सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

पेडल रिपब्लिक

'पेडल रिपब्लिक' ...
राष्ट्रीय दिनांक २४ अग्रहायण १९४१

राष्ट्रीय कॅलेंडरचा ९ वा महिना- 'अग्रहायण'ची अखेर जवळ आली होती. तेजोनिधी अतिदक्षिणेकडे झेपावत होता. आजचा वारही त्याच्याच नावावर बेतलेला... रविवार!

डोंबिवली शहरातील सायकलपटूंचा एक समूह नेहमीप्रमाणेच भास्कराने जागे व्हायच्या आतच दौड घेण्यास सज्ज झाला होता. डोंबिवली शहरातील चार रास्ता ...या नियोजित ठिकाणी जमा झालेले सायकलपटू आज विशेष उत्साहात होते. सगळ्यांनी एका रांगेत दौड सुरू केली. पाहता पाहता टिळक पुतळा, पेंढरकर महाविद्यालय पार करत फौज कल्याण शीळ रस्त्याला लागली.  प्रत्येक सायकलस्वाराने शिरस्त्राण परिधान केले होते. तसेच प्रत्येक सायकलनेही अग्रभागी दिवा परिधान केला होता. शिस्तबद्ध सायकलिंगसाठी हा गट प्रयत्नशील होता, .. नव्हे ती तर ह्या गटात सामील होण्याची प्रमुख अट होती. अन्यथा कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, अशी सक्त ताकीद गटनायक सौमित्र सामंत नेहमीच देत असे.

सामंत पेट्रोल पंपापाशी पोचल्यावर सगळ्यांनी थोडा विसावा घेतला. काही सदस्य चार रास्ता ऐवजी सामंत पेट्रोल पंपापाशीच येणार होते, तेही आता सामील झाले. सगळ्यांचा उत्साह पाहताच रवीराजानेही धुक्याची चादर दूर केली होती.

लयबद्ध पद्धतीने एका पाठोपाठ एक सर्व सायकलस्वार शीळ फाटा येथे पोचले. लगेचच त्यांनी डावीकडे मोर्चा वळवला. आजचे नियोजित ठिकाण आता जवळ येत होते. पनवेलकडे जाणारा हा महामार्ग नेहमीच गजबजलेला असे. काही सदस्य थोडे पुढे गेले होते. मात्र खारघरकडे जाणाऱ्या फाट्यापाशी ते सदस्य इतर सदस्यांसाठी थांबले होते. सगळेजण पुन्हा एकत्र भेटल्यावर तो समूह खारघरच्या सेंट्रल पार्कच्या दिशेने जाऊ लागला. दुतर्फा रुंद आणि स्वच्छ रस्ता पाहताना सगळ्या सायकलींचा उत्साह आणखीच वाढत होता. प्रभातफेरीसाठी निघालेले आबालवृद्ध त्या प्रशस्त रस्त्यावर दिसत होते. ह्या मोकळ्या रस्त्यावर आणि मोकळ्या हवेचा अनुभव विलक्षण सुखावत होता. प्रत्येकजण तेथे आपापल्या गतीने पुढे सरकत होता.
थोड्याच अवधीत खारघरचे सेंट्रल पार्क आले.
एकाशेजारी एक अश्या रांगेत सगळ्या सायकली हारीने उभ्या केल्यावर सगळेजण त्या विस्तीर्ण पार्कमध्ये शिरले. डोळे विस्फारतील अशी हिरवळ नजरेस पडत होती. पार्कमध्ये बऱ्यापैकी गर्दी असली तरी त्याच्या एकंदर क्षेत्रफळामुळे कोठेही गर्दी होत नव्हती. एका ठिकाणी काही स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. शेजारीच विस्तीर्ण प्रेक्षागृह होते. सायकलपटूंचा समूह त्या प्रेक्षागृहाच्या अत्यंत उंचीवर गेला.




सभोवताली दिसणारे दृश्य मनात साठवून सगळेजण चार पायऱ्या खाली उतरले.



