रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

मालगुडी डेज: कोलकाता चेन्नई सायकलप्रवास

अमरावती हॉटेल मधील वास्तव्य सुखावह होते. झोप छान झालीच होती. मी पहाटे ५ वाजताच उठलो होतो. लगेचच warmshower वर विजयनगरम शहरामध्ये आजची राहायची सोय कुठे होऊ शकते का ह्यासाठी शोध घेऊ लागलो. विनय तोष्णीवाल ह्यांचा संपर्क तिथे दिसला. आमची आज रात्रीची सोय होऊ शकेल का हे विचारण्यासाठी मी त्यांना मेसेज केला. अक्षरशः दुसऱ्या मिनिटाला त्यांनी आमची सोय होईल असे उत्तर दिले. पहाटे ५- ५.१५ ला इतक्या लगेच उत्तर येईल ह्याची अपेक्षाच नव्हती. विनयची माझी काहीही ओळख नव्हती की त्याचा reference देखील नव्हता. केवळ warmshower वर शोधताना त्याचे नाव पाहून मी मेसेज केला काय आणि लगेचच त्याचे उत्तर आले देखील. Warmshower सारख्या साईट्स हे फिरस्त्यांसाठी खरोखरच अनमोल ठेवा आहे. विनयने केवळ आमची राहण्याचीच व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले तर तर त्याने पुढे आणखी काही विशेष व्यवस्था हवी आहे का ह्याचीही चौकशी केली. वास्तविक विनय तिथे आज असणार नव्हता. मात्र त्याने सांगितले की त्याचा माणूस तिथे असेल आणि तो तुम्हाला हवी असेल ती सगळी व्यवस्था नक्कीच करून देईल.

मी लगेचच आनंद आणि संजय ह्यांना आपली आजची सोय होत असल्याचे कळवले. आनंदही लगेच म्हणाला आंध्र पोलिसांतर्फेही आजची राहायची सोय होण्याची शक्यता आहे. आज दोन ठिकाणाहून सोय होणार होती. आता आम्हाला निर्णय घ्यायचा होता.


                                                   

त्याच आनंदात मी चहा घेण्यासाठी हॉटेलशेजारील दुकानात गेलो. तिथे चहाखेरीज इतर अनेक वस्तू होत्या.दुकानदारही सायकलवरून बराच फिरला होता. त्यामुळे तोही आमची मोहीम ऐकून खूप उत्साहित झाला होता. चहातर एकदम फर्मास होता. त्यामुळे आम्ही चांगलेच ताजेतवाने झालो होतो. वातावरणही आल्हाददायक होते. आजचा सूर्योदय आमचा उत्साह वाढवत होता. आम्ही तिघांनीही सायकली सज्ज केल्या आणि मार्गस्थ झालो. प्रशस्त आणि सुंदर रस्ता आम्हाला वेग घेण्यास आवाहन करत होता. आम्ही त्याची आज्ञा शिरसावंद्य मानत वेग घेतला.

आज आमच्या सायकल प्रवासाचा सातवा दिवस होता. आमच्या मोहिमेतील राखीव दिवस आम्ही चौथ्याच दिवशी उपयोगात आणल्यामुळे आता आम्हाला रोजचे अंतर पूर्ण करावे लागणारच होते. ते सूर्यास्तापूर्वी पार केले तरच गंतव्यस्थानी गेल्यावर तेथील परिसर, संस्कृती अनुभवण्याची संधी मिळणार होती. आजचे अंतर जवळपास १५० किमी होते. अर्थातच त्यामुळे आता दिवसभर वेग कायम राखणे आवश्यक होते. सुदैवाने आज बऱ्यापैकी चढ उतार , उड्डाणपूल असलेला रस्ता होता. त्यामुळे फुजीचा उत्साह वाढत होता. साधारण अडीच तास सायकलवल्यावर मी नाश्त्यासाठी हॉटेल शोधू लागलो. आनंद आणि संजय ह्यांची गती मंदावली होती. मी त्यांना आणखी अर्ध्या तासाच्या अंतरात आपण थांबूया असे सांगून पुढे निघालो.























सुदैवाने थोड्याच वेळात रस्त्याच्या डाव्या बाजूला मोकळ्या जागेत एक चारचाकी वाहन उभे असलेले दिसले. त्याच्या आजुबाजूला बरेचजण तिथे नाश्ता करत असलेले दिसल्यावर मी कुतुहलाने पाहू लागलो. तर तिथे दाक्षिणात्य पदार्थांची मेजवानी दिसत होती. एव्हाना ४८ किमी अंतर पार झाले होते. मी लगेचच सायकल बाजूला लावली. संजय आणि आनंदही लगेचच आले. इडली, गोल वडा, उत्तप्पा, डोसा अशा अनेक पदार्थांची रेलचेल तिथे होती. आम्ही मनसोक्त ताव मारला आणि क्षुधाशांती करून घेतली.

