रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

ब्रिंदाबन vs ब्रिंदाबन : कोलकाता चेन्नई सायकलप्रवास




एलुरु गावातून आम्ही साधारणपणे सात वाजता सायकल चालवायला सुरुवात केली. गावातून मुख्य महामार्गाला जायला थोडा वेळ लागला. तोपर्यंतचा रस्ता अरुंद असला तरी कमी वाहतुकीचा आणि चढउतार फार नसलेला आणि खड्डेरहित होता. वातावरणही छान होते. आज अंतर साधारण १४० किमी होते. त्यामुळे मी प्रथमपासूनच सरासरी वेग कायम राखण्याचे ठरवले होते. आनंद, संजय आणि विक्रम हे तिघे कायम एकत्र असणार होते.

सुरुवातीचे चाळीस किमी अंतर कापून झाल्यावर मी नाष्टा करण्यासाठी थांबलो. एव्हाना साडेनऊचा सुमार झाला होता. माझ्या पाठोपाठच विक्रम आला. इथे दक्षिणात्य पदार्थ फारच छान मिळत होते. माझ्या मनातील घड्याळ सुरू होते. दोन तासात चाळीस किमी त्यानंतर अर्धा तास थांबा घेतला. तर सरासरी वेग २० किमी प्रतितासाहून १६ किमी प्रतितास इतका कमी होणार होता. दिवसभरात १४० किमी अंतर कापायचे होते. त्यामुळे उरलेले १०० किमी अंतर कापायला साधारण साडेचार वाजले असते. 


माझा नाष्टा होत असताना संजय आणि आनंदही पोचले. त्यांचाही नाष्टा झाला. मात्र एव्हाना दहाच काय साडेदहा वाजून गेले होते. मी सगळ्यांना आपण अर्धा तास मागे पडलो आहोत ते आता cover करावे लागतील असे सांगून पुन्हा एकदा सायकलवायला सुरुवात केली. आनंदला वाटेत विजयवाडा येथे decathlon चे दुकान असल्याचे माहित होते. त्यामुळे त्याला तिथेही जायचे होते. विजयवाडा शहर हे आंध्र प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर जवळपास दोन हजार वर्षांपासून वसलेले आहे. विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिराचा इतिहास आख्यायिका आणि पौराणिक कथांनी भरलेला आहे. प्रमुख देवता, देवी कनक दुर्गा, स्वयंभू असल्याचे मानले जाते. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या इंद्रकीलाद्री टेकडीवर स्थित आहे.



शहरात प्रवेश करत असतानाच शहरातील गर्दीचा अंदाज येत होता. कोलकाता चेन्नई महामार्ग शहरातूनच जात होता. माझ्या सायकलची चाल चांगलीच मंदावली होती. महामार्ग इतका गजबजलेला होता की बऱ्याचदा सायकलवरून पायउतार व्हावे लागत होते. त्यातच सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिस इमाने इतबारे काम करत होते. त्यामुळे चालण्याची गतीही सायकलपेक्षा जास्त वाटत होती. अश्याच गजबजलेल्या ठिकाणी रस्त्याच्या डावीकडे decathlon दुकान दिसले. ते तिघेही नजरेच्या टप्प्यात दिसत नव्हते. दुकानात शिरल्यास वेळ मोडला जाणार हे निश्चित होते. त्यामुळे मी दुकानाकडे दुर्लक्ष केले. सूर्यही डोक्यावर आला होता. त्यामुळे लवकरात लवकर ह्या गर्दीतून बाहेर पडून वेग वाढवणे आवश्यक होते. पुढेही सिग्नल यंत्रणा कार्यरत होतीच. जवळपास अर्धा तास त्या वाहतुकीत अडकल्यानंतर मी विजयवाडा शहराच्या बाहेर पडत होतो. बाहेर पडल्यावर नदीवर एक लांबलचक पूल दिसत होता. नदीचे पात्र खूप लांबवर पसरले होते. पलीकडचा किनारा स्पष्ट दिसतही नव्हता. मात्र पात्राचा किमान पाऊणपट भाग कोरडाच दिसत होता. एवढ्या प्रचंड पात्रात अक्षरशः वाळवंट पसरल्यासारखे वाटत होते. नदीचे रखरखीत पात्र पाहून फार वाईट वाटत होते.

नदीचे पात्र जसे कोरडे पडले होते तसाच माझा घसाही कोरडा पडला होता. मी सायकल बाजूला लावून पाणी प्यायलो. तहान भागल्यानंतर पुन्हा ताज्या दमाने सुरुवात केली. साधारण १०० किमी अंतरावर जेवायला थांबायचे ठरवले होते. मात्र उकाडा आणि लागलेली भूक ह्यांच्यामुळे मी जेमतेम ८०/८२ किमी अंतरावरच जेवण घ्यायला थांबलो. तिथे एक छानसे हॉटेल दिसत होते. जेवण अस्सल दाक्षिणात्य पद्धतीचे म्हणजे फक्त भाताचेच होते. परत पुढे किती अंतरावर जेवायला मिळेल ह्याची काहीच शाश्वती नव्हती. त्यामुळे मी जेवायला थांबलेले लोकेशन इतरांना कळवून मी सायकल थांबवली. जेवण छान रुचकर होते. जेवण करून जवळपास अर्धा एक तास वाट पाहिल्यावर मात्र मी पुढे जाण्याचे ठरवले. कारण अजून जवळपास ५०-६० किमी अंतर बाकी होते आणि दुपारचे अडीच वाजून गेले होते. गेल्या दोन दिवसात आलेले अनुभव विचारात घेता सूर्यास्तापूर्वी गंतव्यस्थानी पोचणे किती आवश्यक आहे हे पुरेसे स्पष्ट झाले होते.

मी आणखी दीड तासाने चहासाठी थांबेन असा तिघांना निरोप देऊन पुन्हा सायकलवायला सुरुवात केली. थोडे पुढे जातोय न जातोय तोच मला समोरच्या बाजूने पाचसहा जण चालत येत असलेले दिसले. त्यांच्यात एक म्हातारे गृहस्थ होते. ज्यांनी धोतर घातले होते, कपाळाला टिळा आणि डोक्याला मुंडासे होते. बरोबर एक बाई होत्या त्यांनी पाचवारी साडी घातलेली होती. इतर चारजण मागे येत होते. त्यांना पाहताच मला ते महाराष्ट्रातून आले असावेत अशी शंका आली. ते जवळ येताच मी त्यांना नमस्कार करत सायकल थांबवली. त्यांची चौकशी करताच समजले की ते औंढ्या नागनाथ येथील रहिवासी आहेत. बाबा दरवर्षी पंढरपूर वारी करत असतात..आता ते औंढ्यानागनाथ येथून श्रीशैल्यम येथे आले होते. तेथून विजयवाडाला जाऊन परत औंढ्यानागनाथ येथे परतणार होते. हा सगळा प्रवास ते पायी करत होते. ही संपूर्ण मोहीम अंदाजे तीन महिन्यांची होती. त्यापैकी निम्मा प्रवास झाला होता. आमचा सायकलप्रवास त्यांच्या पायी प्रवासापुढे अगदीच नगण्य होता. बाबांना मी विचारले माझ्याकडे काही लाडू आहेत ते जर मी तुम्हाला दिले तर तुम्ही ते स्वीकाराल का! त्यांनी हो म्हणताच माझ्याकडे असलेला लाडूचा एक डबा मी त्यांना दिला. त्यांना शुभेच्छा देऊन मी माझा प्रवास पुन्हा सुरू केला.


