तिरूचेंदुर येथे सगळे सायकलस्वार चांगलेच रमले होते. समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा मन प्रसन्न करत होत्या. मात्र प्रत्येकाला वेळेचेही भान होते. त्यामुळे आपल्या उत्साहाला आवर घालत प्रत्येकजण त्वरेने परत फिरू लागला. अर्थात गर्दीमुळे आम्हाला सायकल हातात घेऊनच जावे लागते होते. अर्थात तरीही प्रत्येकाच्या मनातील तजेला चेहऱ्यावर दिसत होता.
गर्दीतून वाट काढत आम्ही सायकली बाहेर काढल्या. सायकलवर बसण्याची संधी मिळताच प्रत्येकजण ती संधी साधत होता. सर्वानन सगळ्यात पुढे होताच. त्याच्या मागोमाग आम्ही सगळेजण गर्दीतून वाट काढत रांगेत जात होतो. आमचे सहाय्यवाहन येथे येऊ शकत नव्हते हेही सगळ्यांना अगोदर कळले होतेच. अर्थात ते आता उपलब्ध नसल्याची माहितीही सगळ्यांना होती. शहराबाहेर जायची वाट फक्त सर्वाननला माहीत असल्याने त्याला नजरेच्या टप्प्यात ठेवणे भाग होते.
सर्वाननने अचानक उजवे वळण घेतले. गल्ली छोटीशीच होती. गर्दीही भरपूर होती. मागे वळून पाहायला थांबणे शक्य नव्हते. आम्ही सगळेजण जागा मिळेल तसे तिथे वळलो. पुढे लगेच एक डावे वळण घेत मोकळी जागा दिसताच सर्वाननने वेग घेतला. सगळेजण तसे वळले. सर्वाननने तेथून परत उजवे वळण घेतले. माझ्या पुढील सायकलपटू तसेच वळले. मात्र खरतर इथे थोडी मोकळी जागा असल्याने मी मागच्या सायकलपटूचा अंदाज घेतला. माझ्या मागे पवन होता. त्याने मला पटकन सांगितले त्याच्या मागे अरुणा लागू होत्या त्या दिसत नाहीत त्या चुकू शकतात. खरतर ह्याच अंदाजाने त्यांना मी सहाय्य वाहनातून जायला सांगितले होते. मात्र त्यांनी माझ्या सुचनेकडे दुर्लक्ष करत त्या हट्टाने आमच्याबरोबर आल्या होत्या. त्यामुळे मलाही मनात त्यांचा राग आला होताच. मी त्याला म्हटले त्या ' चुकल्याच ' आहेत (चुकीचेच वागल्या आहेत). मात्र ह्यावेळी राग काबूत ठेवणे आवश्यक होते. मी सर्वाननला फोन लावला पण त्याने उचलला नाही. मग मी पवनला वेगाने पुढे जात सर्वाननला थांबवायला सांगितले आणि मी जागेवरच थांबून राहिलो.
गणेशोत्सवात पुण्यात गर्दी असावी तशी गर्दी तिथे होती. त्यामुळे मलाही तिथे फार वेळ थांबता येत नव्हते. तेथील वाहतूक पोलीस मला पुढे जायला सांगू लागला तेव्हा त्याला मी अरुणा लागुंचे वर्णन करून त्यांना पुढील मार्गाचे मार्गदर्शन करायला सांगितले आणि पुढे गेलो. वाटेत अरुणा लागूंना फोन करण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्या फोनही उचलत नव्हत्या.
थोड्याच वेळात मी शहराबाहेर पोचलो. येथून पुढे रहदारी आणि गर्दी नव्हती. ह्या रस्त्यावर काही अंतरावर सगळेजण एकामागोमाग रांगेत थांबले होते. रस्ता अरुंद होता. मी अरुणा लागू येईपर्यंत सगळ्यांना तिथेच थांबायला सांगितले. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. अरुणा लागू आम्हाला भेटायच्या आत अंधार झाला तर त्यांना शोधणार कुठे हा प्रश्न सतावत होता. शिवाय आम्ही थांबलो होतो तो रस्ताही तसा अरुंद आणि निर्मनुष्य होता. त्यामुळे आम्हालाही धोका होता. आता मात्र मी ठरवले होते की जेव्हा सहाय्य वाहन मिळेल तेव्हा सगळ्यांना सायकलिंसह सहाय्यवाहनात बसायला सांगायचे.
सुदैवाने अंधार पडायच्या आत अरुणा लागू आल्या. मात्र त्यांच्यासाठी आम्ही रांगेत थांबलो असताना त्या तश्याच सगळ्यांकडे दुर्लक्ष करत पुढे गेल्या. मग मात्र मी त्वरेने पुढे जाऊन त्यांना थांबवले. ह्या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वानन कोणालाही न सांगता पुढे निघून गेला होता. मग मी सगळ्यांना रांगेत क्रमाने उभे करून त्याच क्रमाने रांगेत सायकल चालवण्यास सांगितले आणि एक task दिला...
सगळ्यात पुढे असलेल्याने १ असा क्रमांक पुकारायचा, त्याच्या मागच्याने २, त्याच्या मागच्याने ३, असे करत शेवटच्याने त्याचा क्रमांक पुकारायचा. हे करताना ज्याला आपल्या मागच्याचा आवाज आला नाही त्याने थांबायचे. जर शेवटच्यापर्यंत व्यवस्थित क्रमांक पुकारले असतील तर परत शेवटच्याच्या पुढील क्रमांकावरील सायकलस्वाराने त्याचा क्रमांक पुकारायचा आणि उलट क्रमाने सगळ्यात पुढच्यापर्यंत क्रमांक पुकारत जायचे. ह्यामुळे सगळे सायकलस्वार व्यवस्थित आहेत हे अंधारातही कळत होते. आमची परेड जात असताना वाटेत सर्वाननही आम्हाला सामील झाला. रस्ता मात्र संपता संपत नव्हता. अंधार चांगलाच गडद झाला होता. मात्र दर पाच दहा मिनिटांनी आम्ही आमचा क्रमांक पुकारण्याचा task करत होतो. त्याने सगळेजण थोडे रिलॅक्सही होत होते.
