बुधवार, २९ जानेवारी, २०२०

भेट: पुणे जम्मू सायकल सफर - भाग १ लेख ४

पुण्यनगरीतील स्वार पुणे जम्मू सायकलफेरीची मुहूर्तमेढ रोवत असताना डोंबिवली नगरीमध्येही त्या स्वारांच्या आगमनासाठी उत्सुकता होती. त्या स्वारांचे डोंबिवली येथे आगमन होईपर्यंत वाट पाहण्यासाठी डोंबिवलीकर सायकलपटू तयार नव्हते. पुणेकरांना लवकरात लवकर वाटेतच गाठण्याचे मनसुबे रचत श्विनने डोळे किलकिले केले. शेजारील फुजीची अवस्था काही वेगळी नव्हती. पुणेकरांना वाटेत गाठायचे तर आज cycle2work ची संधीही साधता येणार होती. श्विन आणि फुजीला याची कुणकुण लागली होतीच. मात्र त्यासाठी कोणाची निवड होणार हे अजून निश्चित झाले नव्हते. श्विन आणि फुजी दोघांनाही आपलीच निवड होणार याची खात्री होती. श्विन ही अस्मादिकांची लाडकी असली तरी सध्या अस्मादिक जास्त वेळ फुजीलाच घेऊन जात असल्याने फुजी निर्धास्त होती. दोघेही अस्मादिकांची वाट पाहत होते.

अस्मादिकांनाही लवकरच जाग आली होती. खरतर cycle2work करायचे असल्याने प्रभातफेरी करायची नव्हती. त्यामुळे अंमळ उशिरा उठून चालणार होते. मात्र उत्सुकतेमुळे का होईना निद्रादेवीच्या मोहपाशातून सुटका करून घेत अस्मादिकांनी अमृतपान केले. खरंतर पुणे जम्मू सायकलसफरीमध्ये सामील होणारे डोंबिवली येथील चारही सायकलपटू अधीर झाले होते. पुणे येथील स्वारांना वाटेतच सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करण्याचा मनसुबा अस्मादिकांनी जाहीर करताच अय्यरकाकांची श्विनसुद्धा सावध झाली.

अय्यरकाका हे निवृत्त असले तरी बाकी तीनही डोंबिवलीकरांना आज कार्यालयात जायचे होते. स्कॉट तर आदित्य हजर होण्याआधीच कार्यालयासाठी घरातून बाहेर पडली होती. स्कॉट दुपारी घरी परतणार होती. अस्मादिकांची घरी परतण्याची वेळ सूर्यास्तानंतर असली तरी अस्मादिकांनी आज कार्यालयातून लवकर परतण्याची परवानगी घेऊन ठेवली होती. दुपारी दोन - अडीच वाजेपर्यंत पुणेकर कोठपर्यंत मजला मारतायत ते जाणून त्याप्रमाणे शीळ फाटा ते पनवेल दरम्यान त्यांना सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करण्याचे अस्मादिकांनी ठरवले होते. सज्जाचे प्रवेशद्वार उघडून अस्मादिकांनी श्विनकडे मोर्चा वळवला. Cycle2work साठी वर्णी लागल्याची खात्री होताच श्विन खुष झाली. तिला बऱ्याच महिन्यांनी ठाणे येथे जाता येणार होते. कल्याण येथील पत्री पूल तोडल्यानंतर संध्याकाळी cycle2home करत असताना २.५ तास लागायला लागल्यावरही सुरुवातीला श्विनने नेटाने cycle2work सुरू ठेवले होते. मात्र पुढील ८-१० महिन्यात पत्रिपुलाच्या दुरुस्तीला सुरुवातही झाली नाही आणि दिवसेंदिवस घरी परतताना लागणारा वेळ वाढू लागला. त्यामुळे गेले ७ महिने श्विनने cycle2work करणे बंद केले होते. आज पुणेकरांच्या स्वागताला ऑफिसमधून लवकर निघायचे असल्याने श्विनने संधी साधली. पुढील बाजूस नवी विजेरी, गोप्रो कॅमेरा, नवीन कर्णा लावलेली श्विन देखणी दिसत होती. कर्ण्याची शेपूट श्विनच्या हाताळ्याला अडकवली होती. सायकलच्या कर्ण्याचा आवाज ऐकून कुत्रं सुद्धा दूर होत नाहीत. मात्र श्विनने परिधान केलेला हा कर्णा विशिष्ट आवाज काढत असे ज्यामुळे पुढील बाजूस अडथळा करणारे नक्कीच बाजूला होणार होते.

