रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

(श्विनला भेटलेली) माणदेशी माणसं : डोंबिवली पणजी सायकलसफर लेख ९

महाबळेश्वर येथे उगम पावणारी वेण्णा आणि भारताच्या दक्षिण भागातील प्रमुख नदी कृष्णा यांचा संगम माहुली जवळ होतो. त्या संगमाजवळ अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी एक शहर साधारण सोळाव्या शतकात उदयास आले. या नद्यांच्या सभोवती असलेल्या सात ताऱ्यांच्या (टेकड्यांच्या) मुळे या शहराला 'सातारा' हे नाव मिळाले. औरंगजेबाच्या तावडीतून शाहू महाराजांची सुटका झाल्यावर त्यांचा राज्याभिषेक अजिंक्यतारा येथे झाला आणि मग मराठा साम्राज्याचा अस्त होईपर्यंत सातारा हीच मराठ्यांची राजधानी होती. सातारा हे श्विनचेही आजोळ. मात्र आजोबा पुण्यालाच स्थायिक झाल्यामुळे सातारा येथे जाणेयेणे फार नव्हते. काही वर्षांपूर्वी ते घरही दान केले गेले. मात्र ३२ वर्षांपूर्वी सातारा येथे राहिल्याच्या आठवणी अजूनही ताज्या असल्याने सातारा शहराशी श्विनचे भावनिक नाते आजही जोडलेले होते.

डोंबिवली पणजी सायकलसफरीदरम्यान सातारा येथे पोचताच श्विनला आंतरिक समाधान वाटत होते. शहरात शिरणारा पहिलाच रस्ता श्विन आणि स्कॉटने धरला. तो रस्ता अरुंद, वळणावळणाचा असल्याने स्कॉट मागे पडू लागली होती. वाटेत दोन रस्ते फुटत असत तेथे श्विन कोणत्या रस्त्याला जायचंय याची चौकशी करून स्कॉट येईपर्यंत थांबत असे. एका चौकात डावीकडे वळून श्विनने चौकशी केली. तेथे एक केळेवाली होती. स्कॉट दिसू लागल्यावर श्विनने पुढे जायला सुरुवात केली. पाठोपाठ स्कॉटने डावे वळण घेताच त्या केळेवालीने स्कॉटला हाक मारून केळी घ्यायला सांगितले. ती केळेवाली केळी का देत आहे हे स्कॉटला समजेना. स्कॉटने श्विनला तेथे थांबलेले पाहिले होते. स्कॉटला वाटले की केळेवाली श्विन अथवा साताऱ्यात ज्यांच्याकडे मुक्काम आहे त्या शंकर बागडे ह्यांच्या ओळखीची असावी. मात्र स्कॉटकडे सॅक नसल्याने स्कॉटने केळेवालीला तसे सांगितले. त्यावर ती केळेवाली म्हणाली की मग केळी खाऊन जा. केळेवालीचा आग्रह स्कॉटला अचंबित करत होता. स्कॉटने त्या केळेवालीला सांगितले की, 'माझ्या बरोबरील सहकारी पुढे गेले आहेत.'  केळेवाली चा आग्रह सुरु होता, 'त्यांनाही मागे बोलवून घ्या आणि दोघांनीही केळी घेऊन जा किंवा खाऊन तरी जा.' या सर्व घटनेचा श्विनला मात्र पत्ता नव्हता. स्कॉट मागे का येत नाहीये याचा विचार करत श्विन मात्र पुढे थोड्या अंतरावर थांबली होती. अखेरीस 'आम्ही थोड्या वेळात परत येऊन केळी घेतो,' असे केळेवालीला सांगून स्कॉट पुढे निघाली. श्विन स्कॉटला भेटल्यावर स्कॉटने सर्व हकीकत श्विनला सांगितली. एका अनोळखी केळेवालीने केलेला आग्रह, त्यातील आपुलकी स्कॉटला आश्चर्यचकित करत होता. श्विनला मात्र सायकलसफरीदरम्यान अशी आपुलकी अनेकवेळा अनुभवास आली होती. तरीही त्या केळेवालीचा इतका आग्रह श्विनलाही स्तिमित करत होता. सातारा शहरातील पहिलेच स्वागत तेही अनोळखी केळेवालीकडून अश्या प्रकारे झाल्यावर श्विन आणि स्कॉट खूपच आनंदी झाले होते. 

तेथून थोड्याच वेळात श्विन आणि स्कॉट TJSB बँकेच्या सातारा शाखेत पोचले. आजचा मुक्काम बँकेतील सहकारी शंकर बागडे यांच्या घरी होणार होता. मात्र शंकरला काही कामानिमित्त शहराबाहेर जावे लागले होते. दरम्यान शाखाधिकारी सचिन वनारसे, संतोष शेलार आणि इतर सहकारी यांनी श्विन आणि स्कॉटचे यथोचित स्वागत केले. सातारा शाखेचे कामकाजही सुरु होते. त्यामुळे थोडा वेळ घालवण्यासाठी श्विन आणि बाहेर पडले. इतक्यात ठाणे येथील जितेंद्र वैद्य याने सातारा येथे डॉ श्रोत्री यांना भेटण्याचा अनेकवेळा केलेला आग्रह श्विनला आठवला. श्विनने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर थोड्या वेळात क्लिनिकसाठी निघणार असल्याने थोड्या वेळात पुन्हा फोन करण्याचे ठरले. काहीवेळ खादाडी करून श्विन स्कॉट TJSB बँकेच्या सातारा शाखेत येऊन बसले. दिवसभरातील WA मेसेज, FB पोस्ट पाहून काही वेळ गेला. अर्थात त्यामुळे आणि दिवसभर काढलेले फोटो यामुळे श्विनचा फोन डिस्चार्ज झाला. शंकर बागडे यायला मात्र बराच वेळ लागला. तो आज बराच प्रवास करून आला होता मात्र तरीही तो प्रचंड उत्साहात होता. त्याने श्विन स्कॉटचे प्रेमभराने स्वागत केले. शंकर एका सहकाऱ्याबरोबर दुचाकीवर आणि पाठोपाठ त्याला गाठत श्विन स्कॉट अशी वरात सातारच्या रस्त्यातून निघाली. 

घरी पोचल्यावर श्वास थांबलेल्या भ्रमणध्वनीला प्राणवायू लावला. स्कॉट श्विन थोड्या वेळात ताजेतवाने होईपर्यंत त्या भ्रमणध्वनीला धुगधुगी आली होती. श्विनने भ्रमणध्वनी पाहिला असता त्यात जितेंद्र वैद्य आणि डॉ श्रोत्री यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. श्विनने लगबगीने दोघांना संपर्क केला. तेव्हा मात्र भ्रमणध्वनीचा श्वास थांबला होता त्यादरम्यान झालेला गोंधळ श्विनला समजला. डॉक्टर श्रोत्री आणखी तीन सहकाऱ्यांना घेऊन श्विनची वाट पाहत एके ठिकाणी थांबले होते आणि ते कळविण्यासाठी डॉक्टर श्विनला संपर्क करण्याचा असंख्य वेळा प्रयत्न करत होते. ते तीन सहकारी म्हणजे युरोपमधील ट्रायथलॉनमध्ये सामील झालेले तरुण होते. मुख्य म्हणजे ते सर्वजण जिथे वाट पाहत थांबले होते ते राधिका हॉटेल आणि श्विन स्कॉट जिथे शंकर बागडे यांची वाट पाहत थांबले होते ती TJSB बँकेची शाखा अक्षरशः हाकेच्या अंतरावर होते. मात्र बेशुद्ध पडलेल्या भ्रमणध्वनीमुळे आमचा संपर्क मात्र होऊ शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी चहापानासाठी डॉकटरांच्या घरी जायचे निमंत्रण मात्र श्विन आणि स्कॉटने त्वरित स्वीकारले.

शंकर बागडे मूळ सातारकरच. मात्र त्याचे सर्व कुटुंबीय डोंबिवली येथे राहत होते. शंकर मात्र नोकरीनिमित्त एकटाच सातारा येथे दोन तीन वर्ष राहत होता. जेवणासाठी आम्ही बाहेर निघालो. एका घरगुती खानावळी मध्ये आम्ही शिरलो. वाटेत शंकर त्या खानावळीची स्तुती करत होता. सुपणेकर खानावळीत शिरल्या शिरल्याच ती स्तुती योग्य असल्याचे जाणवू लागले. घरी आलेल्या पाहुण्याप्रमाणेच सर्वांचे स्वागत झालेले. लग्नाच्या पंगतीप्रमाणेच समोरासमोरील रांगेत टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. आम्ही जेवावयास बसल्यावर लग्नात वाढतात त्याप्रमाणे एकेक पदार्थ वाढला जाऊ लागला. त्याबरोबर भूकही चाळवू लागली होती. आमचे उदरभरण सुरु झाले. त्याबरोबर पुन्हा पुन्हा एकेक पदार्थ आग्रहपूर्वक विचारला जाऊ लागला. प्रत्येक पदार्थ ओळीने येत होता. जेवणही एवढे चविष्ट होते की पोट भरलेला माणूसही पुन्हा जेवायला बसेल. सर्वांचे जेवण अत्यंत समाधानाने झाले आणि आम्ही परत शंकराच्या घरी परतलो.

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर जाग आली. आज कोल्हापूर येथे पोचायचे होते. मात्र त्या आधी डॉ श्रोत्रींच्या घरी जायचे होते. श्विन आणि स्कॉट डॉकटरांच्या घरी जाताच डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीने उत्साहाने श्विन स्कॉटचे स्वागत केले. डॉक्टरांशी गप्पा मारताना जितेंद्र वैद्य डॉक्टरांबद्दल भरभरून का बोलत होता हे समजत होते. डॉक्टर, त्यांची पत्नी यांच्याचबरोबर डोकटरांचे भाऊ आणि वहिनीही गप्पांमध्ये सामील झाले. गप्पा छानच रंगत होत्या. डॉक्टर श्रोत्री आणि कुटुंबियांशी फार जुना स्नेह असल्याचे श्विन स्कॉटला वाटू लागले होते. कोल्हापूर पर्यंत जायचे असल्याने फार वेळ थांबायला वेळ नव्हता. डॉक्टर आणि कुटुंबियांचा निरोप घेता घेता त्यांची भेट जपून ठेवण्यासाठी छायाचित्र टिपले गेले. 



सकाळच्या त्या प्रसन्न वेळी सातारा शहर सोडत असताना श्विन आणि स्कॉटला आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत सातारकरांनी दिलेले प्रेम आठवत होते. अनोळखी केळेवालीने भेट म्हणून देऊ केलेली केळी, त्यामागची तिची अजिजी हा अनुभव वर्णन करायला शब्द अपुरेच आहेत. त्याशिवाय TJSB बँकेतील सातारा शाखेचे कर्मचारी, शंकर बागडे, डॉ संदीप श्रोत्री आणि कुटुंबीय यांनी केलेले स्वागत ही ठेव न विसरण्याजोगीच!


बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

मैत्र (डोंबिवली पणजी सायकलसफर लेख ८)

पुणे शहराकडून साताराकडे जाताना राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या नऱ्हे येथे श्विन आणि स्कॉटचा रात्रीचा मुक्काम होता. शांत झोप झाल्यावर दोघांनाही पहाटे ब्राह्म मुहूर्तावरच जाग आली. सूर्य ढगांच्या दुलईतून बाहेर यायला अवधी होता. हवेतला गारठा जाणवत होता. त्यामुळे श्विन आणि स्कॉट थोडे आरामातच तयार झाले. पहाटेच्या निरव शांततेचा भंग न करता दोघंही संकुलाबाहेर पडले, तेव्हा सन युनिव्हर्स ह्या संकुलामध्ये अजून सामसूम होती.  संकुलाबाहेर लगेचच कात्रजमार्गे साताऱ्याकडे जाणारा प्रशस्त महामार्ग सुरु होतो. श्विन आणि स्कॉटने संथ गतीने सुरुवात करत त्या प्रशस्त महामार्गाची डावी बाजू पकडली. दोघेही आजूबाजूचा परिसर न्याहाळत पुढे जात होते.





स्कॉट थोडी पुढे जात असताना श्विन मात्र एका वळणावर थबकली होती. डावीकडे दिसणारा प्रशस्त तलाव लक्ष वेधून घेत होता



श्विनची नजर तलावाकडे खिळलेली असताना स्कॉट मात्र बरीच पुढे गेली होती. श्विन भानावर आल्यावर स्कॉटला गाठण्यासाठी श्विनने गती वाढवली. दरम्यान स्कॉटने विश्रांती घेतल्यामुळे श्विनने स्कॉटला लवकरच गाठले. आत्तापर्यंत थोडी राइड झाल्यामुळे पाय मोकळे झाले होते त्यामुळे स्कॉटने गती वाढवायचे ठरवले. मात्र बराच वेळ प्रयत्न करूनही गती विशेष वाढत नव्हती. टायरमधील हवा, ब्रेक हे दोन्ही चाचपून पाहिले तर त्यात काहीच दोष दिसत नव्हता. एवढ्यात सहजपणे दोघांनी मागे वळून पाहिले मात्र आणि गती न वाढण्याचे कारण दोघांनाही लक्षात आले. हा रस्ता पेडलिंग करताना जाणवत नसला तरी चढाचा होता. चढाची तीव्रता पेडलिंग करताना डोळ्यांना दिसत नव्हती, तरी तो चढ बराच लांबवर पसरलेला होता.

