रविवार, २७ एप्रिल, २०२५

पहिला मुक्काम: कोलकाता चेन्नई सायकलसफर

झोप आणि भूक ह्या खऱ्या मूलभूत गरजा आहेत ह्याचा साक्षात्कार आम्हाला आज होत होता. सकाळी शांत झोप झाल्यामुळेच आम्ही ताजेतवाने झालो होतो. आणि आता भूक भागल्यामुळेच पुन्हा एकदा पुढील चढाईसाठी सज्ज झालो होतो. सकाळपासून आम्हाला येणाऱ्या अनुभवांमुळे सायकल चालवणे कमी आणि थांबे किंवा विश्रांतीच जास्त झाली होती. त्यामुळे आता सलग लांब पल्ल्याचे सायकलवणे करण्याला पर्याय उरला नव्हता.

आनंदच्या आणि माझ्या सायकलची शुश्रुषा व्यवस्थित झाल्यामुळे त्या दोघीही आता छान साथ देऊ लागल्या होत्या. मी, संजय आणि आनंदने आता मात्र चांगला वेग घेतला. खरतर आमचे जेवण होऊन आम्ही पुन्हा सायकलवणे सुरू करेपर्यंत चार वाजले होते. मुंबईकरांची ती तर चहाची वेळ! पण आम्ही नेमके जेवण आटोपले होते. 

तिघांनीही आता छान लय साधली होती. मात्र हे काय? तासाभरातच सुर्य अस्ताला जात असल्याच्या खुणा दिसू लागल्या. मात्र आजची राहण्याची कोणतीही सोय झाली नव्हती. खरगपूर येथे हॉटेल मिळू शकेल असे वाटत होतेच. शिवाय तिथे रामकृष्ण मठही होता. वेळ पडल्यास त्यांनाही विनंती केली असती. मात्र खरगपूरला जाऊन हॉटेल शोधण्यासाठी तिथे उजेडात पोचणे आवश्यक होते. आता ती शक्यता धूसर झाली होती. त्यामुळे मी गुगलबाबांच्या मदतीने वाटेत कुठे हॉटेल मिळू शकेल ह्याची चाचपणी केली. वास्तविक खरगपूर च्या साधारण १५- २० किमी आधी चेन्नईकडे जाणारा महामार्ग वळतो. त्यामुळे खरगपूरला न जाता तिथेच एखादे हॉटेल मिळाले तर हवे होते.

आम्ही देबरा गावाजवळ पोहोचलो. साधारण सलग ४० किमी अंतर पार झाले होते. संध्याछाया केव्हाच लोपल्या होत्या. गाव तसे फारच छोटेसे. साधारण २५०० लोकवस्ती. एक चहाचे दुकान मात्र हमरस्त्याला लागून होते. चहा तर हवाच होता. आम्ही चहा घेत असतानाच आजूबाजूचे लोक कुतुहलाने आमची चौकशी करत होते. खरगपूर शहरातील एक युवक कामावरून कोलकात्याच्या दिशेकडून खरगपूरला त्याच्या दुचाकीवरून परत जात होता. तोही आम्हाला सामील झाला. त्याने आम्हाला सांगितले की साधारण २० किमी वर तुम्हाला राहायला चांगले हॉटेल मिळेल. त्यामुळे आम्हाला नक्कीच हायसे वाटले. त्याने आम्हाला चहाचे पैसेही देऊ दिले नाहीत. 

एव्हाना चांगलाच अंधार पडला होता. आम्ही सायकलींचे दिवे सुरू केले. संजयने आता आघाडी घेतली. मी मध्ये राहिलो आणि आनंद मागे होता. आनंद थोडा मागे राहत असल्याने मी वेग कमी केला. एक नियम मी ठरवला होता. पुढील सायकलपटू पुढे निघून गेला तरी त्याला गाठायचा प्रयत्न न करता मागील सायकलपटूला साथ करायची. ह्याचे कारण पुढील सायकलपटूला काही झाले तरी आपण मागून जाणारच असतो. मात्र मागील सायकलपटूला काही झाले तर कळणारही नाही. संजय थोड्याच वेळात दिसेनासा झाला. 

मी आणि आनंदने आता हॉटेल शोधायला सुरुवात केली. एवढ्या महत्वाच्या महामार्गावर हॉटेल दिसतच नव्हते. एक साधारणसे हॉटेल दिसल्यावर आम्ही तिथे शिरलो. राहण्याची व्यवस्था विचारल्यावर त्यांनी लगेचच होकार दिला. आम्ही संजयला परत मागे येण्यासाठी फोन करणार इतक्यात त्या स्वागत कक्षातील इसमाने महत्वाची माहिती दिली. तो म्हणाला तुम्हाला जी रूम मिळणार आहे तिथे रात्री १२- २ वाजेपर्यंत आवाज येत राहतील. आम्हाला काही कळेना. तो पुढे म्हणाला रात्री छतावरून आवाज येत राहतील. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. त्याने पुढे पुस्ती जोडली. इथे रात्री नाचण्याचे कार्यक्रम असतात. त्यांच्या पायांचे आणि संगीताचे आवाज येत राहतील. हे सगळे सांगताना माझ्या बाजूला आनंद उभा होता. तो आता निवृत्त झाला असला तरी त्याचे पद कळल्यावर तो हॉटेलवाला हे सांगू शकला असता का ह्याचे मला कोडे पडले होते. 

