शनिवार, ३० जून, २०१८

अवचित भेट

शनिवार...कोणतेही नवीन काम सुरु करायचे असेल तर माझ्यासाठी हा सर्वात उत्तम वार. कदाचित त्यामुळेच आज सकाळी प्रसन्न वाटत होते. 

श्विनने आज ऑफिसकडे कूच केले तेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला होता. डोंबिवली पश्चिमेकडून ठाकुर्लीजवळील उड्डाणपुलावर जात असताना एकदम एक हाक ऐकू आली. खरतर घरातून निघताना थोडा उशीर झाला होता आणि उड्डाणपुलावर पोचत असताना श्विनला लय सापडली होती. त्यामुळे तिथे थांबण्याचा श्विनचा कोणताही विचार नव्हता. ज्या कोणी हाक मारली त्याला हात हलवत अभिवादन करून पुढे निघायचे असा विचार करत मी मान वळवली. तर मागे एका टेम्पोतून एकजण मला हाक मारत असल्याचे जाणवले. त्या टेम्पोच्या चालकाच्या खिडकीतून एकजण बाहेर डोकावत होता. त्याला पाहताच श्विनचा पुढे जायचा विचार ताबडतोब बारगळला, आणि श्विन आपोआपच मागे वळली. तो चेहरा होता अविनाश हरडचा.

अविनाश हरड हा कल्याण मुरबाड रस्त्यावरील रायते या छोट्याश्या गावातील साधा सरळ युवक. मात्र त्याचे कार्यबाहुल्य मात्र अतुलनीय. Save our sahyadri ह्या सायकलिंग मोहिमेतील नवापूर ते महाबळेश्वर ७०० किमी हुन अधिक अश्या उत्तर मार्गातील अविनाश हा प्रमुख आधारस्तंभ. 'अश्वमेध प्रतिष्ठान' ची धुरा सांभाळणाऱ्या अविनाशने जवळपासच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध व्हावीत यासाठी एक पुस्तकालयसुद्धा स्वतःच्या घरी उभे केले आहे. त्याचबरोबर सह्याद्रीच्या खजिन्यातून जमा केलेल्या वैविध्यपूर्ण वस्तूंचे संग्रहालय अविनाशने स्वतःच्या घरीच उभे केले होते. त्या मध्ये सातत्याने भर पडत असल्याने मोठ्या जागेची आवश्यकता भासू लागली, तेव्हा त्याने टिटवाळा येथील प्रशस्त जागेत हे संग्रहालय हलवण्याचे ठरवले. हे संग्रहालय नवीन वास्तूत उदघाटनेच्या प्रतीक्षेत आहे. ह्या संग्रहालयासाठीच काही सामान आणण्यासाठी अविनाश आला होता. अविनाशने मनाच्या कोपऱ्यात अढळ स्थान प्राप्त केले असल्याने त्याला बघितल्यावर त्याच्याशी गप्पा मारल्याशिवाय पुढे जाणे शक्यच नव्हते. त्याच्याशी गप्पा मारायला कितीही वेळ हा अपुराच! मात्र ऑफीसला जायचे भान असल्याने थोड्याच वेळात श्विन पुढे निघाली. खरोखरच आजचा दिवस भाग्याचा होता, याचा हा संकेतच होता.

श्विन पुढे जात असताना ९० फुटी रस्ता संपताना DCC चा विकास नागदा भेटला. मात्र वेळ वाचवायचा असल्याने त्याला केवळ अभिवादन करून श्विन पुढे निघाली. पुढे दुर्गाडी पुलावर सर्व अश्वशक्तीधारी वाहने कुर्मगतीने जात होती. दुर्गाडी येथील चौकात उभ्या असलेल्या अश्वारूढ शिवाजीमहाराजांच्या साक्षीने गनीमी कावा वापरत श्विनने सर्व अश्वशक्तीधारी वाहनांना मागे टाकले. कोनगाव ते गोवेगाव दरम्यान परिस्थिती तशीच होती. शिवाय एकामागोमाग एक अवतरलेल्या खड्यांच्या मालिकेमुळे रस्त्याला डावी बाजूच शिल्लक नव्हती. श्विनने डावीउजवी आघाडी बदलत बदलत इथेही बाजी मारली. 

