रविवार, ३० डिसेंबर, २०१८

उपसंहार

स्वप्न आणि ध्येय यामधील दरी दूर करता आली तरच आपले उद्दिष्ट साध्य होऊ शकते. २८-२९ वर्षांपूर्वी माझा मित्र अविनाश आणि मी डोंबिवली गोवा सायकलसफरीचे स्वप्न पाहिले होते. आपण पाहिलेल्या स्वप्नाला योग्य दिशा, समर्पण वृत्ती, निर्धार, शिस्त आणि निश्चित कालमर्यादा यांची जोड मिळाली तरच त्याचे ध्येयात रूपांतर होऊ शकते.

दुर्दैवाने अविनाशचे २८ वर्षांपूर्वी अचानक निधन झाल्यावर डोंबिवली पणजी सायकलसफरीच्या स्वप्नावर पडदा पडला होता. मात्र ८ वर्षांपूर्वी डिसेम्बर २०१० मध्ये इंदोर झांसी सायकलयात्रा केल्यावर मला गोवासफरीचे स्वप्न पुन्हा पडू लागले. त्यानंतर खऱ्या अर्थाने मी २०१४ साली हे स्वप्न पूर्ण करण्याचा आराखडा पूर्ण केला. मात्र जेव्हा ध्येयापासून नजर दूर होते तेव्हा अडथळा निर्माण होतो. गेली ४ वर्ष हा अनुभव येत होता. 'Man proposes, God disposes' याचा अनुभवही या ४ वर्षात आला होता.

गोवा सफारीबद्दलचा माझा आत्मविश्वास तसूभरही कमी झाला नव्हता, उलट येणाऱ्या अडथळ्यांमुळे तो अधिकाधिक दृढ होत होता. २०१८ च्या सुरुवातीलाच माझ्या अर्धांगिनीने डोंबिवली गोवा सफर करण्यासाठी माझ्याबरोबर येणार असल्याचे मला सांगितले. ह्याबरोबरच मला माझे ध्येय प्रत्यक्षात उतरल्याचाच भास होऊ लागला. खरतर तिने सायकलिंगला सुरुवातच २०१८ जानेवारीच्या अखेरीस केली होती. आणि लगेचच तिने माझ्याबरोबर गोवासफर पूर्ण करण्याचा निश्चय बोलून दाखवला होता. ह्या सफरीसाठी दोघांचा सरावही नियमितपणे सुरु होता. अगदी आदल्या रात्रीपर्यंत अडथळे येत गेले पण मित्रांचे साह्य, शुभेच्छा यांच्या जोरावर ते अडथळे पार होत गेले.

डोंबिवली गोवा -६५० किमीचे अंतर हवाईमार्ग, रेलमार्ग आणि धूर ओकणारी अश्वशक्तीधारी रस्त्याने जाणारी वाहने यांच्या मार्गाने सहज पार करता आले असते. परतीचा प्रवास तेजस एक्सप्रेसद्वारे ९ तासात पूर्ण झालाच की! तर घरापासून करमाळी स्टेशनपर्यंत झालेला एकंदर ६५० किमी प्रवास पूर्ण करण्यास मात्र ५ दिवस सायकलिंग केले होते.

मग सायकलनेच डोंबिवली पणजी प्रवास का? खरतर हा प्रश्न अनेकांनी वेळोवेळी विचारला होता.. सायकलीसफरीआधीही आणि सायकलसफरीदरम्यानही!

वाहतुकीची आधुनिक साधने उपलब्ध असतानाही मनुष्यशक्तीधारी सायकलने ते अंतर पार का करायचे? याचे उत्तर आमचा प्रवास सुरु झाल्या झाल्या मिळू लागले होते. प्रवास सुरु करताना आमची काळजी घेत शिळफाट्यापर्यंत येणारा सुमित, मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर असलेले आप्पा मदान ही तर हक्काची माणसं. आम्हाला वाटेत भेटणाऱ्या माणसांची यादी करायची म्हटली तर एक पुस्तक लिहावे लागेल. अनेक जण प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत तरी मनाने आमच्या बरोबर होते. त्यांच्या शुभेच्छा आम्हाला बळ देत होत्या. खोपीली घाटातील प्रसाद वाटणारा सेवेकरी, आम्हाला खाऊ देण्यासाठी ५०-६० किमी सायकलिंग करत येणारा संतोष कांड, सायकलने जगप्रवास करणाऱ्या वेदांगीची आई- अपर्णा कुलकर्णी हे मूळ डोंबिवलीकर जणू तमाम डोंबिवलीकरांच्या वतीने आमचा उत्साह जागोजागी वाढवत होते. इराणी सायकल पटू, तांडेम सायकलवरील सुदेब रॉय आणि विनीत सराईवाला, शंकर गाढवे, सातारा येथील डॉक्टर क्षोत्री, भुईंज येथील योगेश शिर्के आणि त्यांचे दोन सायकलमित्र, चिंचवड आणि कोल्हापूर येथील सायकलमित्र, डॉ कशाळीकर आणि कुटुंबीय, आंबोली येथील काका भिसे, आजरा येथे भेटलेला उत्सव हा सिद्धिविनायक गणेश मंडळातील कार्यकर्ता, TJSB बँकेच्या सातारा, कराड, कोल्हापूर, म्हापसा, पणजी येथील शाखांतील सहकारी, शालेय मित्र संदीप गुळवणी या सगळ्यांचा आणि इतर अनेकांचा स्नेह जुळण्याला आणि वृद्धिंगत होण्यासाठी ही सायकलसफरच तर कारणीभूत होती.

सातारची केळेवाली असो वा पेठ नाक्यावरील केळेवाला- ह्यांचे प्रेम केवळ सायकलप्रवासातच मिळू शकते.

अश्वशक्तीधारी वाहने वेळ वाचवू शकतात, वैज्ञानिक प्रगती, चमत्कार दाखवू शकतात. मात्र नवनवीन मित्रांच्या ओळखी, त्यांचे प्रेम यांचा खजिना मिळवायचा असेल तर सायकलसफरीशिवाय पर्याय नाही. डोंबिवली गोवा सायकलसफर ५ दिवसात पूर्ण झाली. या सफरीदरम्यानचा प्रत्येक दिवस वेगळा, मात्र अधिकाधिक उत्साह वाढवणारा आणि मैत्रीचा खजिना वाढवणारा होता. ५ दिवसांची सायकलसफर संपवून आम्ही गोव्याला पोचलो तेव्हा अनुभवाने समृद्ध झालो होतो. मित्रपरिवारात भर पडली होती ती केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मकही होती. जुनी नाती अधिक घट्ट झाली होती तसेच नवी नाती प्रथमपासूनच घट्ट झाली होती.

तेजस द्वारे प्रवास वेगवान झाला, अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ घेत वातानुकूलीन वातावरणात चित्रपट पाहत झाला. मात्र तेजस एक्सप्रेसद्वारे परतीच्या प्रवासात केवळ तंत्रज्ञानाशी मैत्री झाली, कोणताही नवीन मित्र जोडता आला नाही. याउलट सायकलिंग प्रवास करताना निसर्गाशी संवाद साधता आला, नवीन मित्र जोडण्याचे / आधीची मैत्री वृद्धिंगत करण्याचे भाग्य लाभले तो आनंद तेजसमध्ये मिळवता आला नाही.
संपूर्ण सायकलप्रवासात 'देणाऱ्याचे हात हजार, किती घेशील दो करांनी' अशी अवस्था झाली होती. इतक्या जणांची मदत झाली की प्रत्येकाचे नावही लक्षात राहणे कठीण.
आपल्या माणसांचे आभार मानू नये असे म्हणतात, म्हणून मी आभार न मानता आपण सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो
आपला सर्वांचा स्नेह असाच वृद्धिंगत होत राहो.

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

स्वप्नपूर्ती -डोंबिवली पणजी सायकलसफर लेख १४

गोवा- म्हणजे महाभारत काळातील 'गोपराष्ट्र'- गायींना चरण्यासाठीचा प्रदेश! परशुरामाने निर्माण केलेल्या कोकणातील हा दक्षिण भाग. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान, लोकसंख्येच्या दृष्टीने ४ थ्या कमी लोकसंख्येच्या या राज्याला नदी आणि कालवे यांनी संपन्न केले आहे.  गोव्यातील लोकांनी या नद्यांना नाव देतानाही एका ऐवजी अनेक नावे देऊन मोकळेपणा जपला आहे.  झुआरी (अघनाशिनी), मांडवी (म्हादेई/ म्हादई/महादयी), तेरेखोल (आरवंद), शापोरा (कोलवाळ/कायसुव), गालजीबाग, तळपदी, साळ ह्या सप्तनद्यांसह कुशावती, बागा (Riviera De Goa), म्हापसा, साळावली, सालेरी ११-१२ प्रमुख नद्या आणि ४२ उपनद्यांनी गोव्याची भूमी सजवली आहे.  झुआरी नदी ९२ किमी लांब, तर गालजीबाग नदी अवघी ४ किमी लांब. झुआरी नदीपासून मांडवी नदीला जोडणारा कुंभारजुवे (कुंभारजुवा) नावाचा कालवा आहे. त्या कालव्यातून छोट्या नावांची आंतरनदी वाहतूक होते.

