शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

उ पो द् घा त (कन्याकुमारी चेन्नई सायकलमोहीम)








सायकलपे समय थमसा जाता है

हर लम्हा साफ नजर आता है

वो सूरज की लाली

वो चिडिया की बोली

वो फुलोंके रंग

वो उपरवाले की सारी चित्रकारी 


एका अज्ञात सायकलमित्राने सायकलसफरीचे वर्णन अगदी अचूक शब्दात व्यक्त केले आहे. कदाचित म्हणूनच एक सायकलसफर संपताना पुढील सायकलसफरीचे विचार मनात घर करू लागतात. पुणे जम्मू सायकलसफरीबरोबर भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडील राज्ये चक्राकांत झाली होती. आता वेध लागले होते पूर्व किनाऱ्याचे!

उत्तरेकडे झेपावताना आपल्याला देवनागरी साथ करत असते. मात्र दक्षिणेकडे प्रचलित असलेली लिपी अगम्य वाटते. उत्तरेकडील भाषाही जश्या समजायला सोप्या वाटतात, तसे दाक्षिणात्य भाषांबद्दल होत नाही. कर्नाटक, केरळ येथे सायकलवताना अडचण आली नाही. कारण तिथे YHAI ची साथ होती. आता ती साथ नव्हती, तर स्वतः आखणी करायची होती.

वास्तविक केरळी माणसांचे अगत्य तर वाखाणण्यासारखे असते ह्याचा अनुभव सायकल सफरीत तसेच कौटुंबिक सहलीत चार चाकीतून फिरताना ही आला होता. मात्र तमिळनाडूबद्दल खात्री वाटत नव्हती.

कदाचित त्यामुळेच भारत परिक्रमा पूर्ण करायचे मनात असूनही पुढील टप्पा आखण्याचे दूर जात होते.

दरम्यान माझा मुलगा.. राजस.. शिक्षणासाठी चेन्नई येथे राहत होता. बहुतेक ह्याच कारणासाठी का असेना अखेरीस पुढचा टप्पा ठरवला गेला. एक टोक चेन्नई असणार हे निश्चित होते. तर YHAI बरोबर पूर्वी कन्याकुमारी गाठलेले असल्याने दुसरे टोक कन्याकुमारी हेही ठरलेलेच होते. 

 मीरालाही सायकल सफर आवडू लागल्याने तिने लगेचच संमती दिली. दोन टोके ठरली तरी मार्ग किंवा दिशा ठरवणे महत्वाचे होते.  कन्याकुमारी येथील समुद्राच्या पार्श्वभूमीवर सायकल उंचावत मोहीम पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्याचे आकर्षण नक्कीच मोठे होते. चेन्नई येथील सायकलपटूही तीच दिशा ठरवीत. शिवाय चेन्नईकडून कन्याकुमारीकडे जाताना उताराचा लाभ जास्त वेळा घेता येणार होता. म्हणजे प्रवासाची दिशा चेन्नई ते कन्याकुमारी ठरवणे जास्त सोयीस्कर असणार होते. 

मात्र YHAI तर्फे कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास आधी केल्यामुळे तेथूनच सुरुवात करत चेन्नई गाठायची असे मनात आले. अर्थातच कन्याकुमारी चेन्नई सायकलप्रवास करण्याचे निश्चित झाले. 

मनात आले की इतरांना सांगायचे म्हणजे आपला निर्णय पक्का होत जातो.. हा अनुभव होताच. मीरा येणार हे नक्की होते, तसेच नयना आघारकार येणार हेही गृहीत धरले होते. अय्यरकाका मात्र अमेरिकेत असल्याने येऊ शकणार नव्हते. 

सायकल मित्रांच्या वेगवेगळ्या समूहांमध्ये मोहिमेची कल्पना सांगितली. त्याला प्रतिसाद मिळत होता. दरम्यान मी एकंदर १००० किमी मार्गाचे रोजचे शतकी टप्पेही ठरवत होतो. 

अनेक सायकल समूह/ सायकलमित्रांकडून मोहिमेविषयी विचारणा होत होतीच. त्यांची सामील होण्याची उत्सुकता जाणवत होती. अश्या मोहिमांमध्ये भाग घेत असताना केवळ उत्सुकता पुरेशी नसते तर स्वतःची लक्ष्मणरेषा ओलांडण्याची तयारी, जिद्द आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो. विचारणा करणारा फोन आला की त्यांना विश्वास देणे सुरू होतेच. मात्र  मला स्वतःला अजूनही भाषेची अडचण, तमिळनाडू येथील स्थानिकांच्या सहकार्याविषयी वाटत असणारी शंका सतावत होतीच.

