शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग १०: कोलकातातील मोर्चेबांधणी:कोलकाता चेन्नई सायकलसफर



आमच्या सायकलमोहिमेची पूर्वतयारी सुरू होती ती केवळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापुरती मर्यादित नव्हती. आमची मोहीम होणार होती पूर्व किनारपट्टीलगत. तेथील मोर्चेबांधणी तर जास्त महत्त्वाची होती. पूर्व किनारपट्टीलगत माझ्या थेट ओळखीत चेन्नई वगळता इतरत्र कोणीच नव्हते.

माझी सायकल भ्रमंती जिच्यामुळे सुरू झाली, ती माझी मावशी डॉ निरुपमा भावे येथेही मदतीला आली. वास्तविक तिने सुद्धा ह्या मोहिमेत सहभागी व्हावे ही माझी मनापासून इच्छा होती. पुण्यामधील पुणे सायकल प्रतिष्ठान (PCP) ची ती सदस्य. तिच्यामुळेच माझी पहिली सायकलसफर इंदोर ते झाशी मी साधारण १६ वर्षांपूवी केली होती. भारताच्या मध्यभागात पहिली सायकल सफर केली तरी भारत परिक्रमा करण्यासाठी माझ्या पुढील मोहिमा मात्र मी मुख्यतः भारताच्या सीमाभागावरूनच करत होतो. कोलकाता येथे राहणारे डॉ मुकुंद केळकर ह्यांचा संपर्क मावशीने मला दिला. ते तिचे दिर! पण महत्वाचे म्हणजे ते स्वतःही सायकलपटू होते. त्यांच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला तेव्हाच त्यांचा दिलखुलास स्वभाव लक्षात आला. केवळ नातेच नव्हे तर सूरही पहिल्याच संवादात जुळले होते.

मला कोलकाता येथील संपर्क मुख्यतः हवा होता ते ह्यासाठी की कोलकाता येथे पोचेपर्यंत सायकलचे काही नुकसान झाले तर तिथे आम्हाला कोणीतरी सायकल दुरुस्ती देण्यासाठी तयार असेल. केळकरांनी तर आम्हाला थेट घरी रहायलाच यायचे आग्रहाचे निमंत्रण दिले. किंबहुना आमच्या तिघांच्या सायकली देखील आधीच कुरिअरने त्यांच्याकडे पाठवण्याची सूचनाही केली. ते स्वतः सायकलिस्ट असल्याने कोलकाता येथील ड्रीम बाईक ह्या सायकल दुकानाचे मालक श्री शाह ह्यांचा संपर्क क्रमांकही दिला.

ड्रीम बाईक चे शहा हे तर आणखीच उत्साही व्यक्तिमत्व. त्यांच्याशी बोलताना असे जाणवलेच नाही की आम्ही प्रथमच एकमेकांशी बोलतोय. त्यांचे बोलणे अतिशय आश्वासक होते. विमान, रेल्वे, रस्ता कोणत्याही मार्गाने सायकल कोलकाता येथे पोहोचू देत, कोलकाता येथे जिथे सायकल प्रथम उतरेल तिथे येऊन सायकलसाठी जी काही मदत लागेल ती करण्याची त्यांनी पूर्ण ग्वाही दिली. माझी मोहीम ऐकून शहा अतिशय खुश झाले होते... त्यांना आमच्या मोहिमेविषयी वाटत असणारे कौतुक त्यांच्या शब्दाशब्दात जाणवत होते. खरतर ड्रीम बाईकचे शहाच काय डॉ केळकर ह्यांनाही मी अजून पाहिले नव्हते.

केळकरांनी राहायला यायचे आग्रहपूर्वक सांगितले होतेच. मात्र ह्याही शिवाय मी couchsurfing ह्या साइट वरून कोलकाता येथे संपर्क साधला होता तो तौपाली चक्रबोर्ती हिच्याशी. Couchsurfing ही अशी एक व्यवस्था आहे की जेथील सदस्य हे एकमेकांना प्रत्यक्ष ओळखतही नसतात. मात्र एखाद्या सदस्याला कोठे राहायची व्यवस्था हवी असेल तिथे राहणाऱ्या इतर सदस्यांकडे तो राहण्याची विनंती करू शकतो. ज्यांना विनंती केली आहे ते सदस्य त्या विनंतीला स्वीकारून राहण्याची आणि इतर जी जमेल ती व्यवस्था करून देतो. अतिथी देवो भव ही संस्कृती असलेल्या भारतात ही पद्धत सध्या अजून रुजू पाहत असली तरी पश्चिमात्य देशात ही संस्कृती उदयास आली आहे. प्रत्यक्ष ओळख नसली तरी couchsurfing मार्फत आपली राहण्याची सोय होऊ शकते. couchsurfing ही तटस्थ संस्था सदस्यांचे प्रोफाइल ऑनलाईन verify करत असते.

 तौपालीला मी आमची राहण्याची सोय विचारली तेव्हा तिने लगेचच तिच्या घरी राहायला येण्याविषयी कळवले होतेच. शिवाय तिच्या घरी बंगाली खाद्यपदार्थांची मेजवानीदेखील आम्हाला ती देईल असे सांगितले होते. तिच्या घरी रहायची सोय होणार होती ह्या समाधानापेक्षा तिथे बंगाली खाद्यपदार्थांची मजा लुटता येईल ह्याचेच मला जास्त आकर्षण वाटत होते.

कोलकाता आमचे पूर्वेकडील पहिले ठिकाण असणार होते. अर्थात येथील व्यवस्था आमच्यासाठी खूप जास्त महत्वाची होती. कोलकाता येथील वास्तव्याची आणि खानपानाची व्यवस्था इतकीच मर्यादित नव्हती. कोलकाता शहरातील आणखी एक महत्वाचे केंद्र... त्यांनाही मी संपर्क साधला....

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग ९: दोस्ती आणि लय: कोलकाता चेन्नई सायकलसफर




पाली हे अष्टविनायकाचे स्थान महड प्रमाणेच रायगड जिल्ह्यात आहे. आनंद भेटल्यावर जांभूळपाडा येथे जेवून पाली येथे बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन पुढे इंदापूरला जायचे असा आमचा मूळ बेत होता. मात्र आमच्या सरावपरीक्षेचा पेपर थोडा अवघड निघाला असल्याचे लक्षात आले.