अश्या ह्या निसर्गाने नटलेल्या राज्यात प्रवेश केल्यानंतर TJSB बँकेच्या म्हापसा शाखेत झालेली स्वागताने श्विन स्कॉट भारावून गेले होते. मात्र पणजी शाखेतही श्विन आणि स्कॉटची प्रतीक्षा होत होतीच. TJSB बँकेच्या पणजी शाखेमध्ये गोवा रिजनचे प्रमुख श्री अरुण भट यांच्याबरोबर पणजी शाखेचे व्यवस्थापक आणि सर्व कर्मचारीही श्विन स्कॉटची वाट पाहत होते. श्री भटसाहेब तर श्विन डोंबिवली गोवा मोहीम आखत असल्यापासून श्विनच्या संपर्कात होते. ह्या मोहिमेबद्दल समजल्याबरोबर त्यांनी श्विनला गोव्यातील वास्तव्य आणि परतीचा प्रवास याबद्दल श्विनला आश्वस्त केले होते. मापुसा शाखेत पोचल्याबरोबर श्विनने भटसाहेबांना तशी माहिती कळवली होती.

मापुसा शाखा ते पणजी शाखा यामधील अंतर जेमतेम १४-१५ किमीचे. श्विन स्कॉटने मापुसा शाखेतील कर्मचाऱ्यांचा निरोप घेऊन पणजीच्या दिशेने कूच केले. मापसा शहरात वर्दळ होतीच. शहर संपून महामार्गाला लागल्यावरही रहदारी बऱ्यापैकी होती. श्विन आणि स्कॉट रस्त्याची डावी बाजू धरून जात होते. वर्दळीचा रस्ता असला तरी खड्डेविरहित आणि रुंद असल्यामुळे मोकळेपणाने वाहतूक सुरु होती. वाहतुकीला अडथळा असलाच तर मध्ये मध्ये लागणाऱ्या सिग्नलचा. श्विन स्कॉट मात्र सिग्नल आला की क्षणभर विश्रांती घेत तो वेळ सत्कारणी लावत होते. पणजी शहर जवळ येत होते तशी उत्कंठा वाढत होती. बराच वेळ किमीचे दगड किंवा पाटी दिसत नव्हती. त्यामुळे पणजी नक्की किती अंतरावर राहिले आहे याचा अंदाज येत नव्हता. श्विन स्कॉट मात्र सिग्नल वगळता सातत्याने पेडल मारत होते. आणि पणजीचे अंतर दाखवणारा फलक नजरेस पडला.




पणजी शहर जेमतेम ३ किमीवर राहिले होते. श्विन स्कॉटने तो क्षण कॅमेरात कैद केला. पुढे लगेचच पणजी शहराला जोडणारा मांडवी नदीवरील पूल लागला. पूवरी हे उपनगर आणि पणजी हे शहर जोडणारा हा पूल ३७७१ मीटर लांब आहे. ह्या पुलावर अश्वशक्तीधारी वाहनांची भाऊगर्दी झाली होती. त्यांच्याबरोबर पुलावरून वेगात पुढे जात असताना श्विन आणि स्कॉट चांगलेच उत्साहित होत होते. पूल पार करत असताना मांडवी नदीचे विशाल पात्र छायाचित्र काढण्यासाठी निमंत्रण देत होते. मात्र एकंदर वर्दळ पाहता ते शक्य नव्हते.  पूल पार केल्यावर पणजी शहराकडे जाण्यासाठी उजव्या बाजूला वळायचे हे श्विनला माहित होते मात्र पूल पार झाल्यावर मात्र भुलभुलैय्यामध्ये अडकल्याप्रमाणे दोघांची अवस्था झाली. थोडावेळ अंदाज घेतल्यावर मात्र त्या भुलभुलैय्याचा उलगडा होत श्विन स्कॉट पणजी शहराकडे वळले. तो भुलभुलैय्या पार केल्यावर ज्या मांडवी पुलावरून श्विन स्कॉट आले होते तो मांडवी पूल पुन्हा एकदा समोर आला होता... मात्र विरुद्ध दिशेने! त्या विशाल मांडवी पुलाला आणि सोबतच्या मांडवी नदीला छायाचित्रबद्ध करायला श्विनला छान संधी मिळाली होती.





 त्यानंतर डावीकडे वळत गुगलकाकांच्या मदतीने श्विन आणि स्कॉट TJSB बँकेच्या पणजी शाखेच्या दिशेने निघाले. श्विनस्कॉटचे तेथे पोहोचेपर्यंत पणजी शाखा बंद झाली होती. तेथील रखवालदाराकडे श्विनने चौकशी केली. भटसाहेब पणजी शाखेतच असल्याचे समजले. श्विन स्कॉटने पणजी शाखेमध्ये प्रवेश करताच भटसाहेब, पणजी शाखेचे व्यवस्थापक आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी श्विन स्कॉटचे स्वागत केले. पणजी येथील TJSB च्या कुटुंबातील सगळे सदस्य शाखा बंद झाल्यावरही श्विन स्कॉटची वाट पाहत थांबले होते.

TJSB च्या कुटुंबातील ह्या सदस्यांशी भेट होताच श्विन स्कॉटही सुखावून गेले. श्विनचे... श्विनच्या मित्राचे... अविनाशचे २८ वर्षापूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले होते. पणजी शाखेमध्ये छोटेखानी समारंभात श्विनस्कॉटला भेटवस्तू देत गोवा रिजनतर्फे सत्कार केला गेला.



खरतर गोवेकरांनी केलेल्या ह्या स्वागताला उत्तर द्यायला श्विन स्कॉटकडे शब्दच नव्हते. उत्तरादाखल श्विनने एवढेच आवाहन केले की,'आपण मदत द्यायला नेहमी तयार असतो, मात्र मदत मागायला आपल्याला संकोच वाटतो. तो संकोच आपण सोडून दिला पाहिजे'. हे सांगण्यामागे होते श्विनलास्कॉटला आलेले सायकलसफरीतील अनुभव. आपण जेव्हा एखादी मदत करतो तेव्हा आपण सुखावतो. मात्र मदत मागताना आपण संकोचतो, कारण त्यावेळी आपल्याला कमीपणा वाटतो. खरेतर देणारा आणि घेणारा दोघेही एकमेकांना पूरक असतात. घेणाऱ्याशिवाय देणाराही अपूर्ण असतो. मात्र हे दोघे एकत्र येतात तेव्हाच बंध घट्ट होत असतात.


सातारा येथील शंकर बागडे, कोल्हापूर येथील संदीप गुळवणी, पणजी येथील श्री अरुण भटसाहेब यांनी श्विन स्कॉटची राहण्याची केलेली सोय न स्वीकारता हॉटेलमध्ये राहिलो असता आमचे जुने बंध अधिक घट्ट होऊ शकले असते का? मूळ डोंबिवलीकर असलेला श्विन स्कॉटला खाऊ देण्यासाठी ५० किमी सायकलिंग करत आलेला संतोष कांड, श्विन स्कॉटची वाट पाहत महामार्गावर दोन दोन तास उभे राहिलेले भूईंज येथील योगेश शिर्के आणि इतर दोन मित्र हे स्वतःहून स्कॉट श्विनला मदत करायला पुढे आले होते. ह्या सर्व मित्रांशी ओळख होण्यामागे, त्यांचा स्नेह जडण्यामागे त्यांचे मदत करणे आणि श्विनस्कॉटने ती स्वीकारणे हे दोन्ही पूरक होते. सातारची केळेवाली सुद्धा अशीच स्वतःहुन काही देऊ पाहत होती. नाईलाजाने तिच्याकडून ती केळी न स्वीकारली गेल्यामुळे तिला नाराज करावे लागले याची खंत श्विन स्कॉटला निश्चितच वाटत होती.


अर्थातच मैत्रीचे बंध घट्ट करण्यासाठी किंवा नवीन बंध निर्माण करण्यासाठी अश्या सायकलसफरींचे निमित्त हे हवेच....

तेव्हा २८ वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाल्यावर श्विनच्या डोळ्यात पुढील स्वप्न तरळू लागले होते. आणि आता श्विनच्या जोडीला स्कॉटही स्वप्न पाहू लागली होती


रविवार, १६ डिसेंबर, २०१८

वेलकम टू गोवा...श्विन -डोंबिवली पणजी सायकलसफर लेख १३

वेगवेगळ्या प्रदेशातील प्रवास हा आपल्याला नेहमी नाविन्याचा आनंद देत असतो. ह्या प्रवासादरम्यान दिसणारा परिसर, माणसे, समाज, तेथील प्राणी, पक्षी, खाणे आणि अगदी मातीचे  निरीक्षणही आपल्याला समृद्ध करत असते. त्यात दक्षिण कोकणातील निसर्ग असेल तर त्यातील काय आणि किती टिपून घ्यावे ह्याला मर्यादाच नाही. 
आज पहाटे आंबोलीहुन निघून सावंतवाडीकडे येताना तो निसर्ग भरभरुन दान देत होता. डॉ सुबोधन कशाळीकर आणि कुटुंबियांचा निरोप घेत स्कॉट आणि श्विन आपल्या पुढील प्रवासासाठी निघाले. सावंतवाडीहून पुढे पणजीकडे जाताना दोन मार्ग असल्याचे कशाळीकरांनी सांगितले होते. त्यातील एक मार्ग सरळ जाऊन बऱ्याच वेळाने महामार्गाला लागणार होता. तर दोन तळ्यांनंतर उजवीकडे जाणारा मार्ग बराच आधी महामार्गाला लागणार होता. कशाळीकरांनी उजवा मार्ग धरायला सांगितला होता. 