अश्याच वेळी एक फोन आला...,' मैं सर्वानन...




गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

भटकी (Nomad)

 




गेल्या रविवारी अग्रिमा नायर माझ्या घरी राहायला आली होती. आई वडील दोघेही आर्मी मध्ये! एकुलती एक मुलगी.  १७ व्या वर्षापर्यंत आई वडील ह्यांच्या बरोबर वेगवेगळ्या शहरात  राहण्यात गेले. 

मग मात्र तिने आई वडिलांबरोबर फिरणे थांबवले....

म्हणजे...

आता.. ती एकटीच निरनिराळ्या शहरात राहू (भटकू) लागली. कोणत्याही शहरात सलग दोन - तीन महिन्यांपेक्षा जास्त मुक्काम नाही.  ही फिरस्ती चालू असताना शिक्षण काय आणि कसे घेणार? अग्रिमाने बायो टेक मध्ये मास्टर्स केले, नुरो सायन्स मध्ये PhD केली. हे सुरू असतानाही भटकेगिरी सुरूच!

यादरम्यान थोडा स्ट्रेस जाणवायला लागल्यावर तिचे लक्ष योगाभ्यासाकडे वळले. मग काय योग थेरपी मध्ये थेट मास्टर्स पूर्ण केले. 

आता तरी स्थिरावायचे... हिने Anatomy आणि आयुर्वेद देखील सोडले नाही. त्यांच्याही अभ्यास केला. गेल्या वर्षापर्यंत म्हणजे...वयाच्या २९ व्या वर्षापर्यंत शिक्षण सुरू होते. 

ह्या सगळ्या प्रवासादरम्यान खरतर भ्रमंतीदरम्यान अनेक बौद्ध भिक्खू तिचे मित्र झाले. ही केरळमध्ये असताना एका बौद्ध भिक्खूने तिला भेटायला बोलावले. तो होता लडाखला! मैत्री केली आहे...तर निभावयालही पाहिजेच. लगेच पोचायचे तर विमानाने जायला हवे.. 

पण हिच्या डोक्यात विचार आला ..चालतच जावे... गेली पाचेक वर्ष रोज ५-६ तास चालत होतीच. खरतर मनात विचार आल्यावर ही निघालीही असती....पण मित्राला भेटायची ओढ असल्याने वेळही वाचवायचा होता. मग तिने लगेचच पुढच्या पर्यायाचा विचार केला.. सायकल.. इकोफ्रेंडली पण चालण्या/धावण्यापेक्षा वेळ वाचवणारा पर्याय. तिने लडाखपर्यंतचा प्रवास करताना वाटेतील प्रत्येक मुक्कामी योगप्रसार करण्याचेही उद्दिष्ट्य ठरवले.

८ व्या,  ९ व्या इयत्तेत असताना आईची सायकल चालवलेली होती. तीही आईबरोबर भांडून आई जेव्हा सायकल देईल तेव्हा. म्हणजे साधारण १५ व्या वर्षानंतर सायकल न चालवणारी आग्रिमा आता वयाच्या ३० व्या वर्षी प्रथमच सायकल चालवणार होती... तेही केरळ ते लडाख! तेसुद्धा एकटी! आई वडिलांच्या संमतीच काय? अग्रिमाला जेव्हा मी विचारलं, "तुझ्या आई वडिलांनी तुला संमती कशी दिली". तर ती म्हणाली,"त्यांच्याकडे दोनच पर्याय होते १) मला विरोध करायचा किंवा २) माझ्या(निर्णयाच्या) बरोबर राहायचे. माझा निर्णय बदलणार नाही हे त्यांना माहीतच होते. त्यांनी दुसरा पर्याय निवडला."

अरेच्चा पण सायकल कुठे होती? सायकलशिवाय हे नुसतेच मनातले मांडे झाले होते.

पण हिची इच्छा लक्षात घेताच तिच्या एका भावाने तिला सायकल भेट दिली. लगेचच तिने सायकलचे नामकरण केले...' चक्रिका '. अग्रिमा म्हणते चक्रिका म्हणजे 'दैवी चक्र धारण करणारी दुर्गा'. खरोखरंच अग्रिमाला साथ करायला दुर्गाच हवी!

सायकल हातात पडली न पडली तोच हिने कूच केले.

