रविवार, २४ डिसेंबर, २०१७

दसहजारी श्विन

चिंतन शहा - एकदम हसतमुख आणि शांत स्वभावाचा. तो फार बोलत नाही. एकदा #dombivlicyclingclub (DCC) च्या सदस्यांबरोबर रविवारच्या नियमित राइडसाठी गेलो असता भेटला. श्विन दर आठवड्यात एकदातरी #cycle2work करते हे त्याला माहित होतेच. श्विनकडे पाहत त्याने विचारले ," काय रे, किती कि.मी. झाले आत्तापर्यंत?"
खरे तर मी अंतर कधीच मोजत नव्हतो. आपण केवळ पॅडल मारावे. अंतर मोजायची मी कल्पनाच केली नव्हती. पण त्याच्या ह्या प्रश्नाने विचार आला की काय हरकत आहे अंतर मोजायला!
त्यामुळे मी #strava च्या साहाय्याने सायकलिंगचे अंतर मोजणे २०१६ या वर्षी सुरु केले. दरम्यान जुलै २०१६ मध्ये मुंबई गोवा मध्ये cycle2work (C2W) अशी स्पर्धा घेण्यात आली. त्यात माझे रोज घर- ऑफिस-घर असे ६२ किमी सायकलिंग सुरु झाले. मी त्यात २रा क्रमांक पटकावला. त्यानंतर डिसेम्बर २०१६ मध्ये #saveoursahyadri (SOS) ह्या मोहिमेत भाग घेतला.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरेच जण आपले वर्षाचे उद्दिष्ट ठरवतात.
भारतीय क्रिकेटला सन्मान प्राप्त करून देणारा आणि निवृत्त होताना विक्रमांचा विक्रम रचून ठेवणारा शैलीदार फलंदाज Sunil Gavaskar हे माझे अत्यंत आदराचे स्थान. गावस्कर यांच्या एकूण कसोटी धावा १०१२२. त्यांच्या प्रेमापोटी तसेच C2W आणि SOS च्या अनुभवाच्या जोरावर २०१७ या ग्रेगोरियन वर्षाचे ध्येय मी ठरवले ते सुनीलच्या एकूण कसोटी धावांइतके कि.मी. म्हणजे १०१२२ कि. मी. सायकलिंग करणे.
जानेवारी २०१७ पासून श्विनची दौड जोमाने सुरु झाली. जे व्यसन आपल्याला लागले ते इतरांना लागावे यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतातच. सर्वाना नियमित सायकलिंगची गोडी लागावी यासाठी मी २१ दिवसांची एक मोहीम आखली. त्यात २१ जणांनी भाग घेतला. मोहीम यशस्वी झालीच. पण त्यातील २१ जणच नव्हे तर इतर सायकलिस्टसुद्धा प्रेरित झाले होते. शिवाय याआधी सायकलिंग कडे न वळलेलेही सायकलिंग बद्दल विचारू लागले होते. यामुळे माझा उत्साहही चांगलाच वाढला.
त्या उत्साहात श्विनची नियमितता वाढली होती. पहिल्या ४ महिन्यातच ५००० किमी सायकलिंग पूर्ण झाले होते. त्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढला होता. या दरम्यान #cycle2work वर पूर्ण भर दिला होता. डोंबिवली -ठाणे - डोंबिवली लोकलप्रवासात होणारा त्रास वाचवून हेच अंतर रोज श्विनबरोबर पार करताना स्वतःशी व्यक्त होण्याची, स्वसंवाद साधण्याची संधी तर मिळाली होती. शिवाय रोज निसर्गाचे नवनवीन मुड पाहण्याची आणि मुख्य म्हणजे रोजच पिकनिकची मजा लुटण्याचीही संधी मिळत होती.
घर- ऑफिस-घर या प्रवासातच व्यायामही होत असल्याने व्यायामासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नव्हता आणि आरोग्यही चांगले राखता येत होते. याशिवाय श्विनच्या सफारीबद्दल लिहीण्याचाही छंद जडला. DCC चे सदस्य, शाळा- कॉलेजमधील मित्रमैत्रिणी, Tjsb Sahakari Bank मधील सहकारी, आप्तस्वकीय यांनी केलेल्या कौतुकामुळे श्विनसफारीबरोबरच लेखनाची खुमखुमीही वाढत राहिली. त्या लेखांमुळे आम्हालाही नियमित सायकलिंगची प्रेरणा मिळते असा अभिप्राय सुखावत होताच, पण खरेतर त्या लेखांमुळे माझेही सायंकलिंग नियमित होऊ लागले होते.
गावस्करांनी पहिल्याच मालिकेत केलेल्या भरघोस धावांप्रमाणेच श्विननेही पहिल्याच महिन्यात चांगला पल्ला गाठला.

पहिल्या ४ महिन्यातच जवळपास निम्मे अंतर पार झाल्याने वार्षिक ध्येय गाठण्यासंबंधी मी निर्धास्त होतो. वैशाखातही श्विन थांबायला तयार नव्हती. मात्र गावस्करांची बॅट जशी अचानक रुसली होती त्याचप्रमाणे महिन्यात तब्बल १०  वेळा श्विनचे टायर पंक्चर झाल्याने मी कंटाळलो होतो. #cycle2work ला ब्रेक लागलाच पण रोजचे सायकलिंगही अनियमित झाले. जुनमध्येही सूर गवसेना.

सुनील गावस्कर यांचा जन्मदिवस १० जुलै जवळ येऊ लागल्याबरोबर श्विनला पुन्हा लक्ष्य खुणावू लागले. श्विनची दौड पुन्हा सुरु झाली. मात्र तेवढ्यात घात झाला. पायाला झालेल्या जखमेमुळे १३ ऑगस्टपासून पुढील २ महिने मला सायकलिंग करता आले नाही.
काम - काळ-वेग ह्या त्रैराशिकाचे गणित शाळेत मला आवडत असे. ते डोक्यात ठेवून लक्ष्य किती अंतरावर आहे हे आठवत मी रोजचा दिवस ढकलत होतो. श्विनबरोबर लेखणीही थांबली होती. मात्र DCC सदस्य मला लेखणी थांबवू देईनात. मग मी जगप्रवास करत असलेल्या मॅट आणि जेस्सी बद्दल लेखणी सुरु केली. त्यामुळे श्विनसफारी थांबली असली तरी माझा आत्मविश्वास कायम राहिला.
ऑक्टोंबरच्या मध्यास श्विनसफारी पुन्हा सुरु झाली. Cycle2work ही जोमाने सुरु झाले, मात्र नोव्हेंबरमध्ये अनाकलनीय कारणांमुळे cycle2work थांबवावे लागले.
मग सकाळ संध्याकाळ  #dombivli हुन #thakurli येथे  जाऊन ९० फुटी रस्त्यावर सायकलिंग सुरु केले. सकाळचे सायकलिंग करताना Pushkar Joshi, Vaishal Dharamsey अनेकदा भेटत होते. सकाळचे १.५-२ तास सायकलिंग करून ऑफिसला जायचे आणि ऑफिसहून घरी आल्यावर पुन्हा ९० फुटी रस्ता गाठायचा हा दैनंदिन कार्यक्रम सुरु झाला. गन्धार डोम्बिवलीकर, Arnav Kulkarni Marcella, Rohan Sakhare हे संध्याकाळी नियमित भेटत होते. त्यामुळे cycle2work बंद झाल्याची खंत कमी होऊन सकाळी आणि संध्याकाळी ९० फुटी रस्त्यावर सायकलिंग करण्याची मजा येऊ लागली.
१०००० चा जादुई आकडा जवळ आला होता. तेवढ्यात Sumit Patil, Prashant Gautam Nanaware, Ashish Agashe या मित्रांनी घाटाचा राजा Ashok Khale  यांना श्रद्धांजली म्हणून आखलेल्या #khopoli - #khandala - #खोपोली या सायकलमोहिमेविषयी कळले. Sanjay Datye यांच्या बरोबर डोंबिवली- खोपोली - खोपोली सायकलिंग करत घाटाच्या राजाला मानाचा मुजरा करण्याचे ठरवले. लोकलने खोपोली पर्यंत जायचे ठरवून डोंबिवली स्टेशनवर गेलेली ममता एका फोन कॉल वर आम्हाला सामील झाली. पुढे पळस्पे फाटा येथे #YHAI KANDIVALI मधील Arvind Sahasrabuddhe, Sunil K Gadgil, Rajendra Dusharekar हेही भेटले. मग मात्र खंडाळा पर्यंतचा प्रवास अतिशय सहजतेने झाला. संजय दात्ये ह्यांनी साथ दिल्यामुळे आम्ही खंडाळा डोंबिवली अंतरही सायकलिंग करत पार केले. ह्या प्रवासात अशोक खळे यांची स्मृती सतत जाणवत होती. डोंबिवली- खोपोली- डोंबिवली ह्या दिडशतकी सायकलिंग मोहिमेबरोबर १०००० किमी सायकलिंगही पूर्ण झाले.  पुढच्या दोन दिवसातील सकाळ संध्याकाळच्या ९० फुटी रस्त्यावरील श्विनसफारीमुळे सुनील गावस्कर यांच्या एकूण कसोटी धावा १०१२२ इतके कि.मी. अंतर सायकलिंग करण्याचे ध्येयही गाठले ते १२ दिवस राखून!
हे ध्येय पूर्ण करताना माझे लहानपणीचे दोन आदर्श -अशोक खळे आणि सुनील गावस्कर ह्यांच्या प्रती मन भारावून गेले होते.

रविवार, १० डिसेंबर, २०१७

जैत रे जैत

#margshirshchallange
राष्ट्रीय दिनांक (सौर कॅलेंडर)भारतीय सौर मार्गशीर्ष १९, शके १९३९
हिंदू तिथी (चांद्र कॅलेंडर) वद्य ८, शके १९३९
ख्रिस्ती दिनांक (सौर कॅलेंडर) डिसेम्बर १०, शके २०१७

किल्ले #कर्नाळा म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर येतात 'जैत रे जैत' या मराठी चित्रपटातील डॉ मोहन आगाशे आणि स्मिता पाटील.
गो नि दांडेकरांच्या समर्थ लेखणीतून साकार झालेल्या नाग्या (डॉ मोहन आगाशे) आणि चिंधी (स्मिता पाटील) या ठाकर जमातीतील जोडीच्या जीवनावर आधारित चित्रपटाद्वारे मला 'कर्नाळा'ची ओळख झाली.

तसे म्हटले तर १३व्या आणि १४ व्या शतकात देवगिरीचे यादव आणि तुघलक घराण्याचे राजे यांच्या कारकिर्दीत निर्माण झालेला हा किल्ला उत्तर कोकणची राजधानी म्हटलं जात होता. कालांतराने गुजराथ सुलतानाने जिंकलेला हा किल्ला १५४० साली अहमदनगरच्या निजामशहाने जिंकला. पण वसईमधील पोर्तुगीजांच्या ५०० सैनिकांच्या मदतीने गुजरात सुलतानाने तो परत मिळवला. मात्र पोर्तुगीजांच्याच ताब्यात राहिलेला हा किल्ला सोडून गुजरात सुलतान पळून गेला. ५००० सैनिक पाठवून निजामशहाने एक अयशस्वी प्रयत्नही केला. अखेरीस खंडणी लादून पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाच्या सुपूर्द केला. १६७० ला @शिवाजीमहाराज, तर १६८० ला औरंगजेब यांच्या ताब्यात गेलेला कर्नाळा पेशव्यांनी १७४० जिंकला.

अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला हा किल्ला विशेष लक्ष वेधून घेतो तो त्याच्या 'अंगठ्या'मूळे

मला या किल्ल्याचे विशेष आकर्षण म्हणजे श्विनसफारी करत एका दिवसात जाऊन येता येईल अश्या अंतरावर हा किल्ला स्थित आहे. #dombivlicyclingclub च्या शिलेदारांचा एक गट आज कर्नाळा येथे जाणार होता. Vikas Nagda हा किल्ल्यावर जाणार असल्याने थोडा लवकर निघाला होता. Sumit Mokal, Durgesh Zipre आणि sagar mavani आणि मी सामंत पेट्रोल पंप येथे भेटलो. कालच्या धुक्याच्या अनुभवामुळे मी खरेतर साशंकच होतो. आजही सर्वसाधारण अनुभव तसाच होता. मात्र आमचा उत्साह धुक्यावर मात करू पाहत होता. कालपेक्षा दृश्यमानताही अधिक होती. कुठेही न थांबता थेट कर्नाळा गाठण्याचे आमचे लक्ष्य होते. शिळ फाट्यापर्यंत आम्ही चौघेही एकापाठोपाठ जात होतो.
मात्र पनवेल रस्त्याला वळल्यावर सुमित आणि सागर तर दुर्गेश आणि मी असे दोन गट करून आम्ही जाऊ लागलो. थोड्या थोड्या वेळाने आम्ही पुन्हा एकत्रही येत होतो. ठरलेल्या वेळेप्रमाणे जात असल्याने पळस्पे फाटा येथे नाश्ता आणि चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. धुके फारसा त्रास देत नव्हते. जठराग्नीला आहुती मिळाल्यावर आमचा वेग अधिकच वाढला. आम्हाला लक्षात येण्याआधीच आम्ही 'क्षणभर विश्रांती' पर्यंत पोचलोही होतो. त्यापुढील डावीकडे वळणाऱ्या चढणीवर मात्र मी जागेवरच खिळून गेलो. कालप्रमाणेच धुक्याची चादर लपेटलेला रविराज चंद्राच्या मुखवट्यात अवतरला होता. खरेतर अरुणोदय होऊन ३ तास लोटले होते तरी रवीराजांचे हे आजचे पहिलेच दर्शन होते. मग श्विनला रस्त्याकडेला उभी करून श्विनबरोबर चंद्राचा मुखवटा धारण करणाऱ्या रवीराजांचा फोटो घेण्यासाठी मी सिद्ध झालो. मात्र तोपर्यंत रविराजांनी पुन्हा धुक्याची चादर ओढून घेतली. ३-४ वेळा हा लपंडाव खेळून कंटाळल्यावर मात्र मी फक्त रवीराजांचा फोटो घेऊन समाधान मानले. तेथून कर्नाळा येथे पोचलो तर पुढे पोचलेले सुमित आणि सागर आमची वाटच पाहत होते.
सकाळी लवकर निघालेला विकास तेथे चांगलाच रमला होता. त्याच्याशी गप्पा मारून आम्ही परत निघालो. सुमितला लवकर परत डोंबिवलीला पोचायचे असल्याने तो द्रुतगतीने निघाला.
मग मी, सागर आणि दुर्गेश या त्रिकुटाने पनवेल शहरातील गर्दी टाळण्यासाठी पळस्पेजवळ JNPT कडे जाणारा मार्ग पकडला. त्या मार्गाने कळंबोली सर्कल आणि तेथून कळंबोली शहर गाठले. एव्हाना जठराग्नी पुन्हा प्रदीप्त होऊ लागला होता. त्याला आहुती देण्यासाठीच आम्ही कळंबोली शहरात शिरलो होतो. तेथे मनसोक्त ताव मारून आमचे त्रिकुट पुन्हा पुढे निघाले.
आम्ही कर्नाळा येथे पोचताच धुक्याची दुलई दूर करून आळस झटकलेले रविराज एव्हाना आग ओकू लागले होते.
मग मात्र नेहमीप्रमाणेच तळोजा शिळ यामधील टोल नाक्यावर मी पाण्याचा टोल वसूल केला. बाटलीत पाणी भरून तर घेतलेच शिवाय नाकालाही ओला रुमाल बांधला. पण ३-४ किमी अंतरातच तो पार सुकून गेला. शिळ फाटा- खिडकाळी पार करताच निरापानही करून झाले. रविराज मात्र त्यांचे काम चोख बजावत होते. तरी सरळ मानपाडा रस्त्याने घरी गेलो तर आजचे शतक हुकेल, पण पत्रिपुला अगोदर वळून ९० फुटी रस्त्याने घरी गेलो तर मात्र आजही श्विनचे शतक पूर्ण होऊ शकेल याचा अंदाज मला होताच. दुर्गेशही कल्याणला जाणार असल्याने त्यालाही साथ देता येणार होती. मग सागर आणि मीसुद्धा ९० फुटी रस्त्यामार्गे ठाकुर्लीमध्ये शिरलो. ठाकुर्ली येथे सागरचा निरोप घेऊन मी घरी परतलो तर #strava आजचा स्कोर दाखवत होते ९९.९ किमी. आता एवढ्यावर थांबणे म्हणजे चेतन चौहान यांचा चाहता असल्याचे लक्षण! पण श्विन आणि मी तर सुनील गावस्कर यांचा चाहता! अनिर्णित ठरु शकणाऱ्या सामन्यात शेवटच्या २० अनिवार्य षटकात दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना संपवता येतो. एका सामन्यात अशीच परिस्थिती आली होती तेव्हा सुनील गावस्कर हे शतकासमीप होते. प्रतिस्पर्धी कर्णधाराने सामना थांबवण्याची केलेली विनंती फेटाळून गावस्करने सामना सुरूच ठेवला आणि शतक पूर्ण झाल्यावरच सामना थांबवला. आज मीही गावस्करांचा कित्ता गिरवत श्विनची दौड सोसायटीच्या कंपाउंड मध्ये सुरु ठेवली आणि strava ने १००.० किमी दाखवताच श्विनला थांबवले!