विस्तीर्ण आकाराची ती दोन तळी श्विनला मोहात पाडत होती. सयामी जुळ्यांप्रमाणे ती दोन तळी एकमेकांना बिलगलेली होती. एका बाजूला उभे राहिले तर दुसऱ्या तळ्याच्या पलीकडले दृश्य दिसणार नाही अश्या विशाल सयामी तळ्याच्या बाजूने जात श्विन स्कॉटने उजवीकडे वळण घेतले. त्यानंतरही बराचसा रस्ता अरुंद, गावातील असला तरी खड्डेविरहित आणि कमी रहदारीचा होता. कोकणातील नैसर्गिक ठेवा लुटत श्विन आणि स्कॉट झपाट्याने महामार्गाच्या दिशेने जात होते. महामार्ग यायच्या थोड्या आधी दिशा दाखवणारा फलक होता, मात्र तेथून महामार्ग दिसत नव्हता. त्यामुळे पुढे आणखी एखादा फलक असेल असे समजून श्विन स्कॉटने त्याकडे दुर्लक्ष करत वेग कायम राखला. मात्र अनपेक्षितपणे महामार्ग सामोरा आला. हा मार्ग प्रशस्त, खड्डेविरहित तर होताच पण रहदारी अजिबातच नव्हती. मुंबई आणि पणजी कोणत्या दिशेला आहेत ह्याचे कोणतेही फलक तिथे नव्हते. मात्र पूर्वी केलेल्या सायकल प्रवासात मिळालेले दिशाज्ञान इथे उपयोगी पडत होते. स्वयंप्रेरणेने श्विनने डावीकडे वळायचा निर्णय घेतला. तवंडी घाट संपल्यानंतर प्रथमच इतका रुंद महामार्ग सापडल्यामुळे श्विन स्कॉटला बऱ्याच काळाने वेग मिळणार होता. एव्हाना सूर्य पूर्ण तेजाने तळपू लागला होता. ह्या महामार्गाच्या आजूबाजूला वृक्षराजी असली तरी ती महामार्गाला लागून नव्हती, थोडी दूरवर होती. महामार्गामुळे गती मिळाली तरी तळपत्या उन्हात सावली मिळत नव्हती. कोणती वस्ती तर राहोच, जवळपास छोटी टपरीही नव्हती. त्यामुळे स्कॉटला लवकरच उन्हाचा त्रास होऊ लागला. मात्र उन्हात थांबण्यापेक्षा थोडं जलदीने जात जिथे सावली मिळेल तिथे थांबण्यावर श्विनचा कटाक्ष होता. अगदी पाणी पिण्याच्या निमित्ताने क्षणभर थांबायचे असेल तरी एखाद्या वृक्षाची सावली असेल तिथे श्विन थांबत असे. ह्या महामार्गावर मात्र दूरवर काहीही दिसत नव्हते. अखेरीस उन्हातच थांबून तहान भागवली तरी पुढे स्कॉटचा वेग पुन्हा मंदावू लागला होता. 

मात्र गोवा राज्य जवळ येत असल्याचे भान असल्याने श्विन स्कॉट शक्यतो न थांबता पूढे जात होते. मध्यानाची वेळ झाली असली तरी प्रशस्त महामार्ग आणि गोव्याची चाहूल यामुळे पुढील उदरभरण गोव्यात जाऊनच करायचे असे श्विन स्कॉटने ठरवले. काही वेळात सावंतवाडीहून येणारा दुसरा रस्ता आमच्या महामार्गाला येऊन मिळाला. भुकेची जाणीव होत होतीच त्यामुळे तिथे एकेक सफरचंदाची आहुती जठराग्नीला देऊन त्याला थोडे शांत केले. बांदा गाव जवळच असल्याचे फलक दिसत होते. तिथून गोवा राज्याची सीमाही जवळच होती. त्यामुळे बांदा येथे न थांबता श्विन स्कॉटने प्रवास सुरूच ठेवला. TJSB बँकेतील म्हापसा येथील सहकारी श्विन स्कॉटची उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यामुळे पुढील प्रवास लवकर पूर्ण करत म्हापसा येथे पोचण्यासाठी श्विन स्कॉट सुद्धा उत्सुक होतेच. 

थोड्याच वेळात ज्या फलकही श्विन स्कॉट आतुरतेने वाट पाहत होते तो गोवा राज्याचा फलक दिसला. 




'Welcome to Goa' हा फलक पाहताच पुढे फक्त 'सिंघम' हा शब्द आठवत होता. असो, हा फलक पाहताच श्विनला २८ वर्षांपूर्वी श्विनचा मित्र अविनाश ने पाहिलेले स्वप्न सत्यात उतरावल्याचे समाधान होते.  त्याच समाधानात, आनंदात श्विन आणि स्कॉट तेथेच खिळून गेले होते. गोवा राज्याची सीमा ओलांडत असताना तो क्षण क्षणभरात संपावा असे वाटत नव्हते. ४ वर्षांपूर्वी गोवा ते कन्याकुमारी सायकलसफर करताना २०-२५ जणांच्या बरोबर कन्याकुमारी शहरात शिरताना हीच स्थिती श्विनने अनुभवली होती. ज्या क्षणाची इतकी वर्ष वाट पाहिली तो समोर येताच लगेच निसटून द्यायचा ? छे, भलतंच! श्विन स्कॉटने तो क्षण लांबवला. तो क्षण जगण्यासाठी केलेले श्रम घटकेत विसरले होते. तो कायमचा लक्षात राहण्यासाठी त्या क्षणाला छायाचित्रबद्ध करून श्विन स्कॉटने समाधानाने गोवा राज्यात प्रवेश केला.

गोवा राज्यात प्रवेश केल्याचा आनंद मात्र फार काळ टिकू शकला नाही. थोड्या वेळातच तीव्र चढ उतार सुरु झाले. दुपारची वेळ आणि लागलेली भूक यामुळे ते चढ थोडे त्रासदायक वाटत होते. म्हापसा जवळ असल्याने वाटेत न थांबता उदरभरण करायला थेट म्हापसा गाठायचे ठरवले होते, मात्र तहान तर भागवावी लागणार होतीच. रस्त्याच्या कडेला एका मिठाईच्या दुकानात लिम्बु सरबत दिसताच श्विन स्कॉट लगेचच तिथे गेले. त्या दुकानात शालेय वयातील बहीण भाऊच होते. त्या मुलाने बनवलेले सरबत मात्र अप्रतिम होते. त्या सरबताने दिलेल्या उर्जेमुळे श्विन स्कॉट पुन्हा पुढे निघाले. गोवा राज्य सुरु झाल्यानंतर रस्ता थोडा अरुंद झाला असला तरी फारशी वाहतुक नसल्यामुळे श्विन स्कॉट आरामात जात होते. जठराग्नी शांत असला तरी सूर्यनारायणाच्या कृपेने घशाला मात्र वारंवार शोष पडत होता. श्विन स्कॉटकडील पाणी पूर्ण संपले होते. मापुसा अजून दृष्टिक्षेपात नव्हते. त्यामुळे वाटेत एका घरामध्ये श्विन स्कॉटने पाणी मागितले. त्या घरातील बाईने पाणी दिले खरे पण तिच्या बोलण्यावरून गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे जाणवत होते. त्या बाईला धन्यवाद देऊन श्विन स्कॉट पुढे निघाले. आता रस्ता पुन्हा एकाकी होता. श्विन स्कॉट मापुसाच्या ओढीने पुढे पुढे जात होते. महाराष्ट्र सोडला असला तरी गोवा राज्यातील सुरुवातीचा रस्ता महाराष्ट्राच्या सीमेजवळूनच जात होता. समुद्राचे वारे महाराष्ट्राच्या भूमीतून श्विन स्कॉट जात असलेल्या रस्त्यावर येत होते. महाराष्ट्र आणि श्विन स्कॉट जात असलेल्या महामार्गादरम्यान तेरेखोल नदी होती

सतीयादेवी मंदिरापाशी मात्र त्या महामार्गाला महाराष्ट्राच्या सीमेपासून घेऊन जाणारे एक वळण आले. त्या वळणावरून पुढे जाताच एक लांबलचक चढ दिसू लागला. एव्हाना भूकही चांगलीच लागली होती. त्या चढाकडे पाहताच स्कॉट तो चढ चढू शकणार नाही असे श्विनला वाटू लागले. स्कॉटने त्या चढाकडे पाहताच श्विनच्या अपेक्षेप्रमाणेच अभिप्राय दिला. श्विनने मात्र तो चढ पार करून विश्रांती घ्यायचे ठरवले. तीव्र आणि लांब चढ असेल तर गियर कमी करायचे आणि दूरवर न पाहता जेमतेम ५ फुटापर्यंतच नजर ठेवत पेडल मारत राहायचे ही क्लुप्ती श्विन वापरत असे. त्याच युक्तीच्या आधारे तो चढ पार करत असताना श्विनला पुढे एक डावीकडे जाणारे वळण दिसले. मात्र त्या वळणाआधीच रस्त्याच्या बाजूला एक पंजाबी ढाबा दिसला. श्विनचीही दमछाक झाली होतीच. त्यामुळे श्विनने लगेचच त्या धाब्याच्या प्रांगणात प्रवेश केला. स्कॉट पेडल न मारता चालतच हा चढ चढेल त्यामुळे स्कॉटला तिथे येईपर्यंत वेळ लागेल असा श्विनचा अंदाज होता. स्कॉटने तसे बोलूनही दाखवले होते. मात्र पुन्हा एकदा तवंडी घाटाप्रमाणेच स्कॉटने इच्छाशक्तीच्या जोरावर हा चढ श्विनपाठोपाठ लगेचच पार केला. गोवा राज्यात दोन महाराष्ट्रीयन सायकलीस्टचे 'हैप्पी दा पंजाबी ढाबा' स्वागत करत होता. एव्हाना दुपारचे दीड वाजले होते. त्यामुळे येथेच यज्ञकर्म करायचे श्विनस्कॉटने ठरवले. धाब्यामध्ये टेबल पकडल्यावर श्विन स्कॉटने पहिल्यांदा चेहऱ्यावर भरपूर पाणी मारून उन्हाचा तडाखा कमी केला. त्यानंतरच खाद्यपदार्थांकडे पाहिले. पंजाबी धाब्याशिवाय आजूबाजूला काहीही नव्हते. तरी पंजाबी भाजी खाण्याची श्विनस्कॉटची इच्छा नव्हती. त्यामुळे पराठा आणि दही असा फक्कड मेनू स्कॉट श्विनने मागवला.