सायकल विकत घेतल्यापासून २४ तासाच्या आत अग्रिमाने कोची सोडले देखील!  मूहूर्त देखील छान साधला गेला .. जागतिक योग दिन! सायकल प्रवासाचे उद्दिष्ट्य योगप्रसार हे होते आणि सुरुवात जागतिक योग दिनी... आणखी कोणता चांगला मुहूर्त सापडणार?

गेल्या १५ वर्षात सायकल चालवलेलीही नाही. त्यात एकदम गियरवाली टुरिंग सायकल हातात. गियर बदलणे दूर, पेडल मारण्याचेच ज्ञान दोन तीन मिनिटातच उघडे पडले. अग्रिमाने सुरुवात केली अन् पुढे लगेचच एक गतिरोधक आला. हिचे एक पेडल वर आणि दुसरे खाली.... पेडल गतिरोधकाला मस्त घासले गेले. सायकलवर हिचा संसार होताच. तो भार सहन करत सायकलवर बसून पहिल्या काही मिनिटातच पहिला धडा शिकायला मिळाला... गतिरोधक आल्यावर सायकलचे दोन पेडल जमिनीपासून समान अंतरावर असावेत.

पेडलचे झाले...पण गियरचे काय.  बरं सोबतीला कोणी नाहीच, त्यामुळे वाटेत त्याबद्दलचे मार्गदर्शनही नाही. मग काय थेट on job training! पेडल मारता मारता हिने स्वयमशिक्षणच घेतले.  १५ वर्षानंतर प्रथम सायकल हातात... तीही हलक्या वजनाची नव्हे तर बऱ्यापैकी वजन असलेली टुरिंग बाईक...सोबत स्वतःचे आणि सायकलचे सामान असे सामानाचेच जवळपास १५ किलो वजन.

हे सगळे वजन झेलत अग्रिमाने पहिल्याच दिवशी ३०-३५ किमी अंतर कापले. दुसऱ्या दिवशी तर चक्क सत्तरी गाठत पहिल्या दोन दिवसात शतक पूर्ण केले. प्रवासात एका सायकलदुरुस्ती दुकानात शिरून पंक्चर काढणेही शिकून घेतले.

आषाढ महिना सुरू असल्याने आकाशातून धरणीकडे कोसळणारा पाऊस उभा झोडपत होताच. त्यातच तळकोकणात असताना समुद्राकडून मुख्य भुमिकडे जाणारा वारा आडवा झोडपून काढत होता. पाऊस वाऱ्याच्या ह्या उभ्या आडव्या तडाख्यामुळे एके दिवशी तिला संपूर्ण दिवसभर सायकलवर बसताच आले नाही. दिवसभर पावसाळी कपडे घालून, डोळ्यांवर येणारे थेंब झेलत चक्रिका आणि सामानाचे ओझे वाहवत चालत राहावे लागले. 

केरळ, कर्नाटक, गोवा पार करत तिच्या प्रवासाच्या ४२ व्या दिवशी ती डोंबिवलीला माझ्या घरी आली. तेव्हाही तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. आषाढाने झोडपले तरी श्रावणातील उनपावसाचा खेळ पाहत अग्रिमा खूप आनंदली होती. काल प्रवासाच्या ४४ व्या दिवशी तिने महाराष्ट्र पार करत थेट गुजरात ह्या पाचव्या राज्यात प्रवेशही केला आहे. श्रावणातील हिरवा निसर्ग, वातावरण तिचा प्रवास नक्कीच सुखकर करेल आणि ती लडाखदेखील सहजपणे गाठेल..  ती त्यानंतर दुसऱ्या मार्गाने सायकलवरून पुन्हा केरळला पोचणार आहे. पण तेही तिचे गंतव्यस्थान नव्हेच. त्यानंतरही तिचा प्रवास सुरुच राहणार आहे... ती स्वतःला nomad (भटकी) म्हणवते. तिच्या ह्या भटकेपणाला सलाम!








रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

उद्घाटन





सायकल.... हे केवळ वाहन नाही तर जगभरातील सायकलपटुंना जोडणारे साधन आहे.


ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंबरनाथ सायकलिस्ट फाउंडेशन आणि बदलापूर सायकलिंग क्लब ह्या दोन्ही संघांनी एकत्रितरित्या आयोजित केलेला आजचा कार्यक्रम! सागर मेननने चार दिवसापूर्वीच फुजिला तसेच पेडल रिपब्लिकच्या सगळ्या सदस्यांना ह्या कार्यक्रमाला हजर राहण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे काल २१२ किमी ची दौड केल्यानंतरही झोपताना फुजी स्वतःला आज लवकर उठण्याबद्दल बजावत होती. 