आणि मग सगळ्यांचाच उत्साह अगदीच टिपेला गेला. ज्या क्षणाची सर्व सदस्य वाट पाहत होते , तो क्षण जवळ आला होता. आपल्या कवेत धरलेली गुंडाळी बाहुबली मेघेश हळूहळू उलगडत होता. त्या ठिकाणी व्यायामासाठी आलेले इतर लोकही कुतूहलाने थांबून बाहुबलीकडे पाहत होते. मेघेशने हळूहळू आपले दोन्ही हात दोन विरुद्ध बाजूला लांबवत नेले....अन टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला...
बहुबलीच्या दोन्ही बाहूंमध्ये उलगडलेल्या त्या फलकावर अक्षरे झळकत होती....

'Experience the road little differently...

PEDAL REPUBLIC'





शिस्तबद्ध सायकलिंगचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ह्या सायकलसमूहाने एक पेडल पुढे मारले होते...
'पेडल रिपब्लिक' ह्या गटाच्या घोषणाफलकाचे उदघाटन खारघर येथील विशाल अश्या सेंट्रल पार्कमध्ये शेकडो उपस्थितांच्या साक्षीने झाले होते.



गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

नेवाळी येथील अमृतपान

आदित्य वेगाने दक्षिणेकडे झेपावत होता. दक्षिण गोलार्धातील टोकाला भोज्या करून माघारी फिरण्यासाठी तो आतुर झाला होता. ज्या दिवशी आदित्य दक्षिणेच्या टोकाला पोहोचणार आहे, त्या दिवशी वसुंधरेला सगळ्यात छोटा दिवस आणि सगळ्यात मोठी रात्र अनुभवता येईल. तर त्याच्या पुढील दिवशी आदित्य दिशा बदलून उत्तरेच्या दिशेने वळेल. त्याचमुळे जगातील एकमेव शास्त्रीय सौर कॅलेंडर म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरचा १० महिना पौष सुरू होईल.

त्या दिवशी श्विन आणि स्कॉटसुद्धा उत्तरेकडे झेपावतील. तो दिवस आता जवळ येत होता. त्यामुळे दोघांचा सरावही नियमितपणे सुरू असणे आवश्यक होते. सुदैवाने आज स्कॉटलाही सकाळी वेळ मिळाला होता, त्यामुळे दोघांना एकत्र फेरफटका मारता येणार होता. आदल्याच दिवशी डोंबिवली येथील 'बाईकपोर्ट' या दवाखान्यातून श्री इम्रान लांजेकर या तज्ञ डॉक्टरने आरोग्यचाचणी केल्यावर स्कॉटला डिस्चार्ज मिळाला होता.

आदित्य त्याची प्रभा पसरवण्याअगोदरच श्विन आणि स्कॉट घरातून निघाले. मात्र एव्हाना ब्रह्ममुहूर्त उलटून गेला होता. ब्रह्म मुहूर्त म्हणजे ‘निर्मात्याचा काळ’. ही अशी वेळ आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वत:ला पुन्हा नव्याने घडवू शकता. तुम्ही स्वत:च ब्रह्मण (निर्माता) बनू शकता आणि स्वत:ला हवे त्या प्रकारे घडवू शकता. आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल साधारणपणे रात्री ३.३० ते पहाटे ५.३०- ६.०० चा काळ.

श्विन स्कॉट घरातून निघाल्यावर महानगरपालिकेने रस्त्यावर लावलेले दिवे थोड्याच वेळात बंद झाले. श्विन आणि स्कॉटने डोंबिवली विद्युतरथस्थानक ओलांडले आणि चार रास्ता येथे पोहोचले. 'पेडल रिपब्लिक' चे सदस्य आवटीकाका, सौमित्र सामंत, मेघेश कुलकर्णी तिथे थांबले होते. डोंबिवली सायकल क्लब सदस्यांचे केवळ रविवारच्या प्रभातफेरीवर समाधान होत नव्हते. त्यांची भूक वाढली होती. त्यामुळेच काही सदस्यांनी दररोज नियमित आणि शिस्तबद्ध सायकलप्रभातफेरीला सुरुवात केली होती. अर्थातच ह्यातील काही सदस्य ह्या अगोदरही वैयक्तिकरित्या नियमित सायकलप्रभातफेरी करत होते. मात्र आता त्याला सामूहिक आणि शिस्तबद्धता स्वरूप आले होते. श्विन स्कॉटला पाहताच चार रास्ता येथे थांबलेल्या पेडल रिपब्लिकच्या सदस्यांनीही टाच मारली. मात्र पुढे चार रास्ता ते टिळक पुतळा या अंतरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे वेग मंदावला होता.

