सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

पाडव्याची ओवाळणी

कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे साडेतीन मुहूर्तामधील अर्धा मुहूर्त!

मध्य आणि उत्तर भारतात मात्र याच दिवशी नवीन विक्रम संवत् सुरू होतो. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात
मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.





गोवर्धन पूजा




हिंदू धर्माच्या शालिवाहन शक कालगणनेनुसार ८ व्या महिन्यातील म्हणजे अश्विन महिन्यातील आज पहिला दिवस. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो.










उटणे असलेले ओवळणीचे ताट


दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.







बलीची पूजा















फुजी आणि स्कॉट यांनाही विक्रम संवत्सराचा नववर्षदिन साजरा करायचा होताच. अर्थात दिवाळी फराळासाठी घरी लवकर परतही यायचे असल्याने आज फार लांब काही जाता येणार नव्हते. अखेरीस दोघांनी नेहमीप्रमाणे काटई पाइपलाइन रस्त्याला जायचे ठरवले. घरातून निघेपर्यंत बरेचसे उजाडले होते. नेहमीप्रमाणे संथगतीने सुरुवात करत दोघेही ठाकुर्ली पुलामार्गे डोंबिवली पूर्वेला जाऊन मंजुनाथ शाळेपाशी पोचले. तिथून पुढे मात्र थोडासा वेग घेण्याची संधी मिळाली. झपाट्याने कल्याण शीळ रस्ता गाठल्यावर चांगलीच लय सापडली होती. त्याच लयीत फुजी आणि स्कॉट बदलापूर पाइपलाइन रस्त्याला लागले.

समोरच्या दिशेने रस्त्याच्या डावीकडे मलंगगड डौलात उभा होता. त्याचा राजेशाही रुबाब पाहताना श्विन आणि फुजी नेहमीच हरखून जात असत. पहाटेच्या वेळेस मलंगगडाच्या डोक्यावर प्रगटणारा तेजोगोल त्याचे सौंदर्य नेहमीच वाढवत असे. तो तेजोगील तेव्हा एखाद्या देवतेच्या मुगुटावर विराजमान झाल्याप्रमाणे भासत असे. तीच शोभा पाहत फुजी आणि स्कॉट निर्वेधपणे जात होते. पाहता पाहता दोघांनी अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीजवळील वैभव हॉटेल गाठले. तेथूनच आज परत फिरायचे होते. तोच समोरून पताका आणि रंगात न्हाऊन निघालेला बळीराजाचा सखा येताना दिसला.



त्याचे दर्शन घेत फुजी आणि स्कॉट पुन्हा घराकडे परतू लागले. परतीच्या वाटेवर असताना स्कॉटला काय ओवाळणी द्यायची याबद्दल फुजीच्या मनात विचारचक्र सुरू होते. काहीतरी मानवनिर्मित देण्यापेक्षा काहीतरी 'ओरिजिनल' द्यावे असा विचार मनात घर करत होता. त्याच विचारात फुजीची वाटचाल सुरू होती. पाठोपाठ स्कॉटही होतीच. मात्र त्या वेगात जात असताना फुजीच्या नजरेला रस्त्यामध्ये काहीतरी पडलेले दिसले. ती प्रतिमा अगदीच छोटी होती, त्यामुळे नक्की काय होते ते मात्र फुजीला कळले नाही. फुजीने मागे वळून पाहिले, तर स्कॉट बऱ्याच मागे होती. अखेर फुजीने पायउतार होत परत मागे मोर्चा वळवला. काही पावले मागे जाताच फुजीच्या दृष्टीस रस्त्यावर पडलेली आकृती स्पष्ट झाली. ते एक अतिशय लहान आकाराचे पाखरू होते. सकाळच्या वेळेस भरारी घ्यायला बाहेर पडलेल्या त्या पाखराचा प्रवास मात्र अकल्पितपणे संपुष्टात आला होता. महामार्गावरील भरधाव वेगात जाणाऱ्या प्रदूषणकारी वाहनाची टक्कर त्या पाखराला जीवघेणी ठरली होती.