त्या इसमाचे स्पष्ट माहिती दिल्याबद्दल आभार मानून आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात संजयचा फोन आला. पूर्ण अंधार होता आणि जवळपास खुण सांगता येईल असे काहीही ठिकाण नव्हते. त्यामुळे तो आणि आम्ही ह्यांच्या मध्ये किती अंतर पडले होते हे सांगता येत नव्हते. मी संजयला आहे तिथेच थांब असे सांगितले आणि पुढे जाण्यासाठी सज्ज झालो. आनंदला सांगितले चल सुरू करूया. अंधारात मागे आनंदच्या सायकलचा दिवा दिसत होता. मात्र त्याची सायकल सुरू होताना दिसत नव्हती. मी हाका मारून पाहिल्या तर प्रत्युत्तरच मिळेना. मग मात्र मी फुजीला रस्त्याच्या कडेला थांबवून आनंदच्या सायकलकडे गेलो. पाहतो तर ती बिचारी एकटीच तिथे उभी होती. त्यावरील स्वार गायब झाला होता. अंधारात काहीच कळत नव्हते. एक फुटावरीलही काही दिसत नव्हते. अखेर मी थोडा मागे गेलो तर आनंद फोनवरून संजयशी बोलत होता. मी त्याला निघायची घाई करू लागलो. तर तो म्हणाला संजय आपल्या मागे आहे. आपण थांबूया तो येईपर्यंत. मी म्हटले हे शक्यच होणार नाही. तो रस्ता सोडून कुठे वळला असेल तरच आपण त्याला मागे टाकू शकलो असतो. आम्ही उभे होतो त्या हमरस्त्याच्या पलीकडे एक छोटेसे हॉटेल होते. त्याच्या नावावरून एका स्थानिकाने संजयला आम्ही मागे असल्याचे सांगितले असे आनंद म्हणू लागला. मी पाहिले तर ते अगदीच छोटे हॉटेल होते आणि नाव अगदीच सर्वसाधारण होते. मी ह्यावर ठाम होतो की संजय मागे राहू शकत नाही कारण आम्हीच बऱ्यापैकी मागे होतो शिवाय वाटेत एका हॉटेलमध्ये चौकशी साठीही थांबलो होतो. संजय मात्र न थांबता पुढे गेला होता. तरीही आनंद पुढे यायलाच तयार नव्हता. मी संजयला त्याचे लोकेशन पाठवायला सांगितले. आनंदचे म्हणणे होते की आपण स्थानिकांवर विश्वास ठेवायला हवा. मात्र ते हॉटेल इतके छोटे होते की तेवढ्या माहितीवर ते स्थानिक लोक योग्य माहिती देऊ शकतील ह्याची मला खात्री वाटत नव्हती. अशा नावाची दोनचार इतर हॉटेल इथे असली तर! शिवाय संजय मागे राहण्यासाठी कोणतीच शक्यता नव्हती. ह्या सगळ्या गोंधळात वेळ मात्र वाया चालला होता. शेवटी मी आनंदला म्हटले आता पूर्ण रात्र रस्त्यावर काढायची वेळ येईल. मला हे नक्की माहीत आहे की संजय आपल्या पुढेच आहे. संजयलाही मी सांगितले तू आमच्या मागे असणे अशक्य आहे त्यामुळे आहे तिथेच थांब. शेवटी अर्धा तास तिथे गेल्यावर आनंद पुढे यायला तयार झाला. जेमतेम २-४ किमी अंतरावर पुढे संजय दिसला. आता मात्र मी पुढे राहिलो. कारण संजय पुढे असताना मागे वळून बघत नव्हता आणि पुन्हा अश्या गोंधळात वेळ घालवायला माझी तयारी नव्हती. मात्र लगेचच मला संजयची अडचण लक्षात आली. अंधारात मान वळवून बघणे शक्य नव्हते. मात्र मी आता अगदी कमी वेगात जात ते दोघेही मागे आहेत ह्याची थोड्या अंतरात थांबून खात्री करत जाऊ लागलो. 

चेन्नईकडे जाताना खरगपूरच्या आधी २० किमी अंतरावर एक फाटा फुटतो तिथे एक हॉटेल आम्हाला दिसले. अक्षरशः वाळवंटात मृगजळ दिसावे अशी माझी अवस्था झाली होती. कोलकाता पासून असे मोठे हॉटेल दिसले नव्हते. ग्रीनलँड टॉवर ह्या हॉटेलपाशी जाताच ते थोडे महागडे हॉटेल असल्याचे जाणवले. 

मी थोडी घासाघीस केली. त्यांना आमची मोहीम आणि मोहिमेचा उद्देश सांगितला. आनंद आणि संजय हॉटेलच्या आवारातच यायला तयार नव्हते. शेवटी मीच बाहेर गेलो आणि त्यांना भाडे सांगितले. आनंदने ते भाडे ऐकताच नकार दिला. तो म्हणाला आपण जवळपास राहायची दुसरी काही व्यवस्था होते का ते पाहू. मी त्याला म्हटले आत्ताच रात्रीचे ९ वाजून गेले आहेत. हे ठिकाण मुंबईच्या १ तास पुढे आहे. म्हणजे मुंबईच्या दृष्टीने रात्रीचे १० वाजले आहेत. आज आपण जवळपास सव्वाशे किमी अंतर पार केले आहे हे खरं. मात्र आजचे राहिलेले ३० किमी उद्या भरून काढायचे तर उद्या १८० किमी अंतर पार करावे लागेल. त्यासाठी पहाटे ६ ला निघावे लागेल. ह्या सगळ्याच्या विचार करता आपल्याला ताबडतोब विश्रांती आणि झोप घेण्याची गरज आहे. शिवाय इथे आसपास कोणतेही हॉटेल सापडण्याची शक्यता नाही. अखेरीस आनंद तिथे राहायला तयार झाला.