TJSB बँकेच्या मापुसा शाखेतील शाखा प्रबंधक आणि कर्मचारी श्विन स्कॉटची वाट पाहत होते याची जाणीव श्विन स्कॉटला होती. त्यामुळे धाब्यावर थांबताच मापुसा शाखेची व्यवस्थापक नेहा नागवेकर हिला श्विनने परिस्थितीचा अंदाज दिला. गोवा राज्य सुरु झाल्यावर अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र चढ उतार पार करावे लागत होते आणि त्याचवेळी सूर्यदेव पूर्ण शक्तीनिशी तळपत होता. परिणामी श्विन स्कॉटने नाष्टयाबरोबर थोडावेळ विश्रांतीही येथे घेतली. ताजेतवाने झाल्यावर श्विनस्कॉटने पुन्हा संथगतीने सुरुवात केली. आता पाण्याची बेगमी झाली होती आणि जठराग्निही तृप्त झाला होता. त्यामुळे थेट TJSB ची मापुसा शाखा गाठायचे श्विन स्कॉटने ठरवले. थोड्याच वेळात मापुसा शहरात जाणाऱ्या रस्त्याला श्विन स्कॉटने वळण घेतले. आता मापुसा शाखेत आपण सहजच जाऊ असा विचार श्विनच्या मनात आला. मात्र मापुसा शहारानेही श्विनस्कॉटची सहनशीलता जोखण्याचे ठरवले होते. ह्या शहरातही तीव्र चढ उताराच्या मालिकेने श्विन स्कॉटला भंडावून सोडले. जसजशी शाखा जवळ येत होती तसतशी श्विनस्कॉटची चाल मंदावू लागली होती.... सर्व चढ उतार पार करून श्विनस्कॉट मापुसा शाखेत पोचले.

मापुसा शाखेची व्यवस्थापक नेहा नागवेकर, गोवा रिजन कार्यालयातील फिरोझा आणि मापुसा शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांनी श्विन स्कॉटचें जे स्वागत केले ते पाहून श्विन स्कॉटचा थकवा पार नाहीसा झाला.








मापुसा शाखेत सर्व कर्मचाऱ्यांशी ओळख करून घेत असताना सगळेजण श्विनस्कॉटचे कौतुक करत होते. शाखेतील सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचाऱ्यासह सगळेजण श्विनस्कॉटची विचारपूस करत होते. आपला दूरवर राहणारा नातेवाईक बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर होणारा आनंद नेहासह सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्या वातावरणात श्विन स्कॉटही भारावून गेले होते. श्विनस्कॉटची मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मापुसा शाखेत मिठाई वाटली गेली. सगळ्यांबरोबर गप्पा मारायला आनंद साजरा करायला दिवसही अपुरा पडला असता मात्र अजून पणजी शहर दूर होते. मापुसा शाखेहुन पुढे पणजीकडे निघताना शाखेतील व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना ज्या प्रमाणे श्विन स्कॉटबरोबर बोलायला कमी वेळ मिळाल्याची खंत होती तशीच खंत श्विन स्कॉटलाही पणजीकडे कूच करताना वाटत होती

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१८

आंबोलीचा घाट -डोंबिवली पणजी सायकलसफर लेख १२

आंबोली येथे पहाटे जाग आल्यावर श्विन, स्कॉटने चहापानासाठी फेरफटका मारला, तेव्हा नगरवासीय साखरझोपेतच होते. आजचा प्रवास सुरु होताच १५- २० किमी घाट उतरायचा होता. तसेही आधीच्या दिवसांपेक्षा एकूण अंतरही कमी असणार होते. त्यामुळे श्विन, स्कॉट निश्चिन्त होते. मात्र डोंबिवली पणजी सायकलसफरीचा शेवटचा दिवस असल्याने उत्सुकताही होती. वाटेतील सुरुवातीचा मार्ग उताराचा आणि जंगलातील असल्याने थोडे उजडल्यावर निघायचे ठरवून श्विन स्कॉट जराशा आरामातच आवरत होते.
सर्व तयारी होऊन जराशा आरामात श्विन स्कॉटने सावंतवाडीच्या दिशेने मोर्चा लावला तेव्हा फटफटू लागले होते. पहाटेची सोनकिरणे अवतरु लागली होती.






आंबोली सोडत असताना आजूबाजूचा निसर्ग मात्र आम्हाला स्थानबद्ध करू पाहत होता. पावलापावलावर (की पेडल पेडल वर!) निसर्ग त्याची लोभसवणी रूपं आमच्यासमोर उलगडत होता. श्विन स्कॉटवर आंबोलीच्या निसर्गाने मोहिनी टाकल्यामुळे क्षणाक्षणाला पेडल मारायचे थांबू लागले.  आंबोली बाहेर पडताना 'देव पूर्वीचा वस', या मंदिरात दर्शन घेण्यासाठी डॉ सुबोधन कशेळीकर यांनी आवर्जून सांगितले होते. रस्त्याच्या उजव्या बाजूला ते मंदिर दिसताच श्विन स्कॉट तेथे वळले. 




मंदिरापाशी थांबल्यावर वेगाने वाहणारा वारा श्विनला लावलेल्या फलकांशी दंगामस्ती करु लागला. श्विन स्कॉटच्या आगमनाने तो वाराही बेभान झाल्याप्रमाणे उधळत होता. जणू त्याच्या पंखावर बसूनच श्विन स्कॉटने घाट उतरावा असे तो सुचवत होता. त्या वाऱ्याशी थोडावेळ खेळून श्विन स्कॉट पुढे निघाले खरे, मात्र उजव्या बाजूच्या दरीतील सौंदर्य पुन्हा पुन्हा खिळवून ठेवत होते. काही वेळातच श्विन स्कॉट आंबोली येथील प्रमुख धबधब्यापाशी पोचले. दुधाच्या धारेप्रमाणे वाहणारा तो प्रवाह उत्तुंग उंचीवरून खाली येत होता. इतरही काही पर्यटक त्याच्या धारेत न्हाऊन निघत होते.



 ते सौंदर्य टिपून श्विन स्कॉट पुढे निघाले पुढच्याच वळणावर घाटातील वारा आणि निसर्ग यांनी श्विन यांना पुन्हा अडवले. तेथे श्विन स्कॉटने पुन्हा मनसोक्त वारा अंगावर घेतला. घाटाचा उतार असल्यामुळे थांबत परत पेडलिंग सुरु करायला अडचण नव्हती. त्याचा फायदा घेत जागोजागी थांबत श्विन स्कॉट आंबोली घाटातील निसर्गाचा आनंद घेत होते.






 काही वेळाने मात्र घाटातील रस्त्यात खड्यांचे साम्राज्य सुरु झाले. घाट चढताना दम लागला तर थांबता येते, मात्र उतारावर वेग आपोआप मिळत असला तरी ते खड्डे चुकवताना कसरत करावी लागत होती. स्कॉटची इथे खरी कसोटी होती, कारण खंडाळ्याचा घाट उतरायचा अनुभव असला तरी तेथील रस्ता गुळगुळीत होता. आंबोली घाटात तब्बल १५ किमी चा उतार खड्डे चुकवत उतरायचा होता. स्कॉटचा वेग कमालीचा मंदावला. स्कॉटकडे लक्ष ठेवता यावे म्हणून सुरुवातीला श्विनने स्कॉटला पुढे राहायला सांगितले होते. मात्र खड्डे चुकवताना होणाऱ्या तारांबळीमुळे स्कॉटने श्विनलाच पुढे जायला सांगितले. सरळ रस्त्यावर किंवा महामार्गावर पुढे असताना श्विन अधूनमधून मागे वळून स्कॉटवर लक्ष ठेवत असे. मात्र आंबोली घाटातील उतारावर खड्डे चुकवत तसे करणे शक्य नव्हते. थोडा वेळ श्विनने तसा प्रयत्न केला, पण ते शक्य नसल्याचे लक्षात येताच घाट संपल्यावर वाट पाहण्याचे आश्वासन स्कॉटला देऊन श्विनने उताराचा फायदा घेत वेग घेतला.

