रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

आम्ही पेडलकर




दोन तीन दिवसांपासून पेडल रिपब्लिक च्या सदस्यांना ठाणे येथील ' आम्ही पोहेकर ' चे वेध लागले होते. तसे सगळेजण रोजच २५-३० किमीचा पल्ला गाठत. मात्र पोहे खाण्यासाठी जाऊन येण्याचा पल्ला हा ७५ किमी चा होता. तसे हे ' पेडलकर ' रसनेचे गुलाम. तिच्यासाठी हे ७५ किमी चे लक्ष्य विशेष नव्हते.

कार्तिक महिन्याचा आज अखेरचा दिवस म्हणजे दिनांक ३० कार्तिक. वास्तविक दिनकर दक्षिण गोलार्धात जाऊन दोन महिने पूर्ण होत होते. तरीही वातावरणात अजूनही किंचित गारवाही नव्हता. किंबहुना पहाटे ६ वाजता फुजी घराबाहेर पडली तेव्हा तिचे स्वागत केले पावसाच्या सरींमुळे रस्त्यावर पसरलेल्या चिखलाने! फूजिला तसा नेहमीप्रमाणे उशिरच झालेला. ' पेडल ' चे इतर सदस्य PR नाक्याहून निघाले तेव्हा फुजी घर सोडत होती. इतर सदस्य पेंढरकर महाविद्यालयामार्गे जाणार असले तरी फूजिने मानपाडा रस्त्याने जात त्यांना सामंत पेट्रोल पंपापाशी गाठले.

रविराजांचे अजूनही क्षितिजावर आगमन झाले नव्हते. मात्र त्यांच्या किरणांनी श्रीमलंगगडावर जमलेल्या ढगांना सुंदर रंगात रंगवले होते.


फुजी ह्या दृश्याने मोहित न झाल्यासच नवल. पेडलकर मात्र नाकासमोर पाहत सायकलवत होते. त्यामुळे फुजी त्या रंगाच्या फार मोहात न अडकता पुढे निघाली. थोड्याच अंतरावर रमेशकाका दिसत होते. त्यांना गाठत फुजी त्यांच्या बरोबरीने जाऊ लागली. कल्याण फाट्यापुढील चढ तसा परीक्षा घेणाराच. महाविद्यालयीन काळात झुडुपात लागलेली कच्ची करवंदे खाण्यासाठी काळ्या घोड्यावरून येताना खरी मजा असायची. मात्र दात्यांची जुळवाजुळव करण्याची यंत्रणा असणाऱ्या फुजीला ती गंमत कळणे शक्य नव्हते. चाकांची साखळी खालच्या दात्यांवर आणत फुजीने तो चढ सहजच पार केला. खिंड ओलांडत महापेच्या दिशेने जाताना पेडलकरांनी लय साधली. सगळेजण वेगात जाऊ लागले. इतक्यात ठाण्याहून आलेल्या संजय दात्ये ह्यांनी सगळ्यांचे स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सगळ्या चमूने औद्योगिक परिसरातून पुढे धाव घेतली. रबाळे इथे सगळेजण बेलापूर ठाणे महामार्गाला लागले. सगळ्यांनी वेग घेतला असतानाच ऐरोली रेल्वे स्थानकापाशी थांबा घेतला गेला.

तेथून मात्र आता थेट ठाणे गाठायचे ठरले. कळवा पुल, तलावपाळी मार्गे जाताना फुजिला cycle2work चे दिवस आठवत होते. लवकरच सगळे ' आम्ही पोहेकर ' पाशी पोचले. 

सगळ्यांचे लक्ष शेजारील वऱ्हाडी मिसळ कडे जात होते. मात्र आजचे लक्ष्य मिसळ नव्हे तर पोहे होते. पोह्यांचे इतके प्रकार पाहून नक्की कोणते पोहे घ्यावे हेच समजेनासे झाले होते. मात्र पोहेकरांनी ती समस्या चुटकीसरशी सोडवली. त्यांनी पेडलकरांची चव अचूक ओळखत त्यांना नागपुरी तर्री पोहे घेण्याचे सुचवले. त्यांच्या सूचनेला मान दिल्याबद्दल पेडलकरांना पश्र्चाताप झाला नाहीच. चव उत्तमच होती. सौमित्र आणि प्रसाद अधून मधून पोहेकरांची विशेष मुलाखत घेत होतेच. पोहे खाऊन झाल्यावर सगळ्यांचा मोर्चा वळला तो फलाट क्रमांक १ समोर उभ्या असलेल्या ऐतिहासिक इंजिनाकडे

पोटोबा आणि इंजिन दर्शन झाल्यावर मात्र सगळ्यांना घरी परतायचे वेध लागले. सगळ्यांनी झपाट्याने वेग घेतला. ऐरोलीजवळ विनीत आणि स्वप्नीलने इतरांचा निरोप घेतला. फुजी, डॉ राहुल, कुणाल, श्रेयश झपाट्याने पुढे गेले. त्यांनी रबाळे गाठत थांबा घेतला. बराच वेळ बाकी सदस्य न आल्यामुळे फुजीने प्रसादला संपर्क साधला....
तेव्हा समजले रमेशकाकांच्या सायकलच्या रबरी नळीने राम म्हटला होता. अर्थात डॉ. राहुल आज बरोबर असल्याने चिंता नव्हतीच. डॉ राहुल व्यायसायिक डॉक्टर आहेतच त्याच बरोबर सायकलची शस्त्रक्रिया करण्यातही निष्णात आहेत. 



