रविवार, ४ मे, २०२५

अतिथी तुम कब आओगे: कोलकाता चेन्नई सायकल सफर


भारताच्या पूर्व किनाऱ्यावर सूर्य मुंबईपेक्षा जवळपास तासभर लवकर उगवतो. गेल्या दोन दिवसांमध्ये आम्ही आमच्या नियोजित अंतरापेक्षा साठेक किमी अंतर मागे राहिलो होतो. त्यामुळे आज तरी लवकर सुरुवात करण्याची गरज होती. मात्र आम्हा तिघांची अन्हिके आवरून हॉटेल स्वर्णचुडा चा निरोप घेईपर्यंत घड्याळबाबांनी सातचा ठोका दिला होता. आज खरेतर भुवनेश्वर गाठायचा मूळ आराखडा होता. भुवनेश्वर येथून २५० किमी अंतरावर होते. आम्हाला तर एवढ्याच अंतरासाठी दोन दिवस कमी पडले होते. अर्थातच भुवनेश्वर गाठणे आज अवास्तव ठरले असते. मात्र आम्ही फार विचार न करता शक्य तेवढे अधिक अंतर कापायचे असे ठरवले.

सुरुवातीला ३०-३५ किमी अंतर आम्ही वेगात कापले. तिघांनीही आवश्यक सरासरी वेग कायम राखला होता. त्यामुळे  मी थेट ७० किमी सायकल चालवून बेलडा येथे नाश्त्यासाठी पोचण्याचे मनसुबे रचत होतो. अर्थातच मी वेग कायम ठेवत पेडल मारणे सुरूच ठेवले. मात्र थोड्या वेळात मागे पाहिले तर संजय आणि आनंद दोघेही दिसेनात. दोघेही बरेच मागे राहिले होते. इतक्यात मला संजयचा फोन आला की आनंदला औषध घ्यायचे आहे. त्यामुळे नाश्ता करण्यासाठी थांबायला हवे.
माझ्या डोक्यातील बेलडा गाठायचा विचार बाजूला ठेवून मी जवळपास हॉटेल शोधू लागलो. अर्थातच माझा वेग मात्र मी कायम ठेवला. संजयला मी योग्य हॉटेल सापडले की थांबतो असे सांगून मी पाय मारणे सुरूच ठेवले. जवळपास तासभर अंतरावर 'पंजाबी तडका' हे हॉटेल दिसू लागले.

हॉटेलच्या नावावर मी खुश होतो. इथे चांगले बटाटा पराठे मिळतील असे मांडे मनात मांडत मी दोघांची वाट पाहू लागलो. खरतर हॉटेल माझ्या डोळ्यासमोरच होते. मात्र ते महामार्गाला लागून नव्हते तर सेवा रस्त्याला लागून होते. मी जर हॉटेलमध्ये जाऊन बसलो असतो तर संजय आणि आनंदला मी तिथे थांबल्याचे लक्षात न येता ते पुढे जाण्याची शक्यता होती. त्यामुळे मी रस्त्यामध्ये उभे राहिलो. दोघेही येईपर्यंत बराच वेळ गेला. पहिले ३०- ३५ किमी वेगात मारणारे संजय आणि आनंद अचानक का मंदावले हे मला कळेना. एव्हाना माझी अर्धशतकी मजल पूर्ण झाली होती. 

आज जर भुवनेश्वर गाठले तर उद्याच्या दिवसात आम्हाला पुरी, कोणार्क येथे चांगला वेळ घालवता येणार होता. माझ्या आणि इतर दोघांमधील अंतर लक्षात घेता मी त्यांना सायकल सकट गाडी करून चांदीखोलला जाण्याचा आणि तेथून पुढे सायकल चालवायला सुरुवात करण्याचा सल्ला दिला. मी त्यांना म्हटले की तुम्ही चांदीखोल पासून कटक पर्यंत पोचेपर्यंत मी तुम्हाला गाठतो.
तथापि, पंजाबी तडका मधील सेवा फारच मंद होती. अर्थात तेथील पदार्थ अतिशय चवदार आणि स्वादिष्ट होते.