थोड्याच वेळात कात्रज बोगदा दिसू लागला. श्विन आणि स्कॉट थोडा वेळ थबकले असतानाच मागून आणखी एक सायकलस्वार त्यांच्या जवळ आला. ह्या बोगद्यानंतर चिंचवड येथील मित्र मंडळी भेटणार होती. ह्या सायकलस्वराचा वेष पाहताच श्विनला हा सायकलस्वार त्याच मित्रमंडळीमधील असल्याचे लक्षात आले. तो होता श्रीकांत खटके. आमची भेट झाल्याची वार्ता श्रीकांतने लगेचच इतरांना कळवली. श्विन स्कॉटला त्याने पुढे जायला सांगितले.





समोर दिसणारा कात्रज बोगदा हा लांबूनही लक्ष वेधत होता. बोगद्याच्या वर असणारा डोंगर अवाढव्य असले तरी एखाद्या स्थितप्रज्ञ योग्यासमान भासत होता. तेथून जाणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी त्याने हलकेच वाट उपलब्ध करून दिली होती. कात्रज बोगदा हा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांना जोडणाऱ्या सुवर्ण चतुर्भुज रस्त्याचा भाग होता. हा बोगदा १२२३ मीटर इतका लांब असून येण्या जाण्यासाठी वेगवेगळे बोगदे आहेत. आणि बोगद्यातील रस्ताही रुंद आहे. यातून केलेली राइड हा एक विलक्षण अनुभव होता.



कात्रज बोगदा पार करून पुढे गेल्यावर पुण्याकडून येणारा दुसरा रस्ता मिळतो. त्या ठिकाणी चिंचवड येथील मित्रमंडळी भेटणार होती. श्रीकांत मागे राहिला होता. बोगदा पार केल्यावर वेग वाढला असला तरी श्विनचे लक्ष दुसरा रस्ता कुठे येऊन मिळतोय याकडे होते. मात्र श्विनपेक्षाही चिंचवड येथील सुनील पाटील आणि सहकारी अधिक सावध होते. श्विनला समोरून येताना पाहताच त्यांनी उत्साहाने स्वागत केले. सुनील पाटील बरोबर संतोष कांड,राजेंद्र दोशी, अजय मते, अतुल माने आणि राहुल शहा ही पूर्ण टीम श्विन आणि स्कॉटला भेटण्यासाठी आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा द्यायला आले होते. पाठोपाठ श्रीकांत ही तेथे पोचला. इतके आपुलकीचे स्वागत पाहून स्कॉटही भारावून गेली. श्विन स्कॉटशी सर्वांशी ओळखपरेड झाली आणि लगेचच सर्वजण चहासाठी वळले. चहाबरोबर बिस्किटांचाही फन्ना उडत होता. सर्वजण हास्यविनोदात दंग झाले होते. भेटीची तृप्तता थोड्या वेळात होणे शक्य नसले तरी श्विन स्कॉटला पुढील पल्ला गाठायचे असल्याचे भान सर्वानाच होते. श्विन आणि स्कॉट ला देण्यासाठी आणलेला खाऊ संतोष कांडने दिला. त्याहूनही आनंदाची गोष्ट ही होती की संतोष, राजेंद्र आणि अजय श्विन आणि स्कॉट यांना आणखी थोडावेळ साथ करणार होते.  सुनील, अतुल माने व राहुल शहा मात्र परत फिरणार होते. त्यामुळे भेटीची आठवण टिपण्यासाठी सर्वांचे समुह छायाचित्र घेेण्यात आले.



परत जाणाऱ्या सवंगड्यांचा निरोप घेऊन स्कॉट श्विन सह संतोष, अजय, राजेंद्र पुढे निघाले. आता सगळ्यांनीच वेग घेतला होता. कात्रज बोगद्याआधी असलेल्या कमी वेगाची पूर्ण भरपाई आता होत होती. एकमेकांशी गप्पा मारत पुढील रस्ता पटापट संपत होता. संतोष, अजय आणि राजेंद्र एका शिवमंदिराकडे जाणार होते. जाता जाता पुढील रस्त्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या ठिकाणांची माहिती द्यायला ते विसरत नव्हते. तिघांबरोबर जाताना श्विन स्कॉटचा उत्साह आणि वेग वाढत असला तरी थोड्या वेळातच नसरापूर येथे त्यांचाही निरोप घेण्याची वेळ लवकरच आली.

पुढे जात असताना पंढरपूर फाटा येथे असलेली पेशवेकालीन विहीर पाहण्याची सूचना ह्या मित्रांनी केली होती. त्या विहिरीविषयी श्विनची उत्सुकता वाढली होती.

वाटेत धांगवडी गावाजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मंदिर श्विनला दिसले. ते पाहताच श्विनला त्याविषयी कुतूहल वाटू लागले. धांगवडी हे भोर तालुक्यातील एक छोटेसे गाव. जेमतेम ३०० च्या आसपास कुटुंबे असलेल्या ह्या गावाची लोकवस्ती साधारण १५०० जणांची आहे. मंदिराजवळ जाऊन पहिले असता ते पांडवकालीन अडबलनाथ मंदिर असल्याचे समजले. मंदिर पुरातन असल्याचे दुरूनच समजत होते. आजूबाजूला मात्र कोणी दिसत नसले तरी मंदिरातील परिसर स्वच्छ दिसत होता.




या मंदिरामध्ये प्रत्येक रविवारी आरती व पूजा असते. व मंदिरात येणाऱ्या सर्व लोकांसाठी जेवणही असते. तिथे पाण्याची पण सोय आहे. गावची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
मंदिरापाशी घटकाभर थांबून श्विन आणि स्कॉटने दौड पुढे सुरु केली. दोघांनी वेगही छानच पकडला होता. त्याच वेगात पुढे जात असताना शिरवळ गाठले. जठराग्नी पुन्हा एकदा जागृत होत होता. शिरवळ येताच श्विनने वेग आवरला आणि स्कॉट पुढे गेली. सेवा रस्त्याला काही उपहारगृहे होती, मात्र स्कॉटने मुख्य रस्ता सोडला नसल्याने जठराग्नीला आहुती मिळू शकली नाही. शिरवळ मागे पडल्यावर दोघांनी पुन्हा वेग घेतला आणि दोघेही लवकरच पंढरपूर फाटा येथे पोचले. श्विनला पेशवेकालीन विहिरीविषयी उत्सुकता वाटत होती. तेथे पोहोचताच श्विनने जवळपास त्या विहिरीविषयी चौकशी केली. मात्र दुर्दैवाने तेथील कोणालाही तशी माहिती नव्हती. मात्र तेथे काही उपहारगृहे मात्र दिसत होती. लगेचच जठराग्नीला आहुती देण्याचा निर्णय घेऊन श्विन आणि स्कॉट थांबले. तेथील एका छोट्या घरगुती उपहारगृहाकडे दोघांची पावले वळली. विहिरीची तहान पोहे आणि चहावर भागवली. उपहारगृहाचे चालक आपुलकीने चौकशी करत होते. त्याच आपुलकीने बनवल्यामुळे पोहे अधिकच चविष्ट वाटत होते. तृप्त मनाने श्विन स्कॉटने पुढील वाटचाल सुरु केली. पोटोबाची शांती झाल्यामुळे पुन्हा एकदा वेग वाढला होता.

चिंचवड येथील मित्रमंडळींनी पुढील घाट चढण्याआधी उदरभरणासाठी एक ठिकाण सांगून ठेवले होते. घाटाच्या पायथ्याशी जिथे दोन रस्ते सुरु होतात तेथे असलेले ते ठिकाण होते भैरवनाथ मिसळ केंद्र. खरतर भुकेची जाणीव झाली नव्हती, पण घाट चढण्याआधी थोडी विश्रांती घेण्यासाठी श्विन स्कॉट तेथे थांबले. मुंबई पुणे मधील खंडाळा घाट चढण्याची सवय असल्यामुळे पुणे सातारा मधील खंडाळा घाट चढणे सोपे असणार याची श्विन स्कॉटला खात्री होतीच. घाट चढता चढता तीच अनुभूती येत होती. आजूबाजूचा परिसर न्याहाळत दोघेही आरामात घाट चढत होते. दोघांची तयारी इतकी होती की घाट कधी संपला हे कळलेही नाही.

सायकलजगतातील मैत्र ज्योतीने ज्योत लावावी तसे वृद्धिंगत होत असते. दोन चार दिवसांपूर्वीच सुनिल पाटील आणि समूह सायकल फेरीसाठी गेले असताना तेथे भुईंज येथील काही सायकलपटू त्यांना भेटले होते. सुनील पाटील यांनी त्यानांही एका 'काय अप्पा' (व्हाट्स अँप) समूहावर सामील करून घेतले होते. त्या समूहात श्विन स्कॉटची सफर त्यांना समजली होती. त्यामुळे त्यांनी श्विनशी संपर्क साधून भुईंज येथे वाट पाहत असल्याचे कळवले होते. त्यांना भेटायचे असल्याने श्विन स्कॉटही वेगात जात होते. दरम्यान एके ठिकाणी पाणी पिण्यासाठी विश्रांती घेतली असता मागून एका दुचाकीवरून श्विन स्कॉटला एका महिलेने साद घातली. श्विन स्कॉटशी ओळख करतानाच त्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून जात होता. ती होती अपर्णा कुलकर्णी. सायकलवरून जगप्रवासासाठी निघालेल्या वेदांगी कुलकर्णी हिची ती आई होती. अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण जग सायकलद्वारे कवेत घेण्याचा वेदांगीचा उपक्रम खरोखरच साहसी आणि प्रेरणादायी होता. संतोष कांड प्रमाणेच अपर्णा कुलकर्णी सुद्धा मूळ डोंबिवलीकरच. बोलता बोलता अनेक संदर्भ लागत गेले. अपर्णा आणि श्विनची शाळाही एकच होती. जग गोल असल्याची प्रचिती पुन्हा पुन्हा येत होती. वेदांगीबद्दलची काळजी आणि अभिमान अपर्णा कुलकर्णी यांच्या बोलण्यातून जाणवत होता. तिघांनाही किती बोलू आणि किती नाही असे झाले होते. मात्र वेळेची मर्यादाही सगळ्यांनाच माहित होती. एकमेकांचा निरोप घेता घेता कोल्हापूर येथे घरी यायचे आग्रहाचे निमंत्रण अपर्णा यांनी दिले.

दरम्यान भुईंज येथे  योगेश शिर्के आणि दोन सायकलमित्र वाट पाहत होते. श्विन स्कॉटने पुन्हा वेग वाढवला. वाट पाहून भुईंज येथील मित्र फर्लांग दोन फर्लांग पुढे येऊन सेवा रस्त्यावर थांबले होते. मुख्य रस्त्यावरून वेगात चाललेल्या श्विन स्कॉटला त्यांनी पाहिले आणि लगेचच हाक मारली. तिघेही व्यावसायिक होते. दोघे मेडिकल व्यवसायात होते तर तिसरा कपड्याचा व्यापारी होता. आपला व्यवसाय बाजूला ठेवून तिघेही भर उन्हात श्विन स्कॉटची वाट पाहत महामार्गावर येऊन थांबले होते. अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने त्यांनी श्विन स्कॉटचे स्वागत केले. त्यांचा जेवणाचा आग्रह न स्वीकारणे कठीणच होते. मात्र भेटीची तृप्तताही मोठी होती. त्यांच्या विनंतीला मान देत श्विन स्कॉटने लस्सीचा स्वाद घेतला. त्यांचा निरोप घेत असतानाही तिघांनी अतिशय आग्रहाने ORS चे सहा पॅक देऊ केले. मात्र एवढे पॅक घेता येणे खरोखरच शक्य नसल्याचे श्विन स्कॉटने त्यांना सांगितले. त्यांचा आग्रहही मोडवत नव्हता. त्यामुळे त्यातील तीन पॅक बरोबर घेऊन श्विन स्कॉटने सातारचा रस्ता धरला. दरम्यान आपण वेळेच्या खूपच आधी सातारला पोचणार असल्याचे लक्षात येताच सातारा ऐवजी कराड पर्यंत पुढे जायचा विचार श्विनच्या मनात घोळू लागला होता. स्कॉटनेही सुरुवातीला तयारी दाखवली. मात्र सातारा जवळ येत असताना तीव्र चढ उतार लागू लागल्यावर स्कॉटची दमछाक होऊ लागली. कराडपर्यंत पुन्हा असेच चढ उतार असले तर... ही धास्ती वाटू लागल्याने स्कॉटने विचार बदलला. स्कॉटची गती चांगलीच मंदावली होती. त्यामुळे सातारा शहराचा रस्ता दिसू लागताच ठरल्याप्रमाणे सातारा येथेच मुक्काम करण्याचे ठरले. ठरवलेल्या वेळेपेक्षा स्कॉट आणि श्विन तब्बल तीन तास आधी भोसल्यांची राजधानी सातारा शहरात प्रवेश करत होते. संतोष कांड याने दिलेला खाऊ, चिंचवड येथील सायकलमित्रांबरोबर घेतलेला चहा, अपर्णा कुलकर्णी यांच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा, भुईंज येथील सायकलमित्रांशी जुळलेले मैत्र यांच्यामुळे श्विन स्कॉट तृप्त झाले होते.