साधारण सव्वातीनला आनंदचा संदेश आला की त्यांनी १०० किमी अंतर पार केले आहे. मात्र त्यांनी अजून जेवण केले नव्हते. ते आता जेवण्यासाठी थांबणार होते. मला कळेना मी माझे जेवण करून एक तास थांबलो होतो. तरीही ते तिघे आले नव्हते आणि जेवणासाठीही थांबले नव्हते. मग त्यांचा इतका वेळ गेला कुठे. बरं त्यांना विचारलं तर दोघेही उत्तर काहीच देत नव्हते.

मी थोड्या वेळातच चहासाठी थांबलो. कदाचित इथे मी थोडा वेळ घालवला तर त्यांनी मला गाठले असते. आमचे आजचे राहण्याचे ठिकाण चिलकालूरिपेट माझ्या थांब्यापासून जेमतेम २० किमी म्हणजे तास सव्वा तासाच्या अंतरावर होते. म्हणजे मी पाच साडेपाच पर्यंत हॉटेलमध्ये पोचू शकत होतो. मात्र आंध्र पोलिसांनी अजून तरी काहीच कळवले नव्हते. मी चहा घेऊन पुन्हा अर्धा तास घालवला. तरीही तिघांचा पत्ता नव्हता. अखेर मी थेट चिलकालुरीपेट येथे जाऊन हॉटेल शोधायचे ठरवले. ह्या गावच्या नावाचा उच्चार करताना बराच गोंधळ होत होता...चिलकालुरिपेट की चिकलारूलीपेट! अखेर एके ठिकाणी देवनागरी लिपी मध्ये गावाचे नाव दिसल्यावर उलगडा झाला.







चिलकालुरीपेट शहरासाठी साधारण ८ किमी अगोदर महामार्गाच्या डावीकडे वळलेला रस्ता होता. मी शहरात पोचलो. आंध्र पोलिसांकडून अजूनही नक्की काही कळत नव्हते. मग मी गुगलवर इतर हॉटेल्स शोधायचे ठरवले. मात्र आनंदने कळवले की आंध्र पोलिस सोय नक्कीच करणार आहेत. एका चौकात मी थांबून राहिलो. शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्याबद्दल कुतूहल वाटत होते. ते थांबून माझी चौकशी करत होते. माझी मोहीम ऐकून तेही उत्साहित होत होते. मात्र त्यांच्यापैकी एकालाही हिंदीचा गंधही नव्हता. मला मात्र आश्चर्य वाटत होते. बंगाल, ओरिसा, आंध्र, तमिळनाडू, केरळ ह्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिकांना हिंदी भाषा येत नव्हती तरी ती भाषा महाराष्ट्रात का थोपवली जात आहे. 


मी जवळपास तासभर ह्या विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारल्या मोबाईलवर चेस खेळला. त्यानंतर आंध्र पोलिसांकडून आजची व्यवस्था कोणत्या हॉटेलमध्ये केली आहे त्याचा निरोप आला. मी जिथे उभा होतो त्याच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये ब्रिंदाबन हॉटेलमध्ये आमची सोय झाली होती. हे कळताच मला हायसे वाटले. ती इमारत चार मजली होती. मात्र खालच्या मजल्यावर कुठेच राहण्यासाठी हॉटेल दिसत नव्हते. तिथे एक शॉपिंग complex होता. मी त्या शॉपिंग complex मध्ये शिरलो. तर आतमध्ये मला जे नाव सांगितले होते त्याच नावाचे हॉटेल ब्रिंदाबन दिसले जिथे फक्त जेवण्याची सोय होती. पण राहण्याची सोय नव्हती. मी तिथे रिसेप्शनवर विचारले की ह्याच नावाचे इतर कोणते हॉटेल इथे आहे का जिथे राहण्याची सोय आहे. तेव्हा त्यांनी नाही म्हणून सांगितले. मला आंध्र पोलिसांकडून हॉटेलचा नंबर मिळाला त्या नंबरवर फोन केला असता त्यांनी सांगितले की तुम्ही बिल्डिंगसमोरच थांबा आमचा माणूस तुम्हाला घ्यायला येतो आहे. लगेचच एक माणूस माझ्याकडे आला. त्याने बिल्डिंगच्या मागच्या बाजूला मला नेले तिथे खाली पार्किंग मध्ये सायकल ठेवायला सांगितले आणि तिथेच असलेल्या लिफ्टने चौथ्या मजल्यावर नेले. तिथे आमची राहण्याची सोय असलेले हॉटेल ब्रिंदाबन होते. मी त्यांना तळमजल्यावर मला का चुकीचे सांगितले गेले हे विचारले तर तेव्हा समजले की त्या दोनही व्यवस्थापनांचा एकमेकांशी संबंध नव्हता. आणि तळमजल्यावरील हॉटेलचे व्यवस्थापन मुद्दाम ह्या हॉटेलची माहिती देत नाहीत. थोड्या वेळाने माझे तीनही साथीदारसुद्धा आले. तळमजल्यावरील हॉटेल मध्ये जेवणाचे टाळत आम्ही जेवण्यासाठी आसपास दुसरे हॉटेल शोधले. त्यांनी त्यांच्या आडमुठ्या आणि त्रासदायक वागणुकीमुळे ग्राहक मात्र घालवले होते.



 







शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५

एलुरुचा पाहुणचार: कोलकाता चेन्नई सायकलसफर


राजेशाही थाटातील हॉटेलच्या रूममध्ये झोप शांतपणे लागली होती. अर्थात आधीच्या दिवसात कापलेले जवळपास १५० किमी अंतर देखील त्या शांत निद्रेसाठी उपयोगी ठरले असावे. आरामदायक वास्तव्यानंतर आम्ही आमच्या सायकली सज्ज केल्या. सकाळचे वातावरण खूपच उत्साहित करणारे होते. राजमहेंद्रवरम शहर बऱ्यापैकी मोठे होते. तिथे बघण्यासारख्या अनेक गोष्टी/ ठिकाणे होती. दुर्दैवाने काल आमचे तीन साथीदार शहर हाकेच्या अंतरावर थांबल्याने आम्हाला शहर बघताच आले नाही. 

आज सकाळी मात्र शहर जागे होण्याच्या आत शहराबाहेर पडलो तर शहरी गर्दी लागणार नव्हती. सुरवातीचे गल्लीबोळ, रस्ते पार करत आम्ही राजमहेंद्रवरमचा निरोप घेत असतानाच गोदावरी नदीवरील एक लांबलचक पूल दिसू लागला. आम्ही एकदम उल्हासित झालो. नदीचे पात्र बऱ्यापैकी मोठे असल्याचे लक्षात येत होतेच. सुरुवातीला नदीच्या काठाने थोडा चढ चढून मग डावीकडे वळल्यावर नदीवरील पूल पार करायचा होता. पूल जवळपास ३ किमी लांब होता. पुल पार करत असताना मी मनसोक्त चित्रीकरण करून घेतले. आनंद, संजय, आमचा गोवेकर मित्र विक्रम देखील पूल पार करताना मजा घेत होते. राजमहेंद्रवरम शहराचे अंतरंग आम्ही पाहू शकलो नाही तरी शहराने निरोप देताना आम्हाला चांगलेच खुष केले.