डॉ राहुलच्या मार्गदर्शनानुसार शस्त्रक्रिया पार पडल्यावर जत्था पुन्हा परतीच्या मार्गाला लागला. कार्तिक महिन्याची अखेरची म्हणजे ३० तारीख असूनही अजून थंडी सुरू झाली नव्हती. रवीराजांची उपस्थिती अजूनही आल्हाददायक वाटू लागली नव्हती तर त्रासदायकच होती. मात्र आज रवीराजांचे दाहक शस्त्र ढगांच्या छत्रछायेने रोखून धरले होते.
त्यामुळे डोके शांत राहत असले तरी घसा कोरडा पडत होताच. कल्याण फाटा येथे लिंबू सरबताचा लाभ घेताच सगळेजण तृप्त झाले. खरतर सरबत प्यायलावर ' ये दिल मांगे मोअर ' अशी अवस्था होती. पण पुन्हा एकदा डोंबिवली मध्ये प्रवेश केल्यावर पेंढरकर महाविद्यालयापाशी ' शांताराम सरबत ' चा लाभ घेण्याचा करार करत सगळेजण पुढे निघाले. वास्तविक शांताराम आता गाडी चालवत नसून त्याचा मुलगा ती गाडी (आणि गादी) चालवतो. शांताराम सरबत अजूनही फुजीला भूतकाळात घेऊन जाते. महाविद्यालयीन काळात हे सरबत म्हणजे चैन वाटत असे. प्रसादच्या बाबतीतही तीच अवस्था होती. 

अर्थातच आजच्या सायकल फेरीचा शेवट शांताराम सरबत घेऊन होणे स्वाभाविकच होते.



शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

कार्तिकीचे दान




पौर्णिमा असली की सोमराजांचे रुप अधिकच बहरते. त्यात आज कार्तिकी पौर्णिमा अथवा त्रिपुरारी पौर्णिमा. शिवाने त्रिपुरासुराचा वध केला तो दिवस. अर्थात प्रत्यक्ष देव दिवाळी म्हणजे देवांच्या दिवाळीचा दिवस. तसेच विष्णूचा प्रथम अवतार मत्स्य ह्याचा जन्म झाला तो दिवस. प्रत्यक्ष ब्रह्मदेवांसाठी चार दिवसांसाठी पुष्कर येथे वार्षिक उत्सव आयोजित केला जातो तो संपन्न होण्याचा हा दिवस. (ह्या उत्सवात जगभरातील सगळ्यात मोठा उंट मेळाही भरतो. ३ वर्षांपूर्वी ह्या उत्सवाला १० लाख लोक येऊन गेल्याची नोंद आहे.)
प्रत्यक्ष ब्रम्ह, विष्णू आणि शिव ह्यांच्यासाठी विशेष असलेल्या दिवशी सोमराज प्रसन्न असणे स्वाभाविकच.

सोमराज जरी प्रसन्न असले तरी रविराज दक्षिणेकडे मार्गस्थ होऊन दीड महिना होत होता. त्यामुळे हल्ली रविराज थोडा आळस करू लागले होते. रविराजांचे आगमन जरी थोडे उशिरा होत असले तरी ते अजूनही थोडे लवकरच तेजाने झळकू लागत. त्यामुळे रविराज डोक्यावर येण्या अगोदर आपण घरी परतणे आवश्यक आहे ह्याची खूणगाठ बाळगत फुजी बरोबर रमेशकाका आणि प्रसाद उषःकालीच मार्गस्थ झाले. PR नाका सोडला तेव्हा अजून रविराज क्षितिजावर यायचे होते. पेंढरकर महाविद्यालयामार्गे शिळ कल्याण हमरस्त्याला लागल्यावर मात्र फटफटू लागले होते. तिघेही एकामागोमाग एक जात होते. हळूहळू लय साधत होती. मात्र वेग पकडला नव्हता. तिघांच्या गप्पा सुरू होत्या. पुढील कार्यक्रमाविषयी चर्चा सुरू होती. पत्रिपुलामार्गे दुर्गाडी पुल ओलांडल्यावर मात्र फुजीला स्फुरण चढले. ती झपाट्याने जाऊ लागली. रमेश काका आणि प्रसाद पाठोपाठ होतेच. 

