शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना

'ओह दादा आप कहासे आ रहे हो' दुर्गाडी किल्ला पार करून गोविंदवाडी बायपासवरील १८ गतिरोधक पार करण्यास सुरुवात करत असताना एक अश्वशक्तीधारक दुचाकीस्वार मला विचारत होता.

'मैंने आपको कोन गाव मे देखा, रांजनोली मे देखा,...' तो पुढे म्हणाला. मी म्हटले ' मै ठानासे आ रहा हू, आप कहासे आ रहे हो?'.
मी आणि माझ्या श्विनकडे पाहत तो पुढे म्हणाला , 'मै भी ठानासे आ रहा हू. आप के पीछे ही. कैसे चला लेते हो इतनी सायकल?'
श्विन ठाणे ते दुर्गाडी त्या स्वयंचलीत दुचाकीला मागे टाकत होती, हे समजताच मीही थोडा सुखावलो होतो. माझे रोजचे ६१-६२ किमीे #cycle2work ऐकून/ पाहून बहुतेकांना हा प्रश्न पडतो.

हे सर्वजण इतक्या अंतराचे सायकलिंग आणि तेही रोज असे ऐकून आश्चर्यचकित होतात. पण खरेतर ते रोज आहे म्हणूनच सोपे आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर प्रथम हवे सातत्य #consistency . सायकलिंग सुरु करताना प्रथम आठवडाभर ४- ६ किमी अंतर पार केले तरी हरकत नाही पण ते सातत्याने म्हणजे रोज करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात रोज १०-१२ किमी, पुढे रोज १५-२० किमी असे अंतर वाढवत नेता येते. सुरुवातीला ठेवलेले सातत्य आपला रोजचा स्टॅमीनाही वाढवत नेते आणि मग रोजचे ६०-६२ च नव्हे तर रोजचे १०० किमी सायकलिंगही सहजसाध्य होते.

त्या दुचाकीस्वाराला मी म्हटले तुम्ही ६०-६२ किमी चा विचार न करता रोज ५-६ किमी सायकलिंग सुरु करा आणि आठवडा आठवड्याने अंतर वाढवत रहा, तीन महिन्यात माझ्याबरोबर रोज ठाण्याला सायकलने येऊ लागाल'

तोही म्हणाला 'मेरे पास भी सायकल है, अब सायकलिंग शुरू करना चाहिये'

अंतर किती हे महत्वाचे नाही, फक्त पहिले पॅडल मारायची गरज आहे... मग पुढील शेकडो किमी अंतर कसे पार होते हे समजतही नाही. Cycle2work चा अनुभव आणि आनंद मिळवत असताना, इतरांनाही त्याकडे आकृष्ट करण्यातला आनंद जास्त नाही का! 'आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना'

बुधवार, २५ एप्रिल, २०१८

बिरबलाची भाषा

जागतिक भाषा आणि बिरबलाची भाषा

अकबराच्या दरबारात एक माणूस आला. तो अनेक भाषा बोलू शकत असे. त्याने अकबराला आव्हान दिले की तुमच्या राज्यात इतके हुशार लोक आहेत, तर माझी खरी 'भाषा' ओळखून दाखवा.
दरबारातील अनेक विद्वानांनी प्रयत्न केले पण उत्तर सापडेना. बिरबलाने मुदत मागून घेतली.
तो माणूस बाजारात फिरत असताना बिरबलाने सांगितल्याप्रमाणे एका मुलाने त्याला दगड मारला. तो दगड लागताच तो माणूस त्याच्या 'मातृ'भाषेत त्याच्या 'आई'चे नाव घेऊ लागला. बिरबलाने ते ऐकले आणि त्याची भाषा त्याला सांगितली.

हे सर्व आठवायचे कारण इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याची ओरड. भारतात हिंदी हि राष्ट्रीय भाषा आणि इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याचे सातत्याने म्हटले जाते. सहज म्हणून भारतीय संविधानानुसार भारताची राष्ट्रीय भाषा कोणती म्हणून शोध घेतला. तेव्हा लक्षात आले की कोणतीही भाषा भारतात राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केली गेली नाही. मात्र भारतीय संविधानाच्या आर्टिकल ३४३/१ नुसार भारतात २२ भाषांना 'ऑफिशियल' भाषांचा एकसमान दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे हिंदी हि भारताची राष्ट्रीय (national) भाषा तर नाहीच पण एकमेव 'official' भाषाही नाही. किंबहुना मराठी प्रमाणेच २२ official भाषांपैकी हिंदी आहे.

जागतिक भाषा म्हणून इंग्रजी आहे हा समज तपासून पाहिल्यावर लक्षात आले की १७८ देशांपैकी केवळ ५९ देशात इंग्रजीला ऑफिशियल भाषा असे म्हटले आहे. यातही मेख अशी आहे की 'ऑफिशियल' भाषा म्हणजे तेथील लोकांची एकमेकांशी संवादाची नव्हे तर शासनाशी संवादाची भाषा! ह्या देशांमध्येही इंग्रजी हि एकमेव ऑफिशियल भाषा नाही.
किंबहुना या ५९ देशात इंग्रजांनी राज्य न केलेल्या पैकी रवांडा या केवळ एकाच देशात इंग्रजी ही ऑफिशियल भाषा आहे.
ह्या ५९ देशातही इंग्रजीबरोबरच इतर भाषांना 'ऑफिशियल' भाषेचा दर्जा आहे. किंबहुना भारताचेच उदाहरण घेतल्यास या ५९ देशातही ऑफिशियल भाषा म्हणून इंग्रजीपेक्षा इतर भाषांचा वापरच जास्त प्रमाणात होतो.

