रविवार, १५ जानेवारी, २०२३

साथीदार (कन्याकुमारी चेन्नई सायकलसफर भाग ४)

 



सरोजिनी नायडू ह्यांनी भारतीयत्वाची व्याख्या अथवा ओळख सांगताना म्हटले आहे की भारतीयत्व म्हणजे ' विविधतेतील एकता '. ह्या खंडप्राय देशातील विविधता अनुभवणे ह्यापरता आनंद नाही. पेट्रोल, डिझेल वर चालणाऱ्या चारचाकी अथवा दुचाकी असो की विमान असो..त्याद्वारे प्रवास करताना आपल्याला विज्ञानातील चमत्कार समजू शकेल, मात्र समाजजीवन समजून घ्यायचे असेल तर सायकल खेरीज इतर कोणतेही वाहन नाही.

सायकलने भारत परिक्रमा करत असताना माझा आणखी एक महत्वाचा उद्देश मनात असतो.. तो म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणे.. वाढवणे. तो संपर्क केवळ परिक्रमा करत असतानाच साध्य करायचा असतो असे नव्हे तर परीक्रमेच्या तयारीसाठी देखील जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा माझा प्रयत्न असतो.

आमच्या कन्याकुमारी चेन्नई संघात प्रथमच आठवड्यापेक्षा जास्त दिवसांचा दौरा करणारे अनेक चेहरे होते. असा दौरा करताना सगळ्यात महत्वाचे असते आपल्या सायकलची ओळख आपल्याला असणे. ह्यासाठीच सर्व सहभागी सदस्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्याचा विचार सुचला. मला स्वतःला देखील फारसे तांत्रिक ज्ञान होते असे नव्हे. ह्या उपक्रमासाठी माझ्या डोळ्यासमोर पहिले नाव होते सुमित मोकलचे. खरतर सुमित स्वतःच आमच्याबरोबर यावा अशी माझी इच्छा होती. मात्र तो ह्यासाठी उपलब्ध नसला तरी कार्यशाळा घेण्यासाठी तो लगेचच तयार झाला. सर्व सदस्यांना त्याने सायकल विषयी महत्वाची माहिती थोडक्यात पण नेमकेपणाने दिली.

सायकलची माहिती तर झाली मात्र त्या सायकल कन्याकुमारीपर्यंत नेणे आणि चेन्नईपासून परत आणणे ही व्यवस्था आवश्यक होती. तसेच कन्याकुमारी ते चेन्नई प्रवासात सायकल स्वारांना सहाय्य करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे आवश्यक होते. ह्यासाठी विचारताच सतीश दप्तरी लगेचच तयार झाला. पंढरपूर पदयात्रेसाठी तो नेहमी सहाय्य वाहन नेत असतो. त्यामुळे त्याचा अनुभव आम्हाला उपयोगी पडणार होता. खरतर सतीश हा आमच्या संघातील अकरावा सदस्य म्हणूनच सामील झाला.

कोणत्याही स्पर्धा अथवा मोहिमेसाठी जर गणवेष असेल तर सहभागी सदस्यांचा उत्साह तर वाढतोच शिवाय सांघिक भावनाही वाढीस लागते. डोंबिवलीतील आहारतज्ञ डॉ अर्चना नाईक आणि त्यांचे सहकारी Eatgoodgo चे श्री अजिंक्य परब ह्यांनी आम्हाला जर्सी तर दिलेच शिवाय प्रत्येक सायकलस्वारासाठी खाऊही दिला. 

सायकल आणि सायकलस्वार ह्यांची प्राथमिक तयारी सुरू असतानाच मी आणि सर्वानन ह्यांचा तमिळनाडू येथील निवास व्यवस्थेसाठी पाठपुरावाही सुरू होताच. खरतर सर्वानन काही दिवस आधी त्याच्या गावाला जाणार होता. त्याने संपूर्ण मार्गातील व्यवस्था करण्याची पूर्ण खात्री दिली होतीच. मात्र माझीही स्वतंत्रपणे काही व्यवस्था होते का ह्याची चाचपणी सुरू होती. आमच्या मोहिमेबद्दल कळताच TJSB बँकेतील माझी सहकारी स्नेहा शिंग्रीने ताबडतोब संपूर्ण व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तिच्या मार्फत वनवासी कल्याण आश्रमाच्या श्री शरद चव्हाण ह्यांच्याशी संपर्क साधला. स्नेहा केवळ शरददादांचा संपर्क देऊन गप्प राहिली नाही, तर सातत्याने माझाही पाठपुरावा करत होती. शरददादांनी मला पूर्णपणे आश्वस्त केले होतेच. तसेच त्यांनी श्री अभय बापट ह्यांचाही संपर्क साधून दिला. साखळी जोडली जात होती. सायकल सफर आखतानाचा माझा दुसरा उद्देश.. ' जास्तीत जास्त लोकांशी संपर्क वाढवण्याचा..' सफल होत होता. 

