सोमवार, २९ एप्रिल, २०१९

लोकशाहीचा मी उपासक

राष्ट्रीय सौर ९ वैशाख १९४१

आज लोकशाहीच्या देवतेची पूजा करण्याचा मुंबई - ठाणेकरांचा दिवस.

परवा दिनांक ७ वैशाख १९४१ ला श्विन आणि ट्रेक डोंबिवलीहुन इंदापूरला गेले होते. त्यानंतर काल परत येताना कलंबोली येथे मुक्काम केला होता.

आज मतदानाचा दिवस असल्याने श्विन आणि ट्रेकने कलंबोलीहून घरी जातानाच मतदान करायचे ठरवले होते. अर्थात आजचा प्रवास जेमतेम ३० किमीचाच होता. त्यामुळे पुरेसे उजाडल्यावर कलंबोलीहून प्रस्थान केले. वैशाख महिना सुरु असल्याने उजाडले तरी घड्याळबाबा अजून ६.३०चीच वेळ दाखवत होते.

रस्त्यावर अजून रहदारी सुरु झाली नव्हती. श्विन आणि ट्रेकने नेहमीप्रमाणे संथगतीने सुरुवात केली. आज मात्र वाटेतील टोल नाक्यावर थांबायची गरज नव्हती. त्यामुळे दोघांनी थेट खिडकाळी गाठले आणि चहाचा आस्वाद घेतला. तिथून मतदानकेंद्र जेमतेम ८-९ किमी असल्याने तिथपर्यंत पुढे थांबायची गरज नव्हती. श्विनने थोडी आघाडी घेतली आणि मानपाडा येथून डोंबिवली ला वळणार एवढ्यात #dombivlicycleclub चे उत्साही सदस्य तेथे थांबलेले दिसले. Sumit Mokal, Saumitra Samant, Dilip Awati, Rahul Ghatwal, Vinit Shetye, Ritesh Savla आणि संदीप हे तिथे भेटल्यावर श्विन आणि ट्रेकही त्यांच्यामध्ये सामील झाले. सौमित्र आणि डॉ राहुल घाटवळ यांचा येवलेंचा अमृततुल्य चहा पिण्याचा आग्रह मोडवेना. मग सगळेजण मानपाडा रस्त्याने थेट डोंबिवली स्टेशनजवळील 'येवले अमृत्यतुल्य' कडे पोचले. तेथील कपांचा आकार डॉ घाटवळ यांना आकर्षित करत होता. चहाकेंद्रावरील स्वच्छता वाखाणण्यासारखी होती. चहाची चव तर खरोखरीच 'अमृततुल्य' होती. (इथे खऱ्या अमृताची चव कोणी चाखली आहे). सगळ्यांसोबत तेथे स्वयंछायाचित्र घेऊन झाल्यावर श्विन आणि ट्रेक मतदानकेंद्राकडे निघाले. मतदानकेंद्रावर लोकांची लगबग सुरु होती. ट्रेककडे मतदान ओळखपत्र होते, मात्र श्विनचा अद्ययावत यंत्रणेवर विश्वास होता. ट्रेक आधी मतदानकेंद्रात गेली खरी पण केवळ मतदान ओळखपत्र दाखवून काम होत नव्हते. ट्रेक थोडीशी त्रासली. पण इतक्यात बाहेर थांबलेल्या श्विनने अद्ययावत यंत्रणेचा उपयोग करत मतदानासाठी आवश्यक माहिती काढून ठेवली. ती माहिती हाताशी लागल्यावर मात्र मतदानकेंद्रावर लगेचच काम पुढे सरकले. 'याचसाठी केला होता अट्टाहास', असे म्हणत मतदानकेंद्रावर लोकशाहीच्या देवतेची पूजा करत श्विन आणि ट्रेकने २८ किमीची कळंबोली डोंबिवली राइड सार्थकी लावली.

#dombivlicycleclub #tjsbbank #cycle2work #cyclekatta #ismartcommute

भकास विकास

सौर वैशाख ८, १९४१

उगवतीच्या दिशेला तेजोनिधी दिसू लागण्याच्या सुमारास श्विन आणि ट्रेकने इंदापुरहून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. इंदापुरहून बाहेर पडून कोलाडच्या दिशेने जात असताना काही ठिकाणी रस्ता थोडा अरुंद झाला होता. त्यामुळे मागील येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेत आणि समोरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष देत श्विन आणि ट्रेक सावधपणे जात होते. त्याचवेळी श्विनचे लक्ष उजवीकडे पूर्वेकडेही होते. तेथील डोंगराच्या कडेने लाल बिंब बाहेर येताना दिसू लागताच त्या अरुंद रस्त्याच्या कडेला थांबण्याकडे श्विन चाहूल घेत होती. थोड्या वेळात तशी जागा सापडताच श्विनने थांबा घेत त्या सूर्यबिंबाला मोबाइलमध्ये कैद केले.

