शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

मुक्काम विवेकानंद हाऊस: कोलकाता चेन्नई सायकल सफर


सुलुरपेट येथील आमचा मुक्काम अतिशय समाधानाचा होता. चेन्नई आता एका मुक्कामावरच होती. शेवटच्या दिवशी अंतर शक्यतो १०० किमी च्या आत ठेवायचा माझा मनसुबा साध्य झाला होता. त्यामुळेही मी निश्चिंत होतो. आम्ही नेहमीप्रमाणे प्रथम चहाची सोय पाहिली. अन्हिके उरकून आमच्या सायकली तयार केल्या. आम्ही केव्हाही निघालो तरी घड्याळबाबांनी ७.३० किंवा नंतरची वेळ दाखवण्याचे सातत्य आजही पाळले होते.

सायकल मोहिमेतील शेवटचा दिवस असला की माझा उत्साह कमी झालेला असतो. खरतर आळस नसतो पण आज मोहीम पूर्ण होणार ह्याचा आनंद असला तरी ती संपणार ह्यामुळे थोडा निरुत्साहही वाटत असतो. पेडल मारण्यात जोश नसतो...तर ते यांत्रिकपणे मारले जाते. आजही थोडे तसेच झाले. थोड्याशा कमी वेगातच सुरुवात केली. अंतर फार नव्हतेच. शिवाय चेन्नईमधील मुक्कामाची सोय झालेली होती. तिघांनीही सुरुवात संथपणे केली मात्र थोड्या वेळातच फुजीने लय साधली. संजय आणि आनंद मागे पडले. मी थोडा पुढे होतो. इतक्यात काही मुलांनी माझ्याकडे पाहत मला मी कोठून आलो आहे ह्याची चौकशी केली. मी 'मुंबईहून आलो आहे ' असे म्हणताच त्यांनी विचारले 'मुंबई पुणे का?' मी हो म्हणताच ती मुले जोरात ओरडली 'शिवाजीमहाराजकी....'. मी तेवढ्याच जोरात ' जय ' ओरडत असताना त्या मुलांनी आणि मी उजवा हात झटकन वर केला. महाराजांचे नाव ऐकताच त्या मुलांना आणि मलाही उत्साह वाटला.

रस्त्याच्या डाव्या कडेला एक खोपट होते..तिथे नक्की काय खायला मिळेल अशी शंका वाटत होती. फारशी स्वच्छता नसली तरी आसपास इतर काही पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे आनंद आणि संजय येईपर्यंत मी तिथेच वाट पहायची ठरवले. वाट पाहता पाहता माझी ऑर्डर दिली. नाष्टा मात्र अपेक्षेपेक्षा उत्तम होता. संजय आणि आनंदही लवकरच आले. भरपेट नाष्टा करून आम्ही पुन्हा टाच मारली. आता आम्ही तिघेही एकत्रच जात होतो. आंध्रप्रदेशातील रुंद रुंद महामार्ग संपून रस्ताही थोडा अरुंद झाला होता. शिवाय रहदारीही जाणवत होती. चेन्नई फार लांब नव्हते. वाटेतील लोक आमची चौकशी करत होते. आम्हाला शुभेच्छा देत होते, अभिनंदनही करत होते. चेन्नई अगोदर जेवणासाठी एक थांबा घेतला. तिथे फक्त भात मिळू शकत होता. रोटी, चपाती नव्हती. मग मी चिकन वरच जोर दिला. नुसता भात खाऊन पोट भरल्याचे समाधान झाले नसतेच. 

नंतर थोड्या वेळातच चेन्नई गाठली. विवेकानंद हाऊसची नेटकी इमारत दिसताच आम्ही खुष झालो. येथील आवारात सायकली लावून आम्ही चौकशी करण्यासाठी गेलो. 