आम्ही रूम मध्ये विसावलो आणि मी दिवसभरातील 'काय आप्पा ' वरील संदेश पाहू लागलो. मोनिकाचा संदेश आला होता की माझी मुंबई एअरपोर्टला हरवलेली बॅग सापडली आहे... दिवसभरातील शीण पूर्णपणे उतरला. त्या आनंदात रात्रीचे जेवण माझ्याकडून असल्याचे जाहीर केले. अखेर म्हणतात ना ज्याचा शेवट गोड ते सगळेच गोड... तशीच आजच्या दिवसाची सांगता नक्कीच चांगली झाली होती. पहिला मुक्काम आरामदायी आणि आनंदाचा होता.

रविवार, २० एप्रिल, २०२५

पंचतारांकित क्षुधाशांती: कोलकाता चेन्नई सायकलसफर

मुंबईहून कोलकाता येथे आम्ही विमानाने तर आमच्या सायकली रेल्वेने आल्या होत्या. बहुधा त्यामुळे त्या सायकली आमच्यावर रुसल्या होत्या. आनंदची सायकल पुन्हा पुन्हा तिला रेल्वेने कसा त्रास दिला हे आम्हाला जाणवून देत होती. तिच्या मागच्या चाकाने परत एकदा सरळ रेषेत चालायला नकार दिला. त्यातच आमच्या सामानाची ओझीही मागच्या चाकावर असलेल्या कॅरीयरवर लादलेली होती. त्यामुळे आनंदच्या सायकलचा त्रागा आणखीच वाढला होता. आनंदने परत मला जवळपास डेकाथलॉन दुकान शोधायला सांगितले. कोलकाता सोडल्यानंतर आम्हाला मोठे शहर बहुधा लागलेच नव्हते. त्यामुळे इथे डेकाथलॉन शोधणार तरी कुठे?

सुदैवाने जवळच हमरस्त्यावर बाजार लागला. आनंदने एका इसमाला डेकाथलॉन विचारले. त्याला बंगालीखेरीज बहुधा कोणतीच भाषा येत नसावी.  मी तेथील माणसांना न्याहाळत आम्हाला कोण मदत करू शकेल ह्याचा अंदाज घेत पुढे जात होतो. इतक्यात मला एक इसम दिसला. त्याच्याकडे पाहून मला असे वाटले की हा बहुधा खेळासंबंधी माहिती देऊ शकेल. त्याचे कपडे इतरांपेक्षा थोडे निराळे होते, पायात स्पोर्ट्स शुज होते. सुदैवाने माझा अंदाज खरा ठरला. मी त्याला डेकाथलॉनचे दुकान विचारताच तो म्हणाला इथे जवळपास डेकाथलॉन दुकान तर नाही. त्याने आमच्या सायकली पाहिल्या होत्याच. त्यामुळे त्याने लगेचच पुढे सांगितले मात्र इथे पुढे शहरात गेलात तर तिथे तुम्हाला बेरा सायकल शॉप दिसेल. तिथे सायकलच्या चाकाचे out काढून मिळेल का ह्याची शंका आम्ही व्यक्त करताच त्याने अगदी खात्रीपूर्वक होकार दिला. त्याचे आभार मानून आम्ही पुढे निघालो. डावीकडे वळण घेत आम्ही बागनान शहरामध्ये शिरलो.

हावडा जिल्ह्यातील बागनान हे शहर कोलकातापासून साधारण ५० किमी अंतरावर आहे. दामोदर आणि रुपनारायण ह्या दोन नद्यांच्या मध्ये हे शहर वसलेले आहे. शहर तसे आटोपशीर... खरतर ह्याला शहर म्हणावे की खेडेगाव...! जेमतेम १५००० च्या आतबाहेर लोकवस्ती. मात्र येथील बागनान हायस्कूल १८५४ सालातील आहे... म्हणजे तब्बल १७० वर्ष जूने आहे. बहुधा ह्यामुळेच येथील साक्षरता प्रमाण ८५% पेक्षा जास्त आहे.

आम्ही शिरलो तो शहरातील रस्ता अरुंद होता. बहुधा हा बाजारातील मुख्य रस्ता होता. दोन्ही बाजूला ओळीने दुकाने होती. रस्ताही चांगलाच गजबजलेला होता. आम्ही आता चालण्याच्या गतीने सायकल चालवत होतो. वाटेत एक शाळा होती. आम्ही नेमके शाळा सुटण्याभरण्याच्या वेळेस शहरात शिरलो होतो. रस्त्यावरच्या गजबजाटात शाळेच्या विद्यार्थ्यांचीही भर पडली होती. वाटेत विश्वकर्मा सायकल मार्ट हे सायकलचे छोटे दुकान दिसले. मला शंका आली की इथे आपले काम होणार नाही. मी बेरा सायकल शॉप च्या शोधत पुढे निघालो. आनंद मात्र विश्वकर्मा सायकल मार्टपाशी थांबला. तेथील दुकानदाराने काम होईल असे सांगितले. दुकानात आणखी एका सायकलचे काम सुरूच होते. रस्ता इतका अरुंद होता की आम्हा तिघांच्या सायकल दुकानाबाहेर उभ्या करायला जागाच नव्हती. खरतर सायकलच काय मला आणि आनंदला उभे राहायलाही जागा नव्हती. संजयने थोडे मागे रस्त्याच्या पलीकडे त्याच्या सायकलसह जागा मिळवली.






दुकानदाराचे इतर काम सुरू होतेच त्याबरोबर त्याने आमची माहिती घेतली. आम्ही मुंबईहून आलो आहोत हे ऐकताच तो खुष झाला. त्याची मुलगी अंबरनाथ येथे राहते. थोड्याच वेळात विश्वकर्मा ह्यांचा मुलगा तिथे आला आणि विश्वकर्मा तेथून निघून गेले. तेथील कामगाराने एव्हाना आनंदच्या सायकलच्या चाकावर लक्ष केंद्रित केले होते.