पंजाबी तडका मधील सेवकही अतिशय चांगली सेवा देत होते. हॉटेलचा हॉल चांगलाच प्रशस्त होता मात्र हॉटेलमध्ये आम्ही वगळता कोणीच गिऱ्हाईक दिसत नव्हते. सेवा पुरवायला वेळ लागत असला तरी पदार्थांच्या चवीमुळे आम्हीही पुरेसा वेळ देत समोरील पदार्थांचा यथोचित समाचार घेतला. उदरभरण सुरू असतानाच मी आज आणि उद्याच्या पर्यायी मुक्कामांचा विचार करत होतो. मी जो मार्ग निवडला होता त्यामध्ये भुवनेश्वर अगोदर चंडीखोल हे महत्वाचे ठिकाण होते.
वेगवेगळे पर्याय शोधताना मला चंडीखोल शहराची आठवण झाली. बहुधा आनंदने चंडीखोलमधील व्यवस्थेसंबंधी काहीतरी सांगितले होते असे मला आठवले. मी आनंदला विचारले की त्याच्याकडे काही संदर्भ आहे का. त्याने त्याच्याकडील माहिती तपासली.  कोणीतरी त्याला हॉटेल मिड ईस्ट चा संदर्भ दिला होता. त्याने हॉटेल मिड ईस्ट सुचवणाऱ्या व्यक्तीला फोन केला. तिथे नक्की सोय होत असल्याचे समजले. अर्थातच आम्ही आटापिटा करत आजच भुवनेश्वर गाठण्याचा बेत रद्द केला. पंजाबी तडका येथील पदार्थांवर ताव मारता मारता आम्ही हॉटेल मिड ईस्टचे ऑनलाइन बुकिंग केले.

मी सुशांतला फोन करून माफी मागितली की त्याने भद्रक आणि भुवनेश्वर येथे राहण्याची ऑफर दिली असली तरी आम्ही ती स्वीकारू शकत नाही आणि आम्ही चंडीखोल येथील हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी त्या हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग केले आहे. त्याने लगेचच विचारले की ते हॉटेल मिडईस्ट आहे का. मी हो म्हटल्यावर तो म्हणाला की ते त्याचेच हॉटेल आहे आणि मला ऑनलाइन बुकिंगचा परतावा मिळेल.

खाणे झाल्यावर आम्ही परत एकदा सायकलवणे सुरू केले. चंडीखोल येथे राहण्याबद्दल आमची खात्री झाली होतीच. त्यामुळे की काय आनंद आणि संजय यांनी वेग आणखीच कमी केला. मी मात्र आधी राखलेला वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्यामधील अंतर मात्र वाढत होते.

भद्रक मागे टाकत मी पुढे निघालो. इथे सुशांत आमची व्यवस्था त्याच्या घरीच करणार होता.मात्र आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला असल्याने भद्रक शहराचा आम्ही महामार्गावरूनच निरोप घेतला.

सुमारे ४.३० वाजताच मला लक्षात आले की अंधार पडायला सुरुवात झाली आहे. आदित्य नारायणाची साथ संपली की अस्मादिकांना फुजीवर स्वार होणे पसंत नसते. त्यामुळे आता मात्र मी संजय आणि आनंद ह्यांना सोडून माझा वेग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. भास्कराचार्यांच्या पूर्वेकडील भ्रमणाशी आमची लय साधत नव्हती. त्यांची वेळ गाठण्यासाठी माझा आटापिटा सुरू होता.





मी आघाडी वाढवत असताना लक्षात आले की आजचे अजून १७ किमी अंतर बाकी आहे. मी आनंद आणि संजय ह्यांना मेसेज केला की मी आणखी अर्धा तास सायकल चालवेन आणि जिथे पोचेन तिथे ५ मिनिटे वाट पाहेन. तोपर्यंत तुम्ही मला गाठा. त्याप्रमाणे मी अर्ध्या तासाने थांबलो. गुगलबाबा मला सांगत होते की मी हॉटेलपासून ७ किमी दूर आहे. चहाची वेळही होऊन गेली होती. त्यांची वाट बघताना मला चहा हवाच होता. मी पुन्हा मेसेज केला की मी एक चहाची टपरी शोधेन आणि तुम्हा दोघांची वाट पाहेन. अंधारात तिघेही एकत्र असलो तर परत पहिल्या दिवसासारखा गोंधळ झाला नसता. त्यामुळे अंधारात तिघेही एकत्र असणे आवश्यक होते. मला फक्त १-२ किमी पुढे एक चहाची टपरी सापडली. टपरी छोटीशी होती. तिथे बऱ्याच इतर गोष्टीही होत्या. मला भूकही लागली होती. मी आधी एक चहा घेतला आणि त्यांची वाट पाहू लागलो. बराच वेळ गेला तरी दोघेही येण्याची चिन्हं दिसेना. भूकही चाळवली होती. तिथे वेगवेगळे लाडू दिसत होते. मी दोन लाडू घेऊन जठराग्नीला आहुती दिली. तरी दोघांचाही पत्ता नव्हता. आहुती मिळाल्यावर जठराग्नी शांत होण्याऐवजी आणखीच भडकला होता. मी आणखी दोन चार लाडूंची आहुती दिली. त्यावर चहाचे तीर्थ स्वाहा केले.