श्विन मोठ्या दिमाखात गृहसंकुलातून बाहेर पडली. तोपर्यंत अर्थातच आदित्य पूर्वेकडील क्षितिजावर अवतरला होता. श्विनने शांतपणे कल्याणची दिशा पकडली. दुर्गाडी पूल ओलांडताच श्विनने गियर बदलत गती वाढवली. कोनगाव, गोवे मागे टाकत श्विन थोड्याच अवधीत रांजणोली येथे पोचली. नाशिक ठाणे महामार्ग सुरू झाल्यावर तर श्विन वारा पिऊ लागली. बऱ्याच दिवसांची मरगळ झटकत श्विनने भरारी घेतली. हा हा म्हणता श्विनने पिंपळास पुढील दिवा वसई रेलमार्गावरील चढ पार केला. तो चढ संपल्यावर पुढे डाव्या हातास एक छोटे तळे पावसाळ्यानंतर दृष्टीस पडत असे. तेथील फुलपाखरे, फुले, वृक्ष यांच्याशी हितगुज करून श्विन पुढे निघाली. मानकोली कडे जाणाऱ्या उतारावर श्विनने चांगलाच वेग घेतला होता. अर्थात वेग मिळाला तरी श्विन बेधुंद झाली नव्हती. उतार संपताना मानकोली येथील उड्डाणपूल सोडून देत सावधपणेच श्विनने रस्त्याची डावी बाजू धरली. तेथून पुन्हा संथगतीने मानकोली नाका ओलांडला. त्यानंतर मात्र लय साधत श्विनने TJSB बँकेचे कार्यालय गाठले.



कार्यालयात पोचल्यावरही life 360 द्वारे श्विनची नजर पुणेकरांच्या मार्गक्रमणावर होतीच. श्विन कार्यालयात स्थिरस्थावर होईपर्यंत पुणेकर खोपोली येथे पोचलेही होते. श्विनची चलबिचल सुरू झाली. पुढील दोनेक तासात पुणेकर पनवेल येथे पोचू शकत होते. श्विनचे सायकलजगतातील आदर्श अप्पा उर्फ धनंजय मदन यांना श्विनने पुणेकरांबद्दल कळवले तसेच पुणेकरांनाही पनवेल येथे अप्पांची भेट घ्या असे कळवले. पुणेकर पनवेल येथे अप्पांना भेटतील तसेच पनवेल येथेच जठराग्नीही शांत करतील असा कयास श्विनने बांधला. पुणेकरांनी पनवेल येथे भोजन व थोडी विश्रांती घेतली की ते दोन- अडीच ला पनवेल सोडतील आणि मग शीळ फाटा येथे साधारण ३.३० वाजता त्यांची गाठ पडेल असा अंदाज श्विनने केला होता. मात्र दुपारी दोन वाजताच पुणेकर शीळ फाटा येथे पोचल्याचे समजले. त्यांनी अप्पांची भेट न घेताच पनवेल सोडले होते. पनवेल येथे भोजन न करता पुणेकर थेट शीळ फाटा येथे पोचले होते. अर्थात आता अस्मादिकांची श्विन शीळ फाटा येथे त्यांना गाठू शकणार नव्हतीच पण अय्यरकाकांची श्विनही शीळ फाटा येथे पोचू शकणार नव्हती. स्कॉट, नयना आघारकर हेसुद्धा अद्याप स्वगृही पोचले नव्हते. त्यामुळे पुणेकरांचे वेशीपाशीच स्वागत करणे आता शक्य नव्हते. पुणेकरांनी भोजनाची व्यवस्था कोठे होईल असे विचारताच श्विनने तात्काळ शीळ (कल्याण) फाटा येथून १६०० मीटर अंतरावरील 'कोकणरत्न' चे नाव सुचवले. तिथे पुणेकरांना चांगले जेवण मिळेल ह्याची श्विनला खात्री होतीच, शिवाय मिळालेल्या वेळात पुणेकरांच्या स्वागतासाठी काय करता येईल याचा विचारही करता येणार होता.

ठरल्याप्रमाणे श्विनने ३ वाजता कार्यालय सोडले. कार्यालय सोडत असताना अचानक सर्व सहकारी श्विनला शुभेच्छा आणि मानवंदना देण्यासाठी रांगेत उभे राहिले.





श्विनला हा आनंदाचा धक्काच होता. कार्यालयाच्या आवारातच TJSB मधील दुर्गप्रेमी सुनील शिंदे आणि शंतनू खेडेकर हेही भेटले. सह्याद्रीच्या डोंगररांगांवर त्यांचे प्रेम तमाम TJSB मध्ये प्रसिद्ध होतेच. ह्या दोन्ही दुर्गप्रेमींनीही श्विनला शुभेच्छा दिल्या. इतक्यातच समोरून वरिष्ठ अधिकारी श्री गोपाळ गांगल व श्री अजित रानडे हेही येत होते. श्विनने त्वरित त्यांची भेट घेतली. त्यांच्या शुभेच्छा घेत श्विनने कार्यालयापासून कूच केले.