आनंदला वाटेत काहीही खायलाही मिळाले नव्हते. त्यामुळे त्याने देखील आमच्याप्रमाणेच अनिकेत हॉटेल मध्ये मिसळ फस्त केली. मी आणि संजयने पुन्हा एकदा चहा रिचवला.

सूर्यास्ताच्या आधी मुक्कामी पोचायचे हा माझा शिरस्ता. वेळेचे गणित मांडता सूर्यास्ताआधी इंदापूर गाठायचे असेल तर पालीला ३- ३.३० पर्यंत पोचलो तरच बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायचे असे मी आणि संजयने ठरवले होते. जर तोपर्यंत पोचू शकलो नाही तर बल्लाळेश्वराची आम्ही ह्यावेळी दर्शन घ्यायची इच्छा नाही असे समजायचे हे आम्ही ठरवले होते. साधारण एक वाजता आम्ही पोचू असा अंदाज असताना ३.३० च्या सुमारास आम्ही खुरवले फाटा येथील हॉटेल अनिकेतपाशी म्हणजे पालीच्या जवळपास ९ किमी मागेच होतो. अर्थातच बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायला आता वेळ उरला नव्हता. आनंदचेही मत तेच होते. बल्लाळेश्वराला वेशीवरूनच नमस्कार करुन आम्ही पुढे निघालो. पालीहून पुढे वाकण फाट्यापर्यंतचा रस्ता वळणावळणाचा आणि अरुंद असला तरी निसर्गरम्य आहे. एका बाजूला खळखळणारी नदी साथ करत असताना सायकल चालवण्याचा आनंद काही औरच. 

सुकेळ खिंडीचा रस्ता मात्र रुंद झाल्यामुळे तेथील घाट जाणवला नाही. अर्थातच तेथील सुरुवातीच्या चढाची तीव्रता कायम होतीच. फुजीचा रोजचा सराव साधारण २५०- ३०० मीटर चढाचा होता. आनंद आणि संजय ह्यांना मात्र चढाचा सराव फार नव्हता. त्यामुळे ते जरा मागे पडले. मात्र नंतरच्या उताराची मजा त्यांनी नक्कीच घेतली.

https://youtu.be/PcjVGEX6mgU?si=rXJ0hBlm7nZ79hZH



सुकेळ खिंडीने दोघांची परीक्षा पाहिली होती. त्यामुळे दोघांचा वेग फारच मंदावला होता. जेवणाची वेळ चुकल्याने पुढे चहाची वेळही चुकली होती. त्यामुळे थोडा वेळ त्यांच्या वेगाशी जुळवण्याचा प्रयत्न केल्यावर थोडे पुढे जाऊन चहा केंद्र बघावे असा विचार करत फुजी पुढे निघाली. आमच्या वेगापेक्षा भास्कराचार्य अधिक वेगाने घरी निघाल्याने कोलाड येथे पोहोचेपर्यंत अंधार पडू लागला होता. चहा तर हवाच होता, पण आता थोडी भूकही जाणवू लागली होती. खरतर इंदापूर आता जेमतेम १० किमी अंतरावर होते. आनंद आणि संजय येईपर्यंत चहाकेंद्र पाहावे असा विचार करत असतानाच माझी नजर गेली ती... एका छानश्या दुकानाकडे...




...'दोस्ती चहा' कडे. सकाळी 'चायवर दोस्ती ' झाली होती आता 'दोस्ती चहा' सापडला होता.

मी त्या नावाच्या प्रेमातच पडलो. दोस्ती आणि चहा दोन्ही शब्द जिव्हाळ्याचे. आनंद आणि संजय येताच आम्हा तिघांच्या सायकली जरा विसावल्या.

आम्ही मनसोक्त चहापान केले. बिस्किटांचे इंधनही जठराग्नीला अर्पण केले. मात्र एव्हाना पूर्ण अंधार पडला होता. मग आम्ही तिन्ही सायकली एकामागोमाग चालवू लागलो. कोलाडहून बाहेर पडताना रस्ता थोडा अरुंद होता. पण पुढे जरा प्रशस्त रस्ता मिळाला. कोलाड ते इंदापूर अंतर आम्ही अंधारातच पूर्ण केले. सायकलींच्या पुढील विजेऱ्या आणि शेपटाकडील दिवे ह्यांचा उपयोग पुरेपूर जाणवत होता. 

इंदापूरला आमचे आतिथ्य अतिशय अगत्याने झाले. आनंद आणि संजय एकदम खुष झाले होते. जेवण तर छान होतेच शिवाय शतकी सायकलसफर झाल्याने झोपही शांत आणि गाढ लागली होती. 

सकाळी चहापान करून लवकरात लवकर नाश्त्यासाठी  नामदेवाडीला आनंदचे घर गाठायचे आणि सूर्यास्ता अगोदर स्वतःचे घर गाठायचे असा बेत होता. एकंदर परिसर अतिशय निसर्गरम्य होता. 

पुन्हा एकदा सुकेळखिंड पार करून वाकण फाटा गाठला. चहाची गरज होतीच. मात्र तिथून जवळच नागोठणे होते. तेथील डॉक्टर सुनील पाटील ह्यांनी चहापानासाठी बोलावले असल्याचे आनंदने सांगितले. डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीने आमची आपुलकीने चौकशी केली आणि आमच्या मोहिमेसाठी शुभेच्छाही दिल्या. चहाची अपेक्षा होती मात्र तिथे पुरणपोळीही मिळाली. जठराग्नी अगदी शांत झाला होता. विश्रांतीही छान झाली होती. आता आम्ही महामार्ग सोडून नामदेव वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो होतो. रस्ता अरुंद होता मात्र रहदारी कमी होती. ह्या निसर्गरम्य रस्त्याने जात असताना आनंदचा हेवा वाटत होता.




