रविवार, २९ मार्च, २०२०

भूमिगत खजिना: पुणे जम्मू सायकलसफर भाग २ : लेख २

भारतीय निधर्मी राष्ट्रीय दिनांक ५ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २६ डिसेंबर २०१९
(Deca - 10, But December is 12 th month... Is it rational, is it scientific, is it logical? 


साबरमती आश्रमाबद्दल श्विन(फुजीला) विलक्षण कुतूहल होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील कित्येक लढयांच्या योजना इथेच आखल्या गेल्या असाव्यात. आणि का नाही होणार, कारण कारागृह  किंवा प्रवासातील वेळ वगळला तर महात्मा गांधींचे वास्तव्य साबरमती आश्रम किंवा वर्धा येथील आश्रमातच जास्त काळ होत असावे. जवळपास एक तपाचा काळ तरी महात्म्याने ह्या दोन आश्रमातच घालवला होता. मिठाच्या सत्याग्रहासाठी काढलेल्या दांडीयात्रेचा मूळ पाया साबरमती आश्रमच तर होता.

साबरमती आश्रमाच्या एका बाजूला कारागृह तर दुसऱ्या बाजूला स्मशानभूमी होती. गांधीजी म्हणत आश्रमाची ही जागाच योग्य होती कारण सत्याग्रहींना ह्याच दोन पैकी एका ठिकाणी जावे लागत असे.

राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळालेल्या साबरमती आश्रमात आम्हा सात सायकलपटूंचे स्वागत होणे तेही हारतुरे घालून हेच अभिमानाचे होते. आणि येथेच अहमदाबाद येथील नवे साथीदार आमच्या सायकलयात्रेत सामील होणे हे तर अधिकच समाधानाचे होते. मात्र काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. अहमदाबाद येथे पाच ऐवजी चार सायकलस्वार तर आम्हाला सामील झाले होते. 


खरेतर तिथे इतका जल्लोष सुरू होता की आम्हाला काही विचार करायलाही वेळ नव्हता. आमचे स्वागत झाल्यावर आश्रमाच्या आवारात छोटी फेरी मारण्यासाठी आम्हाला नेण्यात आले. एका बाजूला साबरमती नदी परिसराच्या सौंदर्यात भर घालत होती. तेथील बागही मनमोहक होती.


घड्याळबाबांची टिकटिक चालू होतीच. त्यामुळे आश्रमामध्ये जास्त वेळ घालवणे शक्य नव्हते. नव्याने सामील झालेल्या चार सायकलपटूंबरोबर आमची फेरी पुढे सुरू झाली. मात्र आमच्या बरोबर शुभेच्छा देणाऱ्यांचीही मोठी फौज आमच्याबरोबर येत होती. आमचा उत्साहही चांगलाच वाढला होता. अहमदाबादच्या प्रशस्थ रस्त्यातून जात असताना आमचा जत्था एका चौकात थांबला. लगेचच जमावाने आम्हाला घेरले. त्यांना आमच्याबद्दल उत्सुकता वाटत होती. सगळेजण कुतूहलाने प्रश्न विचारू लागले. त्यात कौतुक होतेच. त्यातच नेहमीचा एक प्रश्न आला,'तुम्ही कशासाठी रॅली काढत आहात?' त्यांना आमच्या रॅलीचा उद्देश 'फिट इंडिया.. सशक्त भारत' हा संदेश देणे आहे हे सांगताच पुढील प्रश्न आला, 'तुम्ही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी का रॅली काढत नाही?'

खरतर बुलेट ट्रेनमुळे शीळ फाटा -डोंबिवली -कल्याण -भिवंडी येथील जवळपास २० किमीच्या महामार्गाचे मंजूर झालेले काम रद्द झाले होते. ह्यामुळे स्थानिक वाहतुकीचा बोजवारा वाजला होता. त्यामुळे बुलेट ट्रेन हा श्विन(फुजी)च्या तिरस्काराचाच विषय झाला होता. मात्र सायकलसफारी करत असताना डोक्यावर बर्फ ठेवून उत्तर देणे भाग होते.

श्विन(फुजी)ने उत्तर दिले, ' आम्ही आमच्या ध्येयासाठी सायकलफेरी काढली आहे. तुमच्या ध्येयासाठी तुम्ही अहमदाबाद पासून मुंबईपर्यंत जरूर सायकलफेरी काढा. आम्ही तुमचे स्वागत करू.' हे उत्तर ऐकताच प्रश्न विचारणारा मात्र चांगलाच ओशाळला. 