त्यानंतर दोघेही पुन्हा मार्गाला लागले. अरुंद रस्त्यामुळे फारशी गती घेता येत नसली तरी दोघेही सातत्य राखत होते. थोड्या वेळातच श्विन आणि ट्रेक नागोठणे येथील गोविंदा हॉटेलमध्ये क्षुधाशांतीसाठी पोहोचले.  उदरभरण होताच पुन्हा मार्गक्रमणाला सुरुवात करून दोघांनी वेग वाढवला. वाटेत निरापान करून दोघे वडखळ नाक्याला पोचले. एव्हाना १०.१५ चा सुमार झाला होता. मात्र सूर्य आग ओकू लागला होता. दोघांनी वडखळ येथे थांबा घेतला. साधारण १२- १ पर्यंत पनवेल येथे पोचून शालेय मित्र Mukund Moghe याच्या घरी विश्रांती घेण्याचा दोघांनी विचार केला होता. मात्र एकंदर तापमानाचा विचार करता दोघांनी पनवेलपर्यंत न जाता पेण येथेच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.

महामार्गाचे रुंदीकरण करण्याच्या नादात रस्त्यालगताची वृक्षसंपदा गेल्या दोनेक वर्षात नाहीशी झाली होती. त्याच्यामुळे वाटसरूंना मिळणारी सावली नाहीशी झाली होती. त्यामुळेही श्विन आणि ट्रेकला वाटेत विश्रांती घेता येत नव्हती. वाढत्या उन्हात पेण पुढील चढ चढतानाही सावली देण्यासाठी आजूबाजूची वृक्षराजी शिल्लक नव्हती. ह्या सगळ्याचा विचार करत असताना पेण येथे थांबण्याचे नक्की केले. मात्र हा विचार करताना महामार्गाचे रुंदीकरण करत असताना रुंद महामार्गाच्या बाहेरीलही वृक्षराजी का नष्ट केली गेली हा प्रश्न उरत होताच.

खरंतर मुंबई गोवा हि महानगरं जोडताना वाटेतील गावांचा विकास होण्याऐवजी ती गावं भकास मात्र केली गेली होती. लहानपणी गोष्टी वाचताना मैलोनमेल चालत प्रवास करणारे वाटसरू वाटेतील झाडाखाली विश्रांती घेत असत, हे चित्र आठवून ते वाटसरू ह्या भकास महामार्गात पायी प्रवास करताना जिवंत तरी राहतील का हा प्रश्न मात्र श्विनला पडत होता.(#saveoursahyadri Bibhas Amonkar Anand Pendharkar)

अखेरीस वडखळ येथे ORS आणि अर्धा डझन केळी रिचवून दोघेही पेण येथे विश्रांतीसाठी गेले. वडखळ येथून  आम्ही येत असल्याची वर्दी श्री शरद सोमण यांना दिली होती. त्यांच्या घरी क्षुधाशांती झाल्यावर श्विन आणि ट्रेकने वामकुक्षी घेतली.जाग आली तेव्हा ३ वाजले होते. सूर्यास्तानंतर मार्गक्रमण करणे श्विनला आवडत नसल्याने रात्रीचा मुक्काम Ajit Modak कडे कळंबोली येथे करण्याचे ठरले.

दोघेही चांगलेच ताजेतवाने झाले होते. जी चढण दुपारच्या उन्हात चढायचे श्विन आणि ट्रेकने टाळले होते ती चढण दोघांनी लीलया पार केली. कर्नाळा जवळ येऊ लागताच कर्नाळ्याचा अंगठा श्विन ट्रेकला खुणावू लागला. तो अंगठा कितीही वेळा छायाचित्रबद्ध केला तरी समाधान होत नाही. त्यामुळे तेथून जाताना प्रत्येक वेळी तो मोह होतोच. वाटेत लिम्बु सरबत घेऊन तो अंगठा श्विनसह कैद करण्यासाठी योग्य जागा अस्मादिक शोधू लागले. कर्नाळ्याच्या थोडे आधीच तशी जागा सापडताच अस्मादिकांनी रस्त्यावर बैठक घेत 'लिंगोबाच्या डोंगूराला' श्विनसह छायाचित्रबद्ध केले.

डोंबिवली पर्यंत जायचे नसल्याने वेळ हाताशी होताच. त्यामुळे तेथे मनसोक्त थांबून श्विन ट्रेकने आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेतला. मात्र येथेही महामार्गाच्या बाजूला उंचच उंच कठडे करून बाजूचे जंगल महामार्गापासून तोडले होते. त्यामुळे कोणत्याही वाटसरुला आजूबाजूच्या वृक्षराजीखाली विश्रांती घेता येणार नव्हतीच पण दोन्ही बाजूचे जंगल पूर्णपणे विभागले गेले होते. यामुळे जे काही उरले सुरले वन्य प्राणी, सरपटणारे जीव शिल्लक असतील त्यांनाही महामार्ग ओलांडून पलीकडील जंगलात जाता येणे केवळ अवघड नव्हे तर अशक्यच झाले होते. अर्थात याचा परिणाम ह्या प्राण्यांच्या संख्येत मोठ्या वेगाने घट होण्यात झाला होता. शिवाय यामुळे काही वंश नष्टही झाले होते, होत होते, होत राहणार होते. ह्याला खरच विकास म्हणायचे का?