मात्र तरीही थोडा उशीर झालाच.' मै देर करता नही, देर हो जाती है ' हे आळवत फुजी घरातून निघाली तेव्हा पेडल रिपब्लिकचे इतर सदस्य PR नाका सोडत होते. त्यामुळे फुजिने जवळच्या मार्गाने जात त्यांना गाठण्याचे ठरवले. वाटेत काही जणांना गाठत फूजिने नेवाळी फाटा गाठला. PR चे अधिकृत छायाचित्रकार आवटीकाकांनी समूह छायाचित्र घेतल्यावर तिघेजण माघारी परतले. तर उरलेल्या दहा जणांनी पुढे कूच केले. 


कोंढेश्वर रस्त्याला लागल्यावर हिरव्या रंगाने नटलेला निसर्ग दिसू लागला होता. रस्ता अरुंद असला तरी वाहतूक अगदीच तुरळक होती. एका रांगेत जात असलेल्या म्हशिंनी PR सदस्यांना शिस्तीचे धडे दिले. गुगलबाबांच्या मार्गदर्शनानुसार डॉ राहुल जात होते. त्यांच्या पाठोपाठ इतर सायकलस्वारही लगबगीने जात होते. सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाची उत्सुकता होती. काही वेळाने मुख्य रस्ता सोडून डॉ राहुल कच्च्या रस्त्याला वळले. दोन्ही बाजूने वृक्षराजी स्वागत करत होती. हिरवाई मनाला भुरळ पाडत होती. सायकलस्वार पुढे जाताच त्यांना एक मोकळे मैदान दिसले. तिथे काही सायकलस्वार गोलाकार उभे राहून खेळ खेळत होते. श्री लोकरे ह्यांच्या फॉर्म हाऊसचा तो परिसर होता. परिसर अतिशय नेटका होता. 


PR सदस्य तिथे जाताच सागरने PR सदस्यांचे स्वागत केले. थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रम सुरू झाला. गोलाकारात उभ्या असलेल्या सायकलपटुंनी एका बाजूला थोडे अंतर मोकळे ठेवले. त्या दिशेने सगळेजण दूरवर पाहू लागले. एवढ्यात त्या दिशेने अंबरनाथ सायकलिस्ट फाउंडेशन आणि बदलापूर सायकलिंग क्लबची जर्सी घातलेले एकेक सायकलपटू आले. काही क्षण गेले सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती.... आणि तिसरा सायकलपटू- श्री साबळे येताना दिसले. पण... ही कोणती जर्सी त्यांनी घातली होती? ही होती अंबरनाथ सायकलिस्ट फाउंडेशन आणि बदलापूर सायकलिंग क्लब ह्या दोन्ही संघांनी एकत्रितरित्या प्रदर्शित केलेली सामाईक जर्सी. 



ह्या जर्सीचे उद्घाटन हाच आजचा मुख्य कार्यक्रम होता. राष्ट्रध्वज हा देशाचे प्रतिनिधित्व करत असतो, त्याचप्रमाणे जर्सी समूहाचे...संघाचे प्रतिनिधीत्व करत असतो. दोन्ही संघांची सामाईक जर्सी! किती ही विलक्षण  कल्पना. अंबरनाथ सायकलिस्ट फाउंडेशन आणि बदलापूर सायकलिंग क्लब दोघांनी एक नवा आदर्शच निर्माण केला होता. डॉ. अहिरे, सागर, अभिषेक आणि दोन्ही संघाचे इतर सदस्य ह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरीत्या केले होते



थोड्या वेळातच इंधन भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. श्री लोकरे स्वतः जातीने लक्ष देत होते. इडली, डाळवडा आणि मेदुवडा ह्यांचे इंधन उत्तम होतेच. त्यावर चटणी आणि सांबारचे आवरणही इंधनाची गुणवत्ता वाढवत होते. सगळेच सायकलपटू तृप्त झाले होते. कार्यक्रमाची आखणी अतिशय नेटकी झाली होती. 


PR चे सदस्य परतीच्या मार्गाला लागले. काल द्विशतकी दौड झाल्यावर आज कार्यक्रम आटपून घरी जाईपर्यंत ६० किमी अंतर पार होणार होतेच. फुजी त्यावर समाधानी होती. काटई नाका जवळ येत असताना फूजिने विचार केला, जर सुनील गावस्करने पहिल्या डावात द्विशतक मारले असते आणि दुसऱ्या डावात तो साठ धावांवर खेळत असता तर तो समाधानी असता का? त्याने नक्कीच दुसऱ्या डावातही शतक मारले असते! फुजिला पुढे काय करायचे ह्याचे उत्तर आपोआपच मिळाले. काटई नाका येताच फूजिने डावे वळण घेतले. पुढे वेग घेत फूजिने थेट कोपरखैरणे गाठले. तिथून परत फिरायला फुजिचि हरकत नव्हती. कारण आता घरी जाईपर्यंत शतक पूर्ण होणार असल्याची फुजिला खात्री वाटत होती. 