आमची सफर पुढे सुरू झाली. या शहरात आम्हाला मिळणारा आनंद केवळ साबरमती आश्रमातील उत्साहपूर्व स्वागतापर्यंतच मर्यादित नव्हता. खरंतर आनंदमिश्रित आश्चर्य आणि भव्यता ह्यांचा एक ठेवा आमच्यासाठी अजून या परिसराने राखून ठेवला होता.

आश्रमापासून साधारण १२- १४ किमी अंतरावर आम्हाला थांबवण्यात आले. सगळ्यांच्या सायकली एका रांगेत उभ्या करायला सांगून आम्हाला एका प्रवेशद्वारातून आत सोडण्यात आले. आमच्याबरोबर जवळपास ४०-५० जण आम्हाला साथ देत साबरमती आश्रमापासून येथे आले होते. आमच्या सायकल हा आमचा प्राणच होता. त्यामुळे प्रवेशद्वारातून आत शिरताना मनावर दडपण येत होते, मात्र आमच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी आम्हाला दिलासा दिला होता. त्यामुळे आम्ही बेफिकिरपणे आत शिरलो. समोर प्रचंड मोठे या आवार दिसत होते आणि काही अंतरावर काही दगडी बांधकाम दिसत होते. आम्ही त्या बांधकामाजवळ गेलो मात्र... आणि खरोखरच स्तिमित झालो. तिथे खाली उतरणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या. जसजसे आम्ही पायऱ्या उतरत होतो, आमचे आश्चर्य आणि आनंद वाढतच होते.





 पाच मजली भक्कम बांधकाम, अप्रतिम कलाकुसर केलेली ती भव्य वास्तू होती अदालज बावडी!




अदालज येथील ह्या पाचमजली खोल विहिरीची भव्यता केवळ फोटोमध्ये सामावणे शक्य नव्हते. ह्या वस्तूची भव्यता आणि सौंदर्य ताजमहालपेक्षा तसूभरही कमी नव्हते. ताजमहाल जर भारताचे जमिनीवरील वैभव असेल तर अदालज येथील ही वास्तू भारताचा भूमिगत खजिना आहे.

शनिवार, २८ मार्च, २०२०

कर्णावतीमध्ये प्रवेश: पुणे जम्मू सायकलसफर - भाग २ - लेख १

भारतीय निधर्मी राष्ट्रीय दिनांक ५ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २६ डिसेंबर २०१९
(Deca - 10, But December is 12 th month... Is it rational, is it scientific, is it logical? )


कर्णावती शहर साबरमती नदीच्या काठी वसलेले आहे. अवघ्या २१ व्या वर्षी राज्यावर बसलेला गुजरातचा सुलतान अहमदशाह ह्याचे भडोच येथे चुलतभाऊ फिरोजखानबरोबर राज्य मिळवण्यासाठी युद्ध झाले. त्या युद्धात विजय मिळवून पट्टण येथे परतताना वाटेत त्याने एक शहर वसवले. तेच हे कर्णावती शहर! सुलतान अहमदशाह ह्याच्या नावावरून ह्या शहराला अहमदाबाद ह्या नावाने ओळखले जाते. पट्टण येथून तख्त हलवून अहमदशहाने अहमदाबादला गुजरातच्या राजधानीचा दर्जा दिला. अहमदाबादजवळ वसलेले जुळे शहर गांधीनगर ही गुजरातची सध्याची राजधानी आहे.
युनेस्कोने कर्णावती म्हणजेच अहमदाबाद ह्या शहराला जागतिक वारसा शहर असा दर्जा दिला आहे. असा दर्जा मिळवणारे हे भारतातील पहिलेच शहर!

असा जागतिक वारसा मिळवणाऱ्या शहरातील ५ सायकलपटू पुणे जम्मू सायकलसफरीमध्ये सामील होणार होते. त्यांना भेटण्यासाठी पुणे डोंबिवली येथील सातही स्वार उत्सुक होतेच. पराठा समारंभानंतर सातही स्वार कर्णावती शहराच्या दिशेने वेगात निघाले. अहमदाबादकरही सातही स्वारांचे स्वागत करण्यास आतुर होते. शहराच्या वेशीवरच सातही महाराष्ट्रीयन सायकलपटूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. सगळ्यांना मिठाई देण्यात आली. अहमदाबाद येथे सामील होणारे ५ सायकलपटू मात्र इथे दिसत नव्हते. मात्र येथे स्वागत करणारी मित्रमंडळी आता पुढील रस्ता दाखवणार होते.