मात्र सगळेजण एका लयीत जात होते. कल्याण शीळ महामार्ग गाठल्यावर सगळ्यांनी वेग घेतला. वाटेत नयना आघारकरही सामील झाल्या होत्या. स्कॉटने आता आघाडी घेतली होती. मानपाडेश्वर मंदिर येईपर्यंत मात्र आदित्य त्याच्या दुलईतून बाहेर आला होता. अद्याप त्याचे दर्शन झाले नसले तरी त्याची उपस्थिती जाणवू लागली होती. पेडल रिपब्लिकचे सदस्य आणि श्विन स्कॉट ह्यांना वेग वाढवण्यासाठी एवढे पुरेसे होते. स्कॉट काटई नाक्याला डावीकडे वळणार इतक्यात मागून मल्हार फाळके हा डोंबिवली सायकल क्लबचा किशोरवयीन सायकल पटू वेगाने शीळ फाट्याच्या दिशेने पुढे गेला. स्कॉटने मात्र नेवाळी फाट्याची दिशा पकडली. रस्त्याला वर्दळ फारशी नव्हती आणि रस्ताही रुंद होता. शिवाय रस्त्याच्या मधोमध असलेला दुभाजक चुकार वाहनांना अटकाव करत होता.

सकाळच्या सुखद हवेत नेवाळी फाटा येथे पोचले तेव्हा सगळेजण उत्साहात होते. नेवाळी गावाची लोकसंख्या जेमतेम २५०० च्या आसपास. मात्र कल्याण श्रीमलंगगड रस्ता आणि काटई नाका ते बदलापूर/कर्जत पाइपलाइन रस्ता जेथे एकमेकांना छेद देतात, त्या नेवाळी फाट्याचा परिसर कायम गजबजलेला असतो. डोंबिवली, पालवा, कल्याण,  अंबरनाथ, बदलापूर या सगळ्या शहरातील सायकलपटू नेवाळी फाटा येथे नियमितपणे फेरी मारत असतात. पेडल रिपब्लिक चे सदस्य आणि श्विन स्कॉट येथे अमृतपानाच्या निमित्ताने खडा विसावा घेऊ लागले.





पेडल रिपब्लिकचे अधिकृत छायाचित्रकार आवटीकाका यांनी उपस्थितांना भ्रमणध्वनीद्वारे छायाचित्रबद्ध केले. खरंतर गप्पा चांगल्याच रंगत होत्या. मात्र घड्याळबाबांच्या पुढे कोणाचे काय चालणार! त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपले काय सुरूच ठेवले होते. अखेरीस त्यांना मान देत सगळ्यांनी पुन्हा एकदा टाच मारत परतीचा मार्ग धरला.



रविवार, ८ डिसेंबर, २०१९

उपसंहार: अष्टविनायक यात्रा

श्री गजानन म्हणजेच गणपती हा बुद्धीचा अधिष्ठाता! भारतात विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. प्रत्येक गावात गणपतीचे मंदिर असणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीन मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.
पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे गणपती डाव्या सोंडेचे आहेत.

