रविवार, २० जुलै, २०२५

जगन्नाथाचे अमूर्त दर्शन: कोलकाता चेन्नई सायकल सफर

 जगन्नाथाच्या चमत्काराचा हा अनुभव घेत असताना मला पूर्वी ऐकलेल्या एका गोष्टीची आठवण झाली. एकदा अचानक मोठा पाऊस येऊ लागला. बरेचजण एका आडोश्याखाली उभे राहिले. थोड्या वेळातच तिथे विजा चमकू लागल्या. विजा त्यांच्या आसपासच कडाडत होत्या. त्याचा आवेग आणि आवाज वाढतच होता. सगळेजण काळजीत पडले. वेळ पुढे जात होता मात्र विजा थांबायचे नाव घेत नव्हत्या. अखेरीस एकजण म्हणाला, ' बहुतेक आपल्यातील कोणाचीतरी वेळ भरली आहे. त्यामुळे विजा इथेच घोटाळत आहेत. आपल्यातील प्रत्येकाने एकेक करून समोरच्या झाडाला हात लावून परत यायचे. ज्याची वेळ भरत आली असेल त्याच्यावर वीज कोसळेल. बाकीचे वाचतील.' हो ना करता करता सगळेजण तयार झाले. एकेकजण जाऊन परत येत होता. वीज कोणावरही कोसळली नव्हती. अखेरीस एकच व्यक्ती शिल्लक राहिली. ती मात्र जागा सोडून झाडाला शिवायला जायला अजिबात तयार होईना. सगळ्यांनी जवळजवळ जबरदस्तीने, दरडावूनच त्या व्यक्तीला तिथून झाडाकडे पाठवले. ती बिचारी घाबरत घाबरत झाडापाशी पोचली मात्र.... आणि धाडकन वीज कोसळली... ती थेट त्या आडोश्यावर. झाडापाशी पोचलेली व्यक्ती सुखरूप होती. किंबहुना जोवर तो व्यक्ती त्या आडोश्यापाशी होती तोपर्यंत बाकी सगळेच जण सुखरूप होते. आमच्याबाबतीत देखील असाच चमत्कार घडला होता.. मात्र जेव्हा अग्रीमा एकटीच राहिली तेव्हाच तिला देवाने दर्शन दिले. ही गोष्ट मी अग्रीमाला सांगितली. आम्ही सर्वजण आम्हाला आलेल्या अनुभवामुळे आश्चर्यचकित झालो होतो.

त्याच आश्चर्यात आम्ही भुवनेश्वरला पोचलो. अग्रीमा रेल्वे स्टेशनवर जाऊन पुढे कटकला जाणार होती. आम्ही सुशांतच्या ऑफिस च्या इमारतीकडे गेलो. त्या दुमजली इमारतीमध्ये तळमजला रिकामाच होता. येथील जिन्याला कुलूप होते. मध्यरात्र उलटून गेली होती. आम्ही तेथील कडी, बेल वाजवली. काहीच प्रतिसाद नव्हता. सुशांतने एका कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांक दिला होता. पण तोही फोन उचलत नव्हता. आम्ही हाका मारून कंटाळून गेलो. पहिल्या मजल्यावर कोणी राहत नव्हतेच. बहुधा आता रात्र खाली उघड्यावर काढावी लागणार असेच वाटू लागले. आजूबाजूला वस्तीही नव्हती. त्यामुळे आम्ही मोठ्या आवाजात हाका मारण्याचा सपाटा सुरू केला. अखेरीस बऱ्याच वेळाने एकजण दुसऱ्या मजल्यावरून खाली आला. त्याने जिन्याच्या दरवाजाची कडी काढून आम्हाला आत घेतले. लगेचच तो दुसऱ्या मजल्यावरील एका बेडरूम मध्ये जाऊन झोपला. हॉलला लागून दुसरी एक बेडरूम होती जिथे आमची सोय केली होती. पाहिले तर तिथे एक गादी होती. आणखी दोन गाद्या बघण्यासाठी आम्ही त्याला शोधू लागलो. त्याने दरवाजा उघडाच ठेवला होता मात्र तो निद्रादेवीच्या अधीन झाला होता. तिथे आणखी एक गादी दिसली. मात्र आणखी कोणी येणार असेल म्हणून ती ठेवली होती की आमच्यासाठी आणली होती हे कळेना. त्याला विचारायचे तर तो डाराडूर झाला होता. अखेर कोणी आले तर बघू असा विचार करून आम्ही दुसरी गादी उचलली. दोघांची सोय झाली होती. माझ्याकडे स्लीपिंग बॅग होती. मी त्यामध्ये शिरलो. आमच्या मोहिमेची सुरुवात होण्या आधी ठाण्याच्या decathlon मधून आणलेल्या स्लीपिंग बॅगचा शुभारंभ करण्याची संधी मिळाल्याने मी खुष होतो. 