पूल पार झाल्यावरही बऱ्याच अंतरावर महामार्ग लागला नव्हता. रस्ता अजूनही फार रुंद नव्हता. त्यामुळे आपण योग्य दिशेने जात आहोत ह्याची एकदा खात्री करून घेतली. त्यानंतर बरीच दौड झाल्यावर मात्र आम्हाला चेन्नई कडे जाणारा महामार्ग समोरा आला. 



मात्र आता आकाशात मळभ दिसत होते. त्यामुळे आमचा उत्साह मावळला. आज अंतर जास्त ठेवले नव्हते. आजचे अंतर जेमतेम १०० किमी होते. त्यामुळे नाष्टा लवकरच केला. पण नंतर आनंद आणि संजय आणखीच संथ झाले. पुढील २ तासात जेमतेम १० किमी अंतर पार झाले. मग मी थोडा रुद्रावतार धारण करून सांगितले की तुम्हाला pedaling चा कंटाळा आला असेल तर सांगा आपण राईड थांबवू. राईड करायची असेल तर आता थेट Eluru ला गेल्यावरच जेवण मिळेल. Actually, तसे खरे मनात नव्हते. फक्त स्पीड वाढावा इतकीच इच्छा होती. नाहीतर १०० किमी ला सुद्धा संध्याकाळचे ७ वाजले असते. मग मात्र दोघेही सुसाट निघाले अखेर मीच २० किमी नंतर चहासाठी थांबवले. आनंदने गूळ विकत घेतला होता. तोही खाल्ला आणि निघालो. 




आम्ही चांगलाच वेग पकडला होता. वाटेत एक माणूस खांद्याला झोळी, डोक्याला फडके गुंडाळून चालत जात असलेला दिसला. दाढीही बऱ्यापैकी वाढली होती. तीदेखील अस्ताव्यस्त दिसत होती. मी त्याची चौकशी केली. तो प्रथम नीट बोलायलाच तयार नव्हता. तो थोडे आढेवेढे घेत बोलू लागला. तो बहुधा राजस्थानातील होता. त्याच्या म्हणण्यानुसार तो बऱ्याच वर्षांपूर्वी घर सोडून निघाला होता. कुटुंबातील कोणाशीही त्याचे संबंध नव्हते. तो कायम पायी प्रवास करत असे. आत्ताही जवळपास दीडशे किमी अंतर त्याला पायी जायचे होते. त्याच्या झोळीत फार काही असावे असे वाटेना. मी त्याला माझ्याकडून लाडू देऊ केले. मात्र तो ते घ्यायलाही तयार नव्हता. त्याला कोणतीही मदत नको होती. मी त्याला सांगीतले तू जसा पायी प्रवास करत आहेस तसेच आम्ही सायकलवरून प्रवास करत आहोत. आपण एकमेकांचे सहप्रवासी आहोत. त्यामुळे तुला माझ्याकडून लाडू घ्यायला हरकत नाही. मग मात्र तो लाडू घ्यायला तयार झाला. त्याने त्याची झोळी उघडून त्यातील एका डब्यात तो लाडू नीट ठेवला.  मला तो माणूस बराच चमत्कारिक वाटला.


संजय, आनंद आणि मी वेग छानच पकडला होता. शेवटचे ६२ किमी अंतर ३-३.५ तासात पार झाले ज्यात चहाचा आणि गुळाचा हॉल्टही होता. एलुरु येईपर्यंत वाटेत धाबा, हॉटेल काहीच दिसले नव्हते. अखेर मी जे म्हटले तसेच झाले. जेवण थेट एलुरुलाच मिळाले.😄 बहुधा माझ्या वाक्यावर परमेश्वराने तथास्तु म्हटले असावे. एलुरु गावाच्या वेशीवरच मस्तपैकी नारळपाणी घेतले. 




आम्ही आज मात्र दिवसाउजेडी गंतव्यस्थानी पोचलो होतो. भूक तर लागली होतीच. जवळच एक धाबा दिसत होता. तिथे छानपैकी जेवण करून मगच आजच्या वास्तव्याच्या सोय बघायची असे ठरवले. त्यामुळे आम्ही आधी उदरभरण करून घेतले. दरम्यान आनंदच्या आंध्र पोलिसांमधील मित्रांतर्फे आमची राहायची सोय ज्या हॉटेलमध्ये झाली आहे त्याची माहिती मिळाली. हॉटेल शहराच्या बऱ्यापैकी आतमध्ये होते. वाटेत रेल्वेखालून चिंचोळ्या भुयारी मार्गाने रेल्वे लाईन पलीकडे जावे लागले होते. रस्ते अरुंद होते आणि बहुतेक त्यामुळे ट्रॅफिकही लागले होते. आम्ही हॉटेलला पोचलो. हॉटेलसमोर चौकोनी आकाराचे मोठे मोकळे मैदान होते. आमच्या सायकली त्या मैदानात ठेवायला सांगितल्यावर आम्हाला चिंता वाटू लागली. मात्र हॉटेल व्यवस्थापन आणि सिक्युरिटीने आम्हाला सायकल सुरक्षित राहतील ह्याची पूर्ण खात्री दिली. एव्हाना माझी अवस्था आता माझ्यात ताकद नाही मी सायकलवरच झोपतो अशी झाली होती.

पण आनंदच्या मागच्या चाकाचे पुन्हा काहीतरी बिनसल्याचे लक्षात आले. हॉटेलमध्ये वेळेवर आल्यामुळे आमच्याकडे आज बऱ्यापैकी वेळही हाताशी राहिला होता. जवळपास सायकलचे दुकान कोठे आहे ह्याचे चौकशी आम्ही गुगलबाबांकडे केली. आम्हाला जवळपास ५ किमी जावे लागणार होते. अंघोळ केल्यावर मात्र आम्ही फ्रेश झालो होतो. त्यामुळे एलुरुच्या गल्लीबोळातून वाट काढत आम्ही पुन्हा त्याच चिंचोळ्या भुयारी मार्गाने  सायकलच्या दुकानात पोचलो. आमची सायकलमोहीम ऐकून दुकानदार आणि त्याचे सहाय्यक चांगलेच खुष झाले. त्यांचे दुकानही छान सजवले होते. सायकलच्या उपयोगाच्या बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध होत्या. दुकानही बऱ्यापैकी मोठे आणि लांबलचक होते. आनंदच्या सायकलचे काम सुरू असताना आम्हाला आठवले की आम्हीही आमच्या सायकलींना कोलकाता सोडल्यापासून तेलपाणी केलेच नव्हते. त्या बिचाऱ्या आमची ओझी वाहत होत्या मात्र आम्ही त्यांच्या सांध्यांचा विचारच केला नव्हता. मग त्या दुकानातच आमच्याही सायकलींचे तेलपाणी करून घेतले 

दरम्यान मला खोकल्याचा त्रास जाणवत होता. आनंदच्या सायकलचे काम बराच वेळ चालणार असल्याचा अंदाज आल्यावर मी आणि संजय चहाचे दुकान शोधू लागलो. पण जवळपास चहाचे दुकानच सापडेना. घशाला थोडा शेक मिळाला असता म्हणूनही चहा हवा होता. मग मी आसपास किराणा दुकान, आयुर्वेदिक दुकान पाहू लागलो. मला जेष्ठमध मिळाला असता तर घशाला थोडा आराम मिळेल असे वाटत होते. तेथील एका दुकानात आम्हाला जवळपास एक वैदुचे दुकान असल्याचे समजले. आम्ही तिथे गेलो. मला तेलगु येत नव्हते आणि त्या वैदुला मराठी, हिंदी, इंग्रजीचा गंध नव्हता. सुदैवाने विक्रम आमच्याबरोबर होता. इथे जवळपास वर्षभर राहत असताना तो चांगले तेलगू बोलू लागला होता. अखेर त्याने दुभाष्याचे काम पत्करले. ते वैदू बऱ्यापैकी वयस्कर आणि अनुभवी होते. त्यांनी माझी नाडीपरीक्षा केली. माझी व्यवस्थित माहिती घेऊन एक औषध दिले. आयुर्वेदिक सल्ला आणि औषध ह्याचे अगदीच कमी मूल्य त्यांनी आकारले त्याशिवाय तेलगूमधील एक कॅलेंडर मला देऊ केले. मी त्यांना म्हटले की मला तेलगु येत नाही. त्यामुळे मला हे कॅलेंडर नको. मात्र तरीही त्यांनी आग्रहाने ते कॅलेंडर मला बरोबर घ्यायला लावले.

