रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

Sunrise state आंध्र प्रदेशात प्रवेश: कोलकाता चेन्नई सायकल सफर


चिलीका येथील गुरुद्वारामधील वातावरण अतिशय शांत होते. सचिनसिंग खूपच प्रेमळ आणि अतिथ्यशील होताच. तसेच त्याचा सहकारी देखील खूप आदराने वागत होता. मी पहाटेच INS CHILIKA समोर एक चहाची हातगाडी गाठली. अजून तो शेगडी पेटवतच होता. महामार्गावरील उड्डाणपुलाखाली INS CHILIKA च्या गेट समोरच ती हातगाडी होती. सगळा जामानिमा अगदी आटोपशीर होता. त्याचे काम सुरू असतानाच आणखी पाचसहा जण तिथे आले. चहा छानच होता. तिथेच दोन छोटे कप चहा पिऊन आनंद, संजय आणि माझ्यासाठी आणखी दोनदोन कप चहा थर्मास मध्ये घेतला. मी गुरुद्वारामध्ये जाईपर्यंत आनंद आणि संजय तयार होत होते. त्यांच्याबरोबर आणखी दोन दोन कप चहा घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी तयार झालो.

सचिनसिंगला आम्ही प्रवास सुरू करतोय म्हणून सांगितले तर तो आम्हाला चहा आणि नाश्त्याचा आग्रह करू लागला. त्याचे प्रेमळ आतिथ्य मोडवता येत नव्हते. मात्र इतक्या लवकर नाष्टा करण्याची आम्हाला सवय नव्हती. माझा तर लहान लहान का होईना चार पाच कप चहा झाला होता. पण सचिनसिंग आणि चहा दोन्हीचाही मान तर ठेवणे भाग होते. अखेरीस आम्ही चहावर तडजोड केली. चहा बिस्किटे घेऊन आम्ही सचिनसिंग आणि त्याच्या सहकाऱ्याचा निरोप घेतला.


आम्ही लगेचच महामार्गाला लागलो. थोड्याच वेळात एक छोटासा घाट लागला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात तो घाट सर करताना खूप मजा आली. अर्थात तो घाट फारच छोटा होता. पुढे जवळपास ९ किमीचा किंचित तीव्रतेचा उतार होता. त्यामुळे आम्ही चांगलाच वेग घेतला होता. चिलीका लेक अजूनही आम्हाला समांतर काही अंतरावर होताच. अर्थात आमच्यापासून तो लांब असल्याने आम्हाला मात्र तो दिसत नव्हता. थोड्या वेळाने जान्हिकुडा मार्गे येणारा रस्ता महामार्गाला मिळाला. चिलीका लेक संपल्याची ती खुण होती.

काही अंतरावर एक मुलगी सायकलवरून जात असलेली दिसली. ती बहुधा शाळा कॉलेज किंवा क्लासला जात असल्याचे जाणवले. मी तिची चौकशी केली. ती साधारण १२ वी मध्ये शिकणारी मुलगी होती. तिने सांगितले की ती रोज कॉलेजमध्ये सायकलनेच जाते. आत्ताही ती कॉलेजलाच जात होती. साधारण साडेतीन चार दशकांपूर्वी डोंबिवलीमध्ये पेंढारकर कॉलेजचे प्रांगण सायकलींनी भरलेले असायचे. मात्र आता तिथे स्वयंचलित दुचाकीचं दिसतात. त्यामुळे त्या मुलीने जेव्हा ती रोज कॉलेजला सायकलने जाते असे सांगितले तेव्हा मला खूप छान वाटले. मी आमच्या मोहिमेविषयी तिला सांगितले. पुढे तिला म्हटले सायकल चालवणे कायम सुरूच ठेव. आमची मोहीम ऐकून तीदेखील खूप उत्साहित झाली होती. एक सेल्फी घेऊन मी तिचा निरोप घेतला.