श्विन ट्रेक महामार्गापासून तोडलेल्या वृक्षराजीकडे पाहत पुन्हा मार्गाला लागले. कर्नाळ्याच्या चढ चढून पुढच्या उतारावर मिळालेला वेग आवरता घेत दोघेही 'क्षणभर विश्रांती' येथे थांबले. तेथे लस्सीचा आस्वाद घेऊन मग मात्र दोघांनी पुन्हा वेग मिळवला. त्या वेगात दोघांनी लवकरच अजितचे घर गाठले तरी वाटेतील वृक्षसंपदेची आर्त हाक आणि वन्य प्राण्यांची बावरलेली अवस्था पंचेंद्रियासमोरून जात नव्हते.

#saveoursahyadri Tjsb Sahakari Banktjsb #dombivlicycleclub #cycle2work #ismartcommute Avinash Harad Prashant Gautam Nanaware Anand Parvate

सोन्याचे अंड आणि कोंबडी

सौर वैशाख ७, १९४१

फाल्गुन महिन्यात ठरवलेल्या डोंबिवली इंदापूर राईडसाठी मुहूर्त मिळाला तो चक्क वैशाख महिन्यात! दरम्यान सूर्याने दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात झेप घेतल्यामुळे रात्रीपेक्षा दिवस मोठा झाला होता तसाच थंडी पार नाहीशी होऊन तीव्र उन्हाळाही सुरु झाला होता.  त्यामुळे सकाळी ११ पर्यंत जास्तीत जास्त अंतर पार करायचे ठरवून श्विन आणि ट्रेकने पहाटे पहाटेच प्रस्थान केले.

डोंबिवली पार झाल्यावर दोघांनीही वेग घेतला. शिळ फाटा पार करून पनवेलच्या दिशेने वळण घेत असतानाही दोघांनी वेग कायम राखला होता. मात्र पुढील टोल नाका येताच दोघांनी घसा ओला केला. पाण्याची बेगमीही बऱ्यापैकी केली होती. श्विनने #dombivlicycleclub ची जर्सी परिधान केली होती. Rudhir Moghe च्या पाठपुराव्यामुळे आणि मेहनतीमुळे तयार झालेली ही जर्सी अतिशय उत्तम दर्जाची आहे. त्या जर्सीच्या मागील बाजूस असलेल्या तीन कप्यांपैकी एका कप्यात श्विनने बाटली अडकवली होती, तर ट्रेकची बाटली अडकवण्याच्या साच्यामध्ये एक बाटली अडकवली होती. ह्याशिवाय दोन बाटल्या श्विनच्या कॅरियरला ट्युबने घट्ट बांधलेल्या सॅकमध्येही ठेवलेल्या होत्या.

शांतपणे मात्र वेग कायम ठेवत दोघांनी पळस्पे फाटा गाठला. तेथून काही वेळातच कर्नाळा येथील छोटा घाट सुरु होणार होता. मनुष्यशक्तीचे इंधन अविरत सुरु राहावे यासाठी जठराग्नीला कच्चा माल पुरवणे आवश्यक होते. इडली सांभार ची आहुती जठराग्नीला दिल्यावर श्विन आणि ट्रेकने पुन्हा वाटचाल सुरु केली. उन्हाचा तडाखा व्हायच्या आत नागोठणे गाठायचे होते. मात्र वाटेत शरीरातील इंधन योग्य पातळीवर ठेवणेही आवश्यक होते. कर्नाळा पार करताना किल्ल्याच्या अंगठ्यासह स्वयंछायाचित्र घेत दोघांनी प्रवास सुरु ठेवला. आपट्याजवळील टोलनाक्यापाशी कोकम सरबत घेत घशाला थंडावा मिळाला.

खारपाडा ते पेण हा प्रवास चढ उताराचा आहे, मात्र श्विन ट्रेकने सरासरी वेग कायम राखत नियोजित वेळेतच पेण गाठले. पुढील वडखळ पर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने बऱ्याचदा वाहतूक कोंडी होते. त्यातून दोघांनी सफाईने मार्ग काढला. वाटेत निरापानाचा आस्वाद घेत नागोठणे येथील गोविंदा हॉटेल गाठले तोपर्यंत मध्यानीची वेळ झाली होतो. सूर्य ऐन भरात आला होता. श्विन स्कॉटने 'गोविंदा' मध्ये पुन्हा एकदा उदरभरण केले. एव्हाना जवळपास ९० किमी अंतर पार झाले होते. अर्धा पाऊण तास झाल्यावर श्विन ट्रेक पुन्हा रस्त्याला लागले. उन्हाचा तडाखा फार जाणवू न देण्यासाठी काही अंतरावरच MSEB सबस्टेशनच्या आवरासमोरील झाडांच्या सावलीत दोघांनीही विश्रांती घेतली.