बॉलिव्हिया या देशात सर्वोधिक म्हणजे ३७ भाषाना 'ऑफिशियल भाषा' हा दर्जा आहे, त्यात इंग्रजीचा समावेश नाही.

त्या खालोखाल सर्वोधिक ऑफिशियल भाषा असणाऱ्या भारतात इंग्रजीप्रमाणेच मराठी, हिंदी अशा २२ भाषांना 'ऑफिशियल भाषा' हा दर्जा आहे.

म्हणजेच इंग्रजी हि अधिकृत रित्या कधीही जागतिक भाषा म्हणून घोषित झालेली नाही, शिवाय अनाधिकृतरीत्याही जागतिक भाषा म्हटली जाऊ शकत नाही.

कोणत्याही देशात सर्वोधिक बोलली जाणाऱ्या भाषांचा विचार केल्यास १७८ देशांपैकी अमेरिका (US), कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आयर्लंड या केवळ ६ देशात इंग्रजी ही सर्वोधिक बोलली जाणारी भाषा आहे. यापैकी खुद्द इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनीही इंग्रजीला राष्ट्रीय भाषा घोषित केलेले नाही.

त्यामुळे या निकषावर सुध्दा अधिकृत राहोच अनधिकृतरीत्या सुद्धा इंग्रजी हि जागतिक भाषा नाही.

जगातील लोकसंख्येच्या निकषानुसार जगात सर्वोधिक बोलली जाणारी भाषा मांडेरिन (चिनी भाषा) आहे जी जगातील १४.१% लोक बोलतात. त्याखालोखाल ५.८५% लोकांची भाषा स्पॅनिश असून इंग्रजी हि तिसऱ्या क्रमांकावर ५.५२% लोकांची बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी हि जगातील चौथ्या क्रमांकाची म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या ४.४६% लोकसंख्येची बोलली जाणारी भाषा आहे.
म्हणजे या निकषानुसार तर इंग्रजीचा जागतिक स्तर हिंदीच्या जवळपास असून मांडेरिन च्या आसपासही नाही.

जगातील १७८ देशांपैकी केवळ १०१ देशांनी राष्ट्रीय भाषा घोषित केल्या आहेत.

ऑफिशियल भाषा, जगातील सर्वोधिक देशात बोलली जाणारी भाषा, जगातील सर्वोधिक लोकसंख्येची बोलली जाणारी भाषा, राष्ट्रीय भाषा या कोणत्याही निकषानुसार जागतिक भाषा ठरू न शकणारी इंग्रजी हि खुद्द इंग्लंडचीही राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केलेली नाही

सोमवार, २३ एप्रिल, २०१८

शिवाजीमहाराज आणि Adam Zalewski

How English is your official language in India-Adam zalewski (Poland) asked us during Navapur Mahabaleshwar cycle trail

मी १.५ वर्षांपूर्वी नवापूर ते महाबळेश्वर अश्या सह्याद्री डोंगररांगेतील सायकलमोहीमेत सहभागी होतो. तेव्हा पोलंडचा ऍडम नावाचा २०-२२ वर्षाचा मुलगा आमच्याबरोबर सामील झाला होता. आम्ही त्याच्याशी इंग्रजीत बोलायचो. त्याला सांगितले की भारतात इंग्रजी हि सर्वाना सामायिक भाषा आहे. दक्षिणेत हिंदी नाही आणि उत्तरेत तामिळ नाही, महाराष्ट्रात बंगाली नाही की बंगालात मराठी नाही. पण सगळीकडे इंग्रजी मात्र आहे. किंबहुना आमची व्यवहारातील भाषाही इंग्रजीच आहे. त्याला खूप आश्चर्य वाटले. तो म्हणाला तुमची सामायिक भाषा हिंदी असू शकते पण इंग्रजी असूच शकत नाही.
आम्ही त्याला सांगितले की आमच्यावर इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केले. त्याचा हा परिणाम!
तरीही तो मानुच शकत नव्हता, त्याच्या ते पचनी पडतच नव्हते. तो म्हणाला युरोपातही इंग्रजीला कोणी विचारत नाही. प्रत्येक देशातील व्यवहाराची भाषा त्या त्या देशातील भाषाच असते.
आमच्याकडे उत्तर नव्हते. वाटेत आम्ही पाचाडला पोचलो. रायगड दिसू लागल्यापासून आम्हा सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आम्ही त्याला शिवाजीमहाराजांचा इतिहास समजावू लागलो. त्याला सांगितले  शतक- दोन शतकाची मुसलमान राजवट उधळून शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले.
....


काल मी धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात मराठीत 'स्पीच' सुरु केले, तेव्हा प्रेक्षागृहातून 'इंग्रजी, इंग्रजी' असा ओरडा सुरु झाला.
तेव्हा मला आठवले शिवाजी महाराज आणि पोलंडचा ऍडम.
शिवाजीमहाराज खरोखरच आम्हाला कळले की ऍडमला! ऍडम पुन्हा भेटला की विचारणार आहे पोलंडमध्ये किती शिवाजी जन्माला आले आहेत

रविवार, १५ एप्रिल, २०१८

रविवार सहल -पिसे डॅम

भारतीय सौर चैत्र २५, शके १९४०

काल टिटवाळा येथे मिसळवर ताव मारल्यावर, आज पळस्पे फाटा येथील दत्तमिसळचा समाचार घेण्याचा विचार होता. मात्र रविवारच्या पहाटेची साखरझोप न टाळता आल्यामुळे श्विन स्कॉटला आज निघायला उशीरच झाला होता. परिणामी पळस्पे फाट्याच्या ऐवजी भातसा नदीवरील पिसे अशुद्ध जल उदंचन केंद्राला भेट देण्याचे ठरवले. पिसे गावाजवळ भातसा नदीवर हे उदंचन केंद्र आहे. #dombivlicycleclub मधील सदस्यांचे हे आणखी एक आवडते ठिकाण.