त्या पाखराकडे पाहत असतानाच फुजीला श्विनने केलेली saveoursahyadri मोहीम आठवली. आनंद पेंढारकर यांची कळकळ पुन्हा एकदा तीव्रपणे आठवली. त्याचवेळी आपण ह्या पाखराबाबत काहीही करू शकत नाही याबद्दलही फुजीला दुःख होत होते.

एवढ्यातच मागून येत असलेली स्कॉट फुजीला दिसली. स्कॉटला या कशाचीच कल्पना नव्हती. ते पाखरू इतके छोटे होते की ते सहजपणे दिसू शकत नव्हते. त्यामुळे स्कॉटलाही ते दिसले नाहीच. स्कॉट संयतपणे पण सातत्य राखत मार्गक्रमण करत होती.


स्कॉट पुढे निघून गेली आणि फुजीनेही पुन्हा दौड सुरू केली. काही वेळातच शीळ कल्याण रस्ता गाठत दोघेही डोंबिवलीच्या दिशेने परतु लागले. चहाची तल्लफ आली नसली तरी सवयीप्रमाणे घारडा सर्कलपाशी चहापानासाठी थांबा घेतला. चहासाठीचे फर्मान देत फुजी आणि स्कॉट थोडे निवांत होत होते. इतक्यात स्कॉटला पाडव्यानिमित्त काय ओवाळणी द्यायची हे फुजीला पडलेले कोडे अगदी अलगदपणे उलगडले. स्कॉटच्या हातात चहा आला असला तरी फुजीचे लक्ष मात्र चहाकडे नव्हते. फुजीने मोर्चा वळवला तो त्या निसर्गनिर्मित हळुवार भेटीकडे जी आज पाडव्यानिमित्त स्कॉटला देता येणार होती. स्कॉट चहासाठी फुजी बोलावत असतानाही फुजीने आपला मोर्चा त्या अलौकिक गोष्टीकडे वळवला. फुजीच्या मनात नेहमीच खास स्थान असलेली ती गोष्ट खासच होती. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्याच्या पत्नीसाठी स्वर्गातून आणलेली ती गोष्ट कोणत्याही इतर भेटीपेक्षा नक्कीच मौल्यवान होती. श्रीकृष्णाने स्वर्गातून ती भेट आणल्यावर सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यातही वाद झाला होता. सुदैवाने श्रीकृष्णाने ते कोडे सहजपणे सोडवले. फुजीला तर तशी काहीही अडचण नव्हतीच.

फुजीने ताबडतोब ती अलौकिक गोष्ट प्राप्त केली आणि स्कॉटला दिली. सत्यभामा आणि रुक्मिणी यांनाही ज्या गोष्टीचे आकर्षण होते ती मिळताच स्कॉटचा आनंदही गगनात मावेना. स्कॉटच्या ओंजळीत ती भेट सुपूर्द करून फुजीलाही इतकी अप्रतिम भेट योग्य वेळी देता आली त्याचा आनंद होत होता.


'बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी' हे एक मराठी नाटकातील गाणे आहे. पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे.



शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

बदलापूर

हिंदू धार्मिक कालगणनेप्रमाणे ७ व्या म्हणजे अश्विन महिन्याचे दोन दिवस बाकी असले तरी जगातील एकमेव निधर्मी म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे आज ८ व्या म्हणजे कार्तिक महिन्याची ४ तारीख! पुणे जम्मू सायकलयात्रेसाठी आता दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला होता.  डोंबिवली हुन जम्मूच्या दिशेने प्रयाण करण्याचा दिवस म्हणजे राष्ट्रीय कालगणनेनुसार १० व्या म्हणजे पौष महिन्याचा १ ला दिवस वेगाने जवळ येत असल्याने नियमित सराव अत्यावश्यक होता.