दरम्यान नयना आघारकरांनी पुणेकरांची सोय त्यांच्या घरी करून ठेवली होती. त्यामुळे आता पुणेकरांची भेट आघारकरांच्या घरीच होणार होती. श्विनने कार्यालय सोडत कळवा खाडीपूलाची दिशा धरली. वाटेत फारशी गर्दी नव्हती. कळवा शहर, पारसिकमार्गे श्विनने मुंब्रा शहराकडे मोर्चा वळवला. दुपारी मुंब्रा शहरात वाहनांची गर्दी नसेल असा विचार करत श्विनने मुंब्रा बाह्यवळण रस्ता टाळला आणि मुंब्रा शहारातूनच धाव घेतली. श्विनचा विचार खरा ठरला मात्र पुन्हा दोन्ही रस्ते मिळतात तेथून पुढे मात्र चांगलीच कोंडी झाली होती. शीळ फाट्याकडे जातानाचा अर्धा रस्ता खोदलेल्या अवस्थेतच होता. गोगलगायीपेक्षा कमी गतीने वाहने पुढे सरकत होती. अखेरीस श्विनने पायउतार होत खोदलेल्या रस्त्यांचा सहारा घेत शीळ फाटा गाठला. तेथून मात्र पुन्हा वेग घेत श्विनने थेट नयना आघारकरांचे घर गाठले.

त्यांच्या गृहसंकुलात खालीच गौतम हा वाहनचालक दिसला. त्याची भेट घेऊन श्विनने नयना आघारकरांचे घर गाठले आणि ज्यांच्या भेटीची दिवस उगवण्याच्या आधीपासून उत्सुकता लागली होती त्या तीनही पुणेकरांची भेट झाली.

रविवार, १२ जानेवारी, २०२०

मुहूर्तमेढ: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख ३

ब्राह्म मुहूर्त टळून गेला होता. वसुधा आदित्यची बराच काळ वाट पाहत होती. मात्र आदित्य अजूनही क्षितिजावर यायला तयार नव्हता. त्याचे कारणही तसेच होते. आदित्याचे वसुधेपासूनचे अंतर आज सर्वात जास्त होते. हो, आज तो दक्षिण गोलार्धातील अतिदक्षिण टोकाला पोचला होता. अदित्याचे किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेला तिरपे होत स्पर्श करत होते. परिणामी ह्या दिवशी दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस तर सर्वात मोठी रात्र होती. 
अर्थातच भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरमधील अग्रहायण या ९ व्या महिन्याची आज अंतिम म्हणजे ३० तारीख! आजच्या दिवशी आदित्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करत होता. ग्रेगरियन कॅलेंडर सुद्धा भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर प्रमाणे सौर कॅलेंडरच! मात्र ग्रेगरियन कॅलेंडर मध्ये खगोलशास्त्राऐवजी धार्मिक बाबींचा विचार केल्यामुळे त्यामध्ये ह्या दिवशी महिन्याचा शेवट न होता २१ डिसेंबर अशी मधलीच अडनीडी तारीख असते.
या दिवसाला विंटर सोलस्टाईस असेही म्हटले जाते. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतोय. 
विंटर सोलस्टाइस जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चीनमध्ये आजचा दिवस पॉझिटीव्ह एनर्जीचा दिवस समजला जातो. चीन बरोबरच तैवानमध्ये या दिवशी लोक पारंपरिक अन्नाला प्राधान्य देतात. पाकिस्तानमधील नॉर्थ वेस्टर्न भागातील आदिवासी जमाती या दिवशी उत्सव साजरा करतात. जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड या देशातील काही भागात या दिवशी द फिस्ट ऑप जूल फेस्टिव्हल साजरा केला जातो.
पुणे जम्मू सायकलसफारीतील सदस्यांसाठी ह्या वर्षीची ३० अग्रहायण ही तारीख अधिकच विशेष होती. वर्षातील सगळ्यात छोटा दिवस असला तरी पुण्यनगरीतील सायकलस्वार आज पुणे जम्मू सायकलसफरीची मुहूर्तमेढ रोवणार होते. शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची फजिती केली, मोगलांना कात्रजचा घाट दाखवला तेव्हाही आदित्य हजर नव्हताच. त्याच पुण्यनगरीतील सायकलस्वार आदित्यची वाट पाहत मोहीम थांबवायला तयार नव्हते. क्षितीजाला तांबडा रंग चढण्यासाठी ते मोहीम आवरती घेणार नव्हते. तीन शिलेदार पुण्यनगरीतून तावी नदीच्या रोखाने जायला तयार झाले होते. ते होते जयंत देवधर, निरुपमा भावे आणि एकादशी कोल्हटकर!