९० फुटी रस्त्यावरील शांत आणि रुंद रस्ता पार करताना सर्व वाहनांना भरधाव गती गाठता येते. मात्र त्यापुढे पत्री पूल ओलांडून डावीकडे वळले की तेथून दुर्गाडी किल्यापर्यंतच्या अर्धा- एक किमी अंतरातील १८-२० गतिरोधक सर्व वाहनांची अवस्था केविलवाणी करत असतात. ९० फुटी रस्त्यावर मिळवलेला अश्वासारखा रुबाब दुर्गाडी रस्त्यावर पार गळून पडतो. चार चाकी अश्वशक्तीधारी वाहने मनुष्यशक्तीधारी स्कॉट- श्विनपुढे नतमस्तक होतात. दुर्गाडी किल्ला मागे टाकत पुढील चौकात अश्वारूढ शिवाजीमहाराजांना मुजरा करत श्विन स्कॉट पुढे निघाले. आधारवाडी चौकातून डावे वळण घेत पडघा रस्त्याला लागल्याबरोबर रस्त्याची कामं सुरु असल्याचे लक्षात आले. येथील गंधारी गावाजवळील पूल पार केल्यावर रस्ता अरुंद असला तरी वाहतूक कमी असल्याने वाटचाल शांतपणे करता येते. गंधारी पुलावर दोन्ही बाजूकडे नदीचे विशाल पात्र मन प्रसन्न करत होते. पुढे जात असतानाच @mandar mathure, @ritesh savla, @rudhir moghe, @vinit shetye हे DCC (डोंबिवली सायकल क्लब) चे सदस्य समोरून येताना दिसले. ते सुद्धा पिसे डॅमला भेट देऊनच येत होते. एकमेकांना शुभेच्छा देत आणि एकमेकांचा उत्साह वाढवत आम्ही आपापले मार्गक्रमण सुरु ठेवले.

सावड नाका येथे डावीकडे वळल्यावर इतिहासकालीन लोणाड लेणी आहेत, तर उजवीकडे वळल्यावर पिसे डॅम आहे. सावड पासून तसेच पुढे गेल्यावर पडघा मार्गे ठाणे नाशिक हमरस्ता आहे. मात्र आज पिसे डॅम ला जायचे असल्याने स्कॉट श्विनने उजवीकडे वळण घेतले. शहरातील वर्दळ, गर्दीपासून दूर असलेला हा सावड - पिसे रस्ता अतिशय शांत होता. पिसे येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रापाशी पोचताच श्विन आणि स्कॉटने विसावा घेतला. घरापासून न थांबता १९- २० किमी अंतर पार झाले होते. तेथील नदीकाठी वाढलेली बेशरम नावाची पाणवनस्पती मला थेट बालपणात मागे घेऊन जाते. सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी डोंबिवली च्या पश्चिम भागात दलदलीच्या प्रदेशात ही वनस्पती आढळत असे. दलदलीत आढळणाऱ्या ही वनस्पती तशी चिवटच! त्यांच्या फांद्यांचा आधार घेत मी त्या दलदलीच्या प्रदेशात फिरत असे. मात्र सिमेंटच्या जंगलात डोंबिवलीतुन ही वनस्पती केव्हाच हद्दपार झाली आहे.

मुरबाड रस्त्यावरील गोवेली गावापासून टिटवाळा मंदिर गाव ५ किमी अंतरावर आहे. तसेच कल्याण पडघा रस्त्यातील सावड नाक्याला वळून पिसे डॅमला पोचले की या डॅम पासून टिटवाळा मंदिर गाव ७ किमी अंतरावर आहे. टिटवाळा शहराच्या दोन विरुद्ध बाजूला पिसे आणि गोवेली वसली आहेत. पिसेहून टिटवाळा येथे जाणारा मार्ग मात्र सुरुवातीला कच्चा आहे. किंबहुना तो थेट मागील शतकाशी नाते सांगणारा आहे.

पिसे डॅम येथे छोटी विश्रांती घेऊन श्विन स्कॉटने परतीचा मार्ग धरला. सावड येथून पिसे येथे पोचताना हा पल्ला लांबचा वाटत असला तरी परत येताना तेच अंतर कमी वाटत होते. सावड नाका येताच लोनाडला जाणारा रस्ता खुणावत होता. मात्र मनाला आवर घालत आम्ही गंधारीच्या दिशेला वळलो.  गंधारी पूलाआधी असलेले निराकेंद्र श्विनला माहित होतेच.  तसेच ते सुरु असल्याची खात्री पिसेकडे जाताना केली होतीच. त्यामुळे गंधारी पूल दिसू लागताच चाल मंदावत श्विनने निराकेंद्रापाशी विसावा घेतला. सकाळची वेळ असल्याने निराची चवही छान होती. सकाळच्या फेरीत निरापान झाल्यावर पुन्हा ताजेतवाने वाटू लागले होते. उन्हाचा तडाखाही अजून जाणवू लागला नव्हता.  श्विन- स्कॉटने पुन्हा दुर्गाडी किल्ला गाठला. अश्वशक्तीधारी वाहनांची मस्ती उतरवणारे १८-२० गतिरोधक पार करत स्कॉट श्विन पत्री पुलापाशी पोचले. येथून उजवीकडे वळत पत्री पूल चढणे तसे जिकरीचे काम. संध्याकाळी तर वाहनांच्या लागलेल्या रांगांतून वाट काढणे येथे अशक्यप्राय होते. सकाळच्या वेळेस परिस्थिती आटोक्यात असल्याने श्विन स्कॉटने हा अडथळा विनासायास पार केला. 

