दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आंतरराष्ट्रीय सीमा आहे, जी गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहे.
शहर पार करताच समोर फरक्का बॅरेज दिसत होते. उत्तर बंगालला जोडण्यासाठी गंगा नदीवरील हे एक महत्वाचे बॅरेज आहे. हे बॅरेज बांगलादेशपासून जेमतेम १८ किमी अंतरावर आहे. बांगलादेशची अंदाजे ७०% लोकसंख्या आणि भारताची अंदाजे ५०% लोकसंख्या गंगा खोऱ्यात राहते. भारताच्या एकूण सिंचित क्षेत्रापैकी ४३% क्षेत्रही गंगा खोऱ्यात आहे, आणि तिच्या काठावर अंदाजे १०० शहरी वस्त्या असून एकूण लोकसंख्या अंदाजे १२० दशलक्ष आहे. फरक्का बॅरेजच्या बांधकामानंतर, गंगा-पद्मा नदीतील पाण्याचा जास्तीत जास्त प्रवाह लक्षणीयरीत्या कमी झाला. प्रवाहातील या घटीमुळे भारत आणि बांगलादेशात अनेक समस्या निर्माण झाल्या; यामध्ये माशांच्या विविध प्रजातींचे नुकसान, पद्मा नदीच्या उपनद्या आटणे, बंगालच्या उपसागराकडून खारे पाणी आत येण्याचे प्रमाण वाढणे आणि सुंदरबनमधील खारफुटीच्या (मँग्रोव्ह) जंगलांचे नुकसान होणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. बांगलादेशमध्ये, असे मानले जाते की जलमार्गाचे नियमन केल्यामुळे क्षारतेची पातळी वाढली आहे, मत्स्यव्यवसाय दूषित झाला आहे, जलवाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे आणि पाण्याच्या गुणवत्तेला व सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वाढलेल्या क्षारतेमुळे जमिनीतील ओलाव्याची पातळी कमी होण्यासोबतच वाळवंटीकरणही झाले आहे. अर्थातच, या धरणाचा दोन शेजारी देशांमधील संबंधांवर अजूनही महत्त्वपूर्ण परिणाम होतो.
बिहारमधील पुरासाठीदेखील फरक्का बॅरेजवर टीका केली जाते, कारण त्यामुळे गंगेच्या पात्रात गाळाचे प्रमाण अत्यधिक वाढले आहे. फरक्का बॅरेजमुळे गंगा नदीच्या प्रवाहातून होणारे माशांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात मंदावले. 'हिल्सा' (किंवा 'इलिश') सारखे समुद्रातील प्रौढ मासे प्रजननासाठी सहसा गोड्या पाण्याच्या नद्यांमध्ये येतात. फरक्का बॅरेज बांधल्यानंतर, या माशांना प्रजननासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणारी कोणतीही 'फिश लॅडर' (माशांसाठीची विशेष वाट) तयार करण्यात आली नाही. या बॅरेजच्या निर्मितीनंतर भारतातील हिल्सा माशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली, तर बांगलादेशातील पद्मा नदीच्या खालच्या पट्ट्यात मात्र त्यांची संख्या चांगली राहिली. २०१६ पासून, फरक्का बॅरेजवर काही 'फिश लॅडर्स' (माशांसाठीच्या विशेष वाटा) बांधण्यात आल्या आहेत.
भारत आणि बांगलादेशमध्ये तणाव निर्माण करणारे फरक्का बॅरेज उत्तर बंगालला मात्र जोडण्याचे महत्वाचे काम करत होते.
गंगा नदी आमच्या डावीकडून वाहत येत होती आणि उजवीकडे वाहत जात होती... ती बांगला देशाच्या दिशेने. आम्हाला नदी ओलांडून पुढे जायचे होते. सायकल चालवत आम्ही नदीवरील पुलाजवळ आलो. बॅरेजवरील पुलावर चारपदरी रस्ता होता. पुलावर रस्त्याच्या कडेला साधारण १० फूट रुंदीचा पदपथही होता. पुलावर प्रवेश करत असताना रस्ता मात्र खराब होता. वाहतूकही बऱ्यापैकी होती. मी पुलाजवळ जाताच एका जवानाने मला अडवले. मी थोडा गोंधळलो. कदाचित येथे सायकलने पूल करायला मनाई तर नाही, हा रस्ता केवळ मोठ्या गाड्यांसाठी राखीव तर नाही? मला त्या जवानाने पदपथावरून सायकल चालवायला सांगितले. त्याप्रमाणे मी पदपथावरून सायकलने जाऊ लागलो. पुल बराच जुना असल्याचे जाणवत होते. १९६२ साली ह्या पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. तब्बल १ अब्ज डॉलर्स करून बॅरेजचे काम १९७० साली पूर्ण झाले होते. मात्र बॅरेज सुरू व्हायला १९७५ साल उजाडावे लागले होते. जीर्ण झालेल्या फरक्का बॅरेजवरून प्रवास करणे ही रोजच्या संयमाची परीक्षा ठरली आहे. हा जुना बॅरेज वाहनांचा प्रचंड ओघ हाताळण्यास असमर्थ ठरत होता. त्यामुळेच बहुधा सायकलच्या वेगामुळे इतर वाहनांचा खोळंबा होऊ नये, म्हणून त्या जवानाने सायकल पदपथावरून चालवायला सांगितली होती. पदपथ मात्र पूर्ण रिकामा होता.