एकादशी कोल्हटकरने काही वर्षांपूर्वीच विमा क्षेत्रातुन स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपले छंद जोपासण्यास प्राधान्य दिले होते. ती केवळ सायकलिंग नव्हे तर मॅरेथॉनमध्येही सहभागी होत असे.


सेनानायक जयंत देवधर हे केवळ ६५ वर्षांचे तरुण होते. त्यांनी भारतातील प्रमुख राष्ट्रीय बँकेतून निवृत्ती घेऊन सायकलिंगकडे मोहरा वळवला होता.


निरुपमा भावे ह्या सर्व स्वारांमधील अनुभवाने जेष्ठ! आपल्या सायकलसफरीदरम्यान संपूर्ण भारत त्यांनी चक्राकांत केला होता. ७० वा वाढदिवस साजरा करताना पुणे कन्याकुमारी सायकलसफर त्यांनी पूर्ण केली होती. तर आत्ताच्या पुणे जम्मू सायकलसफरीदरम्यान त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा होणार होता.

तीनही स्वारांच्या सख्या त्यांना साथ द्यायला उत्सुक होत्या. त्या सख्यांना तीनही शिलेदारांनी ताजेतवाने केले होते. तिन्ही सख्यांच्या अंगावरील विजेरी चमकत होत्या. ह्या तीनही शिलेदारांना निरोपाचे विडे देण्यासाठी तसेच त्यांना काही काळ साथ देण्यासाठी इतरही काही शिलेदार आले होते. 
सगळ्यांच्याच मुखावर उत्साह ओसंडून वाहत होता. सर्व स्वार डोक्यावर शिरस्त्राण, हातामध्ये हातमोजे घालून तयार झाले होते. सेनानायकाच्या इशाऱ्याचीच काय तो गरज होती. पुण्यनगरीतील रस्त्यावर अजूनही तिमिराचेच साम्राज्य होते. मात्र पुण्यनगरीतील ह्या शिलेदारांच्या मनात तिमिरातून वाट काढत तेजाकडे जाण्याची हिम्मत होती. त्यामुळे तेजोनिधी हजर होण्याची वाट न पाहताच सर्व स्वारांनी आपापल्या सख्यांनी ल्यालेल्या विजेरींच्या उजेडातच आपल्या स्वारीला प्रारंभ केला. सगळीकडे जयघोष निनादू लागला. एका निग्रहाने सर्व स्वार मार्गक्रमण करू लागले होते. तिघांचा निग्रह पाहताच आदित्यही आळस झटकू लागला. त्यानेही अंगावरील दुलई दूर करण्यास प्रारंभ केला. इतका वेळ त्याची वाट पाहणाऱ्या वसुधेलाही आदित्य क्षितिजावर येत असल्याची चाहूल लागली.

क्षितिजावर गुलाबी रंग चढू लागला. आदित्यही सर्व सायकलस्वारांची दौड पाहण्यासाठी उत्सुक झाला होता. तो क्षितिजावर येत असताना पक्ष्यांचीही किलबिल सुरू झाली. पुण्यनगरीची सीमा ओलांडून सायकलस्वार पुढे सरकत असताना आदित्यासह संपूर्ण चराचर त्यांचे स्वागत करायला जागे झाले.

पुणे जम्मू सायकलस्वारीची मुहूर्तमेढ रोवली गेली होती.

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

पूर्वतयारी: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख २

'पुणे जम्मू' हे शब्द ऐकताच मी चांगलाच खुष झालो. वास्तविक माझी भारत परिक्रमा खंडमय पद्धतीने उलटसुलट दिशेने सुरू झाली होती. प्रथम गोवा कन्याकुमारी सायकलयात्रा केल्यानंतर मी नयना आघारकर यांच्याबरोबर डोंबिवली ते बरोडा यात्रा करून उत्तरेकडे मोहरा वळवला होता. मध्ये राहिलेली डोंबिवली गोवा अंतराची कडी गेल्या वर्षी माझी पत्नी मीराबरोबर पूर्ण केली होती. आणि आता पुणे/डोंबिवलीहुन पुन्हा बरोडा मार्गे जम्मू सायकलयात्रा करत भारताच्या पश्चिमी सीमारेषेला स्पर्शून/ समांतर दक्षिणोत्तर टोकांना जोडणारा प्रवास पूर्ण होणार होता.
(अर्थात गुजरातची पश्चिमी किनारपट्टी मात्र थोडी लांब राहणार होती.)