मात्र अजून मोहीम संपन्न झाली नव्हती. तिथे कार्यालयामध्ये मी ज्या स्वामीजींच्या संपर्कात होतो त्यांची चौकशी केली. तेव्हा ते इथे नसल्याचे समजले. तसेच आमची राहण्याची कोणतीही व्यवस्था इथे झाली नसल्याचे सांगितले गेले. त्याबरोबर मी स्वामीजींचा मला आलेला मेल दाखवला. त्यावर येथील इसमाने सांगितले मेलमध्ये तुमच्या मोहिमेची विवेकानंद हाऊस येथे सांगता करू शकता एवढीच परवानगी दिली आहे. राहण्याची परवानगी मेल मध्ये नाहीये. मीही थोडा गोंधळलो. अर्थात चेन्नईमध्ये कुठेही राहण्याची सोय होऊ शकते हे माहित असल्याने मी निश्चिंत होतोच. मात्र मला राहण्याच्या सोयीचा उल्लेखही सापडला. त्याबरोबर त्या इसमाने सांगितले की विवेकानंद हाऊस येथे तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. इथे तशी काही व्यवस्था नाही. तुम्हाला मयलापोर येथील रामकृष्ण मठात जावे लागेल. तुमची राहण्याची व्यवस्था तिथे केली असणार. आम्ही लगेचच सायकलवर स्वार झालो. स्वामीजींना भेटायची उत्सुकता होती, तसेच थोडा आरामाही करायचा होता. 

वाटेत डाव्या बाजूला चेन्नई येथील विख्यात मरिना बीच पसरलेला होता. हा भारतातील सगळ्यात जास्त लांबीचा बीच आहे. साधारण तीन चार किमी अंतरावर असलेल्या रामकृष्ण मठात आम्ही शिरलो आणि स्वामी रघुनायकानंद ह्यांना भेटलो. त्याबरोबर त्यांना विलक्षण आनंद झाला. रामकृष्ण मठ येथे आमचे जंगी स्वागत करण्यात आले. तिथे उपस्थित असलेले प्रत्येक स्वामीजी इतके खूष होते की तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आमची ओळख करून देत होते.

रघुनायकानंद स्वामीजींनी आम्हाला सांगितले की आज शारदामातेची जयंती असल्याने आज रामकृष्ण मठ येथे उत्सव  आहे. त्यामुळे आमची आजची राहण्याची व्यवस्था रामकृष्ण मठात नव्हे तर विवेकानंद हाऊस येथेच होईल. त्याबरोबर मी त्यांना सांगितले की आम्हाला तेथूनच इथे पाठवले आहे. त्यावर ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुमची आजची व्यवस्था तिथे होईलच. शिवाय जर तुम्हाला पुढील दोन तीन दिवसही तिथे राहायचे असेल तरी तुम्ही तिथे राहू शकता आणि जर तुम्हाला इथे राहायचे असेल तर उद्या इथे येऊ शकता.


आज शारदामातेची जयंती असणार असल्याचे मी मोहीम ठरवली तेव्हाच मला माहित होते. मी रघुनायकानंद ह्यांना तसे सांगताच ते भलतेच खुष झाले. सगळ्याच स्वामीजींना आम्हाला भेटून खूप आनंद झाला होता. तेथील अध्यक्षांना भेटताच त्यांनीही अगदी मनमोकळेपणे आमचे स्वागत केले.

खरोखर सर्वच स्वामींनी आम्हाला अक्षरशः डोक्यावर ठेवण्याचे तेवढे बाकी ठेवले होते. तिथे माझी एक छोटी मुलाखतही चित्रबद्ध झाली. ह्याशिवाय प्रत्येक स्वामी आणि कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मुलाखत घेतल्या त्या वेगळ्याच. इतके कौतुक पाहून आम्हाला फार संकोच वाटत होता. खरतर शारदमातेचा उत्सवाचा दिवस, त्यामुळे ते सगळे कार्यक्रमाच्या गडबडीत होते. आमची राहण्याची व्यवस्था विवेकानंद हाऊस मध्ये होती. आम्ही जायला निघालो, दरवाजापर्यंत गेलो की परत कोणीतरी बोलावत होते. 