कार्तिक सांगता

भारतीय राष्ट्रीय दिनांक कार्तिक ३०, १९४०

भारताचे राष्ट्रीय वर्ष १९४० च्या कार्तिक महिन्याची आज शेवटची म्हणजे ३० तारीख! भारताचे राष्ट्रीय वर्ष म्हणजे हिंदू वर्ष नव्हे बरं का. हिंदू कॅलेंडरमधील कार्तिक महिन्यात तारीख नव्हे तिथी असते. आजची हिंदू तिथी आहे शुक्ल त्रयोदशी (१३). म्हणजे हिंदू कॅलेण्डरचा कार्तिक महिना संपायला अजून १७ तिथी बाकी आहेत.

हिंदू आणि मुस्लिम ही दोन्ही चांद्र वर्ष आहेत (३६० तिथींचे एक वर्ष), तर भारताचे राष्ट्रीय वर्ष हे ख्रिस्ती ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे सौर वर्ष आहे (३६५ दिवसांचे एक वर्ष).

राष्ट्रीय सौर कॅलेंडरमधील कार्तिक महिन्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मुस्लिम चांद्र कॅलेंडरमधील ईद हा दिनविशेष या वर्षी आला होता. त्यानिमित्ताने आज सुट्टी मिळाली होती. त्यामुळे #cycle2work करता येणार नव्हते. मात्र श्विनने सुट्टीची संधी साधायचे ठरवले. घरातून निघताना श्विन आणि स्कॉट शिळ फाट्याला जायचे म्हणून निघाले तेव्हा अद्यापी विष्णुमूहूर्त होता. दिवसातील २४ तासात ३० प्रहर असतात. त्यातील सुर्योदयापूर्वीचे दोन प्रहर म्हणजे ब्राह्म मुहूर्त आणि विष्णू मुहूर्त. अर्थातच विष्णू मुहूर्त असल्याने अजून सूर्योदय झाला नव्हता. श्विन आणि स्कॉटने परिधान केलेले शेपटाकडील लाल दिवे सुरु करत दोघांची वाटचाल संथ गतीने सुरु झाली. शहर साखरझोपेत असल्यामुळे रस्त्यावर विशेष रहदारीही नव्हती. कल्याण शिळ रस्त्याला लागेपर्यंत उजाडणे आवश्यक असल्याने दोघांनीही गती वाढवण्याचा विचार केला नाही. 

सकाळची शांत आणि गार हवा मनाला ताजेतवाने करत होती. मानपाडा रस्त्यामार्गे कल्याण शिळ रस्त्याला लागताच मात्र स्कॉटने शिळ फाट्या ऐवजी नेवाळी फाट्याला जायचा प्रस्ताव मांडला. त्याबरोबर दोघांनी उंबर्ली गावाकडे जाणारा रस्ता पकडला. वैशाल धारमसी याचा हा आवडता रस्ता. या रस्त्यावरून जाताना सूर्य उगवताना पाहणे हा एक आनंदोत्सव असतो. स्कॉट श्विन आपली संथ गती कायम राखत बदलापूर पाइपलाइन रस्त्यावरील तळोजा फाटा येथे पोचले. तेथून नेवाळी फाटा येथे जाताना सुरुवातीला छोटा चढ चढावा लागला तरी पुढे मात्र बराच उतार मिळतो. ह्या उतारावरून गती घेत असतानाही श्विनचे लक्ष समोर उजव्या बाजूने डोकावणाऱ्या सूर्याकडे होते. नेवाळी फाट्या अगोदर श्विनने सूर्याला कॅमेरात कैद करण्यासाठी योग्य जागा शोधली. तेथून त्या सूर्यबिंबाला कॅमेरात जेरबंद करून नेवाळी फाटा गाठला तेव्हा श्विन स्कॉटचा उत्साह अधिकच वाढला होता. 




नेवाळी फाटा येथे अमृतास्वाद (चहापान) घेत असतानाच श्विन स्कॉटने परतीचा विचार बदलून पुढे मार्गक्रमण करायचे ठरवले. तेथून जवळच असलेला मलंगगड गाठायचे ह्यावर दोघांचे एकमत झाले. मग श्विनने थेट मलंगगडाकडे जायच्या रस्त्या ऐवजी पोसरी, करवले गावाहून जाणारा थोडा लांबचा रस्ता निवडला. हा रस्ता लांबचा असला तरी निसर्ग संपन्न होता. 




ह्याच रस्त्यावरून पूर्वी जाताना चोचीत साप धरलेला खंड्या बराच काळ श्विनला समांतर जात होता. ती आठवण जागी करत श्विन आणि स्कॉट जात होते. रस्ता छान होता आणि रहदारी अजिबात नव्हती त्यामुळे वेग वाढला होता. इतक्यात दोघांचे लक्ष डाव्या बाजूकडील शेताकडे गेले. त्या शेतात एक बाई कसला तरी भारा गोळा करत होती. ते काय आहे हे लक्षात येत नव्हते....काकडी..अहं... दुधी... ओह, खरच! ती नक्कीच दुधी होती. आपोआपच दोघांची गती शून्यावर आली.



स्कॉटने त्या शेतात प्रवेश केला आणि दुधीची किंमत विचारली. शेतातली ताजी, लुसलुशीत दुधी दिसल्यावर भाव करायचा नव्हताच. सांगितलेली किंमत स्कॉटने लगेच दिल्यावर, त्या बाईने लगेचच स्वतः हुनच एका दुधीवर आणखी एक दुधी मोफत दिला. भाजीवालीने दिलेली भेट स्कॉटने आनंदाने स्वीकारली. मळ्यातली भाजी मिळाल्यामुळे श्विन स्कॉटही खुश होते आणि शेतातच बोहनी झाल्यामुळे मळेवालीही खुश!

पुढे जात असतानाच डावीकडे पोसरी करवले गावाजवळ एक शनिमंदिर. ह्या श्री शनिश्वराला मनोमन नमस्कार करून श्विन स्कॉटने पुढचा रस्ता धरला. रावणाची एक कथा सांगतात. सर्वशक्तिमान रावण हा उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवांना खाली झोपवले आणि त्याच्यावरून चालू लागला. चालत असताना खाली झोपलेल्या शनिदेवजवळ तो पोचला तेव्हा शनिदेव पालथा झोपला होता. रावणाने हट्ट धरला की शनिदेवाने पालथे न झोपता सरळ झोपावे. रावणाला कोणीतरी सल्ला दिला की शनिदेव पालथा आहे तेच बरे आहे, त्याला सरळ झोपायला सांगू नकोस. मात्र दुराग्रही रावणाने तो सल्ला मनाला नाही आणि त्याने शनिदेवाला सरळ व्हायला लावले. आणि त्याबरोबर... शनिदेवाची दृष्टी रावणावर पडली. त्याबरोबरच रावणाचे दिवस मात्र फिरले.... ही झाली रावणाची कथा!
मात्र शनिदेव हा खरा परीक्षक आहे. तो तुमची कठोर परीक्षा जरूर घेतो मात्र त्या परीक्षेत तुम्ही पास झालात तर त्याचे योग्य आणि भरघोस फळही देतो.

असो, शनिदेवापासून पुरेसे अंतर ठेवत श्विन आणि स्कॉट मात्र पुढे सरकले. बराचसा रस्ता अत्यंत उत्तम स्थितीत होता. त्यामुळे आता वेगही चांगला घेता येत होता. करवले गावातून जाणारा रस्ता सरळ सरळ मलंग गडाकडे जाणारा नव्हता त्यामुळे प्रत्येक वळणावर खात्री करून घेत जावे लागत होते. अशी वळणे घेत घेत मलंगगड दिसू लागला तेव्हा त्याच्या माथ्यावर सूर्य विराजमान झालेला दिसत होता. मुकुटावर सूर्य परिधान केलेला मलंगगड तेजस्वी दिसत होता. श्विन स्कॉट गडाच्या पायथ्याशी विसावले तेव्हा त्यांना मनुष्य शक्तीचे इंधन मिळत राहण्यासाठी आम्हाला इंधन भरावे लागणार होते.

येथे मिळणारी कांदाभजी आणि पुन्हा एकदा अमृतपान झाल्यावर श्विन स्कॉटने पुन्हा परतीचा रस्ता धरला. नेवाळी मार्गे मलंगगडाकडे थेट येणारा रस्ता जवळचा होता, तर करवले गावामार्गे येणारा रस्ता नेवाळी ते मलंगगडाचे अंतर जवळपास दुप्पट करणारा होता. मात्र हाच करवले गावाकडून मलंगबाबाच्या वाडीतून आलेला निसर्गसंपन्न रस्ता स्कॉटला आवडला होता. साहजिकच दोघांचा मोर्चा मलंगबाबाच्या वाडीमार्फत पुन्हा करवले गावाच्या दिशेने वळला. मलंगगडाकडून वाडी पार करून करवले गावाअलीकडील चौकात उजवीकडे करवले गाव आहे तर डावीकडील रस्ता नऱ्हेन गावाकडे जातो. परतीचा मार्ग पकडताना श्विन स्कॉटने करवले गावा ऐवजी नऱ्हेन गावाकडे जायचे ठरवले. नऱ्हेन गावाकडून जात असतानाच छोट्याश्या शाळेजवळ एका लहानश्या पटांगणात ओळीने उभे राहिलेले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक प्रार्थना म्हणताना दिसले. श्विन आणि स्कॉट साहजिकच तेथे थांबले. मलंगगडाच्या सफरीत जागोजागी वेगवेगळ्या पक्ष्यांची विविध गाणी ऐकायला मिळत होती. त्यालाच स्पर्धा करणाऱ्या आवाजातील प्रार्थना श्विन स्कॉटला स्तब्ध करत होती. तेथील शिक्षकांना अभिवादन करून श्विन स्कॉट निघाले तेव्हा त्यांना निश्चितच आणखी ऊर्जा मिळाली होती. त्याच उर्जेसह दोघांनी बाळेगाव येथील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) चे प्रांगण गाठले. त्या प्रांगणातून जाताना नकळत नतमस्तक व्हावेसे वाटत होते.

SRPF पार करून कोळेगावचा रस्ता पकडला तो मात्र थोडा खराब स्थितीत होता. आता उंच झाडांची जागाही खुरट्या झाडांनी घेतली होती आणि आपल्या बाललीला थांबवून सूर्य सुद्धा कुमारवयात आला होता. कोळेगावमार्गे कल्याण शिळ रस्त्याला लागल्यावर श्विनचे लक्ष नीराकेंद्राकडे लागले होते. मानपाडेश्वर मंदिराजवळ एका निराकेंद्रापाशी श्विनने थांबा घेतला. केंद्रधारक मात्र एखाद्या रंगात आलेल्या गवयाप्रमाणे डोळे मिटून डोलत होता. तेव्हा त्याला भानावर न आणता श्विनने मानपाडा रस्त्या मार्गे डोंबिवली मध्ये प्रवेश केला. तिथे लगेचच आणखी एक निराकेंद्र होते, तेथे मात्र श्विन स्कॉटने आत्मा थंड करवून घेतला. 

सूर्योदयाच्या आधीच्या विष्णुप्रहरात घर सोडून परत श्विन स्कॉट घरी परतले तेव्हा मात्र सूर्योदयानंतर तीन प्रहर उलटून गेले होते.

#tjsbbank #saveoursahyadri #ismartcommute #dombivlicycleclub

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

छोटीसी ये दुनिया... - डोंबिवली पणजी सायकलसफर -लेख ७

The tragedy of life is not that it ends so soon, but that we wait so long to begin it.