अस्मादिक गेल्या २२ वर्षात साधारण दर दोन तीन वर्षात अष्टविनायक यात्रा करत आहेत. अर्थात त्यामागे तेथील मूर्ती म्हणजेच देव असा अर्थ कधीच मनात नव्हता/ नाही. किंबहुना हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक अणू रेणू हाच ईश्वर ही माझी धारणा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून गांधीजींच्या भाषेत सांगायचे तर 'सत्य हाच ईश्वर...म्हणजेच जे अस्तित्वात आहे तोच ईश्वर' हे मान्य केल्यास ईश्वराच्या अस्तित्वाविषयी शंका राहत नाही. मात्र जर निसर्गातील प्रत्येक कण हाच ईश्वर आहे हे मान्य केले तर कोणत्याही देवळात आणि तेही ठराविक आठ ठिकाणी स्थापलेल्या मूर्तीचे दर्शन घ्यायला का जावे?

खरं सांगायचं तर मानवी कल्पनेच्या पलीकडील कोणतीतरी शक्ती जगात आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्या शक्तीला अभिवादन करण्यासाठी प्रतीक म्हणून मूर्तिपूजा! आणि मग निव्वळ दैनंदिन कामकाजातून पूर्णपणे मुक्त होऊन निव्वळ त्या प्रतिकाशी समरस होता यावे यासाठी ठराविक स्थानी जाऊन तेथील स्थापन केलेल्या प्रतीकाचे म्हणजे मूर्तीचे दर्शन! अस्मादिकांना अष्टविनायक दर्शन करत असताना ना धार्मिक श्रद्धा प्रवृत्त करत होती ना वैज्ञानिक श्रद्धा विरोध करत होती.  मात्र एक वेगळ्या प्रकारचे, शब्दात मांडता येणार नाही असे समाधान अष्टविनायक यात्रे द्वारा नक्कीच मिळत होते. 

स्कॉट आणि श्विनचे सायकलिंग ४-५ महिने थांबले होते. ते पुन्हा सुरू करण्यासाठी समोर ध्येय हवे होते. तसेच स्कॉटवर वैशाखात ओढवलेल्या संकटातुन सुटका झाल्यावर नैसर्गिक शक्ती म्हणजेच ईश्वराला नमनही करायचे होते. म्हणून अष्टविनायक सायकल यात्रा करण्याचे मनात आले. तो विचार जितक्या झटकन मनात आला, तितक्याच झटकन त्यावर शिक्कामोर्तबही झाले. अस्मादिकांनी यापूर्वी एकदा सायकलने तर इतर अनेक वेळा प्रदूषणकारी वाहनाने अष्टविनायक यात्रा केली होती. नियोजित पुणे जम्मू सायकल यात्रेची पूर्वतयारी किंवा रंगीत तालीम म्हणूनही यावेळी अष्टविनायक यात्रा सायकलने करायचे ठरवले होते. मुख्य म्हणजे वैशाखातील अपघातानंतर बंद झालेले सायकलिंग सुरू झाल्यावर स्कॉटला लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी आत्मविश्वासही मिळवायचा होता.

श्विन स्कॉट बरोबर राजीव दुधालकर हेही अष्टविनायक यात्रेसाठी सामील होण्यास तयार झाले. सराव करू न शकल्याने त्यांनी आदल्या दिवशी अष्टविनायक यात्रेस येण्यास असमर्थता दाखवली. तेव्हा 'तुम्हाला जमेल' असे आश्वस्थ करत श्विनने त्यांना  तयार केले. मनाच्या निग्रहाच्या जोरावर त्यांनी पहिल्या दिवशी महड आणि पाली पर्यंत साथ दिली. राजीव प्रमाणेच विलास म्हणजेच गजानन वैद्य यालाही पालीपर्यंत येण्यास श्विनने तयार केले. पाली म्हणजे ह्या गजाननाचे (विलासचे) श्रद्धास्थान! त्यामुळे त्यालाही मोह आवरता आला नाही. पाली येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यावर दुसऱ्या दिवशी विलास आणि राजीव माघारी परतले. त्यानंतरही संपूर्ण यात्रेत श्विन आणि स्कॉट हे कधीच एकटे राहिले नाहीत. जेव्हा जेव्हा विघ्न आले तेव्हा तेव्हा कोणाना कोणाच्या स्वरूपात विघ्नहर्ताही उपस्थित होऊन ते विघ्न दूर करत होता.