याच झाडांनी दोनेक वर्षांपूर्वी श्विन आणि Nayana Agharkar यांनाही विसावा दिला होता. छोटीशी वामकुक्षी झाल्यावर मात्र श्विन आणि ट्रेक संथ चालीने जाऊ लागले. थोड्याच वेळात सुकेळखिंडीतील चढण सुरु झाली. खंडाळा घाट सहजपणे पार करणाऱ्या श्विनला सुकेळखिंडीतील चढण त्रास देऊ शकत नव्हती. तसेही श्विनला #cycle2work करत असताना मुंब्रा डोंगरातील चढणीचाही अनुभव होताच. श्विनला तर सुकेळखिंडीतील चढण मुंब्रा डोंगरातील चढणीपेक्षाही सोपी वाटत होती. ती चढण पार केल्यावर मिळालेल्या उताराचा फायदा घेत श्विन आणि ट्रेकने चांगलाच वेग घेतला.

कोलाड येथे बस स्टँड जवळ योगेश नावाच्या सरबतवाल्यापाशी थांबत श्विनने ट्रेकची वाट पहायची ठरवले. ट्रेक येईपर्यंत श्विनने कोकम सरबताचे दोन ग्लास रिचवले सुद्धा. मग ट्रेकबरोबर पुन्हा लिम्बु सरबत घेतल्यावर दोघे पुन्हा बरोबर जाऊ लागले. खरतर हा थांबा अनियोजित होता. मात्र हा थांबा घेतला तरी चंदाराणी कोंडाळकर यांच्या माय भवानी हॉटेलचा पूर्वनियोजित थांबा दोघांनी चुकवला नाही. येथील शिवाजीचे मंदिर अतिशय सुंदर आहे. कोलाड येथे लागोपाठ दोनदा थांबे घेत ताजेतवाने झालेल्या श्विन आणि ट्रेकने मग मात्र थेट इंदापूर गाठले. इंदापूर येथील शाळेच्या रस्त्यावर मोठमोठे वृक्ष सावली देत उभे असत. मात्र आता तेथे त्या वृक्षांचे अस्तित्वच शिल्लक नव्हते. ह्या झाडांचा बळी रस्तारुंदीकरणासाठी गेला नव्हता. महाड जवळील एका शाळेजवळ झाडाची फांदी पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता हे कारण पुढे करून इंदापूर येथील शाळेने - शाळेच्या रस्त्यावरील वनसंपदेचा निर्वंश करून टाकला होता. येथील झाडे पडण्याच्या अवस्थेत आहेत का याची चाचपणीही न करता ही वृक्षदौलत कापून काढल्यावर चार ट्रक भरून लाकडांची किंमत वसूल झाली होती. मुख्य म्हणजे येथुन जवळच वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. लहानपणी ऐकलेल्या सोन्याचे अंड देणाऱ्या कोंबडीची आठवण मात्र हे सर्व पाहून येत होती.
#saveoursahyadri #tjsbbank #cycle2work #ismartcommute #tjsbbank Bibhas Amonkar Anand Pendharkar

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

श्विनची नेरळ राइड

राष्ट्रीय दिनांक सौर २९ चैत्र, १९४१

गुड फ्रायडे म्हणजे या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले होते. येशूच्या बलिदानाचा हा दिवस म्हणून तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो, पण त्याचबरोबर ‘होली फ्रायडे’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इस्टर फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो.
गुड फ्रायडेच्या आधी चाळीस दिवस अॅश वेन्सडे येतो या काळात ख्रिस्ती बांधव आपल्या आवडीच्या कोणत्याही गोष्टीचा त्याग करतात. नंतरचा रविवार- म्हणजे ईस्टर सण्डे हा येशूचा परत प्रकटण्याचा दिवस असतो त्यामुळे ईस्टर संडे मोठ्या आनंदात ख्रिस्ती बांधव साजरा करतात.

ख्रिस्ती कॅलेंडर हे भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर प्रमाणेच सौर कॅलेंडर असल्याने ख्रिस्ती धर्मातील सण तारखांवर आधारित आहेत.

हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे कॅलेंडर मात्र चांद्र कॅलेंडर असल्याने हिंदू आणि मुस्लिम सण तारखांनुसार नव्हे तर तिथीनुसार असतात.

आज गुडफ्रायडे ह्या ख्रिस्ती बांधवांच्या शोकदिनानिमित्त सुट्टी मिळाली असली तरी योगायोगाने हिंदू तिथी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमानजयंती असल्याने हिंदू धर्मीयांसाठी मात्र आनंदाचाच दिवस.

श्विन आणि ट्रेकने आज नेरळपर्यंत मजल मारण्याचे ठरवले होते. सूर्यदेव पूर्वेच्या क्षितिजावरून आकाशात उंचावर पोचल्यावर श्विन आणि ट्रेक राइडसाठी सज्ज झाले. बदलापूर पाइपलाइन रस्त्यावर पोचताच सौमित्र सामंत परत येताना दिसला. डोंबिवली सायकल क्लब (DCC) चे काही शिलेदार मलंग गडाच्या दिशेने गेल्याचे तो सांगत होता. श्विनने मात्र नेरळला जाण्याचा बेत त्याला ऐकवला.