रांजनोलीच्या पुढे ठाणे नाशिक महामार्ग ओलांडल्यावर उन्नत मार्गाने जाता येईल का याची तिघजण चाचपणी करू लागले. मात्र उन्नतमार्ग वंजारपट्टीच्या दिशेने जायला बंद असल्याचे लक्षात आले. खालून जाणारा रस्ता चांगल्या स्थितीत नव्हता तसेच रहदारीचाही होता. मात्र आता इलाज नव्हता. तिथून झपाट्याने मार्ग काढत तिघांनी शेलार गाव गाठले. तिथेच डावे वळण घेताच औद्योगिक गाळ्यांनी वेढलेल्या आणि फुटक्या रस्त्याने तिघांचे स्वागत केले. मात्र अजून तिथे फारशी रहदारी सुरू झाली नव्हती. थोड्या वेळातच जूनांदुरखी गावाजवळ तिघ पोचले. एव्हाना रमेशकाका आणि प्रसादने आघाडी घेतली होती. त्यांच्या पाठी एक मालवाहू वाहन जात होते. रमेश काका आणि प्रसाद ह्यांना गाठून पुढे जाण्यासाठी ते धुड अपयशी ठरत होते आणि त्या वाहनाच्या मंदावलेल्या वेगामुळे फुजीचाही वेग मंदावत होता. रस्ता अरुंद असल्याने फुजिला बाजूनेही पुढे जाता येत नव्हते.
त्या वाहनामागे लगोलग राहिल्यामुळे त्या फुटक्या रस्त्यातील खड्डे फूजीला दिसत नव्हते. अश्याच एका खड्यात फुजीचे मागचे चाक थोडे आपटल्याचे अस्मादिकांना जाणवले. थोडा अंदाज घेत फुजिने मार्गक्रमण सुरूच ठेवले. फुजी व्यवस्थित मार्ग कापत असली तरी अस्मादिकांनी एकदा तिची प्रकृती पाहण्याचे ठरवले. दुर्दैवाने अस्मादिकांचा अंदाज खरा ठरला. फुजीच्या मागच्या चाकातील हवा किंचित कमी झाली होती. भ्रमणध्वनीद्वारे प्रसादला कळवताच तो आणि रमेश काका लगेचच परत आले.
समोरच एक चाळवजा वाडा दिसत होता. समोर अंगणही होते. प्रसादने लगेचच तिथे जाऊन फुजीवर उपचार करायचे ठरवले. फूजीच्या मागच्या चाकातील रबरी नळीचे हे वर्षभरात पाचवे छिद्र होते. (गेल्याच रविवारी चौथे छिद्र बुजवण्याचा योग आला होता). आताही हे छिद्र बुजवण्याचा जामानिमा अस्मादिकांकडे होता. मात्र प्रसादने नवी रबरी नळीच उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर ती नळीच बदलण्याचा निर्णय घेतला गेला. 

फुजिवर उपचार करण्यात तिघेही शल्यविशारद पराकाष्ठा करत होते.



जवळपास पाऊण तास ह्या शल्यक्रियेमध्ये गेल्यावर फुजी पुन्हा एकदा सज्ज झाली. आता मात्र तिघांनी पारोळला जाण्याऐवजी आणखी चार पाच किमी वर जाऊन लगेच परतायचा निर्णय घेतला. चिंबिपाडा येथे पोचताच अस्मादिक आणि रमेशकाकांना येथील चहाकेंद्रावर मागील खेपेस थांबल्याची आठवण झाली. केरळहून काश्मीरला निघालेल्या हशिमला साथ करत तेव्हा दोघं डोंबिवलीहून शिरसाड फाटा पर्यंत ह्याच मार्गाने गेले होते. ती आठवण जागवत आजही त्याच चहाकेंद्रावर थांबा घेतला.



 चहाबरोबरच गप्पाही छान रंगल्या होत्या. एव्हाना रविराज त्यांचा राग आळवू लागले होते. त्यांची मैफिल रंगात येण्याअगोदर आम्हाला घर गाठायचे होते. त्यामुळे तेथूनच आम्ही परतीचा निर्णय घेतला. आजूबाजूला हिरवा रंग पसरला होता. त्या वृक्षराजीने आमच्यावर छत धरल्यामुळे रविराजांचा आमच्यावरील हल्ला थोपवला गेला होता. त्या वृक्षराजीच्या आम्ही मोहात न पडलो तरच नवल!


तेथील निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुन्हा परतीचा मार्ग धरला. इतक्यात समोरून एका तीन चाकी सायकलवरून एक कुल्फिवाला येताना दिसला. तो वर्दी देत असतानाच आसपासच्या पाड्यातील लहान मुले तिथे आली. त्यांना पाहून प्रसादने त्या मुलांना कुल्फी देऊ केली. 



त्या मुलांनी कुल्फी घेत पळ काढला खरा, पण त्यांना मिळालेल्या कुल्फिची वर्दी आता आख्या पाड्यावर पसरली होती. प्रसादने कुल्फिदान करून कार्तिकी पौर्णिमेचे पुण्य कमावले खरे मात्र ती बातमी पाड्यावर पसरताच मुलांचा लवाजमा वाढू लागला. तसा प्रसादला पुढील प्रसंगाची चाहूल लागली. तिघेजण पटापट स्वार झाले आणि मार्ग कापू लागले. पुन्हा एकदा शेलार गावाजवळील औद्योगिक परिसर -भिवंडी मार्गे रांजनोली गाठली. तिघांचे घसे कोरडे पडले होते. रविराज अधिकच तप्त झाले होते. निंबू शिकंजी चा आधार घेत आम्ही इंधन भरून घेतले. थोडा वेळ थांबल्यामुळे रविराजांचा त्रागा कमी झाल्यासारखे वाटले आणि अंतरात्मा ही थोडा शांत झाला.



वाटेत ९० फुटी रस्त्याला पुन्हा एकदा नेहमीच्या ठिकाणी अस्मादिकांनी निंबु शिकंजीसाठी थांबा घेतला. तिथे पुन्हा एकदा तृप्त होत तिघांनी आपापले घर गाठले तोपर्यंत रविराजाने मात्र मध्यान्हीची वेळ गाठली नव्हती.