मधुमेहाने श्विनला ९ वर्षांपूर्वी भानावर आणले आणि श्विनने जगणं सुरु केले. जीवन किती सुंदर आहे हे अनुभवण्यासाठी मधुमेह हा गुरु, मित्र श्विनला लाभला होता. प्रत्येक क्षणात आपण एक काम करत असतो आणि विचार इतरच असतात. त्यामुळे जो क्षण आपण जगत आहोत तोही निसटून जातो. मात्र मधुमेहाची साथ लाभताच त्याने समोर आलेला क्षण पूर्ण जगायला शिकवलं. श्विनबरोबर दौड करताना हातात आलेला क्षण निसटून जाण्याआधी तो परिपूर्णपणे जगण्याची अनुभूती नक्कीच मिळते. किंबहुना असे परिपूर्ण क्षण जगण्यासाठीच श्विनची सफारी (schwinnsafari) सुरु असते. डोंबिवली पणजी सफारी हि सुद्धा त्याच परिपूर्ण जगण्याची एक झलक होती. पहिल्या दिवशी तांडेम सायकलवरील जोडगोळी आणि इराणी मित्राने साथ दिली होती. भारताला इराणमधून किती आणि कसे पेट्रोल मिळते हे मला माहित नाही आणि आपल्याकडे नळाला पाणी मिळते (हल्ली तेही मिळत नाहीच म्हणा) तसे मुबलक प्रमाणात इराणमध्ये जागोजागी नळालाच पेट्रोल मिळते का हेही मला माहित नाही. मात्र त्या इराणी मित्राला मात्र (त्याच्या देशातील आठवण म्हणून असेल कदाचित) रात्रीच्या निवाऱ्यासाठी पेट्रोल पम्पच सोयीचा वाटला होता. 

श्विन आणि स्कॉटने मात्र तळेगाव गाठले. दुसऱ्या दिवशी (रविवारी) दुपारपर्यंत पुन्हा मुंबई गाठून सोमवारी परत पुण्याला यावे लागणार होते. त्यामुळे श्विन स्कॉटने रविवारच्या सकाळच्या वेळेचा फायदा घेत नऱ्हे गाठून मग बसने मुंबई गाठायचे ठरवले. हि सगळी ठरवाठरवी होत असतानाच श्विनला एक फोन आला. उत्साहाने भरलेल्या आवाजातच त्याने ओळख सांगितली,"नमस्कार, मी संतोष कांड." आमची प्रत्यक्ष ओळख तर नव्हतीच शिवाय अगदी भ्रमणध्वनी द्वारेही संवाद साधण्याची हि पहिलीच वेळ होती. चिंचवड येथील सायकलमित्र सुनील पाटील यांनी मला संतोषचा फोन येईल असे सांगितले होतेच. संतोषशी बोलताना पहिल्या एकदोन वाक्यातच आमची ओळख कित्येक वर्षांपूर्वीची असावी हे जाणवू लागले. संतोष हा सुद्धा मूळ डोंबिवलीकरच. माझ्या एक वर्ष आधीच्या बॅचला हा होता. दोघांची शाळा वेगळी होती, मात्र बोलता बोलता आमचे अनेक मित्र सामाईक असल्याचे लक्षात आले. मी आणि संतोष दोघांचे शिक्षण डोंबिवली मध्ये झाले तेव्हा डोंबिवली चा जीव फार मोठा नव्हता. आमचे मित्र सामाईक असले तरी तेव्हा आमची ओळखही झाली नव्हती. मात्र श्विनने मला आणखी एक जिवलग मित्र मिळवून दिला होता. 'दुनिया छोटी है' हे जेवढे खरे तेवढेच 'दुनिया गोल है', हेही खरं ठरलं होत.

"तुम्ही नर्हेहून कधी निघणार आहात, मी तुमच्यासाठी खाऊ घेऊन येणार आहे" संतोष म्हणाला. किंबहुना हे सांगण्यासाठीच तर त्याने फोन केला होता. मी काही आणू का, नव्हे तर मी आणणार आहे असा त्याचा आपुलकीचा धाक घरातील वडीलधाऱ्यांसारखाच होता. 'हे विश्वची माझे घर' ह्या वाक्याचा अर्थ अश्या सायकलसफरीतच.... किंबहुना आपला परीघ/वलय सोडून फिरतानाच कळत असतो. संतोषसारखे कुटुंबीय हा अर्थ समजावून देत असतात.

रविवारी सकाळी श्विन आणि स्कॉटने तळेगावहून कूच केले तेव्हा सूर्याचे सफरचंदासारखे रूप मोहवून टाकत होते. 



स्कॉटने सुरुवातीलाच वेग गाठला होता, मात्र श्विनने अहिस्ता पेडल धोरण अवलंबले होते. कोणताही व्यायाम करताना आधी स्नायू मोकळे होण्यासाठी सुरुवात धीम्या गतीने करणे आवश्यक असते. हे माहित असले तरी तळेगावच्या मिलिटरी परिसरातील मोकळ्या रस्त्याचा आनंद मनमुराद पणे लुटण्यासाठी स्कॉटने वेगात सुरुवात केली होती. मात्र जोरात सुरुवात केल्यामुळे स्कॉटला लवकरच विश्रांती घ्यावी लागली. मग मात्र श्विन स्कॉट दोघेही संथगतीने निघाले. पूर्वी डोंबिवलीकर असलेला श्विनचा शालेय मित्र विनायक खुपेरकर  (विनू) वाकड फाटा येथील जोशी वडेवाले येथे भेटणार होता. खरतर तो रात्रपाळी करून घरी येणार होता, तरी श्विनला भेटण्याची आतुरता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. श्विन आणि स्कॉट वाकड फाटा येथे पोचले तेव्हा अंदाजापेक्षा अर्धातास उशीर झाला होता. श्विनने जोशी वडेवाले यांचे हॉटेल शोधले मात्र त्या जागी आता दुसरेच हॉटेल उभे होते.

मग तिथे असलेल्या नवीन हॉटेलमध्ये चहापान करून श्विन आणि स्कॉट पुढे निघाले. भुजबळ चौक पार करून महामार्गाने जात असताना स्कॉटची गती मंदावली होती. पुढील रस्ता रुंद आणि उत्तम स्थितीत असला तरी त्यावर चढ उतार बऱ्यापैकी होते. स्कॉटला या मार्गात अश्या चढ उताराची अपेक्षा नसल्याने स्कॉटची गती फारच मंदावली. अर्थात आज केवळ सकाळचे २-३ तासांचाच पल्ला गाठायचा असल्याने वेळेची तशी फिकीर नव्हती. श्विन पुढे आणि स्कॉट मागे अश्या रीतीने जात असताना मधले अंतर वाढू लागले की श्विन पुन्हा स्कॉटला पुढे जायला सांगत असे. आणखी एक चढ पार केल्यावर स्कॉटने पुन्हा विश्रांती घेतली. श्विननेही स्कॉटच्या पुढे थांबा घेतला. इतक्यात श्विनला हाक ऐकू आली,'हाय!' श्विननेही त्या दिशेला वळून प्रत्युत्तर दिले. 'मी शंकर गाढवे.' त्याने ओळख दिली. ओहोहो, प्रत्यक्ष शंकर गाढवे! श्विन आणि शंकर दोघेही cycle2work ह्या समाजमाध्यमावरील गटात सामील होते, तसेच strava वर ही होते. त्यामुळे श्विनला शंकरची प्रत्यक्ष ओळख नसली तरी त्याचे उपक्रम माहित होते. श्विनने स्कॉटलाही शंकरची ओळख करून दिली. शंकर हा सायकलिंग मधील शतकांचा बादशहाच होता. जवळपास रोज शतकी राइड करणे ही सवय त्याने लावून घेतली होती. आज खरं तर धावण्यासाठी जाणार होता. मात्र उशिरा उठल्यामुळे त्याचे धावणे रहित झाले होते. त्यामुळे स्वतःलाच शिक्षा म्हणून तो आज पुन्हा शतकी राइडसाठी निघाला होता. श्विन आणि स्कॉटची सफर कळताच तोसुद्धा थोडावेळ साथ देण्यासाठी धीम्या गतीने येऊ लागला. श्विनच्या बरोबरीने जात असताना त्याने काही सल्लेही त्याने अगदी सहजपणे दिले. स्कॉटची गती पाहत काही अंतरातच उतार सुरु होईल असे त्याने आश्वस्तही केले. खरोखरीच काही काळातच तसा उतार सुरु झाला, मात्र तेथून लगेचच शंकर मात्र परत फिरणार होता. 



लवकरच स्कॉट आणि श्विन नवले पुलाजवळ पोचले. आज श्विन आणि स्कॉटला येथेच ठेवून परत मुंबईला परतायचे होते. तेथील सन युनिव्हर्स ह्या आजच्या गंतव्यस्थानी प्रवेश करत असतानाच आणखी एका सायकलस्वाराने श्विनचे स्वागत केले. श्विनने परिधान केलेला 'डोंबिवली पणजी सायकलसफर' हा फलक पाहून तोही थबकला होता. हा युवा सायकलस्वार होता स्वानंद वेलणकर! स्कॉट थोडी मागे राहिली होती. त्या वेळात स्वानंदला ३फेब्रुवारी २०१९ रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात होणाऱ्या २ऱ्या सायकल संमेलनासंबंधी माहिती देण्याची संधी श्विनने साधली.

शंकर आणि स्वानंदला भेटून आज सकाळची छोटी राइड मात्र सार्थकी लागल्याचे समाधान श्विनला नक्कीच वाटत होते.

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

विंचवाचे बिऱ्हाड (डोंबिवली पणजी सायकलसफर लेख क्रमांक ६)

What does running gives you rather than walking ....is injury.

धावताना आपण चालण्यापेक्षा अधिक काय मिळवू शकतो तर ते म्हणजे अपघात/ जखम! धावणे आणि योग्य गतीने चालणे या दोन्हीमध्ये व्यायामाच्या, आरोग्याच्या दृष्टीने फायदा सारखाच असला तरी चालताना अपघात होण्याची शक्यता स्वाभाविकतःच कमी होत असते.

ह्याच प्रमाणे चालण्या (किंवा) धावण्या मध्ये आपण सायकलिंग पेक्षा अधिक काय मिळवू शकतो तर ती आहे गुडघेदुखी. चालताना अथवा धावताना आपल्या गुडघ्यावर भार येत असतो त्यामुळे गुडघ्यांना त्रास होऊ शकतो. गुडघेदुखी थांबवण्यासाठी गुडघ्यांना चक्राकार अथवा गोलाकार पद्धतीने व्यायामाची गरज असते. सायकलिंग करताना तो व्यायाम आपोआपच मिळाल्याने सायकलिंगमुळे गुडघेदुखी बंद होऊ शकते. श्विनने याचा स्वानुभव घेतला आहेच. मात्र ठाणे येथील भाटेकाका हे याचे उत्तम उदाहरण ठरावे. भाटेकाकांना वयाच्या साठीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला. तेव्हा डॉकटरांच्या सांगण्यावरून त्यांनी सायकलिंग सुरु केले. त्यानंतर त्यांची गुडघेदुखी तर दूर झालीच शिवाय आज वयाच्या ९२ व्या वर्षीही ते रोज १५-२० किमी सायकलिंग करण्याइतके ठणठणीत आहेत.

श्विन स्कॉटला तरी गुडघेदुखी हा पाहुणा घरी कुठे हवा होता. ती घालवण्यासाठी सायकलभ्रमंती हा एक पर्याय होता.

डोंबिवली गोवा सायकलफेरीदरम्यान खोपोलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर स्कॉटचें लक्ष ग्रीन पार्क हॉटेलकडे वळले. हे स्कॉटचे लाडके हॉटेल. हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत श्विन आणि स्कॉटला उभे करत असतानाच समोर तांडेम सायकल पुन्हा दिसली. DC (Deccan Cliffhanger) ची तयारी करत असलेली जोडगोळीसुद्धा आमच्या पुढे येऊन ग्रीन पार्क मध्येच विसावली होती. श्विन स्कॉटने त्यांच्याच शेजारचे टेबल पकडले आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी सुरु झाल्या. ते दोघे एकाच तांडेम सायकलवरून प्रवास करत असले तरी दोघेही वेगवेगळ्या शहरातील होते. एक होता 'आमची मुंबई' मधील भांडुप येथील विनीत तर दुसरा होता दिल्ली येथील सुदेब रॉय. दृष्टिदोषावर मात करत सुदेबच्या साहाय्याने विनीत सहजपणे सायकलिंग करत होता. तांडेम सायकलद्वारे DC मध्ये भाग घेणारी हि पहिलीच जोडी होती हे तर आणखी विशेष. विनीत आणि सुदेब यांचा ३ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या सायकलसंमेलनातील सहभाग निश्चित करून श्विन स्कॉटने त्यांचा निरोप घेतला.

श्विन स्कॉटची खरी कसोटी आता सुरु होणार होती. खंडाळ्याच्या घाटाचे दडपण श्विनला नसले तरी प्रत्येक वेळी हा घाट चढताना येणारा अनुभव हा नित्य नवा असतो. स्कॉटनेही खंडाळ्याचा घाट यापूर्वी दोन वेळा पार केला होता. मात्र दोनही वेळी काही काळ तिला पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळेच स्कॉटला लवकरात लवकर- म्हणजे ऊन्ह डोक्यावर यायच्या आधी घाट चढायला सुरुवात करायची होती. त्यामुळेच ती आप्पांकडे जाताना वेळेचा विचार करत होती. मात्र श्विनला स्वतः आणि स्कॉट दोघांबद्दलही पूर्ण खात्री होती.