ज्युनिअर विश्वकर्मा आमची माहिती घेत होताच त्याबरोबर त्याच्या संपूर्ण घराण्याची आणि त्यांच्या दैनंदिन कारभाराचीही माहिती देत होता. दोघेही बापलेक सकाळी आश्वशक्तिधारी दुचाकी वापरतात आणि संध्याकाळी मात्र मनुष्यशक्तीधारी दुचाकी म्हणजे सायकल वापरतात. त्याने स्वतः MBA केले होते. मात्र त्या जोरावर नोकरी पत्करण्यापेक्षा त्याने वडिलांच्या सायकलच्या दुकानातच लक्ष द्यायला सुरुवात केली होती. अर्थात त्याला त्याचा अभिमानच होता. त्याची इतकी अखंड बडबड सुरू होती की त्यामुळे आम्हाला आमचेच तोंड दुखायला लागले की काय असे वाटू लागले. मात्र तो अतिशय आस्थेने, आपुलकीने बोलत होता. त्याला आमच्या मोहिमेविषयी कळकळ वाटत होती. 



खरतर पोटातील कावळ्याचे काय करायचे हा प्रश्न सतावत होताच. त्याला शहरात कोणते चांगले हॉटेल आहे का असे विचारताच तो म्हणाला, बागनान शहर सोडल्यावर कोलाघाट येईपर्यंत धाबे दिसतील त्यानंतर फक्त पंचतारांकित हॉटेल दिसतील. आम्हाला पंचतारांकित नव्हे तर लवकरात लवकर क्षुधाशांती करेल असे सर्वसाधारण हॉटेल हवे होते.

आनंदच्या सायकलची शुश्रुषा होताच आम्ही त्याने सांगितलेले धाबे शोधत निघालो. आमच्या दुर्दैवाने त्याने सांगितलेले कोणतेही धाबे न दिसताच कोलाघाट दिसला. आता आम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये सायकल कुठे ठेवायच्या आणि पैसे कसे वाचवायचे ह्याचा विचार करत पुढे जाऊ लागलो. जवळपास ३ वाजायच्या सुमारास मात्र मला रस्त्याच्या बऱ्याच आतमध्ये एक ढाबा दिसला. रस्त्यापासून ढाबा बराच आत होता आणि मध्ये मोकळे आवार होते. रस्त्यावर एक लष्करी गाडी आणि एक पोलीस गाडी दिसत होती. दोन्ही गाड्या रिकाम्याच होत्या. त्यातील प्रवासी त्या धाब्यामध्ये क्षुधाशांती करायला गेले होते. हे पाहताच मी ठरवले आम्हाला पाहिजे असे हेच ते जगातील सर्वोत्तम जेवायला मिळण्याचे ठिकाण! जवळपास दुसरे कोणतेही हॉटेल नव्हते. बहुधा ज्युनिअर विश्वकर्मा ज्याला पंचतारांकित हॉटेल म्हणत होता ते हेच असावे. त्याच्या आणि आमच्या संकल्पनेमध्ये बहुधा थोडासा फरक असावा.

आम्ही पायउतार होऊन आमच्या सायकलींना विश्रांती दिली. समोर पाण्याचे तीनचार नळ रांगेत लावलेले होते. त्यातील पाणी पायावर, चेहऱ्यावर मारून आधी आम्ही थोडे शांत झालो. आवारात टेबल खुर्च्या टाकलेल्या होत्या. तसेच आतमध्येही बसायची सोय होती. मात्र एकतर नैसर्गिक वारा लागावा आणि सायकलवरही लक्ष राहील अशा दुहेरी उद्देशाने आम्ही बाहेर बसूनच क्षुधाशांती करायचे ठरवले. जेवणाची चव छान होती. खरतर उन्हे कलायला लागेपर्यंत भुकेले राहिल्यावर मिळणारे जेवण पंचपक्वांनांसारखेच वाटत होते. बहुधा विश्वकर्माने हे ओळखूनच कालाघाटनंतर पंचतारांकित हॉटेल दिसतील असे सांगितले असावे.

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

अडथळ्यांची साथ: कोलकाता चेन्नई सायकलसफर

टोल ओलांडून आम्ही पुढे निघालो खरे. मात्र पुढे रस्ता थोडा अरुंद आणि खडबडीत दिसत होता. कोलकाता चेन्नई महामार्ग हाच असेल ह्याची खात्री वाटत नव्हती. दोन महानगरांना जोडणारा रस्ता इतका साधारण अवस्थेत कसा काय? तिथे गावात पुन्हा चौकशी केली. त्यांनी आमचा मार्ग बरोबर असल्याचे सांगितले. मात्र मनात शंकेची पाल चुकचुकत होती. आता आम्ही थोड्या धीम्या गतीनेच जात होतो. हा कोना महामार्ग होता. कोना गाव जवळ येत असताना लांबवर एक उड्डाणपूल दिसू लागला. त्या उड्डाणपुलाखाली काटकोनातून एक रस्ता जात होता. उड्डाणपुलाशेजारून एक छोटा रस्ता त्या काटकोनात जाणाऱ्या रस्त्याला मिळत होता. 