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

CROWN

 जवळपास ८-९ महिने खंड पडल्यानंतर पुन्हा सायकलवयला सुरुवात करून २ आठवडे झाले होते. आठवडा अखेरीस शनिवार आणि रविवार अशी साप्ताहिक आली होती. त्यामुळे फुजी (म्हणजेच श्विन) च्या मनात आता शतकी दौड करण्याचा विचार डोकावू लागला. रविवारी लसीकरणाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे होते. त्यामुळे शनिवार सत्कारणी लावायचे ठरवले. अस्मादिकांनी पेडल रिपब्लिक (PR) च्या ' काय अप्पा ' ह्या समाज गटावर शतकी दौड करण्याचा विचार आणि त्यासाठीचे तीन पर्याय सुचवले. तीनही पर्याय हाताशी ठेवत ' जिथे चाक वळेल तिथे ' हे गंतव्य स्थान फुजिने जाहीर केले. 'पेडल ' च्या काही सदस्यांनी पडले गाव येथे छोटा दौरा करण्याचे ठरवले आणि फुजीचा प्रश्न आपोआपच सुटला. तीनही पर्यायातील एक पर्याय पडलेच्या मार्गाने जाणार होता. त्यामुळे फुजीने तो पर्याय स्वीकारला. ह्या शतकी दौडिसाठी आणखी एक युवा सदस्य सामील होणार होता. तो होता स्टीव्हन! त्यामुळे आज एकल दौड नसून दुहेरी दौड होती. 


पहाटे साडेसहाला PR नाका येथे सगळे सदस्य जमा झाले. स्टीव्हन तर थोडा लवकर उठून ४-५ किमी ची दौड करूनच तिथे आला होता. सगळ्यांनी दिशा पकडली. वाटेत मेघेशही सामील झाला. 




काटई नाका येथे फुजी आणि स्टीव्हन ने मार्ग बदलत बदलापूर पाइपलाइन रस्ता पकडला. दोघांनी छान लय पकडली होती. नेवाळी फाटा लगेचच मागे पडला. अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक परिसरातील वैभव हॉटेलसमोर घसा ओला करून फुजी आणि स्टीव्हन पुढे निघाले.

मागील वर्षी बदलापूर पुढे पोद्दार गृहसंकुलासमोर असलेल्या एका नाश्तागृहात फुजी नाश्ता करत असे. आज मात्र तिथे नाश्ता केंद्राचा मागमूस नव्हता. त्यामुळे फुजिने तसेच पुढे नेरळ पर्यंत जायचे ठरवले. वाटेत एकदा स्टीव्हनलाही विचारले. त्याचीही काही हरकत नव्हती. स्टीव्हन संयत मात्र ठामपणे आणि सातत्याने दौड करत होता. नेरळ येथील पोलिस चौकी हे फुजी (श्विन ) चे  पाण्याची बेगमी करण्याचे नेहमीचे ठिकाण येथील पोलिसही फुजी ( श्विन ) ची आपुलकीने चौकशी करत. आज मात्र बाटलीतील पाणी बऱ्यापैकी शिल्लक होते. त्यामुळे फुजिने थांबा न घेता पुढे जायचे ठरवले.

थोड्याच अंतरावर एक छोटेसे नाश्ता केंद्र दिसले. फुजीला दावणीला बांधत अस्मादिक स्टीव्हन बरोबर आत शिरले. सगळा आटोपशीर कारभार होता. नाश्ता केंद्रात जेमतेम चार मेज आणि सात आठ खुर्च्या होत्या. नाश्ता केंद्राच्या प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजूला छोट्या कोपऱ्यात एक युवक पाककला सादर करत होता आणि ग्राहकांना पदार्थ देण्याचे काम एक महिला करत होती. एक जोडपे वगळता इतर कोणी ग्राहकही नव्हते.

एका अस्मादिक आणि स्टीव्हनने पोह्यांची ऑर्डर दिली.  एवढ्यात शेजारील मेजावर बटाटे पराठे आले. हा खरतर अस्मादिकांचा रोजचा आवडता नाश्ता. मात्र अजून ५०+ किमी सायकलावयचे होते. त्यामुळे मनसोक्त पराठे खाता आले नसते. इथे बहुधा तयार केलेले पदार्थ पुन्हा गरम करून देण्याची पद्धत नव्हती. ऑर्डर दिल्यानंतर पोहे बनवण्यास सुरुवात झाली होती. वेळ लागला खरा पण पोह्यांची चव छान होतीच शिवाय पोहेही भरपूर होते. क्षुधाशांती झाल्यावर फुजी आणि स्टीव्हन पुढे निघाले. उजवीकडे माथेरानकडे रस्ता जाणारा हुतात्मा चौक आला तेव्हा strava साधारणपणे ४८ किमी अंतर पार केल्याचे सांगत होता. तेव्हा फुजिने आणखी पुढे जाण्याचे ठरवले. सीमा रिसॉर्ट येथे पोचलो तेव्हा ५० किमी अंतर पार झाल्याचे पाहून दोघांनी परतीचा मार्ग धरला. 

हुतात्मा चौक येथे selfie चा मोह आवरला नाही.




तेथून पुन्हा परतीची दिशा पकडली. नेरळ पासून पुन्हा बदलापूर पर्यंत परतीचा मार्ग नेहमीच थोडा कंटाळवाणा वाटतो. एव्हाना हा अंदाज आला होता की बदलापूर येईपर्यंत भास्कराचार्य चांगलेच कोपणार होते. 

दोघांनी संथ गतीने मार्गक्रमण सुरू केले. बदलापूर येथे पोहोचेपर्यंत जवळपास मध्यान्ह झाली होती. फुजिने वाटेत अभिषेकच्या AMK Cycle ला भेट देण्याचे ठरवले. बऱ्याच दिवसात अभिषेकची गाठ पडली नव्हती. त्यामुळे त्याला भेटायचे होते. AMK मध्ये अभिषेक नव्हता मात्र फुजीचे सुदैव जोरावर होते. सायकल महर्षी रमाकांत महाडिक तिथे आलेले होते. त्यांना पाहताच फुजीला आनंद झाला. फुजिने त्यांच्याशी स्टीव्हनची ओळख करून दिली. फुजी आणि महाडिक काका ह्यांच्या गप्पा रंगल्या असतानाच अभिषेकही आला. दरम्यान AMK मध्ये फुजी आणि स्टीव्हनने पाण्याची बेगमी करून घेतली. भास्कराचार्यांचा पारा मात्र चांगलाच चढला होता. अभिषेक आणि महाडिक काकांनी फुजीला सावध केले. फुजिनेही त्यांना सांगितले की आता आम्ही ५-१० किमी वर थांबे घेत जाणार आहोत. 