आम्हाला समोसा, चहा घ्यायला लावला. आम्ही खूप संकोचलो होतो. पण त्यांना नकारही धड देता येत नव्हता. नाष्टा चहा करून आम्ही पुन्हा विवेकानंद हाऊस येथे जायला निघालो. मात्र मठातील स्वामींनी आम्हाला आग्रह केला की उद्या नक्की मठात राहायला या. दोन्ही ठिकाणच्या व्यवस्था त्यांनीच केल्या होत्या. निवड आम्ही करायची होती. पुन्हा एकदा विवेकानंद हाऊसला पोचताच आमचे तिथेही स्वागत झाले. कार्यालयाशेजारी चार पाच खोल्यांची बैठी इमारत होती. तिथे आमची राहायची व्यवस्था झाली. 

                                           

रामकृष्ण मठ आणि विवेकानंद हाऊस दोन्ही ठिकाणी आम्हाला रात्रीच्या जेवणाचेही आमंत्रण आम्हाला दिले होते. माझा चेन्नई स्थित सायकलमित्र रवी ह्याचे आम्हाला जेवणाचे खूप आधीपासूनच मिळाले होते. त्यामुळे आम्ही त्याचे निमंत्रण स्वीकारले होते.

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

चेन्नईच्या वेशीवर: कोलकाता चेन्नई सायकलसफर


Check out my ride on Strava: https://strava.app.link/nUgNGFIkUYb

क्रांथी सरांनी कावली येथे आमची उत्तम सोय करून दिली होती. त्यामुळे काल रात्री छान आराम मिळाला होता. अर्थातच येथील हॉटेलमधून सकाळी निघताना  क्रांथी सरांना आम्ही निघत असल्याचा मेसेज केला. त्यावर त्यांचा पुढील प्रवासासाठी शुभेच्छा आणि कोणतीही मदत लागल्यास निसंकोच कळवा असा संदेश त्वरित आला. आम्हीही निर्धास्त मनाने सायकलावयाला सुरुवात केली. आजही आम्ही साडेसात नंतरच निघालो होतो. तिघेही एकामागोमाग जात होतो. शहराबाहेर पडत असताना साधारण चार किमी अंतर पार केले अन् .... हायवेला लागलो न लागलो तोच आनंदची सायकल परत पंक्चर झाली. काल संध्याकाळी खरतर त्याने ट्यूब बदलली होती. त्यानंतर सायकल चालवली नव्हतीच. मात्र बहुधा त्याने टायर तपासला नव्हता. कावली येथील सायकल दुरुस्ती दुकान ९ व्हायच्या आधी उघडत नाही ही बहुमूल्य माहिती आम्हाला आधीच मिळाली होती. चर्चा चर्वण करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. आम्ही स्वतः पंक्चर काढायचे ठरवले तर पाण्यात ट्यूब तपासल्याशिवाय आमच्या कोणालाही पंक्चर शोधता येत नव्हते. जवळपास पाणीही नव्हते आणि पाण्यामध्ये ट्यूब बुडवून पहायला कोणते भांडेही आमच्याकडे नव्हते.

अखेर आम्ही हायवेला उभे राहून एखादे वाहन शोधून त्यामध्ये सायकली टाकून पुढील गावात जायचे ठरवले. बराच वेळ वाहन मिळेना आणि भेटणारे लोक सांगत होते की पुढे जवळपास सायकलचे दुकान नाही. अर्धा पाऊण तास झाल्यावर आनंदने क्रांथी सरांना फोन लावला. इतक्यात मी त्यांचा मला आलेला reply पाहिला की काही लागले तर फोन करा. त्यांना कशी telepathi लागली की आम्हाला मदत लागेल?

आनंदने त्यांना कळवल्यावर त्यांनी लगेचच त्यांचा canter पाठवला. Canter मध्ये बसल्याबसल्या सायकलींचे जवळपासचे दुकान शोधू लागलो. त्यात नेल्लोर येथील Elite cycle ह्या दुकानाची माहिती विश्वासार्ह वाटली. आता तिन्ही सायकली आणि त्यांच्या पाठीवरचे सामान लादून canter ने थेट नेल्लोर मधील Elite cycle गाठले.  क्रांथी सरांनी काल राहायची, जेवायची सोय केली होतीच. आज वाहनाचा खर्चही घेतला नाही.वाहनचालकाला त्याचे मानधन विचारले तर तोही काही घेईना. क्रांती सरांचे आम्ही खास पाहुणे होतो. 