ह्या सुंदर, निसर्गरम्य रस्त्याने नामदेववाडीला कधी पोचलो हे समजलेही नाही. नामदेववाडी येथे उत्तमच पाहुणचार झाला. गरमागरम जेवण, गावरान मेवा ह्यांची रेलचेल होती. खरतर तिथून पाय निघतच नव्हता. आनंद इथेच थांबणार होता. त्याचा खरोखरच फार हेवा वाटत होता. आम्हीही थोडा आराम करून निघालो. मात्र आज तरी सूर्यास्ताच्या आत राईड संपवायची होती. मी आणि दाते सुसाट निघालो. कर्नाळाच्या जवळ एक छान दृश्य दिसले. महामार्ग चांगलाच रुंद होता. येथे वाहनेही सुसाट वेगात जात असतात. मानवाच्या सोयीसाठी आपण जंगलाचे विभाजन करत असतो. प्राणीजीवन मात्र ह्यामध्ये भरडले जाते. कधी कधी जोडीदारातील एकजण रस्त्याच्या एका बाजूला तर दुसरा दुसऱ्या बाजूला असतो. अशा वेळी भर वेगात जाणाऱ्या वाहनांखाली चिरडून अनेक प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. किंबहुना सह्याद्री रांगा मधील काही दुर्मिळ प्राणी तर ह्यामध्ये नष्टही होत आहेत. मात्र कर्नाळा येथे रस्त्यावर उंचावर एक झुला दिसत होता. किमान माकडांसाठी तरी त्यामुळे रस्ता ओलांडायला मदत होत होती.

https://youtu.be/x3iFCum8RCc?si=viz2YTdNpAX5_v4o



पुढे क्षणभर विश्रांती येथे लसीचा अपवाद वगळला तर कुठेही न थांबता थेट महापे गाठले. महापे येथे पुन्हा एकदा चहा घेऊन मी आणि दाते दोन दिशांना निघालो. संजयने ठाण्याचा रस्ता पकडला तर मी परत डोंबिवलीकडे निघालो. दाते आणि माझी लय पुन्हा एकदा साधली गेली होती. आनंदबरोबर मात्र फार मोठी राईड झाली नव्हती. 

पूर्वतयारी भाग ८: सराव परीक्षा: कोलकाता चेन्नई सायकल सफर.


इंदापूर... माझी सासुरवाडी, तर नागोठणे - अलिबाग मार्गावरील नामदेववाडी येथे आनंदचे घर. त्यामुळे आम्ही सरावासाठी डोंबिवली इंदापूर नामदेव वाडी डोंबिवली असा मार्ग निवडला.

आम्ही तिघे तीन ठिकाणी राहणारे, त्यामुळे कळंबोली येथे भेटायचे ठरवले होते. मात्र आनंद नामदेवाडीला आधीच पोचला असल्याचे समजले. त्याचा सराव तिथे सुरू होता. संजय आणि मी कळंबोलीला भेटलो. दोघांची साधारण ३० किमी राईड झाली होती. मात्र दोघेही उत्साहात होतो. त्यामुळे आणखी थोडी राईड करून नाष्टा करायचे ठरवले. चौक फाट्याजवळ एक छानसे उपहारगृह मला माहित होते... चाय दोस्ती...





उपहारगृहाचे नाव आकर्षक आहेच शिवाय नाष्टाही इथे छान मिळतो. तिथे नाष्ट्यावर ताव मारून पुढे निघालो. पुढे वाटेत महामार्ग सोडून एक किमी वर महड गणपती मंदिर असल्याचे माहीत होतेच. वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी सायकलचे चाक आपोआपच वळले. येथील शांत परिसर आलेला थकवा क्षणात पळवून लावतो. महड गणपती हा अष्टविनायक दर्शनापैकी एक. त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. सर्वसाधारणपणे मुंबई येथील सहल आयोजक महड येथून सुरुवात करतात. त्यांची सहल शुक्रवार ते रविवार असते. त्यामुळे इथे शुक्रवारी गर्दी असते. आम्ही मात्र शनिवारी इथे आलो होतो. त्यामुळे दर्शनही पटकन आणि समाधानकारक झाले.


महड गणपती मंदिरामागून पालीला जाण्यास रस्ता आहे. आम्ही तो मार्ग निवडला. आनंद नामदेववाडीहून निघून जांभूळपाडाजवळ आम्हाला भेटणार होता. मी आणि संजयने वेग घेतला. जांभूळपाड्याआधी असलेले सुधागड वैभव ह्या हॉटेलमध्ये जेवण अप्रतिम असते. त्यामुळे तिथे पोचल्यावर आनंदला फोन लावला. मात्र तो बराच लांब असल्याचे समजले. त्यामुळे तो ज्या ठिकाणी खोपोली पाली रस्त्याला लागणार होता तिथे जो आधी पोहोचेल त्याने बाकीच्यांची वाट पहायची असे ठरवले. मी गुगल वरून त्याचे लोकेशन पाहत होतो. आनंद पेण मार्गे पेडली गावाच्या पुढे खुरवले फाटा येथील हॉटेल अनिकेतपाशी आम्हाला भेटणार असे गुगल बाबा सांगत होते. 

मी आणि संजय त्या चौकात पोचलो. तेथील अनिकेत हॉटेलमध्ये शिरलो तोपर्यंत भूक कडकडून लागली होती. आनंद आल्यावर एकत्रच जेऊ म्हणून आधी चहा घेतला. वेळ पुढे सरकत होता. पोटातील कावळे फारच कावकाव करू लागले होते. तिथे जेवण मिळत नसले तरी मिसळ मिळत होती. अर्धा तास वाट पाहून आम्ही मिसळ खाल्ली तरी आनंदचा पत्ता नाही. एका जागी थांबून सायकली आळसावल्या होत्या. त्यांना थोडे फिरवणे गरजेचे होते. आम्ही आनंदच्या दिशेने निघालो, मात्र रस्त्याची अवस्था पाहून संजय परत हॉटेल अनिकेतकडे वळले. मी मात्र त्या कच्च्या रस्त्याने आनंदचे स्वागत करायला निघालो. 

४ - ५ किमी पुढे गेल्यावर आनंद समोरून येताना दिसला. आम्हाला डोंबिवली/ ठाण्याहून यायला वेळ लागेल म्हणून त्याने पेणहून आडमार्गाने आम्हाला येऊन भेटायचे ठरवले होते. आम्हाला तिघांनाही असेच वाटले होते की कदाचित आनंदला जांभूळवाडीला येऊन आमची वाट पाहावी लागेल. मात्र इथे उलटेच घडले होते....

पेण कावळे डॅम रोड खुरवले फाटा येणाऱ्या ह्या रस्त्याने आनंदची आणि त्याच्या सायकलची चांगलीच सराव परीक्षा घेतली होती. अर्धा कच्चा रस्ता, त्यातही बरेच चढउतार असलेल्या रस्त्याचे गणित आनंदने सोडवले खरे पण त्याची वाट पाहण्याची आमचीही परीक्षा झाली होती.