नेहमप्रमाणेच नेवाळी फाटा येथे वाहनांची गर्दी झाली होती. थोडे पुढे जाऊन फुजिने पाण्याने चेहरा धुतला. थोडे पाणी पाठीच्या कण्यावर सोडले आणि  फलाहार सुरू केला. एका सफरचंदाचा फडशा पाडे पर्यंत स्टीव्हनही पोचला. त्यानेही बनानाचा फन्ना उडवला. STRAVA ने मात्र फुजिची फजिती केली होती. फुजीच्या अंतरातील ५ किमी अंतर STRAVA ने जमेस धरले नव्हते. त्यामुळे फुजिला शतकी दौड पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त ५ किमी दौड करावी लागणार होती. ते अंतर पार करण्यासाठी फुजिने पत्री पुलापर्यंत जाऊन ९० फुटी रस्ता गाठण्याचे ठरवले. कोळेगाव येथे पुन्हा वाहनांची गर्दी झाली होती. त्यामुळे फुजी आणि स्टीव्हनने काटई नाका न गाठता तेथेच उजवीकडे वळण्याचे ठरवले. हा खुष्कीचा मार्ग चांगलाच खराब अवस्थेत होता. कसेबसे शिळ कल्याण रस्त्याला लागल्यावर मात्र खरी परीक्षा सुरू झाली. प्रत्येक वाहन इंच इंच लढवू ह्या आविर्भावात जात होते. ही लढाई थेट सुयोग हॉटेलपर्यंत सुरू होती. दरम्यान फुजिने पत्री पुला ऐवजी सुयोग हॉटेल पाशीच डोंबिवली मध्ये शिरण्याचे ठरवले. घसा कोरडा पडत होता. त्यामुळे सारखे जलपान सुरू होतेच. फुजीने शांताराम कडे लिंबू सरबत घेऊन पुढे जाण्याचे ठरवले. स्टीव्हन मात्र तिथे न थांबता पुढे जाणार होता. 

शांतारामकडे सरबत पिणे म्हणजे अस्मादिकांच्या महाविद्यालयीन जीवनातील चैन असायची. आता शांताराम ऐवजी त्याचा मुलगा ती सरबताची गाडी चालवत होता. गेल्या वर्षीच्या हिवाळ्यात जवळपास दर रविवारी हे सरबत फुजीला दौड संपताना ताजेतवाने करत असे. तिथेही आज चांगलीच गर्दी होती. फुजिने पुन्हा एकदा strava पाहिले. Strava ने पुन्हा काहीतरी गडबड करत आणखी २-३ किमी कमी दाखवले. भास्कराचार्य डोक्यावर थयथयाट करत असताना strava ची ही करामत पाहून आता मात्र फुजी मानसिकरित्या दमली होती. मात्र strava ने कमी केलेले हे एकंदरीत ८-१० किमी अंतर पार केले तरच strava शतकी दौडीची नोंद घेणार होती. त्यामुळे मनाविरुद्ध का होईना फुजिने आणखी अतिरिक्त अंतर कापले आणि स्वगृही पोचेपर्यंत शतकी दौडीची नोंद केली. भास्कराचार्य आणि strava ह्या दोघांच्या कट कारस्थानाला फुजी पुरून उरली होती. घरी आल्यावर फुजिने सहजच गुगल बाबांना Steven ह्या नावाचा अर्थ विचारला. तर गुगल बाबा उत्तरले Crown, Wreath. फुजीला आजच्या शतकी दौडीसाठी चक्क स्टीवन ...Crown मिळाला होता.

बुधवार, २४ मार्च, २०२१

मागोवा


 दिनांक : भारतीय सौर चैत्र ३, १९४३


तीन दिवसांपूर्वी -रविवारी- संपलेल्या राष्ट्रीय वर्ष १९४२ चा मागोवा


भारतीय राष्ट्रीय वर्ष १९४२...

अखेर हे वर्ष संपले.. ह्या वर्षाने आपल्याला काय दिले ह्याचा हा मागोवा...


हे वर्ष सुरू झाले ते व्यायाम, प्रतिकारक्षमता ह्यांचे महत्व पटवून देतच! 'Survival of the fittest' ह्या उक्तीचा पडताळा ह्या वर्षात सगळ्यांना आला.


सायकलवणे हा कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त फायदा देणारा व्यायामप्रकार. गेल्या अनेक वर्षात सायकलवण्याचे महत्व कळले नसेल ते ह्या एका वर्षाने शिकवले. 

वाहतूक करण्यास इतर मार्ग बंद झाल्याने काहीजण निव्वळ नाईलाज म्हणून सायकलकडे वळले. काहीजण चक्क ५०० ते १००० किमी अंतर कापत कर्मभूमीकडून मायभूमीकडे सायकल चालवत परतले. 