परतीच्या प्रवासात Track And Trail मध्ये जात फूजिने रवी राहणेची भेट घेतली. दोन दिवसापूर्वीच रवी रहाणेकडे जाऊन सुमितने फुजीसाठी नवे टायर आणले होते. त्याचे उद्घाटन काल द्विशतकी दौड करत फुजीने केले होते. त्या टायरच्या जोरावर अवघ्या ११ तासाच्या दौडितच फुजिने २१२ किमी अंतर पूर्ण केले होते. रवीला सदिच्छा भेट देऊन फुजीने प्रवास सुरू केला खरा. पण आता अडथळ्यांची शर्यत सुरू झाली होती. पालवाजवळच्या चढावर काम सुरू असल्याने कोंडी झाली होती. तिथून मार्ग काढत फुजी पुढे सरकली. पुढे लांबवर धुराचे लोळ आकाशात जाताना दिसत होते. वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. इंच इंच लढवत फुजी मानपाडेश्वर मंदिराजवळ पोचली तर तिथे एनएमएमटीची बस जळत असलेली दिसली. खरतर आता केवळ सांगाडाच उरला होता. तोही आता जळत होता. त्याचेच धुराचे लोळ लांबवरून दिसत होते. रस्त्याची उजवी बाजू वाहतुकीला बंद करून डाव्या बाजूनेच वाहतूक सुरू होती. 


तेथून मार्ग काढत फुजी ९० फुटी रस्त्याला पोचली तोपर्यंत फुजिने ९० किमी अंतर पार केले होते. मग तिथेच आणखी ४-५ किमी ची फेरी मारून फुजीने शिरस्त्याप्रमाणे पटेल टी सेंटर मध्ये चहास्वाद घेतला. चहाची अप्रतिम चव जिभेवर रेंगाळताच फुजी पुन्हा ताजीतवानी झाली. त्यानंतर वेळ न दवडता फुजिने घर गाठले.


काल नवीन टायरचे उद्घाटन द्विशतकी दौडीने झाले होते. त्यानंतर काल संध्याकाळीच भेट मिळालेल्या Garmin चे उद्घाटन फुजिने आज शतकी दौडीने केले होते.

रविवार, २३ जानेवारी, २०२२

नामंजूर





जपत किनारा शिड सोडणे नामंजूर
अन् वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर

घड्याळाच्या काट्यावर उठणे नामंजूर
अन् घड्याळाच्या ठोक्यावर सायकलवणे नामंजूर.

फुजी जेव्हा घराबाहेर पडेल तीच सकाळ..तेव्हा घड्याळबाबा हातवारे करून काही का सांगेनात. आजही फुजी निघाली तेव्हा घड्याळबाबा ८ वाजल्याचे सांगत होते. बऱ्याचदा डोंबिवलीबाहेर पडेपर्यंतही फुजीचे गंतव्यस्थान ठरलेले नसते. आजचे ठिकाण मात्र आधीच ठरले होते.

दोन तीन दिवसांपूर्वी मुरबाड सायकल गटाच्या 'काय अप्पा ' समूहावर रविवारी शहापूर येथे सायकलचे नवीन दुकान सुरू होत असल्याचे समजले होते. त्यानिमित्ताने आज शहापूरला जाऊन शतकी दौड करण्याचे फुजिच्या मनात होते. दरम्यान आजच्या दौडीबद्दल पेडल रिपब्लिकच्या समूहावर चर्चा सुरू होती. श्रेयसने पडघा येथे जाणार असल्याचे कळवले आणि इतक्यातच राहुल जोशीने शतकी दौडीविषयी समूहावर विचारणा केली. सगळे योगायोग जुळून येत होते. शहापूरला गेल्यास तीन गोष्टी साध्य होणार होत्या. नवीन दुकानाच्या उद्घाटनाला जाता येणार होते, शतकी दौड होणार होती आणि पडघ्याला जाणाऱ्या पेडलच्या सदस्यांबरोबर दौडही करता येणार होती. त्यामुळे राहुलने विचारणा करताच फुजीने लगेचच शहापूरला जाणार असल्याचे संकेत दिले.