                                     


नाष्टा करून आम्ही पुढे निघालो. मात्र नाष्टा झाल्यावर आनंद आणि संजय वेग घेईनात. माझ्या मनातील घड्याळ आणि काम काळ वेग हे त्रैराशिक मला वेग कमी करू देत नव्हते. मी पुढे निघालो. थोड्या वेळातच एक दुचाकीचालक माझ्या समांतर जात माझी चौकशी करू लागला. तो वैद्यकीय कॉलेजमधील विद्यार्थी होता. आमच्या प्रवासाबद्दल ऐकल्यावर त्याने लगेचच पन्नास रुपये काढून दिले आणि त्याच्याकडून ती मदत घेण्याविषयी सांगू लागला. मी त्याला नम्रपणे नकार दिला. मात्र तो म्हणाला त्याला स्वतःला अशी यात्रा करायला आवडले असते, मात्र ते सध्या शक्य नाही. तर आमच्या प्रवासात मदत करून तेवढे समाधान तरी त्याला हवे होते. मी ती नोट स्वीकारली. लगेचच तो डावीकडील फाट्यावरून जवळच्या गावात निघून गेला. 

                                             

काही वेळ गेला न गेला तोच आणखी एका दुचाकीवरून दोन स्वार माझी चौकशी करू लागले. त्यांनीही मला पैसे देऊ केले. मात्र मी त्यांचे आभार मानून त्यांना नकार दिला. त्यांना म्हटले तुमच्या शुभेच्छा ह्याच आम्हाला आवश्यक आहेत. दोघेही थोडे नाखुश झाले. मात्र त्यांच्याबरोबर थोडा वेळ सायकलवत गप्पा मारल्यावर तेही निघून गेले. बरेच जण आमची चौकशी करत आम्हाला शुभेच्छा देत होते. आसाममधील मोटारसायकलपटू दिगंत बारुआ आणि जितेंदर सिंग पुन्हा एकदा आम्हाला दिसले. त्यांच्याबरोबर गप्पा मारत आम्ही पुढे निघालो. त्यांनी वेग घेतल्यावर मी मागे राहिलो. त्याचा निरोप घेतो न घेतो तोच आणखी एक मोटार सायकल पटू माझ्या समांतर येऊन माझी चौकशी करू लागला. मी त्याला माझ्या फिट इंडिया मोहिमे अंतर्गत आत्तापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली आणि ह्यावेळच्या कोलकाता चेन्नई प्रवासाच्या टप्प्याची माहिती दिली. त्याचे नाव होते तेजा. तो पलासा येथेच राहणारा होता. परीक्षेसाठी तो विशाखापट्टणम येथे जाणार होता. त्याची परीक्षा दुसऱ्या दिवशी ९.१५ ते ११.१५ दरम्यान होती. त्याने सांगितले की ११.१५ नंतर मला नक्की फोन करा. आम्ही बराच वेळ गप्पा मारत जात होता. अखेर तोही पुढे निघाला.

      

                                                                               

वाटेत एक सुंदर रेल्वे स्टेशन दिसत होते. इनमिन दोन फलाट आणि दोनच रेल्वे रुळ होते. आमचा रस्ता त्या फलाटांच्या पुढील उड्डाणपुलावरून जात होता. त्या फलाटांच्या दुतर्फा शेती दिसत होती. फलाट बराच लांबलचक होता. इतका की फलाटाची दुसरी बाजू दिसतही नव्हती. मात्र इतक्या लांबलचक दोन फलाटांवर मिळून एकच माणूस दिसत होता. चित्र अगदी मनमोहक होते. त्या रेल्वे स्टेशनचे नाव होते हरीसचंद्रपुरम. बहुधा ते हरिश्चंद्रपुरम असे असावे. मात्र देवनागरी लिपी मध्ये मात्र हरीसचंद्रपुरम असाच उल्लेख तिथे होता. तेथील मनमोहक आणि शांत वातावरण पाहताना मला मात्र मालगुडी स्टेशन (हिंदी मालिका मालगुडी डेज ह्या मधील काल्पनिक गाव) ची आठवण येत होती.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...