घाट सुरु होत असतानाच स्कॉटला गियर कमी करायला सांगून श्विनने स्कॉटच्या मागे राहणे पसंत केले. खोपोली सोडल्यावर थोड्याच वेळात टाटा पॉवरहाऊस इथला चढ सुरु होतो, तो गियर कमी करून सहज चढता येऊ शकतो. मात्र गियर कमी केल्यावर दमायला होत नसले तरी पॅडलिंग मात्र जास्त वेळा करावे लागते. नव्यानेच हा घाट चढण्याचा प्रयत्न करणारे हा सोपा दिसणारा सुरवातीचा चढ थोड्या वरच्या गियरवर ठेवून दमतात किंवा कमी गियर करून चढ चढायला गेले तर कंटाळून थांबतात. खरंतर या वेळी आपले शरीर नाही तर मन दमते. अश्यावेळी कमी गियर ठेवत संयम राखुन न थांबता पेडलिंग करणे हाच उत्तम उपाय आहे.

श्विन आणि स्कॉटला अनुभवाने हे माहित झाले असल्याने दोघांनी हा पहिला टप्पा सहजगत्या पार केला. निसर्ग स्नॅक्स येथील वडा खाल्ल्याशिवाय पुढे जाणे हा मात्र तेथील वड्याचा अपमान ठरला असता. त्यामुळे बटाटा वड्याचा फडशा पाडत तेथे घाटातील पहिला विसावा घेतला गेला. यापुढील सुरुवातीचा रस्ता फार तीव्र चढणीचा नसला तरी एक वळण घेतल्यावर पुन्हा परीक्षा सुरु होते. त्यानंतरचा विसावा होता अर्थातच शिंग्रोबा मंदिर येथील! श्विन स्कॉटने हा टप्पाही संयम राखत गाठला. शिंग्रोबा हा खरतर इंग्रजांना घाटातून कोठे रस्ता तयार करता येईल हे सांगणारा एक वाटाड्या. आपला प्रवास सायकलने असो वा राज्य परिवहन मंडळाच्या गाडीने, की खाजगी गाडीने...कोट्यावधी प्रवाशांना मार्ग दाखवणाऱ्या या शिंग्रोबाला वंदन करूनच या मार्गावरील प्रवासी पुढे जातात.

दरम्यान स्कॉट थोडी मागे राहिल्याने श्विनने शिंग्रोबाचे दर्शन घेतले. घाट चढत असताना तेथे मिळणारा खोबऱ्याचा प्रसाद खरोखरच मोलाचा होता. तो प्रसाद वाटणारा सेवेकरीही श्विनची आपुलकीने चौकशी करू लागला. श्विनचा डोंबिवलीहुन प्रवास सुरु असल्याचे पाहून तो अधिकच खुलला. तो सेवेकरीही काही वर्षांपूर्वी डोंबिवली येथे प्रवासी रिक्षा चालवयाचा व्यवसाय करत असे. त्याच्या माहेराहून आलेल्या श्विन आणि स्कॉटला पाहून म्हणूनच तो हरखून गेला होता. घाट चढत असणाऱ्या श्विन स्कॉटला त्याने माठातील गार पाणी घेण्याचा आग्रह केला. ते गार पाणी पिऊन श्विन स्कॉटने पुढील प्रवास सुरु केला.

आता पुढे २-३ वळणांनंतर हा घाट चढताना आलेला थकवा पार नाहीसा करणारा धबधबा लागणार होता. त्यामुळे श्विनने उत्साहातच पेडल दामटवले. धबधब्यापाशी श्विन पोचल्यावर दिसणारे जे दृश्य निराशा करणारे होते. पावसाळा संपतोय न संपतोय तोच येथील धबधब्यामधील खळाळणाऱ्या प्रवाहाचे रूपांतर करंगळी एवढ्या धारेत झाले होते. धबधब्यात पाणी नसल्याने श्विनच्या उत्साहावर मात्र पाणी पडले होते. स्कॉट तेथे पोचत असताना श्विनकडे पाहूनच धबधब्याची अवस्था स्कॉटने ओळखली. अर्थातच तेथे न थांबताच श्विन स्कॉट पुढे निघाले.

तेथून पुढील काही रस्ता फार चढणीचा नसल्याने श्विन स्कॉट थोड्या वेगात पुढे सरकले. मात्र घाटातील अंतिम टप्प्यात लागणारा- राजमाची दर्शन घडवणाऱ्या ठिकाणाआधीचा तीव्र चढ चांगलीच परीक्षा घेणारा होता. याची कल्पना असल्याने श्विन आणि स्कॉटने शांतपणे पण निर्धाराने पेडलिंग सुरु केले. आपले लक्ष पुढील जेमतेम ४-६ फूट अंतरापर्यंत ठेवत पुढे सरकत राहिल्याने तीव्र चढाचे दडपण येत नाही. राजमाची पॉईंट पर्यंत पोहोचल्यावर मात्र दोघांनी हुश्श केले.

त्याच आनंदात खंडाळा विनासायास पार केला आणि लोणावळा दृष्टीक्षेपात येत असताना श्विनला तेथे निराकेंद्र दिसले. निसर्ग स्नॅक्स येथील वडा केव्हाच इतिहासजमा झाला होता. खंडाळा घाट पार केल्याचा आनंद नीरा पाहून साजरा करण्याचे ठरवून श्विन स्कॉट तेथे थांबले. इतक्यात मागाहून इराणी मित्र येताना दिसला. संपूर्ण घाटात दर्शन न देणाऱ्या ह्या इराणी मित्राला श्विनने निरापानाच निमंत्रण दिले. त्याचाही घसा कोरडा झाला असावा. त्यामुळे त्यानेही ते निमंत्रण तातडीने स्वीकारले. कोणतेही वाक्य पूर्ण न करता केवळ इंग्रजी शब्दफेक करण्याची भाषा आता श्विनला कळू लागली होती. त्याच्या इंग्रजी शब्दफेकीला साथ देत श्विनने निरापान उरकले. श्विन स्कॉटच्या बरोबरीने आता इराणीही मार्गक्रमण करू लागला. श्विनची त्या इरण्याशी गट्टी जमताच स्कॉटने वेग घेतला. इराणमधील चित्रपट दिग्दर्शक माजीद माजीदी हा श्विनचा आवडता दिग्दर्शक! त्याचे भावनिक चित्रपट श्विन आणि स्कॉट दोघांनाही आवडत. मग आमची संभाषणाची गाडी माजीद माजीदी वर घसरली. त्याबरोबर तो इराणीही खुलला.

सायकलच्या कॅरियरला दोन्ही बाजूला लावलेल्या पॅनियर मधील सामानाचे ओझे वाहत त्याने खोपोली घाट कसा चढला हे एकतर त्या इराण्याला माहित आणि प्रत्यक्ष भगवंताला माहित. मात्र त्या इराण्याचा उत्साह अजून कायम होता. कधी तो इराणी पुढे तर कधी श्विन स्कॉट पुढे असे एकमेकाच्या संगतीत जात असताना प्रत्येकजण आपापल्या सोयीने वेग राखत होता. इराणी मित्र थोडा पुढे निघून गेला होता. दरम्यान अप्पांकडून घेतलेली तीन केळीही फस्त झाल्यामुळे खंडाळा लोणावळा इथे भूकेची जाणीव झाली नव्हती. मात्र कार्ला कडे जाणारा चौक पार झाल्यावर मात्र इंधनाची गरज जाणवू लागली. त्यामुळे पुन्हा एकदा बटाटा वड्यावर ताव मारण्यात आला. इतक्यात तो इराणी मित्र पुन्हा पुढे जाताना दिसला. बहुधा तो सुद्धा कुठेतरी थांबला असावा, कारण तो आधीच पुढे गेला असताना त्यानंतर श्विन स्कॉटने त्याला परत मागे टाकले नव्हते. श्विन स्कॉट रस्त्याच्या उजव्या बाजूला क्षुधाशांती करत होते आणि दुभाजकापलीकडून तो इराणी पुढे जात होता. त्यामुळे त्याला पुन्हा थांबवताही येत नव्हते.

आता ऊन्ह कलायला लागली होती. श्विन स्कॉटने पुन्हा जोर लावला. श्विनच्या मनाजोगता वेग मिळाल्याने तळेगाव ऐवजी नऱ्हे पर्यंत किंवा किमान चिंचवड पर्यंत पोचणे शक्य होईल असा विश्वास श्विनला वाटू लागला. मात्र थोड्या वेळात स्कॉटचा वेग मंदावला. स्कॉटने एक विश्रांती घ्यायची ठरवली. तसे पाहता आता तळेगाव जवळच होते. तरी दोघांनी एका पेट्रोल पम्पपाशी क्षणभर विश्रांती घ्यायचे ठरवले. पेट्रोल पंपच्या आवारात श्विन स्कॉट शिरले आणि पुन्हा ताजेतवाने झाले. मार्गक्रमणासाठी पुन्हा सज्ज होत असतानाच दोघांच्याही आधी त्याच पेट्रोल पम्पवर येऊन पोहोचलेल्या इराणी मित्राने हर्षभरित होऊन साद घातली. त्या इराण्याची सायकल विश्राम करत असताना पाहून श्विनने त्याला आजची मजल कुठपर्यंत आहे असे विचारले. 'Night here ..petrol pump' असे शब्द फेकत त्या इराण्याने तो रात्री पेट्रोल पंप वरच राहणार असल्याचे सूचित केले. सायकलच्या कॅरियरवर दोन्ही बाजूला अडकवणाऱ्या पॅनियरच्या झोळीत त्याचे बिऱ्हाड सामावलेले होते. विंचवाचे बिऱ्हाड पाठीशी असे म्हणतात, मात्र हा इराणी खरोखरच त्याचे बिऱ्हाड पाठीशी घेऊन फिरत होता. काही दिवसांपूर्वी श्विनने रोज रात्री पेट्रोल पम्पवर राहुन भारत परिक्रमा करत असलेल्या इराण्याबद्दल वाचले होते. तो इराणी हाच की काय! असा श्विनला पडलेला संभ्रम मात्र त्या इराण्याच्या शब्दसंपदेतून दूर होण्याची चिन्हे नव्हती. मात्र श्विन आणि इराण्याच्या गप्पा पुन्हा रंगल्या, त्या दरम्यान रविमहाराजांनी बराच पल्ला गाठला. तो अंदाज येताच श्विन आणि स्कॉट पूढे निघाले. तळेगाव येईपर्यंत उजेड बऱ्यापैकी होता, त्यामुळे चिंचवड पर्यंत दौड करण्याची श्विनची इच्छा होती. मात्र स्कॉटने तळेगावचाच आग्रह धरला. अर्थातच तळेगावला मुक्कामी पोचत असताना अस्तंगत पावत असलेल्या सूर्याने स्कॉटचाच निर्णय बरोबर असल्याची ग्वाहीही दिली.

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

इराणी हल्ला आणि तात्पुरती सुटका (डोंबिवली पणजी सायकलसफर लेख ५)


केल्याने देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार,
मनुजा, ज्ञान येतसे फार ... "
हे झालं भारतीय तत्वज्ञान!

पण पाश्चिमात्य फ्रान्सिस बेकन सुद्धा म्हणतो -"Travel in the younger sort , is a part of education ; in the elder, a part of experience ."

थोडक्यात प्राचीन भारतीय तत्वज्ञान असो की पाश्चात्य तत्वज्ञान दोन्हीच्या मते म्हणजे प्रवास हा शिक्षणाचा एक भागच आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांनादेखील अनुभवसमृद्ध करणारा गुरु आहे. याचाच एक अनुभव घेण्यासाठी श्विन आणि स्कॉट डोंबिवली ते पणजी सायकलप्रवासासाठी निघाले होते. पनवेलचा पहिला टप्पा पार करून श्विन आणि स्कॉटने पनवेल हुन पुढे कूच केले तोपर्यंत सकाळचे ९-९.३० वाजले होते. रवीराज कोवळी किरणे आवरती घेेेत होते.

पनवेलपुढील रस्ता श्विनला नेहमीच आवडत असे. कारण सुरुवातीचा थोडा रस्ता सोडला तर सगळा रस्ता गुळगुळीत आणि रुंद होता. त्यामुळे श्विन वेग घेण्याच्या तयारीतच होती. अप्पांकडे भरपेट नाश्ता झाल्यामुळे आता पळस्पे फाट्याला थांबायची गरज नव्हती. त्यामुळे श्विन स्कॉटने तेथून वेग घेतला. खोपोलीचे अंतर दर्शवणारे फलक दिसू लागले, तसा श्विनचा उत्साह वाढू लागला. स्कॉटची मात्र वेग घ्यायची तयारी नव्हती. मग दोघेही आस्ते कदम.. (की आस्ते पेडल?) जाऊ लागले. चौक फाटा येथे श्विन स्कॉटचा एक थांबा आता ठरलेला होता. त्यामुळे आपसूकच तेथे श्विनने वळण घेत पेडल थांबवले. श्विनपाठोपाठ स्कॉटही तेथे पोचली. स्कॉटने सरबताची फर्माईश केली.