त्यामुळे आज किमान अर्धशतकी मजल मारण्याचे ठरवले होतेच. श्विनला डॉ सुमीतच्या दवाखान्यातून नियमित देखभालीसाठी जाऊन आणले असले तरी त्याचे खोगीर मात्र बदलावे लागणार होते. अर्थातच श्विनच्या ऐवजी आज फुजीचीच साथ मिळणार होती. तसेही गेले कित्येक दिवस सडपातळ बांध्याच्या फुजीबरोबर गेल्यामुळे फुजीचा सहवास सुखाचा वाटू लागला होताच. बहुधा त्यामुळे आज श्विनकडे लक्षही न जाता फुजीलाच बरोबर घेतले.

सवयीप्रमाणे घराबाहेर पडण्याआधी फुजीच्या रबरी नळीत पुरेशी हवा असल्याची खात्री करून अस्मादिकांनी स्वतःचा जामानिमा केला. आज फुजीला साथ देण्यासाठी स्कॉट बरोबर होती. दोघांनीही आपापले STRAVA सुरु करून आजच्या भरारीला सुरुवात केली. डोंबिवली पश्चिमेकडून ठाकुर्ली उड्डाणपुलामार्गे पूर्वेला जाईपर्यंत दोघेही संथ गतीने जात होते. पूर्वेला गेल्यावर फुजीने थोडा वेग घेतला. स्कॉटने तिचा वेग कायम ठेवला होता. मंजुनाथ शाळेपाशी थोडा मोकळा आणि रुंद रस्ता मिळताच फुजी सुसाट वेगाने निघाली. थोड्याच वेळात पेंढरकर महाविद्यालय मागे टाकून कल्याण शिळ रस्ता दिसू लागला. पाठोपाठ स्कॉटही संयमित वेगाने पण सातत्याने येत होती.

कल्याण शिळ रस्ता नेहमीप्रमाणेच गजबजलेला होता. स्वयंचलित वाहने वेगाने जाऊ पाहत होती.  रस्त्यातील गतिरोधक, खड्डे येताच ती वाहने अडखळत असत. मात्र ते गतिरोधक पार होताच ती प्रदूषणकारी वाहने त्यांच्या यांत्रिक अश्वशक्तीद्वारे लगेच वेग घेऊ शकत. मनुष्यशक्तीच्या इंधनावर चालणारे फुजी आणि स्कॉट असा अचानक वेग घेऊ शकत नव्हते. मात्र  तरी गतिरोधक किंवा खड्डे पार करताना फुजी आणि स्कॉट त्या स्वयंचलित वाहनांना मागे टाकत होते.

महामार्गाला लागल्याने फुजी आणि स्कॉट दोघांनीही चांगलाच वेग घेतला होता. मानपाडेश्वर मंदिर, प्रीमियर वसाहत मागे टाकून थोड्याच वेळात दोघेही काटई नाक्याला डावे वळण घेत अंबरनाथ पाइपलाइन रस्त्याला लागले. सूर्यनारायण मात्र अजून दर्शन देत नव्हता. पावसाचे लक्षण मात्र दिसू लागले होते. फुजी, स्कॉटला मात्र त्याची फिकीर नव्हती. तळोजा फाटा पार केल्यावर फुजीने चांगलाच वेग घेतला. काही मिनिटातच नेवाळी फाटा गाठला. स्कॉट दृष्टिपथात नव्हती. त्यामुळे फुजीने स्कॉटसाठी पुन्हा तळोजा फाट्यापर्यंत जाऊन यायचे ठरवले. अर्ध्या अंतरातच मागून गन्धार, अक्षत आणि आणखी एक सायकल पटू यांनी फुजीला गाठले. गंधारबरोबर अर्णव मात्र दिसला नाही. याचे फुजीला आश्चर्य वाटत होते. गन्धार आणि अर्णव हे दोघे एकत्र नसतील तर काहीतरी अपूर्ण राहिल्याचे फुजी/ श्विन यांना वाटत असे.