चेन्नईला जाणारा मार्ग नक्की कोणता ह्याचा फलक तिथे नव्हता. जवळपास कोणी दिसत नव्हते. मी थोडे वेगात जाऊन उड्डाणपूल चढून अंदाज घ्यायचा ठरवले. उड्डाणपूल चढलो. खालील काटकोनात जाणारा रस्ता चांगलाच प्रशस्त आणि उत्तम अवस्थेत होता. बहुधा हाच चेन्नई कडे जाणारा महामार्ग असावा अशी खात्री वाटू लागली. तरीही एका मोटारसायकलस्वाराला थांबवून खात्री करून घेतली. संजय आणि आनंद अजून उड्डाणपूल चढले नव्हते. मी पटकन मागे आलो आणि आम्ही उड्डाणपुलाशेजारील रस्त्याने त्या पुलाखालील काटकोनात जाणाऱ्या रस्त्याला लागलो. आता आम्ही कोना महामार्ग सोडून कोलकाता सुरत/ कोलकाता मुंबई महामार्गाला लागलो होतो. एव्हाना भूकही लागली होती. जवळपास एखादे छान हॉटेल पाहणे गरजेचे होते. मात्र तसे काही चिन्ह दिसेना. घड्याळबाबा दहा वाजल्याचे सांगत होते. आनंदला दहाची नाश्त्याची वेळ साधायची होती. मला रस्त्याच्या बाजूला एक गाडीवर काही लोक खाताना दिसले. तिथे जाऊन चौकशी केली तर फार काही मिळत नसल्याचे लक्षात आले. एकही ओळखीचा पदार्थ दिसेना. खायला काय मागायचे हेच कळेना. तिथे दोन पोलिसही उभे राहून क्षुधाशांती करत होते. त्या गाडीवाल्याने सातूच्या पिठाचा एक पातळसर पदार्थ आम्हाला खायला घातला. त्या दोन पोलिसांशी माझ्या गप्पा सुरू होत्या. गाडीवाला आणि आसपासच्या लोकांना  हिंदी तोडकीमोडकीच येत असावी. मात्र ते पोलिस दुभाष्याचे काम करत होते. 

क्षुधाशांती झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही महामार्गाला लागलो. दोनेक तास सायकल चालवली असताना अचानक मला मागचे चाक जड वाटू लागले. हवा थोडी कमी वाटली. शंका आली की बहुधा हे puncture असणार. पंप मारून हवा भरली, मात्र पुन्हा हवा कमीच वाटू लागली. सुदैवाने जवळच फुलेस्वर हे गाव होते. तिथे चौकशी करताच puncture चे दुकान रस्त्याच्या पलीकडेच असल्याचे समजले. मध्यानाची वेळ झाली होती. मात्र आता भुकेपेक्षा सायकलची काळजी जास्त होती. दुकानदाराला आमची मोहीम समजताच त्यानेही लगेच काम सुरू केले. संजयला माझी चहाची हाव माहीत होतीच. सातूच्या पिठावर त्या गाडीवाल्याने चहा पिऊन दिला नव्हता. मात्र संजयने puncture चे काम सुरू असताना चहाची सोय केली. खापराच्या वाटीसारख्या पात्रात असलेल्या त्या चहाला खरपूस मात्र छान चव आली होती. दुसऱ्यांदा चहा प्यायचा मोह आवरता आला नाही.

इतक्यात आमच्या सायकली आणि जर्सी पाहून एक माणूस आमच्यापाशी आला. आम्ही मराठी आहोत हे पाहून तो आणखीच खूष झाला. तो पूर्वी नागपूर येथे कामाला होता. त्याच्याशी गप्पा चांगल्याच रंगल्या. मात्र साधारण १ वाजला असताना जेमतेम ४० किमी अंतर पार झाले होते... आणि आमचे मूळ ध्येय होते १५० किमीचे.. अर्थात अजून १०० किमी तरी पेडल मारायचे होते. तेव्हा गप्पा आटोपून आम्ही पुन्हा स्वार झालो. थोडे पुढे जातो तोच आनंदच्या सायकलचे मागचे चाक पुन्हा एकदा सरळ रेषेत जायचे नाकारू लागले. आमच्या प्रवासाला येणारे अडथळे नेमाने येत होते. अडथळ्यांची आणि आमची साथ सुरूच होती. मात्र जेव्हा अडथळे येतात तेव्हा त्यांना दूर करणारे हातही सापडतात. किंबहुना असे अडथळे हे नवीन ओळखीची संधीच असतात...

रविवार, १३ एप्रिल, २०२५

गोंधळात गोंधळ.. कोलकाता चेन्नई सायकलसफर



ज्यासाठी केला होता अट्टाहास तो आमच्या मोहिमेच्या शुभारंभाचा दिवस उजाडला खरा. मात्र आदल्या दिवसाच्या दगदगीमुळे आम्ही मुहूर्ताची वेळ गाठण्याची घाई केली नाही. किंबहुना आम्हाला इतकी शांत झोप लागली होती की पहाट झालेली समजलेच नाही. आम्ही उठलो तेव्हा डॉ केळकर आणि त्यांच्या पत्नीही उठल्याच होत्या. आमची झोप खरोखरच खूप छान झाली होती. आदल्या रात्री तो अंदाज आल्यामुळे आम्ही बेलूर मठा ऐवजी डॉ केळकर ह्यांच्या घरापासूनच सुरुवात करायचे ठरवले होते.  बेलूर मठ येथील संपर्क क्रमांक संस्थेला विनंती करूनही मिळाला नव्हता त्यामुळे त्यांना काहीही कळवता येत नव्हते.बिकाश शहा आणि त्यांच्या सायकल समूहातील सभासदांना तसा निरोपही पाठवला होता. तसेच उशीर होण्याचा अंदाज आल्यामुळे आमचा शुभारंभ तासभर पुढे ढकलल्याचेही कळवले होते.