इतक्यात श्विन मिरवत असलेला डोंबिवली गोवा सायकलसफरीचा फलक पाहत एक युवक तेथे थबकला. एकमेकांची ओळख होताच तोही श्विनप्रमाणेच निसर्गप्रेमी असल्याचे समजले. तो होता आयरोली येथील श्रीपती निकम. श्विनची भटकंती शक्यतो रस्त्यांवरूनच होत असे, मात्र श्रीपती गिरिप्रेमी होता. त्यामुळे तो निसर्गाच्या अधिक जवळ जाणारा होता. ट्रेकमेट्स इंडिया trekmatesindia , मुंबई ट्रॅव्हलर्स mumbaitravellers या संस्था असो की EVENTSHIGH हे भ्रमणध्वनी वरील ऍप असो, वेळ मिळेल त्याप्रमाणे या किंवा इतर संस्थांबरोबर भटकंती साठी तयार असणाऱ्या श्रीपतीशी श्विनची नाळ लगेचच जुळली.  श्रीपतीबरोबर गप्पा मारत असताना विश्रांतीही झाली होती.
त्यामुळे मग श्विन आणि स्कॉट पुन्हा नवीन उत्साहाने पुढे निघाले.

थोड्याच वेळात स्कॉटने आणखी एक थांबा घेतला. श्विन आणि स्कॉट विश्रांती घेत असतानाच बाजूने आवाज आला, 'हाय..!' श्विनने वळून बघितले तर आणखी एक सायकलस्वार बाजूला येऊन थांबला होता. श्विननेही त्याला 'हॅलो' म्हटले.

त्या नवागताने आम्ही कुठून आलो आहोत याची विचारणा केली. आम्ही 'डोंबिवली' असे म्हणताच त्याला कळले नसल्याचे समजले. मग श्विनने 'मुंबई' असे म्हणताच त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचे हास्य फुलले. श्विननेही तो कुठून आला आहे हे विचारले. तेव्हा तो इराणहून आला असल्याचे समजले. खरे पाहता त्याच्याकडे पाहून तो अस्सल भारतीयच.... अगदी महाराष्ट्रीयन असल्यासारखेच वाटत होते. ह्या नवीन इराणी मित्राला आंतरजालासाठी (इंटरनेट) जोडणी हवी होती. श्विनने त्याला त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक विचारल्यावर त्यानेही दिला. त्याचे नाव भ्रमणध्वनीमध्ये नोंदवून ठेवण्यासाठी त्याला नाव विचारले, तर मात्र त्या इराणी मित्राला अर्थबोध होईना. दरम्यान त्याने दिलेला क्रमांक फिरवला तर तो तिसऱ्याच व्यक्तीने उचलला. इराणी मित्राची इंग्रजी शब्दसंपदाही तोकडी पडत होती. ते पाहून ज्या व्यक्तीला फोन लागला होता त्याला श्विनने त्याचा कोणी इराणी मित्र भारतात सायकलिंग करत आहे का हे विचारले. तो माणूस चांगलाच बूचकळ्यात पडला. इथे मात्र श्विनला काहीतरी गडबड झाल्याची जाणीव झाली. श्विनने तो फोन बंद करून इराणी मित्राला पुन्हा क्रमांक विचारला. क्रमांक तर तोच होता, पण आता तो इराणी मित्र सुरुवातीला दोन शून्य सांगून पुढे भ्रमणध्वनी क्रमांक सांगत असल्याचे ऐकून श्विनला तो इराणमधील क्रमांक असल्याची शंका आली. मग श्विनने त्याला 'डू यू हॅव इंडियन मोबाइल नंबर?' असे विचारल्यावर त्याने एअरटेल कंपनीचे सिम च खिशातून काढून म्हटले 'नो नेटवर्क.'

हा गोंधळ सुरु असतानाच मागे आणखी दोन सायकलस्वार आले....पण सायकल मात्र एकच होती..! होय, ते दोघेही दोघांनी चालवायच्या तांडेम सायकलवरून आले होते. त्या दोघांना वाटले स्कॉट, श्विन आणि तो तिसरा माणूस (इराणी) एकत्र आहेत. तर श्विन स्कॉटला वाटले तो इराणी पुढे आला असावा आणि हि दुक्कल त्याच्या जोडीने येत असून ती मागाहून आली आहे. मात्र एकमेकांचा परिचय होताच कळले की ते दोघेही स्वतंत्रच निघाले होते. इराणी सायकलस्वारसुद्धा आणखी गोंधळात पडला होता. सगळ्या गोंधळात तिन्ही टीमचा रस्ता एकच असल्याचे मात्र एकमेकांच्या लक्षात आले. श्विन आणि स्कॉट गोव्यापर्यंत जाणार होते, तर तो इराणी पार कोचीन गाठून तेथून परत आग्रा पर्यंत सायकलिंग करणार होता.

तांडेम सायकलवरील दुक्कल मात्र DC (Deccan Cliffhanger) या पुणे गोवा दरम्यान होणाऱ्या सायकलस्पर्धेची तयारी म्हणून मुंबईहून महाबळेश्वर पर्यंत सायकलिंग साठी न थांबता जाण्यासाठी निघाले होते.

इंग्रजी वाक्य तयार न करता केवळ दोन चार इंग्रजी शब्द तो इराणी आम्हा चौघा भारतीयांवर भाल्यासारखे फेकत होता.
इराण्याबरोबर इंग्रजी कुस्ती खेळून श्विनची दमछाक झाली होतीच. इराण्याबरोबरच्या त्या इंग्रजी युध्दात आता ही नवीन दुक्कलही सामील झाली आहे हे श्विनच्या लक्षात आले.
अर्थात DC ची तयारी करणारी दुक्कल नक्कीच वेगात पुढे निघून जाणार होती. आणि इराण्याच्या इंग्रजी कुस्तीला श्विन स्कॉटलाच तोंड द्यावे लागले असते. हे लक्षात येताच त्या इराण्याशी इंग्रजी कुस्ती खेळायला तांडेम सायकलवरील नवीन जोडीला खो देऊन श्विन आणि स्कॉटने पोबारा केला.

श्विन स्कॉट शांतपणे खोपोलिकडे जात होते. मात्र थोड्याच वेळात तांडेमवरील दुक्कल पुढे निघून गेली. आता पुन्हा इराणी भेटलाच तर श्विन आणि स्कॉटच पुन्हा त्याच्या तावडीत सापडणार होते. हा विचार येताच श्विन आणि स्कॉट खोपोलीकडे वेगात निघाले. इराणी पाठोपाठ होताच. मात्र खोपोली शहरात शिरण्या अगोदर त्या इराण्यानेच पुन्हा विश्रांती घेतली आणि श्विन स्कॉटची इराणी संकटातून तात्पुरती सुटका झाली.

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

गुरु साक्षात ... (डोंबिवली पणजी सायकलसफर लेख ४)

देव हे सत्य आहे की नाही या फंदात न पडता, जे सत्य आहे त्यालाच देव मानले तर.... गांधीजींची ही संकल्पना मला खूप भावते. बीजगणित हा माझा आवडता विषय. अ= ब हे सिद्ध करता येत नसेल तर ब= अ हे सिद्ध करता येते का हे पाहायचे. गांधीजींनी बिजगणिताचीच युक्ती देव ही संकल्पना तपासण्यासाठी वापरल्यामुळे मला ही पद्धत लगेचच पटली.

जे सत्य आहे ते तर आहेच. सत्यालाच देव मानले तर मग देव या संकल्पनेबद्दलचा सर्व गोंधळ दूर होतो. आप, तेज, वायू, जमीन आणि आकाश ही पंचमहाभूते तर अस्तित्वात आहेतच. म्हणूनच त्यांना देव मानून त्यांची प्रतिकात्मक पूजा हिंदू धर्मात केली जाते.

देव म्हणजेच या पंचमहाभूतांना वंदन केल्यावर कोणती गोष्ट असाध्य राहील? मात्र ही पंचमहाभूते किंवा हा देव चालता बोलता नाही, म्हणूनच आपल्याला गुरुची गरज भासते. देव मानाला तरी तो मानवी रुपात दिसत नाही, म्हणूनच तो गुरु किंवा आदर्श व्यक्ती या रुपात अधिक भावतो. श्रीगणेशाचे दर्शन घेऊन श्विन आणि स्कॉटने डोंबिवली हुन प्रस्थान केले तरी चालत्या बोलत्या देवाच्या सदिच्छा पाठीशी असणे नक्कीच अधिक प्रेरणादायी ठरणार होते. म्हणूनच २-३ दिवस आधी श्विनने आपले गुरु किंवा आदर्श ह्या प्रवासादरम्यान भेटेल याची चाचपणी करून ठेवली होती.

दरम्यान सुमित मोकल पहाटे पहाटे नियोजित वेळेनुसार सामंत पेट्रोल पम्पापाशी पोचला होता. श्विन स्कॉट थोडे मागे होते. मग श्विनशी बोलून सुमित शिळ फाट्याच्या गणेश घोळ मंदिरापाशी जाऊन परत शिळ फाट्याला येऊन थांबेल असे ठरले. श्विन आणि स्कॉट संयतपणे डोंबिवली शहराबाहेर पडले. सामंत पेट्रोल पम्प येथे विश्रांती घेऊन कल्याण शिळ रस्त्याला मात्र दोघांनी वेग घेतला. आजचे ध्येय डोळ्यासमोर असल्याने श्विन आणि स्कॉट लवकरच शिळ फाट्याला पोचले. सुमितच्या अंदाजापेक्षा लवकरच श्विन स्कॉटने शिळ फाटा गाठला होता. सुमित मात्र त्यावेळी अजून गणेश घोळ मंदिरातच होता. मग सुमितशी भ्रमणध्वनी द्वारेच चर्चा केली. श्विन- स्कॉटची तब्बेत ठणठणीत असल्याचे कळताच, त्याने वेळ न दवडता पुढे जायला सांगितले.

एव्हाना व्यवस्थित सूर्यप्रकाश पसरला होता. उत्साहही चांगला होता. शिळ आणि तळोजा मधील टोळ नाका हा श्विन स्कॉटचा हक्काचा थांबा.




तेथे क्षणभर विश्रांती घेऊन दोघांनी लयबद्ध रीतीने वाटचाल सुरु ठेवली. लवकरच श्विन स्कॉट तळोजा, कळंबोली मार्गे पनवेल शहरात शिरले. श्विनला गुरुतुल्य असे व्यक्तिमत्व पनवेल मध्येच होते. खरतर श्विनच कशाला मुंबईतील तमाम गिरिप्रेमी, निसर्गप्रेमी, सायकल पटू यांचा आदर्श पनवेल येथे वास्तव्य करत होता. पनवेल शहरात शिरताना स्कॉटला मात्र तो वेळेचा अपव्यय वाटू लागला. कारण पुढील खोपोली खंडाळा घाट तिला डोळ्यासमोर दिसत होता. काम, काळ, वेग हे त्रैराशिक श्विनने शालेय जीवनातही लीलया सोडवलेले होते. किंबहुना ते त्रैराशिक सोडवणे हा श्विनचा छंदच होता. त्यामुळे आजही हे त्रैराशिक श्विनच्या डोक्यात फिट्ट होते. त्यामुळे श्विनमात्र वेळेबाबत निर्धास्त होती.

पनवेल शहरातील अरुंद रस्त्याने आम्ही निघालो. एका चौकात पत्ता विचारण्यासाठी एका दुकानात शिरलो. दुकानात पत्ता विचारला आणि इतक्यात समोरून येणाऱ्या एका युवकाने श्विन आणि स्कॉट कडे पाहत विचारले,' तुम्हाला धनंजय मदन यांच्याकडे जायचे आहे का?'.