शनिवारी फुजीने शतकी दौड (१०० मैल -१६० किमी) केली होती. आता लगोलग दुसरी शतकी दौड (१०० किमी) ची संधी साधायची होती. मात्र पहाटे ५ वाजता जाग आली, तेव्हाही फुजीला झोप अर्धवट झाल्याची जाणीव झाली. राहुलला पुढे जाण्याचा संदेश पाठवून फुजीने आणखी तासभर डूलकी काढली. घड्याळबाबा मात्र पुढे पुढे धावत होते.

मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनी खेळ मांडणे नामंजूर 

असे खडसावत फुजीने घड्याळबाबांकडे दुर्लक्षच केले. अखेरीस दोन कप अमृतप्राशन केल्यावर फुजी निघाली. तेव्हासुद्धा भास्करबुवा मात्र ढगांच्या दुलईमध्ये लपले होतेच. फुजीने नेहमीप्रमाणेच संथपणे सुरुवात केली. ९० फुटी रस्ता, दुर्गाडी, गंधारी पुल पार करत फुजी पडघा नाक्याला पोचली. आता ठाणे नाशिक महामार्ग सुरू झाला होता. रस्ता चौपदरी होता पण वर्दळही जरा जास्त होती. चारचाकी वाहने बऱ्याच जवळून वेगाने जात होती. त्यातच ह्या महामार्गाला चढही लगोलग येत होते. त्यामुळे फुजीला फार वेग घेता येत नव्हता. अर्थात संधी मिळताच फुजी वेग वाढवत सरासरी वेग राखण्याचा प्रयत्न करत होती. 

फुजीने पहिला थांबा घेतला तोच जवळपास ३५-४० किमी अंतर पार केल्यावर! मुंबई२उडुपी ह्या खाद्यकेंद्राच्या नावाच्या मोहामुळे फुजी तिथे शिरली. 



इडली सांबार हे आवडते इंधन भरून झाल्यावर मी नेहमीप्रमाणे फूजीच्या चाकावरील रबरी आवरण तपासले. मागील चाकाच्या रबरी अवरणातील हवा किंचित कमी झाली होती. ह्याचा अर्थ स्पष्ट होता. शहापूर अजूनही ६-८ किमी दूर होते. त्यामुळे हवा पूर्ण जाण्याच्या आत थोडे पुढे जाण्यासाठी फुजीने वेग घेतला. २ किमी अंतरातच फुजी रुसली. अखेर तिला हातात धरुनच शहापूर गाठले. ३ महिन्यांपूर्वी श्रेयसबरोबर शहापूरला आलो तेव्हा सायकलदुरुस्तीचे दुकान पाहिले होते. आजही तिथे जाऊन फुजीची शल्यक्रिया उरकली.

तेथून लगेचच आजचा मुख्य कार्यक्रम म्हणजे 'रायडर सायकल' हे दुकान गाठले. दुकान छान सुशोभित केले होते. बाहेर बसण्यासाठी खूर्च्याही मांडल्या होत्या. दुकानातील वातावरण मंगलमय होते. दुकानात शिरत असतानाच प्रसन्न वाटत होते. फुजीने लगेचच दुकानाचे मालक श्री  संजय पांढरे ह्यांची भेट घेत ओळख करून घेतली. शुभेच्छा देण्यासाठी फुजी डोंबिवलीहून आल्याचे समजताच संजय चांगलेच खुश झाले. 



सायकल खरेदीसाठी शहापूरकरांना कल्याण डोंबिवली ठाणे गाठावे लागत होते. मात्र 'रायडर सायकल 'ने शहापुरकरांच्या ह्या समस्येवर पर्याय उपलब्ध करून दिला होता. दुकान नवीन असले तरी सायकलींची संख्या समाधानकारक होती आणि त्यातही वेगवेगळे पर्याय उपलब्ध होते. 