ह्या वेगात खड्डेही श्विनचे स्वागत करत होतेच. त्यामुळे अनेक वेळा खड्डयांचा दणका सहन करत जाणाऱ्या श्विनने परिधान केलेल्या पुढच्या दिव्याने श्विनची साथ सोडली. त्या दिव्याने साथ सोडताच श्विन जागीच थांबली. हा घाटातील रस्ता पूर्णपणे जंगलातूनच जात होता. थांबल्यावर श्विनने समोर पाहिले तर तिथे वळणावर एक फलक लावला होता. त्या फलकावर वाघाचे चित्र होते आणि त्या चित्राखाली 'येथून वन्यप्राणी जात असतात' अश्या अर्थाचा संदेश लिहिला होता. सीटवरून वाकून दिवा उचलता येत नव्हता. दिवा बरोबर U आकाराच्या वळणावर रस्त्याच्या मधोमध पडला होता. पायउतार होऊन दिवा घ्यायचा तर मागून किंवा पुढून येणारे कोणतेही वाहन गळाभेट घेण्याची शक्यता होती. म्हणजे दिवा उचलताना थांबणे म्हणजे वाघ की वाहन एवढाच पर्याय शिल्लक होता. तसे रस्त्यावर वाहतूक तुरळक होती, त्यामुळे वाहनाचा पर्याय श्विनने बाजूला ठेवला. राहता राहिला वाघ किंवा अन्य जंगली प्राणी यांचा पर्याय! श्विनने न थांबता जायचे म्हटले तरी वाघ किंवा इतर वन्य प्राण्यापेक्षा वेगात जाता येणारच नव्हते. त्यामुळे श्विनने पायउतार होत शांतपणे दिवा उचलला. त्या दिव्याची मात्र वाताहात झाली होती. त्या दिव्याचे झालेले तुकडे बरोबर घेत श्विन पुढे निघाली. घाट संपल्यावर स्कॉटची वाट पाहण्यासाठी श्विन थांबली. मात्र अगदी पाठोपाठच स्कॉट तिथे पोचली. घाटाचे सौंदर्य, रस्त्यातील खड्डे यांच्यामुळे १५ किमी चा घाट उतरायला बराच वेळ गेला होता. त्यामुळे घाट संपल्यावर जे पहिले गाव लागेल तिथे चहा घ्यायचा निर्णय श्विन स्कॉटने घेतला. सुदैवाने चहाही लगेचच मिळाला. तेथून डॉ सुबोधन कशाळिकर यांना संपर्क साधून आम्ही सावंतवाडी येथे पोचत आहोत याची वर्दी दिली. पुढील रस्ता अरुंद असला तरी खड्डेविरहित होता. त्यामुळे थोड्याच वेळात सावंतवाडी येथे पोचलो. डॉ कशाळिकर त्यांच्या दवाखान्यात होते. त्यांनी त्यांच्या घरी जायचा मार्ग भ्रमणध्वनी द्वारे कळवत तेही थोड्याच वेळात घरी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी शहरातील रस्ते थोडे अरुंद होते आणि बऱ्यापैकी गजबजलेले होते... म्हणजे आंबोली सोडल्यावर हेच पहिले शहर श्विन स्कॉटला नजरेस पडत होते. श्विन आणि स्कॉट आडनावाचे वैद्य असले तरी कशाळिकर पती पत्नी व्यवसायाने वैद्य होते. म्हणजेच वैद्यांच्याच घरी वैद्य जात होते. डॉ कशाळिकर यांच्या बंगल्याच्या आवारात पाहिल्यावर मात्र श्विन स्कॉटची चटकन बंगल्यातील दरवाजा उघडण्याची हिम्मत झाली नाही. खरतर श्विनला लहानपणापासून श्वानांबद्दल प्रेम होते, मात्र गेल्या काही वर्षात रस्त्यांवरील श्वानांचा धसका घेतल्यामुळे श्विन जरा काळजी घेत असे. डॉ कशाळिकर यांच्या बंगल्याच्या आवारात तर श्वानच सामोरे होते. घरातील कोणाला हाक मारायची असल्यास घराचे दार आवारातील दरवाजापेक्षा बरेच आत होते. त्यामुळे हाक ऐकू जाईल याची खात्री नव्हती. श्वानाला पाहून श्विन आणि स्कॉट बाहेरच घुटमळत असताना पुष्कर कशाळिकर स्वागताला आला. त्याबरोबर श्विन स्कॉटला हायसे वाटले.

आता श्वानाबरोबर मैत्री करायला श्विनची हरकत नव्हती. श्विन आणि स्कॉट बंगल्यात शिरले आणि डॉक्टर कशाळीकरांच्या डॉक्टर पत्नीनेही स्वागत केले. थोड्याच वेळात गरमागरम नाश्ता श्विन स्कॉटसमोर आला. दोनच दिवसात पुष्कर BRM करण्यासाठीही जाणार होता. पुष्कर सोबत गप्पा मारत नाश्ता सुरु होता. इतक्यातच डॉ सुबोधन कशाळीकरही घरी आले. नाश्ता, चहा आणि गप्पा चांगल्याच रंगत होत्या. खरतर संध्याकाळपर्यंत पणजी गाठायची होती. मात्र कशाळीकर कुटुंबाच्या आदरातिथ्यापुढे श्विन स्कॉटला त्याचा विसर पडला होता. अर्थात त्यांच्या बरोबर गप्पा मारायला दिवसही पुरेसा नव्हताच. त्यामुळे आपण आदल्या रात्रीच मुक्कामाला सावंतवाडी गाठायला हवी होती असे मात्र वाटू लागले. श्विनच्या एका फोनवर काही महिन्यांपूर्वी एका इराणी दाम्पत्याची एका रात्रीची सोय डॉकटरांनी केली होती. त्यावेळी घरात झोपायची सोय असूनही ते इराणी दाम्पत्य गच्चीमध्ये स्लीपिंग बॅग वा तंबूमध्ये झोपले होते. ही हकीकत श्विनला गप्पाच्या ओघात कळली तेव्हा मात्र डोंबिवली पणजी सायकलसफारीतील पहिल्या दिवशी भेटलेल्या आणि प्रत्येक रात्र पेट्रोल पम्पवर घालवणाऱ्या इराणी माणसाची आठवण आली.
गप्पा अवरत्या घेत श्विन आणि स्कॉट सफरीच्या पुढील मार्गावर निघायला तयार होऊ लागताच सुबोधन आणि पुष्कर यांनी दोघांच्या सायकलची तब्बेतही तपासली. हे दोघ सायकलींचेही निष्णात डॉक्टर होते. श्विन स्कॉटने पुढे कूच सुरु केली ती डॉक्टर कशेळीकरांचे फिटनेस सर्टिफिकेट घेऊनच!

बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

तलासरी मोहीम - लेख ३

तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमात आम्हाला ब्राह्म मुहूर्तावरच जाग आली. आमची आवराआवर होईपर्यंत आश्रमशाळेतील सहकारी आमच्यासाठी चहा आणि बटर घेऊन आले. आपापल्या सायकलमधील हवा चेक करून सगळे तयार झाले तेव्हा अंधाराचे जाळे फिटले नव्हते. साहजिकच प्रत्येकाने हँडलला लावलेला दिवा आणि सिट किंवा हेल्मेटमागे लावलेला दिवा सुरु केला. 'गणपती बाप्पा मोरया' ची आरोळी देऊन आम्ही वनवासी कल्याण आश्रमाचा निरोप घेतला.

अंधार असल्यामुळे सगळेजण एका रांगेत शांतपणे जात होते. २० ट्रक एका वेळी जाऊ शकतील अश्या चेकपोस्ट पार करताना मात्र थोडी धांदल उडाली. सुनील ननावरे यांचे प्रत्येकाच्या सायकलकडे बारीक लक्ष होते. श्विनच्या साखळीतून येत असलेला आवाज त्यांनी लगेच टिपला. पुढे येणाऱ्या पेट्रोल पंपावर सगळ्या सायकली वळवत प्रत्येकाने आपापल्या सायकलच्या साखळीत तेल टाकले. एव्हाना पुरेसे उजाडले होते. लवकरच महालक्ष्मी मंदिर मागे पडून चारोटी नाका आला.


 इथून पूढे १५-२० किमी पाणीही मिळणार नाही त्यामुळे इथेच नाश्ता करण्याची सूचना श्विनने केली. K2K सफरीतील सायकलस्वारांना बऱ्याच दिवसांनी दाक्षिणात्य पदार्थ खायला मिळत होते. त्यामुळे सगळेजण खुश होते. प्रत्येकजण आपापली मागणी नोंदवत होता. मात्र त्यामुळे त्या उपहारगृहात सेवक पार गोंधळून जात होता. प्रत्येकाने मनपसंत नाश्ता केल्यावर पून्हा आमची सफर सुरु झाली. सगळेजण वेगात पुढे जाऊ लागले आणि श्विनला आधल्या दिवशी मनोर नाका ते तलासरीपर्यंत वेग का घेता येत नव्हता याचा उलगडा झाला. मनोर नाका ते तलासरी पर्यंत काही अपवाद वगळता रस्त्याला चढ होता. त्याची तीव्रता फार नसल्याने तो चढ दिसत/ जाणवत नव्हता. मात्र आज उलट दिशेने उतारावरून मनोरच्या दिशेने जाताना श्विनला मिळालेल्या वेगामुळे उलगडा झाला होता.

दरम्यान आता १० जण एकत्र जाण्या ऐवजी ३-४ च्या गटागटामध्ये विभागणी झाली होती. पुढील रस्ता दाखवण्यासाठी श्विन पुढील गटात होती. श्विनबरोबर आणखी ३ सायकलस्वार थोड्याच वेळात मनोर जवळ पोचले. मनोर येथे वाहतूक नियंत्रक मोठ्या वाहनांना वाड्याच्या दिशेने वळवत होते. इथून पुढे वाड्याच्या दिशेने जायचे की अहमदाबाद मुंबई महामार्गानेच सरळ वसई - चिंचोटी मार्गे भिवंडी गाठायची याचा निर्णय घ्यावा लागणार होता. गुगलनकाशा पाहिला असता वाडा भिवंडी मार्ग आजही कालप्रमाणेच अश्वशक्तीधारी वाहनांनी गजबजलेला दिसत होता. मागून येणाऱ्या सर्व सायकलपटूंची वाट पाहत आमचा गट थांबला. सगळेजण आल्याची खात्री करताच श्विनने वाड्याकडे न वळता थेट चिंचोटी नाका गाठायची सूचना केली. मोठी वाहने वाड्याकडे वळली असल्याने चिंचोटीकडे जाणारा पुढील महामार्ग मोकळा होता. श्विनने आणखी ३-४ जणांसह पुन्हा आघाडी घेतली. डोंबिवली सायकल क्लबचे (DCC) सदस्य आमची वाट पाहत असल्याने आमचा मार्ग लगेचच DCC च्या समूहावर कळवला. तेथून थोड्या अंतरावर एका सदस्याला गेल्या १५ दिवसांच्या प्रवासादरम्यान केलेल्या उदरभरणामुळे त्रास होऊ लागला. खरतर आधीच्या रात्रीपासूनच त्रास होत असला तरी त्यांनी जिद्दीने सकाळी ५०-६० किमी अंतर कापले होते. त्यांना टेम्पोने वसई नाका येथे उतरायला सांगून गटातील इतर लोक मार्गक्रमण करू लागले. दरम्यान थोड्याच अंतरावर सकवार गावात महामार्गागलगतच रामकृष्ण मठ असल्याचे समजले. त्याबरोबर तिथेच जेवण करून आराम करायचे ठरले. टेम्पोने पुढे गेलेल्या सदस्याला त्याची कल्पना दिली. मात्र त्यांची अवस्था बिकट असल्याने त्यांनी दुसरा टेम्पो पकडून थेट डोंबिवली गाठायचे ठरवले. आमचा आणखी एक सहकारी पूढे गेलेला होताच. त्या दोघांना बरोबर जायला सांगून आम्ही रामकृष्ण मठात थांबलो. तेथील प्रसादाचे जेवण झाल्यावर आवारातील बागेत सर्वजण आडवे झाले.