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग ७: रंगीत तालीम: कोलकाता चेन्नई सायकल सफर


ध्येय गाठायचे असेल तर सराव आवश्यकच. HDOR मुळे माझा वैयक्तिक सराव सुरू होताच. पण माझ्या दोन सहकाऱ्यांचे काय! मला त्यांच्या सरावाचीही काळजी वाटत होती. STRAVA ह्या APP वर संजयचा सराव फार जाणवत नव्हता. मग मी माझ्या सरावाचे आकडे 'काय आप्पा ' अँप वर टाकायला सुरुवात केली. दोघेही अंगठे देत होते... पण मला त्यांचे अंगठे नको होते. मला हवे होते त्यांच्या सरावाचे आकडे. संजयच्या बरोबर ह्याही आधी शतकी राईड झाल्या होत्या. मात्र माझ्या प्रमाणेच त्यांचेही सायकलवणे थांबले होते. मला मदत करणारा HODR त्यांच्या सोबत नव्हता. आनंदचा मला अंदाज नव्हता.

संजय, आनंद आणि मी अशी तिघांचीही एकतरी एकत्र सराव सफर होणे गरजेचे होते. त्यादरम्यान एकमेकांचा अंदाज येतो. कच्चे दुवे आणि बलस्थाने समजतात. खरतर ही एक रंगीत तालीमच.

कन्याकुमारी ते चेन्नई राईडच्या अगोदर आयोजित केलेल्या सरावसफरीला अनुपस्थित असूनही ज्यांना ती सफर करण्यासाठी परवानगी दिली अश्या एका सायकलपटुचा संघातील इतर सायकलपटुंबरोबर संपूर्ण मोहिमेत एकदाही ताळमेळ झाला नव्हता. तसे काही होऊ नये ही इच्छा होती. मात्र काहीना काही कारणाने तिघांची वेळ साधत नव्हती. मोहिमेचा दिवस मात्र जवळ येत होता. अखेरीस जेमतेम दोन आठवडे राहिले असताना ती संधी मिळाली.

खंडाळा घाट हा माझा आवडता मार्ग. त्यामुळे डोंबिवली तळेगाव राईड मला विशेष आवडते. तसेच मुंबई अहमदाबाद मार्गावरील तलासरी येथील वनवासी आश्रम शाळेला भेट देण्याचे मनात होते. मुंबई नाशिक महामार्गही बरेच दिवस खुणावत होता. मात्र कोलकाता चेन्नई मार्गात घाट नव्हते त्यामुळे घाट मार्गाच्या सरावाची गरज नव्हती. अहमदाबाद मार्गाची दुर्दशा झाल्याचे कळले. त्यामुळे हे दोन्ही पर्याय बाद झाले. नाशिक मार्गाचा विचार केला तर आनंद आम्हाला फार उशिरा सामील होऊ शकला असता म्हणून तो विचारही बाद केला.

इंदापूर आणि नामदेववाडी येथेही जायचे मनात होतेच. मग डोंबिवली ते इंदापूर असा सायकल प्रवास करून दुसरे दिवशी इंदापूर - नागोठणे - नामदेववाडी - वडखळ - डोंबिवली अशी दोन दिवसीय सराव मोहीम आखली. 

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग ६: जर्सी : कोलकाता चेन्नई सायकल सफर

साहाय्य वाहन, sponsorship ह्यासाठी शोध सुरू होताच.  मला sponsorship केवळ आर्थिक मदतीसाठी नव्हे तर नवीन संस्थांशी संबंध जोडण्यासाठी हवी होती. आर्थिक मदत झाली तर हवी होती पण तो मुख्य उद्देश नव्हता. काही संस्थांशी त्यासाठी संपर्क साधला होता. मात्र त्याचा फॉलो अप करण्यासाठी वेळ मिळतच नव्हता. 

Sponsor मिळाला की त्यांचे नाव टाकलेला जर्सी बनवून घ्यायचा असे ठरवले होते. कोणत्याही संस्थेकडून होकार मिळत नसताना मोहिमेचा दिवस मात्र जवळ येत होता. जर्सी बनवण्यासाठी वेळ कमी उरला होता. डोंबिवली सायकल क्लबमधील मित्र रुधिर मोघे, माझी आहारतज्ज्ञ डॉ अर्चना नाईक, पनवेलमधील सायकल मित्र पवन चांडक ह्यांच्याकडे जर्सी बनवणाऱ्या लोकांची चौकशी केली. त्यांनीही लगेचच कळवले. मात्र त्यांना गाठायला वेळ मिळत नव्हता. साहिर शेख इथेही मदतीला आला. मात्र तो तयार असलेली जर्सी देऊ शकत होता. मला आमच्या कोलकाता चेन्नई राईड साठी विशेष जर्सी हवी होती. अशी जर्सी संघभावना निर्माण करते तसेच रस्त्यातील लोकांना जर्सी पाहताच आमच्या राईडचा उद्देश कळणेही आवश्यक होते. हितेन राणेंनी एक संपर्क क्रमांक दिला.

चिंचपोकळी येथील पांडुरंग निकम! प्रत्यक्ष जायला वेळच नव्हता. 'काय आप्पा' मदतीला आले.... म्हणजे WhatsApp बर का...! निकम ह्यांना फोन आणि WA द्वारे जर्सी बद्दल कळवले. रेल्वे चौकशीप्रमाणेच जर्सीसाठीही संजयने धावपळ करण्याची जबाबदारी घेतली. निकम ह्यांनी जी किंमत सांगितली ती ऐकून खरतर धक्काच बसला.. इतक्या कमी किमतीत जर्सी मिळेल ह्याची कल्पनाच नव्हती. मी परत एकदा हितेन ला फोन लावला आणि खात्री करून घेतली. 

निकमांनी अतिशय कमी वेळात, अत्यंत किफायतशीर दरात खूप चांगली जर्सी उपलब्ध करून दिली.


 जर्सी चे design आल्यावर एक गोष्ट लक्षात आली जर्सी वर RALLY असा शब्द आला होता. पण आम्ही रॅली काढणार नव्हतो. तर आमची एक राईड/ सायकलसफर असणार होती. निकमांना तसे कळवले. त्यांनी लगेचच बदल करून दिला.. 



रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग ५: ट्रान्सप्लांट: कोलकाता चेन्नई सायकल सफर


माझी श्विन आणि फुजी दोघीही दीड, पावणेदोन वर्षात बहुतेक वेळ धूळ खात पडल्या होत्या. त्यांची नीट दुरुस्ती, देखभाल करणे गरजेचे होते. कल्याण येथील BIKEPORT असो की सुमित हे दोघेही अश्यावेळी नेहमीच प्राधान्याने मदत करतात.

HDOR सुरू झाल्याने मी फुजीची जुजबी साफसफाई करून सराव सुरू केला होता. Bikeport येथे साहिरला गाठले. त्याने फुजीची अवस्था बघितली. आमची मोहीम समजताच त्याने फुजीचे पूर्ण रुपांतरण करून टाकले.  फुजीच्या बहुतेक भागांचे ट्रान्सप्लांट झाले होते. अत्यवस्थ अवस्थेतील फुजी एकदम तंदुरुस्त झाली होती. हॅण्डलबारपासून कॅरीअरपर्यंत सगळेच भाग बदलले. बहुधा फक्त फ्रेम तीच राहिली असावी. फुजी आता एकदम नवी कोरी दिसू लागली होती. साहिरची मदत इतक्याच पुरती मर्यादित नव्हती. 

माझा सराव सुरू होताच. HDOR च्या प्रत्येक टप्प्यानुसार सरावाचा वेळ, अंतर वाढवत होतो. प्रत्येक टप्प्यात काही विशिष्ट उद्दिष्ट्ये असत. माझ्या १०० दिवसांच्या HDOR कार्यक्रमामध्ये खंड पडू नये, माझी उद्दिष्टे पूर्ण व्हावी म्हणून फुजी त्याच्या दुकानात असताना साहिरने स्वतःची सायकल मला चालवायला दिली होती. 

सायकलची दुरुस्ती तर झाली होती, मात्र अजूनही ह्या मोहिमेसाठी सहाय्य वाहन मिळण्यासाठी शोध सुरू होता. माझी स्वतःची wagnor ड्रायव्हर सकट नेण्यापासून कोलकता किंवा चेन्नई येथून भाड्याने गाडी घेण्याच्या पर्यायांपर्यंत सर्व पर्यायांचा विचार सुरू होताच. मात्र एकूण खर्चाचा विचार करता कोणताच पर्याय व्यवहार्य वाटत नव्हता. दरम्यान आनंदचा फोन आला, ' तुझा जुना मित्र भेटला होता. तो त्याची गाडी घेऊन आपल्याबरोबर यायला तयार आहे. त्याला फोन कर.'. मी विचारत पडलो... कोण बरं असेल आणि माझा हा मित्र आनंदला कसा भेटला! 'दुनिया गोल है' चा प्रत्यय येत होता. तो मित्र म्हणजे आनंदबरोबर सैनिकी शिक्षण घेतलेला माझा बँकेतील जुना सहकारी होता... विवेक करमरकर. त्याने बँक सोडून बरीच वर्ष झाली होती. मी विवेकला लगेच फोन लावला. एक छोटी राईड करत डोंबिवलीहून ठाण्याला त्याच्या घरीही गेलो. त्याने लगेचच होकार दिला. त्याची गाडी रेल्वेतून नेण्याचे ठरवले. मात्र रेल्वेकडून असे कळले की गाडीमध्ये एक थेंबही इंधन असता कामा नये. आम्ही विचार केला इथून मुंबईला गाडी लोड करताना सगळे पेट्रोल काढले तरी कोलकात्याला पेट्रोलची सोय कोण आणि कशी करणार? 

घोडे...गाडी... पुन्हा अडले/ ली.

माझी कोणतीही मोठी राईड आप्पांना भेटल्याशिवाय सुरू होत नाही. अगदी छोट्याशा भेटीतसुद्धा आप्पा छान मार्गदर्शन करतात. १८०० किमी ची जवळपास २ आठवड्यांची मोहीम... त्यात हिवाळा असणार. त्यामुळे आम्ही साहाय्य वाहन शोधत होतो. सायकल चालवताना सामान वाहायला लागू नये हा सहाय्य वाहनाचा मुख्य उद्देश होता, तसेच काही अडचणी आल्याचं तर त्या वाहनाद्वारे त्वरित मार्ग काढता येईल हाही विचार होता. 

अप्पांनी सहाय्य वाहन घेण्यामागचा माझा विचार समजून घेतला. मात्र अगदी थोडक्या वेळात आणि मोजक्या शब्दात त्यांनी माझा विचार अगदी सोप्या शब्दात पूर्ण १८० अंशात बदलून टाकला. अडचणी आल्याचं तर तिथेच एखादे वाहन मिळेल असे अप्पांनी सांगितले ते मला तितकेसे पटले नव्हते. मात्र सामान वाहण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडचे पॅनियरही देऊ केले. मी मात्र ते लगेच स्वीकारले नाही. कारण त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आप्पांना भेटता आले असते. 

आप्पा पक्के पर्यावरणवादी! त्यामुळे त्यांना अश्या मोहिमांमध्ये इंधन जाळणारे वाहन बरोबर घेणे योग्य वाटत नसावे. मी मात्र सायकल मोहिमेचा पर्यावरणवाद हे उद्दिष्ट मान्य करत नव्हतो. माझ्या मते पर्यावरणवाद हा सायकल मोहिमेचा अनेक कंगोऱ्यांपैकी एक कंगोरा जरूर असू शकतो.

त्यामुळे अजूनही साहाय्य वाहन डोक्यातून पूर्णपणे जात नव्हते. संजय आणि आनंदही सहाय्य वाहन घेण्याच्याच बाजूने ठाम होते. अप्पांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. साहाय्य वाहन न घेता मोहीम करत असलो तर वाटेतील लोकांचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोनही बदलतो. हे मत मात्र पूर्णपणे पटले होते. आप्पांचे म्हणणे पटले तरी मन वळत नव्हते. साहाय्य वाहनाचा शोध सुरूच होता. मनाचे ट्रान्सप्लांट पूर्ण झाले नव्हते.

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग ४ वाहतूक व्यवस्था: : कोलकाता चेन्नई सायकल सफर


तीन जणांचा संघ तयार झाला खरा. तिघेहीजण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो. आमची एकत्रित भेट घडणे आवश्यक होते. अश्यावेळी स्वाभाविकपणे एक नाव आठवले.