आम्हाला लगेचच इतकी गाढ झोप लागली की पहाटे फटफटल्यावरच जाग आली. दुसऱ्या दिवशी समजले की आम्हाला ज्याचा नंबर सुशांतने दिला होता तो आमची वाट बघून घरी निघून गेला होता. ऑफिसमध्ये दुसरा इसम रात्री थांबला होता त्याने दरवाजा उघडल्याने आम्हाला रात्री झोपायला अंगाखाली अंथरूण आणि वर छप्पर मिळाले होते. अन्यथा प्रथमच निजायला भुई आणि पांघरायला आकाश ह्यांचा अनुभव घ्यावा लागला असता.

जगन्नाथाच्या मूर्तीने आम्हाला दर्शन दिले नसले तरी त्याने आमच्यावर कृपादृष्टी नक्कीच ठेवली होती. आम्हाला मध्यरात्री  मिळालेले छप्पर हे त्याचे अमूर्त दर्शनच म्हणायचे... की आम्हाला दरवाजा उघडून डाराडूर झालेला तो इसम म्हणजे जगन्नाथाचे आमच्यासाठी घेतलेले प्रत्यक्ष रूप समजायचे!

रविवार, १३ जुलै, २०२५

जगन्नाथाचा चमत्कार: कोलकाता चेन्नई सायकलसफर


सूर्यमंदिराचा परिसर पाहून होईपर्यंत सूर्यास्त होऊन गेला होता. कोणार्कहुन आमची गाडी पुरीकडे निघाली. कोणार्क ते पुरी हे अंतर मोटारीने साधारण तासाभराचेच होते. आम्ही पुरी येथे पोचलो मात्र अग्रिमाची गाडी अजूनही पुरीला पोचली नव्हती. तिने आम्हाला सांगितले की तुम्ही मंदिरात जा, तिथे मार्केट आहे तिथे फिरा, प्रसादाचे जेवण मिळते ते खा.....मात्र मी आल्याशिवाय मुख्य मंदिरातील दर्शन घेऊ नका. तिथे मिळणारा छप्पन भोग नक्की खाण्यास तिने सांगितले. मार्केट मध्ये फिरून आणि खाणे झाल्यावर आम्ही पुन्हा बाहेर येईपर्यंत ती मंदिरापाशी येईल असे तिने सांगितले.

ह्या मंदिराविषयी अनेक आश्चर्यकारक गोष्टी प्रचलित आहेत ज्या भाविकांना आणि संशोधकांनाही मोहित करतात. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे मंदिरावरील ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. याव्यतिरिक्त, मंदिराच्या वर कोणतेही पक्षी किंवा विमान उडत नाहीत आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी त्याची सावली पडत नाही असे म्हटले जाते. आणखी एक मनोरंजक घटना म्हणजे समुद्राचा आवाज, जो पुरीमध्ये इतरत्र ऐकू येतो परंतु मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या, सिंहद्वारममध्ये तो ऐकू येत नाही. शेवटी, महाप्रसादाची स्वयंपाक प्रक्रिया, जिथे वरच्या भांड्यात सात जणांच्या रचनेमध्ये प्रथम शिजवले जाते आणि तयार केलेले अन्न नेहमीच भाविकांच्या संख्येसाठी पुरेसे असते, हे देखील चमत्कार मानले जाते. मंदिराच्या वर असलेले सुदर्शनचक्र आपण शहरात कुठेही असलो तरी आपल्या समोर आहे असेच वाटत राहते.