स्वागत समारंभ आटपत अहमदबादकरांच्या नेतृत्वाखाली पुढील प्रवास सुरू झाला. सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात सगळ्यांनाच नाक मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली. आजूबाजूला असलेल्या प्रचंड दुर्गंधी, कचरा ह्यांनी शहराच्या वेशीवर दर्शन दिले होते. बहुधा ती शहराची क्षेपणभूमी असावी. तेथून मार्ग काढताना एकमेकांशी बोलणे तर दूरच श्वास घेणेही त्रासदायक होत होते. श्विन/ फुजी नेहमीच नाकतोंडाभोवती कापड गुंडाळत असे. मात्र तेही आज पुरेसे वाटत नव्हते.

मात्र ह्या जाचातून काही वेळातच सुटका झाली. आता मोकळा आणि सुंदर रस्ता सुरू झाला होता. थोड्या वेळातच आम्ही साबरमती नदीमार्गापाशी पोचलो. साबरमती नादिमार्गावरून जात असतानाच आनंद अवर्णनीय होता. मोकळा, स्वच्छ रस्ता आम्हाला उत्साहीत करत होता. साबरमती नदीकाठावरील ऊर भरून घेतलेला वारा प्रोत्साहित करत होता. अहमदबादच्या वेशीवर स्वागत करणारे साथीदार तसेच वाटेत सामील झालेले इतर साथीदार ह्यांच्या बरोबर आम्ही सात स्वार त्या नदीकाठावरून पक्षांच्या थव्याप्रमाणे विहरत होतो.



नदीकाठावरील फेरी संपवत आम्ही साबरमती आश्रमात पोचलो. आश्रमाचा द्वाराशीच आम्हा सात जणांचे पुन्हा एकदा जोरदार स्वागत झाले. श्विन(फुजी)चे डोळे मात्र भिरभिरत होते आपल्या सफरीमध्ये अहमदाबाद येथे सामील होणाऱ्या अन्य ५ सायकलस्वारांना पाहण्यासाठी. आम्हा सातही जणांना एका इमारती शेजारील मोकळ्या प्रांगणात रांगेत उभे राहायला सांगितले गेले. आणि.... आमच्या पुणे जम्मू सायकलसफरीत सामील होऊ इच्छिणारे अहमदाबादकर आमच्या शेजारी रांगेत उभे राहिले.








आम्हा सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठीही लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साबरमती आश्रम पाहायला मिळणे हीच खरी तर एक पर्वणी होती. वेळ थोडा असला तरी आश्रमात एक छोटा फेरफटका मारायला आम्ही सगळेच उत्सुक होतो.

रविवार, १५ मार्च, २०२०

कट्टीबट्टी: पुणे जम्मू सायकलसफर: भाग १ लेख १३

भारतीय निधर्मी राष्ट्रीय दिनांक ५ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २६ डिसेंबर २०१९
(Deca - 10, But December is 12 th month... Is it rational, is it scientific, is it logical? )



तिमीराचे साम्राज्य चोहीकडे पसरले होते. हॉटेल राजस्थान सोडून अर्धा तास तरी होऊन गेला असावा. मात्र अद्यापि रविराज क्षितिजापालिकडेच होते. श्वानांच्या तावडीतून सहीसलामत सुटून हमरस्त्याला लागलेल्या फुजीला गौतम दिसताच जीवात जीव आला होता.

हमरस्त्याला लागताच फुजीने थोडा वेग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेरी नसल्याने फार वेग घेता येत नव्हता. पुणे जम्मू सायकलसफरी मध्ये सामील होण्याआधीपासून फुजीने सगळ्यांना वारंवार सावध केले होते की आपल्या मागील सायकलपटूकडे लक्ष द्या. फुजीने स्वतः ह्या सफरीत सामील झाल्यापासून कायम शेवटच्या सायकलस्वाराला साथ देण्याची भूमिका निभावली होती. मात्र आज फुजीला साथीची गरज होती तेव्हा तसे सांगूनही कोणताही सायकलस्वार थांबला नव्हता. त्याचा परिणाम म्हणजे फुजी संकटात असताना कोणीही बरोबर नव्हते. केवळ दैव बलवत्तर असल्याने फुजी त्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली होती.

मात्र सहभागी सायकलपटूंच्या ह्या बेजबाबदार वृत्तीमुळे आता फूजीच्या मनात क्रोधाग्नि भडकला होता. थोड्या वेळात फटफटू लागले. काही अंतरावर पुढे गेलेले सायकलपटू चहासाठी थांबलेले दिसले. फुजी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागताच ट्रेक आणि नयना आघारकर ह्यांनी फुजीला हाक मारली.