सायकल पाहिल्यावर आम्ही पनवेल शहरात कोणाच्या घराची चौकशी करत आहोत हे कोणताही सायकलपटू सहज ओळखु शकत होता. त्याने आम्हाला अप्पांचे (धनंजय मदन) घर दाखवले. आप्पांचे घर हे केवळ मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर जगातील कोणत्याही सायकल पटूंचे हक्काचे आश्रयस्थान आहे. स्वतः अप्पा उर्फ धनंजय मदन हे केवळ श्विनच नव्हे तर इतर अनेक मुंबईकर गिरिप्रेमी, निसर्गप्रेमींचे, सायकल पटूंचे प्रेरणास्थान, आदर्श आहेत. आम्ही घरी पोचताच त्यांची कन्या प्रिसिलियाने आमचे स्वागत केले. कोणीही सायकलसफर करत असेल तर स्वतःच सायकलसफर करत असल्याप्रमाणे अप्पा उत्साही असतात. अप्पांनी स्वतः संपूर्ण भारत डोंगरखोऱ्यांसह पायी आणि सायकलने अनेक वेळा पादाक्रांत आणि चक्राक्रांत केलेला आहे. त्यांची अत्यंत नम्र, मितभाषी आणि सात्विक मूर्ती आम्हाला नेहमीच हत्तीचे बळ देऊन जाते. त्यांच्याबरोबर सायकलिंग करताना पनवेल ते गोवा सायकलप्रवास एखादा १०-१२ वर्षीय मुलगाही सहज पार करतो तेव्हा म्हणूनच आश्चर्य वाटत नाही. मग त्यांच्या सदिच्छा पाठीशी असताना श्विन स्कॉटला गोवा गाठणे कितीसे कठीण जाणार होते!

स्कॉटला वेळेचा अपव्यय वाटत असलेला श्विनचा खटाटोप यासाठीच होता. वाटेत एखादी डोंगराएवढी अडचण आलीच तर त्यातून वाट काढणे अप्पांच्या सदिच्छा पाठीशी असताना सहजशक्य होते याची जाणीव श्विनला होती. अप्पांच्याच बरोबर प्रिसिलियाची भेट हा तर बोनसच होता. वडीलांच्याच  पावलावर पाउल ठेवून ती पेडल मारत होती. कोणतेही सहाय्य न घेता एकटीने पनवेल ते कन्याकुमारी सायकलिंग करूनही ती समाधानी नव्हती म्हणून नंतर सुमित परिंगे बरोबर प्रिसिलियाने बांबू सायकलवरून कन्याकुमारी ते खारदूंगला हे सुमारे ४५०० किमी अंतर पार केले होते.

अप्पांकडे सकाळचा भरपेट नाश्ता करत असताना आप्पा नेहमीप्रमाणेच नकळत काही टिप्स देत होते. खरतर त्यांच्या भेटीमागे ह्या टिप्स मिळवणे हेच तर खरे इप्सित होते. अप्पा आणि प्रिसिलिया आपुलकीने आमची चौकशी करत होते. गप्पांदरम्यान पुण्यातील सायकलिस्ट निरूपमा भावे ही माझी सख्खी मावशी असल्याचे आप्पाना प्रथमच समजले. अर्थातच माझ्या सायकलिंग, माझी जिद्द यामागचे खरे प्रेरणास्थान किंवा खरे गुपित त्यांना सहजच उलगडले असावे.

आमचा नाश्ता झाल्यावरही आप्पांनी थोडा खाऊ बरोबर नेण्यास सांगितले. त्या खाऊची गरज केव्हाही लागू शकत होती, हे श्विनला माहित होते. मग त्यातील तीन केळी सायकलिंग शर्टच्या मागे असलेल्या तीनपैकी एका खिशात ठेवून आम्ही निघालो. आप्पाही आमच्या सायकली पाहण्यासाठी आले. आम्ही आमचे सामान कसे अडकवतो, सायकली व्यवस्थित स्थितीत आहेत की नाही, टायर ठीक आहेत ना, सायकलसाठी काही साहित्य हवे आहे का या आणि अनेक गोष्टींची खातरजमा अप्पांनी सहजपणे केली.
.






त्यानंतर आप्पांचा निरोप आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन श्विन आणि स्कॉट मोहिमेतील पुढील वाटचालीस निघाले. पहाटे झालेले श्री गणेशाचे दर्शन आणि त्यानंतर झालेले गुरुसमान आणि आदर्शवत अप्पांची भेट (आणि अर्थातच प्रिसिलियाची भेट) यामुळे डोंबिवली गोवा सायकलसफर विनासायास होणार याबद्दल आता श्विनच्या मनात किंचितही शंका राहिली नव्हती.

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

...आणि मुहूर्त सापडला (डोंबिवली पणजी सायकलसफर लेख ३)

श्विनचा जीव ज्या गोष्टीसाठी तळमळत होता तो क्षण जवळ येत होता. आता स्कॉटही श्विनच्या जोडीला असल्याने श्विनला आनंद होत होताच.

संपूर्ण दौऱ्यादरम्यान श्विन किंवा स्कॉट आजारी पडल्या तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी काही सामान आवश्यक होते. श्विनच्या पूर्वी पंक्चर झालेल्या ५ ट्युब मी जपून ठेवल्या होत्या. त्यातील ३ ट्यूबचे पंक्चर काढलेले होते. त्यामध्ये रात्री पुन्हा हवा भरून ठेवली. वेळ पडल्यास किमान ट्यूब बदलून पुढे जायचे असे ठरवल्याने त्यातील २ ट्यूब बरोबर न्यायच्या असे ठरवले. ट्यूब बदलण्यासाठी लिव्हर बरोबर घेतले होतेच.

स्कॉटला कॅरियर मिळाले नव्हते. फार सामान बरोबर घेतले नव्हतेच. तरी ५ दिवस पाठीवर सॅक बांधून सायकलिंग करणे अवघड नसले तरी अनावश्यक होते. श्विन स्कॉट साठी फारसे सामान घेतले नव्हते तसेच आम्हा दोघांसाठीही फार सामान घेतले नव्हते.

सुकमेव्याचे लाडू, सुकामेवा हे इंधन अडीअडीचणीमध्ये उपयोगी पडेल म्हणून घेतले होते. कपडेपट अत्यंत मर्यादित होता. श्विनच्या सॅकमध्ये जागाही होती. त्यामुळे स्कॉटची सॅकच श्विनच्या सॅकमध्ये टाकली होती. गोव्याला फिरायला जाताना दोघांच्या दोन मोठ्या बॅग होत असल्या तरी एकंदर ५-७ दिवसांच्या सायकलसफारीसाठीचे आमचे दोघांचे एकत्रित सामान केवळ एका सॅकमध्ये मावले होते.

हे सगळे सोपस्कार आटपेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. आता उरलेल्या वेळेचा सदुपयोग करून काही वेळ तरी झोप घेणे आवश्यक होते. मनातील उत्सुकता फार वेळ झोप घेऊ देईना. जेमतेम चारेक तास झोप झाली असावी. ह्या चार तासातही झोप सलग लागत होती का! २८ वर्षांपूर्वीपासूनचा चित्रपट श्विनच्या डोळ्यासमोरून जात होता. अविनाशची इच्छा, त्याच्या अकाली निधनाने त्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मला २८ वर्ष सतावत होतेच. ते स्वप्न ह्या चार तासातही पिच्छा सोडत नव्हते. मला आता ते स्वप्न दिवसा साकार करायचे होते. त्याच बरोबर गेल्या चार वर्षातील आलेल्या अडचणी आठवत होत्या. ह्या डोंबिवली गोवा सफारी दरम्यान वाटेत आणखी एक जागृती करायची श्विनने ठरवले होते. ते म्हणजे ३-४ महिन्यात येऊ घातलेल्या २ऱ्या सायकल मित्र संमेलनासंबंधी जागृती. अर्थातच डोक्यातील ह्या सर्व विचारांमुळे या चार तासात आलेली अस्वस्थता आणि पुढील प्रवासाची उत्सुकता यामुळे झोप पार उडून गेली.

सकाळची आन्हिके आटपून पुन्हा श्विनच्या दिमतीला लागलो. रात्री हवा भरलेल्या तीनही ट्यूब टमटमीत होत्या. म्हणजेच तिघीही उत्तम स्थितीत होत्या. मग त्या तिन्हीतील हवा काढून त्यातील एक ट्यूब कपाटात ठेवली. उरलेल्या दोन्हीपैकी एकीची गुंडाळी सॅकमध्ये भरली. आम्हा दोघांचे सामान एकत्र केलेली ती सॅक श्विनच्या कॅरियरला उरलेल्या रबरी ट्यूब ने बांधून टाकले. ती रबरी ट्यूब मध्यभागी श्विनच्या सीटखाली अडकवून त्याची दोन टोके सॅक सहित कॅरियरला बांधल्यामुळे त्या सॅकची आता कॅरियर पासून सुटका होणे अवघड नव्हे अशक्यच होते.

नेपोलियनच्या डिक्शनरी मध्ये नसलेला 'impossible' ह्या शब्दाचा अर्थ त्या रबरी ट्यूब ने त्याला नक्की समजावला असता. असो, त्याच्या नशिबात श्विन नव्हे अश्व होता. त्यामुळे त्याला अशी एखाद दुसरा शब्द गाळलेली 'बकवॉज' डिक्शनरी मिळाली असावी. 

श्विन आणि स्कॉट दोघांच्या हॅण्डलवर घंटेजवळ एकेक विजेरी लावलेली होती. तसेच हॅन्डलपासून आडव्या दांडीवर एकेक पाऊच अडकवलेला होता. त्यामध्ये पाकीट, मोबाइल, थोडा खाऊ, सायकल दुरुस्तीचे छोटे सामान भरले होते. एकंदरीत श्विन आणि स्कॉट डोंबिवली गोवा सायकलसफरीसाठी सज्ज झाले होते. दोघेही २ऱ्या मजल्यावरून सोसायटीच्या आवारात खाली उतरले. अद्याप सूर्यमहाराज उगवले नव्हते. किमान आजतरी श्विनने त्यांच्या पुढे बाजी मारली होती. पुरेसा प्रकाश नसल्याने श्विन स्कॉटने हॅन्डलला लावलेल्या विजेऱ्या सुरु केल्या. अर्थातच गोवा सफरीचा श्रीगणेशा करतानाच क्षण गोठून ठेवण्यासाठी छायाचित्रांचा कार्यक्रम उरकला. 





कोणत्याही गोष्टीची सुरुवात श्रीगणेशाचे दर्शन घेऊन करावी असे म्हणतात. छायाचित्रणाचा कार्यक्रम संपल्यावर श्विन आणि स्कॉट सम्राट चौक मार्गे दीनदयाळ रस्त्यावरील छोटेखानी गणेशमंदिरात गेले. 



पहाटेच्या वेळी गणेशाचे दर्शनामुळे दोघांचा आत्मविश्वास आणि उत्साह नक्कीच वाढला. झुंजूमुझु होत असताना गणेशाचे दर्शन घेऊन आम्ही श्विन स्कॉटकडे वळलो आणि... डोंबिवली गोवा सफारीसाठी सुरुवात करत असताना श्विनच्या हॅन्डलला लावलेले दोन लॅमिनेटेड फलक झळकत होते. एक होता २ऱ्या सायकल संमेलनासंबंधी जागृती करणारा, तर दुसरा होता २८ वर्षापूर्वीचे स्वप्न साकारत असल्याची अनुभूती देणारा






बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१८

अगर किसी चीज को दिल से चाहो तो.... डोंबिवली पणजी सायकलसफर लेख २

सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी शेजारी बसलेली पत्नी असो की युद्धासाठी घरातून निघताना ओवळणारी पत्नी असो, ती साथ करत असते तेव्हा कार्याला यश मिळणे क्रमप्राप्तच असते. खरतरं श्विनला माझी अर्धांगिनी सवतच समजत असे. माझी मुंबई गोवा सायकलसफरीची तळमळ माझ्या अर्धांगिनी पर्यंत पोचत असली तरी तिला पटत नव्हती. त्यातच मी श्विनला घेऊन गोव्याला जायचे प्लॅन दरवर्षी नित्यनियमाने करत होतो. मात्र ते प्लॅन नेहमीच रद्द करावे लागत होते. कदाचित गोव्याला जायच्या माझ्या तळमळीपेक्षा मला जाऊ न देण्याची मीराची (माझ्या अर्धांगिनीची) इच्छा अधिक तीव्र असावी.

नयना आघरकरांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई गोवा सायकलसफर रद्द करावे लागण्यासाठी काहीतरी विधिलिखित नक्कीच होते. जसजशी गोवा सफर पुढे ढकलावी लागत होती तसतशी माझी इच्छा तीव्र होत होती. २०१७ या वर्षी मी ठरवल्याप्रमाणे श्री सुनील गावस्कर यांच्या एकूण कसोटी धावा १०१२२ एवढे किमी अंतर सायकलिंग केल्यावर मी जेवढा आनंदी होतो, तेवढेच माझे स्नेही, मित्र, आप्तजनही खुष झाले होते. खरतर त्या वर्षातील ४-५ महिन्यात सायकलिंग शून्य झाले होते. वर्षाचे शेवटचे २- २.५ महिने राहिले होते तेव्हा सायकलिंग पुन्हा सुरु झाले तरी cycle2work करता येणार नव्हते आणि गावस्करांच्या धावांचे ध्येय गाठण्यासाठी रोजचे ४०-५० किमी सायकलिंग करणे भाग होते. त्यावर तोडगा म्हणून मी ऑफिसला जायच्या आधी सकाळी एक दीड तास आणि ऑफिसमधून घरी आल्यावर एक दीड तास सायकलिंग करायला जात होतो. ह्या काळात माझी अर्धांगिनी- मीरा मात्र एकटी पडत होती. एकंदर  वातावरणाचा परिणाम मीरावरही झाला. जानेवारी २०१८ च्या अखेरीस तिनेही सायकलिंग सुरु करायचे ठरवले. पडत्या फळाची आज्ञा समजून मी ताबडतोब सुमीत मोकल आणि साहिर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार श्विनच्या साथीसाठी स्कॉटची निवड केली.