राजनोली पार करून श्विन नाशिक ठाणे महामार्गागाला लागताच मी ठाण्याच्या क्षितीजाकडे पाहिले. इथून १६ किमी अंतरावर असलेल्या ठाणे येथील क्षितिज स्वच्छ असले तरी वाटेत काळ्या ढगांचा एक पट्टा दिसत होता. त्यावरून मानकोली येथे तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज श्विनला आला. मात्र तरीही लोढा साईमंदिरापुढील उताराचा फायदा घेत त्या तुरळक सरींना तोंड देण्याचे ठरवत श्विन पुढे निघाली. सुदैवाने श्विनचा अंदाज आजही बरोबर ठरला. खरेतर ओवळी गावाकडे जाणारा रस्ता पार करेपर्यंत सूर्य अस्तित्व दाखवू लागला होता. मात्र मानकोली येथे आकाशात आलेल्या ढगांनी सूर्य झाकोळला गेला. किंबहुना आकाशातील काळे ढग पाऊस पाडण्यासाठी न येता सूर्यापासून संरक्षण करण्यासाठीच अवतरले होते. श्विनने त्या छत्राखाली मार्गक्रमण सुरु ठेवले. 
ठाणे जवळ येताच मात्र सूर्याने पुन्हा सुटका करून घेतली होती. TJSB HOUSE आता काही अंतरावरच असल्याने आता श्विनला सूर्याच्या प्रखरतेची चिंता नव्हती. त्यामुळे माजीवाडा/ कापूरबावडी येथील उड्डाणपूल आणि नंतर व्हिव्हियाना मॉल येथील उड्डाणपुलावर चढाई करत श्विनने तीन हात नाका गाठला. 
TJSB HOUSE गाठले तेव्हाही श्विनचा उत्साह कायम होता. कदाचित यामागे उत्साही अविनाशची झालेली अवचित भेट हेच कारण असावे.

बुधवार, २७ जून, २०१८

To be or not to be

'To be or not to be' is the question. 'Cycle2work' or 'no cycle2work' हे द्वंद्व मनात अनेक दिवस चालू होतं. Cycle2work म्हणजे उत्साहपूर्ण जीवन आणि no cycle2work म्हणजे आळसयुक्त जीवन हि संकल्पना मनात निश्चित होती.

शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की मी cycle2work बंद करतो. पुन्हा शाळा सुरु झाल्या की पुन्हा cycle2work सुरु करतो. मात्र ती सुरुवात होऊन यावर्षी पुन्हा cycle2work ला लगेच ब्रेक लागला होता.

Cycle2work, palva cycle2work, nisarg cycle mitra, DCC या समाजमाध्यमांवरील गटांमध्ये सायकलिंग संबंधित येणारे रोजचे संदेश अस्वस्थ करत होते.

माझे आळशी मन cycle2work सुरु करताना निरनिराळी कारणं पुढे करत होतं. Cycle2work ची तयारी करूनही श्विनचे कुलूप काही निघत नव्हते. मात्र TJSB मधील अरविंद जोशी, प्रशांत इंगवले, चिन्मय जोशी, किशोर कुवळेकर, शेखर बापट हे आणि इतर मित्र तसेच जितेंद्र वैद्य सारखे सायकलमित्र वेळोवेळी ऑफिसला आज सायकलने आलास का , याची चौकशी करत होते.

माझे आळशी मन आणि कृतिशील मन यातील द्वंद्व आज सकाळीही सुरु होते. जवळपास दोन आठवडे आळशी मनाचा विजय होत मी ट्रेनने ऑफिसला येत होतो. ऑफिसला आल्यावर मात्र श्विनला का आणले नाही याविषयी मन खट्टू होत होते. आजही दोन्ही मनांचे जोरदार द्वंद्व सुरु झाले. आज कोणाचा विजय होणार, कोणता निर्णय होणार हे मला शेवटपर्यंत कळत नव्हते. कृतिशील मनाचे ऐकून मी cycle2work साठी तयार होत होतो. आळशी मनाचे पारडे कमी होऊ लागले तसे त्याने अखेरचा उपाय म्हणून घड्याळबाबांकडे बोट दाखवले. पण कृतिशील मनाने ते मनावर न घेता विजय मिळवला. अखेरीस मी श्विनला बंधमुक्त केले आणि आमची ऑफिसकडे दौड सुरु झाली.