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त.. (कन्याकुमारी चेन्नई सायकलसफर भाग ३)


कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या आरतीने केली जाते. कडाव येथील श्रीगणेशाचे दर्शन घेण्याची माझी फार वर्षांपासूनची इच्छाही होती. त्यामुळे पवनने कडावचा पर्याय सुचवताच मी लगोलग होकार दिला.

कर्जतजवळ कोथळीगडाच्या परिसरात वसलेले कडाव हे छोटेसे गाव. वस्ती जेमतेम ५ हजाराच्या आतबाहेर. येथील सिद्धिविनायकाची महती खूप वर्षांपूर्वी ऐकलेली होती.  येथील गणेश प्रतिमा खूप प्राचीन आहे. कण्व ऋषींनी या गणेशाची स्थापना केली अशी आख्यायिका आहे. अंदाजे ३०० वर्षांपूर्वी या गावच्या पाटीलांना शेत नांगरत असताना ही मूर्ती मिळाली. या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला, असे म्हटले जाते. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे ही खूप मोठी असून एकदंत शूर्पकर्ण या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ती घडवलेली आहे. दिगंबर आणि यज्ञोपवीत परिधान केलेली अशी ही निश्चितच आगळीवेगळी मूर्ती आहे.

आमचे सदस्य केवळ डोंबिवलीतील नव्हते तर चेंबूर, पनवेल, खारघर आणि ठाणे येथून येणार होते. आम्ही तळोजा फाटा (उंबार्ली) येथे भेटण्याचे ठरवले. सर्वांच्या दृष्टीने वेळ थोडी उशिराचीच ठरवली होती. इतरांची वाट पाहत येथील पंढरपुरी चहाचा आस्वादही घेता येणार होता. 

तळोजा फाटा येथे सायकल सफरीतील पहिला चहा घेऊन तेथून निघालो तोपर्यंत घड्याळबाबा जवळपास ८ वाजल्याचे सांगत होते. वास्तविक आजची सायकलसफर ही आमच्या मोहिमेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. ह्या सफरीनिमित्त आम्ही सगळेजण प्रथमच एकत्र सायकलवणार होतो. ह्या दरम्यान प्रत्येकाची बलस्थान, कच्चे दुवे लक्षात येऊ शकत होते. तसेच काहीजणांची पहिलीच मोठी सफर असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी देखील आजची सायकलसफर महत्वाची होती. दुर्दैवाने आमची आजची सदस्यसंख्या मात्र ५ वरच सीमित झाली होती. प्रसाद अजून आमच्या संघात सामील व्हायचाच होता. मात्र इतर ४ जणही आज सामील होऊ शकले नव्हते.

तळोजा फाटा येथे चहापान झाल्यावर आम्ही लगोलग बदलापूरच्या दिशेने निघालो. येथील हमरस्ता फुजीच्या टायरखालचाच! आज तर फुजीला इतरांनीही साथ होती. नेवाळी फाटा हा पहिला टप्पा लगेचच पार झाला. सर्वानन, मी, पवन, मीरा आणि नयना मॅडम एकमेकांच्या गतीचा अंदाज घेत कूच करत होतो. बदलापूर गाठत असताना जठराग्नी जागृत झाला होता. त्याला आहुती देऊन आम्ही पुन्हा मार्गक्रमण सुरू केले.