'कशाला वेळ वाया घालवताय? दोन मिनिटांची किंमत तुम्हाला माहीत आहे का?' घुश्यातच फुजीने विचारले. खरतर हे उद्गार त्या सायकलपटूंना उद्देशून होते जे हॉटेल राजस्थान सोडताना दोन मिनीटेही फुजीसाठी थांबले नव्हते. फुजीने न थांबता दौड सुरू ठेवली. थोड्या अंतरावर अय्यरकाका इतर सायकलपटूंसाठी थांबलेले दिसले. फुजीने त्यांना इतर सायकलस्वार चहासाठी थांबले असल्याचे सांगितले. अय्यरकाकांशी बोलता बोलता फुजीचा रागही शांत होत होता. फुजी आणि अय्यरकाका चहासाठी पुढे थांबायचे ठरवून कूच करू लागले. उजवीकडे क्षितिजावर तेजोनिधीही दिसू लागला होता.


त्या विलोभनिय दृष्यामुळे फुजीचा राग पूर्ण शांत झाला. फुजी आणि अय्यरकाका पुढे जाऊ लागले. थोड्या अंतरावर एका उड्डाणपूलाशेजारी एक छानसे क्षुधाशांतिगृह दिसले. मागून येणारे सायकलस्वार येईपर्यंत चहा घेण्याचा विचार करत दोघेही तेथे थांबले.




चहाकेंद्रचालक चांगलाच संथ होता. फुजी आणि अय्यरकाका चहाची वाट पाहत असताना इतर सायकलस्वार पूढे निघून गेले. चहाकेंद्र रस्त्यापासून थोडे आत होते, त्यामुळे त्यांना फुजी आणि अय्यरकाका दिसले नव्हते. चहा घेऊन फुजी आणि अय्यरकाका निघाले. पुढे ट्रेक, नयना आघारकर आणि गौतम फुजीची वाट पाहत थांबलेले दिसले. ट्रेक आणि नयना आघारकर ह्यांनी ह्यापुढे फुजीबरोबर राहण्याचे मान्य केले. पुणेकर पुन्हा पुढे सटकले होते.

अय्यरकाका पुन्हा वेग घेत पुढे जाऊ लागले. ट्रेक आणि नयना आघारकर ह्यांचा वेग मात्र मंदावला होता. फुजी त्यांच्या साथीने पुढे जात होती. गौतमही आता बरोबरच होता. एव्हाना हॉटेल राजस्थान सोडून ३ तास झाले होते. अंदाजे ५० किमी अंतरही पार झाले होते. फुजीचा क्रोधाग्नि शांत झाला तरी जठराग्नी जागृत झाला होता. मधुमेह असल्यामुळे फुजी वेळेचे बंधन पाळण्याचाही प्रयत्न करत असे. डाव्या हाताला क्षुधाशांतीगृह दिसताच फुजीने थांबा घ्यायचे ठरवले. हॉटेल बऱ्यापैकी मोठे असले तरी आत मध्ये गिऱ्हाईकच नव्हते. पदार्थांच्या यादिवरून नजर फिरवत अखेर पराठ्यावर शिक्कामोर्तब झाले. फूजीच्या अंदाजाप्रमाणे १५-२० मिनिटात पराठा मिळणे अपेक्षित होते. गल्ल्यावरील माणूस ऑर्डर घेऊन गायब झाला तोही बराच वेळ दिसेना. आता उठून परत दुसऱ्या हॉटेलात जायचे तर परत पहिल्यापासून वेळ जाणार होता. अखेर जवळपास पाऊण तासाने पराठ्याचे दर्शन झाले. ह्या अनुभवामुळे फुजीने पराठा येताच चहाचीही फर्माईश करून टाकली. किमान पराठा संपेपर्यंत तरी चहा येईल ही अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. चहाची प्रतीक्षा सुरू असताना देवधरांचा फोन आला. सगळे पुणेकर पुढे जाऊन ताटकळत उभे होते. शिवाय काही अहमदाबादकरही शहराबाहेर सगळ्या सायकलपटूंचे स्वागत करण्यासाठी आले असल्याचे देवधरांनी सांगितले. पुढे गेलेल्या देवधरांना पराठापुराणाची कल्पना नव्हती.

देवधरांचा फोन सुरू असताना पुढ्यात चहाही आला. अहमदाबादकरांना भेटण्याची फुजीलाही उत्सुकता होतीच. फुजीने देवधरांना चहा घेऊन येत असल्याचे सांगितले. चहापान झाल्यावर मात्र फुजी, ट्रेक, नयना आघारकर आणि गौतम लगेचच निघाले. अवघ्या १-२ किमी अंतरावरच पुणेकर आणि अय्यरकाका थांबलेले दिसले. जम्मू पुणे सायकलसफरीतील सदस्य पुन्हा एक झाले होते. न बोलताच सगळ्यांची पुन्हा कट्टीची बट्टी झाली होती.