जेष्ठ पौर्णिमेला आळशी मनावर कृतिशील मनाने विजय मिळवला होता. बऱ्याच दिवसांनी एका जागी उभी राहिल्याने श्विनलाही आळसावल्यासारखे झाले होते. श्विन आणि मी एकमेकांचा अंदाज घेत पुढे सरकत होतो. ठाकुर्ली येथील रेल्वेवरून जाणारा उड्डाणपूल नव्यानेच सुरु झाल्याने तेथून जाताना श्विन खुश होती. मर्यादित वेगाने ९० फुटी रस्त्यामार्गे श्विनने दुर्गाडी किल्ला गाठला. शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुजरा करत श्विनने दुर्गाडी पूलाच्या दिशेने वळण घेतले. तेथे मात्र अश्वशक्तीधारी वाहनांची भाऊगर्दी झालेली दिसत होती. महाराजांचाच गनिमी कावा उपयोगात आणून श्विनने ती कोंडी सहजरीत्या फोडली आणि कोनगाव गाठले.

कोनगावात रस्त्याची दैना उडालेली दिसत होती. सर्व वाहने जलयुक्त  खड्डे (की शिवार?) टाळत सावधतेने पुढे सरकत असल्याने इथेही रेंगाळत होती. श्विनने वेग कमी करत आणि अंदाज घेत सरळ त्या जलयुक्त खड्डयांमधून धाव घेत पुन्हा सर्व अश्वशक्तीधारी वाहनांना मागे टाकले. कोनगाव मागे पडल्यावर मात्र मार्ग निर्धोक होता. नाशिक ठाणे रस्त्याला लागताच मी ठाण्याच्या क्षितिजाकडे नजर टाकली. तेथून ठाणे जवळपास १६ किमी अंतरावर होते. गेल्या वर्षीचा अनुभव जमेस धरता आणि क्षितिजावरील दृश्य पाहता ठाण्यापर्यंत पावसाची शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे मी निर्धास्त झालो. मानकोलीनंतर थोडा शिडकावा होऊ लागताच मी पुन्हा क्षितीजाकडे पाहिले. ठाण्याच्या दिशेकडून वारा येत होता. याचा अंदाज घेत पावसाचा जोर वाढणार नाही हे स्पष्ट होत होते.
त्यामुळे येणारे दोन चार शिंतोडे अंगावर घेत श्विनने प्रवास सुरूच ठेवला. पुढे डाव्या बाजूला मुंब्रा येथील डोंगररांगा हिरवा रंगात रंगल्या होत्या. ते दृश्य मन मोहून टाकत होते. त्याबरोबर श्विनचा उत्साहही वाढत होता.
निसर्गाची उधळण मनात साठवत ठाणे कधी गाठले हे कळलेही नाही. ऑफिसला पोचल्यावर मात्र कृतिशील मनाने मिळवलेल्या विजयामुळे आज बऱ्याच दिवसांनी cycle2work करता आले याचे समाधान लाभले होते.