DCC ची सदस्य ममता परदेशी वज्रेश्वरी येथे गेली होती. तिला सर्व सायकलस्वार वाडा मार्गे न जाता वसई मार्गे जाणार असल्याचे समजताच तिने संपर्क साधला. वज्रेश्वरी फाटा आणि चिंचोटी या दोन्ही मार्गाची चाचपणी करायचे ठरवून श्विनने ममताला वज्रेश्वरीपासून मुंबई अहमदाबाद महामार्गाला येणाऱ्या रस्त्याची पाहणी करायला सांगितले. दरम्यान आम्हा ५-६ जणांची वामकुक्षी सुरु असली तरी आणखी २ सदस्य मात्र रामकृष्ण मठापर्यंत पोचले नव्हते. त्यांच्यापैकीही एकाच्या पचनसंस्थेने घात केल्याचे समजले. हळूहळू मार्गक्रमण करत त्यांनीही यथावकाश रामकृष्ण मठ गाठला. त्यांचे जेवण होईपर्यंत ३.३०-४ वाजले होते. चहाची वेळ झाल्याने मठातील सेवकांनी चहाचे निमंत्रण दिले. ते फेटाळणे शक्यच नव्हते.

शेवटी आलेल्या दुक्कलीने टेम्पोने डोंबिवली गाठायचा निर्णय जाहीर केल्यावर उरलेल्या K2K सायकलपटूंसह श्विनने पुढे कूच केले. दरम्यान ममता परदेशीने वाटेत चौकशी करून एक मार्ग विचारून ठेवला होता. त्यामुळे चारोटी नाक्याला जावे लागणार नव्हते तर वज्रेश्वरी अंबाडी भिवंडी ह्या मार्गानेही ह्या मार्गानेही जावे लागणार नव्हते. अहमदाबाद मुंबई मार्गावर वज्रेश्वरीला जाण्यासाठी शिरसाड येथे वळावे लागते. तेथून ५ किमी वर पारोळ गावाहून एक वाट वज्रेश्वरीला जाते तर दुसरी वाट देपिवली-तिल्हेर-जुनांदुरकी गावाहून भिवंडीला जातो. आम्ही हाच शिरसाड- पारोळ- जुनांदुरकी मार्ग निवडला. सुनील ननावरे यांच्या संपर्कात राहत याच मार्गात ममता परदेशी K2K च्या चमुला सामील झाली. शिरसाड- पारोळ- जुनांदुरकी मार्ग हा तुंगारेश्वर अभयारण्यातून जात होता. रस्त्याच्या आजूबाजूला घनदाट झाडी होती. त्यातील एका तळ्याने मात्र श्विनला खिळवून ठेवले.




सकवार गावातील रामकृष्ण मठ सोडून बरेच अंतर मागे पडले होते त्यामुळे पुन्हा जठराग्नी जागृत झाला होता. मात्र अभयारण्यात असताना खाण्यासाठी उपहारगृह उपलब्ध नव्हते. सकाळी तलासरीहून निघताना सुनील ननावरे यांनी दिलेल्या सुकमेव्याच्या पुरचुंडीचा पुरेपूर आस्वाद घेत श्विनने जठराग्नीला आहुती दिली. अभयारण्याचा भाग संपल्यावर लाखीवली गावात चहा बिस्किटांनी त्या आहुतीत भर पाडली.
 मात्र आता तेजोनिधी मावळायला लागला होता.



 पूर्ण अंधार पडण्यापूर्वी भिवंडी गाठणे आवश्यक असल्याने सगळेजण गती वाढवू लागले. जुनांदुरकी गाव पार करत असतानाच एक मोठ्ठा आवाज ऐकायला आला. एका सायकलची ट्यूब फुटली होती. सुदैवाने समोरच नारायण कृष्णा पाटील यांचे घर होते. त्यांच्या कुटुंबियांसमोरच हा प्रकार घडला होता. त्यांनी ताबडतोब सर्व सायकल पटूंना आमंत्रण दिले. सुनील ननावरे लगेचच दुरुस्तीच्या कामाला लागले. दरम्यान पाटील कुटुंबीय अगदी आपुलकीने सर्वांचा पाहुणचार करत होते. दुरुस्ती होईपर्यंत पूर्ण अंधार पडला होता. काम पूर्ण होताच सगळे सायकल पटू पुढे निघण्यासाठी तयार असताना पाटील कुटुंबीय त्यांना तसेच सोडायला तयार नव्हते. पाटील कुटुंबियांनी जेवण करूनच जायचा आग्रह केला. मात्र पुढे डोंबिवली पर्यंत पोचायचे सांगून आम्हाला त्यांचा आग्रह मोडायला लागला.

तेथून आम्ही भिवंडी गाठली आणि तेथून मात्र निव्वळ अडथळ्यांनाची शर्यत सुरु झाली. भिवंडी शहर सोडून पुढे जातोय न जातोय तोच सुनील ननावरे यांच्याच सायकलचे चाक रुसले. मात्र रस्त्यात पंक्चर काढायलाही जागा नव्हती. अखेर ननावरेंनी हवा भरून पुढे जायचा निर्णय घेतला. सुदैवाने कोणगाव, दुर्गाडी पूल येथे पूर्ण मोकळा रस्ता मिळाला. पुढे कल्याण येथे नमस्कार मंडळ येथे तब्बल अडीच तास उशिरा पोचल्यावरही मंडळाचे सर्व कार्यकर्ते K2K वीरांचे स्वागत करायला थांबले होते. त्यांच्याबरोबर चहापान झाल्यावर मात्र दुर्गाडी- ९० फूट रस्ता मार्गे सर्वजण जलदीने थेट डोंबिवली मध्ये क्रीडाभारतीच्या कार्यालयात पोचले.  तेथे DCC (डोंबिवली सायकल क्लब), क्रीडाभारती, NYO (नॅशनल युथ ऑर्गनायझेशन) च्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पहाटे ५.३०-६ ला सुरु झालेला K2K च्या सदस्यांचा दिवस संपला तेव्हा घड्याळबाबा रात्रीचे ११ वाजल्याचे दर्शवत होते.



तलासरी मोहीम- लेख २

 तलासरी तेथील वनवासी कल्याण आश्रमात स्वागत झाल्यावर श्विनने थोडावेळ स्नायू मोकळे केले. चिंचवड येथील काश्मीर ते कन्याकुमारी (K2K) सफरीवर निघालेल्या मित्रमंडळींचा मात्र काही पत्ता नव्हता. काही वेळाने तेजोनिधीनेही त्याची किरणे आवरती घेतली आणि अंधाराचे साम्राज्य पसरले. K2K चे नेतृत्व करणारे सुनील पाटील आणि सुनील ननावरे यांना भ्रमण ध्वनी मार्फत संपर्क केला असता ते जवळपास पोचल्याचे समजले. त्यांना तलासरी जवळील उड्डाणपूल न घेता सेवा रस्त्याने यायला सांगून वनवासी कल्याण आश्रमातील दोन सहकारी आणि श्विन आश्रमसमोर येऊन थांबले. आजूबाजूला मिट्ट काळोख पसरला होता.
सेवा रस्त्यावर तुरळक वाहने येत होती. त्यांचे दिवे दिसले की K2K तील स्वार आले असे वाटत होते. मात्र ते जवळ येताच भ्रम दूर होत होता. आमची उत्सुकता वाढली होती.बऱ्याच वेळाने संथ गतीने जवळ येणारे दिवे सेवा रस्त्याला दिसू लागले. श्विनने हॅन्डलला लावलेला दिवा चालुबंद असे करत इशारा दिला. त्याबरोबर तसाच इशारा समोरून मिळाला. तेव्हा मात्र K2K मोहिमेतील सायकलस्वार आल्याची खात्री झाली. त्यांना सायकली उभ्या करण्याची जागा दाखवून श्री वसंत भुसार यांच्या भेटीला कार्यालयात गेलो. सगळ्यांबरोबर पुन्हा चहापान केले. सगळ्यांच्या भेटीने आनंद झाला होता.

