स्वप्न आणि ध्येय यामधील दरी दूर करता आली तरच आपले उद्दिष्ट साध्य होऊ शकते. २८-२९ वर्षांपूर्वी माझा मित्र अविनाश आणि मी डोंबिवली गोवा सायकलसफरीचे स्वप्न पाहिले होते. आपण पाहिलेल्या स्वप्नाला योग्य दिशा, समर्पण वृत्ती, निर्धार, शिस्त आणि निश्चित कालमर्यादा यांची जोड मिळाली तरच त्याचे ध्येयात रूपांतर होऊ शकते.
दुर्दैवाने अविनाशचे २८ वर्षांपूर्वी अचानक निधन झाल्यावर डोंबिवली पणजी सायकलसफरीच्या स्वप्नावर पडदा पडला होता. मात्र ८ वर्षांपूर्वी डिसेम्बर २०१० मध्ये इंदोर झांसी सायकलयात्रा केल्यावर मला गोवासफरीचे स्वप्न पुन्हा पडू लागले. त्यानंतर खऱ्या अर्थाने मी २०१४ साली हे स्वप्न पूर्ण करण्याचा आराखडा पूर्ण केला. मात्र जेव्हा ध्येयापासून नजर दूर होते तेव्हा अडथळा निर्माण होतो. गेली ४ वर्ष हा अनुभव येत होता. 'Man proposes, God disposes' याचा अनुभवही या ४ वर्षात आला होता.
गोवा सफारीबद्दलचा माझा आत्मविश्वास तसूभरही कमी झाला नव्हता, उलट येणाऱ्या अडथळ्यांमुळे तो अधिकाधिक दृढ होत होता. २०१८ च्या सुरुवातीलाच माझ्या अर्धांगिनीने डोंबिवली गोवा सफर करण्यासाठी माझ्याबरोबर येणार असल्याचे मला सांगितले. ह्याबरोबरच मला माझे ध्येय प्रत्यक्षात उतरल्याचाच भास होऊ लागला. खरतर तिने सायकलिंगला सुरुवातच २०१८ जानेवारीच्या अखेरीस केली होती. आणि लगेचच तिने माझ्याबरोबर गोवासफर पूर्ण करण्याचा निश्चय बोलून दाखवला होता. ह्या सफरीसाठी दोघांचा सरावही नियमितपणे सुरु होता. अगदी आदल्या रात्रीपर्यंत अडथळे येत गेले पण मित्रांचे साह्य, शुभेच्छा यांच्या जोरावर ते अडथळे पार होत गेले.
डोंबिवली गोवा -६५० किमीचे अंतर हवाईमार्ग, रेलमार्ग आणि धूर ओकणारी अश्वशक्तीधारी रस्त्याने जाणारी वाहने यांच्या मार्गाने सहज पार करता आले असते. परतीचा प्रवास तेजस एक्सप्रेसद्वारे ९ तासात पूर्ण झालाच की! तर घरापासून करमाळी स्टेशनपर्यंत झालेला एकंदर ६५० किमी प्रवास पूर्ण करण्यास मात्र ५ दिवस सायकलिंग केले होते.
मग सायकलनेच डोंबिवली पणजी प्रवास का? खरतर हा प्रश्न अनेकांनी वेळोवेळी विचारला होता.. सायकलीसफरीआधीही आणि सायकलसफरीदरम्यानही!