रविवार, १७ जून, २०१८

सांग सांग भोलानाथ

'सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?' या गाण्याबरोबरच लहानपणापासूनच पावसाशी आपले घट्ट नाते जडले जाते. आबालवृद्ध ज्या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतात तो पाऊस मात्र सुरुवातीला वर्दी देऊन यावर्षीही दडी मारून बसला होता. त्याची चाहूल लागल्याने काल पहिली पावसाळी सायकल सहल ठरवली खरी. पण कालचा दिवस आमच्याशी लपंडाव खेळून आम्हाला त्याने कोरडेच ठेवले.
आज श्विन आणि स्कॉट थोड्या उशिरानेच भ्रमंतीला निघाले तेव्हा 'नभ मेघांनी आक्रमिले' अशी परिस्थिती होती. नेवाळी फाटा येथे जाऊन पावसाचा अंदाज घेत पुढील निर्णय घेण्याचे ठरवत दोघांनी मार्गक्रमण सुरु केले. नेहमीप्रमाणे डोंबिवली शहरातून बाहेर पडेपर्यंत श्विन आणि स्कॉट संथ गतीने जात होते. कल्याण शिळ रस्त्याला लागताच वेग वाढला. अजूनपर्यंत ढगांचे छत्र डोक्यावर असले तरी पावसाचा मात्र पत्ता नव्हता. बदलापूर पाइपलाइन रस्त्यामार्गे तळोजा फाटा गाठला तेथे अजित मोडक भेटला. तो ऑफिसला जाताना तेथे ज्या अमृतपानकेंद्रामध्ये (शुद्ध मराठीत चहाची टपरी) जातो ते मात्र आज बंद होते. थोडावेळ गप्पा मारून तो त्याच्या ऑफिसला निघाला. मागोमाग श्विन आणि स्कॉटही नेवाळी फाट्याच्या दिशेने निघाले. मात्र आता ढगांची झालर दूर करून सूर्य त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागला होता. नेवाळी फाटा येथे पोचत असताना श्विन आणि स्कॉटने तेथे चहा घेऊन परत फिरायचे ठरवले. 
श्विन आणि स्कॉट नेवाळी फाटा येथील अमृतपानकेंद्रापाशी थांबत असताना तेथे अंबरनाथ येथील अनुपमा उनकुले आणि अपेक्षा पटेल यांची भेट झाली. त्या दोघीही मलंगगडाकडे जाऊन आल्या होत्या. अनुपमा जवळपास ३ महिन्यांनी सायकलजगतात परत आल्यामुळे चांगलीच खुश होती. पावसाळी सहली आणि जवळपासची ठिकाणे याबद्दल अनुपमा भरभरून बोलत होती. भटक्या खेडवाला म्हणजे विनायक वैद्य कोकणात अनुभवत असलेल्या पावसाळी गंमतीची चर्चा होताच आम्ही सगळेजण मनाने खेडला पोचलो. या पावसात खेडला जायचा प्लॅनही ठरू लागला.  आमची चर्चा ऐकण्याचा मोह न आवरल्याने पाऊसही अवतरला. त्याबरोबर आम्ही मलंगगडाच्या दिशेने जायचे ठरवले. खरतर घड्याळबाबा आम्हाला परत फिरायचा आदेश देत होते. 
अनुपमा आणि अपेक्षा अंबरनाथ वळत असताना श्विन आणि स्कॉटने मलंगगडाकडे जाणारा रस्ता पकडला. अर्थात मलंगगडापर्यंत न जाता वाटेत खरड येथील गावदेवी मंदिरापर्यंत जाण्याचे ठरवले होते. पाऊसही आता आम्हाला साथ करत होता. त्यामुळे आमचा उत्साह वाढला होता. नेवाळी गाव, मांगरुळ पार केल्यावर तर पाऊस चांगलाच रंगात आला. नेवाळीहून मलंग गडाकडे जाताना खरड येथील गावदेवी मंदिर हे मुख्य रस्त्यापासून उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला वळल्यावर थोडा रस्ता काँक्रिटचा असून पुढे मात्र मातीचा रस्ता आहे. मातीच्या रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे श्विन आणि स्कॉट सावधतेने जात होते. जेमतेम ५-६ फूट रुंद असलेला हा रस्ता निसर्गसंपन्न आहे. आम्ही देवळाच्या प्रांगणात प्रवेश करेपर्यंत पावसानेही चांगलाच जोर पकडला होता. श्विन आणि स्कॉटला एका पत्र्याच्या शेडखाली उभे करत आम्ही गावदेवी आणि महादेवाचे दर्शन घेतले. एव्हाना पावसाने सातवा सूर लावला होता. डोळ्यांच्या पापण्यांवरचे पाणीही झटकन कठीण झाले होते. पावसामध्ये मनसोक्त भिजण्याची संधी मिळाल्यामुळे स्कॉट आणि श्विन खुश झाले होते. पावसाच्या ह्या मुसळधार सरींचा आनंद घेत परत फिरण्याचे श्विन आणि स्कॉटने ठरवले. देवळाच्या प्रांगणातून आम्ही निघालो तेव्हा पावसाचा जोर चांगलाच वाढला. मातीचा रस्ता आणि पुढील काँक्रिटचा रस्ता पार करेपर्यंत श्विन आणि स्कॉट अतिशय संथपणे पुढे सरकत होते. मलंगगडाकडून नेवाळीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागल्यावरही त्याच गतीने पुढे जावे लागणार होते. पावसाचा आमच्यावरील वर्षाव सुरूच होता. त्यामुळे आम्ही नेवाळी फाटा येथे पुन्हा चहा घेण्यासाठी थांबलो. 
तेथून परत निघणार तोच समोर गावातील ताजी भाजी घेण्याचा मोह झाला. बरोबरील सॅक भरेपर्यंत खरेदी करून स्कॉट आणि श्विन डोंबिवली च्या दिशेने निघाले. डोंबिवलीमध्ये प्रवेश करेपर्यंत पावसाचा जोरही ओसरला होता. मात्र तोपर्यंत मनसोक्तपणे भिजायला मिळाल्याने श्विन आणि स्कॉटही समाधानी झाले होते.