मी दोघांची वाट पाहत होतो. दरम्यान सुशांतने मला फोन केला. मी कुठे आहे ह्याची त्याला माहिती देत मी दोघांची वाट पाहत असल्याचे त्याला कळवले. मी चहाच्या टपरीवर थांबलो त्या वेळी ते दोघे माझ्यापासून जेमतेम ५-६ किमी अंतर मागे होते. खरतर पंधरा वीस मिनिटात दोघेही येणे अपेक्षित होते. मात्र दोघेही त्या चहाच्या टपरीपाशी पोचेपर्यंत जवळपास एक तास संपला होता. ते पोहोचत असतानाच मला सुशांतचा आणखी एक फोन आला. खरतर तोही त्या टपरीपाशी पोचला होता.

आमची ओळख परेड होताच तो  हॉटेलमध्ये आमची व्यवस्थित सोय होत आहे हे पाहण्यासाठी दुचाकीवर पुढे निघाला. आम्हीही त्याच्या नंतर काही मिनिटांतच हॉटेल मिड ईस्ट येथे पोहोचलो. सुशांतने आम्हाला दोन खोल्या मिळवून दिल्या आणि ऑनलाइन बुकिंगसाठी दिलेले पैसेही परत केले.








रात्री जेवण्यासाठीही त्याने आम्हाला आमंत्रण दिले. ते आम्ही नाकारू शकत नव्हतो. सुशांत स्वभावाने खूपच छान आहे. तो लोकांचे आतिथ्य करण्यास उत्सुक असतो. तो couchsurfing (CS) ह्या साइटवर देखील आहे.  Couchsurfing हा एकमेकांचे आतिथ्य करणाऱ्या लोकांचा एक समाजमाध्यमावरील समूह आहे. मी देखील त्यावर आहे. सुशांतने मला सीएस वर राहण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात विनंती पाठवण्यास सांगितले. मी लगेचच त्याला CS वर संदेश पाठवला.

आदरातिथ्यात त्याने कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. माझी मत्स्यहाराची आवड समजताच त्याने त्याप्रमाणे ऑर्डर दिली.  जेवण करत असताना आम्हाला कळले की उद्या त्याच्या मोठ्या काकीचा १० वा दिवस आहे. म्हणून तो खरतर त्या तणावात आहे. मात्र इतका वेळ आम्हाला त्याने हे जाणवूही दिले नव्हते. 
जेवण सुरू असतानाच आमच्या गप्पाही रंगत होत्या. तो सांगत होता की तो जगाला भेट देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवावस्थेतच सागरी सेवेत सामील झाला होता. काही काळ तो मुंबईत दिवा येथेही राहिला होता. डोंबिवली शेजारील दिवा येथे तो राहिला असल्याचे समजताच  त्याची माझी जवळीक आणखीच वाढली. तो पुढे सांगत होता की त्याने मध्य पूर्व, कोम्बोडिया, व्हिएतनाम, लाओस सारख्या अती पूर्वेकडील देशांना भेट दिली होती. आम्ही त्याच्यासोबत खूप छान वेळ घालवला. आमच्या गप्पा संपत नव्हत्या. मात्र त्याला परत भद्रकला जायचे होते. आमचे जेवण झाल्यावर तो परत घरी निघाला तेव्हा आमची भूक भागली असली तरी आमची गप्पांची भूक कायम होती. सुशांतची आदिरातिथ्याची भूकही तशीच कायम होती. तो मला विनंती करत होता की आमच्या ओळखीतील कोणीही ओरिसा मध्ये येणार असेल तर त्याला आदिरातिथ्याची संधी मिळावी. 'अतिथी तुम कब आओगे'ची त्याची तळमळ त्याच्या बोलण्या वागण्यातून जाणवत होती.