वास्तविक मी डोंबिवली अमृतसर सायकल प्रवास या वर्षी करून नंतर पुढच्या वर्षी अमृतसरहून पुढे काश्मीर/लडाख असा प्रवास करण्याचा विचार करत होतो. मात्र पुणे जम्मू सायकलप्रवासाची कल्पना ऐकताच मी लगेचच तयार झालो. पुण्याहून मावशीसह तीनजण आणि डोंबिवलीहुन मी आणि मीरा असे केवळ पाचजणांनी जायचे असे मावशीने सांगितले. काही दिवसांतच बरोबर एखादे सपोर्ट वेहीकल पण बरोबर न्यायचे असल्याचे समजले. तेव्हा मात्र केवळ पाचजणांनी जाण्याऐवजी साधारण २०-२२ जणांचा समूह असावा अशी कल्पना मी मांडली. पुणेकरांना ती मान्य होईना. दोनेक महिने चर्चा निर्णयाविना रेंगाळली. सायकलसफरीला साधारण ३ महिने राहिले असताना आता आयत्या वेळी कोणीही येणार नाही असे सांगत पुणेकरांनी सदस्यसंख्या वाढवण्यास नकार देऊ लागले. तेव्हा सदस्य संख्या वाढवायला अजून पुरेसे दिवस बाकी आहेत, तुम्हाला शक्य नसल्यास मी प्रयत्न करतो असे मी सांगितले. नयना आघारकर आणि विश्वनाथ अय्यर लगेचच तयार झाले. सदस्यसंख्या ७ झाली. काही दिवसात पुणे जम्मू सायकलसफरीची धुरा वाहणारे श्री जयंत देवधर यांनी स्वतःच त्यांच्या अहमदाबाद येथील ३ मित्रांना सामील होऊ द्यायचे का असे विचारले. मी तर अजूनही २०-२२ सदस्यसंख्या होऊ देण्यास तयार होतोच. त्यामुळे मी लगेचच होकार दिला. आमची सदस्यसंख्या आता दोन आकडी झाली होती.

समूह वाढत होता. माझा सायकल दौऱ्याचा उद्देश नवनवीन लोकांशी, संस्कृतीशी, मातीशी ओळख करून घेणे हा असतो, त्यामुळे अधिकाधिक सदस्य सामील व्हावेत या इच्छेबरोबरच तसेच वाटेत कोणत्याही हॉटेल किंवा लॉजमध्ये राहण्यापेक्षा तेथील लोकांसमवेत त्यांच्या घरी राहणे मी पसंत करतो. पैसे मोजून हॉटेलमध्ये राहताना व्यावसायिकता असते. तेथील सेवा पैशांनी मोजली जाते. मात्र जेव्हा आपण वाटेत इतरांची मदत घेतो, मार्गदर्शन घेतो, तेव्हा त्यांच्याशीही ऋणानुबंध जुळले जातात. नवनवीन संबंध प्रस्थापित होतात. माणूस हा जंगली प्राणी नसून कळप करून राहणारा म्हणजे समाजात राहणारा प्राणी असल्याने सायकल प्रवास करत केवळ भोज्याला शिवण्यापेक्षा वाटेत भेटणाऱ्या 'माणसांना' भेटणे मला अधिक महत्वाचे वाटते. ही माणसे भेटत असताना एखादवेळी भोज्याला शिवता आले नाही तरी त्याला माझी हरकत नसते. कारण मला 'माणसे' अधिक महत्वाची वाटतात. असो, सदस्यसंख्या वाढत असल्याचा मला आनंदच होत होता. मात्र आता १० पुढे सदस्यसंख्या न्यायची नाही असा पुणेकरांनी ठराव केला.

मी, मीरा आणि नयना आघारकर यांचा सराव सुरू होत नव्हता. तीन पुणेकर आणि अय्यरकाका यांचे strava वरील आकडे आम्हा तिघांना प्रोत्साहित करत होते. दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. वैशाख महिन्यात तळेगावहून परतताना घाटात मीराला तिच्या नवीन ट्रेकने भिरकावून दिल्यानंतर तिचे उजवे मनगट सरकले होते. ते अजून त्रास देत असल्याने ती अजून सरावाला सुरुवात करत नव्हती. तिच्याबरोबर माझाही सराव शून्यवत झाला होता. मात्र त्या अपघातानंतर सायकलिंग पुन्हा सुरू करताना प्रथम ७०० किमी अष्टविनायक सायकल यात्रा करायचे ठरवले होते. आता पुणे जम्मूच्या सरावासाठी अष्टविनायक सायकल यात्रा  करणे आम्ही निश्चित केले. मात्र त्यासाठीही दैनंदिन सराव करणे आवश्यक होते. दिवाळीच्या सुट्टीत अष्टविनायक यात्रा ठरवली. मात्र त्यासाठी पुरेसा सराव मिळू शकला नव्हता. श्रीगजाननाच्या कृपेने सहा दिवसात ठरवलेली ७०० किमी अष्टविनायक सायकल यात्रा ही ५ दिवसातच पूर्ण केली. या यात्रेतही नवीन मित्र मिळाले, नवीन ओळखी झाल्या. 'माणसं' जोडली गेली.