' जितेन्द्र, रविवारी ऑफिस मध्ये असशील का? '.... मदतीसाठी कायम तत्पर असणारा जितेंद्र ह्याही वेळी मदतीला धावून आला. आमच्या तिघांची मीटिंग ठरली ती जितेंद्रच्या ऑफिसमध्ये. रविवारच्या दिवशी आम्हा तिघांबरोबर यजमानपद सांभाळत जितेंद्र हजर होताच. शिवाय जितेंद्रच्या सांगण्यानुसार कोपरीहून खोपटला त्याच्या ऑफिसमध्ये आमच्यासाठी नाष्टा घेऊन मंगेश कोळीनेही उपस्थिती लावली. आमचा संघ खरच तीन जणांचाच होता का! 


जितेंद्र, रमेश काका, पुष्कर, सुमित हे आणि असे इतरही काही मित्र अशा सफरींना बरोबर असावेत ही मनापासून इच्छा होती. मात्र इतर कामांच्या प्राधान्यक्रमामुळे ते आमच्या बरोबर येऊ शकत नव्हते. 

आमचे तिघांचे जाण्या येण्याचे रेल्वेचे आरक्षण करताना कोलकाता येथून परत येण्याचे सोयीचे आरक्षण मिळत नव्हते. मग मी मार्गच बदलला... चेन्नई ते कोलकाता ऐवजी आम्ही आता कोलकाता ते चेन्नई प्रवास करण्याचे ठरवले. आमचे तिघांचे रेल्वेचे आरक्षण तर आम्ही केलेच पण सायकलींचे काय? 

जितेंद्रच्या ऑफिसमध्ये असताना courier ने सायकल पाठवता येऊ शकते ह्याचाही अंदाज आला.

सायकल पाठवण्यासाठी रेल्वे, कुरिअर, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर किंवा थेट विमान असे अनेक पर्याय समोर येत होते. विमान कंपन्या आधी खर्च सांगायलाच तयार नव्हत्या. तो कळणार होता थेट प्रवासाच्या दिवशी सायकल घेऊन गेल्यावर. रस्ता मार्गे कुरिअर किंवा ट्रान्सपोर्ट ऑपरेटर तर्फे सायकल पाठवण्याचा पर्याय कमी अडचणींचा वाटत होता. मात्र कुरिअर कंपनीनेच आम्हाला सल्ला दिला की रस्तामार्गापेक्षा रेल्वेने सायकल सुरक्षितरित्या जाऊ शकतात. त्यामुळे रेल्वे ह्या पर्यायावर आम्ही येऊन थांबत होतो.

मात्र त्यासाठी CST स्टेशन वर जाऊन चौकशी करावी लागणार होती. संजय ह्यांनी हे काम स्वीकारले. .

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग ३: संघ: कोलकाता चेन्नई सायकल सफर




सायकलमोहिमेतील दोन ठिकाणे चेन्नई आणि कोलकाता असणार हे नक्की केल्यावर मी सायकल समूह सदस्य आणि सायकल मित्र ह्यांना आवाहन करण्यास सुरुवात केली. मोहीम साधारण दोन आठवड्यांची असणार होती.

एक फोन मी लक्षात ठेवून लावला...'; राजू... मी चेन्नई कोलकाता सायकलसफर करणार आहे. येणार का?'... अक्षरश दुसऱ्याच क्षणी होकार आला. राजू उर्फ आनंद पाटील... रिटायर्ड ACP. काही महिन्यांपूर्वीच आनंद रिटायर्ड झाला होता. तो उत्तम ट्रेकर होताच शिवाय चांगला सायकलपटूही होता. पुणे जम्मू सायकल सफर ठरवत असताना सदस्य संख्येच्या बंधनामुळे त्याला होकार देत आला नव्हता. म्हणूनच ह्या वेळी मोहिमेची आखणी करत असताना सुरुवातीलाच त्याला फोन केला होता. 

डोंबिवली सायकलक्लब मधील सदस्य संजय दात्ये ह्यांनीही लगेचच होकार कळवला. संजय सुद्धा ह्याच वर्षी निवृत्त झाले होते. सदस्य संख्या कमी जास्त होत होती. ज्यांनी मोठी सायकल सफर केली नाही त्यांना अश्या मोहिमेचा अनुभव मिळावा ही इच्छा होती. काहीजणांचे तळ्यात मळ्यात होत होते. इच्छा असली तरी ती दृढ होणे महत्वाचे असते. मला स्वतःला आणि तसेच नवीन सदस्यांना साहाय्य वाहन असल्यास दिलासा मिळावा म्हणून त्याचीही चाचपणी सुरू होती. मात्र सदस्य संख्या मर्यादित राहत असल्याने साहाय्य वाहन नक्की करता येत नव्हते.

साहाय्य वाहनाचा खर्च अवाढव्य वाटत होता. काही sponsorship मिळते का ह्याचाही अंदाज घेतला. पण तेही नक्की होत नव्हते. आनंद, संजय आणि मी हे तिघेजण सहभागी होणार ह्या व्यतिरिक्त सगळेच अधांतरी राहत होते. तिघांचा संघ नक्की झाला होता मात्र तिघेजण तीन टोकाला होते. तिघांची भेट घडत नव्हती. आनंद गोरेगावला, संजय ठाण्याला आणि मी डोंबिवलीला. भेट झाली तर पुढील काही गोष्टी मार्गी लागणार होत्या. 

ह्याचवेळी मला एक नाव आठवले... जितेंद्र वैद्य.

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग २:HDOR 100 दिवसांचे आव्हान: कोलकाता चेन्नई सायकल मोहीम


पूर्व किनाऱ्यावरील सायकल सफरीचा आनंद कागदावर मिळत असला तरी प्रत्यक्षात योग जुळून येत नव्हता. २०२३ हे वर्ष पुढे सरकले. माझे दैनंदिन सायकलवणेच होत नव्हते तिथे मोहीम कशी आखणार? पुन्हा एकदा HDOR मदतीला आले. HDOR हा १०० दिवसांचा कार्यक्रम आहे. २०२३ मध्ये मी HDOR मध्ये भाग घेतला नाही. मात्र २०२४ ला HDOR चा कार्यक्रम समजताच मी त्याच्या पाचही टप्प्यांची व्यवस्थित आखणी करायला सुरुवात केली.