आम्ही हॉटेलमध्ये परतलो. मात्र आमचा चहा राहिला होता. मी आणि संजय चहा पिण्यासाठी बाहेर पडलो. आम्हाला उद्या सकाळी लवकर चहा कुठे मिळेल ह्याचा शोध घ्यायचा होता. बाहेर पडल्यावर मी जवळपास जेष्ठमध, जिरे मिळत आहे का ह्याचा अंदाज घेऊ लागलो. तेथील कोणालाही मी काय म्हणत आहे हेच समजेना. एका दुकानात जिरे मिळले पण त्यांनाही जेष्ठमध समजेना. दुकानदारीण स्वभावाने खूप चांगली होती. मी तिला जेष्ठमध चे गुगल translation दाखवले. पण बहुधा गुगलने काहीतरी घोळ केला होता. मग तिला फोटो दाखवला. तेव्हा तिने सांगितले की हे तिच्याकडे मिळत नाही. दुसऱ्या एका ठिकाणी मिळते पण ते संध्याकाळी ५ च्याच आतच. नंतर मागितले तर ते ओरडतात. तिला जेव्हा समजले की मला ते खोकल्यावर औषध म्हणून हवे आहे. तेव्हा तिने मला हिरड्या सारखे काहीतरी दाखवले. कदाचित तो हिरडाच असू शकेल. तिने सांगितले हा उत्तम उपाय आहे. त्याच्या सालाचा तुकडा तोंडात ठेवायचा. लाळ येईल ती गिळायची पण ते साल किंवा बी गिळायचे नाही. तिने माझ्या expedition बद्दल चौकशी करून त्याचे कौतुक केले, शुभेच्छाही दिल्या. बहुधा तिच्या लक्षात आले असावे की मला तो हिरडा तोडता येणार नाही. मग तो तोडून त्याच्या सालाचे तुकडेही करून दिले. घरातील एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे तिचे वागणे होते. तिने मला त्यातील एक तुकडा मला तोंडात ठेवायला सांगितला. मी थोडे पुढेमागे करत आहे हे लक्षात येताच मोठ्या बहिणीप्रमाणे थोडे दटावतच मला तो तुकडा तोंडात ठेवायला लावला.

आम्हाला चहाचे दुकानही सापडले. तिथे पहाटे ४ वाजता चहा मिळू शकेल असे समजताच आम्ही समाधानाने हॉटेलच्या रूममध्ये परत आलो. जेवणही छान मिळाले. एलुरु शहरात आमचा पाहुणचार फारच छान झाला होता.

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

राजमहेंद्रवरम : कोलकाता चेन्नई सायकलसफर


येलमनचिल्ली येथील वास्तव्य सुखावह होते. पहाटे चहासुद्धा लवकर आणि उत्तम मिळाला. येथील पोलिसांनी अक्षरशः शेवटच्या क्षणी आमची माहिती मिळूनही आमची उत्तम व्यवस्था केली होती. त्यामुळे येथील पोलिस कार्यालयाला भेट देऊन मगच आपण निघूया असे आनंदने सांगताच आम्ही लगेचच ते मान्य केले. अर्थातच काल रात्री ज्यांनी आमची सोय केली होती त्यांची भेट आत्ता होणार नसली तरी ज्या पोलिस कार्यालयाने आमची सोय केली तिथे जाणे आम्हालाही आवश्यक वाटले. आमच्या हॉटेलपासून पोलिस स्थानक जवळच होते असे कळले. आम्ही तिथे पोहोचलो. तेथील उपस्थित केंद्रप्रमुखाला आमच्याबद्दल माहिती नव्हती. त्यांचा स्वभाव अतिशय नम्र होता. त्यांना भेटताना घरातीलच एखाद्या ज्येष्ठ आप्ताला भेटल्यासारखे वाटत होते. आनंदने त्यांना आमची आपल्या कार्यालयातर्फे कशी सोय झाली हे सांगितले. आनंद निवृत्त ACP असल्याचे कळताच ते केंद्रप्रमुखही आनंदित झाले. त्यांचे आभार मानत आम्ही येलमनचिल्लीचा निरोप घेतला. ह्या गावात राहू नका असे आनंदच्या पोलिस मित्रांतर्फे का सांगितले ह्याचा आम्हाला उलगडा होऊ शकला नाही. उलट आम्हाला तर येथील पोलिस आणि सामान्य नागरिकही अतिशय साधे, नम्र आणि मदतीला तत्पर असल्याचे जाणवले होते.


येलमनचिल्ली पासून आमचे आजचे गंतव्य स्थान असलेले राजमहेंद्रवरम (राजमुंद्री) हे शहर जवळपास १४२ किमी अंतरावर होते. मी सरळ गणिती आकडेमोड करत तीन टप्प्यात ते अंतर पार करायचे ठरवले. १० वाजेपर्यंत ५० किमी अंतर पार करून नाष्टा करायचे पुढे परत ५० किमी पार करून २ वाजेपर्यंत जेवण करायचे नंतर उरलेले ४०-४२ किमी अंतर ५ वाजेपर्यंत पार केले तर ह्या ऐतिहासिक शहरात फेरफटका मारता येईल असा हिशोब मी मांडला. राजमहेंद्रवरम ह्या शहराला राजमुंद्री असेही म्हणतात. गोदावरी नदीच्या काठावरील ह्या शहराची स्थापना ११ व्या शतकात पूर्व चालुक्य राजा राजराजा नरेंद्र यांनी केली. त्याच्या स्थापनेपासून, ब्रिटीश राजवटीखाली येण्यापूर्वी आणि कालांतराने आधुनिक आंध्र प्रदेशचा भाग बनण्यापूर्वी, चालुक्य, काकतीय आणि कुतुबशाहींसह विविध राजवंशांनी या शहरावर राज्य केले आहे.