एका तरुणीने तर चक्क तिच्या वडिलांनाही सायकलवरून घरी परत नेले. ह्या सगळ्यांची सायकल चालवण्याची जिद्द वाखाणण्यासारखी होती. त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले गेले. मात्र मला एक शंका सतावत होती, हे लोक सायकलकडे वळले ते त्यांना सायकलविषयी प्रेम होते म्हणून की निव्वळ नाईलाज म्हणून! ह्यांनी ताबडवत गावापर्यंत नेलेल्या सायकलबद्दल ह्यांना खरोखरीच काही प्रेम आहे का? की ते गावाला पोचल्यावर ह्या सायकली अडगळीत टाकल्या जातील? वर्ष संपल्यावर ह्या प्रश्नांची उत्तरे आता तरी मिळायला हवी. ह्या लोकांच्या सायकल चालवण्याचे जे कौतुक केले जात होते ते सार्थ होते का? हे आता तरी कळायला हवे. ज्या सायकलने ह्यांना मदत केली, तिची ह्यांनी काय निगा राखली आहे हे समजायला हवे.


ह्या वर्षभरामध्ये सायकलची खरेदी सुरुवातीलाच प्रचंड प्रमाणात वाढली. विक्रेते, उत्पादक ह्यांना सुगीचे दिवस आले ह्यात आश्चर्य नाही. नेहमीपेक्षा एकदम १० पटीने विक्री होऊ लागली. मात्र ह्याचा सायकल बाजारावर उलट परिणाम जाणवू लागला. मागणी आहे, मात्र पुरवठा अपुरा पडू लागला. वर्ष संपले तरी सुरळीत पुरवठा कधी सुरू होईल ह्याची शाश्वती नाही.


मात्र ह्या कालावधीत काही सायकलपटूंनी मात्र मनसोक्त सायकलप्रवास केला. काहीजणांनी आपले ऑफिसच पाठीवर घेऊन देशभ्रमंती केली. पाठीवर लॅपटॉप, स्लीपिंग बॅग घेऊन हे स्वार सायकलसफरीवर निघाले होते. रोज पहाटे सायकलची रपेट करून सकाळी १०-११ ला हे सायकलपटू एखाद्या धाब्यावर थांबत. तिथेच लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत. काम आटोपून संध्याकाळी पुन्हा सायकलची रपेट करत. दिवसभरात ऑफिसच्या कामासह ह्यांनी जवळपास शतकी पल्ला गाठलेला असे. ह्या सायकलपटूंनी १५-२० दिवसात मुंबई हुन कन्याकुमारीही गाठली होती.


सगळ्यांना ऑफिसच्या कामासह सायकलसफर करता आली नाही. काही जणांना तर नोकरी गमवावी लागली होती. मात्र त्यांनीही निराश न होता ह्या कालावधीत सायकलवरून भारतभ्रमण केले. 


एक सायकलस्वार तर इतका जिद्दी होता की त्याच्याकडे सायकलही नव्हती. भावाची मोडकळीला आलेली सायकल ह्याने पहिली. स्वतःचा कॅमेरा विकून आलेल्या पैशातून त्याने ती सायकल दुरुस्त करून घेतली... आणि अवघ्या दीडशे रुपयांसह ह्याने केरळमधील आपले गाव सोडले. जिथे थांबेल तिथे चहाविक्री करायची, मिळतील ते पैसे गाठीला बांधून पुढील प्रवास सुरु करायचा. अश्या पद्धतीने ह्या पठ्ठ्याने दक्षिणोत्तर भारत चक्राकांत केला. 


पाठीवर ऑफिस बांधलेली मंडळी असो की चहाविक्री करत रपेट करणारा तरुण असो ... पेट्रोल पंपाच्या आवारात रात्र काढण्याचीही ह्यांची तयारी होती.


अत्यंत कमी भांडवलात संपूर्ण देश फिरता येतो हा विश्वास ह्या तरुणांनी दिला.


आबाल वृद्धांना प्रतिकारशक्तीचे महत्व पटवण्याबरोबरच, जिद्द, धैर्य, चिकाटी ह्या सर्व गुणांची महती पटवण्याचेही काम सरत्या राष्ट्रीय वर्षाने अतिशय सहजतेने आणि अचूकपणे केले

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

खेडचा भटक्या विनायक




'अंबरनाथ पर्यंत आपण रेल्वेने जाऊ आणि तिथून पुढे 'त्याच्या'बरोबर सायकलने जाऊया' संजय दात्येने प्रस्ताव ठेवला. अंबरनाथ एवढ्या कमी अंतरासाठी रेल्वेने जायला श्विन तयार होणे कठीणच होते. मात्र त्याशिवाय पहाटे ६-६.३० ला अंबरनाथला पोचायचे तर घरातून ५ वाजता निघणे भाग होते. श्विनला तेही शक्य नव्हते. त्यामुळे श्विनने दात्येंचा 'त्या'च्या बरोबर जायचा प्रस्ताव नाकारला. 'ज्या'ला भेटण्यासाठी २० किमी अंतर जायचा प्रस्ताव श्विनने नाकारला होता, 'त्या'च्या ओढीने नंतर २०० किमी चा प्रवास करावा लागेल आणि २०-२५ महिने प्रतिक्षा करावी लागेल ह्याचा अंदाज मात्र तेव्हा श्विनला नव्हता.

दरम्यानच्या काळात फेबु (फेसबुक) असो की 'काय अप्पा' (व्हाट्सअप) असो, 'त्या'च्या बहारदार लेखणीने श्विनचे मन  जिंकले होते. त्याने लिहिलेला 'कोणती सायकल घेऊ' हा लेख तर कदाचित 'त्या'ने स्वतः पसरवला त्यापेक्षा जास्त वेळ श्विननेच पसरवला असेल. त्याचे कारणही तसेच होते. ह्या लेखात त्याने वाचकांची मानसिकता बरोबर जोखली होती आणि त्यावर भाष्य केले होते. त्या लेखानंतरही त्याचे अनेक लेख मन गुंगवून टाकत असत. लेखांबरोबरच त्याने अंबरनाथ येथे सायकलवेडही रुजवले होते. त्याला भेटण्याची श्विनची  इच्छा तीव्र होऊ लागली असतानाच आणि अंबरनाथ येथील सायकलवेडाचे रोपटे मोठे होत असतानाच तो कोकणातील त्याच्या मूळगावी खेड येथे परत गेल्याची बातमी कळली.