हिंदू पौराणिक कथेनुसार,भगवान श्रीकृष्णाच्या मृत्युनंतर, त्यांच्या शरीराचे दहन करण्यात आले, परंतु त्यांचे हृदय, ज्याला ब्रह्म पदार्थ म्हणून संबोधले जाते, ते चमत्कारिकरित्या अबाधित राहिले. भगवान श्रीकृष्णाचे हृदय ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये ठेवलेले असल्याचे मानले जाते.


                                        


जगन्नाथाचे दर्शन घेण्यास आम्ही उत्सुक असलो तरी गाडी मंदिरापासून थोडी लांबवर थांबवावी लागत होती. गाडी थांबवून आम्ही मंदिराकडे निघालो. दोन्ही बाजूला दुकाने दिसत होती. रस्त्याला चांगलीच गजबज दिसत होती. अग्रीमाने जे मार्केट सांगितले ते मंदिराच्या आवारात की हेच जे आम्हाला गाडी थांबवून मंदिराकडे जाताना रस्त्यात दिसत होते ते... ह्याबद्दल आम्हाला संभ्रम वाटू लागला. तिने जो छप्पन भोग खायला सांगितला होता तो पदार्थ कसा असतो हेही माहित नव्हते. त्यामुळे जाता जाता रस्त्यात दिसला तरी आम्हाला कळणार नव्हते. आम्ही रस्त्यातील दुकानांकडे दुर्लक्ष करत थेट मंदिरात जायचे ठरवले. 

                                                    


रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर न्हाऊन निघाला होता. बाहेरूनदेखील मंदिराची सुंदर वास्तू मन प्रसन्न करत होती. आम्ही झपाट्याने प्रवेशद्वाराकडे जात होतो. अग्रीमाने मंदिराविषयी एक विशेष माहिती दिली होतीच ते म्हणजे मंदिरात मोबाईल, पिशव्या, चप्पल अश्या कोणत्याही गोष्टी नेता येत नाहीत. त्या ठेवण्यासाठी आजूबाजूला सरकारी आणि खाजगी कार्यालये असतात. मोबाईल नेता येत नसला तरी पैशांचे पाकीट मात्र आत नेता येत होते. अर्थात नाहीतर आतमध्ये असलेल्या मार्केटमध्ये आम्ही खरेदी कशी करू शकणार किंवा तेथील खाद्यपदार्थ तरी कसे घेऊ शकणार होतो?




एका कार्यालयात आमचे सामान ठेवून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. इथे प्रत्येक मुख्य दिशेच्या नावावरून वेगवेगळी प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर आम्ही आधी छप्पन भोग शोधायचे ठरवले. तिथे हारीने गोड पदार्थ, मिठाया ह्यांची दुकाने दिसत होती. सगळी दुकाने पाहत पाहत आम्ही पालथी घातली. शेवटी एका दुकानाकडे मोर्चा वळवला. वेगवेगळ्या प्रकाराच्या मिठाया तिथे दिसत होत्या. दुकानदाराला त्यांचे नाव विचारून आम्ही एकेक मिठाई खात होतो. छप्पन भोगही तिथे खायला मिळाला. अग्रिमाने छप्पन भोग खायला इतके वेळा सांगितले होते की तो खाणे आम्ही विसरूच शकत नव्हतो. पाच सहा प्रकाराच्या मिठाया खाऊन झाल्यावर आम्ही त्या दुकानदाराला प्रसादाचे ताटही द्यायला सांगितले. तो दुकानदार आणि तेथील सेवेकरी बोलण्यात अतिशय नम्र तसेच समोरच्याचे ऐकण्यात, समजून घेण्यात तत्पर होते. प्रसादाचे ताट संपवले पण आम्ही दर्शन घेतले नव्हते. अग्रीमा येऊन पोचली असली तरी आमचे मोबाईल बाहेर होते त्यामुळे आम्हाला कळू शकणार नव्हते. त्यामुळे आम्ही लगेचच बाहेर येऊन आमचे सामान परत घेतले. मी अग्रिमला फोन लावला तर ती माझ्या फोनची वाटच पाहत होती. आम्ही ज्या प्रवेशद्वारापाशी होतो तिथे तिला बोलावले. पुन्हा एकदा सामान एका दुकानात ठेऊन तेथील कूपन घेतले. आमच्या चौघांचेही सामान ठेवण्यासाठी दुकानदाराने एकच कूपन दिले होते.




अग्रीमाबरोबर आम्ही पुन्हा मंदिराच्या आवारात शिरलो. तिला काहीही खायला नको होते. रात्रीचे ९ चा सुमार झाला असावा. आम्ही मुख्य देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्यास उत्सुक होतो. तिथे तर चांगलीच रांग लागली होती. आम्ही गुपचुप रांगेत उभे राहिलो. १५- २० मिनिटे गेल्यावर एका सुरक्षारक्षकाने आम्हाला सांगितले मंदिरातील प्रवेश आत्ता थांबवण्यात आला आहे. तो दीड तासाने पुन्हा सुरू होऊ शकतो. आम्ही रांगेतच उभे राहिलो. आमच्या पुढेही रांगेत बरीच गर्दी होती. इतक्यात एक द्वार रक्षक आमच्याकडे आला आणि आम्हाला म्हणाला तुम्ही रांगेत न थांबता कुठेतरी बसून घ्या कारण दर्शन दीड तासानेही लगेच सुरू होणार नाही. कदाचित दोन तासदेखील मंदिर बंद राहील. आमची चलबिचल सुरू झाली कारण आम्हाला परत भुवनेश्वरला सुशांतच्या ऑफिसमधील लोकांना उठवावे लागणार होते..शिवाय पहाटे लवकर सायकलवणेही सुरू करायचे होते. त्यामुळे मी, आनंद आणि संजय ह्यांनी दर्शन न घेता परत जाण्याचे ठरवले. पण अग्रीमा ऐकायला तयार नव्हती. 

मी अग्रीमाला म्हटले आम्ही इथे तीन तास थांबूनही आम्हाला दर्शन मिळत नाहीये, आम्हाला भुवनेश्वरसाठी निघणेही आवश्यक आहे. कदाचित ही देवाचीच योजना असावी की आपल्याला त्याचे दर्शन मिळू नये. वैष्णोदेवी, अमरनाथचेही दर्शन तेव्हाच मिळते जेव्हा देवाच्या मनात तसे येते. त्यावर ती म्हणाली,'शशांक तुझे म्हणणे मला पटलेही असते, मात्र... आत्ता मी कटक स्टेशनवर जेव्हा आले तेव्हा ट्रेन सुरू झालेली होती. मी मनात म्हटले जर मी दर्शन घ्यावे अशी देवाची इच्छा असेल तर ही गाडी थांबेल. आणि क्षणभरात गाडी थांबली, मी गाडीत चढल्यावर गाडी सुरू झाली. ह्याचा अर्थ मी देवाचे दर्शन घ्यावे ही देवाचीच इच्छा आहे.' 

ह्यावर आमच्याकडे काहीच उत्तर नव्हते. तरी तिला एकटी तिथे सोडायला आमचे मन मनात नव्हते. अखेरीस मी आणि संजय बाहेर जाऊन आमचे सामान सोडवून घ्यावे, तिथे संजय थांबेल आणि मी परत अग्रिमाच्या सामानाचे कूपन घेऊन परत रांगेपाशी येईन तोपर्यंत दर्शन सुरू झाले तर ठीक असे आम्ही ठरवले. ह्या सगळ्यात आणखी १५- २० मिनिटे गेली. मात्र दर्शन अजूनही सुरू झाले नव्हते. अखेर नाईलाजाने मी आणि आनंद अग्रीमाला तिथे सोडून बाहेर आलो. संजय, आनंद आणि मी परत गाडीकडे गेलो न गेलो तोच आग्रिमाचा मला फोन आला. ज्या अर्थी तिचा फोन आला त्या अर्थी ती मंदिराच्या बाहेर आली होती, कारण फोन मंदिरात नेता येत नव्हता. मला वाटले तिनेही दर्शन न घेता परत यायचे ठरवले असावे. ती अतिशय उत्साहाने बोलली, तुम्ही थांबा मी दर्शन घेऊन बाहेर आले आहे, मी तुमच्याबरोबरच भुवनेश्वरला येत आहे. तीन- तीन तास पुरीमध्ये राहून आम्हाला दर्शन मिळाले नव्हते मात्र आमची साथ सुटल्यावर अग्रीमाला मात्र जगन्नाथाने लगेचच दर्शन दिले होते.

खरा चमत्कार एवढ्यावरच संपत नव्हता. अग्रीमा भेटल्यावर आम्ही तिला विचारले. तर ती म्हणाली,' तुम्ही गेल्यावर रांग सुरू झाली. मी आत शिरले आणि लगेचच मागच्या माणसाला द्वार रक्षकाने अडवले आणि सांगितले की रांग चुकून सुरू केली गेली, मंदिर आणखी काही काळ बंदच राहणार आहे.' म्हणजे ती रांग जणू फक्त अग्रिमासाठीच सुरू केली गेली होती. ही योजना प्रत्यक्ष जगन्नाथाचीच असू शकते.



कोलकाता चेन्नई सायकलसफर ह्या प्रवासवर्णनातील आधीच्या लेखांच्या लिंक्स:

1) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post.html

2) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_19.html

3) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/hdor-100.html

4) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_21.html

5) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_22.html

6) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_23.html

7) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_24.html

8) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_25.html

9) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_26.html

10) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_92.html

11) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_28.html

12) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post.html

13) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_2.html

14) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_14.html

15) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_16.html

16) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_17.html

17) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_18.html

18) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_76.html

19) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_20.html

20) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_21.html

21) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_22.html

22) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post.html

23) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post_13.html

24) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post_14.html

25) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post_20.html

26) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post_27.html

27) https://schwinnsafari.blogspot.com/2025/05/blog-post.html

28) https://schwinnsafari.blogspot.com/2025/05/blog-post_4.html

29) https://schwinnsafari.blogspot.com/2025/06/blog-post.html

30) https://schwinnsafari.blogspot.com/2025/06/blog-post_8.html

31) https://schwinnsafari.blogspot.com/2025/06/blog-post_15.html

32) https://schwinnsafari.blogspot.com/2025/07/blog-post.html

शनिवार, १२ जुलै, २०२५

सूर्यमंदिर: कोलकाता चेन्नई सायकल सफर

                                    

भुवनेश्वर ह्या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मांडाचा देव. शंकराला उद्देशून हे नाव आहे. मूळ शहरात अनेक मंदिरे असल्याने ह्या शहराला मंदिरांचे शहर किंवा भारतातील कॅथेड्रल शहर असेही म्हटले जाते. आम्हाला मात्र ओढ होती ती कोणार्क येथील सूर्यमंदिर आणि पुरी येथील जगन्नाथ मंदिर येथे भेट देण्याची!

थोडा वेळ वाट पाहून मी अग्रीमाला फोन केला. तर ती अजूनही कटकलाच होती. मग तिनेच सुचवले की आम्ही भुवनेश्वरहून पुढे निघावे, कोणार्क येथील सूर्यमंदिर पाहून पुरी येथे जावे. ती आम्हाला थेट पुरी येथे भेटेल. मग आम्ही तिघांनी एक गाडी करून कोणार्क, पुरी येथे जायचे ठरवले. सायकल प्रवास नसल्याने आता आम्ही निवांत असलो तरी रात्री उशीर होऊन चालणार नव्हते. खरं पाहता मला सूर्यमंदिरामागून होणारा सूर्योदय पहायचा होता. मी अग्रीमाला तसे म्हटलेही होते. पण आता मात्र आम्ही पोचणार होतो सूर्यास्तावेळी! आम्ही कोणार्क येथे पोचत असताना अग्रीमाला पुन्हा फोन केला. तिने ठरल्याप्रमाणे कटक येथून ट्रेन पकडली होती मात्र ती ट्रेन जवळपास तासभर उशिराने धावत होती. आमची गाडी मंदिरापाशी पोचत असताना सूर्य अस्ताला जाण्यास थोडा वेळ होता. गाडी पार्क करत असतानाच लक्षात आले की मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेला होते. म्हणजे सूर्योदयावेळी मंदिरामागून सूर्य उगवताना पाहता आलाच नसता तर आत्ता मात्र मंदिरामागे होणारा सूर्यास्त पाहता येणार होता. हे लक्षात आल्यावर पहाटे ऐवजी संध्याकाळी मंदिरापाशी पोचण्याच्या योगायोगाबद्दल मी खुषच झालो. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेला ठेवण्यामागे एक मुख्य कारण होते ते म्हणजे सूर्योदयावेळी सूर्याचा प्रथम किरण मंदिराच्या प्रवेशद्वारावर पडावा.



                                       




मंदिराचे आवारही चांगलेच प्रशस्त होते. मूळ मंदिरापाशी पोचण्याआधी सूर्यास्त होऊ नये म्हणून आम्ही थोडे घाईघाईने आवारात शिरलो. आवारात लांबवर दिसणारे मूळ मंदिर आणि मागे अस्ताला जाणारा सूर्य विलोभनीय वाटत होते. आवारात मोठ्या संख्येने लोक आले असले तरी ते आवार इतके मोठे होते की कुठेही गर्दी होत नव्हती. म्हणूनच आम्ही जलदीने पुढे जाऊ शकत होतो. भारतातील ठिकठिकाणचे लोक तिथे आले होते.




त्यातही हा गोतावळा पाहून राजस्थानची आठवण येत होती. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील राजस्थानातील लोक देशाच्या पूर्व किनाऱ्यावर चांगलेच विसावले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान, शांतता आणि निश्चिंत भाव भारताच्या एकतेची साक्ष देत होते.

कोणार्क हा शब्द कोन आणि अर्क (सूर्य) ह्या दोन शब्दांपासून बनला आहे ज्याचा अर्थ सूर्याचा कोन असा होतो. कोणार्क येथील मन्दिराचा परिसर, मूर्तिकाम भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत होते. ह्या मंदिराचे बांधकाम तेराव्या शतकात राजा नरसिंहदेव ह्यांच्या काळातील आहे. हे मंदिर बांधण्यासाठी १२०० कामगार १२ वर्षे काम करत होते. ह्या मंदिराविषयी अशी दंतकथा सांगितली जाते की ह्या मंदिराचा वास्तुविशारद बिसु मोहराणा आपले गाव सोडून येथे कामात मग्न झाला होता. त्याचवेळी त्याला एक पुत्र झाला. हा पुत्र देखील या कार्यशाळेचा एक भाग बनला आणि मंदिराचा घुमट बांधल्यानंतर, जो त्याचे वडील पूर्ण करू शकले नाहीत, त्याने अंतराळात उडी मारून आत्महत्या केली.


कोणार्क सूर्य मंदिर सूर्यदेवाच्या रथाच्या स्वरूपात बांधले आहे. त्यात २४ तासांचे प्रतिनिधित्व करणारी २४ चाके आणि आठवड्याचे सात दिवसांचे प्रतिनिधित्व करणारे सात घोडे आहेत. मंदिराच्या भिंती आणि खांबांवर उत्कृष्ट कोरीवकाम आहे,ज्यामध्ये देव-देवता, पौराणिक कथा, दैनंदिन जीवन आणि कामुक दृश्ये दर्शविली आहेत. मंदिराची वास्तुकला आणि शिल्पकला भारतीय कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी म्हटले होते की हे असे स्थान आहे की जिथे दगडांच्या भाषेपुढे माणसांची भाषा देखील खुजी ठरते.

कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या स्मारकांपैकी एक आहे. १९८४ मध्ये युनेस्कोने ह्या मंदिराला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. ह्या मंदिराला ब्लॅक पॅगोडा असेही म्हटले जाते. मंदिराची आता बऱ्याच प्रमाणात पडझड झाली आहे. मंदिरातील गर्भगृहदेखील बंदच झाले असल्याने येथे पूजा अर्चा केली जाऊ शकत नाही. १९०३ मध्ये मंदिराची अवस्था लक्षात घेऊन ब्रिटिशांनी गर्भगृह रेती भरून बंद केले तसेच गर्भगृहात जाण्याचे सर्व दरवाजे बंद केले. अर्थात ह्या आधी आतील सर्व मूर्ती काढण्यात आल्या होत्या असे सांगितले जाते.

कोणार्क मंदिराच्या बांधकामात ५२ टनाचा एक चुंबक वापरण्यात आला होता. असे म्हटले जाते की तो चुंबक मंदिराच्या शिखरावर होता. कोणार्क समुद्रातून जाणारी अनेक जहाजे त्याकडे आकर्षित झाल्यामुळे लोहचुंबक जागेमुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले. तसेच, हे चुंबक समुद्रातील जवळजवळ सर्व जहाजांच्या कंपासला त्रास देत असे. म्हणून, त्रासाचे कारण दूर करण्यासाठी, पोर्तुगीज लोकांनी हा लोहचुंबक चोरला. मंदिराची पडझड होण्यासाठी मुस्लिम आक्रमणाबरोबर हेही कारण सांगितले जाते.

आम्ही मुख्य मंदिराजवळ जात असताना सूर्यही अस्ताला जात होताच. मुख्य मंदिराभोवती मोठी प्रदक्षिणा घालावी लागणार होती. आम्ही ती प्रदक्षिणाही घाईघाईने पूर्ण करत होतो. मात्र त्याभोवतीची शिल्पकला आमची गती कमी करत होती. पण आम्हाला ती शिल्पकला पाहता यावी ह्यासाठी जणू आमच्यासाठी सूर्याने त्याच्या अस्ताला जाणाऱ्या प्रवासाची गती संथ केली होती. 









मंदिराच्या मुख्य वास्तूची पडझड मन खिन्न करत होती मात्र तरीही त्या मंदिराची भव्यता भारताच्या समृद्ध वास्तुकलेची, स्थापत्य शास्त्राची जाणीव करून देत होती. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही ह्याची नोंद घेत दहा रुपयांच्या नोटेवर कोणार्क सूर्यमंदिराला स्थान दिले आहे.

आम्ही ती वास्तू डोळे भरून पाहिली. तेथून बाहेर पडताच मराठी भाषा कानावर पडली. महाराष्ट्रातील डॉक्टर मित्रांचा एक गट कुटुंबाबरोबर पर्यटनासाठी तिथे आला होता. त्यांना आमची मोहीम समजल्यावर तेही खूप खूष झाले, आमच्याबरोबर त्यांनी फोटोही काढून घेतले.


मंदिराबाहेर चहाचा आस्वाद घेत अग्रीमाला फोन केला. तिची गाडी अजूनही उशिराने येणार असल्याचे समजले. त्यामुळे तिने आम्हाला पुढे पुरी येथे जाण्यास सांगितले. 

( https://youtu.be/NPNmg1UfICQ ह्या यूट्यूब लिंकवर जाऊन आपण मुख्य मंदिराभोवतीचे दृश्य पाहू शकता.)

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...