१६०२ मध्ये डच लोकांनी राजमहेंद्रवरम येथे एक किल्ला बांधला. १८ व्या शतकात ब्रिटिशांनी या प्रदेशासह उत्तर सरकार ताब्यात घेतले. ब्रिटिश राजवटीत, राजमहेंद्रवरम हे गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय होते. १८६४ मध्ये ब्रिटिशांनी डच किल्ल्याचे तुरुंगात रूपांतर केले आणि १८७० मध्ये ते मध्यवर्ती कारागृहात रूपांतरित केले. १९२५ मध्ये, जिल्हा पूर्व आणि पश्चिम गोदावरीमध्ये विभागला गेला. शहराचे मूळ नाव राजमहेंद्रवरम होते, परंतु ब्रिटिश काळात ते हळूहळू राजमुंद्री असे बदलण्यात आले. २०१५ मध्ये, आंध्र प्रदेश सरकारने हे नाव अधिकृतपणे त्याच्या मूळ स्वरूपात बदलले .आज, राजमहेंद्रवरम त्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. म्हणूनच हे शहर आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. शहरात गोदावरी नदीकाठी मंदिरे, घाट आणि त्याच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या अवशेष सापडतात. अर्थातच म्हणूनच मला ह्या शहरात सूर्यास्तापूर्वी पोचून येथील संस्कृती अनुभवायची होती. त्यासाठी मी आखलेल्या गणिती आकडेमोडीप्रमाणे मार्गक्रमण करावे लागणार होते. आनंद, संजय आणि आमचा नवीन सहकारी विक्रम ह्या तिघांनाही मी ह्याची स्पष्ट कल्पना देऊन ठेवली. 

खरतर मला संजयबद्दल अजिबात शंका नव्हती. विक्रम हे नियोजन पाळेल अशी आशा होती. मात्र आनंदबद्दल मी अजूनही साशंक होतो. वास्तविक आज आमच्या मोहिमेतील नववा दिवस होता. त्यामुळे आनंदकडून त्याने हे वेळापत्रक पाळावे ह्याची अपेक्षा करणे गैर नव्हतेच. शहराबाहेर पडून महामार्गाला लागेपर्यंत आम्ही बरोबरच होतो. अंतराचा अंदाज घेत वेग योग्य राखणे ही आजची प्रत्येकाची जबाबदारी होती. मात्र थोड्या वेळातच आनंद, संजय आजही मागे राहिले. अर्थात आज त्यांच्याबरोबर विक्रम होता. मी मात्र वेगाशी प्रतारणा करणार नव्हतो. रस्ता अतिशय सुंदर होता. आजूबाजूचा  निसर्गही खुणावत होता. काल उन्हाचा प्रचंड त्रास झाला होता मात्र आत्ता सकाळी येथे हवेत सुखद गारठा होता. सायकलवण्यासाठी एकदम पोषक वातावरण होते.





साधारण ५० किमी अंतर पार होत असताना छोटासा घाट लागला. तो घाट चढून जाताच रस्त्याच्या डाव्या हाताला दोनतीन टेबल मांडलेली दिसली. समोर एक टपरी होती. साधारण १०- १०.१५ वाजले होते. अर्थातच भूकही लागली होती. मी आनंद आणि संजयला मेसेज पाठवला की मी इथे नाश्त्यासाठी थांबत आहे. तेव्हा लवकर इथे पोहोचा. मात्र तिथे नाश्त्यासाठी काहीच दिसत नव्हते. मी चहाची ऑर्डर दिली. चहाची वाट बघत असताना दुकानात बरेच खाद्यपदार्थ बरण्यांमध्ये भरून ठेवलेले दिसत होते. त्यात लाडूही होते. मी एक लाडू खाल्ला. लाडू एकदम स्वादिष्ट होता. भूक लागली होतीच. चहाबरोबर थोडी बिस्किटे आवश्यक होती.






चहा घेऊन मी त्या टेबलपाशी बसलो. दुकानदार वयस्क जोडपे होते. दुकान रस्त्याच्या डावीकडे होते आणि तिथे बरीच मोकळी जागा होती. तरी शेजारी एकही इतर दुकान नव्हते. मला चहा देऊन ते दोघेही कुठे गायब झाले कळेना. माझा चहा, बिस्किटे नाष्टा झाला तरी ना त्या दुकानदार जोडप्याचा पत्ता होता ना माझ्या सहकाऱ्यांचा. लाडू खाऊन माझी भूकही चाळवली होती. मी थोडा वेळ त्या जोडप्याची वाट पाहिली. अखेरीस न राहून बरणीतून आणखी एक लाडू खाल्ला. चव जिभेवर चांगलीच रेंगाळत होती. आता भूक खवळली होती. मी बरणीतून एकामागोमाग एक लाडू काढून खायला सुरुवात केली. पाचसहा लाडू खाऊन झाल्यावर जरा बरे वाटले. माझे सहकारी अजूनही आले नव्हते. खरतर मला इथे येऊन अर्धा पाऊण तास झाला होता. आम्ही वेळापत्रकाच्या मागे पडलो होतो. पुन्हा एकदा चहा घेऊन मी त्यांना पुढे जात असल्याचे सांगून आपल्या नियोजनापेक्षा उशीर होत असल्याची आठवण करून दिली.

मी मात्र एक निश्चय केला की ते तिघे वेळापत्रकाच्या मागे राहत असतील तरी आपण ते पाळायचे. मुळात ते तिघे एकत्र होते. मी वेळापत्रक पाळल्यास उजेडात गंतव्यस्थानी पोहोचू शकत होतो. आमची आजची व्यवस्था अजून झाली नव्हती. उजेडात पोचल्यास ती व्यवस्था शोधायलाही वेळ मिळणार होता. शिवाय दुर्दैवाने वाटेत काही मदत लागली तर वाटेतील एखाद्या गावात मदत मिळणे कठीण असले तरी राजमहेंद्रवरमसारख्या महत्वाच्या ठिकाणी ती मदत मिळू शकली असती. 

आनंदने मला मेसेज पाठवला की ते तिघे मागे नाष्टा घेण्यासाठी थांबले आहेत. मी येथे पाऊण एक तास थांबूनही ते आले नाहीत. आम्ही वेळापत्रकाच्या मागे अधिकच मागे पडत होतो. त्यामुळे मी पुढे निघालो. दुपारी दोन पर्यंत एकूण १०० किमी अंतर पार करणे गरजेचे होते. मी सायकल दामटवली. 

वाटेत बरेच पदयात्री दिसत होते..त्यातील काही जणांनी भगवे कपडे घातले होते. एक मध्यमवयीन जोडपेही त्यात होते. मी त्यांच्याजवळ थांबून त्यांची चौकशी केली. ते सगळेजण विशाखापट्टणम येथून चालत विजयवाडा येथे निघाले होते. 



विशाखापट्टणम ते विजयवाडा हे अंतर जवळपास ३५० किमी होते. विजयवाडा हे शहराभोवती असलेल्या टेकडीवर असलेल्या अलंकृत कनक दुर्गा मंदिरासाठी ओळखले जाते. हे सगळे भाविक त्या देवीच्या दर्शनासाठीच पायी निघाले होते. तेथील उंडावल्ली लेण्यांमध्ये वाळूच्या टेकडीवर कोरलेली आणि विस्तृत पुतळ्यांनी सजवलेली प्राचीन दगडी मंदिरे आहेत. शहराजवळ कृष्णा नदीच्या पलीकडे प्रकाशम बॅरेज पसरलेला आहे. जवळच भवानी बेट आहे, जिथे जंगले आणि पाण्याच्या काठावरील बागा आहेत. त्या जोडप्याबरोबर तसेच इतर भाविकांबरोबर थोड्या थोड्या गप्पा मारत मी पुढे जात होतो. मध्यानीची वेळ असल्याने मलाही थोडा विसावा हवा होता. उन्हे तापली होतीच. खरेतर त्या भाविकांना आणि मला एकमेकांची भाषा समजतही नव्हती. मात्र भावनांची भाषा एक होती. एकमेकांविषयी आदर आणि प्रेम होते. त्यामुळे एकमेकांच्या भावना समजत होत्या.