९० फुटी रस्त्यावर ताडगोळे दिसताच आणखी एक थांबा घेऊन मात्र श्विन स्कॉट थेट घरी परतले.

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

आधी वंदू तुज मोरया

भारतीय सौर चैत्र २४, शके १९४०

#cycle2work करत #tjsbbank येथे जाताना रोज एकट्याला पिकनिक अनुभवायला मिळत असली, तरी सुट्टीच्या दिवशी स्कॉटबरोबर पिकनिकला जाण्याची संधी मिळते.

आज त्याच संधीचा लाभ घेत श्विन आणि स्कॉटने टिटवाळा येथील सिद्धिविनायक महागणपती मंदिर येथे दर्शनास जायचे ठरवले.

राजाधिराज दुष्यंन्त जिच्या प्रेमात पडला होता त्या शकुंतलेचा जन्म झाला ते हे ठिकाण. शकुंतलेने बांधलेले सिद्धिविनायक मंदिर काळाच्या ओघात एका तळ्यामध्ये लुप्त झाले होते. माधवराव पेशवे यांच्या काळात या क्षेत्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी येथील तळ्यातील गाळ साफ करायचे ठरले. तेव्हा त्या ठिकाणी गाडले गेलेले मंदिर नजरेस आले. पेशव्यांचे सरदार रामचंद्र मेहेंदळे यांना श्रीगणेशाची मूर्ती सापडली. मंदिराच्या पुनर्रचनेचे काम त्वरित हाती घेण्यात आले. वसईच्या जयानंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुरुवातीला बांधलेला लाकडी सभामंडप खराब होऊ लागल्याने १९६५-६६ रु २०००००/- खर्च करून पुन्हा एकदा याच ठिकाणी मंदिराच्या बांधकामाची पुनर्रचना करण्यात आली.

या गणेशाच्या दर्शनाने विवाहोत्सुक लोकांचे लग्न जमते, ज्या जोडप्यात विघ्न आले असेल ते दूर होते तसेच ज्यांना अपत्य हवे असेल त्यास अपत्यप्राप्ती होते असा समज आहे. अंगारकी चतुर्थी ला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.

आज शनिवार असल्याने सर्व भाविक मारुतीरायाच्या दर्शनासाठी उत्सुक असल्याने श्विन स्कॉटला श्रीमहागणपतीचे दर्शन आज सहजपणे करता येणार होते. उत्तरार्धातील सूर्याच्या कृपेमुळे लवकर उजाडू लागले होते. याचाच फायदा घेत श्विन आणि स्कॉट पहाटेच तयार झाले. दोन्ही सायकलच्या टायरमध्ये हवा पूर्ण भरल्याची खात्री करून दोघेही निघाले. पहाटेची वेळ असल्याने अश्वशक्तीधारी वाहनांची वर्दळ सुरु झाली नव्हती. डोंबिवली- ९० फुटी रस्ता- पत्री पूल पार करून श्विन स्कॉट जोडीने शहाडच्या दिशेने कूच केले. शहाड येथील रेल्वे पूल, बिर्ला मंदिर येथील चढ सहजतेने पार केल्यावर मोकळी हवा उत्साह वाढवू लागली. शहरातील अरुंद रस्ते, गतिरोधक, पादचारी आणि वाहनांची गर्दी यांच्या अडथळ्यांपासून दूर आल्यावर श्विन आणि स्कॉट यांची गती वाढली. रायते गावाजवळील नदीपुलावर फोटोसेशन करण्याचा मोह आवरणे कठीणच. रायते गाव येताच #saveoursahyadri मोहिमेतील उत्तर मार्गाचा आधारस्तंभ @avinash harad याची आठवण येणे स्वाभाविकच. त्याने स्वकष्टाने उभे केलेल्या अप्रतिम संग्रहालयाने मनात कायमचे स्थान मिळवले आहे. #dombivlicycleclub च्या सदस्यांनी या संग्रहालयात दोन वेळा हजेरी लावली आहे. गोवेली येथून डावे वळण घेत श्विन, स्कॉटने टिटवाळ्याची दिशा पकडली. श्रीमहागणपती मंदिरात पोचताच तेथे आणखी दोन सायकली दिसल्या. मात्र सायकलिस्ट आसपास दिसत नव्हते. श्रीमहागणपतीचे दर्शन घेऊन परत आल्यावर श्विन स्कॉट परत येण्यासाठी तयारी करत असतानाच त्या दोन सायकलींचे वाहक समोर दिसले. ते होते DCC चे @sanjay datye आणि @abhay kulkarni
त्या दोघांची पोटपूजा झाली असल्याने ते पुढे निघाले. मात्र श्विन स्कॉटला मनुष्यशक्तीचे इंधन मिळत राहण्यासाठी आम्हाला कच्चा माल भरायचा होता. मग मिसळरूपी कच्चा माल भरून मनुष्यशक्तीच्या इंधनाचा पुरवठा पुरेसा असल्याची खात्री करून श्विन, स्कॉटने परतीचा मार्ग धरला. मुरबाड रस्त्यावर आता वर्दळ सुरु झाली असणार हे लक्षात घेत परत येताना पुन्हा मुरबाड रस्त्याकडे न वळता टिटवाळा स्टेशन, आंबिवली स्टेशन ह्या रस्त्याने यायचे ठरवले.