गर्दीच्या रस्त्यातून मार्ग दाखवणारा सुभाष माने श्विनस्कॉटसाठी  स्वतःच्या घराच्या ५-६ किमी लांबवर घोडा सायकलवर दौडत होता. तसेच नगरसेवा टाइम्सचे शिवराम कांबळे, नाथाभाऊ उंद्रे पाटील हे तर घरातीलच सदस्य झाले होते. नाथाभाऊ घरातील वडीलधारे वाटू लागले. प्रत्यक्ष भेट न होताही मोरगावचे ढोले भाऊ हे मनाने इतके जवळ आले की ते आमच्या सोबतच मोरगावला आहेत असा विश्वास निर्माण झाला. सिद्धटेकहुन परतताना केडगाव चौफुला येथील इंद्रप्रस्थ लॉजमालकाला फोन केला तेव्हा त्याने केलेले मार्गदर्शन व्यावसायिक लॉजमालकापेक्षा एखाद्या आप्ताने केलेले मार्गदर्शनच होते. हक्काने आणि आग्रहाने चहा पाजणाऱ्या शिवाजीराव थोरातांना परके कसे मानायचे? आमच्याप्रमाणेच सायकलवरून अष्टविनायक यात्रेस निघालेले अटलास (उपेंद्र परब) आणि हिरो हॉक (हितेश कापडोस्कर) हे तर आमच्यापासून वेगळे होऊच शकत नाहीत. स्वागत करण्यासाठी विलासप्रमाणेच गोवेलीपर्यंत येणारे तुषार, दीपक आणि अजय याखेरीज या यात्रेत मदत करणारे, हक्काने आग्रह करणारे, सल्ला देणारे , मार्गदर्शन करणारे, कौतुक करणारे, शाबासकी देणारे अनेक ज्ञात, अज्ञात आप्त यांच्याशी जुळलेले बंध हे कशाचे निदर्शक आहे? भारतीय संस्कृती मध्ये भेट होताच कोरडे 'हाय हॅलो' न करता नमस्कार करण्याची पद्धत रूढ झाली. याचे कारण येथे अस्तित्वात असलेली निसर्गातील प्रत्येक अणुरेणुला ईश्वरी अंश मानण्याची संस्कृती. अष्टविनायक यात्रेदरम्यान आपणहून पुढे आलेले हे हात याच संस्कृतीचे फलित आहे.

अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने करताना मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेऊन यात्रा सुरू करून इतर सात गणपतींचे दर्शन झाल्यावर पुन्हा मोरगावच्या गणपतीचे दर्शन घ्यावे हा संकेत आहे. मात्र हिंदू धर्म हा कठोर नसून प्रवाही आणि पाण्यासारखा निर्मळ असल्याने मोरगावच्या गणपतीचे दर्शन पहिल्यांदा घेणे शक्य नसल्यास ज्या गणपतीचे दर्शन प्रथम घेतले त्या गणपतीचे दर्शन पुन्हा शेवटी घेतले तरीही आडकाठी नाही. श्विन आणि स्कॉट महडला पोचण्याच्याही आधी त्यांना दर्शन झाले होते ते श्री गजानन वैद्यचे! वैद्यांच्या घरातीलच हा गजानन! यात्रा सुरू करताना साथ देणारा हा गजानन लेण्याद्रीहून परतताना पुन्हा गोवेलीजवळ श्विन स्कॉटला साथ द्यायला आला होता. त्यामुळे या यात्रेत ज्या गजाननाचे दर्शन सर्वप्रथम झाले होते त्याच गजाननाचे दर्शन श्विन स्कॉटला शेवटीही झाले होतेच. भारतीय संस्कृती प्रमाणे त्याच्यातही ईश्वरी अंश होताच की.