गन्धारने स्कॉटला नेवाळी फाट्याच्या दिशेने गेल्याचे पाहिले होते. रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावरील झुडुपांमुळे फुजीला मात्र स्कॉट दिसली नव्हती. मात्र गंधारने सांगितल्यावर फुजीने पुन्हा नेवाळी फाट्याकडे मोर्चा वळवला. फुजीने पुन्हा नेवाळी फाटा गाठेपर्यंत स्कॉटने बरीच आघाडी घेतली होती. फुजीने भ्रमणध्वनिमार्फत संपर्क साधत फुजी मागे असल्याची स्कॉटला कल्पना दिली आणि वेग आणखी वाढवला. अंबरनाथ येत असताना फुजीने स्कॉटला गाठले. दोघांनी मग पुढे बदलापूर गाठायचे ठरवले. फुजीने पुन्हा एकदा आघाडी घेतली. रस्ता मोकळाच होता. त्यावेळी वेगही छान मिळाला. 'नेरळ २० किमी' या पाटीकडे फुजीने दुर्लक्ष करून नेरळचा मोह टाळला आणि K2 Cycles पर्यंत गेल्यावर परतीचा निर्णय घेतला.

परत फिरताना फुजीच्या साखळीलाही दात्यांच्या पुढील आणि मागील बाजूकडील आतील संचावर वळवले. साहजिकच आता पदललित्य अधिक वेगाने होऊ लागले तरी  फुजीचा वेग कमी झाला. पायाच्या अधिक गतीने होणाऱ्या भ्रमणाचा आनंद घेत बदलापूर शहर मागे टाकल्यावर मात्र पुन्हा एकदा दोन्ही बाजूकडील दात्यांच्या बाहेरील संचावर साखळी सरकवून फुजीने वेग वाढवला. अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीजवळ जाताच 'हॉटेल वैभव'  खुणावू लागले. मात्र तिकडे दुर्लक्ष करत फुजी आणि स्कॉट झपाट्याने परतू लागले. डावीकडे मलंगगड साथ करत होता. मात्र सूर्यदर्शन न झाल्याने मलंगगडानेही काळी झालर पांघरली होती.



मलंगगडाला छायाचित्रबद्ध करत असताना फुजीला अचानक लक्षात आले की आज शिरस्त्राण मात्र विसरून घरीच राहिले होते. फुजीला तयार करून अस्मादिकांनी डोक्यावर, तोंडावर आणि नाकावर आवरण तर घातले होतेच, मात्र त्या आवरणानंतर शिरस्त्राण घालण्याचे भान राहिले नव्हते. आणि त्याची जाणीव झाले ते थेट बदलापूरहून परत फिरल्यानंतर!

 अभ्राच्छादित वातावरणात नेवाळी फाटा मागे टाकत फुजी आणि स्कॉट लवकरच पुन्हा काटई नाक्याला पोचले. तेथे उजवीकडे वळण घेत डोंबिवली गाठत असतानाच वाटेत संजय दात्ये एका सायकलस्वारासह दिसले. ते दोघेही मलंगगडाच्या सान्निध्यातील करवले गावात जाऊन आले होते. त्यांच्याशी गप्पा मारतच फुजी आणि स्कॉट डोंबिवली शहरात शिरले. एव्हाना ५५ -५६ किमी अंतर न थांबताच पार झाले होते. दात्येंचा निरोप घेता घेता 'एक चहा' तर लागू झाला होता. उभ्या उभ्या चहा घेत फुजी आणि स्कॉट पुन्हा डोंबिवली पश्चिमेला पोचले. घरी पोचत असताना Strava ने ६० किमी साठी ६०० मीटर अंतर कमी असल्याची सूचना दिली. फुजी त्यावर समाधानी नव्हती. फुजीने घराभोवती परिभ्रमण करत strava ने ६० किमी अंतर पूर्ण केल्यावरच विश्रांती घेतली.


मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

सीमोल्लंघन

जागतिक शास्त्रीय सौर दिनविशेष- जगातील एकमेव निधर्मी कॅलेंडरनुसार दिनविशेष- भारतीय राष्ट्रीय दिनांक: १६ अश्विन (ईश मास) १९४१

हिंदू दिनविशेष (चांद्र कालगणना- तिथी): अश्विन शुक्ल १०,
(अर्थात विजयादशमी) शालिवाहन शके १९४१

विजयादशमी अर्थातच सुष्ट शक्तींचा दुष्ट शक्तींवर विजय मिळवण्याचा आज दिवस...
रामाने रावणाचा वध केल्याचा आज दिवस...
बंधनातून मुक्त होऊन पुन्हा आपली आयुधे परजण्याचा आज दिवस...