#tjsbbank #ismartcommute #cyclingzens

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

SOS (#saveoursahyadri)

SOS (save our skin) संकटात सापडलेल्या जहाजावरील कप्तानाने दिलेला अखेरचा निरोप.

हाच संदेश सह्याद्रीच्या वतीने घेऊन Bibhas Amonkar यांच्या कल्पनेतून सुरु झालेल्या सायकलमोहिमेच्या सांगतेला आज एक वर्ष पूर्ण झाले.
#navapur हे गुजरातच्या सीमेजवळील महाराष्ट्रातील ठिकाण ते महाराष्ट्र अशी महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या उत्तर दिशेकडील मार्ग पार करणारा सायकल पटूंचा एक संघ तर महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाकडील सावंतवाडी ते महाबळेश्वर असा दक्षिण मार्ग पार करणारा एक संघ असे दोन्ही संघ आपापला पल्ला पार करून एक वर्षांपूर्वी #mahabaleshwar येथे एकत्र आले.
मला यातील उत्तर मार्गावरील संघाचा सभासद होण्याची संधी मिळाली. या आधी निसर्गाबद्दल फारसा जागरूक नसलेला मी या मोहिमेनंतर मात्र बदलून गेलो. याचे मुख्य कारण होते Anand Pendharkar आनंदचे कळकळीने बोलणे केवळ पटतच नव्हते तर भिडत होते.
Avinash Harad , Suhas Mukteshwar Joshi हे तर उत्तर मार्गावरील संघाचे खंदे पाठीराखे. भारतात फिरायला आलेला मात्र मोहिमेची माहिती मिळताच शांतपणे सुट्टीची मजा न उपभोगता #saveoursahyadri मोहिमेत सामील झालेला Adam Zalewski आमचाच नव्हे तर वाटेत भेटणाऱ्या सर्वांचाच आकर्षणाचा केंद्रबिंदू. मात्र तो इंग्रजांच्या गुलाम देशाचा रहिवासी नसून पोलंडचा रहिवासी असल्याने त्याचे इंग्रजीही तोडकेमोडकेच. Sunita Ramchandra मात्र मराठीत बोलत त्याची चांगलीच फिरकी घेत होती. सुनीता बरोबर तिची सख्खी मैत्रीण Vandana Bhavsar असल्याने आमच्या प्रवासात दोघींनी जिवंतपणा ओतप्रोत भरला होता.
Shalaka Gawde, Panchi Sky, Pushpa Patel यांचा स्वभाव शांत असला तरी जिद्द वाखाणण्यासारखी होती. #dombivlicyclingclub ची ममताही सामील झाली होतीच.
लोकसत्तातील लेखांमुळे Prashant Gautam Nanaware ला भेटण्याची आणि त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची संधीही या मोहिमेत मिळाली. Sumit Patil, Ashish Agashe, Raju Sitaram Patil यांचे मार्गदर्शनही मोलाचेच.
Sunil K Gadgil बरोबर सायकलिंग करणे मला नेहमीच आवडते. Sunil Nanaware, Sunil Patil या चिंचवडच्या दुक्कलीची साथ तर मस्तच. Trilok Khairnar चा स्वभावही मनाला भावला.
वाटीत मनसोक्त गुलाबजाम घेऊन ते घेण्याचे समाधान मिळवून मधुमेह काबूत ठेवण्यासाठी त्यांचा ताबा देण्यासाठी आणि ते संपवण्याची जबाबदारी देण्यासाठी Akhilesh A. Potnis ह्याला मी जेवताना नेहमीच बाजूला बसवत असे.
Kaustubh Puranik हा कॉलेजकुमार तर चांगलाच तयारीचा होता. #कल्याण जवळील #रायते गावातील #अश्वमेधप्रतिष्ठान चे Ajay Karle , Tushar Pawar आणि #badlapur येथील #k2cycles चा चेतन यांचे सहकार्य मोलाचेच!
या मोहिमेसाठी सहकार्य करणारे एक्सेल इंडस्ट्री आणि मुंबई विद्यापीठ हे तर आमच्या मोहिमेचे खरे आधारस्तंभ

ती वाट दूर जाते

#margshirshchallange

जागतिक एकमेव शास्त्रीय सौर कॅलेंडर अर्थात जगातील एकमेव निधर्मी कॅलेंडरनुसार तारीख भारतीय सौर मार्गशीर्ष १८, शके १९३९

हिंदू कॅलेंडरनुसार तिथी (चांद्र कॅलेंडर) मार्गशीर्ष वद्य (कृष्ण) ७, शके १९३९

ख्रिस्ती कॅलेंडरनुसार तारीख (सौर कॅलेंडर मात्र ख्रिस्ती धर्म संस्थापकाच्या जन्मतारखेनुसार तयार केलेल्या ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांसाठी बनवलेले अशास्त्रीय कॅलेंडर) डिसेंबर ९, शके २०१७

जन्मतः च सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण करणाऱ्या हनुमानाच्या उपासनेचा आजचा वार म्हणजेच शनिवार! श्विनलाही आज शतकी मजल मारून आजचा दिवस साजरा करायचा होता.
पहाटेची थंडी आणि धुके यांच्या युतीमुळे श्विन सफारी थोडी उशिराने सुरु केली. #dombivlicyclingclub च्या सदस्या @nayana agharkar त्यांची रोड बाइक घेऊन आधीच निघाल्या होत्या. सकाळच्या प्रहरी शिक्षणसाम्राज्याची तथाकथित ज्ञानमंदिरे सुरु होण्याच्या वेळेस श्विनने घरातून प्रस्थान केले. शहरातील वाहतूक सुरु झाली असल्याने संथ गतीने श्विन शहराबाहेर पडली. बऱ्याच दिवसांनी मानपाडा रस्त्यामार्गे बाहेर पडत होतो. रिक्त झालेल्या शनिमंदिराच्या समोर अनेक दिवसांनी गायवासरांचा कळप येताना दिसल्याने जुने सवंगडी भेटल्याचा आनंद झाला. दिवसाची सुरुवात तर छानच झाली होती.
आज नेरळ नगरी पर्यंत जाऊन येण्याचा मानस होता. कल्याण शिळ रस्त्याला लागल्यावर श्विनला लय सापडली. श्विनने लगोलग बदलापूर पाइपलाइन महामार्ग गाठला. सुरवातीपासूनच धुक्याचे साम्राज्य पसरलेले दिसत होते. श्विनच्या पॅडल किती वेळा मारले की किती अंतर पार होते याचे गणित अनुभवाने माहित झाले होते. अंदाजे १५० मिटरपुढील काहीही दिसत नव्हते. श्विनची चाल थोडी मंदावली. कोळेगाव पार केल्यावर थोड्याच अंतरावर नयना मॅडम जाताना दिसल्या. धुक्याचा अंदाज घेत आम्ही दोघंही संथगतीने पुढे सरकत होतो. काही वेळातच धुके कमी होईल या आशेवर आमची मजल दरमजल सुरु होती. तळोजा फाटा - नेवाळी फाटा पार करत आम्ही पुढे पुढे जात होतो. अंबरनाथ औद्योगिक परिसर सुरु होताच धुके अधिकच वाढल्याची जाणीव झाल्याने आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला.
धुक्याच्या परिणामी विमानांना टेक ऑफ अथवा लँडिंग करता न आल्याने घिरट्या माराव्या लागतही असाव्यात. मात्र आजतर धुक्यामुळे श्विनला टेकऑफ (!) साठी बदलापूर पाइपलाइन महामार्गावर घिरट्या मारण्याची वेळ आली होती.
परत फिरताना नेवाळी नाका येथे चहापानाचा कार्यक्रम उरकून आम्ही पुन्हा कोळेगावपर्यंत मागे आलो. तिथे नयना मॅडमचा निरोप घेऊन श्विन पुन्हा अंबरनाथ औद्योगिक परिसराकडे निघाली. एव्हाना ९.१५ वाजले होते. दरम्यान मिनिटभरासाठी आपले मुखकमल दाखवून सूर्यमहाराज पुन्हा धुक्याच्या दुलईत गुरफटले होते. त्यांचे मुखकमल इतके म्लान होते की ते प्रत्यक्ष सूर्यमहाराज आहेत की पौर्णिमेचा चंद्र गगनभरारी घेत आहे हे समजत नव्हते.

अंबरनाथ औद्योगिक परिसरातील हॉटेल वैभव येथे नाष्टयाच्या लाभ घेत धुके कमी होण्याची कल्पना मात्र यशस्वी झाली. माझा नाश्ता झाल्यावर धुक्याची चादर बाजूला सारून सूर्यमहाराज पुन्हा अवतरले होते. दरम्यान  इंधन भरले असल्याने श्विनलाही गती प्राप्त झाली. सूर्य पूर्ण तेजाने झळकत नसला तरी आता पूर्ण दृश्यमानता अनुभवाला येत होती. बदलापूर जवळ आल्यावर 'नेरळ २० किमी' हा फलक दिसल्यावर श्विनची नेरळ गाठण्याची इच्छा पुन्हा तीव्र झाली. मनुष्यशक्तीच्या इंधनाचा पुरवठा योग्य गतीने होत असल्याने श्विनने वेग पकडला होता. हा हा म्हणता श्विनने नेरळ गाठले. आजचे ध्येय गाठल्यामुळे तो आनंद साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा पृथ्वीवरील अमृताचा लाभ घेतला. दरम्यान सूर्यमहाराज त्यांच्या सहस्त्र नेत्रांनी त्यांच्या अस्तित्वाची तीव्र जाणीव करून देऊ लागले होते.

चेहऱ्यावर पाणी मारून आणि ओला रुमाल नाकाला बांधून मी परतीचा प्रवास सुरु केला. अर्थात ही एकल दौड असल्याने वाटेत कुठेही आणि कितीही वेळ थांबण्याची मुभा होतीच. मात्र कोणतीही दौड पूर्ण करताना ठरवलेल्या वेळेच्या मर्यादेत ती पूर्ण करणेही महत्वाचे असते. श्विनला मनुष्यशक्तीच्या इंधनाचा पुरवठाही योग्य गतीने होत असल्याने श्विनची दौड सुरु राहिली. मनुष्यशक्तीचे इंधन राखीव (reserve) पातळीपर्यंत खाली येण्याची वाट न पाहता मी परत हॉटेल वैभव येथे नाश्ता आणि अमृतपानासाठी थांबलो. पोटातील कावळे/पेटके चुहे/ butterflies in stomach याना कोणतीही संधी न देता मी जठराग्नी सुरु होण्या आधीच त्यात मेदूवड्याची आहुती दिली.
तेथून निघाल्यावर मात्र श्विनची गती मंदावली. तळोजा फाटा पार केल्यावर पुन्हा सेवा रस्त्याने कोळेगाव येथे पोचेपर्यंत श्विन आणि माझी आणखी एक शतकी भागीदारी पूर्ण झाली होती. त्याच समाधानात श्विन घरी परतली
#tjsbbank #cyclingzens #ismartcommute

गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

धुके आणि बरेच काही

पहाटे पहाटे मला जाग आली.... पण श्विनला बांधलेली कुलुपाची मिठी मात्र सैल करण्याची हिम्मत होत नव्हती.
अखेरीस घरातच हात आणि पाय थोडे मोकळे करण्यात बराच वेळ घालवल्यावर मात्र मी श्विनकडे वळलो.

बाहेर फिरायला मिळणार म्हटल्यावर श्विन तयारच होती. श्विनजवळ जाईपर्यंत मी थोडा आळसावलो होतो, मात्र तिला पाहताच माझा आळस पळून गेला. ओखी वादळामुळे अचानक वाढलेल्या थंडीवर मात करण्यासाठी श्विनसवारी हा उत्तम उपाय होता. थोडा उशीर झाला असला तरी आजची सकाळची राइड करायचीच असे ठरवून आम्ही निघालो.

पूर्वपश्चिम पादचारी पूल ओलांडून आम्ही गणेशमंदिर येथे पोचलो. श्विनवरूनच गणपतीबाप्पांना नमस्कार करून आमची स्वारी पुढे निघाली. ठाकुर्लीकडून ९० फुटी रस्त्याला जाणाऱ्या अरुंद गल्लीत वाहनांची गर्दी झाली होती. तेथील मारुतीरायाला ती गर्दी नेहमीचीच! श्विनने रस्त्याच्या डावीकडून वाट काढत ९० फुटी रस्ता गाठला खरा. पण इथून पुढे मात्र काळ, वेळ, स्थान काहीही लक्षात न येण्यासारखीच परिस्थिती होती. घरातून निघताना थंडी असेल हि कल्पना आली होतीच. मात्र ९० फुटी रस्त्याला लागताच जो अनुभव आला तो मात्र अलौकिक होता.