तेथून पुढे जात श्विन आणि ट्रेकने पहिला थांबा घेतला तो थेट अंबरनाथ औद्योगिक परिसरातील 'वैभव स्नॅक्स' या क्षुधाशांतिगृहात. तेथे इडली सांभारची फर्माईश करत ते येण्याची वाट पाहत असतानाच एकजण क्षुधाशांतिगृहात शिरला. त्याच्या पेहरावावरून तोही सायकलिस्ट असल्याचे कळताच श्विनने त्याला आपल्याच मेजावर सामील होण्यास सांगितले. त्याच्याशी गप्पा मारत असतानाच आणखी दोन सायकलिस्ट तेथे आले. ते तिघे होते हिरू आहुजा, सागर मेनन आणि साबळे. आम्हा पाच सायकलीस्टचा इडली सांभरवर ताव मारता मारता चांगलाच फड रंगला. ते तिघेही ५०-७० किमी सायकलिंग करून आले होते आणि घराकडे निघाले होते, तर श्विन आणि ट्रेकची अजून सुरुवातच होती.

एकमेकांबरोबर स्वयंचित्र घेत आम्ही सर्वजण आपापल्या मार्गाला लागलो. एव्हाना घड्याळ १०.३० हा आकडा दाखवत होते. दरवेळी नेरळकडे खेचून नेणाऱ्या 'नेरळ २० किमी' या पाटीकडे आज विश्वासाने पाहत श्विन ट्रेक पुढे निघाले. बदलापूर औद्योगिक परिसरापासून उजवीकडे वळण घेत दोघांनी खरवाई मागे टाकले. वांगणी पार करत असताना लस्सीची तहान ताकावर भागवावी लागली. पुढील रस्ता मोकळा आणि रुंद होता मात्र रविराज पूर्ण तेजाने तळपू लागले होते आणि रस्त्याला लागून वृक्षराजी मात्र अजिबात नव्हती. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने घशाखाली आणि चेहऱ्यावर पाण्याचा मारा करत आगेकूच सुरु झाली.

नेरळ जवळ येत असतानाच निरापानाचाही आनंद घेतला. नेरळ येथे गेल्यावर तेथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्याकडील रिकाम्या झालेल्या बाटल्यांमध्ये पुन्हा पाणी भरून घेणे हे श्विनसाठी सवयीचे झाले होते.  मात्र तेथील थंडगार पाणी लगेच पिता येण्याजोगे नव्हते. माथेरान कडे जाणाऱ्या मार्गा पाशी गेल्यावर तेथे मनसोक्त छायाचित्रे काढून श्विन ट्रेकने जवळच्याच क्षुधाशांतिगृहाकडे मोर्चा वळवला. श्विनचे नेरळमधील हेही एक नित्याचेच ठिकाण! उदरभरण झाल्यावर परतीचा प्रवास सुरु झाला.

एव्हाना पृथ्वीतलावर आदित्यनारायणाचा मुक्त संचार सुरु झाला होताच. खरतर तो आता ऐन भरात आला होता. थोड्या वेळातच पुन्हा चेहरा आणि घसा पाण्याची मागणी करू लागले. काही अंतरावरच पोलिसांचा एक तंबु दिसला आणि त्या तंबूमागे ठेवलेला माठ श्विनने लांबूनच हेरला. तेथे महिला अधिकारी एकटीच उपस्थित होती. माठातील पाणी घेत असताना तिने श्विन आणि ट्रेकच्या सायकलफेरीविषयी विचारणा केली. एवढ्या उन्हात सुरु असलेला तो प्रवास तिला बूचकळ्यात टाकत असला तरी ती स्वतः त्याच उन्हात तिचे कर्तव्य बजावत होती. माठातील पाणी बरेच खाली गेले होते. त्यामुळे त्या महिला अधिकाऱ्याला अजून किती वेळ थांबावे लागेल आणि तोपर्यंत तिला हे पाणी पुरेल का, हा श्विनला प्रश्न पडलेला असताना ती अधिकारी मात्र श्विन ट्रेकला पुरेसे पाणी मिळाले आहे ना याची खात्री करत होती. अश्या अनुभवांमुळे पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांविषयी श्विनचा आदर आणि विश्वास नक्कीच वाढत होता.

वांगणी मागे टाकून खरवाई येण्याच्या मार्गात रस्त्याच्या डावीकडे असलेल्या एका झाडाच्या सावलीत थांबण्याचा मोह श्विनला झाला. रस्त्याच्या थोड्या आतल्या बाजूला काही मोठे वृक्ष हातात हात घालून उभे होते. त्यातील दोन वृक्ष तर एकमेकांना बिलगुनच उभे होते. अशी वृक्षराजी टिकवायची असेल तर बिभास आमोणकर ह्यांच्या कल्पनेतून निघालेल्या #saveoursahyadri ह्या मोहिमेतील तळमळ सर्व लोकांनी जपण्याला पर्याय नाही. दुर्दैवाने आजूबाजूला मात्र विपरीत परिस्थिती होती. त्या सलग वृक्षराजीपासून काही फुटांवरच मातीचा छोटा उंचवटा पोखरलेला होता. रस्त्यापासून काही फूट आतपर्यंत केवळ माती होती आणि तेथे कधीकाळी झाडे असलीच तर त्याचा मात्र मागमूसही नव्हता.