अर्थात काय अप्पा आणि फेबुच्या माध्यमातून श्विन त्याच्या लेखणीची करामत अनुभवत होती तसेच त्याच्याशी संपर्कातही राहत होती. भ्रमणध्वनीपेक्षा श्विनला काय अप्पा द्वारे संपर्क साधणे नेहमीच सोयीचे वाटे. 'त्या'च्या भेटीची ओढ वाढत होती. ठाणे येथील 'दुसरे सायकल संमेलनात' त्याच्याशी भेट झालीही... मात्र ती अगदी काही मिनिटे किंवा सेकंदाची होती. त्याच्या खेडजवळच्या सायकलसफरींची वर्णने वाचून श्विनला कधी एकदा खेडला जातोय असे झाले होते. मात्र योग काही येत नव्हता. विनायकच तो... त्याचे दर्शन असे सहजासहजी कसे होणार? हो, हो मी खेडच्या भटक्या विनायकबद्दलच सांगतोय. ह्या खेडच्या विनायकाला भेटण्याची श्विनची ओढ किती तीव्र आहे ह्याची बहुधा तो आकाशस्थ विनायक परीक्षाच घेत असावा. 



अंबरनाथला सायकलवण्याचे वेड लावून विनायकचे समाधान झाले नव्हतेच. त्याने हाच कार्यक्रम खेडला सुरू केला. गाव तसे आटोपशीर! इथे किती भिडू मिळणार? हा विचार त्याला काही काळ त्रस्त करत असेलही, मात्र एकदा गडी ह्याच्या नादाला लागला की ह्याचीच भाषा बोलू लागणार एवढे मात्र नक्की होते. विनायकची जादू खेडमध्येही पसरू लागली. नवनवे सदस्य सामील होत होते. एकदा त्याचा लेख आला- ज्यात १० वर्षाचा सदस्यही मोठमोठ्या फेऱ्या मारत असल्याचे समजले. कोकणातील रस्ते म्हणजे ५-६ किमी वर चढण आलीच. मात्र ह्या छोट्या सदस्याच्याही पुढे अश्या या मोठमोठ्या चढणी नतमस्तक होऊ लागल्या होत्या. खेड सायकल क्लब (KCC) आकाराला आला. विनायकने खेड तालुक्याचा नकाशाच भिंतीवर टांगला. आणि मग सुरू झाली तालुक्यातील प्रत्येक गावावर स्वारी. रविवार असो वा सोमवार, वेळ मिळेल तसा KCC चे सदस्य गाव अन गाव पिंजून काढू लागले. ह्या विषयी लिहिताना विनायकाची लेखणी आणखी बहारदार होत होती. आधी कोकणातील चिवट सायकलपटू आणि त्यात कोकणातील निसर्ग..ह्यांचा मिलाफ त्यात विनायकाची लेखणी हा त्रिवेणी संगम जमला होता. 

श्विन आता खेडला जाण्यासाठी निमित्तच शोधत होती. विनायक प्रमाणेच सायकलवेड वाढवण्याचा श्विनलाही ध्यास होता. त्याचाच एक भाग म्हणून श्विन भारतीय राष्ट्रीय नववर्षाच्या निमित्ताने २१ दिवसांची सायकल मोहीम राबवत असे. यंदा मोहिमेचे सलग चौथे वर्ष होते. मात्र जागतिक महामारीमुळे यंदाची मोहीम लांबली ती तब्बल ८ महिने. यंदा ही मोहीम सुरू करत असताना श्विनने खेडमधील सायकलपटूंनाही ह्या मोहिमेत सामील होण्यास सांगण्याचा विनायकला आग्रह केला. सायकलवेड वाढवण्याची संधी विनायक तरी कसा सोडणार. विनायकच्या सांगण्यावरून खेडचे सायकलपटूही ह्या वर्षी २१ दिवसांच्या मोहिमेत सामील झाले. त्यांच्याशीही 'काय अप्पां'द्वारे परिचय वाढत होताच. २१ दिवसांची मोहीम संपली. मात्र खेडच्या सायकलपटूं चा संपर्क कायम होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त खेडमध्ये एक सायकल रॅली काढण्याचे ठरले. नितीशने श्विनला ह्या रॅलीत सामील होण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. एक दिवस रजा टाकली तर सलग ४ दिवस सुट्टी मिळणार होती. श्विनने विचार केला डोंबिवली-खेड- डोंबिवली साधारण ४५० किमी कापण्यासाठी ४ दिवस पुरेसे होते. श्विनने संधी साधली. श्विनने होकार दिला. मात्र अचानक रॅली रद्द झाल्याचे कळले. आता मात्र विनायकनेच फर्मावले ,'तू येण्याचे ठरवले होतेस ना, मग ये. रॅली रद्द झाली तरी येथील सायकलपटूंबरोबर संवाद साधू'. श्विनला काय तेच हवे होते. श्विनने लगेच होकार दिला.