HDOR ही खरेतर भाग घेणाऱ्यांमधील एकमेकांशी स्पर्धा नव्हे. किंबहुना एकमेकांकडून स्फूर्ती घेत आपले स्वतःचे सायकलवणे सुधारवण्याचा तो कार्यक्रम आहे. HDOR मध्ये २० दिवसांचे ५ टप्पे असा एकंदर १०० दिवसांचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये भाग घेतल्यावर सायकलवण्याला निश्चित ध्येय मिळते. मी प्रत्येक टप्प्यामधील उद्दिष्टांचा अभ्यास करून माझे प्रत्येक टप्प्यातील वैयक्तिक ध्येय, उद्दिष्ट ठरवले आणि त्याचा सातत्याने आढावा घेत त्यात सुधारणा करत होतो. प्रत्येक पुढील टप्प्यात आधीच्या टप्प्यापेक्षा किमान १०% ते ४०% सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठरवले. 

ह्याचबरोबर भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील सायकल प्रवासाचा कार्यक्रम आपसुकच ठरवला गेला. HDOR च्याच अंतिम म्हणजे पाचव्या टप्प्यामध्ये पूर्व किनारपट्टीची मोहीम करण्याचे निश्चित केले. ह्यात दोन उद्दिष्ट्ये एकत्रच पूर्ण करता येणार होती. HDOR मध्ये शेवटच्या टप्प्यातील कामगिरी उंचावता येणार होती आणि पूर्व किनाऱ्याची मोहिमही पूर्ण करता येणार होती.

१०० दिवसांचा कार्यक्रम निश्चित करताना त्याच्या आखणीमध्ये सुधारणा करत असताना शेवटच्या टप्प्यात साधारण २००० किमी चे वैयक्तिक आव्हान मी स्वीकारायचे ठरवले. आता मात्र ह्या शेवटच्या टप्प्यातील २० दिवसात मी चेन्नईपासून थेट कोलकाता गाठायचे ठरवले. कारण हे अंतर जेमतेम १८०० किमी च्याच आसपास असणार होते. 

पूर्व किनाऱ्याची मोहीम मी ठरवत असताना रजेचे दिवस, प्रवासाचा वेळ, सायकल वाहण्याचे नियोजन, मोहीम करत असताना सामान वाहण्याची तजवीज, मार्ग, मार्गातील टप्पे ही निश्चित करायचे होतेच. मात्र त्याही आधी बरोबर येणारे सहकारी, संघ बांधणी, त्यांची वैयक्तिक उद्दिष्टे, तयारी हे सुद्धा विचारात घ्यावे लागणार होते. मी मोहिमेचे दिवस नक्की केले आणि पण सहकारी, संघ कुठे होता....!

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

कोलकाता चेन्नई सायकल सफर पूर्वतयारी भाग १





बंगालच्या उपसागराची साद ऐकू येत होती. चेन्नई पुन्हा एकदा खुणावत होती. संस्कृती, इतिहास ह्यांचा वारसा लाभलेले हे शहर बिचसाठीही प्रसिद्ध आहे. येथील मरिना बीच भारतातील सगळ्यात जास्त लांबीचा बीच आहे.

पश्चिम किनारपट्टीला लाभलेले सह्याद्री पर्वतरांगांचे वैभव, संरक्षण मात्र पूर्व किनारपट्टीला लाभले नव्हते. पश्चिमेप्रमाणे एकच पावसाळा न लाभता इथे पावसाचे दोन ऋतू पहायला मिळतात. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे एक पावसाळा इथे असतोच. ह्याशिवाय ईशान्येकडून येणारे वारे हिवाळ्यातही इथे पावसाळा अनुभवण्याची संधी देतो.

सायकल सफर आखताना हवामानाचा अंदाज घेणे महत्वाचे ठरते. कन्याकुमारी चेन्नई सायकल प्रवास करत असताना धनुष्कोडीपासून अरीचल मुनाई ह्या चार पाच किमीच्या अंतरात आडवा उभा पाऊस झोडपत होता. तेव्हा मजा घेता आली होती. मात्र त्यावेळी सायकलवण्याचा प्रयत्न अगदीच केविलवाणा होत होता. ह्यावेळी पुन्हा पूर्व किनारपट्टीवरच सायकल चालवायची होती. त्यामुळे पुन्हा एकदा ईशान्य मोसमी वाऱ्याचा लहरीपणा झेलण्याची तयारी ठेवावी लागणार होती. त्याचप्रमाणे एकंदर दिवसांचे गणित जमवायचे होते. 

प्रवासातील टप्पे आखताना शहरेच नव्हे तर मार्गही पूर्ण अनोळखी असणार होता. मुंबईमध्ये राहताना पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भारतीय लोकांशी जेवढा संबंध आला होता तेवढा संबंध पूर्व किनारपट्टीतील राज्यातील लोकांशी फारसा आला नव्हता. माझ्यासाठी पूर्व किनारपट्टीच नव्हे तर येथील लोक, राहणी, संस्कृती एवढेच नव्हे तर अर्थव्यवस्था देखील कुतूहलाचा विषय होती. 

चेन्नई ते कोलकाता हे एकंदर अंतर जवळपास १७००+ किमी होते. तर चेन्नई ते पुरी, भुवनेश्वर अथवा कोणार्क हे अंतरही सहस्र किमीपेक्षा जास्त असणार होते. त्यामुळे एका वेळी सुट्टी घेऊन थेट कोलकाता गाठायचे की यंदा पुरी, भुवनेश्वर अथवा कोणार्क गाठून परत मुंबई गाठायची ह्याबद्दल मनात बरेच महिने गोंधळ सुरू होता.

प्रवासाचे एक टोक चेन्नई असणार असले तरी दुसरे टोक कोणते हे नक्की होत नव्हते. एकंदर दिवस, अंतर ह्यांचा मेळ घालता घालता वेळ मात्र पुढे सरकत होता.

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

उपोद्गघात: कोलकाता ते चेन्नई सायकल सफर




भारत...