          श्विन आणि स्कॉटने केलेला अष्टविनायक मार्ग



               सर्वसाधारण दृष्टिकोनातील नकाशा


                           भूप्रदेशीय नकाशा


                         उपग्रहीय नकाशा  





सोमवार, २ डिसेंबर, २०१९

स्वगृही परत: अष्टविनायक सायकलयात्रा लेख ९

सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील नैसर्गिक बेचक्यात मुरबाड तालुका वसलेला आहे. मुरबाड जवळील म्हसा येथील म्हसोबाच्या पौष पौर्णिमेला भरणाऱ्या जत्रेला दोनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. सिद्धगड, पिकॉक हिल, बारवी धरण ह्यांच्या सान्निध्यात असलेल्या ह्या परिसरात निसर्गाची उधळण मुक्त हस्ते होत असते. अहमदनगरकडून मुरबाडमार्गे कल्याणकडे जाणारा राज्य महामार्ग २२२ हा दुहेरी रस्ता चांगल्या स्थितीत आहे.

लेण्याद्रीहून निघून माळशेजमार्गे  मुरबाड गाठत श्विन स्कॉट ह्याच राज्य महामार्गावरून कल्याणच्या दिशेने निघाले होते. मात्र श्विनला पुन्हा एकदा मामनोलीजवळ एका विचित्र योगायोगाला सामोरे जावे लागले. याआधी केलेल्या अष्टविनायक सायकल यात्रेप्रमाणेच याही अष्टविनायक सायकलयात्रेदरम्यान श्विनच्या मागील चाकाच्या रबरी नळीला मामनोलीजवळ छिद्र पडले होते. स्कॉट थोडी पुढे गेली होती. एव्हाना संध्याछाया पडू लागल्या होत्या. त्यामुळे श्विनने स्कॉटला थांबण्याचा इशारा न देण्याचा निर्णय घेतला. विलास वैद्य ह्याला मात्र भ्रमणध्वनीद्वारे झाल्या प्रकाराची कल्पना दिली. श्विनकडे हवा भरण्याचे दोन पंप होते. त्यातील मोठ्या पंपाला नळी असली तरी त्याचा दांडा निखळला असल्याने त्या पंपाचा उपयोग नव्हता. हवा भरण्यासाठी दुसरा छोटा पंप हा रबरी नळी मध्ये थोडीशी हवा भरायला उपयोगी असला तरी छिद्र पडलेल्या रबरी नळीत पुन्हा पूर्ण हवा भरण्यास मात्र पुरेसा नव्हता.

सुदैवाने रबरी नळीला छिद्र पडले असले तरी त्यातील हवा पूर्णपणे गेली नव्हती. त्यामुळे श्विनने तसेच पुढे जायचे ठरवले. मात्र त्या आधी श्विनच्या मागील चाकावरील धावकावरील सामान अस्मादिकांच्या पाठीवर आले. मामनोलीला सायकलचा शल्यविशारद मिळाला नाही तरी गोवेली येथे मिळू शकेल असे श्विनला वाटत होते. तसेच विलास वैद्यसुद्धा गोवेली येथे येणार होताच. त्यामुळे असलेल्या हवेच्या जोरावर जास्तीत जास्त पुढे जायचे ठरवून श्विनने दौड सुरू केली. मामनोली ते गोवेली हे अंतर जेमतेम ६ किमीचे. मात्र २-३ किमी अंतरातच हवा अगदीच कमी होऊ लागल्याची जाणीव झाल्यामुळे श्विनने पायउतार होत चालत जायला सुरुवात केली. आता मात्र अंधार पडायला सुरुवात झाल्यामुळे श्विन सावधपणे जात होता. सुदैवाने थोड्याच वेळात दुचाकीवरून विलास वैद्य येत होता. त्याने वाटेत गोवेली येथे स्कॉटला थांबायला सांगितले होते. 

विलासकडेही पंप नव्हता. गोवेलीला जाऊन सायकलशल्यविशारद शोधण्यासाठी विलास परत निघाला. थोड्या वेळात श्विनही चालत गोवेलीला पोचला. विलासला शल्यविशारद सापडला नसला तरी तेथील एका दुकानात त्याला सायकलचा पंप मात्र मिळाला होता. त्या दुकानाच्या ओसरीतच ठाण मांडून विलासने श्विनची नळी बदलून राखीव नळी चाकाला बसवली.