अर्धशतकी दौड करून आम्ही छत्रपुर गाठले. शहर सुरू होत असतानाच एक मोठा चौक होता. त्या चौकातच दक्षिणात्य पदार्थांची रेलचेल असलेल्या टपऱ्या होत्या. लांबूनही येथील पदार्थ उत्तम असल्याची जाणीव होत होती. सायकली बाजूला लावून आम्ही खाण्याची ऑर्डर दिली. येथील पदार्थ खरोखरच उत्तम होते. आम्ही चांगलाच आडवा हात मारला. जठराग्नी अगदी तृप्त झाल्यावर त्याला पुन्हा चहाची आहुती दिली. 


नाष्टा झाल्यावर संजय आणि आनंद रेंगाळू लागले. मी थोडी आघाडी घेतली. थोड्या वेळातच आम्ही ओरिसा राज्य पार करून आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश केला होता. 







नाष्टा करून बराच वेळ झाला होता. भुकेची जाणीव होऊ लागली होती. मात्र वाटेत कोणतेही हॉटेल दिसत नव्हते. दुपारी ऊनही चांगलेच जाणवत होते. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून मी चेहऱ्यावर पाणी मारले, ओले फडके नाकावरून घेतले. उन्हे त्रास देत असताना पोटातही आग लागली होती. अखेरीस एके ठिकाणी समोसा आणि चहा ह्यावर आम्ही भूक भागवली. आनंद, संजय आणि मी तिघेही पुढेमागेच होतो. इतक्यात एका स्वयंचलित दुचाकीवरून एक स्वार मला समांतर जात माझी चौकशी करू लागला. मी त्याला आमची मोहीम सांगितली. त्याच्या बरोबर आणखी एक स्वयंचलित दुचाकीचालक होता. दोघेही आमची मोहीम ऐकून खूष झाले. तेही आमच्याच प्रमाणे सायकलस्वारच होते. 


मात्र आत्ता ते सायकल ऐवजी स्वयंचलित दुचाकी वरून एक मोठा प्रवास करत होते. दोघेही गुवाहाटीहून निघाले होते. पुढे चेन्नई कन्याकुमारी मुंबई मार्गे ते परत गुवाहाटी पर्यंतचा प्रवास करणार होते. आम्ही सगळेच एकमेकांची माहिती घेत उत्साहित झालो. दिगंत बारुआ आणि जितेंदर सिंग ह्या त्या दोनही स्वारांना त्यांच्या प्रवासादरम्यान मुंबईमध्ये आल्यावर माझ्या घरी राहण्याचे आमंत्रण दिले तसेच पुढील वर्षी आम्ही गुवाहाटी गाठणार असल्याचेही सांगितले. ते दोघेही कोलकाता चेन्नई महामार्गाने न येता सातपदा जान्हिकुडा असा चिलीका लेक मधून जलप्रवास करून आले होते. मी त्यांना सांगितले की आम्हीही तोच मार्ग निवडला होता. पण विशाखापट्टणम येथील आम्हाला सामील होणार असलेला सहकारी राज ह्यांच्याकडून असे समजले होते की सध्या एकच बोट आहे तीही दुपारी तीन साडेतीन वाजताची. त्यानंतर साठ किमी अंतरापर्यंत राहण्याची सोय नाही. त्यामुळे आम्ही तो पर्याय स्वीकारला नाही. मात्र दिगंत आणि जितेंदर म्हणाले की असे काहीही नाही. बोटी सातत्याने सुरू आहेत. राजने दिलेल्या चुकीच्या माहितीवर अवलंबून राहिल्याने आमची चिलीका लेकमधून प्रवास करण्याची संधी गेल्याची खंत वाटली तरी त्याऐवजी गुरुद्वारामधील सचिनसिंगचा सहवास लाभण्याची संधी मिळणे हे जास्त समाधानकारक वाटत होते.







आमची पलासा येथील राहण्याची व्यवस्था झाली नव्हती. विशाखापट्टणम येथील मित्र राज खरेतर पुढे आमच्याबरोबर चेन्नईपर्यंत येणार होता. दुर्दैवाने १० दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. मी त्याला म्हटले होते की आम्ही विशाखापट्टणम येथे पोचेपर्यंत तू बरा होशील. संध्याकाळी सहाच्या सुमारास मी त्याला पलासा येथे काही व्यवस्था होऊ शकते का हे विचारले. त्याने सांगितले की त्याची थेट ओळख नसली तरी तिथे चांगली हॉटेल्स आहेत जिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकेल. मात्र त्याने एक निराशाजनक बातमीही दिली. ती म्हणजे तो अजूनही बरा झाला नव्हता त्यामुळे आमच्याबरोबर विशाखापट्टणम ते चेन्नई सायकल प्रवास करू शकणार नव्हता.