बदलापूर येथे घसा ओला करून रणरणत्या उन्हात श्विन ट्रेक पुढे निघाले. वाटेतच कलिंगडांची रास रचलेला तंबू दिसला. श्विन ट्रेकने लगेचच आजच्या भोजनाची तृप्तता कलिंगडावर ताव मारत पूर्ण करण्याचे ठरवले. कलिंगड गोड आणि रसाळ तर होतेच. पण श्विन आणि ट्रेकला आणखी आनंद झाला कारण त्यांना त्या तंबूमध्ये सावलीत बसून सूर्याला वाकुल्या दाखवता येत होत्या. तेथे बसलेले असताना सुखकर वाराही श्विन ट्रेकचा उत्साह वाढवत होता. त्याचा आनंद घेत स्वयंचित्र काढण्याचाही कार्यक्रम करण्यात आला. जठराग्नी शांत झाल्यावर त्याच तंबूत आडवे होण्याचाही मोह होत होता. मात्र तो आवरत श्विन ट्रेकने पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला. नेवाळी फाटा, तळोजा फाटा, मानपाडेश्वर मंदिर येथून डोंबिवलीमध्ये शिरताना थोडक्यात शतक हुकण्याची शंका डोकावू लागली. मग मात्र सोसायटीच्या आवारात शिरल्यावर सोसायटीला फेऱ्या मारत शतक पूर्ण करण्याचे श्विनने ठरवले.

संपूर्ण प्रवासात अजूनही हनुमानाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे श्विन आणि ट्रेक थोडे खट्टू होते. मात्र टंडन रस्त्याला लागताच मारुतीरायांचे दर्शन तर झालेच शिवाय राम लक्ष्मण यांच्याही सुंदर मूर्तींचे दर्शन झाले. पळस्पे फाट्याकडून रसायनी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील मारुतीरायांच्या विशाल मूर्तीचे दर्शन घेण्याचे श्विन ट्रेकच्या मनात होते. मात्र डोंबिवली -शिळ- पनवेल मार्गातील गर्दी टाळत नेरळ मार्गात एखादे हनुमान मंदिर दिसले तर तेथे मारुतीरायांचे दर्शन घ्यायचे असा विचार दोघांनी केला होता. डोंबिवली- नेरळ- डोंबिवली प्रवासात कोठेही रस्त्याला लागून मारुतीरायांचे दर्शन झाले नव्हते. मात्र टंडन रस्त्यावर मात्र ती मनीषा पूर्ण होत आजची सायकलसफर पूर्ण झालीच शिवाय श्विनची शंका खोटी ठरवत strava आणि endomodo दोघांनीही शतकी राइड पूर्ण झाल्याचीही ग्वाही दिली.

बुधवार, १७ एप्रिल, २०१९

जास्वन्दी

भारतीय सौर २७, १९४१

महावीर जयंती निमित्त सुट्टी मिळाल्यामुळे आज श्विनला cycle2work ची संधी नव्हती. ती सुट्टी सार्थकी लावण्यासाठी श्विन उत्सुक होतीच. अरुणोदय झाल्याची पक्की खात्री झाल्यावर अस्मादिक श्विनजवळ गेले. श्विन तयार होतीच. श्विनबरोबर ट्रेकही आज सकाळच्या फेरीसाठी उत्सुक होतीच.

डोंबिवली नगरीतील रस्त्यांचा अंदाज घेत श्विन आणि ट्रेक संथगतीने डोंबिवली शहराबाहेर पडले. नेहमीप्रमाणे आजही नेवाळी फाटा येथे जाण्याचे ठरले होते. काटई नाका येथे अभूतपूर्व अशी कोंडी झाली होती. श्विन आणि ट्रेकने तेथून मुसंडी मारत बदलापूर पाइपलाइन रस्त्याला मोर्चा वळवला. तेथे पोचल्यावर मात्र दोघांनाही मोकळा श्वास घेता आला. थोड्याच वेळात वेग घेत तळोजा फाटा मागे पडला. पुढे असलेल्या उतरणीचा लाभ घेत वेग अधिकच वाढला तेव्हा मात्र श्विनला नेवाळीपेक्षा पुढे जाण्याचा मोह होऊ लागला.