एव्हाना श्विन स्कॉटचा जठराग्नी चांगलाच जागृत झाला होता. तसेच मागे राहिलेले अटलास आणि हिरो हॉक अजून आले नव्हते. गोवेली येथे त्यांचा निरोप घेण्याचे ठरले होते. कारण शहाड नंतर त्यांचा मार्ग वेगळा होता आणि तेथील गर्दीत त्यांचा निरोप घेण्यासाठी थांबणे अवघड होते. त्यामुळे गोवेली येथे क्षुधाशांती करण्याचे श्विन स्कॉट आणि विलासने ठरवले.

पुढे रायते येथे तुषार पवार, दीपक जाधव आणि अजय कार्ले हे अश्वमेध प्रतिष्ठानचे उत्साही कार्यकर्ते श्विन स्कॉटच्या स्वागताला थांबले होते. मात्र श्विन स्कॉट गोवेली येथे थोडावेळ थांबणार असल्याचे समजताच ते तिघेही थेट गोवेली येथे आले. ह्या जुन्या सवंगड्यांची भेट होताच श्विनचा दिवसभराचा शीण निघून गेला. अश्वमेध प्रतिष्ठानच्या ह्याच सवंगड्यांच्या पाठिंब्यामुळे व सहकार्यामुळे श्विनने 'सह्याद्री वाचवा' ह्या संदेशासह नवापूर ते महाबळेश्वर ही सह्याद्रीच्या डोंगरखोऱ्यातील सायकलयात्रेत सहभाग घेतला होता.

थोड्या वेळात अटलास आणि हिरो हॉकही तेथे येऊन पोचले. त्यांचे स्वागत करण्यास त्यांचीही मित्रमंडळी उल्हासनगरहून आली होती. सगळ्यांची एकमेकांशी भेट होताच त्या क्षुधाशांतिगृहात एकच जल्लोष सुरू झाला.


एव्हाना रोज काळोखाआधी दिवसाचा प्रवास पूर्ण करण्याचा आटापिटा करणारा श्विन आज मात्र निर्धास्त होता. कोणाचाही पाय निघत नव्हता. गेले ६ दिवस थोडे पुढे का होईना पण एकमेकांच्या साथीने जाणाऱ्या अटलास, हिरो हॉक यांचा निरोप घेण्याची श्विन स्कॉटची वेळ आली होती. 'पुन्हा भेटूया' चा गजर करतच त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

तेजोनिधी मावळल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अर्थात आता श्विन स्कॉटला साथ करण्यासाठी दुचाकीवरून विलास वैद्य होताच. शिवाय तुषार, अजय आणि त्याच्या दीपक हेसुद्धा रायते येथे न थांबता त्यांनी थेट शहाड पर्यंत साथ दिली. शहाडच्या पुढेमात्र पथदिवे असल्याने अंधाराचे भय नव्हते. त्यामुळे शहाड येथे तुषार आणि त्याच्या सहकाऱ्यांचा निरोप घेत श्विन स्कॉट विलास सह पुढे निघाले.

कल्याण येथेही एक अवलिया श्विन स्कॉटची वाट पाहत होता. त्या अवलियाने 'टाकाऊ तुन टिकाऊ' ह्या संकल्पनेसह अनेक प्रकारच्या सायकलींची निर्मिती केली होती. तो होता दुर्गेश झिपरे! दुर्गेशच्या सायकल प्रसूतिगृहात तीन जणांनी चालवायची सायकल, ९० अंशाचे आकार असलेली काटकोनी सायकल, मोटरसायकलचा भास होणारी 'रॉकी' सायकल, पुढील चाक छोटे आणि मागील चाक मोठे अशी अनोखी सायकल अश्या वेगवेगळ्या सायकलींनी जन्म घेतला होता. अश्या ह्या हरहुन्नरी कलाकाराची भेट हा श्विन स्कॉटच्या अष्टविनायक सायकलयात्रेचा उत्तम समारोप होता.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...