आंबिवली पुढील रेल्वे फाटक ओलांडून उतारावरील नीरा स्थानक हा श्विनचे आवडता विसावा. एव्हाना सूर्यमहाराजही अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागले होते त्यामुळे स्कॉटलाही त्याची गरज होतीच.
निरापान झाल्यावर मात्र पुन्हा कल्याण शहरातील वर्दळ दिसू लागली. कल्याण स्टेशनची गर्दी टाळण्यासाठी बिर्ला महाविद्यालय, दुर्गाडी मार्ग पत्करला तरी पत्री पुलावर मात्र स्कॉटची तारांबळ उडाली. पुन्हा ९० फुटी रस्ता आल्यावर मात्र स्कॉटने निश्वास सोडला. खरेतर पुन्हा पेयपान करण्याची गरज वाटू लागली होती, मात्र आता श्विन- स्कॉटच्या टायरखालील नेहमीचा रस्ता सुरु झाल्याने त्याकडे दुर्लक्ष करीत दोघांनी थेट घरी जाऊनच विसावा घेतला.

रविवार, ८ एप्रिल, २०१८

राष्ट्रीय दिनांक भारतीय सौर ८ चैत्र, शके १९३०
#21dayscyclingcampaign day 8

नवीन राष्ट्रीय वर्षानिमित्त २१ दिवस सायकल उपक्रम सुरु झाल्याचा आज ८ वा दिवस.
या वर्षी #dombivlicycleclub चे सदस्य अधिक संख्येने आणि अधिक उत्साहाने सामील झाले आहेत.
गन्धार डोम्बिवलीकर, Arnav Kulkarni Marcella, Sanjay Datye, Dev Gaikwad, Jayshree Pandit, Pushkar Joshi, Ritesh Savla, Kulkarni Meghesh , ममता हे DCC (डोंबिवली सायकल क्लब) चे सदस्य याही वर्षी जोशात आहेत. अर्णव आणि गंधारने प्रथम या नवीन सदस्याला बी घडवत आहेत.  Rudhir Moghe, Rohan Sakhare , Nayana Agharkar, हे मागील वर्षी सामील असलेले सदस्य या वर्षी लवकरच सामील होतीलच. मात्र यावर्षी सामील झालेले Mahesh Khare आणि Ravindra Patil यांचा उत्साहही कौतुकास्पद आहे. Bhimashankar Birajdar हे तर कुटुंबासहीत (त्यांचा सुपुत्र आणि लाडक्या लेकीबरोबर) सहभागी झाले आहेत.

एकण ३५ जणांचा सहभाग असलेल्या  उपक्रमाचा काल पहिला आठवडा समाप्त झाला.

मात्र मी स्वतः आर्थिक वर्षाची अखेर जवळ आल्यामुळे #cycle2work ला मुकत होतो. अर्थात गेल्या शनिवारी सुट्टी असूनही ऑफिसला जाताना श्विनला घेऊन गेलो आणि रविवारी सुट्टी असूनही ऑफिसला जावे लागले तरी लवकर घरी येऊन स्कॉट बरोबर सायंकालीन फेरी मारली होतीच.
आजही सुट्टी असून ऑफिसला जायचे असल्याने मी श्विनला घेऊन ऑफिसला जायचे मी ऑफिसमध्ये ठरवत होतो.

मात्र काल संध्याकाळी Ajit Ranade यांचा निरोप आला की उद्या (म्हणजे आज) सायकल घेऊन येऊ नकोस. एक सायकल ठाण्याहून डोंबिवलीला अभिजित मराठेंकडे पोचवायची आहे.

काम आवडते होतेच. पण श्विनला #tjsbbank च्या मुख्य कार्यालयात नेता येणार नाही याची खंतही होती. मी अजितला लगेचच होकार दिला. मात्र सकाळी श्विनकडे ना बघताच ऑफिसकडे निघालो.

ऑफिसमध्ये दिवसभर श्विनची आठवण होतीच. अखेर ऑफिसहून निघताना अजितला फोन करून त्याची सायकल घेतली.
सायकल घेऊन सुरुवात केली खरी आणि लक्षात आले पुढचा गियर चक्क पहिला गियर होता आणि तो बदलता येत नव्हता. मात्र मागचे गियर व्यवस्थित बदलता येत होते. गियर बदलण्यासाठी अंगठ्याने बदलायचे खटके नसून मुठिने गोल फिरवून गियर बदलायचे खटके होते. खटके गोल फिरवून गीअर बदलण्याची सायकल असली की वेग घेऊन गियर बदलावे लागतात हे श्विन आधी माझ्या कडे असलेल्या फोमासमुळे माहित होते. त्यामुळे मी दौड तशीच सुरु ठेवून वेग घेत गियर बदलण्याचा प्रयत्न केला. पण यश मात्र येत नव्हते.

पहिला गियरवर सायकल असल्याने तिची गती वाढवता येत नव्हती. पण त्या पहिल्या गियरमुळे मुंब्रा बाह्यवळण रस्ता घेत मुंब्रा टेकडी चढणे सहज शक्य होत होते. घाट रस्त्यावरून खाडी आणि परिसर फारच मोहक दिसत होता. मग त्या परिसराला कॅमेराबद्ध करत घाट चढलो. पहिल्या गियरमुळे घाट खूपच आरामात आणि विनासायास चढता आला होता. नंतरचा उतारही आरामात पार करून मी शिळ फाट्याला पोचलो.