अष्टविनायक सायकल यात्रेबरोबर मी आणि मीराचा आत्मविश्वासही वाढला. दरम्यान नयना आघारकरही भारताच्या पूर्व किनारपट्टीला सायकल यात्रा करून आल्या. पुणेकर, अय्यर काका, अहमदाबाद येथील मित्रमंडळी यांचा नियमित सराव सुरू होताच.

श्री देवधर यांनी तर स्वतःला पूर्ण झोकून दिले होते. पुणेकरांना हा सायकलप्रवास आरामदायीरीत्या करायचा असल्याने सपोर्ट वेहीकलबरोबरच प्रशस्त हॉटेलसाठीही ते आग्रही होते. देवधरांचा होम वर्क जोरात सुरू होता. त्याचबरोबर प्रवास योजना आखण्यात आनंद मिळत असल्याने मीही अभ्यास सुरू केला. आम्ही दोघांनीही आपापल्या परीने प्रवासमार्ग आखले. दोघांच्या समन्वयाने दोघांच्या मार्गांचे अवलोकन करून प्रवासमार्ग निश्चित केला. त्यातील रोजची नियोजित वास्तव्यस्थानेही निश्चित केली. देवधर अधिक खोलवर अभ्यास करत होते. गेल्या वर्षी चिंचवड येथिल सुनील ननावरे आणि मित्रमंडळींनी काश्मीर ते कन्याकुमारी सायकलयात्रा केली होती. त्यांनी दिलेले संपर्क मी देवधरांना दिले. नेहमीप्रमाणेच क्रीडाभारती आणि NYO च्या श्री क्षीरसागरांनी सर्वतोपरी मदतीची खात्री दिली. मी तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्र येथील आश्रमशाळेमध्ये राहण्यासाठी आग्रही होतो. पुणेकरांनी तो आग्रह लगेचच मान्य केला. क्षीरसागरांनी तलासरी येथील केंद्राला आमची विनंती कळवली. तलासरी येथील केंद्रप्रमुख श्री भुसारा यांच्याशी गेल्या वर्षी सुनील ननावरे आणि समूहाला घेण्यासाठी तलासरी येथे गेलो असता ओळख झाली होतीच.

देवधर आणि मी परस्पर समन्वयाने हॉटेलची आरक्षणे करत असताना सुनील ननावरे आणि गंधार कुलकर्णीनी दिलेल्या संपर्क यादीतील मित्र आणि त्या यादितील मित्रांचे मित्र ह्यांनी पंजाब व जम्मूतील आमच्या राहण्याची व्यवस्था पाहत असल्याचे कळवले. तसेच गुजरातमधील वास्तव्याची जबाबदारी अहमदाबादकर मित्रांनी उचलली. मी व देवधर ह्यांचे बरेचसे काम हलके झाले.

आता आम्ही उरलेल्या ठिकाणांच्या हॉटेलची आरक्षणे उरकून जम्मूपर्यंतच्या वास्तव्याची खात्री करत होतो. प्रवासाचा दिवस जवळ आलेला असताना अहमदाबादकरांनी एके ठिकाणी ६ रूम बुक केल्याचा निरोप पाठवला. आम्ही सगळेच बुचकळ्यात पडलो. प्रत्येक रुम मध्ये २ अश्या ५ रूमची आवश्यकता असताना ६ रुम कशासाठी? तेव्हा अहमदाबादकरांनी कोणालाही विश्वासात न घेता परस्पर दोन सदस्य वाढवल्याचे कळले. देवधरांनी निर्णय आमच्यावर सोपवला. मावशीने मध्यस्थी करून ते दोन सदस्य वाढवू देण्यासाठी आमचे मन वळवले. सदस्यसंख्या पुन्हा वाढत १२ वर गेली. 

सायकलसफर आता चांगलीच जवळ आली होती. मी अजूनही २०-२२ सदस्य वाढवू देण्यास तयार होतो. मात्र त्याला पुणेकर अनुकूल नव्हते. त्यामुळे सदस्य संख्या १२ वर मर्यादित राहिली. Pedal Republic च्या सदस्यांबरोबर मी अधूनमधून प्रभातफेरी करत सराव करत होतो.

सायकलसफरीसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थ व सायकलसाठी पूरक वस्तूंची नवनवीन खरेदी amazon, flipkart बरोबरच Bikeport मधून सुरू होती. सुमित मोकल, साहिर शेख, नाझीर, इम्रान हे तज्ञ सायकलच्या तंदुरुस्तीसाठी परोपरीने आणि निस्वार्थीपणे मदत करत होते. श्विन, फुजी, स्कॉट, ट्रेक ह्यांची देखभाल आणि काळजी मी आणि मीरा पेक्षा ह्या चौकडीनेच अधिक घेतली होती. चौघेही आम्हाला बारीकसारीक सूचना करत होते. एवढ्या लांब पल्ल्याच्या सफरीसाठी छायाचित्रण करणे आवश्यक होते. त्यासाठी कॅमेराबद्दल मी रुधिर, विनीत शेट्ये, लौकिक ह्यांना सतावत होतो. डॉ राहुल घाटवळ, मेघेश यांना तर गृहीतच धरले होते. पेडल रिपब्लिक आणि डोंबिवली सायकल क्लब ही घरचीच मंडळी! सायकलसफरीचा दिवस जवळ येऊ लागला तशी एक कल्पना डोक्यात आली. डोंबिवलीहुन निघताना डोंबिवली सायकल क्लब (DCC) मध्ये अगदी लहान वयात सामील झालेल्या जिया शाह आणि श्रीराज अय्यर ह्यांनी ध्वज दाखवावा. जवळपास ८ वर्षांपूर्वी DCC स्थापन झाल्यावर लगेचच काही काळात हे दोघेही ५-७ वर्षांचे असतानाच सामील झाले होते. जियाने अनेक अडचणींचा सामना करत सातत्य राखले होते, तर श्रीराज काही वर्षांनंतर पुन्हा DCC मध्ये पुनरागमन करत होता.





डॉ पूणतांबेकरांनाही ही कल्पना आवडली. डॉ घाटवळ ह्यांना मी ध्वज तयार करून घेण्यासाठी सतावू लागलो. त्यांच्या असंख्य व्यापातून त्यांचीही धडपड सुरू होती.
ऑफिसमध्येही निरनिराळे महत्वाचे सल्ले मिळत होते. ऑफिस मधील श्री नीतीन मानकामे ह्यांनी वॉर्मर सुटची माहिती दिली. उत्तरेकडील अतिथंड वातावरण पाहता तो अत्यावश्यक ठरणार होता. अमेझॉनने तो ताबडतोब घरपोच आणून दिला.

सर्वव्यापी तयारी बाकी होती आणि दोनेक दिवसच बाकी राहिले. अखेरीस ऑफिस मधून थोडा लवकर निघून खाद्यपदार्थ, कपडे आणि इतर वस्तूंची खरेदी केली. ज्या दिवशी सूर्य दक्षिणेच्या अतिदक्षिण टोकाला जातो तो सगळ्यात लहान दिवस असतो. त्याच दिवशी म्हणजे भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा ९ व्या महिन्यातील शेवटच्या दिवशी-  दिनांक ३० अग्रहायण रोजी पुणेकर निघणार होते. त्या दिवशी ते डोंबिवली येथे मुक्काम करणार होते. आणि त्यापुढील दिवशी म्हणजे राष्ट्रीय कॅलेंडरच्या १० व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सूर्य दक्षिणेकडील प्रवास थांबवून पुन्हा उत्तरेकडील प्रवास सुरु करतो त्या दिवशी अर्थात दिनांक १ पौष रोजी ३ पुणेकरांसह ४ डोंबिवलीकर आपल्या यात्रेसाठी प्रारंभ करणार होते.

सगळ्यांची उत्सुकता तीव्र होत असताना शुक्रवार २९ अग्रहायण म्हणजे २० डिसेंबर रोजी तेजोनिधी क्षितिजापलिकडे गेला.


गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

उपोद्गघात : पुणे जम्मू सायकल सफर

'सायकलिंग...
कधी वाट अज्ञाताची, तर कधी मळलेल्या वाटांची...'

पनवेल येथील माझी सायकल मैत्रीण सुनीता रामचंद्रने सायकलिंग बद्दलच्या भावना अतिशय सुंदर शब्दात गुंफल्या आहेत. कवितेचा समारोप करताना ती म्हणते, 'सायकलिंग ...सुरेल गाणी.. मला शोधणाऱ्या माझ्याच अंतरीची,
एक कहाणी माझ्या समृद्ध होत जाणिवांची'