पलासा येथे राहण्याची सोय करण्याबद्दल मला कोणीतरी reference दिल्याचे मला आठवत होते. राजने तर तो refrence दिला नव्हता. मग मी अग्रीमा आणि सुशांतला विचारले. पण त्यांनीही नकार दिला. आनंद आणि संजयला विचारले तर त्यांना काहीच लक्षात येईना. मी माझ्या भ्रमणध्वनी मध्ये शोधू लागलो. अखेर आनंदनेच एका हॉटेलचा reference दिल्याचे लक्षात आले. सूर्यास्त होऊन जवळपास तासभर झाला होता. पलासा अजूनही ८ किमी लांब होते. इतक्यात आम्हाला हॉटेल अमरावती नावाचे हॉटेल दिसले. तिथे चौकशी केली. तर राहायची आणि जेवणाची चांगली सोय होत असल्याचे लक्षात आले. मी लगेचच शेजारी असलेल्या छोट्या दुकानात चहा घेत सकाळी चहा किती लवकर मिळेल ह्याची चौकशी केली. तर आम्हाला कळले की तिथे २४ तास चहा मिळू शकतो. आता तर तिथे राहण्याबद्दल मी अगदीच निश्चिंत झालो.






रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

चिलिका: कोलकाता चेन्नई सायकलसफर



छेनाची मिठाई, फ्लॉवर भजी हाच आमचा आजचा न्याहारी आणि जेवणाचा आहार होता. मात्र कोलकाता सोडल्यानंतर प्रथमच हिरवागार निसर्ग आमची साथ करत होता. शक्यतो उजेडात पोचून जवळच चिलिका लेकला धावती भेट देण्याचा विचार होता. त्यामुळे आम्ही सायकली दामटवल्या. चिलिका गाव जवळ आले तसा एक उड्डाणपूल दिसू लागला. एव्हाना साधारण पाच वाजले होते. मी पटकन आघाडी घेत गुरुद्वाराच्या ठिकाणाचा अंदाज घेतला. उड्डाणपुलाखालून महामार्गाच्या पलीकडील सेवा रस्त्यालगत गुरुद्वारा होता. मात्र त्या उड्डाणपुलाखालील रस्त्याला डाव्या बाजूला INS CHILIKA चा फलक दिसत होता. 


भारतीय नौदलातील खलाशी आणि अग्निपथ भरतीसाठी INS CHILIKA ही प्राथमिक प्रशिक्षण संस्था आहे. १९८०ह्या वर्षी ही संस्था सुरू करण्यात आली. ह्या संस्थेमध्ये नव्याने भरती झालेल्या युवकांना नौदलाच्या मूलभूत मूल्यांनी सुसज्ज असलेल्या कणखर, शिस्तबद्ध समुद्री योद्ध्यांमध्ये विकसित करण्यासाठी शारीरिक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचे व्यापक प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी हजारो प्रशिक्षणार्थींना इथे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेमध्ये सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक, अत्याधुनिक प्रशिक्षण पायाभूत सुविधा आहेत. चक्रीवादळांच्या वेळी पूर मदत कार्यात देखील ही संस्था मदत करत असते.