पहिल्यांदा त्यांच्या त्या अद्भुत आवाजात "भारत" हा शब्द बोलताना ऐकला तेव्हाच भारताबद्दल प्रेम वाटू लागले. पाच अक्षरांच्या एका छोट्या शब्दात इतकं काही ठेवता आलं असतं हे अविश्वसनीय वाटतं. प्रेम, उत्कटता, अभिमान, तळमळ, आराधना, शोकांतिका, शौर्य, घराची ओढ आणि पुन्हा प्रेम होते. कोणतेही मोठमोठे ग्रंथ इतरांमध्ये अशी भावना निर्माण करू शकले नसते. ज्यांनी ते शब्द ऐकले त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण करण्याची जादूची शक्ती त्या आवाजात होती. त्यानंतर भारत ही मनाच्या इच्छेची भूमी बनली. तिची माणसं, तिचा इतिहास, स्थापत्य, तिच्या चालीरीती, तिच्या नद्या, पर्वत, मैदाने, तिची संस्कृती, तिची महान आध्यात्मिक संकल्पना, तिचे धर्मग्रंथं अश्या भारताबद्दलच्या सगळ्या गोष्टी आवडीच्या बनल्या. आणि म्हणून एक नवीन जीवन, अभ्यासाचे, ध्यानाचे जीवन सुरू झाले. आवडीचे/ कुतूहलाचे केंद्रस्थान बदलले गेले...

स्वामी विवेकानंद ह्यांच्या आवाजातील जादूबद्दल भगिनी क्रीस्टीन ह्यांनी सांगितलेला हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव.


विवेकानंद ह्यांचे भारताबद्दलचे प्रेम हे निर्विवादपणे पराकोटीचे होते. भगिनी क्रिस्टिन ह्यांनी वर्णन केलेले भारताचे वैभव अनुभवण्याची ओढ, कुतूहल माझ्या सायकलीच्या चाकांना आवाहन करत असतेच. भारताचे हे वैभव अनुभवायचे असेल तर मानवी इंधनाच्या साहाय्याने चालणारे सायकल हे दुचाकी वाहन ह्यापेक्षा उत्तम वाहन नाही. म्हणूनच एक सायकलप्रवास पूर्ण करत असतानाच पुढील सायकलप्रवासाचे वेध लागत असतात.

खरं पाहता सायकलवरून भारताची परिक्रमा करायची हा विचार नेमका कधी पक्का झाला हे नक्की सांगता येणार नाही. ती परिक्रमा सुरू करण्यामागे एक आवाहन होते हे मात्र नक्की. हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद ह्यांचा जन्मदिनांक हा भारतीय क्रीडादिवस म्हणून ओळखला जातो. ध्यानचंद ह्यांचे खरे नाव होते ध्यानसिंग. मात्र ते रात्री चंद्रप्रकाशात हॉकीचा सराव करायचे. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ध्यानचंद हे नाव ठेवले. ध्यानचंद ह्यांचा खेळ इतका अप्रतिम होता की नेदरलँड मध्ये त्यांच्या स्टिक मध्ये मॅग्नेट लावले असावे ह्या शक्यतेतून ती स्टिक तोडली होती.



भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी ग्रेगोरियन वर्ष २०१९ (म्हणजेच भारतीय राष्ट्रीय वर्ष १९४१) च्या क्रीडादिवशी ' फिट इंडिया ' ह्या संकल्पनेची मुहूर्तमेढ केली. त्यानिमित्ताने पंतप्रधान म्हणाले होते की जरी ही मोहीम सरकारने सुरू केली असली तरी नागरिकांनी ती पुढे नेली पाहिजे. 

पंतप्रधानांचे हे आवाहन मनाला भिडले. ज्या देशाचे नागरिक सुदृढ (फिट) असतील तो देश सुरक्षित राहू शकतो. म्हणूनच पंतप्रधानांनी नागरिकांप्रती केलेले हे आवाहन पटले. ते पटल्यावर आपल्याला काय करता येईल याविषयी फार विचार करावाच लागला नाही. मनामध्ये त्याचे उत्तर तर तयारच होते... 

सायकल चालवताना मिळणारा आनंद, त्याचा कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त फिटनेस देण्याचा लाभ, एकमेकांशी सहजपणे जोडला जाण्याचा अनुभव अशा अनेक गोष्टी मनात होत्याच. अर्थातच ही संकल्पना पुढे नेण्यासाठी सायकलचा उपयोग करायचा हे उत्तर लगेचच सुचले. कदाचित सायकल चालवत भारत परिक्रमा करणे हे मनात होतेच, पण आता त्याला निश्चित पार्श्वभूमी लाभली. ही संकल्पना सायकलद्वारे कशी पुढे न्यायची हेही सहजपणे सुचले.

ह्या अगोदर भारताच्या वेगवेगळ्या भागात सायकल चालवलेली होतीच. त्या मोहिमांद्वारे मुंबई ते कन्याकुमारी हे अंतरही आधीच पार केले होते. त्यामुळे ही संकल्पना राबवताना भारत परिक्रमा करावी हा विचार पक्का झाला होता. ह्या संकल्पनेतील पहिल्या मोहीमेदरम्यान २१ डिसेंबर २०१९  ते ७ जानेवारी २०२० मध्ये पुणे जम्मू हे जवळपास २१०० किमी अंतर आम्ही ११ जणांनी पूर्ण केले होते. त्या मोहिमेच्या अनुभवातून FIT INDIA संकल्पनेतील कन्याकुमारी चेन्नई अशी दुसरी मोहीम ग्रेगोरियन वर्ष २०२२ मध्ये आयोजित केली होती. ह्या जवळपास ११०० किमीच्या मोहिमेमध्ये १० सायकलपटू सहभागी झाले होते.

ह्या दोन्ही मोहिमांमध्ये माझी पत्नी मीरा त्याचबरोबर नयना आघारकर ह्या दोघीही सामील होत्या. बाकीचे साथीदार मात्र बदलले होते. दोन्ही मोहिमांमधील अनुभवलेले प्रदेश, दिशा, संस्कृती, भाषा, वेगवेगळे होतेच. मुख्य म्हणजे आलेले काही अनुभवही परस्परविरोधी होते. गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू मध्ये जाणवलेली आपुलकी, स्नेह, मोकळेपणा कन्याकुमारी ते चेन्नई मोहिमेदरम्यान लाभणे हा अपवाद असायचा. अर्थात गेल्या मोहिमेच्या अंतिम टप्प्यात चेन्नई येथील अनुभव सुखावह होता. ही एक जमेची बाजू होती.

खरतर एव्हाना भारताची पश्चिम सीमारेषेसह दक्षिण सीमारेषाही पूर्ण होत आली होती. आता भारताच्या पूर्व किनारपट्टीची साद ऐकू येऊ लागली होती.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...