निसर्गाच्या ओढीने असो की स्वतःचा शोध घेण्यासाठी, स्वप्नांची वाट शोधण्यासाठी असो की अज्ञात वाटेने जाण्यासाठी असो,  ... निमीत्त बदलत असले तरी दोन चाकांवरील प्रवास नेहमीच शब्दांपलीकडील आनंद देत असतो. म्हणूनच बहुतेक एक प्रवास संपत असतानाच मनात दुसऱ्या प्रवासाचे आडाखे तयार होत असतात. ५ वर्षांपूर्वी YHAI बरोबर भारताचे दक्षिण टोक कन्याकुमारी चक्राकांत केले तेव्हाच उत्तर दिशा खुणावू लागली होती. खरंतर संपूर्ण भारत देशाची सीमारेषाच खुणावू लागली होती. मनाने तर युरोप ते ऑस्ट्रेलिया भरारी घ्यायला सुरुवात केली होती. इंग्लंडमधील मित्र ज्यो बरोबर डोंबिवली ते पालघर सायकल सफारी केली तेव्हा मन त्याच्याबरोबर त्याच्या ऑस्ट्रेलियापर्यंतच्या प्रवासात भटकत होते.
तोच अनुभव एकमेकांशी लग्न करण्याचा, तसेच लग्न केल्यास कुठे राहायचे याचा निर्णय घेण्यास स्वीझरलँडची जस्सी आणि ऑस्ट्रेलियाचा मॅट ह्यांनी जस्सीच्या स्वीझरलँडच्या घरापासून मॅटच्या ऑस्ट्रेलियातील घरापर्यंत केलेल्या सायकलसफारी बद्दलचा 'पेडल प्रॉमिस' हा ब्लॉग वाचताना येत होता. माझे सायकलप्रवास सुरू होतेच. त्यातच कॉलेजमध्ये असताना माझा मित्र अविनाशने माझ्या मनात रुजवलेले डोंबिवली गोवा सायकलसफरीचे स्वप्न वर्षभरापूर्वी माझी सहचारिणी मीराबरोबर पूर्ण झाले होते. खरतर मीराने सायकल चालवायला सुरुवात केली ती केवळ माझ्याबरोबर राहण्यासाठी. पण तिची साथ मिळाल्यावर वेळोवेळी काहीना काही कारणांमुळे पुढे ढकलले जाणारे डोंबिवली गोवा सायकलसफरीचे स्वप्न पूर्ण होताच झालेला आनंद अवर्णनीय होता. अर्थातच एक सायकलप्रवास पुढील सायकलसफरीसाठी उत्साह, प्रोत्साहन देत असतोच. इतरांना आपल्या पुढील सायकलसफरीबद्दल उत्सुकता असते तशीच उत्सुकता आपल्यालाही लागून राहते. अनेक योजना मनात घर करू लागतात. मनातील अनेक योजनांच्या गुंत्यातून नेमकी एक योजना नक्की करेपर्यंत मन शांत दिसत असते. मात्र ती शांतता केवळ वरवरची असते, तळाशी सगळ्या योजनांचे एकमेकांशी द्वंद्व सुरू असते. अश्याच वेळी कोणीतरी सायकल मित्र ही अश्याच द्वंद्वात अडकला असताना त्याचे मन मोकळे करतो. दोघं- तिघांच्या किंवा अधिक सायकलमित्रांच्या मनातील गुंत्यातील सामायिक दुवे जुळत एक ठिकाण निश्चित होते आणि नवा सायकलप्रवास निश्चित होतो.



मी आणि मीराचा जोडीने मुंबई गोवा सायकल प्रवास झाल्यावर अश्याच योजना मनात पिंगा घालत होत्या. एके दिवशी ऑफिसहुन घरी येताच मीरा म्हणाली, 'अरे, मावशीचा फोन आला होता. तुझा फोन लागत नव्हता. जरा फोन करून बघ.' माझा सायकलप्रवास नियमित सुरू झाला तो माझी मावशी निरुपमा भावे हिच्यामुळेच. लहानपणापासून माझी समजूत काढण्याचे काम ती अतिशय सहजपणे करत असे. वाचन हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा छंद. मावशीकडे तर पुस्तकांचा खजिनाच होता/ आहे. त्यामुळे लहानपणी मी तिच्याकडे राहायची संधी शोधतच असे. त्यातच माझा मावसभाऊ हर्षुने माझी ओळख माझ्या पहिल्या प्रेयसीशी करून दिली होती. ती पितवर्णीय, सुबक ठेंगणी होती. तिच्याबरोबर पहिल्यांदाच फिरताना आम्ही दोघे एकमेकांबरोबर झुडुपात पडलो आणि लगोलग एकमेकांच्या प्रेमात पडलो. ती होती हर्षुची सायकल. पुस्तके आणि सायकल हे दोन्ही छंद मावशीकडे अधिकच वाढीस लागले होते. माझा पहिला लांबचा सायकलप्रवास मावशीबरोबरच झाला होता. त्यामुळे मावशीचा फोन आल्याचे कळताच ऑफिसहून आल्याचा शीण पळून गेला. गेले काही दिवस जसे माझ्या मनात सायकलप्रवासाचे बेत शिजत होते, तसेच मावशीच्या मनातही ते शिजत होतेच.
फोन लावताच मावशीने सांगितले , 'आपण येत्या डिसेंबरमध्ये सायकलप्रवासाला एकत्र जाणार आहोत.' ती माझी परवानगी विचारत नव्हती, ती सांगत होती. मीराला स्वतःबद्दल थोडी साशंकता वाटत होती. मावशीने तीही दूर केली.

मावशीने पुढील सायकलप्रवासाची दिशा सांगितली,'पुणे जम्मू..'



फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...