पोटातल्या लाडूंनी मला बरेच इंधन पुरवले होते. मात्र त्यालाही अडीच तीन तास उलटून गेले होते. साधारण पाऊण वाजता मी पुन्हा चहा घेतला आणि त्या इंधनाच्या जोरावर पुढील अर्ध्या तासात उपहारगृह सापडले की त्या तिघांसाठी थांबायचे ठरवले  मात्र दीड वाजेपर्यंत कोणतेही खोपटवजा हॉटेलही सापडेना.  पुढे एक मोठा चौक दिसला. मला जरा हायसे वाटले. एक छोटेसे मार्केट तिथे होते. परिसरातील ते मोठे गाव असावे. मात्र तिथेही कोणती खानावळ सुद्धा दिसत नव्हती. फळांनी भरलेले एक दुकान तिथे दिसले. मी तिथे काही संत्री खरेदी केली आणि  बसण्यासाठी जागा शोधण्यासाठी पुढे निघालो.





थोड्या अंतरावर एक शेडवजा बस स्टॉप दिसला. ऊन रणरणत होते..आजही खायला ... जेवायला मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. मी जवळची संत्री खाण्यासाठी बाहेर काढली. आधी संजय आणि आनंदला कळवले की वाटेत कोणतेही उपहारगृह दिसत नाहीये तेव्हा वाटेत चौकात फळे दिसतील ती खाऊन घ्या. संत्री थोडी आंबटच होती. मात्र पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना ती गोड वाटत होती. त्या बसस्टॉपवर संत्री खाऊन मी पुन्हा त्या तिघांची वाट पाहण्यात अर्धा तास घालवला. आनंदच्या पोलिस मित्रांकडून अजूनही राजमहेंद्रवरम येथे राहण्याच्या सोयीबद्दल काहीही कळले नव्हते. आता अधिक विश्रांती घेत थांबलो तर राजमहेंद्रवरम येथे राहण्याची सोय शोधण्यासाठी वेळ मिळाला नसता. त्यामुळे मी पुढे जात असल्याचे दोघांना सांगून पुढे निघालो. 




साधारण तासाभरात मी पुन्हा आमची राहण्याची काही सोय झाली आहे का याची चाचपणी केली. मात्र आनंदने कळवले की अजूनही काहीच निरोप आला नाहीये. इतक्यात मला आमचा ठाणेकर मित्र विवेक करमरकरने राजमहेंद्रवरम येथील इस्कॉन मंदिरात सोय होऊ शकेल असे सांगितल्याची आठवण झाली. एव्हाना साधारण सव्वा तीन वाजले होते. मी चहासाठी थांबा घेतला आणि लगेचच इस्कॉन मंदिरात फोन लावून तेथे राहण्याची सोय होऊ शकते का ह्याची विचारणा केली. आम्ही कोणीही त्यांचे सभासद नव्हतो. मात्र तरीही आमची सशुल्क सोय होऊ शकेल असे त्यांनी कळवले. मी लगेचच आनंदला आपली इस्कॉन मंदिरात सोय झाली असल्याचे कळवले. माझ्यापासून राजमहेंद्रवरम शहर अजूनही साधारण पस्तीस किमी लांब होते. सोय होत असल्याने मी आता धीम्या गतीने जाऊ लागलो. माझ्या अंदाजाने त्या तिघांनी आता मला गाठायला हवे होते.. 

साधारण सव्वापाचच्या सुमारास आनंदने मेसेज केला की आंध्र पोलिसांनी राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे आपण इस्कॉन मंदिर रद्द करू या. आंध्र पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये आमची सोय केली होती ते हॉटेल माझ्यापासून साधारण सात किमी अंतरावरच होते.  म्हणून मी पुन्हा एकदा चहासाठी थांबा घेतला आणि त्यांना तसे कळवले. ते तिघेही माझ्यापासून साधारण पाच किमी मागे होते. त्यामुळे माझा चहा पिऊन होईपर्यंत ते येतील असा माझा अंदाज होता. त्यांनीही मला तसे कळवले होते. त्यांच्या ठिकाणापासून अर्धा पाऊण तासात आम्ही हॉटेल गाठू शकत होतो. मात्र चहा पिऊन अर्धा तास झाला तरी ते येईनात म्हणून मी फोन केला. तेव्हा संजयने मला सांगितले ते जेवणासाठी थांबले आहेत. मला ह्याचा काहीच उलगडा होईना की मी त्यांच्यापासून फक्त १५- २० मिनिटे अंतरावर त्यांची वाट पाहत आहे हे माहित असूनही मला काहीच न कळवता ते अचानक जेवायला का थांबले. तसेही आणखी पाऊण तासात तर आम्ही राहण्याच्या ठिकाणी पोचणार होतोच. मी फोन केला तेव्हा त्यांनी मागितलेले जेवणही आलेले नव्हते. मग मात्र मी त्यांना कळवले की मी आता पुढे निघतो आणि आमचे राहण्याचे हॉटेल गाठतो, तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे या. 

राजमहेंद्रवरम शहर बऱ्यापैकी मोठे आहे. शहराचे क्षेत्रफळ १६० चौरस किमी असून हे आंध्र प्रदेशातील लोकवस्तीच्या तुलनेत पाचवे मोठे शहर आहे. मी शहरात शिरत असतानाच शहरी ट्रॅफिक जाणवू लागले. त्यामुळे शेवटचे सात किमी अंतर कापायला अर्धा पाऊण तास तरी गेला. आंध्र पोलिसांनी आमची सोय केलेले अथीधी इंटरनॅशनल हे हॉटेल तीन तारांकित होते. हॉटेलच्या आवारातच त्याची कल्पना येत होती. माझी सायकल त्या हॉटेलच्या प्रशस्त आवारात पार्क करून मी रिसेप्शनकडे वळलो. तिथे मात्र आमची काही सोय झाल्याची माहिती नव्हती. मी आनंदला कोणाच्या नावाने बुकिंग आहे हे विचारले. त्याने त्याच्याच नावाचे बुकिंग असल्याचे सांगितले. पण रिसेप्शनला त्याचे नाव दिसत नव्हते. मग मात्र मी आंध्र पोलिसांतर्फे काही बुकिंग आहे का हे विचारले. रिसेप्शन काउंटरला त्याची माहिती नव्हती. इतक्यात त्या हॉटेलचे एक वरिष्ठ माझ्याकडे आले. त्यांना आमच्या वास्तव्याची माहिती मिळाली होती. त्यांनी मला लॉबीमध्ये बसायला सांगितले. लॉबी अतिशय सुंदर, प्रशस्त आणि सजवलेली होती. 

बराच वेळ झाला तरी मला चावी मिळेना. मी थोडा अस्वस्थ झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला इतर जण कधी येतील ह्याबद्दल विचारले. मी त्यांना सांगितले ते बरेच मागे आहेत त्यांना उशीर होईल. हे सांगितल्यावर त्यांनी मला लगेचच चावी दिली. रूम उघडून पाहतो तर काय... रूम अतिशय प्रशस्त होती. शिवाय फर्निचर सुंदर होतेच. अतिरिक्त रूम, बाल्कनी होती. मुख्य म्हणजे चक्क बाथटब होता. मी पहिल्याप्रथम एक चहाची ऑर्डर दिली. एका भल्यामोठ्या थर्मासमध्ये चहा आला. मी एक कप चहा प्यायला. तरीही अजून एक दीड कप चहा शिल्लक होता. तिघेही अजून आले नव्हते. मी उरलेला चहाही फस्त केला आणि बाथटबकडे मोर्चा वळवला. 