शनिवार, १६ जून, २०१८

वरूणराजांची हुलकावणी

सरोजिनी नायडू यांनी भारतीयत्वाबद्दल सांगितले आहे की विविधतेतील एकता म्हणजे भारतीयत्व.
भारतातील प्रमुख धर्म हिंदू आणि त्यानंतर मुस्लिम. ह्या दोन्ही धर्माची कालगणना हि चांद्र पद्धतीवर अवलंबून आहे. मात्र तरीही भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर हे भारतात अत्यल्प प्रमाणात असलेल्या ख्रिस्ती धर्माच्या प्रमाणे सौर कॅलेंडर आहे. याचे कारण सरोजिनी नायडू केलेल्या भारतीयत्वाच्या व्याख्येत दडले आहे. आज ईद-उल- फित्र म्हणजे मुस्लिम धर्मियांचा २९-३० दिवस चाललेला उपास सोडायचा दिवस. अर्थात रमदान या पवित्र महिन्याची अखेर तर मुस्लिम कॅलेण्डरचा दहावा महिना शव्वल याचा पहिला दिवस. बंधुत्व आणि जातीय सलोखा यांचा संदेश देणारा हा सण.

आज रमजान ईद च्या निमित्ताने मिळालेल्या सुट्टीचा उपयोग करायला श्विन आणि स्कॉट उत्सुक होतेच. सायकल जगतात नुकताच सामील झालेला तेजस जोशी गेले काही दिवस नियमाने १०-१५ किमी सायकलिंग करत होता. त्यामुळे श्विन स्कॉटने आज त्याला बि घडवायचे ठरवले. त्याला विचारताच तोही लगेच तयार झाला. त्याची फुजीही लांब पल्ल्यासाठी उत्सुक होती. स्कॉट आणि फुजी या दोघीही एकाच घराण्यातल्या म्हणजे कल्याणमधील साहिर शेख याच्या बाईकपोर्टमधीलच. फुजीचे पहिले अर्धशतक पळस्पे फाटा येथे जाऊन करायचे आम्ही ठरवले.
सूर्याचे उत्तरायण सुरु असल्याने अरुण लवकर हजर होत होता. आणि गेल्या आठवड्यात हूल देऊन गायब झालेला वरूण धुमाकूळ घालण्याचे काही चिन्ह नव्हते. श्विन, स्कॉट आणि फुजी पहाटे ६-६.१५ ला तयार झाले तेव्हा मात्र अरुणने ढगांची दुलई पांघरली होती. क्षितिजावर काळी झालर दिसत असली तरी अनुभवामुळे श्विन निर्धास्त होती. अर्थात शिळ फाट्याजवळच्या डोंगररांगा मेघांना अडवण्याची शक्यता होतीच.