सकाळी आम्ही अगदी आरामात आवरले. पुढील दिवसात राहण्याची आणि जेवणाची इतकी छान व्यवस्था होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे केळकरांकडील पाहुणचाराचा अगदी मनपूर्वक आनंद घेतला. त्यांच्या घरी आलेल्या पक्ष्यांशी आनंदने संवाद साधला. तेही त्याला प्रत्युत्तर देत होते. आवारातील फुलझाडे, वृक्ष ह्यांच्याभोवती फेरफटका मारला. डॉ केळकर अगदी उत्साहाने आम्हाला तेथील बागेची माहिती देत होते.





 चहापान करून आम्ही सज्ज झालो. डॉ दांपत्याने उत्साहाने आम्हाला मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 



आणि .. आम्ही तिघांनीही पहिले पेडल मारले. सायकलींच्या मागील बाजूस कॅरीयरवर सामान लावलेली पॅनियर्स दोन्ही बाजूस लावलेली होती. आमची सुरुवात अतिशय संथगतीने झाली होती. गुगलबाबांच्या मदतीने मी नकाशा पाहत पुढे जात होतो. संजय आणि आनंद मागून येत होते. थोड्याच वेळात आम्ही गल्लीबोळ मागे टाकले. पुढे नदीवर एक मोठ्ठा पूल दिसत होता... हा होता हुगळी नदीवरील विद्यासागर सेतू. 



कोलकाता महानगर प्रदेशात हुगळी नदीवर बांधलेला हा दुसरा पूल होता. म्हणूनच कोलकाता आणि हावडा शहरांना जोडणाऱ्या ह्या विद्यासागर सेतुला दुसरा हुगळी पूल असेही म्हटले जाते. हा हुगळी नदी पूल प्रकल्प आयुक्तांच्या (HRBC) नियंत्रणाखाली सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचा संयुक्त प्रयत्न होता. ह्या पुलाची बांधणी करण्यासाठी ₹३८८ कोटी खर्च आला. १९९२ मध्ये विद्यासागर सेतूचे उद्घाटन झाले त्यावेळी हा भारतातील पहिला आणि सर्वात लांब केबल-स्टेड पूल होता. सहा मार्गिका असलेल्या ह्या पुलाची लांबी ८२२.९६ मीटर (२,७०० फूट) आहे. त्याचे नाव शिक्षण सुधारक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या नावावर ठेवण्यात आले. 

पुल समोर दिसताच आमचा उत्साह वाढला. नदीवरून आम्ही पुढे गेलो. माझा समज असा होता की आता आम्हाला लगेचच मोठ्ठा हायवे लागेल आणि आम्ही अगदी सहजतेने आणि वेगात पेडल मारत जाऊ. थोड्याच वेळात आणखी एक पुल दिसत होता. रस्ता मोकळा आणि प्रशस्त होता. तिथे टोलही दिसत होता. अर्थातच आम्हाला त्या टोलशी काही घेणे देणे नव्हते. टोल मागे टाकून आता वेग घ्यायला काही हरकत नव्हती. टोल पार केल्यावर मात्र एक चक्राकार वळण दिसत होते. आम्ही ज्या टोल महामार्गावरून आलो होतो त्याच्यावरच हे वळण रस्ते होते. तिथे इतके मार्ग होते की नक्की कोणता रस्ता धरावा ह्याचा नेमका अंदाज येत नव्हता. गुगलबाबा काय सांगत होते तेही कळेना. सुदैवाने पुलावर एक पोलिस दिसला. त्याला मी चेन्नईकडे जाणारा रस्ता विचारला. बहुधा त्याला नीट समजले नसावे. मी चौकशी करत असताना आनंद आणि संजयदेखील माझ्याजवळ येऊन पोचले. त्या पोलिसाने आम्हाला वळण घेऊन उजवीकडे जायला सांगितले. पोलिसाने सांगितल्यामुळे मी निर्धास्त झालो. पुढे पुन्हा एक प्रशस्त रस्ता लागला. संजय आणि आनंद थोडे मागे राहिले होते. पुढे आणखी एक पुल दिसू लागला. हा पुलसुद्धा लांबलचक आणि आधीच्या पुलासारखाच दिसत होता. मी पुल ओलांडून संजय आणि आनंदची वाट पहायचे ठरवले. पुल संपल्यावर एक उतार दिसू लागला... मात्र मला दिशेची खात्री वाटेना. संजय आणि आनंद मागोमाग येत होते. मी एका मोटारसायकल वाल्याला थांबवले आणि चेन्नईची दिशा विचारली. तो म्हणाला तुम्ही बरोबर उलट दिशेने जा. आम्ही त्या चक्राकार वळणाच्या चक्रव्युहात अडकून बहुधा तोच पूल उलट दिशेने परत ओलांडला होता. आनंद आणि संजय येताच मी त्यांनाही तसे सांगितले. आनंदही मला तेच सांगत होता. आम्ही तिघेही गोंधळलो होतो. पुन्हा एकदा खात्री करायचे ठरवत आम्ही थोडे मागे फिरलो. मागे पडलेला टोल पुन्हा दिसू लागला. तिथे एका माणसाला विचारले.. तर त्याने प्रतिप्रश्न केला तुम्हाला दिल्ली मार्गाने जायचे आहे की बॉम्बे (मुंबई) मार्गाने? आम्हाला तर चेन्नईला जायचे होते. त्याला म्हटले दिल्ली मार्ग असो की मुंबई मार्ग.. जो मार्ग प्रशस्त, खड्डेरहित असेल तो सांगा. त्यानेही आम्हाला आमची दिशा चुकल्याचे सांगितले. त्याने सांगितले की इथून रस्त्यांच्या पलीकडे जाऊन उलट दिशेला जात टोल पुन्हा ओलांडा. गुगलबाबा काय सांगत होते ते लक्षात येत नव्हते. अखेर आम्ही परत टोल ओलांडला आणि चौकशी केली. तिथे पुन्हा मुंबई मार्ग आणि दिल्ली मार्ग पैकी कोणता मार्ग हवा म्हणून विचारले गेले. आमची विनंती एवढीच होती की चेन्नईला जाणारा जवळचा मार्ग कोणता असेल तो सांगा. आनंद मला विचारू लागला आज आपण कुठे मुक्काम करायचा आहे. खरतर मला आज १५० किमी गाठून महामार्गावर जे हॉटेल सापडेल तिथे रहायचे होते. अगदी पेट्रोल पंपावर देखील रहावे लागेल हेही मी दोघांना आधी सांगितले होते. आनंदला आज खरगपूर जवळ कुठे तरी राहू असे सांगितल्यावर तो खरगपूरला जाणाऱ्या रस्त्याची चौकशी करू लागला. मात्र खरगपूरच्या आधी चेन्नईला जायला एक वळण आहे..त्यामुळे मी त्याला म्हटले खरगपूर नव्हे चेन्नईची चौकशी कर. नाहीतर आम्ही दुसऱ्याच रस्त्याने खरगपूरला पोचून उद्याचे अंतर २५-३० किमी ने वाढवण्याची भीती होती. 

