'१९९४ पासून पार्सल सर्व्हिस बंद करण्यात आली आहे' ही पाटी पाहत दुकानातल्या आजीबाई दुकानात बसण्याची परवानगी केव्हा देतात याची वाट बघण्याची सवय गेली दोन दशकं पाहत डोंबिवलीकरांना झाली होती. (काही वर्षांपूर्वी ती पाटी गेली तरी अजून पार्सल मिळत नाहीच बरं का!). दुकानातील अतिशय त्रासदायक गोष्ट म्हणजे दुकानात येणारे गिऱ्हाईक याबद्दलचा संताप आजीबाईंच्या बोलण्यात सहजपणे डोकावत असे... आहे.
तसे पाहता काळ लोटत असता मिसळीची इतरही अनेक ठिकाणे डोंबिवलीकरांच्या सेवेला हजर झाली होती. त्यातच काही महिन्यांपूर्वी स्टेशनसमोरच्याच परिसरात भर पडली 'बल्लाळेश्वर मिसळ'ची. मिसळ खायला आणि प्लेट ठेवायला जागा जेमतेमच मिळण्याची सवय असताना 'बल्लाळेश्वर' चे स्वरूप फारच आकर्षक वाटत होते. 'आमच्या कोठेही शाखा नाहीत' हे मिरवण्याऐवजी 'आमच्या अमुक अमुक ठिकाणी शाखा आहेत' हे मिरवायला बल्लाळेश्वराला शोभतही आहे.
बाहेरून पाहताच तिथे जाण्याची इच्छा होतेच. तेथे मिळणारे पदार्थ खास महाराष्ट्रीयन मात्र त्या पदार्थातही वैविध्य आहेच. येथे मिसळ, रस्सा वडा, कांदाभजी याबरोबरच गुलाबजाम, अननसाचा शिरा इथपासून सोलकढीचा आस्वाद आपण घेऊ शकतो. या सर्वांबरोबर कांदापोहे, गवती चहा हेसुद्धा हजर आहेत.
'१९९४ पासून पार्सल सर्व्हिस बंद आहे' हे ऐकण्या ऐवजी इथे पार्सल घेऊन जाणाऱ्याला इतका रस्सा बरोबर मिळतो की तिघांसाठी दोनच मिसळ पार्सल आणल्या असत्या तरी चालले असते हे हटकून मनात येते.
बऱ्याच वेळा पार्सल घरी घेऊन गेल्यानंतर आज मात्र तेथे बसूनच मिसळ खायचे ठरवले होते. सुंदर नेपथ्य असलेल्या त्या उपहारगृहात प्रवेश केल्यावरच प्रसन्न वाटते. मिसळची ऑर्डर दिल्यावर गिऱ्हाईकाकडे तुच्छ कटाक्ष न देता ऑर्डर घेणारा विनयाने निघून गेला. मिसळ आली ती छोट्याश्या ताटलीत नव्हे तर प्रशस्त ताटात आणि थाटात. त्या ताटात मिसळ भरलेला मोठा बाऊल, शेजारी आणखी एक बाऊल भरून एक्सट्रा रस्सा, कांदा लिम्बु, पाव यांच्याबरोबर दह्याची वाटिहि होती. इतके सर्व ठेवूनही त्या ताटात आणखी एक बाऊल राहील इतकी जागा होती. ती जागाही भरून काढण्यासाठी की काय, काहीजण त्या ताटातच गुलाबजाम भरलेला आणखी एक बाऊल घेत होते. खरतर तिथे मिसळ खाणे हा एक सोहळाच होता.
मिसळीचा पहिला घास खाताच जिव्हा तृप्त झाली. येथील रश्याची चव अप्रतिमच! मिसळी बरोबर इतर पदार्थांनी भरलेले हे ताट म्हणजे परीपूर्ण रसास्वादच. मात्र यानंतर सोलकढीचा आस्वाद घेणे ही रसनेच्या आनंदाची परमावाधीच! जीभ आणि पोट दोघांचीहि तृप्तता झाल्यावर बिल देतानाही इथला सेवेकरी तुच्छ कटाक्ष न टाकता मऊ न पडलेली बडीशेप देतो. ती बडीशेप चघळत बाहेर पडत असताना मनात नकळत येऊन जाते, इतकी मिसळ खाण्याचा हा सोहळा अनुभवणे ही तर बल्लाळेश्वराचीच कृपा