साधारण आठ वाजता आमची त्रिमूर्ती हॉटेलमध्ये आली. संजयच्या सायकलचा शहरात शिरत असतानाच काहीतरी घोटाळा झाला होता. मी लगेचच येथील डेकॅथलॉन दुकानाचा पत्ता संजयला पाठवून तिथे जायला सांगितले. थोड्या वेळाने संजयच्या रूममध्ये गेलो तर संजय रूममध्ये होते. मला ह्याचे आश्चर्यच वाटले की इतक्या लवकर संजय डेकॅथलॉनमध्ये जाऊन कसे आले. तर संजयने उत्तर दिले की तो उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी तिथे जाणार आहे. मला तर त्यांच्या बोलण्याचा अर्थच कळेना. आम्हाला सकाळी सातच्या आधी निघायचे होते, डेकॅथलॉन दुकान तर दहा साडेदहा आधी उघडणार नाही ह्याची खात्री होती. मग संजय इतका वेळ का थांबले आणि उद्या जाईन असे कसे म्हणू शकतात. मी त्यांना म्हटले तुम्ही ताबडतोब निघा. दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी कोण सकाळी सातच्या आधी सायकल दुरुस्त करून देणार. गंतव्यस्थानी आपण वेळेवर पोचायला मी का सांगत असतो ह्याचीही त्यांना आठवण करून दिली. मी नेहमी सांगत असायचो की आपण मुक्कामी सूर्यास्ताच्या आत पोचलेच पाहिजे म्हणजे ते शहर बघायला, सायकलची दुरुस्ती करायला पुरेसा वेळ मिळतो. शिवाय जेमतेम दहा बारा किमी अंतरावर असताना जेवणासाठी थांबायचा निर्णय घेऊन त्या तिघांनी वेळ घालवला होताच शिवाय त्यानंतर जवळपास तीन तासांनी ते पोचले होते.

मी सांगितल्यावर मात्र संजय डेकाथलॉन मध्ये जायला तयार झाले. त्यांनी मलाही सोबत यायला सांगितले. मी माझ्या रूममध्ये परत आलो. मात्र मला चष्मा कुठे ठेवला हेच आठवेना. त्यात पाच दहा मिनिटे गेली. तरी चष्मा सापडला नाही. मग मी संजयला एकट्यानेच डेकाथकॉनला जायला सांगितले. माझी चौकशी करायला आनंद आला. त्याला मी चष्मा सापडत नसल्याचे सांगितले. अख्खा एक ACP माझ्या तावडीत सापडला होता. त्यालाच अखेर मी चष्मा शोधायला सांगितले. मी चष्मा न लावल्याने नीट शोधू शकणार नव्हतो. अखेर आनंदच्या पोलिसी डोळ्यांनी माझ्या चष्म्याचा शोध लावला. संजयदेखील त्यांची सायकल दुरुस्त करून घेऊन आले. आमच्या हॉटेलसमोरच एक खानावळ होती. तिथे आंध्र पद्धतीचे उत्कृष्ट जेवण आम्हाला मिळाले. त्या तिघांचे दुपारचे जेवण संध्याकाळी झाले होते तर मला आज आंबट संत्र्यावर भागवावे लागले होते. रात्रीच्या जेवणाने पुन्हा एकदा कसर भरून काढली.

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

येलमनचिल्ली: कोलकाता चेन्नई सायकलसफर







 भोगापुरम येथील हॉटेल अन्नपूर्णा येथे आम्ही वगळता कोणाचाच मागमूस नव्हता. आमचे स्वागत करणारे पोलिस गेल्यावर तर तिथे चिटपाखरूही नव्हते. आमची झोप मात्र शांत झाली. पहाटे जाग आल्यावर मी आणि संजय चहाच्या शोधार्थ बाहेर पडलो. जवळपास दीड किमी अंतरावर आम्हाला चहाची सोय दिसली. तिथेच दोन दोन छोटे कप चहा घेऊन आम्ही पुन्हा थर्मोस भरून घेतला. वाटेत सूर्योदयाचा सूर्य फारच लोभसवाणा दिसत होता. रस्त्याच्या कडेला एके ठिकाणी रांगेत बरेचसे मुखवटे लावलेले दिसत होते. त्यावरील कलाकारी लक्ष वेधून घेत होती.

हॉटेलमध्ये आल्यावर आम्ही आनंदबरोबर परत चहा घेतला. हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये कोणी नव्हतेच. सायकली योग्य अवस्थेत आहेत ह्याची तपासणी करून आम्ही निघालो. आम्ही सायकलवायला सुरुवात करेपर्यंत ८.१५ वाजून गेले होते. हॉटेल सोडल्यानंतर जवळपास ११ किमी सेवा रस्ता आणि मुख्य महामार्ग ह्यामधील बॅरिकेड्स आम्हाला महामार्गाला जाण्यासाठी वाट देत नव्हते. त्यानंतर मार्ग सापडताच आम्ही मुख्य महामार्ग पकडला. सहा लेनचा महामार्ग आणि त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन दोन लेनचे सेवा मार्ग असा प्रशस्त कारभार होता. 



समोर महामार्गावर एक उड्डाणपूल दिसू लागला. एक रस्ता त्याच्या डावीकडे वळत होता जो विशाखापट्टणमकडे जाणार होता. मात्र ते आमच्या मार्गात नव्हते तर महामार्गापासून जवळपास तीस किमी आत होते. मी उड्डाणपूल चढायला सुरुवात केली खरी. मात्र आधीच्या अनुभवावरून मला शंका आली की आनंद आणि संजय उड्डाणपूल न चढता बाजूच्या रस्त्याने यायचा प्रयत्न करतील जो आमच्या मार्गापासून दूर थेट विशाखापट्टणमला जाईल. त्यामुळे मी उड्डाणपुलावर थोड्याच अंतरात थांबलो. वास्तविक उड्डाणपूल सुरू व्हायच्या आधी विशाखापट्टणचा फाटा फुटतो तिथे फलकही होता. मात्र माझ्या अंदाजाप्रमाणे दोघेही तो फलक न पाहता उड्डाणपूल टाळून विशाखापट्टणकडे वळले. माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोचू शकत नसला तरी त्यांनी मला पाहिले होते. पुन्हा हातवारे करून त्यांना तो मार्ग घेऊ नका असे सांगू लागलो. थोडे पुढे येताच त्यांना माझ्या खुणा लक्षात आल्या आणि दोघेही मागे येत परत उड्डाणपुलावर आले. 

थोड्या वेळातच आम्हाला उन्हाचा तडाखा जाणवू लागला. सकाळी निघायला उशीर झाल्यामुळे एव्हाना भूकही लागली होती. मात्र नाष्टा करायचा असेल तर पुन्हा सेवा रस्त्याला जावे लागणार होते. दुर्दैवाने एकदा महामार्ग पकडल्यावर पुढे तीस किमी पर्यंत बॅरिकेड्स संपत नव्हते. तसेही सेवा रस्त्यालाही कोणतेही दुकान अथवा छोटी टपरीही नव्हती. डोक्यावर उन्हाची आग आणि पोटात भुकेची आग आम्हाला त्राही माम करायला लावत होती. आमची गती चांगलीच मंदावली होती. आज खरेतर मी फार अंतर ठेवले नव्हते. जेमतेम १०० किमी अंतरावर असलेल्या एलमनचिल्ली ह्या गावात राहायचे ठरवले होते. मात्र आंध्र पोलिसांमधील आनंदच्या मित्राने ते गाव राहण्यायोग्य नसल्याने तिथे राहू नका असे सांगितले होते. त्यामुळे जमले तर आणखी थोडे पुढे जावे लागणार होते. 