वाहतुकीची आधुनिक साधने उपलब्ध असतानाही मनुष्यशक्तीधारी सायकलने ते अंतर पार का करायचे? याचे उत्तर आमचा प्रवास सुरु झाल्या झाल्या मिळू लागले होते. प्रवास सुरु करताना आमची काळजी घेत शिळफाट्यापर्यंत येणारा सुमित, मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर असलेले आप्पा मदान ही तर हक्काची माणसं. आम्हाला वाटेत भेटणाऱ्या माणसांची यादी करायची म्हटली तर एक पुस्तक लिहावे लागेल. अनेक जण प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत तरी मनाने आमच्या बरोबर होते. त्यांच्या शुभेच्छा आम्हाला बळ देत होत्या. खोपीली घाटातील प्रसाद वाटणारा सेवेकरी, आम्हाला खाऊ देण्यासाठी ५०-६० किमी सायकलिंग करत येणारा संतोष कांड, सायकलने जगप्रवास करणाऱ्या वेदांगीची आई- अपर्णा कुलकर्णी हे मूळ डोंबिवलीकर जणू तमाम डोंबिवलीकरांच्या वतीने आमचा उत्साह जागोजागी वाढवत होते. इराणी सायकल पटू, तांडेम सायकलवरील सुदेब रॉय आणि विनीत सराईवाला, शंकर गाढवे, सातारा येथील डॉक्टर क्षोत्री, भुईंज येथील योगेश शिर्के आणि त्यांचे दोन सायकलमित्र, चिंचवड आणि कोल्हापूर येथील सायकलमित्र, डॉ कशाळीकर आणि कुटुंबीय, आंबोली येथील काका भिसे, आजरा येथे भेटलेला उत्सव हा सिद्धिविनायक गणेश मंडळातील कार्यकर्ता, TJSB बँकेच्या सातारा, कराड, कोल्हापूर, म्हापसा, पणजी येथील शाखांतील सहकारी, शालेय मित्र संदीप गुळवणी या सगळ्यांचा आणि इतर अनेकांचा स्नेह जुळण्याला आणि वृद्धिंगत होण्यासाठी ही सायकलसफरच तर कारणीभूत होती.
सातारची केळेवाली असो वा पेठ नाक्यावरील केळेवाला- ह्यांचे प्रेम केवळ सायकलप्रवासातच मिळू शकते.
अश्वशक्तीधारी वाहने वेळ वाचवू शकतात, वैज्ञानिक प्रगती, चमत्कार दाखवू शकतात. मात्र नवनवीन मित्रांच्या ओळखी, त्यांचे प्रेम यांचा खजिना मिळवायचा असेल तर सायकलसफरीशिवाय पर्याय नाही. डोंबिवली गोवा सायकलसफर ५ दिवसात पूर्ण झाली. या सफरीदरम्यानचा प्रत्येक दिवस वेगळा, मात्र अधिकाधिक उत्साह वाढवणारा आणि मैत्रीचा खजिना वाढवणारा होता. ५ दिवसांची सायकलसफर संपवून आम्ही गोव्याला पोचलो तेव्हा अनुभवाने समृद्ध झालो होतो. मित्रपरिवारात भर पडली होती ती केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मकही होती. जुनी नाती अधिक घट्ट झाली होती तसेच नवी नाती प्रथमपासूनच घट्ट झाली होती.
तेजस द्वारे प्रवास वेगवान झाला, अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ घेत वातानुकूलीन वातावरणात चित्रपट पाहत झाला. मात्र तेजस एक्सप्रेसद्वारे परतीच्या प्रवासात केवळ तंत्रज्ञानाशी मैत्री झाली, कोणताही नवीन मित्र जोडता आला नाही. याउलट सायकलिंग प्रवास करताना निसर्गाशी संवाद साधता आला, नवीन मित्र जोडण्याचे / आधीची मैत्री वृद्धिंगत करण्याचे भाग्य लाभले तो आनंद तेजसमध्ये मिळवता आला नाही.
संपूर्ण सायकलप्रवासात 'देणाऱ्याचे हात हजार, किती घेशील दो करांनी' अशी अवस्था झाली होती. इतक्या जणांची मदत झाली की प्रत्येकाचे नावही लक्षात राहणे कठीण.
आपल्या माणसांचे आभार मानू नये असे म्हणतात, म्हणून मी आभार न मानता आपण सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो
आपला सर्वांचा स्नेह असाच वृद्धिंगत होत राहो.