पुढील रस्ता तसा उघडाबोडखा. काही वर्षांपूर्वी असलेली हिरवळ कधी नाहीशी झाली होती कोण जाणे. सगळे सायकलस्वार धीम्या गतीने जाऊ लागले. वांगणी, शेलू, नेरळ मागे पडेपर्यंत रविराज चांगलेच तळपू लागले होते. अर्थातच सायकलस्वारांचा सकाळचा उत्साह कमी झाला होता. उन्हाच्या तडाख्याने तहान लागत होतीच, शिवाय आता पुन्हा पोटातील कावळे कावकाव करू लागले होते. अजूनही कर्जत लांब होते. त्यापुढे कडाव...! दरम्यान आम्हाला कर्जतला न जाता कडावकडे जाणाऱ्या जवळच्या रस्त्याचा सुगावा लागला. जवळपास १० किमी अंतर कमी होणार असल्याचे कळले तरी सावधगिरी म्हणून अस्मादिकांनी रस्ता कितपत चांगला आहे ह्याची विचारणा केली. ग्रामस्थांनी जेमतेम २००-३०० मीटर रस्ता खराब असून पुढचा रस्ता चांगला असल्याचे सांगितले. ग्रामस्थांवर विश्वास ठेवून आम्ही तो रस्ता निवडला.

मात्र काही वेळातच चांगला रस्ता ही ग्रामस्थांची कल्पना आणि आमची कल्पना ह्यात महद्अंतर असल्याचे लक्षात आले. खरतर हा रस्ता आमच्या नाजूक सायकलींची परीक्षा पाहणाराच होता. आम्हीच काय आमच्या निर्जीव सायकलीही कुरकुर करू लागल्या होत्या. मात्र आता परत फिरायला वाव नव्हता. परत त्याच मार्गाने जायला आमच्या सायकलीही तयार नव्हत्या. वेग मंदावलेला होताच. कदाचित त्याचमुळे ' उपरवालेकी चित्रकारी ' पहायला आम्हाला सवड मिळाली. खरतर आम्हाला म्हणण्यापेक्षा पवनला.. असे म्हणायला हवे कारण ती चित्रकारी दिसली ती त्याच्याच दृष्टीला..

पुढचा रस्ता आता बरा म्हणण्याइतपत होता. मात्र सगळेजण कधी एकदा कडाव येतय असा विचार करू लागले होते. आम्ही कर्जत मुरबाड हमरस्त्याला लागलो. कडाव गाव आले होते. श्रीविनायकाचे मंदिर उजव्या हाताला दिसले. अष्टविनायकांच्या परिसरातील गर्दी इथे नव्हती. मंदिराचे आवार मोकळे होते. मंदिराशेजारी गार पाण्याने चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारताच आलेला थकवा निघून गेला. मंदिराचे सभागृह देखील लांबरुंद होते. थोडा विसावा घेऊन आम्ही बाहेर आलो. पवन आम्हाला पुढे नेत होता... आमचे गंतव्य स्थान अजून आलेच नव्हते. मात्र आता पुन्हा सायकलवायला मजा येऊ लागली. कडाव मागे पडले होते.  रविराज थेट डोक्यावर येऊन आग ओकू लागला होता. सायकली वेग घेऊ लागल्या एवढ्यात पवन एका कच्च्या रस्त्याला वळला. 



निसर्ग मुक्तहस्ते उधळण करत होता, पण आमची मनस्थिती त्याचा लाभ घेण्याची नव्हती. आकाशातील रवी, पोटातील कावळे आम्हाला आजूबाजूचा निसर्ग पाहण्याचा विचार करू देत नव्हते. मात्र थोड्या वेळातच आम्ही एका सुंदर जागी पोचलो.


येथील दृश्य पाहूनच सगळे प्रसन्न झाले. पण आमचे होणारे स्वागत तर अगदी राजेशाही होते. पवन इथे येण्यासाठी का आग्रही होता, ह्याचे प्रत्यंतर लगेचच आले. थंडगार लिंबू सरबत देत आमचे स्वागत झाले. तेही भल्यामोठ्या पेल्यामध्ये. आम्ही अगदी मनसोक्त सरबत पिऊन घेतले. आता सगळेजण शांत झाले होते. हा बंगला पवनच्या मामांचा होता. आवार चांगलेच मोठे होते. आजूबाजूला वृक्षराजी मन प्रसन्न करत होतीच. बंगल्यामध्ये असलेल्या तरण तलावात पोहण्याचा मोह सर्वाननला आवरता आला नाही.