अरुणमहाराज येऊन तासभर नक्कीच लोटला होता, मात्र त्यांचे तेज पार फिक्के पडले होते. खरेतर त्यांच्या अस्तित्वाची पुसटशी जाणीवही होत नव्हती. श्विन तशीच पुढे निघाली. श्विनचा वेग मात्र फारसा वाढू शकत नव्हता कारण पुढे धुक्याची दाट चादर पसरली होती. श्विनला त्याची तमा नव्हतीच. वेग नसला तरी श्विन तिच्याच धुंदीत जात होती. धुक्याच्या चादरीमुळे #dombivlicyclingclub चे सदस्य किंवा इतर सायकलिस्ट फारसे दिसत नव्हते. श्विनने ९० फुटी रस्त्यावरील मोहनसृष्टीपासून नव ठाकुर्ली रस्त्याच्या शेपटपर्यंत ४.५ - ५ किमी पसरलेल्या L आकारातील परिसर दोन वेळा चक्राकांत (पादाक्रांतच्या अनुषंगाने) केल्यावर मात्र मी श्विनला आवरते घेतले. खरेतर श्विनचेच काय पण माझेही मन भरले नव्हतेच. श्विनच्या २ चकरा मारून झाल्यावर तर मी अधिकच ताजातवाना झालो होतो. धुक्याच्या चादरीने लपेटलेल्या भास्कराचार्यांचे दर्शन झाले नव्हते त्यामुळे परत फिरावेसे वाटत नव्हते.
पण मानगुटीवर बसलेल्या घड्याळबाबांनी आमची सफारी आवरती घ्यायला लावली. तेव्हा मात्र रोजच्याप्रमाणे संध्याकाळी परत यायचेच असे एकमेकांना सांगत मी आणि श्विन घरी परतलो

#tjsbbank

रविवार, ३ डिसेंबर, २०१७

खजिन्याची लूट

खजिन्याची लूट

भारतीय राष्ट्रीय दिनांक (अर्थात जगातील एकमेव निधर्मी कॅलेंडर नुसार तारीख)भारतीय सौर १२ मार्गशीर्ष, शके १९३९

हिंदू तिथी मार्गशीर्ष पौर्णिमा, शके १९३९

डोंबिवली शहरच नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा बराचसा भाग उल्हास नदीने जिवंत ठेवला आहे. या नदीच्या खोऱ्यात विपुल जैवविविधता तर आहेच, पण अनेक मानववंशसुद्धा सामावले आहेत. उल्हास नदीच्या या अथांग संपन्नतेची जपणूक करणे आणि ती जगासमोर आणणे हा ध्यास घेऊन #कल्याण #मुरबाड रस्त्यावरील #रायते या गावातील Avinash Harad हा तरुण जीवाचे रान करत आहे.

#dombivlicyclingclub (DCC) चे सदस्य नवीन खजिन्याच्या शोधात असतातच. रविवार हा तर त्यासाठी हक्काचा दिवस. आज मार्गशीर्ष पौर्णिमेचा (दत्तजयंती)मुहूर्त साधत DCC ने अविनाशच्या खजिन्याची लूट करायचे ठरवले. अविनाश तर त्याच्या खजिन्याची उधळण करायला केव्हाही तयार असतोच. त्याला फोन करून कळवताच त्याने आनंदाने आणि आग्रहपूर्वक होकार दिला होताच.

मग काय DCC चे शिलेदार सज्जच झाले. टिटवाळा येथील गांपतिमंदिर हे DCC सदस्यांचे आवडते ठिकाण. तेथून जवळच अविनाशचे संग्रहालय उभे राहत असल्याने दोन्हीचा लाभ एकत्रितरित्या मिळणार होता.

मार्गशीर्षातील प्रभातकाळी DCC तील जुन्या सदस्यांबरोबरच काही नवीन सदस्यही जमले होते. सूर्यनारायण अद्याप दक्षिण गोलार्धातील दक्षिण टोकाकडे जात असल्याने त्यांची किरणे अद्याप उपस्थिती दर्शवत नव्हती. मात्र उगवती अगोदरच गणपती मंदिराजवळ ठरलेल्या वेळेत DCC सदस्य उत्साहाने दाखल झाले. देवने जमलेल्या सदस्यांचे फोटो काढल्यावर सर्वजणांनीं आपापल्या सायकली दामटवायला सुरुवात केली. वाटेत इतर काही सदस्य दाखल होतच होते.

Pushkar Joshi, Sumit Mokal Vaishal Dharamsey , या DCC तील मुरब्बी सायकलपटुंबरोबरच Shrikrishna Gawas , abhi kamathe Swapnil Satam, Yogesh Dhage, Alpesh Pasad  ,Shubham Nagle हे उत्साही सायकलपटूही हजर होते. दुर्गाडी किल्ल्याजवळ Durgesh Zipre आणि Nayana Agharkar सामील झाले तर पुढे Gajanan Keshav Vaidya (विलास) सामील झाल्याने आमच्या ताफ्याला आणखी ऊर्जा मिळाली.

दुर्गाडी किल्ला, शहाड पूल, शहाड विठ्ठल मंदिर पार केल्यावर निसर्ग आमच्याशी बोलू लागला. त्याने काय आणि किती खजिना उघड करावा ह्याला मर्यादाच नव्हती. लहानपणी चित्र काढायचे म्हटले की दोन तीन त्रिकोण आणि मागे अर्धगोल काढून डोंगरामागून उगवणारा सूर्य हे चित्र बरेचजण काढतात. निसर्गाने ह्या डोंगरामागून उगवणाऱ्या सूर्याचे खरे अप्रतिम रूप आज आम्हाला मोकळया हवेत उघड केले. काल रात्री चतुर्दशीच्या चंद्राचे विलोभनीय रूप तर आज पहाटे डोंगरामागून उगवणाऱ्या सूर्याचे रूप!

पांचवा मैल पार करून उल्हास नदीच्या पुलावर जाताच सर्वजण एकामागोमाग जागेवरच खिळले. नदीपात्रात पडलेले सूर्यबिंबाचे दर्शन सर्वाना मोह पाडत होते. अखेरीस मनाला मुरड घालत आम्ही टिटवाळा येथील गांपतिमंदिरापाशी पोचलो. अविनाश आम्हाला घ्यायला तिथे आला होताच. आम्ही मंदिराहून अविनाशबरोबर संग्रहालायकडे जाणार त्याआधीच ममता आणि Vikas Nagda हेही हजर झाले.

संग्रहालयाबाहेर छोटीशी ओळखपरेड करून आम्ही आत शिरलो. अविनाशच्या संग्राहक वृत्तीबरोबरच त्याची ओघवती वाणी सर्वांना मंत्रमुग्ध करत होती. कोणताही आडपडदा न ठेवता तो संग्रहालयातील विविध वस्तूंबरोबर उल्हास नदीच्या खोऱ्यातील प्राचीन संस्कृती, विविधता यांबरोबर ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, सागरी खजिना यांच्या माहितीचा खजिना आमच्यासमोर उघड करत होता. सर्वजण त्याच्या ज्ञानामुळे तृप्त होत होते. खरेतर कोणालाही पुन्हा बाहेर पडावेसे वाटत नव्हते, पण आम्ही पुन्हा पुन्हा परत येऊ याची अविनाशला ग्वाही देतच सर्वजण बाहेर पडले.

अविनाशच्या वाणीपुढे लपलेली भुकेची जाणीव परतीच्या प्रवासाला प्रारंभ करताच जागृत झाली. मग मात्र प्रत्येकजण आपली जिव्हा आणि जठराग्नी तृप्त करूनच परतीचा मार्गाला लागला.

#tjsbbank #saveoursahyadri

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

2πr(Dombivli Thakurli) & 9* 2πr (society compound) आणि बरच काही

2πr (Dombivli thakurli) + 2(manpada addl ambarnath) + 1(90 feet+ new thakurli road) + 9* 2πr (society compound)

जागतिक शास्त्रीय अर्थात भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर मार्गशीर्ष, शके १९३९

प्रभातफेरी न झाल्याने दिवसभर एका जागी थांबून श्विन कंटाळली होती. त्यामुळे मी दुपारी ४.३० ला श्विनजवळ जाताच श्विन खुलली. गेले दोन आठवडे C2w (cycle2work) बंद केल्यावर ९० फीट रस्त्यावर फिरायला श्विनला आवडू लागले होते.
त्यामुळे आजही श्विनचा मनसुबा तोच होता. तिथे L या इंग्रजी आद्याक्षराच्या आकारात खड्डेरहित आणि रुंद रस्त्यावर फिरायला श्विन चांगलीच सोकावली होती.
मात्र मला मात्र बदलापूर पाइपलाइन रस्त्यावर जावेसे वाटत होते. अखेरीस घरी परत येताना ९० फुटी रस्त्यावर जाऊ असे सांगत मी श्विनची समजूत घातली तेव्हा कुठे श्विन बदलापूर पाइपलाइन रस्त्यावर जायला तयार झाली.
दीनदयाळ रस्ता, डोंबिवली विद्युतरथ स्थानक पूर्व पश्चिम पूल पार करत टंडन रस्त्याला लागलो आणि अडथळ्यांची शर्यत सुरु झाली. अनिर्बंधपणे रस्ता अडवणाऱ्याना अश्वशक्तीधारी वाहनांच्या रांगेतून श्विनने मार्ग काढला आणि भोपर-मानपाडा रस्ता मार्गे श्विन कल्याण शिळ महामार्गाला लागली. दुपार टळत आली असली तरी सायंकाळ झाली नव्हती. त्यामुळे कार्यालयातून परतणाऱ्या वाहनांची गर्दी अद्याप सुरु झाली नव्हती. त्यामुळे श्विनला मोकळा रस्ता मिळाला होता. भरधाव वेगात श्विनने काटई नाका गाठत बदलापूर पाइपलाइन रस्त्याकडे वळण घेतले. कोळेगावच्या चौकातही अनिर्बंधपणे वाहने उभी राहिली होती. तेथून पुढे गेल्यावर काही अंतरावर परतीचा मार्ग बंद केल्याने दुभाजकाच्या एकाच बाजूला दुहेरी वाहतूक सुरु ठेवली होती. हे काम तसेही बऱ्याच दिवसांपासून सुरु असल्याची जाणीव श्विनला होतीच. मात्र हा अडथळा थोड्याच अंतरापर्यंत होता.
तळोजा फाटा मागे टाकताच पुन्हा श्विनने पुन्हा वेग पकडला. नेवाळी फाट्याहुन परत येउन ९० फुटी रस्त्यावर फेऱ्या मारत बसण्यापेक्षा अंबरनाथ औद्योगिक परिसरापर्यंत जाऊन यायचे मी ठरवले. श्विनला वेग मिळाल्याने तिचीही काही हरकत नव्हतीच. मोकळ्या रस्त्याचा फायदा घेत आम्ही विनासायास अंबरनाथ औद्योगिक परिसराकडे पोचलो. सूर्यमहाराजही चम्बूगबळे आवरते घेत होते. त्यामुळे परतीचा प्रवासही जलदीने करावा लागणार होता.
श्विनला लय सापडली होतीच. नेवाळी फाटा, तळोजा फाटा मागे टाकत श्विन पुन्हा शिळ कल्याण रस्त्याला लागली. ९० फुटी रस्त्यावर जायचे आश्वासन श्विनला दिल्याने मानपाडा रस्त्यामार्गे परत फिरता येणार नव्हते. श्विन झपाट्याने अंतर कापत होती. दरम्यान सूर्यमहाराज अंतर्धान पावले परंतु महापालिकेने महामार्गावर बसवलेले पथदिवे सुरु झाले नव्हते. मात्र ओळखीचा आणि खड्डेरहित रस्ता असल्याने श्विन निर्धास्त होती. टाटा पॉवर, मेट्रो मॉल मागे टाकत असताना महामार्गावर रस्त्याची अर्धी बाजू अडवत उभ्या असलेल्या बेबंद वाहनांनी कोंडी केली होती. श्विन मात्र सफाईने मार्ग काढत होती.

अखेरीस पत्री पूला आधी डावे वळण घेत श्विन ९० फुटी रस्त्याला लागली. तेथे L या इंग्रजी आद्याक्षराच्या आकारात नेहमीप्रमाणे फेरी मारून श्विन पुन्हा मोहन सृष्टी संकुलापर्यंत मागे आली. अंबरनाथ औद्योगिक परिसरापर्यंत जाऊन आल्याने आता ९० फुटी रस्त्यावर रोजप्रमाणे फेऱ्या मारण्याची गरज नव्हती. त्यामुळे तेथून थेट घराकडे वळण्याचे ठरवले. घरी पोचेपर्यंत मानपाडा ते अंबरनाथ औद्योगिक परिसर आणि परत या व्यतिरिक्त डोंबिवली ठाकुर्ली परिसराला एक फेरी पूर्ण झाली होती. हे लक्षात येताच शाळेत शिकलेले 2πr म्हणजे वर्तुळाचा परीघ हे सूत्र आठवले. म्हणजे आज मानपाडा ते अंबरनाथ औद्योगिक परिसर व परत या अंतराबरोबर २πr(डोंबिवली ठाकुर्ली) एवढे अंतर पार केले होते. सोसायटीच्या आवारात शिरल्यावर #strava पहिले तर अंतर होते ४९.३ किमी. मग अर्धशतकाची ओढ श्विनला स्वस्थपणे थांबू देईना. त्यामुळे ९* २πr(सोसायटी बिल्डिंग) हे अंतर पूर्ण करत stava ने ५० किमी अंतर दाखवल्यावरच आमची विनाथांबा आणि विनाथेंब (पाण्याचा थेंबही न घेता) सायकलसफर पूर्ण झाली
#dombivlicyclingclub #tjsbbank

रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

तळेगावहून परत

राष्ट्रीय दिनांक भारतीय सौर मार्गशीर्ष ५, शके १९३९

तळेगावच्या सुंदर आणि शांत वातावरणातून परत डोंबिवलीकडे निघणे तसे अवघडच असते. #dombivlicyclingclub चे आमचे पंचक काल डोंबिवलीहुन तळेगावला पोचले होते. तेथून आज परत फिरायचे होते. तळेगावचा मुक्काम सोडतानाचे क्षण कॅमेराबद्ध करून आम्ही निघालो.

परत येताना घाट उतरायचा असल्याने कालपेक्षा कमी वेळात प्रवास संपणार होता. तळेगावहून पुणे मुंबई महामार्गाला (NH4) लागताच पुण्याहून येणारे काही सायकलिस्ट दिसले. आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसे त्यांची संख्या वाढतच होती. राष्ट्रीय महामार्गाला लागल्यावर जेमतेम ८-१० किमी वर चहासाठी थांबायचे ठरल्याने आम्ही ठराविक लयीत पुढे जात होतो. @yogesh choughule, @pritesh choughule आणि मी हा हा म्हणता आमच्या नियोजित चहाच्या टपरीपाशी पोचलो. इतक्यात मागून @yogesh dhage आला. त्याने सांगितले की @sarang mulay ची सायकल पंक्चर झाल्याने त्याने योगेश चौघुलेला परत बोलावले होते. मात्र सारंगला फोन लावल्यावर कळले की टायर बदलावा लागणार होता. चहावाल्या मावशींनी शेजारीच असलेल्या सायकल दुरुस्तीवाल्याला निरोप दिला, तसा आम्ही सारंगला पुढे चालत यायला सांगितले.

पण तो ३-४ किमी मागे होता. त्याला एकट्याला चालत यायला कंटाळा येऊ शकतो म्हणून मी श्विनसह त्याला भेटण्यासाठी उलट दिशेने निघालो. दरम्यान पुण्याहून येणारे बरेच सायकलिस्ट येताना दिसतच होते. ती खरे तर #२६/११ च्या निमित्ताने एक श्रद्धांजली सायकल यात्रा होती. त्यांच्या आयोजकांनी सहभागी सायकलिस्टसाठी एके ठिकाणी चहा बिस्किटे ठेवली होती. येथेच चहा बिस्किटे घेऊन सारंग उभा होता. आम्ही योगेशला फोन करून चहावाल्या मावशींच्या ओळखीच्या सायकल दुरुस्तीवाल्याकडे टायर मिळेल का याची चौकशी केली. पण त्या खात्री देईना. मग सारंग आणि त्याची ३२ वर्षीय सायकल यांना लोणावळयापर्यंत जाणाऱ्या अश्वशक्तीधारी मालवाहू वाहनात बसवून मी पुन्हा उर्वरित तिघांना गाठण्यासाठी श्विनसह निघालो. तेथे पुन्हा चहा घेऊन आम्ही लोणावळ्याकडे कूच केले. कामशेतचा घाट टाळून आम्ही कामशेत गावातील रस्त्याने पुन्हा राष्ट्रीय महामार्ग ४ ला लागलो. चारही सायकली बरोबरीने लयीत जात होत्या. #Indo cyclist club च्या मोहिमेत जाणारे आणि गंतव्यस्थानी पोचून परत पुण्याकडे वळणारे असंख्य सायकलिस्ट वाटेत दिसतच होते.