या दिवसाचे निमित्त साधून जम्मू सायकलसफरीसाठी एकत्रित सरावाची सलामी देत सीमोल्लंघन करण्याचे डोंबिवली मधील गटाने ठरवले. आत्तापर्यंत पुण्यातील गट नियमित सराव करत होताच. मात्र श्री अय्यर वगळता इतर डोंबिवलीकर सरावापासून लांबच होते. समाजमाध्यमातील गटावर चर्चा सुरु होऊन अखेर दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन करत अंबरनाथ येथील शिवमंदिर गाठायचे ठरले.

पहाटे ६ वाजता घारडा सर्कल येथे जमायचे ठरल्यामुळे अस्मादिक स्वतःबद्दल साशंकच होते. पहाटे वेळेवर जाग येईल की नाही या भीतीने रात्रभर सलग झोप लागली नाहीच. अखेरीस घड्याळबाबांनी संकेत देताच अपुरी झालेल्या झोपेवर विजय मिळवत अस्मादिक सज्ज होऊ लागले.

श्विन आणि फुजी दोघींचे वय साधारण सारखेच. श्विन ही गेली ६ - ६.५ वर्ष मला साथ करत होती, शिवाय ती MTB श्रेणीतील असल्याने अस्मादिकांची विशेष लाडकी. मात्र दुसऱ्या घरात ८ वर्ष काढून काही महिन्यांपूर्वी आमच्या घरातील सदस्य झालेली फुजी ही हायब्रीड श्रेणीतील असल्याने तिच्याबाबत मात्र अस्मादिक बेतास बात धोरण ठेवत असत. श्विन रुसली तरच फुजीला संधी मिळे.

घराबाहेर निघण्यासाठी श्विनकडे गेल्यावर श्विन अवखळपणे दौडू लागे, फुजीचे मात्र तसे नव्हते. फुजी शांत स्वभावाची आणि सरळमार्गाने जाणारी! अर्थात गेला आठवडाभर फुजी आणि अस्मादिक यांचे ऋणानुबंध चांगले जमले होते. श्विनचे रुसलेले चाक अजून दुरुस्त झाले नसल्याने आजसुद्धा फुजीला संधी मिळालेली होती.

 पहाटे दोघी शेजारी शेजारी उभ्या असताना श्विनच्या नकळत मी हळूच फुजीला बाहेर काढले. फुजी कोणताही आवाज न करता हळूच पुढे आली. फुजीच्या खांद्यावर गोप्रो ऐटीत विराजमान झाला आणि त्याच्या शेजारी विजेरीही स्थानापन्न झाली. सर्व जामानिमा झाल्यावर फुजीने कूच केले. श्री अय्यर आणि नयना आघारकर आधीच घारडा सर्कल येथे हजर झाले होते. आम्ही लगेचच आपापल्या वाहनांना टाच मारली. गोप्रोचे प्राथमिक धडे अजून गिरवत असल्याने मला त्यात फार यश येत नव्हते. त्यामुळे गोप्रोचा नाद सोडत फुजी निघाली तोपर्यंत अय्यर आणि नयना आघारकर दृष्टीपल्याड पोचले होते. फुजीने वेग वाढवत त्यांना पुन्हा नजरेच्या टप्प्यात ठेवले, तेव्हा अस्मादिकांनी पुन्हा गोप्रोची खटपट केली. गोप्रो सुरु झाला खरा पण ह्या नादात फुजी पुन्हा मागे पडली होती. काही वेळातच पुढच्या तुकडीला सामील होत फुजी दौडू लागली.

बदलापूर पाइपलाइन रस्त्याला लागल्यावर तेजोनिधीचे लोभसवाणे रूप नजरेस पडू लागले. ते रूप छायाचित्रबद्ध करून फुजीने पुन्हा लय साधली.