गुरुवार, १ मे, २०२५

बालासोर: कोलकाता चेन्नई सायकल सफर



हॉटेल ग्रीनलँड टॉवर्स येथे आमची सोय अतिशय उत्कृष्ट झाली होती. पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे होते. कारण कालची ३० किमी ची कसर आणि आजचे १५० किमी असा एकूण अंदाजे १८० किमीचा पल्ला आज गाठायचा होता. सकाळी आम्ही थोडे आरामात आवरले. सुमारे ७.३० च्या सुमारास आम्ही सुरुवात केली. तिघेही जण एकापाठोपाठ जात होतो.

रस्ता अरुंद आणि थोडा खडबडीत होता. मात्र आमच्या सायकली व्यवस्थित साथ देत होत्या. त्यामुळे आम्ही शांतपणे जात होतो. साधारण २०-२५ किमी अंतर पार केले होते. समोर ५०० मीटर अंतरावर टोल असल्याचे लक्षात आले. मी मागे बघून दोघेही जण येत असल्याची खात्री केली. एक छोटे वळण लागले. टोल जवळ येत असताना रस्ता रुंद झाला होता. तिथे पुन्हा मागे वळून पाहिले तर दोघेही दिसेनात. मी टोल पार करून वाट पहायचे ठरवले. उशिराने सुरुवात केल्यामुळे एव्हाना नाश्त्याची वेळही झाली होती. मी थोडा वेळ वाट पाहिली तरी दोघेही दिसेनात. अखेर मी माझ्या राखीव कोट्यातील दोन लाडू खाऊन घेतले. माझा अंदाज होता की तोपर्यंत तरी दोघेही येतील. मात्र मागे कोणीच दिसेना. आणखी १५-२० मिनिटांनी संजयचा फोन आला की आनंदच्या सायकलने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली आहे. मी पुन्हा थोडा वेळ वाट पाहून मागे जायचा निर्णय घेतला. मला टोल पुन्हा पार करून मागे जायचे होते. त्यामुळे मी पायउतार झालो. रस्ता क्रॉस करून जायला जागा नव्हती. त्यामुळे मी सायकल हातात धरून उलट दिशेने टोल ओलांडून मागे आलो. 

माझ्या अंदाजाप्रमाणे लगेचच तेथील पोलिसाने मला बोलावले. मी त्याला आमची मोहीम सांगितली. तसेच मी मागे परत का आलो हे सांगितले. त्याचा स्वभाव खरोखरच चांगला होता. त्याने माझे म्हणणे मध्ये अडवले नाही. मला बोलायची पूर्ण मुभा दिली. मी संधी साधत माझ्याबरोबर मुंबईतील निवृत्त ACP असल्याचे जाणिवपूर्वक सांगितले आणि त्या ACP च्याच सायकलचा प्रॉब्लेम झाला असल्याचे सांगितले. तो पोलीस मुळातच शांत स्वभावाचा होता. तो आता आणखीच अदबीने चौकशी करू लागला. त्याने त्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला बोलावून माझी ओळख करून दिली तसेच माझ्याबरोबर एक ACP आहे हेही सांगितले. आता आमच्या तिघांच्या गप्पा रंगत होत्या. त्या पोलिसाने माहिती पुरवली की तो केवळ पोलिस म्हणून कर्तव्य बजावत नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी मदतही करतो. समाजसेवा करण्यात त्याला आनंद मिळतो ह्याचे काही किस्सेही त्याने सांगितले. त्या पोलिसाला आम्हाला नाश्ता द्यायची इच्छा होती. मात्र जवळपास कोणतेही हॉटेल नव्हते त्यामुळे आम्हाला तो नाश्ता देऊ शकत नव्हता ह्याची खंतही त्याने बोलून दाखवली. मात्र त्या दरम्यान अजूनही संजय आणि आनंद का येत नाहीत ह्याची चिंताही मला सतावत होती. बऱ्याच वेळाने दोघे येताना दिसल्यावर मला हायसे वाटले.


 


आनंद आल्यावर त्याची मी ओळख करून दिली. पुन्हा एकदा आमच्या गप्पा रंगू लागल्या. आनंदला भेटून त्या दोन्ही पोलिसांना खूप आनंद वाटत होता. आम्ही जरी थांबलो असलो तरी सूर्य ना थांबला होता ना त्याने गती कमी केली होती. घड्याळबाबा त्यांचे हात भराभर फिरवत होते. आम्ही पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली खरी. मात्र एव्हाना सकाळची आल्हाददायक वेळ निघून गेली होती. 