आम्ही लोणावळ्याला पोचलो तर सारंग अजूनही सायकल दुरुस्तीची वाट पाहताच होता. पण पोचल्यावर मात्र सायकल दुरुस्तीचे दुकान सुरु होऊन त्याच्या सायकलचे काम सुरु झाले. आमचा नाश्ता होईतो त्याच्या सायकलचा टायरही बदलून झाला. मात्र आम्ही तेथून निघेपर्यंत आम्ही ठरलेल्या कार्यक्रमापेक्षा ३ तास मागे पडलो होतो. सर्व परिस्थितीची कल्पना देऊन मी मध्ये कुठेही न थांबता पुढील मुक्काम पळस्पे फाटा येथे करायचा असे सर्वांना सांगितले. मात्र तो निर्णय कोणालाच रुचला नाही. त्यांना वाटेत राजमाची पॉईंट, घाटमार्ग येथे थांबत खोपोली कर्जत बदलापूर अश्या मार्गाने जायचे होते. तसे करायचे तर रात्रीचे ८ वाजतील याची कल्पना देऊनही त्यांचा निर्णय ठाम होता. मग मात्र माझा नाईलाज होऊन मी एकट्याने खोपोली पनवेल मार्गे जायचे ठरवले. राजमचिपर्यंत आम्ही सर्व एकापाठोपाठ होतो. सर्वजण निदान खोपोलिपर्यंततरी थांबणार नाहीत अशी मला अशा होती. राजमाचि पॉईंट पुढील घाटाचा उतार सुरु झाल्यावर मला मागे वळून अंदाज घेता येईना. पुन्हा उतार कमी झाल्यावर मी मागे वळून पहिले तर कोणीच दिसेना. सर्वजण राजमाची पॉईंटला थांबले असणार अशी अटकळ बांधत मी सरळ हाल गावा कडून कर्जतला वळणाऱ्या मार्गाशी जाऊन पुन्हा सर्वांचे मत विचारायचे ठरवले. घाट उतरून मी खोपोलिमार्गे हालजवळील कर्जत फाट्याला पोचलो. तेथून फोन केल्यावर समजले की सारंगच्या सायकलचे ब्रेक उतारावर नीट लागत नसल्याने तो मध्येच चालत येत आहे आणि ते चारहीजण बरोबरच आहेत.

एक शेवटची संधी घेत त्या सर्वांचा खोपोली पनवेल मार्गे येण्याचा विचार आहे का याचा मी अंदाज घेतला. पण त्यांचा खोपोली कर्जत बदलापूर मार्गे जाण्याचा निर्णय अजूनही पक्का होता. मग मात्र त्यांची वाट पाहण्यात काहीच अर्थ नसल्याने मी पनवेलमार्गे पुढे जातो असे सांगून मी श्विनबरोबरील भागीदारी पुढे सुरु ठेवली.

एकटाच असल्याने वाटेत कुठे थांबण्याची गरज नव्हती. तसेही लोणावळ्याला नाश्ता केल्यावर खोपोलीपर्यंत घाट उतरायचा असल्याने श्रम नव्हतेच. त्यामुळे एकदम पळस्पे फाटा किंवा पनवेलला थांबायचे ठरवले. थोड्याथोड्या वेळाने पाणी पीत मी मार्गक्रमण सुरु ठेवले. वाटेत निरापानही झाले. श्विनने चांगलाच वेग पकडला होता. त्यात खोपोली पनवेल दरम्यानचा रस्ताही चांगला असल्याने श्विनचे फावले होते. रसायनिजवळील टोल नाक्यावर पिण्याचे पाणी भरून मी पुढे निघालो. पळस्पे फाटा आणि पनवेल येईपर्यंत शरीरातील इंधनसाठा पुरेसा शिल्लक असल्याचे जाणवल्याने मी न थांबता पुढे निघालो.

कळंबोली चौकातील अश्वशक्तीधारकांची वर्दळ पार करून पुढे तळोज्याकडे निघाल्यावर अरुंद रस्ता सुरु झाला. इथेमात्र श्विनची गती मंदावली. तळोजा पार केल्यावर जठराग्नीची चाहूल जाणवली. श्विनची चाल मंदावताच तिला लागणारे मानाविशक्तीच्या इंधनाचा पुरवठा कमी पडू लागला असावा अशी शंका वाटली. मग माझ्याकडील जादुई पदार्थ म्हणजे आवळा खाऊन घेतला. एका आवळ्याच्या आहुतीने मानवीशक्तीच्या इंधनाचा श्विनला होणारा पुरवठा पुन्हा योग्य वेगात सुरु झाला.
लगेचच पुढचा टोलनाका आला. तिथे पुन्हा पाणी पिऊन आणि बाटली पूर्ण भरून घेतली. आवळ्याने केलेल्या जादूमुळे जठराग्नी शांत झाला होताच. त्यात पाण्याने अंतरात्मा पूर्ण प्रसन्न झाला. श्विनचा वेग चांगलाच वाढला. शीळफाट्यापुढील कोकणरत्न हॉटेलच्या नाष्टयाच्या कट्ट्यावर इंधन भरायचे ठरवून श्विन आणि मी लयीत निघालो. मात्र तो कट्टा बंद असल्याने माझा हिरमोड झाला. मग मात्र खिडकाळी जवळील बऱ्याच दिवसांपासून जाण्याची इच्छा असलेल्या 'लाल वडा पिवळा चहा' (की पिवळा वडा लाल चहा ? की आणखी इतर काही कॉम्बिनेशन असलेले नाव?) या उपहारगृहात शिरलो. #Lonavala ते #khidkali हे अंतर श्विनने साधारणपणे अवघ्या ३ तास ३० मिनिटात गाठले होते. तेथे मिसळपाव आणि पृथ्वीवरील अमृत पिऊन मी शेवटचा टप्पा सुरु केला.

खिडकाळीहून मानपाडेश्वर मंदिरापुढे डोंबिवलीत शिरल्यावर शहरातील रहदारी, गतिरोधक, खड्डयांची मालिका सुरु झाले तरी श्विन आणि मी अजूनही चांगलेच ताजेतवाने होतो. त्यामुळे त्या सर्वांवर सवयीने मात करत आम्ही सहजरीत्या घरी पोचलो.
#tjsbbank 

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

खंडाळ्याचो घाट

#margshirshchallange

भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९३९

Sunil Gavaskar यांच्या कसोटी सामन्यातील एकूण धावांइतक्या किमी ख्रिस्ती वर्ष २०१७ मध्ये पूर्ण करण्याचा संकल्प केल्यावर शतकी खेळी होणेही महत्वाचेच.

बऱ्याच दिवसात शतकी दौड न केल्यामुळे श्विनही कंटाळली होती. तळेगावला एक काम मार्गी लावायचे असल्याने मी ही संधी साधायचे ठरवले. नेमकी श्विनची आरोग्यचाचणीही आधी मोंट्राच्या मोहम्मदने केली होती. त्यात काही त्रुटी होत्या त्या #bikeport मध्ये Sahir Shaikh ने दूर केल्या होत्या. साहिरला भेटण्याचे अनेक वेळा ठरवून आधी जमले नव्हते. पण यावेळी नेमका तोही योग जुळून आला होता. उमद्या मनाच्या साहिरने श्विनला शतकी राइडसाठी सुसज्ज केले होते.

दरम्यान शेवटपर्यंत हो ना करता करता #dombivlicyclingclub चे आणखी ४ सदस्य यायला आज सज्ज झाले होते. सदासर्वदा मदतीला धावून येणारा Sarang Mulay, Yogesh Dhage, Yogesh Choughule आणि त्याचा भाऊ Pritesh Choughule सामील झाल्यामुळे माझाही उत्साह पंचगुणीत झाला होता.

स्वतःला सामील होता येत नसले तरी अश्या राईडला जाणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जमेल त्याप्रमाणे सामील होणारे Bhimashankar Birajdar यांची उपस्थिती आमच्या सगळ्यांचा उत्साह वाढवत होती.

सकाळी ५.४५ ला #tjsbbank च्या #dombivli पूर्व शाखेसमोर आम्ही ५ जण जमलो आणि निघण्याच्या आधीच बिराजदार मार्गशीर्षातील थंडीत आम्हाला सामील झाले. आमची टूर निघाली तेव्हा सारंगच्या ३२ वर्षीय सायकलवर झळकणारा झेंडा डौलात फडफडत होता. डोंबिवली मागे टाकून मानपाडेश्वर मंदिरासमोरील सामंत पेट्रोल पंप कधी आला हे आम्हाला उत्साहाच्या भरात कळलेही नाही. तेथे न थांबता आम्ही वाटचाल सुरूच ठेवली. दरवर्षीच्या कल्याण पाली सायकलयात्रेत Gajanan Keshav Vaidya (विलास) ने लावलेल्या सवयीप्रमाणे आम्ही शिळ फाट्याला पनवेलच्या दिशेने वळताच चहासाठी पहिला मुक्काम केला. चहापान झाल्यावर बिराजदारांना परत जावे लागणार होते. पुढे यावे न यावे हा विचार करत बिराजदार पेचात पडले. अखेरीस नाराजीनेच त्यांनी परत जायचा निर्णय घेतला.

इतक्यात ममताचा फोन आला. तळेगाव पर्यंत येणे तिलाही जमणार नव्हते, पण थोडा वेळ तरी राइडचा आनंद घेता यावा यासाठी तिची घालमेल सुरु होती. आम्ही पुढे पनवेलकडे जात असल्याचे सांगितले. आम्ही पुढे निघाल्यावर निराश मनाने बिराजदार परत फिरले. आमचे पंचक पनवेलच्या दिशेने जात होते. रस्त्यावर खड्डे फार नसले  तरी अरुंद आणि वर्दळीचा होता. आम्ही एकामागोमाग जात होतो. नावडे फाट्यापुढे रस्ता खराब असल्यामुळे आम्ही सेवा रस्त्याने जायचा निर्णय घेतला. कळंंबोली नाक्याला आम्ही पुन्हा मुख्य मार्ग पकडला आणि पनवेलला पोचलो. तिथे नाश्त्यासाठी थांबा घेतला. आमचा नाश्ता होईपर्यंत ममताही पोचली. बिराजदारांप्रमाणेच तिलाही पुढे येण्याची इच्छा असली तरी परत फिरण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.

पनवेल सोडल्यावर रस्ताही रुंद आणि छान असल्यामुळे सर्व सायकली सुसाट दौडू लागल्या. सर्व सायकलींनी सूर पकडला होता. श्विन थांबायला तयार नव्हती. कधी दोघे तर कधी तिघे तर कधी सर्व पाचजण एकत्र अशी आमची राइड सुरु होती. मध्येमध्ये छोटे थांबे घेत आम्ही जात होतो. खोपोली येताच आम्ही नाश्त्यासाठी पुन्हा थांबलो. नष्टयावर ताव मारून झाल्यावर मात्र खरी कसोटी सुरु होणार होती.

नाश्ता करून निघाल्यावर लगेचच चढ सुरु झाला. पहिल्याच चढावर सर्वांचा दम निघू लागला. सारंग आणि योगेश ढगे दोघांकडेही बिना गियरची सायकल असल्याने ते दोघे चालतच घाट चढणार होते. योगेश चौगुले, प्रितेश आणि मी पुढे निघालो. #saveoursahyadri मोहिमेमध्ये Sumit Patil यांच्या मार्गदर्शनामुळे घाट चढण्याचे उत्तम मार्गदर्शन मिळाले होतेच. त्यामुळे श्विन आत्मविश्वासाने घाट चढत होती. टाटा सायमाळ येथील चहाची टपरी, शिंग्रोबा मंदिर आणि (कोरडा पडलेला) धबधबा येथे थांबण्याचे ठरवले होतेच. त्याप्रमाणेच थांबे आम्ही शिंग्रोबा मंदिराशी थांबलो. तिथे फोटोसेशन आणि विश्रांती घेऊन निघेपर्यंत झेंडाधारी ३२ वर्षीय घोडा सायकलसह सारंगचे आगमन झाले. मला तळेगावला लवकर पोचुन काही कामे उरकायची असल्याने सारंग येताच मी पुढे निघालो.

प्रितेश माझ्या मागोमाग आलाच. (कोरडा पडलेल्या) धबधब्यापाशी गेल्यावर प्रितेश थोडा मागे पडला. पण तळेगावला ठरलेल्या वेळेत पोचायचे असल्याने मला थांबणे शक्य नव्हते. काम, काळ, वेग ह्या शाळेतील गणिताने माझ्या मनात आजही घर केले होते. श्विन संथ गतीने पण न थांबता पुढे जात होती. पाहता पाहता मी खंडाळा गाठले. तेथे मारुतीरायाच्या देवळात त्यांना नमस्कार करून मी पुन्हा पुढे निघालो. लोणावळा जवळ आल्यावर निराचा आस्वाद घेतला आणि पुढे अन्नपूर्णा हॉटेलपाशी पोचून इतरांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क न झाल्याने त्यांना मी पुढे जात असल्याचे कळवून मी प्रवास सुरु ठेवला.

घाट चढून झाल्यामुळे श्विन पुन्हा १*२, २*२, २*३ अश्या गियर ऐवजी ३*७ गियर वर स्थिरावली होती. अर्थातच श्विनने वेग पकडला होता. माझे लक्ष तळेगावकडे लागले होते. त्यामुळे श्विन आणि माझी लय चांगलीच साधली होती. खोपोली घाट चढल्यावर कामशेतचा चढ तर जाणवलाही नाही. श्विनचा सूर चांगलाच लागला होता. पण सारंगने टोनी दा धाबासमोरील चहा, वडा, लस्सीचे अप्रतिम वर्णन केल्यामुळे तिथे चहासाठी थांबलो.

तिथे फक्कड चहा घेत इतर चौघांना संपर्क साधला तेव्हा समजले योगेश चौगुलेच्या सायकलने अचानक असहकार पुकारल्याने ते चौघेही लोणावळ्यात अडकले होते.

वेळेचा अंदाज घेत मी पुढे जात असल्याचे सांगून श्विनची चाल पुन्हा सुरु झाली. वडगाव गेल्यावर एक १५-१७ वर्षाचा मुलगा माझ्या जोडीला आला. त्याला लगेच वळायचे होते पण त्या थोड्या वेळात त्याच्या सायकलबद्दल बऱ्याच गप्पा मारायची त्याची इच्छा होती. त्याची अखंड बडबड सुरु होती. पण एकदाही स्वतःबद्दल न बोलता त्याच्या सायकलबद्दलच बोलत होता. सायकलबद्दलचे त्याचे प्रेम सहजपणे समजत होते. तसेही सर्वच सायकलिस्ट त्यांच्या सायकलबद्दल हळवे असतातच. तो वळल्यावर मी पुढे तळेगावकडे निघालो. तळेगाव चाकण रस्त्याला लागल्यावर भाग्यश्री हॉटेलमध्ये मटकी भेळ खाल्ल्याशिवाय तळेगावमध्ये प्रवेश करण्याचे पाप मी करू शकत नव्हतो. भेळेवर ताव मारल्यावर मात्र श्विन थेट गंतव्यस्थानी पोचली.