जवळपास सात- साडेसात वाजता आम्ही काटकोनात महामार्गाला लागलो. आमचे सहाय्य वाहन दुसऱ्या रस्त्याने येऊन तिथेच उभे होते. आम्ही सगळेजण पायउतार होऊन तिथे जमा झालो. एव्हाना सगळ्यांचीच सहनशक्ती संपली होती. इतक्यात प्रमोदने मला अचानक म्हटले आता तू काहीतरी 'action' घे. अर्थातच हे अरुणा लागूंना उद्देशून होते. मला हे अगदीच अनपेक्षित होते. वास्तविक ह्या सगळ्या संभाव्य गोंधळाचा विचार करून मी अरुणा लागुंना सहाय्य वाहनात बसायला केव्हाच सांगितले होते. मात्र कोणालाही न सांगता न जुमानता त्या स्वतःहून सहाय्यवाहनातून उतरल्या होत्या. मी लगेचच प्रमोदला म्हटले 'ठीक आहे मी आत्ता action घेतो. येथून पुढे सगळ्यांनी सहाय्य वाहनातून आजच्या निवासस्थानाकडे जायचे.' खरेतर हे मी आधीच ठरवले होते. मात्र प्रमोदला वाटले की त्याच्या बोलण्यावर चिडून मी म्हणत आहे. अर्थातच अरुणा लागू राहिल्या बाजूला, आता आमच्यातच वाद सुरू झाला. माझ्या मनात हे स्पष्ट होते की आपल्याला हा भाग पूर्ण अनोळखी आहे, येथील पुढील रस्ता कसा आहे आपल्याला माहीत नाही, वाटेत घाट किंवा जंगल आहे का माहीत नाही, स्थानिक भाषा आपल्याला येत नाही आणि तसेच ज्याला येथील भाषा येते तो सर्वानन मात्र सगळेजण रांगेत बरोबर आहेत की नाही ह्याची काळजी न घेता वेगात पुढे निघून जातो. तसेच सहाय्य वाहन चालवताना सतीश शेवटच्या सायकलस्वाराच्या मागे न राहता वेगात पुढे जाऊन ५-१० किमी वर थांबत होता. हे पदयात्रेला ठिक होते पण सायकल यात्रेवेळी जर शेवटच्या सायकलपटुला अपघात झाला तर तो स्वतः कळवू शकत नाही आणि सहाय्य वाहन मागे नसेल तर त्याला मदतही योग्य वेळी मिळू शकत नाही.
आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आता पुन्हा अरुणा लागू कुठे चुकल्या तर संपूर्ण रात्र जागून रस्त्यावर काढावी लागेल. आणि पुढचा दिवसही वाया जाऊ शकेल.
मात्र प्रमोद आता वेगळ्याच ट्रकवर गेला होता. सर्वानन ह्यावेळी अतिशय शांत होता. त्याने तोडगा काढला की मी आणि सगळ्या महिला सायकलस्वारांनी सहाय्य वाहनाने जावे. तो, प्रमोद, प्रसाद आणि पवन सायकल चालवत येतील. सतीशला मी त्यांच्यामागून वाहन चालवायला सांगितले आणि आम्ही सायकलिंसह सहाय्य वाहनात मागे बसलो. मात्र पुन्हा एकदा सतीशने सगळ्या सायकलपटुंच्या पुढे वाहन नेले. साधारण अर्धा पाऊण तास प्रवास केल्यावर आम्ही गंतव्यस्थानी पोचलो. सर्वांननच्याच ओळखीने आमची सोय थूतुकुडी शहाराजवळील Heavy Water Project च्या अतिथी गृहात झाली होती.
सुनिता आणि मी दोघेही पुढे जाऊन आमच्या राहण्याच्या सोयीची चौकशी केली. थोडा विसावा घेतोय तोच कळले की जेवणाची वेळ संपत आली आहे. त्यामुळे लगेचच जेवायला गेलो. मागून येणाऱ्या चार शिलेदारांसाठीही त्यांना सूचना दिली. ते चौघे येईपर्यंत जेवण संपतच आले होते. जेवण आणि निवासाची व्यवस्था मात्र उत्तमच होती. सगळ्यांना झोप अनावर झाली होती. पहाटे ५.३०-५.४५ ला सुरू झालेली आजची रपेट संपली. तेव्हा साधारण ९-९.३० वाजले होते. दिवसभरात जवळपास १२० किमी अंतर पार केले होते. अंतरापेक्षा सगळ्यांनाच शीण आला होता तो तब्बल १५ - १६ तास प्रवास करण्याचा ...
आम्हाला सहाय्य वाहन मिळाले ते ठिकाण B ह्या अक्षराने दाखवले आहे. ते थिरुचेंदुर येथील मंदिरापासून १४ किमी वर होते. तेथून आमचे गंतव्यस्थान असलेले HWP चे अतिथी गृह २० किमी अंतरावर होते. वरील नकाशातील C ह्या अक्षराने अतिथीगृह दाखवले आहे.











