आम्ही अतिशय संथपणे मात्र निर्धाराने पेडल मारत होतो. अखेरीस जवळपास ५० किमी अंतरावर आम्हाला सेवा रस्त्याला जाता आले. तिथेही नाष्टा करण्यासाठी उपहारगृह नव्हतेच. पण एक चहाकेंद्र होते. तिथे चहा आणि बिस्किटे ह्यावर समाधान मारून आम्ही पुन्हा सायकलवायला सुरुवात केली. वेळ पुढे जात होती तसे ऊन तर वाढतच होते. आम्ही आता सेवा रस्त्यानेच जाणे सुरू ठेवले. मात्र त्याच्या लगतही ना विश्रांतीसाठी ना कोणते झाड होते ना एखादे दुकान. चहा बिस्किटांनी नाश्त्याची कसर भरून काढली नव्हती.

आम्ही पुन्हा एकदा सायकलवायला सुरुवात केली. ऊन आणि भुकेने आम्हाला थकवा जाणवू लागला होता. अखेरीस आणखी थोडा वेळ पेडल मारल्यावर एक बस थांबा दिसला. तिथे बसायची सोय होती. वर छप्परही होते. मी लगेचच तिथे सायकल लावली. बस स्थानकावर नाव होते बंजारा! आम्हीही तसेच बंजाऱ्यांप्रमाणे भटकंती करत होतो. त्यामुळे ते बस स्थानक आम्हाला शोभेसेच होते. मी तिथे आडवाच झालो. डोक्याखाली हेल्मेट घेऊन शांतपणे पडून राहिलो. 

संजय आणि आनंदही विसावा घेत होते. थोडी विश्रांती झाल्यावर आम्ही नाईलाजाने उठलो. नाष्टा झाला नव्हताच मात्र मध्यानाची वेळ उलटून गेली होती. आता जेवण तरी मिळणार की नाही ह्याची चिंता सतावत होती. आम्ही सेवा रस्ता सोडू शकत नव्हतो. त्यामुळेही आमची गती आणखीच मंदावली. सुदैवाने काही अंतरावर एक छानसा धाबा दिसला. आम्ही सायकली लावल्या. इतक्यात आणखी एक सायकलपटू तिथे आला. आमच्या सायकली पाहून त्यानेही त्याची सायकल तिथे थांबवली होती. 

आमचे जेवण येईपर्यंत मी त्याच्याकडे जाऊन त्याची चौकशी केली. तो येथील स्थानिक असावा त्यामुळे मी इंग्रजीतच त्याची चौकशी केली. त्याने सांगितले की तो मूळचा गोवेकर होता. म्हणून मी हिंदीत संभाषण पुढे नेले. त्याने नाव सांगितले...  विक्रम दाभाडकर! मग थेट मराठीच सुरू केली. विक्रम नोकरीनिमित्ताने विशाखापट्टणम येथे कूक म्हणून काम करत होता. साधारण वर्षभर तो येथे राहत होता आणि तेलगु बोलायलाही शिकला होता. आत्ता सायकलने विशाखापट्टणमहून गोव्याला जायला निघाला होता. विशाखापट्टणमहून राज नावाचा सायकलपटू आमच्याबरोबर चेन्नईपर्यंत येणार होता. त्याला येणे रद्द करावे लागले होते. त्याच्या ऐवजी अनपेक्षितपणे आता विक्रम काही अंतर तरी आमच्याबरोबर येणार होताच. अर्थातच आता स्थानिक भाषा बोलता येणारा साथीदार लाभल्याने आमची सोय होणार होती आणि त्यालाही आमची सोबत मिळणार होती.

धाबा पंजाबी होता. तिथे शेवभाजी आहे कळल्यावर मी एकदम खूष झालो. रोटी आणि शेवभाजी असा मस्त बेत होता. भातापासून माझी सुटका झाली होती. आम्ही सगळ्यांनीच मनसोक्त ताव मारला. सकाळी नाष्टा न मिळाल्याची कसर जेवणात भरून काढली 

जेवण झाल्यावर थोडे सुस्तावलो असलो तरी जवळपास निम्मे अंतर बाकी असल्याची जाणीव होतीच. आम्ही थोड्या सुस्तपणे सायकलवायला सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा सेवा रस्त्यावरून मुख्य रस्त्याला यायला मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे आम्ही सेवा रस्त्यानेच जाऊ लागलो.

थोड्या वेळाने मुख्य महामार्ग एका उड्डाणपुलावरून जात असल्याचे दिसले. मात्र सेवा रस्ता त्या महामार्गाखालून पलीकडच्या बाजूला गेला होता. आम्हाला महामार्गाला जायला वाटच नव्हती. नाईलाजाने आम्ही सेवा रस्त्याने महामार्गाखालून गेलेल्या रस्त्याने गेलो. तर तो मार्ग महामार्गाच्या उजवीकडून एका गावात शिरत होता. आम्हाला पर्यायच नव्हता. नाईलाजाने आम्हाला त्या गावात शिरून  ५- ७ किमी गाव फिरून पुन्हा महामार्गाला यावे लागले. आनंद आणि संजयला महामार्ग न सोडता सेवा रस्ता का घेऊ नये ह्याचा आज एका दिवसातच दोनदा अनुभव आला होता. पहिल्यांदा ते दोघेही सेवा रस्ता समजून आमचा मार्ग सोडून विशाखापट्टणम कडे जाण्याची दिशा धरणार होते आणि आत्ता सेवा रस्त्यामुळे आम्हाला मोठा फेरा पडला होता.



जेवण उशिरा झाल्याने आमच्याकडे सूर्यास्तापर्यंत फार वेळही उरला नव्हता. येलमनचिली अजून लांबच होते आणि सूर्य झपाट्याने क्षितिज गाठू लागला होता. अखेरीस मी आनंदला त्याच्या आंध्र पोलिसांतील मित्रांना आमची कुठे व्यवस्था होऊ शकते ह्याची पुन्हा विचारणा करायला सांगितले. त्यांनी सांगितले की आम्ही येलमनचिल्ली पोलिसांच्या हद्दीत पोचलो आहोत. त्यामुळे त्याच गावात आमची व्यवस्था ते करतील. पोलिस खात्याने जे गाव आम्हाला टाळायला सांगितले होते, नेमके त्याच गावात त्या पोलिसांनाच आमची व्यवस्था करावी लागणार होती.


पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही येलमनचिल्ली येथे पोचलो. गुगल मॅप ने आम्हाला चांगल्याच कच्च्या रस्त्याला वळवले. त्या रस्त्याने आम्ही गावात शिरलो. तिथेही वाटेत पोलिस खात्यातील सहकारी आम्हाला घेण्यासाठी सामोरे आले.

एका टुमदार लॉज मधील एका मोठ्या खोलीत पाच सहा बेड टाकलेले होते. तिथेच आमची व्यवस्था करण्यात आली होती. गाव छोटेसेच होते. त्यामुळे आम्हाला लगेचच बाहेर पडून जेवणाची व्यवस्था बघावी लागणार होती. सुदैवाने फार लांब जावे न लागता आमची जेवणाची व्यवस्था झाली. दुपारी रोटी मिळाली असली तरी आता मात्र भातावर समाधान मानावे लागणार होते.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...