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

श्विनचा रुबाब

राष्ट्रीय दिनांक भारतीय सौर मार्गशीर्ष १ शके १९३९
अर्थात हिंदू तिथी मार्गशीर्ष शुक्ल ४, शके १९३९
अर्थात ख्रिस्ती सौर दिनांक २२ नोव्हेंबर शके २०१७

भारतीय राष्ट्रीय कालगणना अर्थात जगातील एकमेव निधर्मी कॅलेंडर अर्थात जगातील एकमेव शास्त्रीय सौर कॅलेंडर च्या शके १९३९ मधील ९ वा महिना मार्गशीर्षचा आज पहिला दिवस.

काल श्विन कल्याण येथे @sahir shaikh याच्या बाईकपोर्ट या दुकानात विसावा घेत होती. तिला परत आणण्यासाठी आज जायचे होते. दुकानात जाताच साहिरने श्विनची चांगली सरबराई केल्याचे लक्षात आले.

श्विन पहिल्यांदाच बाईकपोर्ट मध्ये राहिली होती. पण तेथील वास्तव्यात श्विन सुदृढ झाली होती. मी गेल्यावर तिचे तेज लक्षात येत होते. मी साहिरकडून श्विनसाठी नवीन बेल आणि नवीन आरसाही घेतला. डाव्या बाजूला बसवलेली नवीन बेल आणि उजव्या बाजूला नवीन आरसा लावल्यामुळे श्विन अधिक देखणी दिसत होती.

साहिरला धन्यवाद देऊन मी आणि श्विन घरी येण्यासाठी निघालो. आधारवाडी चौक -दुर्गाडी चौक मार्गे आम्ही पत्री पूल पार केला. पत्री पुलाकडून  ९० फुटी रस्त्यावर जाताच श्विनला मोकळा रस्ता मिळाला. साहिरने केलेल्या सरबराईमुळे ९० फूट रस्त्यावर जाताना श्विनला तरंगत जात असल्यासारखेच वाटू लागले.

आरश्यामध्ये मागील वाहनांचा अंदाज घेत आमचे मार्गक्रमण सुरु होते. ठाकुर्ली जवळ येताच श्विनची गती मंदावली. हनुमान मंदिर येथे रस्ता अरुंद असल्याने थोडीफार कोंडी झाली होती. पण तेथून लगेच सुटका झाली आणि नवीन रुपात श्विनने डोंबिवली मध्ये रुबाबात प्रवेश केला.

#dombivlicyclingclub

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

I don't ride to win race

#kartikchallange
भारतीय राष्ट्रीय (Indian National) अर्थात निधर्मी (secular) तारीख सौर कार्तिक २८, शके १९३९

हिंदू तिथी (चांद्र कॅलेंडर) मार्गशीर्ष शुक्ल १ (प्रतिपदा) , शके १९३९

ख्रिस्ती दिनांक, नोव्हेंबर १९, शके २०१७

आज रविवार असल्याने खरेतर #dombivlicyclingclub च्या सदस्यांबरोबर एकत्र राइड करण्याचा दिवस. मात्र मला लवकर सकाळी राइडला जायला जमणार नव्हते. काही DCC सदस्य एका स्पर्धेत भाग घ्यायला #mumbai  मध्ये जाणार होते.
अर्थात DCC च्या नियमित रविवार राइडसाठी नेहमीप्रमाणेच डॉ पुणतांबेकर तयार होतेच.

मी आणि श्विनने आज अंबरनाथला जायचे ठरवले. दरम्यान DCC सदस्य बेतवडे गावात गेल्याचे समजले. श्विनचा निर्णय मात्र पक्का होता. जी ४० किमी ची राइड करण्यासाठी काही DCC सदस्य मुंबईत गेले होते तशीच ४० किमी डोंबिवली ते डोंबिवली राइड करण्याचा श्विनचा निर्धार होता.

सम्राट चौक पासून श्विनने साधारण वेग घेतला. टंडन रस्ता- भोपर रस्ता- शनी मंदिर मार्गे कल्याण शिळ रस्त्यावरील सामंत पेट्रोल पम्पपाशी श्विनने पहिला विसावा घेतला. इतर कोणी DCC सदस्यांचा काही निरोप आहे का हे बघून मी पुन्हा श्विनवर स्वार झालो. पुढील रस्ता श्विनच्या आवडीचाच होता. त्यामुळे श्विन भरधाव निघाली. काटई नाक्याला वळण घेत आम्ही बदलापूर पाइपलाइन रस्त्याला लागलो. थोडे उशिरा निघाल्याने भास्कराचार्य क्षितिजावर येऊन बराच वेळ झाला होता. त्यांचे सफरचंदी गुलाबी रूप आज पाहायला मिळाले नाही.

दक्षिणायनातील भास्कराचार्य श्विनकडे कौतुकाने पाहत होते. सौर कार्तिक महिना संपत आल्यामुळे भास्कराचार्यांनी दक्षिण गोलार्धातील निम्म्याहून अधिक प्रवास संपवला होता. अर्थात त्यामुळे त्यांच्या दर्शनाची वेळ १२ तासांपेक्षा कमी झाली होती.

उत्साह वाढवणारा गारवा वातावरणात जाणवत होता. श्विनने नेवाळी फाटा मागे टाकून एव्हाना ऍडिशनल अंबरनाथ औद्योगिक परिसर गाठला होता.

तेथून परत फिरताना मलंगगडाच्या डोंगररांगा लक्ष वेधत होत्या. त्यांच्याकडे पाहताना छायाचित्र काढण्याचा मोह श्विनला आवरला नाही. श्विनने परतीचा मार्ग धरला. दरम्यान इतर काही सायकलिस्ट थोड्या थोड्या अंतरावर दिसत होते. एकमेकांचा उत्साह वाढवत आम्ही आमची वाटचाल सुरु ठेवत होतो.
नेवाळी नाक्याला गन्धार डोम्बिवलीकर आणि Arnav Kulkarni Marcella यांच्या नेहमीच्या चहावाल्याकडे चहा घेण्याचा मोह मला आवरता आला नाही. सकाळच्या सुंदर हवेत गरमागरम चहाचे घुटके घेणे याचे स्वर्गसुख न अनुभवणारा खरेतर अरसिकच म्हणायला हवा. हे स्वर्गसुख घेऊन मी तळोजा फाटा पार केला आणि पाइपलाइन रस्त्याला समांतर असलेल्या चिंचोळया सेवा रस्त्याला लागलो. हा रस्ता अरुंद असला तरी ह्यावर वर्दळ अजिबात नसते आणि कदाचित त्यामुळेच खड्डे फारच कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे श्विनला हा रस्ता चांगलाच पसंत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्हीबाजूला असलेली हिरवळ, छोटी छोटी फुले, फुलपाखरे यांच्यामुळे मलाही हा रस्ता मोह पाडतो. श्विन आणि माझे एकमत असल्याने आम्ही DCC सदस्यांच्या उंबर्ली गावातून जाणाऱ्या रस्त्याचा विचारही केला नाही.

सेवा रस्ता संपल्यावर उजवीकडे वळून खुष्कीच्या मार्गाने आम्ही शिळ कल्याण रस्त्याला लागलो आणि पुन्हा एकदा प्रदूषित हवेच्या साम्राज्यात प्रवेश केला. मानपाडा रस्त्याने डोंबिवली शहरात प्रवेश केल्यावर P & T वसाहतीमधून आम्ही DNC शाळेच्या मार्गाला लागलो.

शहरातील खरी वर्दळ पुढे टंडन रस्त्याला आमची वाटच पाहत होती. सकाळी सकाळीच वाहनांच्या रांगा टंडन रस्ता- पूर्व पश्चिम पूल येथे लागल्या होत्या. श्विनने नेहमीच्या सफाईने त्यातून मार्ग काढत डोंबिवली पश्चिमेला प्रवेश केला आणि सुटकेचा निश्वास टाकला
#tjsbbank #saveoursahyadri #cycle2work





शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

सकाळची मैफल

भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधानानुसार (constitution) सुरु केलेल्या एकमेव अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडरनुसार तारीख -सौर कार्तिक २७, शके १९३९

जगातील एकमेव निधर्मी कॅलेंडरनुसार तारीख -भारतीय सौर कार्तिक २७, शके १९३९

जगातील एकमेव शास्त्रीय सौर कॅलेंडरनुसार तारीख - भारतीय सौर कार्तिक २७, शके १९३९

जगातील सर्वात अत्याधुनिक कॅलेंडर (केवळ ६७ वर्षांपूर्वी सुरु झालेले कॅलेंडर) नुसार तारीख - भारतीय सौर कार्तिक २७, शके १९३९

हिंदू धर्माच्या कॅलेंडरनुसार (चांद्र कॅलेंडर) तिथी कार्तिक अमावस्या, शके १९३९

ख्रिस्ती धर्मानुसार तारीख (सौर कॅलेंडर) नोव्हेंबर १८, शके २०१७

सौर अश्विन महिन्यातील सकाळी राइडसाठी निघणे खूपच आल्हाददायक होते. काल ठरल्याप्रमाणे श्विन राइडसाठी निघाली ती शिळ फाट्याच्या दिशेने जायचे ठरवून! मात्र बाहेर पडल्यावर शिरस्त्राण आणि  हातमोजे घरीच राहिल्याचे लक्षात आले. इतक्यात भ्रमणध्वनीही खणखणला.
जिवलग मित्र Pushkar Joshi मला शिळ फाट्या ऐवजी ९० फुटी रस्त्याच्या राइडसाठी गळ घालत होता. मी त्याला एमराल्ड हॉटेलपाशी भेटून ठरवू असे सांगून सम्राट चौकात पोचणार तोच डोळ्यात छोटा कीटक गेला.
एकंदर चिन्हे पाहून मी शिळ फाट्याला जायचा विचार बदलला.
पुष्करला भेटल्यावर मी ९० फिट रस्त्याला येत असल्याचे सांगितल्यावर तो खुश न झाला तरच नवल. मात्र आता गन्धार डोम्बिवलीकर आणि Arnav Kulkarni Marcella माझ्यावर नाखूष होणार होते. पण पुष्करने त्यांची जबाबदारी घेतली.
मग मात्र श्विन निसंकोचपणे 'सखू'बरोबर ९० फिट रस्त्याकडे वळली. पुष्कर त्याच्या 'सखू'ला घेऊन उद्या एका स्पर्धेत भाग घेणार होता. त्यासाठी आज त्याला सखुची तयारी करून घ्यायची होती. श्विन आणि सखू चार रस्ता मार्गे निघाले.
घारडा सर्कलला वळण्याऐवजी मी पुष्करला सरळ पेंढारकर महाविद्यालयावरून शिळ कल्याण रस्त्याला वळवले. तेथून मात्र आम्ही पत्री पुलामार्गे ९० फुटी रस्त्याला लागलो.
श्विनची चाल थोडी मंदावली असल्यामुळे पुष्कर त्याच्या सखुसह थांबला तरी मी श्विनबरोबर पुढे निघालो. ९० फुटी रस्ता- नवीन ठाकुर्ली रस्ता या काटकोनात फेरी मारून परत येता येता वाटेत Vaishal Dharamsey भेटला. #dombivlicyclingclub मधील मित्र भेटल्यामुळे सकाळ छानच वाटत होती. दरम्यान पुष्करला परतीचा मार्ग धरावा लागला तरी वैशाल माझ्या बरोबर होताच.
#strava वरील जुना मित्र Sanjeev Divekar सुद्धा वाटेत भेटला.
वैशालबरोबर गप्पा मारता मारता आमच्या फेऱ्या सुरु होत्याच. श्विनच्या साथीला आता सखू नसली तरी हिरो हॉक आली होती. मग आम्ही Ankur Agarwal ह्यालासुद्धा राइडसाठी राजी केले. अंकुर बऱ्याच दिवसांनी भेटला होता. आमच्या गप्पा रंगणार होत्या पण मग आम्ही सायकलफेरी मारतानाच गप्पा मारायच्या ठरवले. वैशाल रंगात आला की किती वेळ जाईल याचा भरवसा नसतो, पण घडयाळ बाबा त्यांचे काम चोख बजावत होते. रविमहाराजही मार्गक्रमण करत होतेच. श्विनचे मनसुबे कितीही उधळायचे असले तरी मानगुटीवरील घड्याळबाबांच्या दटावणीमुळे मी श्विनला परतीचा मार्ग दाखवला

#tjsbbankhttps://www.relive.cc/view/1279683102

रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

अवचित भेट

जागतिक शास्त्रीय (निधर्मी) अर्थात भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक भारतीय सौर कार्तिक २१, शके १९३९

ख्रिस्ती सौर दिनांक १२ नोव्हेंबर, शके २०१७

हिंदू तिथी (चांद्र) कार्तिक वद्य ९, शके १९३९

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर च्या महिन्यांची नावे आणि वर्षाचा (शकाचा) क्रमांक हे हिंदू कॅलेंडर (पंचाग) वरून घेतले आहे. मात्र भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर आणि हिंदू कॅलेंडर येथील साम्य इथेच संपते.
मात्र ख्रिस्ती कॅलेंडर प्रमाणेच भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर सौर कॅलेंडर असल्याने या दोन्ही कॅलेंडरमध्ये ३६५ दिवसांचे वर्ष असते. या दोन्ही कॅलेंडर मध्ये लिपवर्षही असते आणि त्या लिपवर्षात ठराविक महिन्यात एक दिवस इतर वर्षांपेक्षा अधिकही असतो.

आज खरेतर #dombivlicyclingclub (DCC) सदस्यांबरोबर सकाळची राइड करण्याचा दिवस. मात्र मी आज जाऊ शकणार नव्हतो. DCC सदस्यांच्याही आज तीन टीम झाल्या होत्या. पहिल्या टीमने छोटी राइड केली. दुसरी टीम मध्यम पल्ल्याच्या राइडसाठी गेली होती तर तिसरी टीम लांब पल्ल्याच्या राइडसाठी गेली होती.

मी सर्व राइडना मुकलो खरा, पण दुपारी मात्र श्विनला घेऊन नेवाळी फाट्याकडे निघालो. ह्या वेळेस कोणीही DCC सदस्य भेटण्याची शक्यता नव्हतीच. पण श्विनला एकाजागी उभे राहून कंटाळा आला होता, त्यावेळी राइड करणे हाच उपाय होता.

श्विनने दीनदयाळ रस्त्यामार्गे डोंबिवली विद्युतरथ स्थानकाचा चौक गाठला. तेथे अश्वशक्तीधारी वाहनांनी जो गोंधळ घातला होता त्याला तोड नव्हती. सर्व दिशांना जाणारी वाहने एकमेकांच्या मार्गात बेमालूमपणे अडकली होती. श्विनला अशी कोडी सोडवणे काही कठीण नव्हतेच. श्विनने मार्गही लगेच काढलाच आणि पूर्वपश्चिम उड्डाणपुलाकडून पूर्वेला गेलो.

टंडन रस्ता- भोपर मार्गे कल्याण शिळ रस्ता गाठला. श्विन इथे नेहमीच खुश असते. एकतर कल्याण शिळ रस्ता गावातील रस्त्यापेक्षा रुंद आहे आणि खड्डेविरहित आहे.  त्यामुळे श्विनला इथे सूर न सापडता तरच नवल! काटई नाक्याला झोकात वळण घेऊन श्विन बदलापूर पाइपलाइन रस्त्याला लागली.