लगोलग श्विनने जाताना येतानाची आखणी केली. डोंबिवली-कर्जत-खोपोली- पाली मार्गे पहिल्या दिवशी इंदापूर गाठले. दुसऱ्या दिवशी सकाळी महाड येथे शलाका वारंगे हिने नाश्त्यासाठी येण्यासाठी फर्मावले होते. श्विनने उजाडेपर्यंत वाट पाहून सुरुवात केली खरी मात्र लोणारे फाट्यापुढे धुक्याचा जाड पडदा पसरला होता. श्विनच्या विजेरीचा प्रकाश त्या पडद्याला दूर करण्यास असमर्थ ठरत असल्याने श्विनने थांबायचे ठरवले. सुदैवाने शेजारीच एक उपहारगृह दिसले. तिथे चहास्वाद घेत असतानाच श्विनने शलाकाला धुक्यामुळे उशीर होत असल्याचे कळवले. आणि काय आश्चर्य शलाकाला बातमी कळवून भ्रमणध्वनी बंद केला आणि तो धुक्याचा पडदा दूर झाला. 

श्विनने लगोलग महाड गाठले. शलाकाच्या घरी भरपेट पेटपूजा होत असतानाच तिच्या दोन्ही कन्यांबरोबर गप्पाष्टकही रंगत होते. खरेतर आधीच्या- म्हणजे रॅली होणार असती तर ठरवलेल्या- योजनेप्रमाणे कालचा मुक्कामच शलाकाच्या घरी होणार होता. मात्र रॅली रहित झाल्यामुळे मी आधी इंदापुरला मुक्काम केला होता. त्यामुळे शलाका नाराज होतीच. त्यामुळे मीही निघण्याची घाई न करता पुरेपूर पेटपूजा करून घेतली. गृहमंत्री, इंदापूर आणि शलाका तिन्ही ठिकाणी कशेळी खवटीचा घाट टाळून विन्हेरे मार्गे खेडला जाण्याचा सल्ला मिळाला होता. त्याप्रमाणे शलाकाने विन्हेरेच्या मार्गालाही लावून दिले. रस्ता सुंदरच होता.  


कोकणातील घाटांची ओळख करून घेत श्विनने खेड गाठले. विनायकची तसे पाहिले तर ही पहिलीच भेट. मात्र भेटताक्षणीच आमचे बालपणीपासूनचे संबंध असल्याची खात्री पटत होती. घरामागे त्याने फुलवलेली बाग पाहून शहरात आपण कोणत्या ठेव्याला मुकत आहोत ते कळत होते. विनायक मूळचा इथलाच. डोंबिवली, अंबरनाथ इथल्या वास्तवाने त्याची खेडची ओढ कमी झाली नव्हती तर वाढली होती. 

इथल्या रानमेव्याने विनायकने श्विनला तृप्त केले. अर्थात जवळपासचा निसर्ग श्विनला दाखवल्याशिवाय ही खेडवारी पूर्ण होणार नव्हती. विनायकने आसपास फेरफटका मारायचा प्रस्ताव ठेवताच श्विनला आजचे शतक थोडक्यात हुकल्याची आठवण झाली. मात्र विनायकने स्वयंचलित दुचाकीने जाण्याचा प्रस्ताव ठेवला. तो सायकलने जिथे जातो तिथे स्वयंचलित दुचाकीनेच जाण्याचा प्रस्ताव त्याने का ठेवला ह्याची प्रचिती मात्र लगेचच आली. वाट उभ्या चढणीची होतीच, शिवाय डांबरीकरण नावालाच होते. पहिल्या टप्प्यालाच श्विनने विनायकच्या स्वयंचलित दुचाकीने जाण्याच्या प्रस्तावाबद्दल आभार मानले. मात्र ही केवळ सुरुवात होती. संपूर्ण चढ संपेपर्यंत तर श्विनने संपूर्ण शरणागती पत्करली होती. चढ संपल्यावर मात्र आसपासचा निसर्ग, तेथील मंदिर देहभान हरवून टाकत होते. 





अर्थात तिथे फार वेळ थांबता येणार नव्हते. घड्याळबाबा मानगुटीवरच बसले होते.  घरी परत गेल्यावर KCC चे सदस्य आवर्जून भेटायला आले. नितीश, अमीत लढ्ढा,  मिलिंद बोडस ह्यांच्याबरोबर गप्पा रंगत होत्या. हेच नव्हे तर KCC मधील एकेक सदस्य हा हिरा होता. सदस्य संख्येपेक्षा सदस्यांची गुणवत्ता किती महत्वाची असते हे KCC तील सदस्यांकडे पाहून कळत होते. घड्याळ बाबांच्या धाकामुळे महफिल आवरती घ्यावी लागली. 


रात्रीचे जेवण ही मेजवानीच होती. एकूणच विनायकच्या घरी पोचल्यापासून कोकणातील पदार्थांचे वैविध्य जाणवत होते. कंदमुळांपासून ते श्रीखंडापर्यंत असे निरनिराळे पदार्थ रसनेची तृप्ती करत होते. जेवण करून पोट भलेही भरले असेल पण विनायकबरोबर गप्पागोष्टी करत मन भरत नव्हते. खरतर 'दिल मांगे मोअर' अशी परिस्थिती होती. अखेर नाईलाजानेच निद्रादेवीच्या स्वाधीन झालो. दुसऱ्या दिवशी विनायकचा निरोप घेऊन परतणे श्विनला मान्य होत नव्हते. अखेर लहान मुलाप्रमाणे गावाला जाऊन घरी परताना होणारे मानसिक द्वंद्व सहन करतच श्विनने विनायकचा निरोप घेतला. 




फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...