संजयजींना शुभेच्छा देऊन फुजी परत निघाली. फुजीने लगेचच वेग घेतला. परतीच्या प्रवासात उतार जास्त प्रमाणात  असल्याचे फुजीच्या लक्षात येत होते. भास्करबुवा हजर नसल्यामुळे दृश्यमानता कमी होती. वातावरण फारसे उत्साहवर्धक नव्हते. मात्र मिळत असलेल्या वेगामुळे फुजी लयीमध्ये जात होती. शहापूरकडे जात असताना जाणवत असलेली वाहनांची वर्दळ आता विरुद्ध दिशेला जाताना अजिबात जाणवत नव्हती. त्यामुळेच चहाची तल्लफ येऊनही फुजी थांबणे तर दूर वेग कमीही करत नव्हती. पडघा टोळजवळ असलेल्या कल्याणला जाणाऱ्या जवळच्या मार्गाकडे दुर्लक्ष करत फुजीने ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील दौड सुरू ठेवली. रांजनोली जवळ आल्याचे लक्षात आल्यावर मात्र फुजी चहासाठी थांबली. 'पंढरपुरी चहा ' ची केंद्रे फुजीला अनेक दिवस खुणावत होती खरी. आज मात्र तेथील चहाचा लाभ घेण्याचा योग आला. तरीही शतकी दौड करून आल्यावर ९० फुटी रस्त्यावरील चहाकेंद्रावर चहा घेण्याचा शिरस्ता फुजीने मोडला नाहीच. दौड सुरू होण्यापूर्वी घरी दोन कप चहा बरोबर दौड संपतानाही दोन वेळा चहा घेत फुजीने समन्वय साधला. कारण..
जगण्यासाठी चहा हवा मज समजे
चहा टाळण्याचा गर्व वाहणे.... नामंजूर

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

एक उनाड दिवस




भास्करबुवांनी वर्दी दिल्याशिवाय घराबाहेर पडायला फुजी तशी नाखुषच असते. त्यात सध्या हिवाळ्याचे दिवस... थंडी नसली तरी भास्करबुवा उशिराच उगवतात. घड्याळ बाबा मात्र उगाचच पुढे पुढे धावत होते. फुजी आज बाहेर पडली तेव्हा तर ते ८ चा ठोका पाडत होते. फुजिने नाराजीनेच त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. 

अजूनही भास्करबुवा मात्र नजरेस पडत नव्हतेच. फुजीने संथगतीने सुरुवात करत PR नाका गाठला...(PEDAL REPUBLIC चे सदस्य ज्या ठिकाणाहून राईड ची सुरुवात करतात त्याला जगभरात PR नाका असे म्हणतात हे सुजाण वाचकांना माहीत आहेच)

घारडा सर्कल मार्गे फुजी कल्याण शीळ रस्त्याला लागली तरी साधारण १ किमी पुढे धुक्याचे साम्राज्य पसरले आहे असेच वाटत होते. त्यातच मानपाडा बस थांब्यापाशी उखडलेल्या रस्त्याने फुजीचे स्वागत केले. फुजीने ते फारसे मनावर घेतले नाही. काटई बदलापूर पाईप लाईन रस्त्याला लागल्यावर मात्र फुजी थोडी सहजतेने जाऊ लागली. पहिला थांबा नेहमीप्रमाणेच बदलापूर येथील शेलारांच्या खाद्य केंद्रावर घेतला. गरमागरम इडली, झकास चटणी आणि मनसोक्त सांबार ही फुजीची सुट्टीच्या दिवशीची शेलारांकडची ठरलेली फर्माईश! आपल्या डिश बरोबरच येथील अण्णा सांबार भरलेली एक छोटी बादली आपल्या मेजावर आणून ठेवतो. मग अस्मादिक इडली सांबार ऐवजी सांबार इडली न स्वाहा करतील तरच नवल.

इडली सांबारचे इंधन पुरेपूर भरून झाल्यावर फुजी चांगलीच ताजीतवानी झाली होती. खरवई जवळचा खड्डेमय रस्ता, चढण ह्यांना पार केल्यावर फुजीने वेग घेतला. मात्र अजूनही भास्करबुवा ढगांच्या दुलईमागे लपले होते. तसे ते अधूनमधून बाहेर डोकावत असले तरी त्या दुलई मागून पूर्णपणे काही बाहेर येत नव्हते. फुजी मात्र आता मजेत पुढे जात होती. बदलापूर पुढे वाहनांची गर्दीही कमी झाली होती. नेरळच काय पण कर्जतचा चार फाटा मागे पडला तरी फुजी दुसरा थांबा घ्यायला तयार नव्हती. कर्जत चौक रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असली तरी वर्दळ कमी असल्यामुळे फुजिने वेग कायम राखला होता. चौक फाटा आल्यावर फुजिने उजवे वळण घेत पनवेलकडे मोर्चा वळवला. लोधीवली जवळ आल्यावर मात्र अस्मादिकांनी फूजीला थांबवले. सफरचंदाचे इंधन भरून झाल्यावर फुजीच्या चाकावरील रबरी आवरण तपासले खरे... ओह, मागील चाकावरील आवरण पूर्णपणे दाबले गेले. त्यातील हवा भुर्रर्रर उडाली होती. फुजी ने आजूबाजूला पाहिले, तर शेजारीच कारागीर दिसला. तो खरतर स्वयंचलित आणि प्रदूषणकारी वाहनांचा कारागीर होता, पण फुजीने आपल्याकडे साहित्य आहे असे म्हटल्यावर मात्र त्याने लगेचच शल्यक्रिया पार पाडली.