तळोजा फाट्या अगोदर परतीचा रस्ता बंद करून एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरु असलेली पाहून परतीच्या रस्त्याची डागडुजी सुरु असावी असे वाटले. त्या आनंदात नेवाळी नाका गाठला. आता तहानेची जाणीव झाली असली तरी पाणी आणले नव्हते. म्हणून दुभाजक संपताच परत न वळता चहा घेण्यासाठी थांबायचे ठरवले. ओहो! हा निर्णय चांगलाच ठरला. समोरून @jayshree pandit आणि @sanjay datye येताना दिसले. दोघेही #ambarnath cyclist बरोबर कडावला गेले होते. अंबरनाथ सायकलिस्टचे @vinayak vaidya ने ही राइड आयोजित केली होती. दोघेही कडावला जाऊन येताना खुश होते. दिवसभराच्या सायकलिंगमुळे दोघेही पुढील आठवड्याच्या रहाटगाडग्यासाठी पुरेसा प्राणवायू घेऊन आले होते. नेवाळी फाट्याला चहा घेऊन आम्ही तळोजा फाट्यानंतर बदलापूर पाइपलाइन च्या शेजारील सेवा रस्त्याने परतलो.

मी आणि जयश्रीमॅडम मानपाडा रस्त्याला वळलो पण दात्ये शिळ कल्याण रस्त्याने सरळ पुढे गेले. भोपर रस्त्याने जात असताना @dev gayakwad ही भेटला. DCC सदस्य असे अचानक भेटल्याने माझी आजची राइड चांगलीच यशस्वी झाली. आमच्या भेटीचे क्षण देवने कैद केल्यावर आम्ही आपापल्या घराकडे परतलो
#tjsbbank #cycle2work 

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

बिकट वहिवाट

भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक १८, शके १९३९

सूर्याचे दक्षिणायन सुरु असल्यामुळे दिवस लवकर मावळत आहे. त्यामुळे ऑफिसहून निघेपर्यंत सूर्य क्षितिजापलिकडे गेला होता. अंधाराचे साम्राज्य सुरु झाल्याने पथदिवे सुरु होते. अश्वशक्तीधारी वाहनांचे दिवेही सुरु होतेच. या दिव्यांच्या उजेडात श्विनचा ऑफिसहून घराकडे प्रवास सुरु झाला. मागील वाहनांना श्विनचे अस्तित्व कळावे यासाठी श्विनने एक मिणमिणता दिवा धारण केला होता.

मुलुंड चेकनाका- ठाणे क्लब-रघुनाथनगर मार्गे श्विन सेवा रस्त्याला लागली. तिथे उजेड कमी असल्याने श्विनने लगेच मुख्य रस्ता पकडला. पहिल्याच चौकात अश्वशक्तीधारक वाहनांच्या घोळक्यात श्विनही अडकली. पण सर्व वाहनांच्या मधून वाट काढत श्विनने उजवीकडील सेवा रस्ता गाठला.

माजीवाडा नाक्याला फुटलेल्या रस्त्यामुळे सर्व वाहने अडखळत असताना श्विनने पुन्हा बाजी मारली. ठाणे नाशिक महामार्गाला श्विनला सरासरी दर सेकंदाला एक वाहन मागे टाकत होते. मात्र हा महामार्ग पुरेसा रुंद असल्याने रस्त्याला गर्दी जाणवत नव्हती. खरतर या वाहनाच्या साथीने श्विनला उजेडही छान मिळत होता.

डावीकडून काही रस्ते या महामार्गाला मिळतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी महामार्ग फुटलेला असल्याने तेथील वाहनेही सावकाशपणे येत असतात. त्यामुळे त्या वाहनांचाही श्विनला अडथळा नसतो. मात्र मानकोली चौकाअगोदर रस्ता दोन भागात विभागाला जातो. डावीकडील मार्ग पुलशेजारून तर उजवीकडील मार्ग पुलावरून जातो. श्विनला पुलावरून यायचे असल्याने तेथे मागील वाहनांचा अंदाज घेत उजवीकडील मार्ग गाठावा लागतो.

इथेही रस्ता फुटलेला आहेच.  त्यामुळे इथे नजर समोर ठेऊन कान मागे असावे लागतात. खरेतर दोघांनाही स्वतःच्या कामाबरोबर एकमेकांचेही काम करावे लागते. संपूर्ण महामार्गावर साधारण परिस्थिती अशीच असते. पुढील अंदाज डोळ्यांनी घेत असताना मागील वाहनांचा केवळ आवाजच कानांनी ऐकायचा नसून त्याबरोबर कानांनी ते वाहन 'पहावे'ही लागते. म्हणजे ते वाहन किती अंतरावर आहे, किती वेगात आहे याचा अंदाज बांधण्यासाठी मेंदूला केवळ कानांवर अवलंबून रहावे लागते.

याची सवय झाल्यामुळे कानांनी ऐकून आणि 'पाहून' मी श्विनला देत असलेल्या इशाऱ्यांचा श्विनलाही अचूक अंदाज येतो. याच जोरावर मानकोली पूल श्विनने लीलया पार केला.
रांजनोली नाक्याअगोदर वाहनांची रिघ लागली होती. अगोदर  सेकंदाला एक प्रमाणे श्विनला मागे टाकणारी वाहने चांगलीच अडकली होती. आता श्विनची वेळ होती.

एकेक पॅडलला ४ वाहने या गतीने श्विन अश्वशक्तीधारी वाहनांना मागे टाकत होती. १०० मिटरसाठी श्विनला अंदाजे १७ पॅडल मारावे लागतात. या गतीने रांजनोली नाक्याला सुमारे ३०० -३५० वाहनांना मागे टाकत श्विनने रांजनोली नाक्याला कल्याणकडे वळण घेतले.

रांजनोलीपासून कोनगाव येईतो मोकळा रस्ता मिळाला, पण कोनगाव सुरु झाल्यावर दुर्गाडी पूल पार करेपर्यंत श्विनला पुन्हा २००-२५० वाहनांना मागे टाकण्याची संधी मिळाली. त्याच दिमाखात श्विन दुर्गाडी किल्यासमोर पोचली. गोविंदवाडी बायपासचा पूल उतरताच १८ गतिरोधकांचे अडथळे स्वागत करत होते. जी वाहने दुर्गाडी पूल पार करून इथे पोचत होती, त्यांचा उरलेला जीव काढण्यासाठी हे गतिरोधक पुरेसे आहेत. अश्वशक्तीधारक वाहनांची रग आणि मस्ती इथे पार उतरते. तेथील अडथळे पार करून श्विन पत्रिपुलमार्गे कचोरे गावाकडे वळली तर आज तिथेही वाहनांची कोंडी झाली होती. हे सर्व पार करत श्विनने ९० फुटी रस्ता गाठला. इथे पोचताच प्रसन्न वातावरणाने सर्व शीण निघून गेला. सोसायटीत पोचल्यावर मी घरी जाण्यासाठी वळलो तरी श्विनमात्र आणखी १० किमी जायला तयार होती...
#dombivlicyclingclub #tjsbbank #cycle2work

थंडीची चाहूल

भारतीय सौर कार्तिक १८, शके १९३९

थंडी सुरु झाल्याची चाहूल नेहमीच सुखद असते. अजून कानटोपी, स्वेटर अश्या गोष्टींची गरज वाटू लागली नसली तरी सकाळी प्रसन्न वाटणारा गारवा होता. श्विनने नेहमीप्रमाणे संथगतीने सुरवात करून गणेशमदिराजवळील पादचारी पुलामार्गे डोंबिवली पूर्वेला प्रवेश केला.

९० फुटी रस्ता सुरु झाल्यावर लगेचच #dombivlicyclingclub च्या सदस्य @jayashree pandit समोरील बाजूने दुभाजकाच्या पलीकडून जाताना दिसल्या. मध्ये अंतर बरेच होते त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. सकाळच्या शांत वातावरणात ९० फूट रस्त्यावर सायकलिंग करून त्या रमतगमत परत घरी निघाल्या असाव्यात.

९० फुटी रस्ता संपता संपता माझा अनोळखी धावपटू मित्र समोरून येत होता. रोजच्या प्रमाणे आम्ही एकमेकांना प्रोत्साहन दिले आणि आपापले मार्ग सुरु ठेवले

रस्त्यावरील गर्दी कमी असल्यामुळे श्विनचा प्रवास सुखेनैव सुरु होता. गोविंदवाडी बायपास-दुर्गाडी पूल-कोनगाव-गोवेगाव- पिंपळघर- रांजनोली हे सर्व पार करून श्विन नाशिक ठाणे मार्गाला कधी लागली हे समजलेच नाही.

श्विन आणि मी एकमेकात इतके गुंग झालो होतो की ओवळीनंतरच्या उताराजवळील तळे, तिथली फुलपाखरे, फुले यांचा विचारही मनाला शिवला नाही. मी भानावर आलो ते मानकोली-खारेगाव टोल-माजीवाडा नाका पार करून सेवा रस्त्याला लागल्यावर.

श्विनच्या थोडे पुढे एक सायकलिस्ट जाताना दिसला. त्याला गाठल्यावर एकमेकांशी ओळख करत असतानाच आमचे मार्ग वेगवेगळे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अधिक काही बोलता आले नाही. मग मात्र रघुनाथनगर मार्गे तिनचाकी तीन आसनी काळ्या पिवळ्या अश्वशक्तीधारी वाहनांची कोंडी फोडत श्विन TJSB House ला पोचली.

#tjsbbank #cycle2work

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

स्वशक्ती हेच श्रेष्ठ इंधन

भारतीय सौर कार्तिक १७, शके १९३९

श्विन ऑफिसहून निघते तेव्हा मी पोटपूजा करून इंधन भरून घेत असतो. सफरचंद हे इंधन मला जास्त पसंत आहे. पण आज कोणत्याही इंधनाची सोय मी केली नव्हती. त्यामुळे पोटातील कावळे ओरडायला लागण्याच्या आत घरी पोचणे आवश्यक होते.
श्विननेही ही परिस्थिती ओळखली आणि सुरुवातीपासूनच वेग घेतला. तिनहात नाक्याला माजीवाडा नाक्याच्या दिशेने वळल्यावर श्विनने गती आणखी वाढवली. पहिल्याच चौकात सरळ जायला लाल बावटा असल्याने उजवीकडे वळून श्विनने सेवा रस्ता पकडला. तिथेही चार चाकी वाहने बेशिस्तीने आडवी येत होती. श्विनने त्यांना हुलकावणी देत माजीवाडा नाका गाठला.
ठाणे नाशिक महामार्गावर वेळातच अंधारांचे साम्राज्य सुरु झाले. वद्य (कृष्ण) पक्ष सुरु असल्याने चंद्रही सकाळी हजेरी लावत होता. त्यामुळे चंद्राचा प्रकाशही सोबतीला नव्हता. अश्वशक्तीधारी वाहनांच्या दिव्यांच्या साथीने श्विन दौडत होती. माझ्याकडील विजेरी लावण्यासाठी श्विन तयार नव्हती. वाहने तुरळक असल्याने काही भागात अंधारात श्विनला पुढे जावे लागत होते.
रस्ता माझ्या पायाखालचा नसला तरी श्विनच्या टायरखालचा होता. तरी अंधार येताच श्विनला मी शांत करत होतो.
रांजनोली नाक्याला मात्र श्विनला प्रचंड प्रमाणात उजेड मिळाला. अश्वशक्तीधारी वाहने चांगलीच अडकली होती. त्यामधून लीलया पार होत श्विन कल्याणकडे वळली.
पिंपळघर, गोवेगाव येथे तर वाहनांची गर्दी नव्हतीच पण कोनगावातील रस्ताही मोकळाच होता.
दुर्गाडी पुलाने मात्र सगळी कसर भरून काढली. पण श्विनने सर्व अनुभव पणाला लावत दुर्गाडी पुलावर शंभरेक अश्वशक्तीधारी वाहनांना मागे टाकले आणि स्वशक्ती हेच श्रेष्ठ इंधन असल्याचे सिद्ध केले.
घरी पोचल्यावर श्विनने ख्रिस्ती वर्ष २०१७ मधील ८२३३ किमी अंतर गाठताना माझ्या आणखी एक लाडका फलंदाज डेव्हिड गावर याच्या कसोटी धावांचा टप्पा (८२३१) पार केला.
#dombivlicyclingclub #tjsbbank #cycle2work

Cycle to save Yourself, Recycle to Save Earth

राष्ट्रीय दिनांक भारतीय सौर कार्तिक १७, शके १९३९
ख्रिस्ती दिनांक सौर नोव्हेंबर ८, शके २०१७

जेव्हा जेव्हा एखादी नवीन राजवट सुरु होते तेव्हा त्या राष्ट्राने (देशाने) तीन गोष्टी स्वीकारून त्यातील नागरिकांनी त्या अमलात आणाव्या लागतात. ह्या तीनही पैकी एखादी जरी गोष्ट जर राष्ट्राने स्वीकारली आणि नागरिकांनी स्वीकारली नाही तर ते नागरिकांनी ती नवीन राजवट स्वीकारली नाही असा त्याचा अर्थ होतो.
ह्या तीन गोष्टी म्हणजे स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र चलन आणि स्वतंत्र कालगणना पद्धत. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया पर्यंत सर्व पृथ्वीतलावर आणि पुराणकाळापासून आजपर्यंत ही पद्धत सुरु आहे.
शिवाजीमहाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केले तेव्हा त्यांनीही याचकरीता भगवा ध्वज, नवीन चलन याचबरोबर शिवशके ही कालगणना पद्धत सुरु केली. याचकरिता ब्रिटिशांनीही त्यांचे राज्य सुरु करताना त्यांचा ध्वज, चलन आणि ख्रिस्ती सौर कालगणना पद्धत सुरु केली.

म्हणूनच भारत स्वतंत्र झाल्यावर कॅलेंडर रेफॉर्म कमिटी स्थापन करून देशभरातील शेकडो प्रचलित कॅलेण्डरचा अभ्यास करून राष्ट्रीय सौर कॅलेंडर तयार केले गेले. स्वातंत्र्यानंतर नागरिकांनी ज्याप्रमाणे तिरंग्याऐवजी युनियन जॅक हा ध्वज किंवा रुपया ऐवजीब्रिटिश पौंड हे चलन सुरु ठेवणे हे स्वातंत्र नाकारणे ठरते त्याचप्रमाणे नागरिकांनी सर्व कामकाजात राष्ट्रीय कॅलेंडर न उपयोगात आणता ख्रिस्ती कॅलेंडर उपयोगात आणले तर भारताचे स्वातंत्र नाकारणेच आहे. RBI, सर्व शासकीय कार्यालये, आकाशवाणी या सर्व ठिकाणी राष्ट्रीय कॅलेंडर वापरले जाते. मात्र नागरिकांमध्ये यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना याची सवय लावणे याची गरज आहे.

याचकरिता श्विनसफारी लिहितानाही राष्ट्रीय दिनांक लिहिणे ओघानेच आले.