 मनुष्यशक्तीधारी फुजीला अश्वशक्तीधारी वाहनांची भीती नव्हती, मात्र वाटेत फिरणाऱ्या श्वानांच्या टोळक्यांची मात्र चांगलीच दहशत वाटत होती. सकाळच्या वेळी हि टोळकी सुखेनैव संचार करत होती. सुदैवाने त्यांना फुजिमध्ये स्वारस्य वाटत नव्हते. तरीही सावधगिरी म्हणून श्वानपथके दिसताच फुजी वेग मंदावत असे.

कल्याण मलंगगड रस्ता पाइपलाइन हमरस्त्याला छेदतो तो नेवाळी चौक मागे टाकताच रस्त्याच्या डावीकडे कचऱ्याचे ढीग सलगपणे पडलेले दिसत होते. तिथून पुढे जलदीने जात आम्ही वैभव हॉटेलपाशी डावे वळण घेत अंबरनाथ गाठले. कधीकाळी गावाबाहेर असलेले प्राचीन शिवमंदिर आता इतर शहरांप्रमाणेच शहरवस्तीमध्येच सामावले गेले होते. बाजूने असलेली वाडवण किंवा वालधुनी नदी अंग चोरून वाहत होती. मंदिराच्या आवारात शिरल्यावर मात्र मन प्रसन्न झाले.








हे पुरातन शिवालय शिलाहार राजा छित्तराजा याने बांधले आहे. शालिवाहन शक ९८२ अर्थात ग्रेगोरियन या युरोपियन कलनिर्णयाचा इसवीसन १०६० साली बांधलेल्या या मंदिराची बांधणी छित्तराजाचा पुत्र मुम्मूनी याने केली. हे शिवालय अम्बरेश्वर शिवमंदिर या नावानेही ओळखले जाते. या शिवमंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी साधारण २० पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहाच्या मध्यभागीचे छत मात्र आच्छादित केलेले नाही. भूमीज प्रकारातील या शिवालयाचे हे अर्धवट स्थितितील काम पूर्ण केल्यास मध्य प्रदेशातील उदयपुर येथील उदयेश्वर मंदिर अथवा निलकंठेश्वर मंदिराच्या शैलीप्रमाणे तसेच सिन्नर येथील गोंडेश्वर मंदिराच्या शैलीप्रमाणे अंबरनाथच्या ह्या शिवालयाची शैली वाटू शकेल.

मंदिराशेजारील हौदातील पाणी हिरव्या रंगाचे दिसत होते. ही किमया पाण्यातील प्रदूषणाची की बाजूला असलेल्या वृक्षाच्या सावलीची हे मात्र लक्षात आले नाही. आजचा दिवस विष्णूच्या दशावतारातील आठवा अवतार असलेल्या रामाने रावणावर विजय मिळवला तो विजयादशमीचा दिवस! त्याच विजयादशमीच्या दिवशी विष्णूच्या दशावतारातील प्रथम अवतार असलेली असंख्य कूर्म अर्थात कासवे अंबरनाथच्या शिवालयाशेजारील हौदात आम्हाला दर्शन देत होती.



शिवालयाच्या प्रांगणात मन प्रसन्न झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. परतताना श्री अय्यर यांनी दाखवलेला मार्ग लांबलचक चढणीचा असला तरी ती चढण फार तीव्र नव्हती. पाइपलाइन हमरस्त्याला लागल्यावर मात्र श्री अय्यर थोड्याच वेळात दृष्टीपलीकडे पोचले. नयना आघारकर आणि फुजी यांनाही लय सापडली. नेवाळी फाटा, काटई नाका, मानपाडा पार करून सुयोग हॉटेलपाशी डावे वळण घेत आम्ही पुन्हा पेंढरकर महाविद्यालय गाठले. आजची सायकलसफर पूर्ण केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अमृतपान तर आवश्यकच! महाविद्यालयासमोरच वाफाळत्या अमृताचा आनंद घेऊन आम्ही स्वगृही परतलो. घरी पोचताना strava ने अर्धशतक झाल्याचे दर्शवल्यामुळे आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान फुजीला वाटू लागले.


फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...