त्यानंतर टमटमित फुगलेल्या चाकाच्या जोरावर राष्ट्रीय महामार्ग ४ च्या गुळगुळीत पृषठभागावर फुजीने चांगलाच वेग घेतला. पनवेल शहरात प्रवेश न करता पळस्पे फाट्याहून फुजिने जेएनपीटीकडे जाणारा पनवेल बाह्यवळण मार्ग निवडला. ह्या प्रशस्त मार्गावर फुजी मजेत जाऊ लागली. खरतर तिसरा थांबा घेण्यासाठी कळंबोली येथे थांबण्याचा अस्मादिकांचा विचार होता. पण फुजीला मिळालेली लय पाहता अस्मादिकांना विचार बदलावा लागला. इडली आणि सफरचंद ह्यांचे इंधन संपून आता वेग मंदावू लागल्याची जाणीव फुजीला होईपर्यंत खारघर आले होते. एव्हाना फुजिचे शतकही पूर्ण झाले होते. मग मात्र फुजीने पुन्हा छोटा थांबा घेत संत्र्याचे इंधन भरून घेतले. त्यानंतर तर फुजीचा वेग चांगलाच वाढला. बेलापूर ठाणे हमरस्त्यावरील उड्डाणपूल घेत फुजी लयीत पुढे जात होती. वाटेत दिसत असणारी निराकेंद्र फुजीला खुणावत होती. पण त्या अमिषाला न बधता फुजीने मार्गक्रमण सुरूच ठेवले होते. दरम्यान भास्करबुवा थोडावेळ ढगांच्या दुलईतून बाहेर येऊन फुजिकडे डोळे वटारू लागले होते. अखेर तुर्भे नाका पार होताच थोड्याशा नाराजीनेच एका निराकेंद्रापाशी फुजी थांबली. दोन पेले निरा रिचवल्यावर तृप्त मनाने फुजीने पुन्हा प्रवास सुरू करताच भास्करबुवा पुन्हा गायब झाले. 
आयरोलि मुलुंड दरम्यानच्या खाडीवरील पुलावर फुजीने मनसोक्त वारा पिऊन घेतला. खरतर तिथे फुजी वाऱ्यावरच स्वार झाली होती. 
संत्रे स्वाहा करत असताना चहाचे इंधन भरण्यासाठी मी मुलुंडला येत असल्याचे आमदिकांनी राहुलला कळवले होते. त्यामुळे तो वाट पाहत होताच. तिथे चिवडा, लाडू आणि चहाचे इंधन भरत असताना गप्पाही रंगात होत्या. मात्र पुढे ठाणे शहर, ठाणे नाशिक हमरस्ता आणि भिवंडी कल्याण हमरस्ता ह्यावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता फुजीला फार वेळ थांबता येणार नव्हते. मुलुंडहून निघतानाच फुजीला आपला अधिक वेळ न थांबण्याचा निर्णय योग्य असल्याचे ध्यानात आले. आनंदनगर चेक नाक्यावर वाहनांची रांगच रांग लागली होती. तेथून शिताफीने वाट काढत फुजी पुढे निघाली खरी पण माजिवडा -रांजनोली-गोवेगाव मार्गे कल्याण गाठेपर्यंत वाहनांच्या भाऊगर्दीने फुजिची साथ सोडली नाहीच. दुर्गाडी पुलावर तर फुजीला साथ द्यायला वरुण राजांनीही हजेरी लावली. तसे ते केवळ शिंतोडे उडवूनच परतले.

९० फुटी रस्त्यावर आल्यावर त्या गोतावळ्यातून फूजीची सुटका झाली. अखेरीस चहास्वाद घेत फुजिने आजच्या शतकी (१०० मैल - १६० किमी) फेरीची सांगता सुफल संपन्न झाल्याची ग्वाही दिली.

भेट आसामच्या शिवाजीशी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३३

आमची गुवाहाटी येथील व्यवस्था रवींद्र हणमत्तेकर करणार होते. आम्ही पुढे एक चौकात जाऊन त्यांना संपर्क करण्याच्या निमित्ताने चहा पिण्यासाठी थांब...