तिघांनी संथगतीने सुरुवात करत भोपर मार्गे कल्याण शिळ रस्ता गाठला. अजूनही अरुणमहाराज ढगाआडच लपले होते. पालवा, खिडकाळी पार करत श्विनने कोकनरत्नकडे एक नजर टाकली. परत येताना इथला मुक्काम हा ठरलेलाच होता. मात्र पहाटे तिथे थांबण्याचे प्रयोजन नसल्याने तिघेही शिळ फाट्याला पोचले. फुजीने पहिला महत्वाचा टप्पा गाठल्याने तेथे जलपान करत क्षणभर विसावा घेतला आणि तिघांनी पुढे कूच केले. 
मानपाडा पासून पुढे सगळ्यात वरील गियर टाकत वेग वाढवणे शक्य होते तरी आजतरी श्विनने शिळ फाट्यापर्यंत तसे केले नव्हते. मात्र शिळ फाट्याचा टप्पा ओलांडताच श्विनने गियर आणि वेग वाढवला. फुजीचा वेग पाहता तिच्या रोजच्या सरावाची प्रचिती येत होती. अभ्राच्छादित नभाची साथ असल्याने श्विन स्कॉट आणि फुजीची दौड लयीत सुरु होती. अवघ्या सव्वादोन तासात पळस्पे फाटा हे गंतव्यस्थान गाठले तेव्हा मात्र वरूण राजांनी तेथे आधीच लावलेल्या हजेरीची कल्पना येत होती. 'दत्त' समोर असलेल्या गर्दीची जाणीव होताच श्विन, स्कॉट आणि फुजीने रस्त्याच्या डावीकडील क्षुधाशांतीकेंद्राकडे मोहरा वळवला. मिसळीची तहान इडली वड्यावर भागवावी लागणार होती. आम्ही इडली सांभारचा फडशा पडत असताना वरूणराजांनी जोरदार हजेरी लावली. जणू आम्ही भिजू नये यासाठीच तो थांबला होता. त्याचा रागरंग पाहता परत जाताना पावसाळी सफरीचा अनुभव मिळण्याची शक्यता स्पष्ट होती. मात्र आमचे उदरभरण होऊन आम्ही परतीसाठी सज्ज होईपर्यंत वरूणराजांनी रजा घेतली.
परत येताना आम्ही सज्ज होत असताना शेजारीच पांढरेशुभ्र आणि स्वच्छ कपडे घातलेला एक मुस्लिम युवक आमची आस्थेने चौकशी करत होता. त्याला इदच्या शुभेच्छा देऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 
एकंदर वातावरण चांगलेच उल्हसित करणारे होते. फुजीचे नवखेपण अजिबात जाणवत नव्हते. किंबहुना हायब्रीड श्रेणीतील असल्यामुळे फुजीला MTB श्रेणीतील श्विन आणि स्कॉटपेक्षा वेगही जास्त घेता येत होता. एव्हाना सूर्यदर्शन झाले नसले तरी रस्त्यावरील वर्दळ जाणवू लागली होती. कळंबोली सर्कल, तळोजा येथे आमची गती मंदावली. पुढे टोल नाक्यावर पाण्याची सोय करून आम्ही शिळ नाकामार्गे कोकणरत्न गाठले. श्विनही बऱ्याच दिवसांनी कोकणरत्न गेली. तेथे चहा कॉफी घेऊन आम्ही फोटोसेशन केले. पालवा, पुढील टोलनाका आणि काटई नाका येथे थोडीफार गर्दी होतीच. 
तेथे मार्ग काढून आम्ही भोपरमार्गे डोंबिवली मध्ये शिरलो. वरुणराजाने हजेरी लावूनही आम्ही मात्र कोरडे राहिलो होतो. आणि एकंदर ७२ किमीचा पल्ला पार करूनही पहिले अर्धशतक नोंदवणाऱ्या फुजीचा उत्साह कायमच होता. 

रविवार, ३ जून, २०१८

श्विनचा आनंदसोहळा - जागतिक सायकलदिन

समता, स्वातंत्र आणि विश्वबंधुता साधणारे सायकलखेरीज कोणते वाहन असू शकेल.  

दिवस सुरु होताच आपल्याला सेवा देणारे दुधवाले, पेपरवाले यांच्यापासून पंतप्रधानपदावरील व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच सायकलचा प्रवास सहज करता येण्याजोगा तर आहे, शिवाय परवडणाराही आहे. निसर्गाशी जवळीक साधताना आपल्या स्वतःशीही जवळीक साधण्याचे स्वातंत्र सायकलप्रवासा दरम्यान मिळते. तसेच सायकलप्रवासादरम्यान (आणि समाजमाध्यमांवरील सायकलसमूहा द्वारे) अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया पर्यंत मित्र परिवार जोडत विश्वबंधुता साधता येते. 


चित्रपटांद्वारे तर सायकलिंग करताना 'राम भजन कर लेना रे एकदिन जाना रे भाई' हे जीवनविषयक तत्वज्ञान सांगितले आहे. तसेच' मै चली मै चली देखो प्यार की गली' असा तारुण्याचा संदेशही सायकलिंगद्वारे दिला आहे.


सायकलने अनेकजणांना शिक्षणाच्या, क्रीडा क्षेत्राच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि अनेकांना आरोग्याची गुरुकिल्लीही मिळवून दिली आहे.

अश्या सायकलचा शोध लागून जवळपास २०० वर्षे पूर्ण होत असताना ह्या वाहनाचा सन्मान करण्यासाठी ३ जून हा जागतिक सायकल दिवस म्हणून नियोजित करण्यात आला.