सौर कार्तिक महिना अर्धा संपला तरी अजून पाहिजे तेवढी थंडी सुरु झाली नाही. म्हणून आज थोडा लवकरच निघालो. श्विनजवळ जाऊन तिच्या दोन्ही टायरवर टिचकी मारली. टिचकी मारताच श्विनने हवा व्यवस्थित असल्याचे सांगितले. मग 'Cycle to Save Yourself, Recycle to Save Earth' हा फलक श्विनने धारण केला आणि संथगतीने मार्गक्रमण सुरु केले.
गणेशमंदिराजवळील पूल ओलांडून आम्ही पूर्वेला गेलो. फडके रस्त्याजवळील गणेशमंदिर हे DCC सदस्यांचे दर रविवारी भेटण्याचे नियोजित ठिकाण. श्विनवरूनच तेथील गणपती बाप्पाला नमस्कार करून मी नेहरू मैदानाआधीच्या चौकात डावीकडे वळलो.
९० फुटी रस्त्यात नेहमीप्रमाणे ओपन जिमवर व्यायामाचे प्रयोग सुरु होते. पत्री पूल, गोविंदवाडी बायपास, दुर्गाडी पूल पार करून कोनगावामध्ये पोचलो आणि वाऱ्याची थंड झुळूक जाणवली. श्विनही लयीत जात होती. कृत्रिम इंधनावर चालणारी वाहने तुरळक होती, त्यामुळे रस्ताही मोकळा होता. रांजनोली नाक्याला डावीकडे वळण घेत श्विनने ठाण्याच्या दिशेने कूच केले. श्विन कुठेही थांबायला तयार नव्हती. पण मानकोली पार केल्यावर श्विनला तिचाच फोटो काढायचे सांगितल्यावर मात्र श्विन थांबली. नवीन फलक धारण केलेल्या श्विनचे फोटोसेशन संपल्यावर मात्र श्विन निघाली ती थेट TJSB हाऊस ला जाऊनच थांबली.

#dombivlicyclingclub #tjsbbank #cycle2work

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

सफरचंदाची सफर

TJSB House हुन निघताना उशीर झाल्यामुळे क्षुधाशांती न करता मी आणि श्विन निघालो. मात्र रघुनाथनगर मार्गे माजीवाडा नाक्याला जाणाऱ्या मार्गाला लागताच पाऊचमधील सफरचंद उजव्या हातात घेत आणि डाव्या हाताने श्विनला सांभाळत प्रवास सुरु ठेवला. श्विन ही पाश्चिमात्य बनावटीची असल्याने डाव्या हातात पुढचा ब्रेक होता. त्यामुळे सफरचंद खाताना श्विनची गती फारच संथ ठेवली होती. क्षुधाशांती होईतो कॅडबरी चौक आला. तेथे सरळ जायला लाल बावटा असल्याने उजवीकडचा सेवा रस्ता गाठला आणि मार्गक्रमण सुरु ठेवले.
ठाणे नाशिक महामार्गावर खारेगाव पूल सोडल्यावर श्विन वारा पिऊ लागली. वाहतूकही सुरळीत सुरु होती. ओवळी गावपुढील खिंडी पुढील उतार सुरु होताच श्विनचा वेग अधिकच वाढला. मात्र रांजनोली चौकाच्या साधारण १ किमी आधी मात्र अश्वशक्तीधारी वाहने रेंगाळत होती. खोखोचा खेळ खेळत श्विन मार्ग काढत होती. अश्वशक्तीधारी वाहनांनी रस्ता डाव्या कडेपासून दुभाजकापर्यंत पूर्णपणे व्यापला होता. अखेरीस दुभाजक ओलांडून श्विनने रस्त्याची उजवी बाजू पकडली.
अश्वशक्तीधारी वाहने मात्र इतकी अडकली होती की श्विनने कल्याणच्या दिशेने जवळपास अर्धा किमी अंतर गाठले तरी मागून एकही वाहन येऊ शकले नाही. रांजनोली चौकाच्या आधी आणि नंतर असे एकंदर १ किमी अंतर गाठायला श्विनला ५ मिनिटे लागली तरी अश्वशक्तीधारी वाहनांना मात्र किमान १५-२० मिनिटे लागत होती.
सुदैवाने कोनगाव आणि दुर्गाडी पूल येथे मात्र रस्ता चक्क इतका मोकळा होता की मनात असत तर श्विन रस्त्याच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आणि परत डावीकडे फिरत फिरत पूल ओलांडू शकत होती. या संधीचा फायदा घेत श्विन चटकन दुर्गाडी किल्ला गाठला. दुर्गाडी पुलावर गर्दी नसल्याचा श्विनला इतका आनंद झाला की पुढे गोविंदवाडी बायपासवरील १८ गतिरोधकांची अडथळ्यांची शर्यतही श्विनने आनंदाने पार केली.
#dombivlicyclingclub #tjsbbank #cycle2work

सोबर्स बायकॉट आणि श्विन

Bhartiy Saur (solar calendar) Kartik 16, Shake 1939
Christian Saur (solar calendar)November 7, Shake 2017
Hindu tithi (lunar calendar) kartik vadya (krushn) chaturthi, shake 1939

विक्रमादित्य लिटिल मास्टर @sunil gavaskar (सुनील गावस्कर) ह्यांच्या कसोटी धावा १०१२२ इतके किमी सायकलिंग ख्रिस्ती सौर वर्ष २०१७ मध्ये करायचे ध्येय ठरवून वर्षारंभ केला होता. रविवारी #dombivlicyclingclub च्या सदस्यांबरोबर रविवारी लोनाड येथे सायकलफेरीसाठी जाऊन आलो तेव्हा सर @gary sobars (गॅरी सोबर्स) ह्याच्या कसोटी धावांएवढ्या (८०३२) किमीचा टप्पा श्विनने पार केला होता. सुनील गावस्कर ह्यांचा आदर्श असलेल्या @rohan kanhai (रोहन कन्हाय) यांचा गॅरी सोबर्स हा जोडीदार. तर आज #cycle2work करत ऑफिसला पोचलो तेव्हा सुनील गावस्कर यांचा समकालीन असलेला चिवट आणि खडूस फलंदाज #geofree bycott (जेफ बायकॉट) ह्याच्या कसोटी धावा ८११४ पेक्षा जास्त किमी चा टप्पा श्विनने पार केला होता.
ह्या तिघांची फलंदाजी वेगवेगळ्या शैलीतली असली तरी एक साम्य म्हणजे हे तिघे जेव्हा निवृत्त होत होते तेव्हा सर्वोधिक कसोटी धावांचा विक्रम त्यांच्या नावावर होता. सोबर्सच्या धावांचा टप्पा पार करताना श्विन भारावली होती, तर बायकॉटच्या धावांपेक्षा जास्त किमी पूर्ण करताना एक आसुरी आनंद झाला होता.
दरम्यान ९० फिट रस्त्यावर आजही नेहमीप्रमाणेच धावण्याचा सराव करणारा अनोळखी मित्र आणि मी एकमेकांना अंगठा उंचावत एकमेकांचा उत्साह वाढवला. घरापासून संथगतीने सुरुवात केली असली तरी तो अनोळखी मित्र भेटल्यावर श्विनची गती वाढली.
दुर्गाडी रांजनोली रस्त्यावर श्विन सावधपणे जात होती. वाटेत कोठेही वाहनांची भाऊगर्दी नव्हती. नाशिक ठाणे महामार्ग सुरु होताच श्विनचा उत्साह अधिकच वाढला. मात्र लगेचच दिवावसई लोहमार्गावरील पूल, पुढील खिंड येथील चढ चढताना नेहमीप्रमाणेच श्विनची चाल मंदावली. चढ आला की उतार येणारच. पुन्हा एकदा मला हूल देत श्विनने वाटेतील तळयापाशी न थांबता थेट मानकोली गाठले. श्विन आजही कोठे थांबायला तयार नव्हती. मात्र अंजुरदिवे गावापुढील पुलावर मुंब्रा डोंगर रांगांच्या दृश्याने मला मोह पाडला. तेथे निसर्गाच्या ह्या रुपाला कॅमेरात कैद करून आम्ही पुढे निघालो. इथून पुढे मात्र श्विनसमोर माझे काही चालले नाही. श्विनने कुठेही न थांबता थेट #TJSB हाऊस गाठुनच विश्रांती घेतली.

Office2home #kartikchallange

राष्ट्रीय दिनांक भारतीय सौर कार्तिक १५, शके १९३९

ऑफिसहून निघताना श्विनने उदरभरण करण्याची इच्छा व्यक्त केली. वास्तविक तिला फार हवेची गरज नव्हती. पण तरी तिचे समाधान करून आम्ही परतीचा मार्ग सुरु केला. TJSB House सोडताना टायरवर टिचकी मारून श्विनचा आत्मा शांत झाल्याची खात्री करून घेतली. वास्तविक मलाही थोडी क्षुधाशांती करायची होती. पण उशीर होऊ नये म्हणून मी वाटेत तो कार्यक्रम साधायचे ठरवले.

सूर्याचे दक्षिणायन सुरु झाल्याने सूर्य लवकर अस्त्र म्यान करू लागला आहेच. त्यातच कार्तिक या चांद्र महिन्याचा कृष्ण (वद्य) पक्ष सुरु झाल्यामुळं चंद्रही त्याचा प्रकाश आवरता घेत असल्याने पथदिवे आणि वाहनांचे दिवे याखेरीज उजेड नव्हता. सेवा रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताच मी डाव्या हातातील पुढच्या ब्रेकवर हात ठेवत उजव्या हाताने सफरचंद खाऊन घेतले. तोपर्यंत माजीवाडा नाका जवळ आला होता. पुलाखालून ठाणे नाशिक महामार्ग गाठला.

खारेगाव पूल ओलांडताच संध्याकाळ असूनही शिर्डीला जाणारे पदयात्री मार्गक्रमण करताना दिसत होते. त्यांचा आजचा मुक्काम दापोडे येथील लोढा साईमंदिरात असावा. मात्र ते बऱ्यापैकी लांब होते.

श्विनने रांजनोली नाका गाठला तर तेथे  वाहतूक सुरळीतपणे असल्याचे दिसले. आश्चर्याचा हा धक्का पचवत श्विनने कल्याणच्या दिशेने उजवीकडे वळण घेतले मात्र... तेथे मात्र चांगलीच कोंडी झाली होती. त्यातून सुटका केल्यावर कोनगावापर्यंत श्विन आरामात गेली. कोनगाव-दुर्गाडी पूल येथे सर्व वाहनांनी केलेल्या वेढ्यातून सुटणे तसे कठीणच. पण श्विनने तेथेही बाजी मारली. दुर्गाडीजवळील चंद्र कुठे आहे याचा मागोवा घ्यायचा मी प्रयत्न केला पण व्यर्थ!

९० फूट रस्त्यावरून येताना एक सायकलिस्ट संथ गतीने जाताना दिसला. त्याला गाठत मी त्याच्याशी परिचय करून घेतला आणि त्याला #dombivlicyclingclub च्या रविवारच्या फेरीला यायचे आमंत्रण दिले आणि आजची cycle2work फेरी सार्थकी लावली

#tjsbbank

Cycle2work Saur Kartik 15, Shake 1939. Khristi Saur date Nov6, Shake 2017

#dombivlicyclingclub (DCC) बरोबर काल आठवडाभरासाठी ऑक्सिजन घेतल्यावर आज पुन्हा cycle2work साठी जायचे होते. श्विन माझी वाटच पाहत होती. गेल्या आठवड्यात सकाळी थंडी जाणवू लागली असली तरी आम्ही आज निघालो तेव्हा मात्र थंडीचा लवलेशही नव्हता.

९० फुटी रस्त्यावर धावण्याचा रोज सराव करणारे काहीजण आणि मी आता एकमेकांना ओळखू लागलो होतो. आम्ही एकमेकांना ओळखत नसलो तरी हाताचा अंगठा उंचावून एकमेकांचा उत्साह मात्र वाढवत होतो. त्या उत्साहात रस्त्यावरून हळूहळू वेग वाढवत श्विनने पत्री पूल पार केला आणि कोनगाव गाठले. थोडीफार अडथळे सोडले तर सर्व वाहने शिस्तीत जात होती. या रस्त्यावरून रांजनोली जवळील गावात सायकलने कामावर निघालेली मोजकी मंडळी दिसत असतात. गोवेगावात एक चार चाकी अश्वशक्तीधारी वाहन उजवीकडे वळण्याची वाट पाहत होते. मात्र त्याला वाट मिळेपर्यंत त्याच्या मागे इतर वाहनांची चांगलीच कोंडी झाली होती. त्या कोंडीतून श्विनने मात्र मार्ग काढला.

नाशिक ठाणे महामार्गाला लागताच शिर्डीला जाणारे पदयात्री दिसू लागले. ओवळीपुढील उताराच्या बाजूला असलेल्या तळ्यापाशी मला नेहमीप्रमाणे थांबायचे होते. पण श्विनने मला ती संधी दिली नाही. पुढील रविवारच्या DCC राइडसंदर्भात माझे विचारचक्र सुरु असताना श्विनने तो उतार कधी पार केला हे मला कळलेही नाही. मी भानावर येईतो मानकोली नाका आला होता.

श्विनचा रागरंग बघून मी मानकोलीलाही न थांबता पुढे निघालो. श्विनला लय सापडली होती. मग मीही तिचे मन मोडले नाही. खारेगाव टोलनाका येताच घसा ओला करण्याचे निमित्त करत मी क्षणभर श्विनला थांबवले तोपर्यंत २३ किमी अंतर पार झाले होते.

त्या क्षणभर विश्रांतीनंतर तर श्विनचा जोर आणखीच वाढला. माजीवाडा नाक्याला फ्लॉवर व्हॅलीशेजारील सेवा रस्ता न घेता श्विनने मुख्य मार्ग पकडला. मिळालेला वेग कायम ठेवत नितीन कंपनी चौकात श्विन पोचली. तेथे मात्र RTO कडील सेवा रस्ता पकडून श्विनने रघुनाथनगर रस्त्याकडे कूच केले. पुढे तिनचाकी प्रवासी वाहने आणि इतर अश्वशक्तीधारी वाहने एकमेकांची वाट अडवत रणांगणात अडकल्याचे दिसताच श्विनने ठाणे क्लब कडून LBS मार्ग गाठला.


  • #tjsbbank

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

DCC Ride to Lonad Caves

#dombivlicyclingclub (DCC) ची सदस्यसंख्या आणि सदस्यांचा उत्साह शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. कोणत्याही घटकाला उत्साह वाढत असताना एक निश्चित कार्यक्रम/ ध्येय वेळेनुसार मिळत गेले तर ते पोषक ठरते. याच उद्देशाने DCC ची रविवारची राइड ठरलेलीच.

मात्र इतक्यावर समाधान मानतील तर ते DCC सदस्य कसले? यासाठी मध्यम आणि लांब पल्ल्याच्या सायकल राइड हव्यातच. आज १५ किमी अंतरावरील लोनाड जवळील अंदाजे ५ व्या शतकातील बौद्ध लेणी आणि लोनाड गावातील प्राचीन शिवमंदिर पाहायला जायचे ठरले.
नेहमीप्रमाणे मिलापनगर येथील गणेशमंदिर येथे DCC सदस्य जमले. तेथे सर्व नवीन आणि जुने सदस्यांची ओळख झाल्यावर दोन गट करायचे ठरले. मिलापनगर येथील ३१ जणांची उपस्थिती DCC ची ताकद दर्शवत होती. प्रत्यक्षात पुढे आणखी ४ जण सामील झाल्याने आज ३५ जण DCC राइडला हजर होते. दोन गटांपैकी एक गट डोंबिवली मध्ये राइड करणार होता, तर दुसरा गट ठरल्याप्रमाणे लोनाडला जायला सज्ज झाला.

लोनाडला जाणार गट पुढे निघाला. @ritesh savla ह्या गटाचे नेतृत्व करत होता. @pushkar joshi, @sanjay datye, @nayana agharkar,@jayshree pandit, @meghesh kulkarni (बाहुबली), @vikas nagada, @anand parvate, @arnav kulkarni, @dev gaikwad, ज्यू. बिराजदार आणि इतर यांच्या पाठोपाठ मी सर्वात शेवटी जात होतो. वाटेत @rohan sakhare, @durgesh zipre आणि त्याचा मुलगा सामील झाले.