तेथेमात्र अश्वशक्तीधारी वाहनांची गर्दी झाली होती. माझी नवी सखी मात्र मला त्या गर्दीतून सहज मार्ग काढून देत होती. सर्व वाहनांना मागे टाकत आम्ही शिळ कल्याण रस्त्याला वळलो. अनेक दिवसांनी कोकणरत्न हॉटेल येथे पृथ्वीवरील अमृताचा लाभ घेत छोटा विसावा घेतला.
मग मात्र आम्ही डोंबिवली गाठली. मानपाडा रस्त्याला लागताच वाहनांची भाऊगर्दी झाली होती. माझ्या नवीन सखीचा पहिला गियर मात्र या गर्दीत माझा प्रवास सोपा करत होता. त्यामुळेच डोंबिवली शहरातील अश्वशक्तीधारी वाहनांना मागे टाकत आणि शहरातील भूमी इंच इंच सर करत आम्ही आमचे गंतव्यस्थान मात्र विनासायास गाठले.

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

नाम गुम जायेगा

शुक्रवार दिनांक भारतीय सौर १६, शके १९४०

#cycle2work साठी मी तयार होत असताना लक्षात आले की श्विनच्या टायरमध्ये हवा नव्हती. एवढ्या सकाळी सायकलींचे दवाखाने उघडणे शक्य नव्हते, त्यामुळे आज लोकलकळा सहन करतच ऑफिसला जाऊन आलो.

पण #dombivlicycleclub च्या सदस्यांना #21dayscyclingcampaign चे आवाहन करून मी श्विनला घरी ठेवणे योग्य वाटत नव्हते. आज या उपक्रमाचा १६ वा दिवस होता. मग मी ऑफिसहून परत आल्यावर श्विनला घेऊन ९० फूट रस्त्यावर जायचे ठरवले.

डोक्यावर शिरस्त्राण, चेहऱ्यावर डोळ्यापर्यंत आवरण मात्र नेहमीपेक्षा वेगळा जर्सी घालून मी श्विनवर स्वार झालो होतो. ९० फुटी रस्त्यावर पहिली फेरी मारून मी परत फिरलो तोच बाजूने एक दुचाकी मला समांतर येऊन माझ्या बरोबर जाऊ लागली. मी त्याकडे पाहताच दुचाकीचालकाने मला विचारले "आप ठानासे आ रहे हो ना!" खरं तर तो प्रश्न नव्हता तर त्या वाक्य उच्चारण्यामागे त्याची खात्रीच होती.
मी उत्तरलो "नही, मै तो यही पर राउंड लगा रहा हुँ." ह्या वाक्यावर तो वाहनचालकाचा चेहरा मात्र पडला. मोठ्या अविश्वासाने त्याने विचारले "आप रोज सायकलसे ठानामे ऑफिस जाते हो ना?" त्याच्या ह्या केविलवाण्या प्रश्नावर मात्र मला आज मी श्विनबरोबर ऑफिसला का नाही गेलो असे वाटून गेले. मी उत्तरलो "हा, मै रोज ऑफिसमे डोंबिवलीसे ठाणा सायकलसे जाता हुँ, पर आज नही गया" 

हे ऐकताच त्याचा जीव भांड्यात पडला. त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या बुरखादारी ललनेकडे पाहत त्याने सांगितले ," मैं इनको यही बता रहा था की आप रोज सायकलसे ऑफिसके लिये ठाणा जाते हो". आत्ता मात्र त्याच्या पडलेल्या चेहऱ्यामागचे गुपित मला उलगडले. मी आज सायकलने ऑफिसला न गेल्याने तो वाहनचालक खोटारडा पडणार होता आणि त्यामुळे अपमानित झाल्याप्रमाणे बिचाऱ्याचा चेहरा पडला होता.

"मुझे पहचाना ना?" त्याने मोठ्या विश्वासाने मला विचारले. आता पुन्हा त्याला अनपेक्षित उत्तर मिळू नये यासाठी त्याने क्लू देत पुढे सांगितले, "हम वहा मिले थे".

आता त्या "वहाँ' मी अनेकांना भेटलो होतो. बरं त्याचा चेहरा मला खरच आठवत नव्हता. पण आता त्या ललनेसमोर त्याची पुन्हा फजिती होऊ नये म्हणून मी म्हणालो, " हा!" तो कल्याणच्या दिशेने आला होता हे लक्षात येत त्याला सावरण्यासाठी मी पुढे म्हणालो "आप कल्याणसे है ना".

बिचारा पुन्हा क्लीन बोल्ड होत म्हणाला, "नही, मै तो यही पर रहता हुँ"

आता अधिक बोलण्यात अर्थ नव्हता.  आम्ही दोघांनी आपापला रस्ता धरला. तो पुढे गेला आणि मला आश्चर्य वाटत होते की तोंडावर डोळ्यापर्यंत आवरण, डोक्यावर हेल्मेट आणि नेहमीपेक्षा वेगळा जर्सी घालून त्याने मला ओळखले कसे?

पण लगेचच लक्षात आले 'नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी 'श्विन'ही पहचान है गर याद रहे' 

#tjsbbank #cyclingzens #saveoursahyadri

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

धुंदी फुलांना

भारतीय सौर चैत्र १५, शके १९४०

कोंबडा आरवला की पहाट झाली. पण सध्याच्या शहरीकरणाच्या लाटेत कोंबडाच नाही तर आरवणार कोण! कोंबडा आरवला नाही तर पहाट तरी कशी होणार? त्यामुळे की काय सध्या रात्रीनंतर पहाट न होता एकदम सकाळच होते.