आम्ही स्वतः इतके गोंधळलो होतोच त्यात हे मुंबई मार्ग की दिल्ली मार्ग हे पर्याय आमचा गोंधळ आणखीच वाढवत होते.

रविवार, ६ एप्रिल, २०२५

सुहृदांची साथ: कोलकाता चेन्नई सायकल सफर

कोलकाता रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडत असताना वेष्टण काढल्यावर आनंदला मागचे चाक व्यवस्थित नसल्याचे जाणवले. तेथील चौकीदाराकडे आम्ही तक्रार दाखल केली. रेल्वेच्या चाकांनी आनंदच्या सायकलच्या चाकाची चाल बदलवली होती. आमचा बराच वेळ आधीच पार्सल ऑफिस शोधण्यात गेला होता. आम्हाला केळकरांकडे जाऊन सामान घेऊन परत बेलूर मठ गाठायचा होता.

मात्र आनंदची सायकल त्यासाठी तयार नव्हती. आनंद आणि संजय ह्यांना त्यांच्या सायकलची वेष्टण काढायला सांगून मी स्टेशन जवळील सायकल दुरुस्ती दुकान शोधू लागलो. आम्ही कोलकाता चेन्नई सायकल प्रवासाचे जर्सी घातल्यामुळे जाणारे येणारे लोक आमच्यापाशी थांबून विचारपूस करत होते, आम्हाला शुभेच्छा देत होते. खरतर आनंदच्या सायकलला त्या शुभेच्छांची गरज जास्त होती. 

मला ड्रीम बाईकचे शाह ह्यांची आठवण झाली. त्यांनी लगेचच सर्व मदत करण्याची खात्री दिली. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. ते स्वतः ओरिसामध्ये पुरी जवळ एका मोठ्या सायकल महोत्सवासाठी गेले होते. एका टीमची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र त्यांचा भाऊ बिकाश शाह कोलकाता येथील दुकानात होता. बिकाशचा लगेचच फोन आला. त्यांचे दुकान जवळपास १०- १५ किमी लांब होते. आम्ही त्याला तासभर लागेल असे सांगितले. एव्हाना अंधार पडायला लागला होता.

मुंबईपेक्षा कोलकाता येथील रेखांशा मध्ये तब्बल १५.३० अंशाचा फरक आहे. साधारणपणे एक अंश फरकाने सूर्य चार मिनिटाने स्थान बदलतो. अर्थात दोन्ही शहरातील सूर्यास्तामध्ये जवळपास ६२ मिनिटांचे अंतर आहे. अंधारात त्यांचे दुकान शोधणे कठीण होते. मी एका हातात मोबाईल घेऊन त्यावर गुगल मॅप लावला. आनंद आणि संजयला मागोमाग यायला सांगितले. आनंदची सायकल त्याला त्रास देत होती. त्यामुळे त्याला वेग घेता येत नव्हता. तो वाटेत दुकान सापडते का हे शोधत होता. मात्र त्यामुळे आणखीच उशीर होऊ लागला. बिकाशचे फोन सुरूच होते. आम्ही मजल दरमजल करत एकदाचे रुबी येथील ड्रीम बाईकचे दुकान शोधले. बिकाश एकटाच दुकानात बसला होता. लवकर अंधार पडत असल्याने त्याची दुकान बंद करण्याची वेळ झाली होती. मात्र आमच्या सफरीसाठी तोही उत्सुक होता. 

माझी पिशवी विमानतळावर राहिल्याने मला नवीन विद्युत उपकरणे घ्यायची होती. आनंदला सायकलच्या दुकानात थांबायला सांगून मी जवळपास शोध घेऊ लागलो. सुदैवाने मोबाईल चार्जर मिळाला. त्या आनंदात मी परत आलो मात्र आनंदच्या सायकलचा असहकार सुरूच होता. त्या चाकासाठी लागणारी योग्य उपकरणे दुकानात नव्हती. बिकाशने त्या उपकरणाशिवाय चालवलेल्या प्रयत्नांना यश येत नव्हते. मात्र त्यानेच आम्हाला गरिया भागातील डेकाथलॉन येथील दुकानाचा पत्ता दिला. तेथील मेकॅनिकशी तो स्वतः बोलला. आनंदने मुंबईतील डेकाथलॉन शॉप मधील सल्लागाराशी बोलून त्यालाही बिकाशने सांगितलेल्या मेकॅनिकशी बोलण्यास सांगितले. 