मुंबईतील अनेक सायकल क्लब्स सायकलदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करत असताना डोंबिवली सायकल क्लबच्या (DCC) वर्तुळात मात्र शांतता होती. त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो. मात्र ३ जून हि तारीख जवळ येऊ लागताच हालचाली सुरु झाल्या आणि एक दोन दिवस आधी जागतिक सायकल दिनानिमित्त लोणाड येथे सायकलसफर काढायचे निश्चित झाले.


'No helmet no ride' हि सूचना ठळकपणे सांगितली गेली. पाहता पाहता एका दिवसात ५० हुन अधिक DCC सदस्य येणार हे निश्चित झाले. आमचे जेष्ठ सदस्य अय्यरकाका ह्यांना सायकल चालवता येणे शक्य नव्हते, मात्र येण्याची इच्छा होती. सायकलदिन साजरा करताना त्यांची उपस्थिती आमच्यासाठी महत्वाची होती. मग एक सपोर्ट वेहीकल घेऊन त्याबरोबर अय्यरकाका येतील असे ठरले.

अखेर तो दिवस उजाडला. खरतर मी ह्या दिवसाची इतकी वाट पाहत होतो की रात्री झोपही लागली नाही. श्विन जवळपास महिनाभराने रस्त्यात धावणार होती. पहाटे श्विनजवळ गेलो तर श्विनही ह्या दिवसासाठी उत्सुक होती. अर्थात आज तिच्यासाठी मानाचा दिवस होता! मी श्विनला तयार करून फडके रस्ता येथील गणेशमंदिराकडे निघालो. तिथे DCC चे अनेक सदस्य आधीपासूनच येऊन तयार होते. आम्ही ९० फुटी रस्त्याच्या दिशेने कूच केले. तेथील चौकात काहीजण सामील होणार असल्याने तेथे पहिला थांबा घेतला. पूर्वनिर्धारीत वेळ होताच सर्वजण एका रांगेत एकामागोमाग उभे राहिले आणि उपस्थित सदस्यसंख्येची मोजणी केली. जवळपास ४५ सदस्य हजर होते. 

अवघ्या चार वर्षांची असताना DCC परिवारात काही वर्षांपूर्वी सामील झालेल्या जिया पासून वयाने सर्वात जेष्ठ मात्र उत्साहाने तरुण असलेल्या अय्यरकाकांसह सगळे सदस्य आजच्या सायकलफेरीला उत्सुक होते.  

९० फुटी रस्ता, पत्री पूल पार करून आम्ही २ डझन गतिरोधक असलेल्या गोविंदवाडी बायपासकडे वळलो. ती अडथळ्यांची शर्यत पार करून दुर्गाडी किल्ला गाठला तोपर्यंत मात्र काहीजण पुढे मागे झाले होते. दुर्गाडी चौकातील महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्हाला प्रोत्साहन देत होता आणि शिस्तीचे महत्वही समजावत होता. आधारवाडी चौकात डावीकडे वळत आम्ही पडघ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. नदीवरील पूल पार करताच पुढील अरुंद रस्ता स्वागत करत होता. कालच पडलेल्या पावसामुळे वातावरण उल्हसित झाले होते. सर्वजण एका रांगेत पुढे जात बापगाव सोनाळे मार्गावरून लोणाड गावाकडे वळलो.

चौधरपाडा (ब्रह्मपुरी) या गावात एका मंदिरात एक पुरातन शिलालेख जतन करून ठेवला आहे. DCC सदस्यांनी तेथे विसावा घेत त्या शिलालेखाचे निरीक्षण केले. हा शिलालेख शिलाहार राजा द्वितीय केशीदेवाने एका ब्राह्मण कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी ११६१ च्या माघ कृष्ण चतुर्थी (२४ जानेवारी १२४०) रोजी बापगावातील मांजसपल्ली (वाडी) दान केल्याबद्दल आहे.

हा शिलालेख चौधरपाडा येथे १८८२ साली सापडला आहे.

तेथून सर्वजण १ ल्या शतकात बांधलेल्या शिवमंदिरापाशी पोचले. हे शिवमंदिर भग्नावस्थेत आहे. मात्र आतील गाभारा शाबूत असून येथे आजही पूजा अर्चा सुरु असते. मंदिराभोवतीचे इतर बांधकाम आज अस्तित्वात नसले तरी काही कोरीव काम त्या काळातील कलेची साक्ष देत आहे. गाभाऱ्यात शंकराची पिंड आणि नंदीचे दर्शन घेण्यास काही पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिरामागील तळे पूर्वी इथे असणाऱ्या निसर्गसंपन्नतेची कल्पना देते. DCC सदस्य इथे चांगलेच रमले होते. आपल्याला अजूनही लोणाड लेण्यांचे दर्शन घ्यायचे आहे याची आठवण करून द्यावी लागत होती.