शनिवार, १४ मार्च, २०२०

पाचावर धारण: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख १२

भारतीय (निधर्मी) दिनांक सौर ५ पौष १९४२
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २६ डिसेंम्बर २०१९


वर्णं कीर्तिं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति।
ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥

ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणाऱ्या व्यक्तीला सुंदरता, लक्ष्मी, बुद्धी, स्वास्थ्य, आयु इ. गोष्टींची प्राप्ती होते. यामुळे शरीर कमळाप्रमाणे सुंदर होते.

हे वचन पटले तरी ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी दोन तास आधी उठण्यासाठी मन वळणे अवघडच. मात्र पुणे जम्मू सायकल सफर सुरू झाल्यावर मात्र श्विन/फुजीला आपोआपच ब्रह्म मुहूर्तावर जाग येऊ लागली होती. वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की ब्रह्म मुहूर्तातील वातावरण प्रदूषणमुक्त आहे. त्याच वेळी, वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सर्वाधिक (४१ टक्के) असते, जे फुफ्फुसांच्या शुद्धीकरणासाठी महत्वाचे आहे.

आज सगळे सायकलस्वार ब्रह्म मुहूर्तावर केवळ उठले नव्हते, तर हॉटेल राजस्थानच्या प्रांगणात कूच करण्यासाठी सज्जही झाले होते. ब्रह्म मुहूर्ताचे महत्व पटत असले तरी श्विन मात्र त्यावेळी घराबाहेरही पडत नसे त्याचे कारण घराबाहेर पडताक्षणी त्या ब्रह्म मुहूर्तावर जागे असलेले श्वानपथक! भल्या पहाटे रस्त्यातील श्वानपथकाला चांगलाच चेव आलेला असतो. हा अनुभव श्विन/फुजी ला अनेकदा आलेला होता.

गेल्या चारपाच दिवसात मात्र सवयीने जाग आल्याने सगळ्या सायकलस्वारांबरोबर फुजीही ब्रह्ममुहूर्तावर तयार झाली होती (फुजीची निवड झाल्यामुळे श्विन आजही टेम्पोतच राहणार होती). खरंतर आज तर नेहमीपेक्षाही सगळेजण लवकर तयार झाले होते. गेले तीन दिवस महामार्गावरूनच प्रवास सुरू असल्याने फुजीने घंटी लावली नव्हता. आज अहमदाबाद शहरात प्रवेश करायचा असल्याने आजमात्रं घंटी लावणे गरजेचे होते. त्यामुळे फुजीने घंटी लावली. साध्या घंटीच्या आवाजाने रस्त्यातील कोणीही लक्ष देत नसले तरी फुजीने विशिष्ट आवाज काढणारी घंटी लावली होती. ह्या घंटीच्या आवाजाने पुढील माणूस झटकन बाजूला तरी होईल किंवा किमान मागे वळून तरी बघेल. 

दरम्यान सगळे सायकलस्वार कूच करण्यास तयार झाले. इतक्यात फूजीच्या हाताळ्याला घंटी लावल्यामुळे शेजारील विजेरी मात्र सरकली. ती विजेरी गर्रकन गोल फिरली. फुजीने सगळ्यांना थांबण्यास सांगितले. मात्र चार स्वारांनी लक्ष नसल्याने कुच केले. अजून दोन सायकलस्वारांनी मात्र कूच केले नव्हते. त्यांना फुजीने परिस्थितीची कल्पना दिली आणि थांबण्यास सांगितले. मात्र फुजीची विनंती ऐकूनही त्या दोन्ही सायकलस्वारांनी सरळ सरळ दुर्लक्ष करत कूच केले. टेम्पोमध्ये बसून गौतम हे सर्व पाहत होता.

फूजीच्या हाताळ्याला विजेरी लावण्याचा खटाटोप निष्फळ होत होता. २-३ मिनिटे प्रयत्न करूनही ती विजेरी लागली नाही, त्यामुळे उशीर होऊ नये म्हणून विजेरी खिशात टाकून गौतमच्या टेम्पोच्या उजेडात जायचे फुजीने ठरवले. गौतमलाही तशी कल्पना दिली. फुजीने महामार्ग पकडला खरा पण विजेरी नसल्याने फुजीला वेग घेता येईना. शिवाय आज गेल्या तीन दिवसांपेक्षा तब्बल अर्धा तास लवकर प्रवास सुरु झाल्यामुळे आदित्यनारायण इतक्यात उगवणार नव्हता. अर्थातच आता पुढिल सायकलस्वार आणि फुजीमधील अंतर कमी व्ह्यायच्या ऐवजी वाढतच जाणार होते.