डेकाथलॉन चे दुकान पुन्हा साधारण १०- १२ किमी लांब होते. अंधारात मोबाईल वर गुगल मॅप लावून मी पुन्हा पुढे जाऊ लागलो. डाव्या हातात मोबाईल आणि उजव्या हातात सायकल सांभाळत मी जाऊ लागलो. संजय आणि आनंद मागोमाग येत होते. प्रत्येक वळणावर ते मागे आहेत ह्याची खात्री करत मी पुढे सरकत होतो. दोघांनाही गुगल मॅप लावून सायकल चालवण्याचा अनुभव नव्हता. काही अंतरावर एक उड्डाणपूल सुरू झाला. रस्ता तसा अरुंदच होता. मी उड्डाणपुलाच्या अगदी डावीकडून जात होतो. मात्र उजव्या बाजूने अगदी जवळून इंधन जळणारी दुचाकी, चारचाकी वाहने जात असल्याने मला मागे बघून संजय आणि आनंद किती मागे आहेत ह्याचा अंदाज घेता येईना. सायकलही दोन्ही हातात धरावी लागत होती, त्यामुळे गुगल मॅप लावलेला मोबाईल खिशात ठेवावा लागला होता. उड्डाणपूल बराच लांबलचक होता. वाटेत एक फाटा जाताना दिसला. तिथे रस्ताही थोडा रुंद झाला होता. त्याचा फायदा घेत मी थांबलो. डेकाथलॉन दुकान अजूनही लांब असल्याचे गुगल बाबा सांगत होते. आम्ही जाईपर्यंत दुकान चालू असणे गरजेचे होते. आनंद आणि संजय दिसल्यावर मी पुन्हा सायकल दामटवली. आम्हाला खरतर भूकही लागली होती. पण आता स्वतःपेक्षा सायकलचीच काळजी जास्त होती. 




डेकाथलॉन दुकान दिसल्यावर मात्र जीवात जीव आला. आनंद आणि मी दुकानात शिरलो. दुकान दुमजली होते. खालच्या मजल्यावर वेगवेगळ्या खेळांचे साहित्य होते तर पहिल्या मजल्यावर सायकलचे सुटे भाग, सायकली आणि सायकल दुरुस्ती विभाग होता. तेथील मेकॅनिकने आनंदची सायकल पाहिली. तेथील मेकॅनिक अश्रफ अलीचा सूर सुरुवातीला आश्वासक वाटत नव्हता. योग्य साहित्य हाताशी नव्हते. मात्र त्याने जिद्द मात्र सोडली नाही. आम्हाला आवश्यक सामग्री दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यावर मिळेल असे त्याने सांगितले. आम्हाला तर पहाटे आमच्या सफरीचा शुभारंभ करायचा होता. अश्रफ ने त्याचा सगळा अनुभव पणाला लावत दुरुस्ती चालूच ठेवली. 



मी मनामध्ये एक दिवस उशीरा मोहीम सुरू करण्याची योजना आखू लागलो. अश्रफ मात्र हार मानायला तयार नव्हता. घड्याळाचे काटे अक्षरश: धावत होते. डेकाथलॉन मध्येही आम्ही बराचवेळ उभेच होतो.  अश्रफने आनंदची सायकल आमच्या सफरीसाठी तयार केली. एव्हाना बरीच रात्र झाली होती. दुकानाची वेळ टळून गेली होती. आनंदने समाधानाने अश्रफला दुरुस्ती खर्च विचारला. दुकानातील व्यवस्थापक बर्नाली बोरो तिथे आली. तिने कोणताही दुरुस्ती खर्च घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. बर्नालीचे बोलणे, वागणे अतिशय शांत होते. अश्रफला आम्ही वैयक्तिकरित्या काही रक्कम घेण्याची विनंती केली. मात्र तोही कोणतीही रक्कम न स्वीकारण्यावर ठाम राहिला. त्यानेही अतिशय शांत आणि स्पष्टपणे आम्हाला नकार दिला. एव्हाना रात्रीचे १०.३० वाजून गेले होते. आता केळकरांकडे जाऊन परत बेलूर मठ गाठणे शक्य नव्हते.



मी केळकरांना साधारण तासाभरात घरी येऊ आणि रात्री तिथेच राहू असे कळवले. त्यांच्या घराचे डेकाथलॉन दुकानापासूनचे अंतर जवळपास १५ किमी होते. आम्ही त्यांच्या घरी पोचलो तेव्हा साधारण ११.३० वाजले असावेत. डॉ केळकर आणि त्यांच्या पत्नी आमच्याबरोबर जेवण्यासाठी थांबले होते.
दिवसभर झालेली दगदग, पोटातील भूक आम्हाला जाणवत होती. मात्र डॉक्टरांच्या पत्नीने जी मेजवानी आम्हाला दिली त्यामुळे सगळा थकवा, शीण निघून गेला. दुपारी मिष्टी दोही मिळाले होतेच रात्रीही आमच्यासाठी खासा बेत होता. पहाटे चारला सुरू झालेला आमचा दिवस रात्री १२ च्या सुमारास संपत होता. 

परिस्थिती कितीही वाईट असली तरी योग्य साथ मिळाली की त्यावर मात करता येते हेच दिवसभरात कोलकाता येथील ह्या सुहृदांनी शिकवले होते.

डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी किती वाजता निघणार असे विचारले. मी दुसऱ्या दिवशी पार कराव्या लागणाऱ्या दिडशे किमी अंतराचा आणि बंगालमधील सूर्याच्या परिक्रमणाचा अंदाज घेत साडेसहा असे उत्तर दिले खरे मात्र त्यावर माझा स्वतःचाच विश्वास नव्हता.


फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...