ट्रेकशी संवाद साधत श्विनने नेवाळी फाटा येथे न थांबता तशीच पुढे दौड घेतली. अंबरनाथ जवळ पोचल्यावर मात्र आणखी पुढे जाण्याचा मोह टाळत दोघेही मागे फिरले. मात्र लगेचच चहासाठी एक विसावा घेतला. छोट्याशा टपरीत चहा घेतल्यावर श्विनने टपरीच्या मागील बाजूस पाहिले. त्या टपरीच्या मागील बाजूस भिंत किंवा कापड नव्हते त्यामुळे मागील बाजूला असलेला निसर्ग दिसत होता. तेथे असलेल्या जास्वन्दाच्या झाडाने श्विनचे लक्ष वेधून घेतले. त्या चहाच्या टपरीच्या थोडे पुढेच रस्त्यापासून जरासे आत एक हॉटेल तेथे होते. त्या हॉटेलच्या प्रांगणात त्या हॉटेलशेजारी बरीच मोठी मोकळी जागा होती. आणि बाजूच्या कुंपणावर जास्वन्दाची फुलांनी लगडलेली दोन तीन झाडं हारीने उभी होती. श्विन आणि ट्रेक त्या झाडांकडे नजरबंदी झाल्याप्रमाणे खेचले गेले. जास्वन्दाच्या फुलांशी मनसोक्त गुजगोष्टी करताना आजूबाजूचे भान राहिले नव्हते. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्या हॉटेलच्या मागच्या कुंपणापलिकडे झुंज घेत असलेले दोन बैल नजरेस पडत होते. दोघेही तुल्यबळ होते. खरतर जास्वन्दाच्या झाडापाशी जातानाच श्विनने ती झुंज लागलेली जोडी पहिली होती पण जास्वन्दाशी संवाद साधताना त्या झुंजीचा विसर पडला होता. मात्र श्विन आणि ट्रेक भानावर आले तरी ती झुंज सुरूच होती. दोघेही अतिशय तुल्यबळ होते. कोणीही मागे सरकत नव्हते. मागच्या कुंपणापलिकडे हि झुंज लागलेली असताना जास्वन्दाची झाडे ज्या बाजूस होती त्याच्या पलीकडे दोन बैल आरामात क्षुधाशांती करत होते. त्यांच्या शेजारी दोन पांढरेशुभ्र बगळे स्थितप्रज्ञतेचा आव आणत शांतपणे उभे होते. ते बगळे त्या बैलांच्या पाठीवर बसले तर छानसा फोटो घेता येईल या विचारात काही क्षण गेले पण त्या बगळ्यांना मात्र फोटो काढून घेण्याची इच्छा नव्हती. इकडे झुंज बराच वेळ सुरु होती. अखेरीस थोड्या वेळात श्विन आणि ट्रेक मागे फिरले. मागे फिरताच वाटेत पडलेली जांभळे दिसली. जांभळाच्या झाडाशी श्विनचे नाते लहानपणापासूनचे! बऱ्याच वेळेस श्विन एकटाच जांभळाच्या झाडाखाली क्रिकेटची प्रॅक्टिस करत असे. अर्थात त्यासाठी ना चेंडू हवा असायचा ना बॅट. एक मोठी काठी आणि एक छोटी काठी एवढी सामग्री पुरेशी असायची. ती छोटी काठी चेंडू समजून डाव्या हाताने हवेत उडवायची आणि ती हवेतून खाली येत असताना दोन्ही हाताने मोठी काठी बॅटसारखी पकडत त्याने छोट्या काठीला मारायचे. हा श्विनचा खेळ जांभळाच्या झाडाखाली तासनतास सुरु असायचा. भूक लागली की त्याच झाडाची जांभळे समोरच असत.

जास्वन्दाच्या मोहाने त्या हॉटेलच्या प्रांगणात शिरताना जांभळाचेही भान श्विनला नव्हते. परत फिरताना जांभळे पाहताच श्विनच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. अखेरीस त्या जास्वन्दी क्षणांवर पडलेली जांभळी पखरण मनाशी साठवत श्विन आणि ट्रेक परतीच्या मार्गाला लागले

गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

भेट एका झाडाशी

भारतीय सौर चैत्र २१, १९४१

*भेट एका झाडाशी*

#dombivlicycleclub (DCC) च्या #21dayscampaign चा २१ वा दिवस!
डॉ राहुल घाटवळ, रितेश सावला, अवटीकाका आणि सौमित्र सामंत यांनी अंबरनाथ शिवमंदिर येथे जाण्याचे निश्चित केले होते. मला मात्र त्यांच्याबरोबर लवकर जाता येणार नव्हते.

काहीसा उशीर झाल्याने मनाची चलबिचल सुरु झाली होती. मात्र श्विनची एका झाडाशी भेट ठरलेली होती. त्यामुळे श्विनने मला घराबाहेर काढले. खरंतर तोपर्यंत शिवमंदिरची टीम परतीच्या वाटेला लागलेली असणार होती. झालेही तसेच - मी पूर्वपश्चिमेचा उड्डाणपूल ओलांडत असतानाच एकजण परत येताना दिसला. पण श्विनने मला समजावले की तो नेवाळी फाट्यापासूनच पासूनच परत आला असेल.

डोंबिवली शहराबाहेर पडताच डॉ घाटवळ याना फोन करून ते अजून नेवाळी फाटा येथेच आहेत याची खात्री झाल्यावर मात्र मी निर्धास्त झालो. पुढे प्रीमियर कॉलोनी जवळ दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने शैलेश महाडिक, दुर्गेश झिपरे आणि DCC चे जेष्ठ सहकारी अय्यरकाका दिसले. तिघेही पूर्ण लक्ष सायकलवर होते. मधल्या दुभाजकामुळे त्यांना हाकही मारता येणार नव्हती.