महामार्ग मोकळा होता. फुजीची सगळी भिस्त मागून येणाऱ्या गौतमच्या टेम्पोवरच होती. इतक्यात समोर एक उड्डाणपूल दिसला. उड्डाणपूलशेजारूनही एक रस्ता जात होता. गौतमचा टेम्पो फुजीपासून अंतर ठेवून येत होता. त्यामुळे विजेरी नसताना उड्डाणपुलावरून जाताना दुसरे वाहन टेम्पोपुढे येऊन फुजीला धडकण्याची शक्यता होती. दुसरे म्हणजे पुढे गेलेले सगळे सायकलस्वार उड्डाणपुलाऐवजी शेजारील रस्त्यावरून जाणेच पसंत करत. जर ते उड्डाणपूलशेजारील रस्त्यावरून जाऊन फुजीसाठी थांबले असतील तर...ती शक्यताही होतीच.

त्यामुळे फुजीने उड्डाणपुलावरून न जाता शेजारील रस्त्यावरून जाणे पसंत केले. गौतमचा टेम्पो मागोमाग येईल हा विश्वास होताच. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. सर्वत्र सामसूम होती. पुढील सायकलपटूंना लवकर गाठणे आवश्यक होते. रस्त्यावर थोडाफार उजेड होता. त्याच्या आधारावर फुजी जात होती. जवळपास ३००-४०० मीटर अंतर पार झाले तरी बाजूचा उड्डाणपूल अजून उच्चच उंच जात होता. आणि अचानक....
रस्ता संपला होता. पुढे केवळ पायवाट होती आणि डाव्या हाताला कचऱ्याचे ढीग होते. फुजीने मागे वळून पाहिले उड्डाणपूल सुरू झाला ती जागा बरीच दूर होती. गौतमही दिसत नव्हता. खरंतर त्याला शेवटच्या सायकलपटूबरोबर राहणे आवश्यक होते. त्याला तशी सूचना सफर सुरू होण्यापूर्वीच देण्यात आली होती.

आता मागे जाणेही सोपे नव्हते. फुजीने आणखी थोडे पुढे जात अंदाज घ्यायचे ठरवले. फुजी पायउतार होत पुढे जात होती. थोड्याच अंतरावर जवळपास २०-२५ श्वान मुटकुळे करून झोपलेली दिसली. अद्याप अंधाराचेच साम्राज्य होते. आता तिथे थांबणे धोकादायक होतेच, पण परत मागे वळण्याचा प्रयत्न करणेही धोकादायक होते. मागे वळताना एखाद्या श्वानाला संशय आला तरी इतर श्वानही मागे आली असती. फुजीला त्यांच्यापेक्षा अधिक वेगात आता मागेही फिरता येणार नव्हते आणि पुढेही जाता येणार नव्हते. 

हवेत किंचित गारठा असला तरी फुजीला तो जाणवेनासा झाला होता. फुजीने शांतपणे पुढे जात राहण्याचे ठरवले. श्वानपथकाच्या शेजारून जात असताना आवाजही न करता पुढे जावे लागणार होते. कोणत्याही श्वानाकडे नजरही न वळवता फुजीने चाल सुरू ठेवली. कोणत्याही श्वानाच्या  डोळ्यात डोळे घालून पाहिले तर त्या श्वानाला ते आव्हान वाटू शकते आणि जर एखाद्या जरी श्वानाला तसे वाटले असते तर.... ते श्वान तर अंगावर आले असतेच पण इतर २५ श्वानही अंगावर आली असती. सगळे सायकलस्वार एकत्र जाणे आवश्यक असताना फूजीच्या विनंतिकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे फुजी पूर्ण संकटात होती. गौतमनेही फुजीला पुढे जाण्यापासून थांबवण्याऐवजी बहुधा उड्डाणपूल गाठला होता. आता मात्र फुजी पूर्णपणे संकटात होती. जरासा आवाज झाला असता, थोडीशी चूक झाली असती तर फूजीची हाडेही कुणाला सापडली नसती. 