NYO (नॅशनल युथ ऑर्गनायझेशन) आणि क्रीडाभारतीचे डोंबिवली येथील सदस्य श्री कमलाकर क्षीरसागर यांनी श्विनला तलासरी येथील आश्रमशाळेतील मुलांबरोबर K2K मधील साहसवीरांची चर्चा घडवून आणायला सांगितले होते. श्विनने तलासरी येथे पोचल्यावर श्री वसंत भुसार यांच्याशी त्याबद्दल विचारणा केली होतीच. वेळ बराच झाला असल्याने K2K मधील साहसवीरांनी चहापानानंतर लगेचच चर्चेची तयारी दाखवली. सर्व मुलांची जेवणं झाली होतीच. त्यांना पटांगणात जमा व्हायला सांगताच सगळे विद्यार्थी शिस्तबद्धरित्या पटांगणामध्ये येऊन बसले. ह्या वनवासी कल्याण आश्रमात साधारण १५० मुले आणि ७५ मुली राहत होत्या. तसेच शाळेत एकंदर ६००-७०० एकंदर विद्यार्थी होते. आश्रमाची जागा विस्तीर्ण होती. याच ठिकाणी गोशाळा ही होती. येथील पूर्वीचे अध्यक्ष श्री वैद्य काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी येथे गेल्यावर श्री वसंत भुसार येथील केंद्राची जबाबदारी सांभाळत होते. अतिशय नम्र, मृदू स्वभावाच्या ह्या अध्यक्षांना येथील सर्व सहकारी तळमळीने साथ देत होते. सगळ्यांची निरपेक्ष वृत्ती तसेच नम्र स्वभाव छाप पाडत होता. प्रास्ताविक होताच सर्व K2K साहसवीरांबरोबर श्विनने आपापला परिचय करून दिला. काश्मीर पासून सुरु झालेल्या प्रवासाचा हा १५ दिवस होता. त्यातही महाराष्ट्रातला १ ला च दिवस. जवळपास दोन आठवड्या नंतर मातृभाषेत संपर्क साधता आल्याबद्दल K2K साहसवीरांनी आनंद व्यक्त केला. मुलांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारत आपापले अनुभव हे साहसविर सांगत होते. पंजाब आणि तेथील माणसांबद्दल सायकलवीर आत्मीयतेने बोलत होते. सर्व विद्यार्थी त्यांचे अनुभव शांततेने ऐकत होते. 'महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या दुरावस्थेप्रमाणे राजस्थानमध्येही स्थिती आहे का?', या प्रश्नावर उत्तर देताना सायकल पटूंनी स्पष्ट केले की सायकलसफरीचा उद्देश गडकिल्ले पाहणे हा नसून विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार करणे हा असल्याने मनात असूनही गडकिल्ले पाहता आले नाहीत. श्विनने मात्र स्पष्ट केले की राजस्थानमधील राजे सरदार यांनी प्रथम मोगल व नंतर ब्रिटिशांचे मांडलिकत्व स्वीकारले त्यामुळे त्यांचे गड सुरक्षित राहिले, मात्र महाराष्ट्रातील स्वराज्याच्या सरदारांनी ब्रिटिशांना कडवा प्रतिकार केल्यामुळे ब्रिटिशांनी रायगडसह मराठा साम्राज्यातील गडकिल्ले जाळून, तोडफोड करून उध्वस्त केले.

वनवासी कल्याण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेले एकेक चित्र देऊन सर्व सायकल पटूंचा सन्मान केला गेला. त्यानंतर आश्रमशाळेतील सहकाऱ्यांबरोबर सर्व K2K साहसविर आणि श्विनने भोजन केले. त्यानंतर K2K सायकल पटूंनी विसावा घेतला तो दुसऱ्या दिवशीच्या सफरीचे नियोजन श्विनकडे सोपवून!






सोमवार, १० डिसेंबर, २०१८

तलासरीची मोहीम - लेख १

'काश्मीर ते कन्याकुमारी' सायकलप्रवास हे स्वप्न प्रत्येक भारतीय सायकल पटू पाहत असतात. चिंचवड येथील निसर्गमित्र यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या प्रसारासाठी जम्मू ते कन्याकुमारी असा २८ दिवसांचा सायकलप्रवास करायचा ठरवले. त्यांच्याबरोबर श्विननेसुद्धा हा प्रवास करायचे ठरवले. मात्र काही वैयक्तिक अडचणींमुळे श्विनला हा बेत रद्द करावा लागला होता.

निसर्गमित्रसमूहाचा ९ जणांचा गट मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जम्मूहून निघून पंजाब, राजस्थान, गुजरात मार्गे १६ व्या दिवशी तलासरी येथे पोचणार होते. त्या दिवशी आंग्ल दिनदर्शिकेतील डिसेम्बर महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती, तर दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होतीच. ह्या जोडसुट्टीचा फायदा घेत निसर्गमित्रांच्या मोहिमेतील किमान एक दिवस तरी सहभागी होण्याची संधी साधण्यासाठी त्यांना तलासरी येथे गाठण्याचे श्विनने ठरवले. शनिवारी सकाळी ७.३० ला डोंबिवली हुन सायकलिंगला सुरुवात केली तेव्हा वैशाल धरमसी साथ करायला आला होता. मात्र तो फार लांब येणार नसल्याचे त्याने आधीच स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे तो कल्याणहून परत गेला.

तिथून पुढे तलासरीपर्यंत 'एकला चालो' करायचे होते. भिवंडी शहरात जाण्या ऐवजी श्विनने ठाणे नाशिक महामार्ग निवडला. ह्या महामार्गाने पूढे जाऊन भिवंडी शहर टाळण्याचाच हा प्रयत्न होता. ह्या मोकळ्या आणि प्रशस्त महामार्गावर श्विनला वेग मिळू लागला होता. अर्थातच तलासरीला जाण्यासाठी ह्या महामार्गावर फार लांब जाता येणार नव्हते. त्यापुढे मात्र गुगलनकाशाचा आधार घेत वडपे जवळ नाशिक महामार्ग सोडला. पाइपलाइन रस्ता पकडून श्विन मजेत जात होती.




खालींग आणि चावे या गावांदरम्यान दरम्यान शहरीकरणाचा मागमूस दिसत नव्हता. जेमतेम एक दोन बैलगाड्या जातील एवढ्या रुंद रस्त्यावर रहदारी मात्र अजिबात नव्हती. आजूबाजूला असलेल्या निसर्गामुळे श्विनचा उत्साह वाढत होता. लवकरच खडबडीत रस्ता सुरु झाला. MTB श्रेणीतील श्विनला मात्र त्याची फिकीर नव्हती. किंबहुना सायकल दौऱ्यावर MTB चीच निवड का करावी हे कळण्यासाठी हा आदर्श रस्ता होता. त्या रस्त्याबरोबर झटापट करत श्विनने चावे गाव पार केले आणि महापोली ह्या गावाजवळ भिवंडी वाडा रस्त्याला लागली. आणि.... भिवंडीकडे जाणाऱ्या अश्वशक्तीधारी चार,सहा आणि बहुचाकी वाहनांची लांबलचक रांग दिसू लागली. सुदैवाने श्विनला उलट दिशेने जायचे होते. मात्र काही गाड्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेनेही येत होत्या. श्विनने आपली दुडकी चाल सुरूच ठेवली आणि दुगाड फाटा पार केला. एव्हाना नाश्त्याची गरज वाटू लागली होती. श्विनची नजर रस्त्याच्या डाव्या बाजूला क्षुधाशांती भवन शोधू लागली. अस्नोली गावा आधी रस्त्यापासून थोडे आवार सोडून एक उपहारगृह दिसत होते. बाहेरून पाहता येथे वडे, भजी, मिसळ किंवा तत्सम पदार्थांशिवाय काही मिळेल असे वाटत नव्हते. श्विनला बाहेर उभे करून मी आतमध्ये शिरलो तेव्हा हॉटेलचा मालक हा एकमेव माणूस उपहारगृहात बसला होता. आतमध्ये बरीच टेबल तीही मोकळ्या अंतरावर होती, मात्र ग्राहक मी एकटाच होतो. थोडासा साशंकतेनेच खायला काय मिळेल याची चौकशी केली. 'पोहे'! हे उत्तर ऐकताच आनंद गगनात मावेना. वडा भजी सारखे तेलकट पदार्थ नको असले तरी पोहे मिळतील हि आशा उपहारगृहाच्या बाह्यस्वरूपावरून वाटत नव्हती. पोहे सुद्धा भरपूर आणि चविष्ट होते. रसनेची तृप्ती झाल्यावर श्विनचे मार्गक्रमण पुन्हा सुरु झाले. कुडुस येथे पोचताच तेथे TJSB बँकच्या कुडुस शाखेजवळ श्विनने थांबा घेत छायाचित्र काढून घेतले.


कुडुस ते वाडा अंतर पार करत असताना श्विनच्या डोक्यात विचार घोळत होते ते नाक्यावरील श्रीनाथ आईस्क्रीम सेन्टरचे! त्याच आशेने श्विनने विनाथांबा वाडा गाठला. ७.३० ला डोंबिवली सोडून वाटेत नाश्त्यासाठी वेळ घालवूनही दुपारी १२ वाजता श्विनने वाडा गाठले होते. श्रीनाथ आईस्क्रीम सेन्टर मध्ये श्विनने पहिल्यांदा प्रवेश केला त्यावेळी श्विनबरोबर सायकल वर जगप्रवास करणारा जो (जोसिह स्किटस), वैशाल धरमसी, गन्धार डोंबिवलीकर आणि रोहन साखरे होते. त्यानंतर वाडा येथे सायकलने जात असताना श्विनने श्रीनाथ आईस्क्रीम येथे आपला थांबा निश्चित केला होताच. दुकानात शिरताच 'बहोत दिनोंके बाद आये' असे सूनवत मालकाने स्वागत केले. बदाम पिस्ता फालुदा खाऊन श्विन तृप्त झाल्यावर दिवसातील अवघड वेळेतील वाटचाल सुरु झाली. वाडा तेथून मनोर कडे जाणाऱ्या रस्त्यावर वर्दळ फार नव्हती. श्विनने विश्रांतीसह पहिल्या साडेचार तासात ६३ किमी अंतर कापले असले तरी अजून ७०-७५ किमी अंतर बाकी होते.