श्विनने काटई नाका येथे वळण घेतल्यावर मी शिवमंदिर टीमकडे लक्ष ठेवत संथगती सुरु केली. सावधपणे दुभाजकापलीकडे पाहत श्विन जात होती. अल्पावधीतच सर्वजण भेटले. रितेश आणि नवोदित सदस्य अक्षत हे पुढे होते. पाठोपाठ डॉ घाटवळ आणि DCC मधील आणखी एक तरुण सदस्य आवटी काका येऊन सामील झाले. सर्वजण शिवमंदीरला जाऊन आले होते. मात्र सौमित्र आधीच नेवाळी फाट्याहून परतला होता. तो क्षण जपून ठेवण्यासाठी रितेशने लगेचच भ्रमणध्वनीच्या साहाय्याने स्वयंचित्र घेतले.



अर्थातच त्यांच्याबरोबरील छायाचित्रामुळे माझ्या शिवमंदिर भेटीचाही पुरावा मिळाला होता. मात्र हे सर्वजण भेटल्यावर मी त्यांच्या बरोबर परत फिरतोय की काय अशी धाकधूक श्विनला वाटू लागली होती.

पण त्या सगळ्यांचा निरोप घेत मी श्विनला नेवाळी फाट्याकडे वळवले. होय, माझीही एक भेट ठरलेली होतीच. गन्धार डोम्बिवलीकर आणि अर्णव कुलकर्णी यांच्याइतका नियमितपणा माझ्याकडे नसला तरी अधूनमधून तरी नेवाळी फाटा येथील चहावाल्याचे देणे गंधारच्या अनुपस्थित मला चुकते करायलाच हवे होते. गन्धार नसल्यामुळे आणि काही वैयक्तिक कारणांमुळे अर्णवचेही नेवाळी फाट्याला जाणे कमी झाले होते. मात्र आज ते कर्तव्य पूर्ण करायला मी नेवाळी फाटा येथे गेलो.

नेहमीप्रमाणे चहावाल्याला माझ्या चहाचा आदेश देऊन मी श्विनची छायाचित्र काढू लागलो....


आणि पाहता पाहता श्विनची चौकशी करत काहीजण माझ्याशी संवाद साधू लागले. त्यातील एकाला माझ्याबरोबर स्वयंचित्र घ्यायचे होते. आम्ही दोघांनीही एकमेकांना आपापल्या भ्रमणध्वनी द्वारे स्वयंचित्रात बद्ध केले.



सायकल विषयी बोलण्याची संधी मी थोडाच सोडणार? गियरचा संबंध वेगापेक्षा चढणीच्या रस्त्याशी आहे, कमी वजनाची (aluminum) ची सायकल लोखंडी सायकलपेक्षा जलद पळू शकते, टायर ची जाडी आणि वेग अश्या विषयांवर गप्पा मारत मी संवाद साधत होतो. जवळपासच्या छोट्या उद्योगधंद्यात काम करणारी ती साधी माणसं आपलीशी होत होती. सायकलमुळे समानता आणि विश्वबंधुत्व वाढते ते हे असे! रु. ५००० पासून रु. ९ लाखपर्यंतही सायकलची किंमत असते हे ऐकून ते हरखून गेले होते. श्विनची किंमत काय या प्रश्नाला मात्र मी राजकीय बगल दिली. लोखंडी सायकल वजन वाहू शकते मात्र अल्युमिनुम ची सायकल वजन वाहण्यासाठी नाही तर केवळ प्रवासासाठी आहे. त्यामुळे तुमच्या गरजांनुसार सायकल निवडली पाहिजे असे सांगत मी त्यांची किंमतीबाबतची जिज्ञासा कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. तरीही ते फिरून फिरून श्विनच्या किमतीविषयी विचारत होते. मग मी थेट उत्तर न देता अश्या सायकल अगदी ५००० रुपयांपासून मिळू शकतात असे सांगत श्विनची किंमत सांगणे टाळले.

इतका वेळ श्विन तेथे शांतपणे उभी होती. मात्र मी परतु लागताच तेथील एका झाडाजवळ उभी राहुन छायाचित्र काढण्याचा मात्र तिने हट्ट धरला होता. खर पाहता इतर झाडांप्रमाणेच ते एक सर्वसामान्य झाड होते. पण त्या झाडाच्या भेटीसाठीच तर श्विन बाहेर पडली होती. मग श्विनच्या आग्रहाखातर अस्मादिकांनी त्या झाडाकडे मोर्चा वळवला. हिरवागार पर्णसंभार ल्यालेला तो वृक्ष शांतपणे उभा होता. त्याच्या पायथ्याशी आलेल्या पांथस्थाना सावली देण्याचे कर्तव्य तो बजावत होता. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता येणाऱ्या जाणाऱ्याला विसावा देण्याचे काम करणाऱ्या त्या वृक्षाबद्दल म्हणूनच श्विनला आकर्षण वाटत असावे. श्विनच्या विनंतीला... की आज्ञेला मान देत मी त्या वृक्षासह श्विनचे छायाचित्र काढू लागलो.
 त्या वृक्षाच्या फांद्यातून डोकावत सूर्यमहाराजसुद्धा छायाचित्रात येण्याचा प्रयत्न करत होते.



श्विन आणि सूर्यमहाराज यांची इच्छा पूर्ण झाल्यावर अस्मादिक परतीच्या वाटेला लागले.

#bikeport #tjsbbank #saveoursahyadri #cyclingzens #cycle2work #ismartcommute

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...