नदीच्या विशाल पात्राची कल्पना पुल सुरू होण्या अगोदर येत होती. त्यामुळे नदीकडे पाहत सायकलवायला मिळेल ह्या कल्पनेने मी खुष झालो होतो. पुलाशेजारील पदपथावर सायकल चढवली मात्र आणि.. माझी पार निराशा झाली. पुलाच्या डाव्या बाजूला अंदाजे ६ फुटांपेक्षा उंच कठडा होता. रस्त्याच्या पुलाला खेटूनच डावीकडे रेल्वेमार्गही होता. त्यामुळे डावीकडे नदीचे पात्र पाहताही येत नव्हते. उजव्या बाजूला चारपदरी रस्त्याच्या पलीकडे बांगला देशाच्या दिशेने वाहणाऱ्या नदीच्या पात्राच्या ' दूरदर्शन ' वरच समाधान मानावे लागत होते. नदीचे पात्र रुंद तर होतेच शिवाय चांगलेच खोल असल्याचे लांबूनही जाणवत होते. तेथील पाण्याच्या प्रवाहाचा खळाळ आणि पात्राची रुंदी, खोली पाहता ही नदी नव्हे तर ' नद ' च होता. फरक्का बॅरेजला आव्हान देत बांगलादेशकडे जाणारा तो अजस्त्र नद आपल्याच नादात वाहत होता.
पुल चांगलाच लांब होता. वाटेत काही ठिकाणी टेहेळणी पथकही तैनात होते. पदपथावरून जात असल्याने वेगही कमी झाला होता. पदपथावर चालत जाणारे तर कोणीच नव्हते. त्यामुळे सायकल संथ मात्र विना अडथळा जात होती. पुल पार करायला आम्हाला जवळपास २० मिनिटे लागली. ह्या बॅरेजची लांबी २२४५ मीटर आहे. मात्र एवढ्या विशाल पात्राचे नीट दर्शन न मिळाल्याने नदीपात्रावरील सायकलवण्याची मजा घेता येत नव्हती.
एव्हाना भूकही लागली होती. सुदैवाने पूल पार करताच डाव्या बाजूला एक खोपट दिसले. लांबून पाहता तिथे जेवण मिळेल असे वाटत नव्हते. मात्र किमान चहा घेऊन तरी पुढे जाता येईल अश्या अपेक्षेने आम्ही तिथे शिरलो. शेजारीच फरक्का सुपर थर्मल पॉवर स्टेशन दिसत होते. हे पॉवर स्टेशन २१०० मेगावॉट क्षमतेचे होते.
आम्ही त्या खोपटामध्ये शिरून पाहिले. आतील जागा चांगलीच मोठी होती. समोर बरीच मोकळी जागा होती. दरवाजाच्या उजव्या बाजूला काही टेबल आणि खुर्च्या मांडल्या होत्या. तर डाव्या बाजूला अगदी आतल्या बाजूूला किचन दिसत होते. ते बंदिस्त नव्हते. एकाच हॉल मध्ये बिनभिंतीचा तो कारभार होता. मालक आणि मालकीण आमचा अंदाज घेत होते आणि आम्ही त्यांचा अंदाज घेत होतो. समोर बसलेले ग्राहक उत्सुकतेने आमची चौकशी करू लागले. आम्ही मुंबईहून आलो आहोत हे ऐकताच ते खुष झाले. व्यापारानिमित्त त्यांचा मुंबईशी नियमित संपर्क होता. त्यांनी लगेचच त्याच्या मुंबईतील मित्राला फोन लावला. त्यांचा मुंबईतील मित्रही आमची मोहीम ऐकून खुष झाला. मनोज त्या मुंबईतील मित्राशी फोनवर बोलत होता तर मी येथील नवीन मित्राशी गप्पा मारू लागलो. आमची मोहीम त्यांना रोमांचकारी वाटत होती. एव्हाना हॉटेलचे मालक, मालकीण आणि आम्हीही एकमेकांबद्दल आश्वस्त झालो. आम्ही येथेच जेवण करण्याचे ठरवले. एकतर भूक लागली होतीच. शिवाय कालच्या दुपारचा अनुभव ताजाच होता. जेवण मात्र छानच होते. हॉटेल मालक आणि मालकिणीला आम्ही धन्यवाद दिले. त्यांनी आणि येथे परिचित झालेल्या आमच्या नवीन मित्राने आम्हाला शुभेच्छा दिल्या.
आम्हाला त्या शुभेच्छांची आज खरोखरीच गरज होती. कारण आम्ही आज ज्या गजोल ह्या गावी मुक्काम करायचे ठरवले होते त्या गावाचे नावही ऐकले नसल्याचे आम्हाला काहीजणांनी सांगितले होते. तिथे पोचल्यावर आम्हाला राहण्याची व्यवस्था शोधायची होती. अर्थातच त्यासाठी सूर्यास्ताच्या अगोदर पोचायला हवे होते. अद्यापही जवळपास ६५ -७० किमी अंतर बाकी होते. सूर्यास्ताच्या सुमारास आम्ही गजोल गाठले खरे. मात्र हमरस्त्याला हॉटेल दिसेना. आम्ही गावाकडे वळलो. चौकशी करता सुरुवातीला एक दोन हॉटेलने आम्हाला राहण्याची परवानगी नाकारली. अंधार होत असल्याने थोडी चिंता वाटू लागली. मात्र तिसऱ्या ठिकाणी आमची सोय झाली. थोडे फ्रेश होऊन आम्ही आजच्या राइडचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलो.


छान महिती मिळाली.प्रवास केल्यासारखेच वाटले.👍👌🕉️
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा