रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

आम्ही पेडलकर




दोन तीन दिवसांपासून पेडल रिपब्लिक च्या सदस्यांना ठाणे येथील ' आम्ही पोहेकर ' चे वेध लागले होते. तसे सगळेजण रोजच २५-३० किमीचा पल्ला गाठत. मात्र पोहे खाण्यासाठी जाऊन येण्याचा पल्ला हा ७५ किमी चा होता. तसे हे ' पेडलकर ' रसनेचे गुलाम. तिच्यासाठी हे ७५ किमी चे लक्ष्य विशेष नव्हते.

कार्तिक महिन्याचा आज अखेरचा दिवस म्हणजे दिनांक ३० कार्तिक. वास्तविक दिनकर दक्षिण गोलार्धात जाऊन दोन महिने पूर्ण होत होते. तरीही वातावरणात अजूनही किंचित गारवाही नव्हता. किंबहुना पहाटे ६ वाजता फुजी घराबाहेर पडली तेव्हा तिचे स्वागत केले पावसाच्या सरींमुळे रस्त्यावर पसरलेल्या चिखलाने! फूजिला तसा नेहमीप्रमाणे उशिरच झालेला. ' पेडल ' चे इतर सदस्य PR नाक्याहून निघाले तेव्हा फुजी घर सोडत होती. इतर सदस्य पेंढरकर महाविद्यालयामार्गे जाणार असले तरी फूजिने मानपाडा रस्त्याने जात त्यांना सामंत पेट्रोल पंपापाशी गाठले.

रविराजांचे अजूनही क्षितिजावर आगमन झाले नव्हते. मात्र त्यांच्या किरणांनी श्रीमलंगगडावर जमलेल्या ढगांना सुंदर रंगात रंगवले होते.


फुजी ह्या दृश्याने मोहित न झाल्यासच नवल. पेडलकर मात्र नाकासमोर पाहत सायकलवत होते. त्यामुळे फुजी त्या रंगाच्या फार मोहात न अडकता पुढे निघाली. थोड्याच अंतरावर रमेशकाका दिसत होते. त्यांना गाठत फुजी त्यांच्या बरोबरीने जाऊ लागली. कल्याण फाट्यापुढील चढ तसा परीक्षा घेणाराच. महाविद्यालयीन काळात झुडुपात लागलेली कच्ची करवंदे खाण्यासाठी काळ्या घोड्यावरून येताना खरी मजा असायची. मात्र दात्यांची जुळवाजुळव करण्याची यंत्रणा असणाऱ्या फुजीला ती गंमत कळणे शक्य नव्हते. चाकांची साखळी खालच्या दात्यांवर आणत फुजीने तो चढ सहजच पार केला. खिंड ओलांडत महापेच्या दिशेने जाताना पेडलकरांनी लय साधली. सगळेजण वेगात जाऊ लागले. इतक्यात ठाण्याहून आलेल्या संजय दात्ये ह्यांनी सगळ्यांचे स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सगळ्या चमूने औद्योगिक परिसरातून पुढे धाव घेतली. रबाळे इथे सगळेजण बेलापूर ठाणे महामार्गाला लागले. सगळ्यांनी वेग घेतला असतानाच ऐरोली रेल्वे स्थानकापाशी थांबा घेतला गेला.

तेथून मात्र आता थेट ठाणे गाठायचे ठरले. कळवा पुल, तलावपाळी मार्गे जाताना फुजिला cycle2work चे दिवस आठवत होते. लवकरच सगळे ' आम्ही पोहेकर ' पाशी पोचले. 

सगळ्यांचे लक्ष शेजारील वऱ्हाडी मिसळ कडे जात होते. मात्र आजचे लक्ष्य मिसळ नव्हे तर पोहे होते. पोह्यांचे इतके प्रकार पाहून नक्की कोणते पोहे घ्यावे हेच समजेनासे झाले होते. मात्र पोहेकरांनी ती समस्या चुटकीसरशी सोडवली. त्यांनी पेडलकरांची चव अचूक ओळखत त्यांना नागपुरी तर्री पोहे घेण्याचे सुचवले. त्यांच्या सूचनेला मान दिल्याबद्दल पेडलकरांना पश्र्चाताप झाला नाहीच. चव उत्तमच होती. सौमित्र आणि प्रसाद अधून मधून पोहेकरांची विशेष मुलाखत घेत होतेच. पोहे खाऊन झाल्यावर सगळ्यांचा मोर्चा वळला तो फलाट क्रमांक १ समोर उभ्या असलेल्या ऐतिहासिक इंजिनाकडे

पोटोबा आणि इंजिन दर्शन झाल्यावर मात्र सगळ्यांना घरी परतायचे वेध लागले. सगळ्यांनी झपाट्याने वेग घेतला. ऐरोलीजवळ विनीत आणि स्वप्नीलने इतरांचा निरोप घेतला. फुजी, डॉ राहुल, कुणाल, श्रेयश झपाट्याने पुढे गेले. त्यांनी रबाळे गाठत थांबा घेतला. बराच वेळ बाकी सदस्य न आल्यामुळे फुजीने प्रसादला संपर्क साधला....
तेव्हा समजले रमेशकाकांच्या सायकलच्या रबरी नळीने राम म्हटला होता. अर्थात डॉ. राहुल आज बरोबर असल्याने चिंता नव्हतीच. डॉ राहुल व्यायसायिक डॉक्टर आहेतच त्याच बरोबर सायकलची शस्त्रक्रिया करण्यातही निष्णात आहेत. 



डॉ राहुलच्या मार्गदर्शनानुसार शस्त्रक्रिया पार पडल्यावर जत्था पुन्हा परतीच्या मार्गाला लागला. कार्तिक महिन्याची अखेरची म्हणजे ३० तारीख असूनही अजून थंडी सुरू झाली नव्हती. रवीराजांची उपस्थिती अजूनही आल्हाददायक वाटू लागली नव्हती तर त्रासदायकच होती. मात्र आज रवीराजांचे दाहक शस्त्र ढगांच्या छत्रछायेने रोखून धरले होते.
त्यामुळे डोके शांत राहत असले तरी घसा कोरडा पडत होताच. कल्याण फाटा येथे लिंबू सरबताचा लाभ घेताच सगळेजण तृप्त झाले. खरतर सरबत प्यायलावर ' ये दिल मांगे मोअर ' अशी अवस्था होती. पण पुन्हा एकदा डोंबिवली मध्ये प्रवेश केल्यावर पेंढरकर महाविद्यालयापाशी ' शांताराम सरबत ' चा लाभ घेण्याचा करार करत सगळेजण पुढे निघाले. वास्तविक शांताराम आता गाडी चालवत नसून त्याचा मुलगा ती गाडी (आणि गादी) चालवतो. शांताराम सरबत अजूनही फुजीला भूतकाळात घेऊन जाते. महाविद्यालयीन काळात हे सरबत म्हणजे चैन वाटत असे. प्रसादच्या बाबतीतही तीच अवस्था होती. 

अर्थातच आजच्या सायकल फेरीचा शेवट शांताराम सरबत घेऊन होणे स्वाभाविकच होते.



शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

कार्तिकीचे दान




पौर्णिमा असली की सोमराजांचे रुप अधिकच बहरते. त्यात आज कार्तिकी पौर्णिमा अथवा त्रिपुरारी पौर्णिमा. शिवाने त्रिपुरासुराचा वध केला तो दिवस. अर्थात प्रत्यक्ष देव दिवाळी म्हणजे देवांच्या दिवाळीचा दिवस. तसेच विष्णूचा प्रथम अवतार मत्स्य ह्याचा जन्म झाला तो दिवस. प्रत्यक्ष ब्रह्मदेवांसाठी चार दिवसांसाठी पुष्कर येथे वार्षिक उत्सव आयोजित केला जातो तो संपन्न होण्याचा हा दिवस. (ह्या उत्सवात जगभरातील सगळ्यात मोठा उंट मेळाही भरतो. ३ वर्षांपूर्वी ह्या उत्सवाला १० लाख लोक येऊन गेल्याची नोंद आहे.)
प्रत्यक्ष ब्रम्ह, विष्णू आणि शिव ह्यांच्यासाठी विशेष असलेल्या दिवशी सोमराज प्रसन्न असणे स्वाभाविकच.

सोमराज जरी प्रसन्न असले तरी रविराज दक्षिणेकडे मार्गस्थ होऊन दीड महिना होत होता. त्यामुळे हल्ली रविराज थोडा आळस करू लागले होते. रविराजांचे आगमन जरी थोडे उशिरा होत असले तरी ते अजूनही थोडे लवकरच तेजाने झळकू लागत. त्यामुळे रविराज डोक्यावर येण्या अगोदर आपण घरी परतणे आवश्यक आहे ह्याची खूणगाठ बाळगत फुजी बरोबर रमेशकाका आणि प्रसाद उषःकालीच मार्गस्थ झाले. PR नाका सोडला तेव्हा अजून रविराज क्षितिजावर यायचे होते. पेंढरकर महाविद्यालयामार्गे शिळ कल्याण हमरस्त्याला लागल्यावर मात्र फटफटू लागले होते. तिघेही एकामागोमाग एक जात होते. हळूहळू लय साधत होती. मात्र वेग पकडला नव्हता. तिघांच्या गप्पा सुरू होत्या. पुढील कार्यक्रमाविषयी चर्चा सुरू होती. पत्रिपुलामार्गे दुर्गाडी पुल ओलांडल्यावर मात्र फुजीला स्फुरण चढले. ती झपाट्याने जाऊ लागली. रमेश काका आणि प्रसाद पाठोपाठ होतेच. 

रांजनोलीच्या पुढे ठाणे नाशिक महामार्ग ओलांडल्यावर उन्नत मार्गाने जाता येईल का याची तिघजण चाचपणी करू लागले. मात्र उन्नतमार्ग वंजारपट्टीच्या दिशेने जायला बंद असल्याचे लक्षात आले. खालून जाणारा रस्ता चांगल्या स्थितीत नव्हता तसेच रहदारीचाही होता. मात्र आता इलाज नव्हता. तिथून झपाट्याने मार्ग काढत तिघांनी शेलार गाव गाठले. तिथेच डावे वळण घेताच औद्योगिक गाळ्यांनी वेढलेल्या आणि फुटक्या रस्त्याने तिघांचे स्वागत केले. मात्र अजून तिथे फारशी रहदारी सुरू झाली नव्हती. थोड्या वेळातच जूनांदुरखी गावाजवळ तिघ पोचले. एव्हाना रमेशकाका आणि प्रसादने आघाडी घेतली होती. त्यांच्या पाठी एक मालवाहू वाहन जात होते. रमेश काका आणि प्रसाद ह्यांना गाठून पुढे जाण्यासाठी ते धुड अपयशी ठरत होते आणि त्या वाहनाच्या मंदावलेल्या वेगामुळे फुजीचाही वेग मंदावत होता. रस्ता अरुंद असल्याने फुजिला बाजूनेही पुढे जाता येत नव्हते.
त्या वाहनामागे लगोलग राहिल्यामुळे त्या फुटक्या रस्त्यातील खड्डे फूजीला दिसत नव्हते. अश्याच एका खड्यात फुजीचे मागचे चाक थोडे आपटल्याचे अस्मादिकांना जाणवले. थोडा अंदाज घेत फुजिने मार्गक्रमण सुरूच ठेवले. फुजी व्यवस्थित मार्ग कापत असली तरी अस्मादिकांनी एकदा तिची प्रकृती पाहण्याचे ठरवले. दुर्दैवाने अस्मादिकांचा अंदाज खरा ठरला. फुजीच्या मागच्या चाकातील हवा किंचित कमी झाली होती. भ्रमणध्वनीद्वारे प्रसादला कळवताच तो आणि रमेश काका लगेचच परत आले.
समोरच एक चाळवजा वाडा दिसत होता. समोर अंगणही होते. प्रसादने लगेचच तिथे जाऊन फुजीवर उपचार करायचे ठरवले. फूजीच्या मागच्या चाकातील रबरी नळीचे हे वर्षभरात पाचवे छिद्र होते. (गेल्याच रविवारी चौथे छिद्र बुजवण्याचा योग आला होता). आताही हे छिद्र बुजवण्याचा जामानिमा अस्मादिकांकडे होता. मात्र प्रसादने नवी रबरी नळीच उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर ती नळीच बदलण्याचा निर्णय घेतला गेला. 

फुजिवर उपचार करण्यात तिघेही शल्यविशारद पराकाष्ठा करत होते.



जवळपास पाऊण तास ह्या शल्यक्रियेमध्ये गेल्यावर फुजी पुन्हा एकदा सज्ज झाली. आता मात्र तिघांनी पारोळला जाण्याऐवजी आणखी चार पाच किमी वर जाऊन लगेच परतायचा निर्णय घेतला. चिंबिपाडा येथे पोचताच अस्मादिक आणि रमेशकाकांना येथील चहाकेंद्रावर मागील खेपेस थांबल्याची आठवण झाली. केरळहून काश्मीरला निघालेल्या हशिमला साथ करत तेव्हा दोघं डोंबिवलीहून शिरसाड फाटा पर्यंत ह्याच मार्गाने गेले होते. ती आठवण जागवत आजही त्याच चहाकेंद्रावर थांबा घेतला.



 चहाबरोबरच गप्पाही छान रंगल्या होत्या. एव्हाना रविराज त्यांचा राग आळवू लागले होते. त्यांची मैफिल रंगात येण्याअगोदर आम्हाला घर गाठायचे होते. त्यामुळे तेथूनच आम्ही परतीचा निर्णय घेतला. आजूबाजूला हिरवा रंग पसरला होता. त्या वृक्षराजीने आमच्यावर छत धरल्यामुळे रविराजांचा आमच्यावरील हल्ला थोपवला गेला होता. त्या वृक्षराजीच्या आम्ही मोहात न पडलो तरच नवल!


तेथील निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुन्हा परतीचा मार्ग धरला. इतक्यात समोरून एका तीन चाकी सायकलवरून एक कुल्फिवाला येताना दिसला. तो वर्दी देत असतानाच आसपासच्या पाड्यातील लहान मुले तिथे आली. त्यांना पाहून प्रसादने त्या मुलांना कुल्फी देऊ केली. 



त्या मुलांनी कुल्फी घेत पळ काढला खरा, पण त्यांना मिळालेल्या कुल्फिची वर्दी आता आख्या पाड्यावर पसरली होती. प्रसादने कुल्फिदान करून कार्तिकी पौर्णिमेचे पुण्य कमावले खरे मात्र ती बातमी पाड्यावर पसरताच मुलांचा लवाजमा वाढू लागला. तसा प्रसादला पुढील प्रसंगाची चाहूल लागली. तिघेजण पटापट स्वार झाले आणि मार्ग कापू लागले. पुन्हा एकदा शेलार गावाजवळील औद्योगिक परिसर -भिवंडी मार्गे रांजनोली गाठली. तिघांचे घसे कोरडे पडले होते. रविराज अधिकच तप्त झाले होते. निंबू शिकंजी चा आधार घेत आम्ही इंधन भरून घेतले. थोडा वेळ थांबल्यामुळे रविराजांचा त्रागा कमी झाल्यासारखे वाटले आणि अंतरात्मा ही थोडा शांत झाला.



वाटेत ९० फुटी रस्त्याला पुन्हा एकदा नेहमीच्या ठिकाणी अस्मादिकांनी निंबु शिकंजीसाठी थांबा घेतला. तिथे पुन्हा एकदा तृप्त होत तिघांनी आपापले घर गाठले तोपर्यंत रविराजाने मात्र मध्यान्हीची वेळ गाठली नव्हती.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...