कल्याण शिळ रस्त्याने पत्री पूल, दुर्गाडी किल्ला, दुर्गाडी चौक, आधारवाडी मार्गे आम्ही गांधारी पूल गाठला. येथून रस्ता अरुंद होत असला तरी वर्दळ कमी असल्याने आरामात  सायकलिंग करता येत होते. गार वारा श्रमाची जाणीव होऊ देत नव्हता. दोन्हीकडे हिरवळ असल्याने डोळेही सुखावत होते.

#kalyancyclist आज पिसे डॅमला जाणार होते. ते परत येत असताना आम्हाला दिसले. DCC आणि kalyan सायकलिस्टस दोघांचा मार्ग बराचसा सारखाच होता. सावड गावपुढील चौकात उजवीकडे साधारण ६ किमी वर पिसे डॅम, तर सावड गावपुढील त्याच चौकात डावीकडे ३ किमी वर लोणाड जवळील लेणी आहेत. कल्याण सायकलिस्टच्या ग्रुपमधील @roy sachin quadros























, सचिन आणि इतर सायकलिस्ट परत येत असताना आम्ही सावड गावापर्यंत पोचत होतो.

सावड नाक्याहून डावीकडे वळणाऱ्या रस्त्याला आम्ही लागलो, तेथे वृक्षसंवर्धनाचे काम सुरु होते. पुष्करला त्यांचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. सावड नाक्याहून जाताना लोणाड लेणी रस्त्याच्या उजव्या बाजूला आहेत. वळेपर्यंत लेण्यांकडे जाणारा चढ कळत नाही. मात्र मला त्या चढाची, अरुंद आणि मातीच्या रस्त्याची कल्पना असल्याने मी श्विनचे गियर टप्प्याटप्प्याने बदलले. पहिला चढ फार तीव्र नसल्याने ३७ वरून ३६ मग ३५ आणि शेवटी २५ (२*५) चा गियर टाकत श्विन पूढे सरकली. मात्र पुढे पूढे चढ अधिकच तीव्र होऊ लागताच गियर २४, २३, २२ टप्प्याटप्प्याने पण पटापट बदलले. मात्र तरीही चढ तीव्र वाटू लागल्याने अखेरीस १२ च्या गियरने श्विनने सर्व चढ पार केला. चढ संपताच पुन्हा टप्प्याटप्प्याने गियर २५ वर आणून ठेवले.

लेण्यांपाशी पोचल्यावर तेथील टाक्यातील पाणी काढून चेहऱ्यावर मारले. चढ चढ़तानाचे सर्व श्रम लगोलग नाहीसे झाले. DCC चे सर्व सदस्य खुश झाले होते. लेण्यांपाशी गप्पा, थोडेफार खाणे आणि फोटोशूट करत सर्वजण विसावा घेत होते.

जानवल ह्या गावाजवळील टेकडी वर साधारण ५ व्या शतकात दगडात कोरलेली ही हिंदू आणि बौद्ध लेण्यात बुद्धांच्या पूर्वजन्मातील जातककथांपैकी वेषांतर जातक यावर आधारित कलाकृतीअसून सोबत हरीती आणि पंचिका या देवता आहेत. कालांतराने ह्या बौद्ध लेण्यांना हिंदू देवालयाचे स्वरूप देत येथे खंडेश्वरी आणि महिषसुरमर्दिनी यांचाही समावेश केला गेला.

नालासोपारा येथून जुन्नर या सातवाहन राजवटीतील राजधानीकडे जाणारे बौद्ध साधू वाटेत या लेण्यांमध्ये मुक्काम करीत असत. येथील चैत्यगृह (प्रशस्त प्रार्थना दालन) हे प्रमुख दालन असून इतर दोन- तीन अर्धवट काम झालेली दालनेही येथे आहेत.

भूस्खलनामुळे बाहेरील व्हरांड्याचे नुकसान झाले असून चार खांबांपैकी (पिलर) एका खांबांची हानी झाली आहे. इतरही तीन खांब फार चांगल्या अवस्थेत नाहीत. लेण्यांच्या पायाखालील अवैध खोदकामामुळेही या वारशाची हानी होत आहे.

येथे विसावा घेऊन आणि दुर्गेशच्या फोल्डिंग सायकलचे प्रात्यक्षिक पाहून सर्वजण लोणाड गावातील शिवमंदिराकडे निघाले. लोणाड गावात शिरता शिरता पुष्कर आणि मेघेश याना मातीच्या खापऱ्या दिसल्या. भाकरीची चव वाढवणाऱ्या या खापऱ्या बनवण्याची कार्यपद्धती समजावून घेत दोघंही पुढे आले, तोपर्यंत इतर सर्वजण गावातील शिवमंदिरापाशी पोचले होते. हे शिवमंदिर १ ल्या शतकातील असून इथली संस्कृती किती प्राचीन आहे याचा पुरावा देत तग धरून उभे आहे. मंदिर बाहेरून सध्या ढासळत्या अवस्थेत असले तरी आतील गाभारा सुरक्षित असून येथे नेमाने पूजा अर्चा होत असते. मंदिरामागील विस्तीर्ण तलाव परिसराची शोभा वाढवत आहे.

सर्वजण मंदिरापाशी गप्पा मारत असता आनंद मात्र पुरातन शिलालेख शोधण्यासाठी बेचैन होता. मंदिराहुन परत येताना आम्ही परत जानवलच्या दिशेने मागे न जाता सोनाळे बापगाव रस्त्याकडे पुढे निघालो. बापगाव येथील चौकात उजवी दिशा घेत गंधारी पुलाच्या दिशेने आमची फौज दौड करू लागली. पुष्कर आणि देव यांनी सकाळी एक महत्वाचे ठिकाण येताना थांबण्यासाठी हेरून ठेवले होते. त्यामुळे तिथे थांबणे भाग होते. सर्वजण आनंदाने तेथे थांबले तोपर्यंत सूर्य हजेरी जाणवू देऊ लागला होता. देव आणि पुष्कर यांनी हेरून ठेवलेल्या निराकेंद्रावर सर्वांनी निरापान केले आणि घराकडे कूच केले.
#cycle2work #tjsbbank #saveoursahyadri #cyclingzens #bikeport

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

Saturday saturday #kartikchallange

Indian  National date Saur Kartik 13, Shake 1939
हिंदू तिथी कार्तिकी पोर्णिमा (शुक्ल १५), शके १९३९
ख्रिस्ती तारीख नोव्हेंबर ४, ग्रेगोरियन शके २०१७.

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर हे ग्रेगोरियन ख्रिस्ती कॅलेंडर प्रमाणेच सौर कॅलेंडर असल्याने या दोनही कॅलेंडरवर्षात ३६५ दिवसांचे एक वर्ष असून यातही दिनांक म्हणजे तारीख असते. तसेच या दोन्ही कॅलेंडरमध्ये चार वर्षांनी ३६६ दिवसांचे लीप वर्ष असते.
मात्र हिंदू कॅलेंडर हे मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे चांद्र कॅलेंडर असल्याने ह्या दोनही कॅलेंडरमध्ये तिथी असून वर्ष साधारण ३५४ दिवसांचे असते. चांद्र- सौर कालगणनेचा मेळ घालण्यासाठी हिंदू वर्षात चार वर्षात एकदा अधिक महिना जोडला जातो. मात्र मुस्लिम कॅलेंडरमध्ये पृथीच्या सूर्याभोवती फिरण्याचा विचार न केल्याने ते सौर कॅलेंडरपेक्षा दर वर्षी मागेमागे पडत जाते.

आज चांद्र कालगणनेप्रमाणे पौर्णिमेचा दिवस! त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरू नानक जयंतीनिमित्त सुट्टी असल्याने आज #cycle2work करता येणार नव्हते. श्विनने नेवाळी फाट्यापर्यंत जायचे ठरवले होते. गार हवा श्विनच्या उत्साहात भर घालत होती. मानपाडा दीनदयाळ रास्ता- टंडन रस्ता-भोपर-शनिमंदिरमार्गे कल्याण शिळ रस्त्यावर प्रवेश करताच श्विनने वेग वाढवला. नेवाळी फाट्यापर्यंत जाऊन घरी परतायचे तर २८ किमी ची रपेट होणार होती. पण साधारण ४० किमी झाले तर आज एक महत्वाचा टप्पा पूर्ण होऊ शकणार होता. मग श्विनने नेवाळी फाटा पार करून अंबरनाथ चेकपोस्ट पर्यंत जायचे ठरवले. एव्हाना श्विनचा उत्साह चांगलाच वाढला होता.
अंबरनाथ औद्योगिक परिसरातील कृष्ण पॅलेस हॉटेलजवळ जाताच श्विनने अंदाजे २० किमी म्हणजे आजच्या उद्दिष्टाच्या निम्मे अंतर पार केले होते. तेथून परत फिरण्यासाठी श्विनने इंग्रजी U आकारात वळण घेतले आणि आज जो टप्पा पार करायचा ठरवला होता तो किती दूर आहे याचा अंदाज घेतला. ओह! त्यासाठी आज एकंदर ४० नव्हे तर ४५ किमी अंतर पार करणे जरुरीचे होते. परत फिरताना अजून २५ किमी अंतर बाकी होते. पण तरी श्विन परत फिरली आणि मानपाडा रस्त्याऐवजी कल्याणच्या दिशेने पुढे जाऊन आजचे उद्दिष्ट पूर्ण करायचे ठरवले.
 परतीच्या मार्गात नेवाळी फाटा येताच मी श्विनला थांबवले आणि पृथ्वीवरील अमृताचा आस्वाद घेतला. तोपर्यंत २५ किमी रपेट झाली असली तरी २० किमी अंतर बाकी होते.

नेवाळी फाट्याहुन पुन्हा सुरुवात करताना धीम्या गतीने चाल करीत श्विनने हळूहळू वेग वाढवला. काटई नाक्याला श्विनने डोंबिवली च्या दिशेने वळण घेतले. मात्र मानपाडा रस्ता, पेंढारकर कॉलेज कडे वळणारा रस्ता, टाटा पॉवर रस्ता या सर्वांकडे दुर्लक्ष करीत श्विनने पत्रिपुल गाठला. तेथून ९० फूट रस्ता- नवीन कल्याण रस्ता मार्गाने श्विन घारडा सर्कलकडे वळली. पुढील रस्ता शहरातून असला तरी संध्याकाळसारखी वर्दळ आत्ता असणार नव्हती. त्यामुळे सहजपणे मार्ग कापत श्विनने आज ४६ किमी अंतर पार करून घर गाठले तेव्हा ख्रिस्ती वर्ष २०१७ मधील ८००० किमी अंतर पार झाले होते.


#tjsbbank #dombivlicyclingclub #cyclingzens #saveoursahyadri

शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

"झाले मोकळे आकाश"



शनिवार असल्यामुळे आज ठाण्याला जायचे नव्हते. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी नेवाळी फाट्यापर्यंत जाऊन यायचे ठरवले होते. घराबाहेर पाहीले तर 'नभ मेघांनी आक्रमिले' हि परिस्थिती स्पष्ट दिसत होती. तरीही आज ऑफिसला जायचे नसल्याने बेफिकिरीनेच निघालो. श्विन तयारच होती.
सोसायटीबाहेर पडल्याबरोबर के डि एम सी महानगरपालिकेच्या मेहेरबानीमुळे खड्ड्यांमध्ये काही जागी शिल्लक राहिलेले रस्त्याचे तुकडे दिसू लागले. श्विन मात्र तेथून सहीसलामत बाहेर पडली. एव्हाना "तारांगण सर्व हिराकूनी गेले" होते. श्रावणा ऐवजी पुन्हा आषाढाचे साम्राज्य असल्यासारखे वाटत होते. श्विन ला त्याचे काहीही सोयरसुतक नव्हते.
के डि एम सी च्या प्रयत्नाने तयार झालेली पेंढारकर कॉलेज जवळील वीतभर ते मीटरभर लांब रुंद तळ्यांची मालिका पार करून श्विन कल्याण- शिळ रस्त्याला लागली. तोपर्यंत अवकाशातील मेघांनी श्रावण धारा सुरु केल्या नव्हत्या. कल्याण शिळ रस्त्याला लागल्यावर  मला आजूबाजूला लपायला जागा नाही असे दिसताच मात्र त्यांनी आक्रमण सुरु केले. पण इतक्यात मला आणि श्विनला एक आडोसा मिळालाच. वर्षाराणी रंगात येण्याच्या खुणा दिसू लागल्याने मी मानपाडा रस्त्याने परत घरी जायचे ठरवले. श्विन माझ्यावर नाराजच झाली होती
मात्र मी कल्याण शिळ रस्त्यावरून मानपाडा रस्त्याला वळण्याआधीच तेथून डोंबिवली सायकल क्लब चे तीन शिलेदार शिळ रस्त्याकडे वळताना दिसले. त्यात एक अर्णव कुलकर्णी होता. अर्णव होता म्हणजे गंधार डोंबिवलीकर असणारच
मग माझ्याकडे दुर्लक्ष करीत श्विन त्यांच्यामागे सुसाट निघाली. मला काही कळायच्या आत श्विन ने त्यांना गाठलेही. अर्णव आणि गंधार बरोबर आज संजय दात्येही होते. एव्हाना पाऊस कमी झाला असला तरी : 'मुसलाधार बारिश की संभावना' कायम होती. पण आता मात्र मी वरुणराजाचे आव्हान स्वीकारायचे ठरवले. शिळ फाट्याऐवजी नेवाळी फाटा येथे जाण्याविषयी विनाविलंब एकमत झाले आणि आम्ही बदलापूर पाइपलाइन रस्त्याला वळलो. थोड्याच वेळात "घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा" असा अनुभव येऊ लागला. नेवाळी फाटा येईपर्यंत मनसोक्त भिजून झाल्यामुळे एक कप चहा लागू झाला होता. चहा तर फक्कडच होता. चहा साठी घेतलेली विश्रांती संपेपर्यत वर्षाराणीही शांत होती.
परतीच्या प्रवासासाठी श्विनची तयारी नव्हती. पण आता मात्र मी श्विनहट्ट न पुरवण्याचे ठरवले.
परतीच्या प्रवासासाठी आम्ही पुन्हा निघालो आणि वर्षाराणी पुन्हा आमच्या स्वागताला हजर झाली. मात्र आधीच पुरेसे भिजल्यामुळे आता आम्ही तयारच होतो. आमच्या मानवशक्तिधारित वाहनांना वर्षा राणी आणि वरुणराज अडथळा आणू शकत नव्हते. मात्र काही अंतरावरच एक अश्वशक्तीधारी वाहन मात्र बंद पडले होते. मग त्या वाहनाला धक्का मारण्याचे प्रयत्न करून आम्ही पुढे निघालो.
परत येताना आम्ही डोंबिवली सायकल क्लब मधील सदस्यांना मोहविणाऱ्या उंबार्ली रस्त्याने आलो. तेथून येताना शिळ फाट्याकडे मुंब्रा डोंगररांगांवर अजूनही काळे ढग राज्य करताना दिसत होते. मात्र उजवीकडे सोनारपाडा दावडी गावाच्या दिशेने सूर्याची सोनेरी किरणे दिसू लागली होती.
गंधार म्हणजे हालता बोलता भाषाकोष. मग मी मिळालेली संधी साधायचे ठरवले. संस्कृत पासून प्राकृत, प्राकृतापासून बोली अश्या भाषा आणि नागरी पासून देवनागरी आणि देवनागरी पासून मोडि अश्या लिप्या यासंबंधी गांधारकडून माहिती घेत श्विनसह मी घरी परतलो तेव्हा मात्र अंधाराचे जाळे फिटून आकाश मोकळे झाले होते

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...