पण प्रत्यक्ष डोंगर दऱ्या, समुद्र, नद्या यांना आवर घालणाऱ्या माणसाला एका निर्जिव वस्तूने मात्र गुलाम केले आहे.... घड्याळबाबा! माणूस कोंबडयाला हद्दपार करत असताना घड्याळबाबांच्या काट्याच्या तावडीत मात्र अडकला. त्या घड्याळबाबांचा मला मनस्वी तिटकारा, म्हणून मी अजूनही मनगटावर घड्याळ बांधत नाही. ( तसेही घड्याळ मुंबईकरांच्या मानगुटीवरच असते)

आज मी उठलो तेव्हा घड्याळबाबा मला दटावत होते. मला जाग येईल तेव्हापासून माझा दिवस सुरु असे मला वाटत असले तरी घड्याळबाबा आज फारच पुढे सरकले होते. त्यामुळे आज कार्यालयात जाण्याचा बेत मी रद्द केला. श्विन लगेच हिरमुसली. मी ऑफिसला जाणार नाही म्हणजे श्विनला बाहेर फिरायला मिळणार नव्हते. चैत्र महिना अर्धा संपल्यामुळे सूर्यही ह्या वेळेपर्यंत बराच वर आला होता.

मात्र श्विनची मनस्थिती ओळखून मी तिला बाहेर फिरायला न्यायचे ठरवले. आज ऑफिसला जायचे नसल्याने #cycle2work होणार नव्हते. उशीर झाल्यामुळे फार लांबवर जाता येणार नसले तरी फेरफटका मारायचाच हे मी निश्चित केले. ३*५ गियरवर सुरुवात करून आम्ही निघालो. मात्र मानपाडा रस्ता संपून कल्याण शिळ रस्त्याला लागलो तरी मी गियर वाढवला नाही याचे श्विनला नवल वाटत होते. पण आज अतिशय आरामात जायचे ठरवून मी ३*५ वरच जात होतो.

काटई नाक्याला कोळेगावकडे वळलो आणि गियर चाचपून बघितले. माझ्या नकळत श्विन ३*७ जाऊन केव्हाच स्थिरावली होती. चैत्र अर्धा संपला असला तरी वैशाख अजून बऱ्यापैकी लांब होता. त्यामुळे मला वाटत होते तितक्या प्रमाणात उन्हाच्या झळा लागत नव्हता. मग मीही नेवाळी फाट्याच्या थोडे पुढे जात राहिलो. पण थोडा पूढे जाताच परत घरी पोचेपर्यंत किती वेळ लागेल याचे भान येत परत फिरलो. सुट्टी घेऊनही घड्याळबाबा पिच्छा सोडत नव्हते. आता कुठेही न थांबता थेट घर गाठायचे असे मनाशी ठरवत असताना नेवाळी फाटा दिसू लागला.
गन्धार डोम्बिवलीकर आणि Arnav Kulkarni Marcella या #dombivlicycleclub च्या सदस्यांनी लावलेली नेवाळी फाटा येथील अमृतपानाची सवय मला थांबवत होती. नेवाळी फाटा येताच श्विन आपोआपच अमृतपानस्थानकाकडे (TEA STALL) वळली. मग मात्र माझा नाईलाज झाला. गंधार, अर्णव आणि श्विन यांच्या कारस्थानाला बळी पडून मी अमृतपान केले (गंधार आणि अर्णव माझ्या बरोबर नसले तरी त्यांचा प्रभाव पडला होताच ना!)

परतीचा प्रवास पुन्हा सहजपणे सुरु झाला. मानपाडा रस्ता, भोपरमार्गे मी DNC शाळेच्या रस्त्याला लागलो, तोच एका वृक्षाखाली नाजूक फुलांचा सडा पसरलेला दिसला. त्या नाजूक फुलांनी माझा रस्ता अडवला. त्यांना पाहत उभा असताना त्या वृक्षाचे एक फुल श्विनसमोरच पडले. जणू श्विनला त्या वृक्षाने ते फुल अर्पणच केले. त्या फुलाला कॅमेराबद्ध करत मी ते फुल श्विनला दिले. श्विनला लावल्यावर ते फुल अधिकच छान वाटू लागले. जणू त्या फुलाचा जन्म श्विनला अर्पण होण्यासाठीच झाला होता. श्विन मात्र मग एकदम रुबाबात घरी परतली.
#cyclingzens #tjsbbank

सोमवार, २ एप्रिल, २०१८

धूरांच्या रेषा हवेत काढी

#21dayscycling campaign चा उत्तरार्ध सुरु होत असताना आज पुन्हा #cycle2work सुरु करायचे ठरवले होते. चैत्र महिन्याची सकाळ सुखावत होती. #dombivlicycleclub ची नाविन जर्सी घालून मी श्विनवर स्वार झालो. श्विन तयारच होती. मंद गतीने सुरुवात करीत आम्ही ९० फुटी रस्ता गाठला. सूर्य बऱ्यापैकी वर आला असला तरी हवा आल्हाददायक होती.
कोनगाव, गोवे, रांजणोली इथेही रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. रांजणोली नाक्यावर उजवीकडे वळण घेत मी ठाण्याकडे वळलो. पावसाळ्यामध्ये ठाण्याकडे वळल्यावर मी ठाण्याच्या क्षितिजकडे बघत तेथील पावसाचा अंदाज बांधत असे. आज मात्र पावसाळी ऋतू नव्हता आणि पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते, तरी ठाण्याच्या क्षितिजावर ढगांचा मोठा पट्टा दिसत होता. त्याचे नवल करत मी पिंपळासकडे जाणारा रस्ता मागे टाकत पुढील रेल्वे पूल ओलांडू लागलो. तिथे पोलीस आणि बघ्यांची गर्दी दिसताच काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. अर्धा पाऊण चढ चढताच डाव्या बाजूला जवळपास २५ फूट खोल पडलेली चारचाकी नजरेस आली.