आम्हाला मात्र INS CHILIKA येथे भेट देण्यासाठी ना वेळ होता ना संधी. मी उड्डाणपुलाखालून वळण घेऊन सेवा रस्त्याला लागलो. गुरुद्वाराचा उच्च आणि भक्कम दरवाजा बंदच होता. मी थोडावेळ तिथे घुटमळत असताना एक छोटा मुलगा कुतुहलाने माझ्या जवळ आला. त्याने सांगितले तो दरवाजा ढकलून आत जा. त्याप्रमाणे मी आत गेलो. तिथे फरशीबंद मोकळे आवार होते. आवाराच्या चहूबाजूने बांधकाम होते. उजव्या बाजूला एक खोली होती, समोर एक आडवे सभागृह होते. तर डाव्या बाजूला दुमजली बांधकाम होते. तिथेच खाली कार्यालय आहे असे वाटून मी तिथे गेलो. पण तिथेही कोणीच नव्हते. मी सचिनसिंगला फोन लावला. तोही उचलला गेला नाही. जवळच एक नळ दिसला. मी आवारात सायकल लावून पाण्याने चेहरा धुतला आणि आनंद व संजय ह्यांना गुरुद्वाराच्या मार्गाची कल्पना दिली. सचिनसिंग ह्यांना दोन तीन फोन केले तरी प्रतिसाद मिळेना. आजूबाजूला कोणतीच जाग दिसत नव्हती. थोड्या वेळाने एक बारीक अंगकाठी असलेला सरदार आला. आनंद आणि संजयही आलेच. सचिनसिंग वयाने चांगलाच तरुण होता. मात्र गुरुद्वाराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने लगेचच आम्हाला पहिल्या मजल्यावरील एक खोली दिली. 



पंजाबमधील फिरोजपूर येथे राहणारे माझे मित्र सोहनसिंग सोधी ह्यांना मी फोन लावला आणि सचिनसिंग बद्दल सांगितले. भारताच्या दुसऱ्या टोकावरील छोट्याश्या गावात अतिशय तरुण वयात गुरुद्वाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या सचिनसिंगबद्दल मला फार कौतुक वाटत होते. सोधी आणि सचिनसिंग ह्यांना एकमेकांची ओळख करून दिली. पाकिस्तानच्या म्हणजे भारताच्या पश्चिमी बॉर्डर वरील फिरोजपूर आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील चिलिका दरम्यान हा स्नेहाचा पूल नक्कीच बांधला गेला.

एव्हाना थोडाफार अंधार झाला असला तरी चिलिका लेक बघायला जायचे ठरले. वास्तविक सायकल सफर करत असताना एकदा सायकल थांबवली की परत पेडल मारायला मी तयार नसतो. त्यामुळे सायकलचे दिवे, घंटी मी काढून ठेवली होती. मात्र आनंदने सांगितल्याप्रमाणे आम्ही सायकलनेच जायचे ठरवले. त्या उड्डाणपुलाखालून उलट दिशेने थोडी रपेट केल्यावर बाळूगावला जाणाऱ्या एका रस्त्यालगत चिलिका लेक दिसत होता. दिसत होता नव्हे तर अंधारातही तेथील दृश्य डोळ्याचे पारणे फेडत होते. आनंदने आग्रह धरला नसता तर हे दृश्य बघण्याची संधी तर गेली असतीच, मात्र मुख्य म्हणजे काय गमावले आहे हेही समजले नसते. चिलिका लेकच्या जवळून साठ सत्तर किमी सायकलवून देखील ह्या लेकला भेट दिली नसती तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच ठरलो असतो. साधारण सातचा सुमार झाला होता. लेक जवळून एक छोटा अरुंद रस्ता जात होता. त्यावरून सायकलवताना चिलिका लेक आम्ही डोळ्यात साठवत होतो. संध्याकाळच्या त्या समयी त्या शांत तलावाचे वातावरण नक्कीच एखाद्या मैफिलीसारखा वाटत होते. 










जवळच चहाचा आस्वाद घेत आम्ही पुन्हा एकदा गुरुद्वारामध्ये आलो. सचिनसिंग आणि त्याचा एक साथीदार आमची वाटच पाहत होते. त्यांना एका लग्नाच्या कार्यक्रमाला जायचे होते. मात्र त्या आधी त्यांनी आमच्यासाठी जेवण बनवून ठेवले होते. आम्हाला भूक तर लागली होतीच. सगळे किचन आमच्याच ताब्यात होते. तिथे आम्ही तिघांनीही मनसोक्त ताव मारला आणि दिवसभराची भूक भागवली.


रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

मिठाईपेक्षा भजी बरी: कोलकाता चेन्नई सायकलसफर


निद्रादेवी आम्हाला प्रसन्न झाली होती. रात्रभर शांत झोप झाल्यावर मी प्रथम चहाची सोय पाहून आलो. आम्ही मुक्काम केला होता ते ऑफिस असले तरी सध्या तिथे ऑफिसचे furniture आले नव्हते. आमची रात्रीची सोय नक्कीच छान झाली होती. आम्ही अन्हिके आवरून सायकली तयार केल्या. आता पुढील मुक्कामी सुशांत मदत करू शकणार नव्हता. माझा बाळूगावला राहण्याचा इरादा मी अग्रीमाला सांगितला होता. तेव्हाच तिने मला त्याऐवजी चिलिका येथे एक गुरुद्वारामध्ये व्यवस्था होऊ शकेल असे सांगितले. मीही लगेच गुरुद्वाराचा व्यवस्थापक सचिनसिंग ह्यांच्याशी बोललो. त्याने लगेचच माझी विनंती मान्य केली होती. त्यामुळे आजच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय झाली होतीच. 

ही गुरुद्वाराची सोय झाली तेव्हा मला सतीश आंबेरकर ह्यांच्या सायकलजगप्रवास करताना आलेल्या अनुभवावर आधारीत 'दोन चाक झपाटलेली' ह्या पुस्तकात त्यांनी वर्णन केलेला युरोपात एका गुरुद्वारा मध्ये आलेला अनुभव आठवत होता. त्यांच्याबरोबर तेव्हा एक शीख मित्र देखील होता. मात्र ज्या गुरुद्वारा मध्ये त्यांची सोय झाली तेथील वातावरण खलिस्तानी विचारांनी भारलेले होते. त्या शीख मित्राला देखील तेथील लोकांनी चांगलेच फैलावर घेतले होते. त्यांच्या सायकलसमूहातील एका मित्राची पत्नी त्या सुमारास त्यांना भेटायला भारतातून युरोपला गेली होती. ती देखील त्या दिवशी त्यांच्यासोबत होती. ती रात्र सगळ्यांनी चांगलीच तणावात घालवली होती. अर्थात आम्हाला ती भीती नव्हती. चिलिका येथील गुरुद्वाराचा संदर्भ आम्हाला अग्रीमा हिने दिला होता. तसेच फोन वर सचिनसिंग ह्यांच्याशी संभाषण झाले ते अगदी आश्वासक आणि दिलासादायक होते. 
 
आम्ही अंमळ उशिराने निघालो. काल रात्री झोपायला उशीर झाला होता आणि आज जेमतेम ११० - १२० किमीचीच दौड करायची होती. साधारण ८.१५ च्या सुमारास आम्ही निघालो. सकाळची महत्वाची वेळ आम्ही गमावली होती. त्यामुळे मला काम काळ वेग ह्या त्रिकुटावर लक्ष ठेवायला लागणार होते. नेहमीप्रमाणे सुरुवातीला काही वेळ एकत्र सायकलवल्यावर मी थोडी आघाडी घेतली. रस्ता चांगला रुंद आणि तुरळक वाहतुकीचा असल्याने वेग चांगला घेता येत होता. नाश्त्यासाठी योग्य ठिकाण काही सापडत नव्हते. मात्र माझ्या सॅकमध्ये अग्रीमाला देण्यासाठी कटक ते भुवनेश्वर मार्गातील स्वीटशॉप मधून घेतलेली केकच्या सारखी दिसणारी मिठाई होती. अग्रीमा भुवनेश्वरला आमच्या राहण्याच्या ठिकाणी येऊ न शकल्याने ती मिठाई तिला देता आली नव्हती. 
                                          

एका ठिकाणी सेवा रस्त्यावर चहाकेंद्र दिसले. तिथे आनंद आणि संजयची बराच वेळ वाट पाहिल्यावर मी त्या मिठाईचे उद्घाटन करायचे ठरवले. आज खरतर एका चांगल्या मेजवानीचा दिवस होताच. कारण आदल्याच दिवशी गुकेशने डिंग लीरेनला हरवून विश्वविजेत्याचे पद पटकावले होते. मी ती मिठाई सॅक मधून बाहेर काढली छेना (फाटलेले दूध) पासून बनवलेली ती मिठाई खूपच छान दिसत होती. मी त्याचा एक तुकडा तोडून त्याची चव पाहिली.वाह... मिठाई खूपच छान होती. त्या मिठाईचे तीनचार तुकडे मी खाल्ले खरे... मात्र ती मिठाई इतकी गोड होती की भूक असूनही पुढचा घास खाववेना. मी अक्षरशः मनाचा हिय्या करून आणखी एखादा तुकडा खाल्ला असेल. खरतर केवळ गुलाबजामच नव्हे तर त्याचा पाकही मी आवडीने पित असे मात्र ही मिठाई आणखी खाण्याची माझी हिंमतच होईना. आनंद आणि संजय आल्यावर गुकेशच्या विजयानिमित्त त्यांनाही ती मिठाई दिली. मात्र त्यांनीही लगेचच शरणागती पत्करली. अर्थात चहाला मात्र आम्हा कोणाचीच आडकाठी नव्हती. 