मंदिराभोवती फोटोसेशन उरकत आम्ही लोणाड लेण्यांच्या दिशेने वळलो. मुख्य मार्गापासून हि लेणी थोडी उंचावर आहेत. मुख्य मार्ग सोडल्यावर लगेच पुढील चढाचा खरा अंदाज येत नाही. मात्र श्विनने या आधी लोणाड लेण्यांची सफर दोन तीन वेळा केली असल्याने श्विन त्या चढासाठी पूर्ण तयार होती. मुख्य मार्ग सोडतानाच श्विनने पुढील पहिला तर मागील दुसरा गियर टाकला. अनेक DCC सदस्य वाटेत अडखळत असताना श्विन मात्र आरामात पुढे सरकत होती. पूर्ण चढ चढून श्विन लेण्यांपाशी पोचली. मेघेश सुद्धा पूर्ण प्रयत्न करत होता. मात्र दुर्दैवाने चेनवर जास्त जोर आल्यामुळे त्याच्या सायकलने घात केला. अर्थात सायकलचे डॉक्टर दुर्गेश आणि डॉक्टर सुमित आमच्याबरोबर असल्याने मेघेशला चिंता नव्हती. सायकलच्या डॉक्टरप्रमाणेच माझे मधुमेह सल्लागार डॉ संजय पृथी हे सुद्धा आज आमच्या बरोबर होते. डॉक्टर पृथी आज बरोबर असल्याने मलाही चिंता नव्हती.

लोणाड येथील लेणी ही ५ व्या शतकातील आहेत. हि बौद्ध लेणी जातककथांवर आधारित आहेत. येथील प्रशस्त सभामंडप अत्यंत स्वच्छ आहे. बाहेरील खांबांचें मात्र नुकसान झाले आहे. शेजारीच एक पाण्याचे टाके आहे. लेण्यांपर्यंतचा चढ चढल्यावर ह्या टाक्यातील पाणी आपला थकवा पार नाहीसा करते. आधी येऊन गेलो असलो तरी प्रत्येक वेळी इथे नाविन्याचा आनंद मिळतो. विकास नागदा येथील एका लांबरुंद खडकावर चक्क आडवा झाला होता. काहीजण लेण्यातील कोरीव काम, आतील मूर्ती, सभामंडप आणि जवळचा परिसर न्याहाळत होते. दुर्गेश आणि सुमित मात्र मेघेशच्या सायकलवर उपचार करत होते.

अचानक काहीजणांना ग्रुप फोटो काढण्याची आठवण झाली. डोंबिवली सायकल क्लब चा कापडी फलक धरून फोटोसाठी सर्व जण आजूबाजूला जमा झाले. आणि फोटो काढण्यासाठी काहीजण सज्ज झाले. फोटोसेशन झाल्यावरही परतीचा मार्ग धरायला कोणी तयार नव्हते. पोटातील कावळे जागे झाले होते, त्यामुळे परतीचा मार्ग धरावाच लागणार होता. 

लेण्याहून परतताना हळूहळू सर्व गियर पूर्ववत करत आम्ही लोणाड गावा ऐवजी सावड नाक्याकडे वळलो. सावड नाका येथे क्षुधाशांती करेपर्यंत बरेच DCC सदस्य पुढे निघाले. जठराग्नी तृप्त करून आम्ही कल्याणकडे जाणारा मार्ग पकडला.  वाटेत निरापान करून आम्ही दुर्गाडी किल्ला -पत्रिपुलामार्गे ९० फुटी रस्त्याकडे वळलो. तेथे पुन्हा एकदा विश्रांती घेत गप्पांची मैफल जमली. शेजारीच निराकेंद्र असल्याने पुन्हा निरापान झाले. 

नीरापान करून आमची तहान भागली त्याचप्रमाणे जागतिक सायकल दिनानिमित्त लोणाड येथे सायकलफेरी करत डोंबिवलीला आम्ही परतलो तेव्हा श्विनही समाधानी झाली होती.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...