तिथून पुढे लोढा साईमंदिराजवळील चढ चढू लागताच ठाण्याच्या क्षितिजावरील ढगांचा काळा पट्टा पुन्हा नजरेस पडला. त्याने संपूर्ण क्षितिज व्यापले होते. मात्र तो चढ चढून उतार सुरु झाल्यावर मात्र त्याचे उगमस्थान भिवंडीकडे असल्याचे लक्षात आले. तो निसर्गतः निर्माण झालेला ढग नसून मानवनिर्मित ढग होता. भिवंडीकडून उद्योग वसाहतीतील एका कारखान्यातून तयार झालेला हा धुरांचा पट्टा नाशिक ठाणे महामार्गागावरील मानकोली पुढून मुंब्रा डोंगरपर्यंत पसरलेला होता.

इतका लांबवर पसरलेला हा धुरांचा महाकाय राक्षस प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या विभागातील अधिकारी, स्थानिक राजकारणी, नेते, यांच्या पैकी कोणालाही दिसत नव्हता याचे मात्र आश्चर्य वाटत होते

रविवार, १ एप्रिल, २०१८

ऋणानुबंधाच्या गाठी

भारतीय सौर चैत्र ११, शके १९४० म्हणजेच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी #cycle2work करण्याचा मानस होता.  ऑफिसमधून आदल्या रात्री १२.३० ला घरी आल्यावर पहाटे राइड करण्यापेक्षा cycle2work हाच उत्तम उपाय होता.

मात्र घरी परत कधी येत येईल याची खात्री नसल्याने तो बेत रहित केला. मात्र #dombivlicycleclub च्या नवीन जर्सीचे उदघाटनही करायचे होते आणि #21dayscyclingcampaign च्या उद्दिष्टांप्रमाणे सातत्य ही राखायचे होते.

मग मात्र श्विनने एक छोटी राइड करायचे ठरवले. स्कॉटही जोडीला होतीच. वेळ कमी आणि सोंगे फार अशीच परिस्थिती होती. पण त्या वेळेचा सदुपयोग करायचे श्विनने ठामपणे ठरवले होते. स्नायू सैल करायलाही वेळ नव्हता, त्यामुळे कमी गियरवर सोसायटी च्या बिल्डिंग भोवती ५-६ फेऱ्या मारत श्विनने सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरही वर्दळ नसल्यामुळे श्विनने लगेच वेग घेतला. स्कॉटही पाठोपाठ होतीच. दोघंही मोकळ्या रस्त्याचा अनुभव घेत निघाले. पूर्वपश्चिम पूल, भोपरकडे जाणारा चढ पार करत श्विन-स्कॉटने (तोडलेल्या)शनिमंदिरापर्यंत धाव घेतली. इतक्यात श्विन- स्कॉटचे समाधान होणार नसले तरी घडयाळबाबा मात्र आम्हाला पुढे जाऊ द्यायला तयार नव्हते. त्यामुळे श्विन- स्कॉट मानपाडा रस्त्यामार्गे परत फिरले.

श्विनला घरी ठेवून ऑफिसला जाणे पटत नव्हते. संध्याकाळी पुन्हा बाहेर जायचे ठरवून मी लगेचच ऑफिसला निघालो. आज खरेतर रविवारचा दिवस म्हणजे DCC (डोंबिवली सायकल क्लब) च्या सदस्यांचा पर्वणीचा दिवस. DCC चे सदस्य आज एकत्रित राइड करत असताना मी श्विन ऐवजी आज लोकलने ऑफिसला निघालो होतो. सुट्टीचा दिवस असल्याने लोकल ट्रेनला गर्दी नव्हती. मी दरवाजातच उभा होतो. आणि...

DCC चे ऋणानुबंध किती घट्ट आहेत याचेच प्रत्यंतर आले. म्हातार्डेश्वर मंदिरासमोरून गाडी जात असताना DCC सदस्य @meghesh kulkarni चे दर्शन झाले. बाजूलाच रांगेत उभ्या असलेल्या सायकलीही नजरेस पडल्या. कदाचित मेघेश आणि DCC चे इतर सदस्य समोरील गाडी कधी जातेय याची वाट पाहत असावेत. आणि त्या गाडीच्या दरवाजात उभा असलेला मी मात्र ही गाडी थांबली तर DCC सदस्यांना भेटता येईल असा विचार करत होतो.

अनेक वेळा असंख्य सिग्नलला थांबणारी, रडत खडत जाणारी मरे (मध्य रेल्वे) ची लोकल गाडी आज मात्र दिमाखात आणि वेगात पुढे गेली. DCC सदस्य म्हातार्डेश्वराचे दर्शन घेत असताना मी #TJSBBANK च्या मुख्य कार्यालयात पोचलो होतो. DCC सदस्यांबरोबरच्या ऋणानुबंधामुळे माझे मन मात्र अजून म्हातार्डेश्वर मंदिरापाशी उभ्या असलेल्या DCC सदस्यांजवळच अडकले होते

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...