जेवण्यासाठी आम्ही एका छोट्याशा धाब्यावर थांबलो. बंगाली माणसाचे मत्स्यप्रेम मी ऐकून होतोच. त्यामुळे मी इथे मत्स्य आहाराची संधी सोडणार नव्हतो. वेळ वाचवण्यासाठी मी भात खाण्याचा निर्णय घेतला. खरेतर भात खाऊन माझे पोट भरणार नव्हतेच. त्यामुळे मी दशावतारातील पहिला अवतार भाताबरोबर उदरात भरून समाधान करून घेतले. अखेर म्हणतात ना.. when in Rome, behave like Roman. आनंद आणि संजयने मात्र शाकाहार पसंत केला. आनंद मला चिडवत होता की मासे खाण्यापेक्षा येथील भाजी  उत्तम आहे. पण मी तर भाजीचा स्वादही चाखला होताच. त्यामुळे मला दोन्ही चवींचा उपभोग घेता आला होता. जेवण चांगलेच तब्बतीत झाले होते. आम्ही त्यानंतर पुन्हा एकदा शांतपणे सुरुवात केली. 


थोड्याच वेळात आम्ही ओडिशा राज्यात प्रवेश केला. ओडिशा राज्याविषयी मला कुतूहल होतेच. येथील आदरातिथ्याविषयी मी ऐकले होते. आता ओडिशातील पाहुणचाराचा  प्रत्यक्ष प्रत्यय येणारच होता.



मी अग्रिमाच्या संपर्कात होतोच. तिने मला सुशांत नावाच्या मित्राचा संपर्क दिला होता. त्याने आमची भद्रकला रहायची सोय केली होती. मात्र आता दिवसभरात १८० किमी अंतर पार करून भद्रक गाठणे फारच अवघड होते. त्यामुळे आता मी त्या अगोदर ३० किमी अंतरावरील सोर (soro) गावात सोय होईल का ते पाहू लागलो. दुर्दैवाने तिथे राहण्यासाठी गुगलबाबा काही मदत करत नव्हते आणि सुशांतही तिथे मदत करू शकणार नव्हता.

एव्हाना भास्कराचार्यांनी मात्र बराच पल्ला गाठला होता. मध्यान्ह केव्हा टळून गेली हे आमच्या लक्षातच आले नाही. आम्ही वेग घेऊ लागलो. तिघांनाही वेळ, वेग आणि अंतर ह्या त्रैराशिकाची जाणीव होती. मात्र अचानक संजयच्या पायात cramp येऊ लागले. मी एखादे वाहन मिळून आम्हा तिघांना किंवा किमान संजय आणि त्याच्या सायकलला पुढे पाठवता येईल का हे पाहू लागलो. मात्र तसे काही चिन्ह दिसेना. अखेर मी सुशांतला संपर्क साधून आम्ही आज बालासोरपर्यंत जाऊन थांबत असल्याचे सांगितले. सुशांतने लगेचच बालासोर येथे त्याच्या मित्राच्या सहाय्याने तो आमची व्यवस्था करत असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात पूर्ण काळोख पडला.

सुशांतने मला सांगितले होते की त्याच्या मित्राने आमची व्यवस्था एका ऑफिसमध्ये केली आहे. मात्र तेथील सुपरवायझर ८ वाजता निघून जातो त्यामुळे आम्ही त्या आधी पोचणे आवश्यक आहे. सुदैवाने सातच्याच सुमारास आम्ही महामार्गावरच बालासोर शहरातील मुख्य चौकात पोचलो होतो.