श्विनने पुढील २ तास आस्ते कदम धोरण स्वीकारायचे ठरवले. सूर्य डोक्यावर आला होताच. आजूबाजूचा निसर्ग पाहत, छायाचित्रणाची हौस भागवत श्विनची दौड सुरु होती.




 वाटेत एका ठिकाणी हातपंप दिसला. त्याबरोबर श्विनने गती रोखली आणि शांतपणे पाणी पिऊन चेहरा धुतला. त्याबरोबर श्विनला एकदम ताजेतवाने वाटू लागले. थोड्या थोड्या अंतरावर पाणी पीत तोंडावर मारत हात असताना श्विनला घटकाभर झोप घेण्याची गरज वाटू लागली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या बुंध्यापाशी योग्य जागा शोधत श्विन पुढे जात असताना कंचाड गावाजवळ वनविभागाच्या कार्यलयासमोर एक बाक श्विनला दिसला. त्याबरोबर तो बाक जवळ करत हेल्मेट उशीसारखे डोक्याखाली घेऊन अस्मादिक त्या बाकावर आडवे झाले. भर दुपारची वेळ असली तरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या घनदाट वृक्षाने छत्र धरले होते.



थोडावेळ शांत झोप काढल्यावर बाटलीतील पाण्याने श्विनने चेहरा धुतला. १० मिनिटांच्या ह्या झोपेने श्विनचा सगळं शीण निघून गेला होता. जवळील सुकमेव्यावर ताव मारून श्विन पुन्हा मार्गक्रमण करण्यास तयार झाली.

श्विनने पुन्हा एकदा वेग पकडला आणि लवकरच मनोर नाका गाठला. ठाणे- नाशिक, भिवंडी- वाडा या दोन महामार्गाना पार करून श्विनने मुंबई अहमदाबाद हा तिसरा मार्ग धरला होता. हा महामार्ग मात्र थेट तलासरीपर्यंत साथ देणार होता. एव्हाना पुन्हा एकदा क्षुधाशांती करायची गरज वाटू लागली होती. मनोरकडून उजव्या बाजूला वळण घेत अहमदाबादच्या दिशेने महामार्गाला लागल्यावर श्विनची नजर पुन्हा क्षुधाशांती भवन शोधू लागली. काही अंतरावर बाबा रामदेव नावाचे काठियावाडी होटेल दिसले. समोरच्या प्रशस्थ आणि मोकळ्या प्रांगणात श्विनला उभे करून अस्मादिक हॉटेलमध्ये शिरले. एव्हाना सुमारे २ चा सुमार झाला होता. अजून सुमारे ४५-५० किमी अंतर बाकी होते. त्यामुळे पोटभर न जेवता हलकेसे खाऊन पुढे जायचे होते. मात्र चौकशी केली असता दाक्षिणात्य पदार्थ किंवा पुरी भाजी हे काहीही उपलब्ध नसून केवळ पंजाबी भाजी आणि रोटी असेच जेवण उपलब्ध होते. त्यामुळे तिथे केवळ पेलाभर ताक घेऊन श्विनचा पुढील प्रवास सुरु झाला. मुंबई अहमदाबाद महामार्ग हा अतिशय चांगल्या स्थितीत आणि रुंद असल्याने श्विनला शांतपणे विना अडथळा जाता येत होते. कोणतेही अंतर सूर्यास्तापूर्वी पूर्ण करून सूर्यास्तापूर्वी मुक्कामाच्या ठिकाणी पोचणे हे श्विनचे ध्येय सहजसोपे वाटू लागले होते. मात्र श्विनला वेग  घेेणे आता कठीण वाटू लागले होते.
श्विनने दोन्ही टायर ट्युबमधील हवा चेक केली, दोन्ही ब्रेक चाकाला घासत नाहीयेत याची खातरजमा करून घेतली. कोणतीही तांत्रिक अडचण वाटत नव्हती. तरीही वेग का मिळत नाही याचे उत्तर सापडत  नव्हते (ते उत्तर परत येताना मात्र मिळाले). दरम्यान महामार्गातील वाहतुकीला बळी पडलेला एक साप श्विनला दिसला.


त्याला छायाचित्रबद्ध करून श्विनने तहान भागवण्यासाठी बाटली अडकवण्यासाठी असलेल्या स्टँडकडे हात नेला. मात्र तेथे बाटली नव्हती. तहान लागली असली तरी आता पाणी उपलब्ध नव्हते. पाण्याची बाटली बहुधा बाबा रामदेव या हॉटेलमध्ये विसरली असावी.

पुढील रस्त्यात जिथे मिळेल तिथे पाणी घ्यायचे ठरवून पुन्हा पेडलिंग सुरु झाले. मात्र वेग काही सापडत नव्हता. आजूबाजूला हिरवाई असली तरी एक छोटीशी टपरीही नव्हती. वेगात जात असलेली तुरळक वाहने सोडली तर अक्षरशः चिटपाखरूही नव्हते. पाणी लवकर मिळवायचे असेल तर वेग गाठणे आवश्यक होते हे स्वतःला बजावत श्विन पुढे जात होती. सुमारे तास दीड तास याच स्थितीत पेडलिंग केल्यावर रस्त्याच्या बाजूला पडलेल्या ट्रकला उचलायला आलेली एक क्रेन दिसली. श्विनने लगबगीने तिथे जाऊन पाणी मागितले. तिथे असलेल्या अधिकाऱ्याने पुढे असलेल्या त्याच्या चार चाकीतून पाणी दिल्यावर श्विनला मनोमन आनंद झाला. घसा शांत करून त्या अधिकाऱ्याचे आभार मानून श्विनने प्रवास पुन्हा सुरु केला.

अजूनही श्विनची संथ गती सुरु होती. काही वेळात श्विन एका टोल नाक्यापाशी पोचली. तिथे थोडा आराम करून श्विनने पोटभर पाणी पिऊन घेतले. अजूनही कुठे पाण्याची बाटली मिळण्यासाठी लहानसे दुकानही दिसले नव्हते. थोड्या विश्रांती नंतर श्विनने थेट चारोटी नाका गाठला. आता तलासरी टप्प्यात आले होते. श्विनला चहापानाची तल्लफ आली. चारोटी नाक्यापासून ४-५ किमी अंतरावर एक महालक्ष्मी मंदिर आहे. तिथे श्विनने दोनदा मुक्काम केला होता. पहिला मुक्काम होता तो ४ वर्षांपूर्वी..YHAI च्या गोवा कन्याकुमारी सायकलसफरीची तयारी म्हणून डोंबिवली महालक्ष्मी मंदिर सायकलसफर केली तेव्हा! त्यानंतर दोन वर्षांपूर्वी नयना आघारकर यांच्याबरोबर डोंबिवली बरोडा सायकलसफर केली तेव्हा! अर्थातच त्यामुळे चहा घेण्यासाठी महालक्ष्मी मंदिराजवळ श्विनने थांबा घेतला. तेथील हॉटेलमालकाशी श्विनची नाळ लगेच जुळली. श्विनकडे पाहून तो आपुलकीने चौकशी करत होता. साखर घातलेला चहा श्विनला आवडत नाही, मात्र त्या गप्पांमध्ये श्विनने तो साखरेचा चहा प्यायला. त्यानंतर पुढे जात असताना मात्र चहाची तल्लफ पूर्ण झाल्यासारखे वाटत नव्हते. पुढचा रस्ता पुन्हा बराचसा निर्मनुष्य होता. थोड्या वेळातच एक मोठ्ठा चेकपोस्ट लागला. मुंबईकडून अहमदाबादच्या दिशेने एकावेळी १० ट्रक आणि विरुद्ध दिशेने आणखी १० असे एकूण २० ट्रक जातील एवढा तो रुंद चेकपोस्ट होता. महाराष्ट्र राज्याचा गुजरातकडे जाणारा तो बहुधा शेवटचा चेकपोस्ट असावा.

तो रुंद चेकपोस्ट पार करून काही अंतर पार केल्यावर पुढे जात असताना रस्त्याच्या कडेला एक चहावाला दिसला. श्विनने ताबडतोब तिकडे वळली. त्या चहावाल्याचा दिवस संपला होता. भांडी धुण्याचे काम सुरु होते. मात्र श्विनने चहा विचारताच तो परत चहा करायला आनंदाने तयार झाला. ह्यापेक्षा पाहुणचार किंवा पुण्य ते काय! मात्र त्याच्याकडचे दूधही संपले होते. श्विनने बी बिना दुधाचा चहाही चालणार होता, अट एकच होती की चहामध्ये साखर नको. मग त्या शुद्ध चहामध्ये आलं टाकायची फर्माईश श्विनने केली.



 तो फक्कड चहा पिताना श्विनला लक्षात आले की भ्रमणध्वनीचा जीव जात चालला होता. मात्र आजचे गंतव्यस्थान असलेली वनवासी कल्याण आश्रमाची शाळा आता जेमतेम ५-६ किमी वरच होती. शुद्ध चहा प्राशन केल्यावर मात्र श्विनने थेट वनवासी कल्याण आश्रम शाळा गाठली. तेथील आवारात प्रवेश करत कार्यालयाची चौकशी करतानाच तेथील प्रमुख श्री वसंत भुसार सामोरे आले. एकमेकांची ओळख होत असतानाच श्विनच्या मागणीनुसार बिनासाखरेचा चहा हजर झाला. काश्मीर कन्याकुमारी मोहिमेतील स्वार मात्र अद्याप १८ किमी दूर असल्याचे समजले. दिवसभर सायकलिंग केल्यावर शरीर स्नायू सैल करणेही आवश्यक होतेच. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेत श्विनने स्नान आणि थोडाफार व्यायाम करत स्नायू मोकळे केले. 

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...