स्कॉट घरी आल्याबरोबर श्विनला जोडीदार लाभली. सुट्टीच्या दिवशी श्विनबरोबर स्कॉट फिरायला येऊ लागली. मात्र आठवडाभरात इतर दिवशी दोघांची वेळ जुळणे शक्य नव्हते. श्विनला cycle2work साठी सकाळ संध्याकाळ फिरायला मिळत असे. मात्र सकाळी डोंबिवलीहुन निघून मुलुंडला सकाळी ७ वाजता ऑफिसमध्ये पोचणे स्कॉटला शक्य नव्हते. स्कॉटने त्यावर तोडगा काढला. कामावरून आल्यावर ९० फुटी रस्त्यावर फेरफटका मारायचे स्कॉटने ठरवले. स्कॉटची सुरुवातच १५ किमी सायकलफेरीने झाली. सायकलजगतात नव्याने प्रवेश करत असतानाच काही दिवसातच स्कॉटची रोजची २०-२५ किमीची नियमित दौड सुरु झाली. श्विनची गोवा सफर करण्याची इच्छा स्कॉटला माहित होतीच. मात्र श्विनबरोबर गोवासफर करण्याचे मनोमन ठरवून स्कॉटचा दैनंदिन सराव सुरु झाला. स्कॉटचे सातत्य, नियमितता, दृढनिश्चय पाहून श्विनला आनंद न होता तरच नवल. स्कॉटने श्विनबरोबर गोवासफर करण्याचे जाहीर केले, त्याबरोबर आठवड्याच्या शेवटी नियमित लांब पल्ल्याच्या सफर सुरु झाल्या.

मुंबई (डोंबिवली) ते पणजी सायकलसफर करण्याचे निश्चित झाले तरी केव्हा जायचे, कधी जायचे, कोणत्या मार्गाने जायचे हे निर्णय अधांतरी होते. तसे पाहता कोणत्या मार्गाने जायचे याचा आराखडाही श्विनच्या डोक्यात पक्का होता. किनारपट्टीच्या मार्गाने YHAI तर्फे दरवर्षी मुंबई गोवा सफर आयोजित केली जाते. त्यादरम्यान काही प्रवास बोटीनेही करता येतो. मात्र श्विन दुसऱ्या वाहनाच्या पाठुंगळी ठेवून प्रवास करणे फारसे रुचत नव्हते. NH १७ हा दुसरा मार्ग सुद्धा कोकण दर्शन घडवणारा होता. मात्र त्या मार्गाची ऐकीव दशा आणि ऐकीव अवघड घाट यांचा धोका पत्करणेही श्विनला पटत नव्हते. त्यामुळेच मुंबई गोवा सायकलसफरीचा मार्ग श्विनने फार पूर्वीच ठरवला होता तो NH ४ अर्थात पुणे कोल्हापूर मार्गे! विवेक खेताल शी चर्चा करून पुढे आंबोली मार्गे पणजी गाठण्याचेही ३-४ वर्षांपूर्वीच ठरले होते. तेव्हापासूनच कराड येथे श्री विनायक करमरकर, कोल्हापूर येथे विवेक खेताल यांनी डोंबिवली गोवा सायकलसफरीदरम्यान त्यांच्याकडेच मुक्काम करण्याचा प्रेमळ आदेश देऊन ठेवला होता. खरतर महाड येथील डॉ राहुल वारंगे - शलाका वारंगे, पुढे खेड येथे भटक्या खेडवाला म्हणजे विनायक वैद्य, सावंतवाडी येथील डॉ. कशाळिकर या आप्तजनांना भेटण्यासाठी NH १७ पुन्हा पुन्हा खुणावत होता. त्यामुळे जाताना पुणे कोल्हापूर आणि येताना सावंतवाडी खेड महाड असे डोंबिवली-पणजी- डोंबिवली असा दुतर्फा सायकलप्रवास करण्याचे विचार श्विनच्या डोक्यात थैमान घालू लागले.

दरम्यान वैशाख महिना येताच दोघांच्याही सरावात चांगलाच खंड पडला. पुढच्या पावसाळ्याच्या महिन्यात श्विनचे टायर अधूनमधून फुरफुरत असले तरी त्यात 'राम' नव्हता. स्कॉटने तर सराव सर्व पूर्णपणे थांबवला होता. गणेशोत्सव सरत आला. श्विनला धोक्याची घंटा जाणवू लागली आणि श्विन खडबडून जागी झाली. श्विनने पुन्हा सराव सुरु केला आणि स्कॉटलाही निर्वाणीचा इशारा दिला. सरावा अभावी स्कॉटचा आत्मविश्वास कमी पडू लागला होता. मात्र इरादा पक्का होता.

श्विनची दुतर्फा सायकलसफरीची कल्पना स्कॉटने क्षणाचाही विलंब न करता मोडीत काढली तरी पुन्हा सराव सुरु केला. सुट्टीच्या दिवशी एकत्रित सराव तर इतर दिवशी एकेकट्याने सराव पुन्हा सुरु झाला. सुट्टीच्या दिवशी सरावासाठी वेळ कमी असेल तर नेवाळी फाटा येथे फेरफटका ठरलेला होता.  स्कॉटने सायकलिंग सुरु केल्यापासून डोंबिवली तळेगाव राइड दोन वेळा झाली होतीच. त्यामुळे घाट चढण्याचा आत्मविश्वास स्कॉटला असला तरी आता घाट चढण्याचा सराव मात्र राहिला नव्हता. अखेरीस राहिलेले दिवस लक्षात घेत श्विन स्कॉटने आणखी एक लांब पल्ल्याची मोहीम करायचे ठरवले. डोंबिवली महड डोंबिवली अशी जवळपास १३० किमी ची राइड करण्याचे श्विन आणि स्कॉटने ठरवले. दरम्यान चिंचवड येथील निसर्गप्रेमी सायकल समूह जम्मू पासून कन्याकुमारीपर्यंत सायकलिंग करणार असल्याचे समजले होते. त्यांच्या सरावाचा एक भाग म्हणून ते अष्टविनायक सफर करत महड येथे पोचणार असल्याचे समजले. मग दिवसभर एकमेकांच्या वेळेचा अंदाज घेत दोन्ही गटांचे महडच्या दिशेने मार्गक्रमण सुरु होते. श्विन आणि स्कॉट महडपासून सुमारे ३ किमी अंतरावर असताना चिंचवड येथील गट महड येथे पोचला होता. महड देवस्थानाजवळ सर्वांची भेट होताच सर्वजण आनंदीत झाले. प्रथम वरदविनायकाचे दर्शन आणि नंतर ग्रुप फोटो घेऊन सर्वजण पुन्हा आपापल्या वाटेने मार्गस्थ झाले.

एका दिवसात केलेल्या १३० किमीच्या डोंबिवली महड डोंबिवली सायकलिंग मुळे स्कॉटचा आत्मविश्वास नक्कीच वाढला होता.

एव्हाना नवरात्र सुरु झाले होते. गोवा सफरीचा दिवस जवळ येत असताना स्कॉट आणि श्विनची सर्विसिंग करणे गरजेचे होते. यासाठी एकतर कल्याणला साहिरकडे जावे लागणार होते किंवा डोंबिवली मध्ये सुमित मोकलकडे. त्याशिवाय गोवा राइड दरम्यान अनावस्था प्रसंग उद्भवला तर त्यातून मार्ग काढण्यासाठी दुरुस्तीचे कामही शिकून घ्यावे लागणार होते. दरम्यान दसरा उलटेपर्यंत सुमितला वेळ नव्हता. आणि नंतर मात्र गोवा राइड सुरु करेपर्यंत मध्ये फार दिवस शिल्लक राहणार नव्हते. खरंतर दसऱ्यानंतर जेमतेम आठवडा उरला होता. त्यात सोमवारी दुकान बंद असल्याने तो दिवस बाद झाला होता. मंगळवारी सुमितला वेळ नव्हता त्यामुळे बुधवारी स्कॉट आणि श्विन दोन्ही सुमितकडे सर्विसिंग साठी सुपूर्द केल्या. त्यातही सुमित आजारी पडला असल्याने सर्विसिंग गुरुवारवर गेले. शनिवारी गोवा राइड सुरु करायची असल्याने आता केवळ शुक्रवारच मध्ये होता.

गुरुवारी ऑफिसमध्ये असताना सुमितचा फोन आला, " शशांक, तुमच्या सायकलचे पुढील चाक बदलावे लागणार आहे." सुमितने सांगितल्यावर मला चिकित्सा करण्याची गरज नव्हती. मी ऑफिसमधूनच त्याला होकार दिला. मात्र त्यातही अडचण अशी होती की नवीन चाक दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उपलब्ध होणार होते. म्हणजे मला सलग ३ दिवस cycle2work करता येणार नव्हते. शिवाय गोवा राइड साठी आता मध्ये दिवसच शिल्लक राहणार नव्हता..... आता मला थोडी धाकधूक वाटू लागली. मात्र सुमितने शुक्रवारी काम होईल याबद्दल आश्वस्त केले. शुक्रवारी ऑफिसहून मी सुमितकडे गेलो तर अद्याप नवीन चाक आलेच नव्हते. मात्र साहिरने कल्याणहून ते चाक पाठवले असून थोड्याच वेळात सुमितकडे पोहोचेल असे समजले. त्याचबरोबर स्कॉटसाठी एक कॅरियरही येणार होते. दरम्यान सायकल दुरुस्ती शिकण्यासाठी वेळ मिळालाच नव्हता. सुमित दुकान बंद झाल्यावर घरी येऊन शिकवायला येणे हा त्याचा मोठेपणा होता. मात्र मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत मी त्याला दुकानात किमान टायर बदलण्यासंबंधी शिकवण्याबद्दल सांगितले. माझा शैक्षणीक सराव होताच कल्याणहून साहिरने पाठवलेले चाकही पोचले. श्विनचे आधीच्या चाकाच्या ब्रेकचे रबर झिजून आतील धातू घासला गेल्याने ते चाक पार बाद झाले होते. सुदैवाने डॉ सुमीतकडे श्विनला शुश्रूषेला दिल्यामुळे वेळीच धोका ओळखता आला होता. अन्यथा श्विन पुढील चाकासह गोव्याला पोचणे कठीणच होते.

श्विनचे टायर आले तरी स्कॉटचे कॅरियर मात्र उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे दोघांचे सामान एकट्या श्विनलाच बांधावे लागणार होते. सुमितने श्विनवर योग्य उपचार करून श्विनला माझ्या सुपूर्द केले तोवर रात्रीचे ८.३०- ९ वाजले होते. घरी जाऊन आवराआवर करायची होती. सुमितने त्यातही सांगितले की जर काही मदत लागली तर तो आमच्या बरोबर शिळ फाटा पर्यंत येणार होता. घरी येऊन आवराआवर आणि जेवण होईपर्यंत ११ वाजून गेले. हवेचा पंप मी श्विनला आडवा अडकवत असे. हॅन्डलला वायरलॉक अडकवून त्यामध्ये पम्पची आडवी दांडी अडकवायची आणि हवेची नळी सीटखाली गुंडाळून अडकवून टाकायची. म्हणजे हवेचा पम्प श्विनला आडव्या स्थितीत व्यवस्थित अडकला जातो. आम्हा दोघांचे सर्व सामान मिळून केवळ एक सॅक होती जी श्विनच्या कॅरियरवर ट्यूबने बांधायची होती.  रंगीत तालीम म्हणून मी श्विनवर सॅक ठेवून ती ट्युबने बांधली आणि ....ओह, अजून सगळे नष्टचर्य संपले नव्हते....नेहमीप्रमाणे हवेचा पंप श्विनच्या हॅन्डलला लावलेल्या वायरलॉकला अडकवायला गेलो तर लक्षात आले की घाईघाईत निघताना लॉक सुमितच्या दुकानातच राहिले होते. सुमित पहाटे भेटणार होताच. मात्र तिथपर्यंत लॉकला अडकवल्याशिवाय पंप नेता येणार नव्हता. मग पुन्हा सुमितला फोन करून दुकानात बोलावले. रात्री ११ नंतरही सुमितने कोणतेही आढेवेढे न घेता दुकानात येऊन ते लॉक माझ्या सुपूर्द केले. आणि अखेरचा अडथळा दूर करत श्विन मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतली ती केवळ ६ तासात गोवा सफरीवर निघण्यासाठी!

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...