भुवनेश्वर सोडून जवळपास ५० किमी अंतर पार झाले तेव्हा टांगी नावाचे गाव लागले. महामार्गाला समांतर जवळपास १० किमी अंतरावर इथेच चिलिका लेक सुरू होतो. तो थेट आमचे गंतव्यस्थान असलेल्या चिलिका गावापर्यंत सोबत करतो. म्हणजे जवळपास ६०- ७० किमी लांबवर हा तलाव पसरला आहे. कोलकाता सोडल्यापासून आम्हाला निसर्गातील हिरव्या रंगातील उधळण पाहायला मिळाली नव्हती. मात्र टांगी गाव सोडून पुढे जाताच हिरव्या रंगाची चादर पसरलेली धरणी दिसू लागली. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर मोठे होत असताना हे वैभव अनुभवायला मिळते. त्यामुळे मला पुन्हा एकदा सह्याद्री रागांची आठवण येऊ लागली. प्रवासाची मजा येत असली तरी पोटातील कावळे आम्हाला जठराग्नीची आठवण करून देत होते. सह्याद्रीच्या कुशीत खाण्याची सोय थोड्या थोड्या अंतरावर होत असते. इथे ती सोय नव्हती. वाटेत एके ठिकाणी एका मंदिरापाशी खूप गर्दी दिसली. तिथे तरी आसपास काही हॉटेल दिसेल असे वाटले. मात्र तिथेही काही सोय दिसत नव्हती. 

तिथे काहीतरी उत्सव सुरू असावा असे दिसत होते. एवढी गर्दी असूनही विक्रेत्यांची गर्दी दिसत नव्हती. किंबहुना आसपास एकही दुकान, टपरी दिसत नव्हती. 

अखेरीस मी मार्गक्रमण सुरूच ठेवले. अखेरीस बरीच दौड केल्यावर एक मोठा चौक दिसला. रस्त्याच्या डाव्या बाजूला बहुधा एक बस स्थानक होते. हे ह्या मार्गावरील मुख्य स्थानक असावे. तिथे बरेच प्रवासी उभे होते. डाव्या हाताला एक खाद्यकेंद्र आणि मागे एक मंदिर होते. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मोठे मंदिर रस्त्यालगतच दिसत होते. 







रस्त्याच्या डाव्या हाताला एक रस्ता जात होता जो रेल्वे स्टेशनकडे जात होता. त्याच्या बाजूला मोठे मोकळे आवार दिसत होते. मुख्य म्हणजे इथे खायलाही काहीतरी दिसत होते. आनंद आणि संजय आल्यावर आम्ही तेथील खाद्यकेंद्राकडे मोर्चा वळवला. तेथील पदार्थ काही समजत नव्हते. विचारले तर तेथील कोणालाही हिंदी भाषा येत नव्हती. फ्लॉवरची भजी दिसत होती. आम्ही ती भजी आणि आणखी एकदोन पदार्थ खाऊन जेवणाची भूक मिटवली. आत्ताही त्या छेनाची मिठाई खाण्याची कल्पना करवत नव्हतीच. 'थोडक्यात गोडी' ह्याचा शब्दशः अर्थ आम्हाला त्या छेनाच्या मिठाईने चांगलाच पटवला होता.



फ्लॉवरचे इंधन मिळाल्यावर सायकली पुन्हा सज्ज झाल्या. आता थेट चिलीका गाठायचे होते. सूर्यास्तापूर्वी तिथे पोचण्यासाठी आम्ही वेग घेतला.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...