Elite cycle हे दुकान चौकालगत होते. आमच्या सायकली दुकानासमोर लावून आम्ही दुकानात शिरलो. दुकानात काउंटरवर बसलेल्या माणसाने आणि कर्मचाऱ्याने आमची चौकशी केली. आमच्या सायकलवर लादलेले सामान त्यांनी पाहिले होतेच. आम्ही आमच्या मोहिमेविषयी माहिती देत आनंदच्या सायकलचे पंक्चर काढून देण्याची विनंती केली. त्यांचे दुकान खरेतर अजून सुरू होतेच होते. आम्हाला भूकही लागली होती. आनंद तिथे दुकानदाराशी बोलत असताना मी आणि संजय जवळपास हॉटेल शोधू लागलो. तिथे नाष्टा आणि कॉफी उत्तम होती. आमचा नाष्टा होईपर्यंत Elite cycle मध्ये आनंदच्या सायकलचे पंक्चर काढले गेले. तिथे कळले की कालच्याच जागी परत पंक्चर होते. आनंदने काल ट्यूब बदलली तरी टायर तपासला नव्हता त्यामुळे तेथील खिळ्याने त्याचे काम परफेक्ट केले होते. त्यांना आम्ही दुरुस्तीचे पैसे विचारले. काउंटर असलेला माणूस दुकानाचा मालक नव्हता तर तो तिथे मॅनेजर पदावर काम करत होता. त्यांचे नाव होते सुब्रमण्यम. दुकानातील mechanic अनिल आणि मॅनेजर सुब्रमण्यम दुरुस्तीचे पैसेच घेईनात. उलट सुब्रमण्यम ह्यांनी आम्हालाच चहा कॉफी पाजली. ते म्हणाले की दुकान मालकाची strict instruction आहे की रायडर्स कडून पैसे घ्यायचे नाहीत. सुब्रमण्यम ह्यांनी स्वतःचा फोटोही काढू द्यायला नकार दिला. ते फारच नम्रपणे वागत होते. दुरुस्ती होऊन निघेपर्यंत १२ वाजले होते. 



टेम्पोच्या वेगात आम्ही आत्तापर्यंत गती गाठली होती. ५० किमी अंतर कमी झाले होते. आम्ही आज नायडुपेटा इथे मुक्काम करणार होतो. पण टेम्पोमुळे आम्ही आजचे काही अंतर वेगाने कापले होते. त्यामुळे मी नायडूपेटा इथे मुक्काम करायचा की पुढे जाऊन सुलुरूपेटा इथे मुक्काम करायचा हा किडा संजय आणि आनंद ह्यांच्या मनात सोडून तो निर्णय त्या दोघांवर सोडला. मनातल्या मनात सुलुरूपेटा त्यांनी येथे पोचण्यासाठी तयार व्हावे ह्यासाठी दोघांना सूचक वाक्ये टाकत होतो... उद्याचा प्रवास कमी होईल, सुलुरूपेटा इथे बर्ड sanctury आहे... अशी विधाने टाकत होतो.

नेल्लोर येथे थोड्या उशिराने नाष्टा झाला होता. साधारण ३ वाजता कुठे जेवायला मिळते का ते पाहू लागलो. वाटेत हॉटेल दिसत नव्हतेच. इतक्यात तिरुमाला डेअरी चे विक्री केंद्र दिसले. म्हैसूर पाक, गुलाबजाम आणि बदाम मिल्क वर जेवण भागवले. आज आनंद आणि संजय ह्यांना मी सांगितले होते की आजचे गंतव्यस्थान , वेग ह्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा. 




दोघेही आज फार ब्रेक घेत नव्हते. नायडूपेटाच्या वेशीवर मी दोघांना विचारले की इथे थांबायचे की आणखी २७ किमी पुढे सुलुरूपेटा इथे जायचे. दोघांनी सुलुरूपेटच्या पारड्यात मत टाकले आणि मी निःश्वास सोडला. चेन्नईचे अंतर कमी होत होते. आम्हाला अखेरच्या दिवशी १०० पेक्षा कमी अंतर सायकलवायला लागले असते. वाटेत अनेकजणांना आमच्याबरोबर फोटो हवे होते आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर फोटो हवे होते. 