सुदैवाने कोणत्याही श्वानाने फुजीची दखल घेतली नाही. थोड्या वेळात मात्र आता पुढे जाणारी पायवाटही संपली. आता परत त्याच श्वानपथकाच्या समोरून परत जवळपास अर्धा किमी मागे जावे लागणार होते. इतक्यात उड्डाणपुलाखालून उजवीकडे एक पायवाट दिसली, तेथून उड्डाणपुलाला काटकोनात जाणारा रस्ता दिसला. मात्र तो रस्ता काटकोनात जात असल्याने परत महामार्गाला लागणार नव्हता. इतक्यात उड्डाणपुलाला वळसा घालून पुढे जाणारी पायवाट फुजीला दिसली. फुजीने ती पायवाट गाठली. पुढे पुन्हा छोटा रस्ता उड्डाणपुलाच्या डावीकडून जाताना दिसला. त्यासरशी पुन्हा स्वार होत फुजीने टाच मारली. आणखी अर्ध्या पाऊण किमी अंतरावर उड्डाणपूल संपून फुजी जात असलेला रस्ता महामार्गाला लागत होता. तो रस्ता पुन्हा महामार्गाला लागत होता. तिथे उड्डाणपूल उतरून गौतम फुजीची वाट पाहत असलेला दिसला. हा जवळपास दीड किमीचा उड्डाणपूलशेजारील रस्ता पार करून पुन्हा गौतम दिसेपर्यंत मात्र फुजीची पाचावर धारण बसली होती.

मंगळवार, १० मार्च, २०२०

जय जय गरवी गुजराथ: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख ११


निधर्मी, भारतीय राष्ट्रीय सौर पौष ४, १९४१
ख्रिस्ती युरोपियन सौर २५ डिसेंम्बर २०१९


शालिवाहन शक १६४३ (ग्रेगोरीयन वर्ष १७२१) म्हणजे जवळपास ३०० वर्षांपूर्वी मुघलांना हुसकावून मराठा साम्राज्यामध्ये बडोदा सामील झाले. पिलाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे पाहिले अधिपती. ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात न राहता स्वायत्त राहिलेल्या बडोदा येथे गायकवाड घराण्याने राज्य केले. ह्या घराण्यातील १३ वे संस्थानिक प्रतापसिंह गायकवाड ह्यांच्या कारकिर्दीत बडोदा संस्थान भारत देशात विलीन झाले.

बडोदा येथे उदरभरण झाल्यावर सगळे सायकलस्वार पुढे कूच करण्यास सिद्ध झाले. आसाभाईंचे मित्र श्री गद्रे त्यांच्या अश्वशक्तीधारी स्वयंचलित दुचाकीवरून आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी पुढे झाले. सगळे सायकलस्वार त्यांच्यामागे रांगेत जात होते. बडोदा शहरातील वाहतूकीतून मार्ग काढत असता कोणताही स्वार रस्ता चुकणार नाही याची खात्री श्री गद्रे वेळोवेळी करत होते. अखेरीस शहरातील वर्दळीच्या वाहतुकीतून मार्ग काढून त्यांनी आम्हाला हमरस्ता गाठून दिला. त्यांचा निरोप घेऊन आम्ही वायव्य दिशा पकडली. थोड्याच अंतरावर कलती झालेली दिल्ली नजरेस पडली.



रस्ता सुंदर असला तरी मैलांच्या (खरतर किमीच्या) दगडांची ही अवस्था पाहवत नव्हती. मात्र तो कलता दगडही 'दिल्ली बहुत दूर है' ची आठवण करून देत होता. अजून अहमदाबाद ही एक दिवस दूर होते, म्हणा!








बडोद्याला ताजेतवाने झालेल्या सायकली मात्र त्याची फिकीर न करता वेगात पळत होत्या. साधारण तास दीड तासाने एक छोटासा थांबा घेतला. वातावरण खूपच छान होते. आणंद जवळ येईपर्यंत मात्र पुन्हा जठराग्नी जागृत होऊ लागला होता. त्यामुळे एका चौकात सगळ्या सायकली पुन्हा विसावल्या. शेजारीच एक थंड पेयाचे दुकान होते. जेवणासाठी न थांबता तेथेच जठराग्नीला आहुती देण्याचे ठरले. सायकली रांगेत उभ्या राहिल्यावर सगळे स्वारही थोडेसे आळसावले. तेथे गप्पाष्टक रंगत असतानाच कळले की त्या चौकात डावीकडे वळले तर साधारण १५-२० किमी वर सरदार वल्लभभाई पटलांचे घर आहे. ती संधी सोडायची नाही ह्यावर अस्मादिक, एकादशी आणि नयना आघारकर यांचे एकमत झाले. गौतमही यायला तयार होता. अय्यरकाका मात्र त्याच दुकानापाशी थांबणार होते. तर उर्वरित तिघांनी थेट आजच्या मुक्कामी जायचे ठरवले. तेथून पटेलांच्या घरी परत त्याच चौकात येऊन हॉटेलला जायला अंधार पडला असता. त्यामुळे सायकली तेथेच ठेवून जाऊन यायचे ठरले. दुकानदारानेही त्याच्या ओसरीमध्ये सायकली ठेवायला परवानगी दिलीच शिवाय त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही स्वतःहून स्वीकारली.