आम्ही चांगलेच ताजेतवाने झालो होतो. जेवणासाठी आम्ही दिवाणखान्यात गेलो. एका मोठ्या मेजावर जंगी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. पवनचे मामा अथवा त्यांचे कुटुंबीय येथे राहत नसले तरी देखरेख करण्यासाठी एक गडी येथे राहत असे. त्याने स्वतःच स्वयंपाक केला होता. ती चव इतकी उत्कृष्ट होती की आम्ही बोटेही चाखत होतो. वास्तविक परत घरापर्यंत सायकलवायचे होते, तरीही हात आखडता घेता येत नव्हता. जेवण चांगलेच तब्बेतीत झाले. आता खरेतर वामकुक्षी आवश्यक वाटू लागली. सगळेजण चांगलेच रेंगाळले. मात्र घरी पोचणे आवश्यकच होते. त्यामुळे अगदी मनाविरुद्धच आम्ही परत निघालो.. ते मात्र पवनला बजावत की आता आपली मोहीम संपली की आपण सगळे इथे परत येऊ तेही मुक्कामासाठी..






परतताना सगळ्यांच्या मनात एकच विचार होता...
'' गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त "



सोमवार, ९ जानेवारी, २०२३

संघ (कन्याकुमारी चेन्नई सायकल मोहीम - भाग २)

 


माघी चतुर्थीनिमित्त कल्याण पाली सायकल यात्रा करण्याचा कल्याणच्या गजानन (विलास) वैद्य ह्याचा ध्यास गेली ३७ वर्ष सुरू आहे. ह्या सायकल वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या आणि त्यांचा उत्साह हा दरवर्षी वाढतच असतो. ३७ व्या वर्षीच्या सायकल वारीमध्ये खारघर येथील सर्वाननदेखील सामील झाला होता. त्याच वारीदरम्यान त्याची ओळख झाली होती. 

कल्याण पाली यात्रेतील सदस्यांच्या 'काय अप्पा ' समूहावर सर्वाननला कन्याकुमारी चेन्नई मोहिमेची बातमी कळली. त्याचे मूळ गाव तमिळनाडूमधीलच. त्यामुळे ह्या मार्गाचे त्याला आकर्षण असणे स्वाभाविकच. ' मै सर्वानन.. ' असे म्हणत जो फोन त्याने मला केला तो माझ्यासाठी खूपच महत्वाचा होता.

सर्वानन हे प्रत्यक्ष मुरुगन अथवा कार्तिकेयाचेच एक नाव. तामिळनाडू राज्यात मुरुगन ह्या देवतेस विशेष महत्त्व आहे. आणि आता तर तमिळनाडूमधील कन्याकुमारी ते चेन्नई ह्या सायकलवारीमध्ये प्रत्यक्ष सर्वानन सहभागी होऊ इच्छित होता. यापरते भाग्य ते काय?

सर्वाननच्या बोलण्यात उत्साह पुरेपूर भरलेला होता. तो सामील होण्यास उत्सुक आहे हे कळताच मी निर्धास्त झालो. तमिळनाडूमध्ये तेथील लोकांशी स्थानिक भाषेत संपर्क साधण्याची महत्वाची अडचण त्याच्या येण्यामुळे दुर होणार होती. सर्वाननचा सहभाग तेवढाच मर्यादित राहणार नव्हता. तर त्याला भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे आणि त्यांची कार्यालये असणाऱ्या ह्या राज्याची पूर्ण माहिती होती. 

मी आखलेला मार्ग त्यातील रोजचे टप्पे ह्याची माहिती देताच त्याने लगेचच दुजोरा दिला. तसेच रोजच्या प्रवासाची आणि निवासाची पूर्ण जबाबदारी घेण्याचेही सूतोवाच केले. दरम्यान इतर काही मार्गांनीही निवास व्यवस्था करण्याचा प्रयत्न मी करत होतोच. मात्र आता सर्वानन जोडीला असल्याचे कळताच एकंदर आखणीचे दडपण एकदम हलके झाल्यासारखे वाटू लागले.

वास्तविक ह्या मोहिमेची कल्पना सगळ्यात आधी उचलून धरली होती ती जयश्री पंडित ह्यांनी. त्यांचे स्वतःचे येणे निश्चित होत नव्हते. मात्र त्यांच्या आणि नयना आघारकार ह्यांच्या माध्यमातून अरुणा लागू ह्यांना मोहिमेत सामील होण्याची ओढ लागली. मी त्यांना समाजमाध्यमाद्वारे एक उत्तम गिर्यारोहक म्हणून ओळखत होतो. आमची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्यांच्या गिर्यारोहणाचे लेख मी वाचत असे. त्या लेखाद्वारे त्यांची ओळख झाली होती. 