                     राजू (आनंद) आणि राजुपालेम


 १२२- १११-१०० किमी ... चेन्नई जवळ येत होती. सूर्य आणखी वेगाने अस्ताला जात होता. आज मात्र मी आज अंधाराची तमा बाळगणार नव्हतो. उद्याचे अंतर कमी होत आहे. ह्याचे समाधान जास्त होते कारण उद्या विवेकानंद हाऊसला वेळेवर पोचायला हवे होते. चेन्नई मधील सायकल मित्र रवी रोज चौकशी करत होता. त्यालाही भेटायची घाई झाली होती. कदाचित चेन्नईमधील सायकल क्लबचे सदस्यही भेटू शकणार होते.


अंधार होत असताना आंध्र पोलिसांकडून राहण्याच्या व्यवस्थेबद्दल काही कळत नव्हते. वाटेत एक फॉरेस्ट ऑफिसर भेटला. त्यानेही जवळपास काही व्यवस्था नसल्याचे सांगितले. किमान १५ किमी गेल्यावर सुलुरुपेट इथेच व्यवस्था होईल असे त्यानेही सांगितले. साधारण ७.१५ वाजता आम्ही सुलुरुपेट इथे पोचलो. आनंदने आंध्र पोलिस खात्याकडून काही सोय झाली आहे किंवा होते आहे का ह्याचा अंदाज घेतला. मात्र आंध्र पोलिसांकडून आमच्या राहण्याची सोय होऊ शकली नव्हती. आम्ही तेथील मुख्य चौकात उभे राहून लॉज शोधत होतो. ह्या चौकात डावीकडे वळणारा रस्ता श्रीहरिकोटा येथे जातो. मोहीम आखत असताना मी आजचा चेन्नई आधीचा मुक्काम श्रीहरिकोटा अथवा सुलुरपेट येथे करून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरीक्ष केंद्राला भेट देण्याचे ठरवले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे अंतरीक्ष केंद्राला भेट देण्याचा विचार आम्ही रद्द केला होता.

आम्ही त्या चौकात थांबलो असता बरेच लोक आमची चौकशी करत होते, आमच्याबरोबर फोटो काढून घेत होते. त्यातील एकाने विचारले तुम्ही सायकलने का फिरत आहात. मी त्याला म्हटले मला भारत पाहायचा आहे, लोकांना भेटायचे आहे. मी सायकलने आलो म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत आहात, कार मधून आलो असतो तर बोलला असतात का? तो म्हणाला मला तुमच्याबद्दल खूप आदर वाटत आहे. त्याने लॉजही सुचवला. आम्ही तिथे गेलो. मुन्नाभाई धाब्याशेजारी लॉज असल्याचे तो म्हणाला. तो धाबा वाटेत हायवेला पाहिला होता. पण तेव्हा तिथे लॉज आहे हे कळले नव्हते. परत धाब्यावर गेलो. तिथे विचारले तर शेजारच्या इमारतीमध्ये असलेला श्रीराम रेसिडेन्सी लॉज समजला. इथे रिसेप्शनवर एक बाई होत्या. त्यांनी लगेचच रूम दिली. जेवण अर्थातच मुन्नाभाईंकडे झाले. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत असताना काही मुलांनी गावात आलेले तीन सायकलपटू आम्हीच असल्याचे ओळखले. त्यांनाही आमच्याबरोबर फोटो काढायचे होते.





गाव लहान होते. आम्ही शोधलेला लॉज महामार्गालगत होता. तिथे वस्तीही कमी होती. त्यामुळे आमची प्रसिद्धी लगेच पसरली होती. आमच्या मोहिमेतील आंध्र प्रदेशातील हा शेवटचा मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी आम्ही तामिळनाडूमध्ये प्रवेश करणार होतो जो मोहिमेचा शेवटचा दिवस असणार होता. चेन्नई आता फक्त ८० किमी अंतरावर होती... 

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...