बालासोर ह्या शहराला बालेश्वर असेही म्हटले जाते. हे आज जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहराचा इतिहास फार रंजक आहे. बालासोरजवळील गावांमध्ये केलेल्या उत्खननातून मानवी वसाहतींच्या तीन वेगवेगळ्या सांस्कृतिक टप्प्यांचे पुरावे मिळाले आहेत, म्हणजे, चॅल्कोलिथिक (२०००-१००० ईसवीसनपूर्व), लोहयुग (१०००-४०० ईसविसनपूर्व) आणि प्रारंभिक ऐतिहासिक काळ (४००-२०० ईसविसनपूर्व). बालेश्वर जिल्हा हा प्राचीन कलिंग राज्याचा भाग होता. पुढे तो मुकुंद देवाच्या मृत्यूपर्यंत उत्कलचा प्रदेश बनला. १५६८ मध्ये तो मुघल साम्राज्याने आपल्या ताब्यात घेतला. पुढे १७०० पर्यंत त्यांच्या ताब्यात राहिला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने (EIC) १६३३ मध्ये बालासोर येथे एक कारखाना स्थापन केला. १७१९ मध्ये, ट्रायस्टे कंपनीच्या व्यापाऱ्यांनी तेथे एक व्यापारी चौकी स्थापन केली. कलकत्त्याचे महत्त्व वाढत असताना, हुगळी नदीवर चढण्यासाठी येणाऱ्या जहाजांसाठी बालासोर हे नदी पायलट सेवांचे केंद्र बनले. १६८६ मध्ये अँग्लो-मुघल युद्धादरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने या शहरावर बॉम्बफेक केली. परंतु मुघल सैन्याने कंपनीची डाळ शिजू दिली नाही. पोर्तुगीजही इथे व्यापारासाठी आले. ते मलेशियाहून बोर्नियोला तांदूळ, कापूस आणि लोणी यांसारख्या ओरिसाच्या उत्पादनांची निर्यात करत होते आणि इंडोनेशियाहून चिनी उत्पादने आणि मसाले आणत होते. आजच्या ओडिशाचा हा भाग नागपूरकर भोसल्यांनीही जिंकून घेतला होता. १८०३ मध्ये देवगावच्या तहामध्ये त्यांना तो इंग्रजांना द्यावा लागला.

९ सप्टेंबर १९१५ रोजी बालासोरजवळ, जतिंद्रनाथ मुखर्जी (बाघा जतिन) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रांतिकारक आणि ब्रिटिश सैन्य यांच्यात घनघोर लढाई झाली.  माऊसर पिस्तूलांनी सज्ज असलेले जतिन आणि त्यांचे अनुयायी आधुनिक रायफलांनी सज्ज असलेल्या ब्रिटिश पोलिसांच्या आणि लष्कराच्या मोठ्या तुकडीशी भिडले. दोन तास चाललेल्या या लढाईत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, ज्यात जतिनला प्राणघातक जखमा झाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले.

बालासोर येथे आम्ही पोचल्याचे सुशांतला कळवले. समोरच चहाची गाडी होती. तिथे चहा घेत असताना आम्हाला तिथून ५-६ किमी अंतरावर एक मठात आमची सोय होऊ शकते अशी माहिती मिळाली. आसपासचे लोक आमची चौकशी करून आम्हाला शुभेच्छाही देत होते. सुशांतचा फोन आला तो मात्र आम्हाला निराश करणारा होता. तो सुपरवायझर निघून गेला होता. सुशांत आमची माफी मागत म्हणाला की बहुधा त्या सुपरवायझरला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले नाही. मात्र समोरच एक हॉटेल दिसत होते. त्यामुळे मी सुशांतला सांगितले की आमची काळजी करू नकोस. आमची व्यवस्था होईल. आम्ही तिघेही त्या हॉटेलमध्ये गेलो. मात्र तिथे सांगितलेली किंमत आम्हाला अवाजवी वाटली. गाव तसे मोठे वाटत होते. आम्ही त्या मठात जायचाही विचार करत होतो.

इतक्यात आनंदला त्याच्या मित्राने बालासोर येथील संपर्क दिल्याची आठवण झाली. आम्ही लगेचच तो संपर्क साधला....अरबिंद रे ह्यांनी लगेचच आम्हाला आमची सोय करत असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितलेल्या हॉटेलात आम्ही पोचलो. मात्र तिथे योग्य सोय उपलब्ध नव्हती. अरबिंद ह्यांनी अजिबात वेळ न दवडता आमची सोय लगेच दुसऱ्या हॉटेलात केली. ते आमच्याबरोबर हॉटेल स्वर्णचुडा इथे आले. तेथील सोय व्यवस्थित असल्याची त्यांनी खात्री केली आणि मगच त्यांनी आमचा निरोप घेतला.


 









रात्रीचे जेवण छान झाले. मात्र झोपण्या अगोदर मी एका मोहिमेवर जाऊन आलो. दोन दिवसात मिळून आम्ही ५०- ६० किमी मागे पडलो होतो. त्यामुळे पुढील दिवशी लवकर निघावे लागणार होते. त्यासाठी लवकर उठावे लागणार होते. सकाळची आन्हिके आवरायची तर चहा तर हवाच. आमच्या हॉटेलमध्ये तो इतक्या पहाटे मिळणार नव्हता. त्यामुळे आनंद आणि संजय झोपण्याची तयारी करत असताना मी जवळपास जाऊन पहाटे ५ वाजता चहा कुठे मिळेल ह्याची खात्री करून हॉटेल मध्ये परतलो.


फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...