लगेचच त्या चौकातून पटेलांच्या घरी जाऊन परत त्याच चौकात आणून सोडण्याच्या बोलीवर एका रिक्षाची सोय केली. सौदा त्याला आणि आम्हालाही पटण्यासारखा झाला होता. त्वरा करत आम्ही निघालो, कारण परत आल्यानंतर पुढे गेलेल्या तिघांना गाठायचे होते.

रस्ता महामार्गापेक्षा थोडा अरुंद होता, रहदारी ही बऱ्यापैकी होती. मात्र थोड्या वेळातच आम्ही सरदार पटेलांच्या घरी पोहोचलो. एका छोट्याश्या गल्लीत पटलांचे घर आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी नेत्यांपैकी असलेल्या सरदार पटलांचे वास्तव्य असलेल्या घरी आपण आलो आहोत ही कल्पनाच सुखद होती. रस्त्यापासून चारपाच पायऱ्या चढून गेल्यावर घराचे आवार आहे. तेथे गेल्यावर स्वच्छ, मोकळे आंगण आपले स्वागत करते. डाव्या हाताला पटलांचे घर आहे. घरात प्रवेश करताना कोकणातील जुन्या घरांची आठवण येते. समोर छोटीशी ओसरी, त्यापुढे रांगेत दोन खोल्या. तसेच ह्या तीन खोल्यांशेजारी तश्याच तीन खोल्या. कोणताही दिखावा किंवा बडेजाव तिथे दिसत नव्हता. अतिशय साधी पण टापटीप राहणी तेथे नजरेस येत होती. इतर ठिकाणांप्रमाणे पर्यटकांची गर्दी तर नव्हतीच, किंबहुना आम्ही चार जण आणि तेथील व्यवस्थापक सदस्य वगळता इतर कोणीही तिथे नव्हते. त्यामुळे अगदी आरामात आम्ही तिथे वावरत होतो.








पटेलांच्या घरी शांतपणा अनुभवल्यावर मात्र आम्ही पुन्हा त्याच रिक्षाने फुजी आणि तिच्या मैत्रिणींना ठेवले होते त्या चौकात पोचलो. तिथे पोचताच लगेचच फुजीचा लगाम सोडला आणि टाच मारली. अय्यरकाका, नयना आघारकर आणि एकादशी ह्यांच्याबरोबर फुजीने थेट पिपलाग येथील हॉटेल राजस्थान गाठले.
आणंद आणि खेडा जिल्ह्यांच्या सीमेवरील पिपलाग गाव तसे छोटेसे आणि आटोपशीर आहे. लोकसंख्या केवळ चार आकडी... जेमतेम ४ ते ५ हजार.


पुढे गेलेले तीन सदस्य हॉटेल राजस्थान येथे पोहोचले होतेच. आसाभाईंचे दोन मित्र येथेही आमचे स्वागत करण्यास हजर होते. त्यांच्याच बरोबर चहापान करून आम्ही विश्रांती घेतली.

रात्रीचे जेवण त्याच हॉटेलमध्ये घेतले. तेथील कर्मचारी अतिशय अगत्याने, अदबीने सेवा देत होते. त्यांच्या मर्जीनुसार पदार्थ मागवायचे ठरले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या विनंतीला मान देत आम्ही डाल बाटी चुरमा मागवला. सर्व कर्मचारी आग्रहपूर्वक वाढत तर होतेच शिवाय ते पदार्थ कसे खावेत याचे मार्गदर्शनही करत होते. तुपाची धार मोह पाडत होती. मात्र ते जेवढे प्रेमाच्या ओलाव्याने आग्रह करत होते, तितकेच ते पदार्थ मात्र सुके वाटत होते. त्यामुळे कोणीही त्याची जबाबदारी घ्यायला तयार होईना. सगळेजण इतर पदार्थांवर ताव मारत असताना तो दाल बाटी चुरमा संपवण्याची सार्वजनिक जबाबदारी मात्र अस्मादिक आणि देवधरांना घ्यावी लागली.




सकाळी बडोदेकरांनी केलेले स्वागत असो की पिपलाग येथील हॉटेल राजस्थानमधील कर्मचारीवृंदाने केलेले आतिथ्य, गुजरातमधील जिव्हाळा आणि प्रेम आमची जिव्हा तर करत होतेच त्याबरोबर मनही तृप्त करत होते.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...