सुनिता भणगे आणि अवनी कांबळे ह्या दोघी मैत्रिणी रोज पहाटे इतर सदस्यांबरोबर ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावर चालण्यास येत असत. अजित शिरवळकर ह्यांच्या गटातील हे सदस्य मी सायकल चालवत असताना रोज दिसत असत. बऱ्याच दिवसात अजित मात्र दिसला नव्हता. पण बहुधा त्याच्या माध्यमातून सुनिता आणि अवनी ह्याही मोहिमेत सामील झाल्या. दोघींचा स्वभाव मात्र एकदम विरुद्ध. सुनिता गप्पिष्ट तर अवनी शांत. कदाचित दोघींच्या मैत्रीचा पायाही हाच असावा.

' मी पवन चांडक ...' अशी ओळख फोनवर कळताच मी थोडा गोंधळलो. कारण मी ज्या पवन चांडकना ओळखत होतो ते होते परभणी येथील डॉक्टर. परभणी मधील डॉक्टर देखील आमच्या मोहिमेत सामील होणार असे वाटल्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. माझा गैरसमज काही दिवस तसाच राहणार होता. आमची गाठ पडायला वेळ होता. 

 प्रमोद दोडकेबरोबर पहिले संभाषण झाले तेव्हाच खात्री झाली की हा सर्व परिस्थितीत साथ देणारा साथीदार आहे. प्रमोदने ही खात्री संपूर्ण मोहिमेत सार्थ ठरवली. प्रसाद सरवटे हा खरतर पेडल रिपब्लिक ह्या घरच्याच सायकल गटातील सदस्य मात्र...तो सामील झाला तो सगळ्यात शेवटी. घरच्या आघाडीवर पाठिंबा मिळण्यात त्याला बराच वेळ द्यावा लागला असावा. 

अपवाद वगळता बहुतेक सगळ्याच सायकलस्वारांना अश्या मोहिमांसाठी घरच्या मंडळींना पाठिंबा मिळवण्यात थोडा वेळ जातो. मात्र अस्मादिकांना अश्या मोहिमेसाठी पूर्ण पाठिंबा मिळतो कारण गृहस्वामिनीच अश्या मोहिमेत साथ करत असते. किंबहुना तिच्या सोयीनेच अश्या मोहिमांची आखणी अस्मादिकांनी केलेली असते. माझी अर्धांगिनी... मीरा.. खरतर आता माझ्यापेक्षाही अश्या मोहिमांसाठी उत्सुक असते. डोंबिवली गोवा, अष्टविनायक, पुणे जम्मू अश्या मोहिमांनंतर तिचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे.

आमच्या मोहिमांमध्ये नयना आघारकर येणार हे तर आम्ही गृहितच धरलेले असते. भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांची सायकल फिरलेली आहे.

आमचा एकंदर संघ दहा जणांचा झाला होता. मी, मीरा आणि नयना मॅडम ह्यांनी दिर्घ दौरे केले होते तर पवन आणि प्रमोद ह्यांना लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीचा अनुभव होता. सर्वानन लांब पल्ल्याचे सायकलवणे करण्यात तरबेज होता.

मात्र आमच्या संघातील दहाजणांपैकी कोणत्याही चार जणांनी एकावेळी एकत्र सायकल चालवली नव्हती. तीन इतर डोंबिवलीकर वगळता इतर सर्व मला स्वतःला नवीन होतेच पण ते एकमेकांना पूर्ण अनोळखी होते.

मग एका रविवारी सर्वांनाच सोयीच्या ठिकाणी असलेल्या शीळ फाट्याजवळील गणेश घोळ मंदिरात भेटण्याचे ठरले. त्यावेळी पवन चांडक विषयीचा माझा गोंधळ संपला. हा पवन परभणी नव्हे तर अप्पा (धनंजय मदन) ह्यांच्या पनवेलचाच असल्याचे समजले. 

मात्र दीर्घ पल्ल्याच्या सायकल मोहिमेआधी एक दिवसीय शतकी सायकल सफर आखणे महत्वाचे होते. त्यासाठी विचारणा करताच पवनने सुचवले ... ' कडाव '




फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...