शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५

एलुरुचा पाहुणचार: कोलकाता चेन्नई सायकलसफर


राजेशाही थाटातील हॉटेलच्या रूममध्ये झोप शांतपणे लागली होती. अर्थात आधीच्या दिवसात कापलेले जवळपास १५० किमी अंतर देखील त्या शांत निद्रेसाठी उपयोगी ठरले असावे. आरामदायक वास्तव्यानंतर आम्ही आमच्या सायकली सज्ज केल्या. सकाळचे वातावरण खूपच उत्साहित करणारे होते. राजमहेंद्रवरम शहर बऱ्यापैकी मोठे होते. तिथे बघण्यासारख्या अनेक गोष्टी/ ठिकाणे होती. दुर्दैवाने काल आमचे तीन साथीदार शहर हाकेच्या अंतरावर थांबल्याने आम्हाला शहर बघताच आले नाही. 

आज सकाळी मात्र शहर जागे होण्याच्या आत शहराबाहेर पडलो तर शहरी गर्दी लागणार नव्हती. सुरवातीचे गल्लीबोळ, रस्ते पार करत आम्ही राजमहेंद्रवरमचा निरोप घेत असतानाच गोदावरी नदीवरील एक लांबलचक पूल दिसू लागला. आम्ही एकदम उल्हासित झालो. नदीचे पात्र बऱ्यापैकी मोठे असल्याचे लक्षात येत होतेच. सुरुवातीला नदीच्या काठाने थोडा चढ चढून मग डावीकडे वळल्यावर नदीवरील पूल पार करायचा होता. पूल जवळपास ३ किमी लांब होता. पुल पार करत असताना मी मनसोक्त चित्रीकरण करून घेतले. आनंद, संजय, आमचा गोवेकर मित्र विक्रम देखील पूल पार करताना मजा घेत होते. राजमहेंद्रवरम शहराचे अंतरंग आम्ही पाहू शकलो नाही तरी शहराने निरोप देताना आम्हाला चांगलेच खुष केले.


पूल पार झाल्यावरही बऱ्याच अंतरावर महामार्ग लागला नव्हता. रस्ता अजूनही फार रुंद नव्हता. त्यामुळे आपण योग्य दिशेने जात आहोत ह्याची एकदा खात्री करून घेतली. त्यानंतर बरीच दौड झाल्यावर मात्र आम्हाला चेन्नई कडे जाणारा महामार्ग समोरा आला. 



मात्र आता आकाशात मळभ दिसत होते. त्यामुळे आमचा उत्साह मावळला. आज अंतर जास्त ठेवले नव्हते. आजचे अंतर जेमतेम १०० किमी होते. त्यामुळे नाष्टा लवकरच केला. पण नंतर आनंद आणि संजय आणखीच संथ झाले. पुढील २ तासात जेमतेम १० किमी अंतर पार झाले. मग मी थोडा रुद्रावतार धारण करून सांगितले की तुम्हाला pedaling चा कंटाळा आला असेल तर सांगा आपण राईड थांबवू. राईड करायची असेल तर आता थेट Eluru ला गेल्यावरच जेवण मिळेल. Actually, तसे खरे मनात नव्हते. फक्त स्पीड वाढावा इतकीच इच्छा होती. नाहीतर १०० किमी ला सुद्धा संध्याकाळचे ७ वाजले असते. मग मात्र दोघेही सुसाट निघाले अखेर मीच २० किमी नंतर चहासाठी थांबवले. आनंदने गूळ विकत घेतला होता. तोही खाल्ला आणि निघालो. 




आम्ही चांगलाच वेग पकडला होता. वाटेत एक माणूस खांद्याला झोळी, डोक्याला फडके गुंडाळून चालत जात असलेला दिसला. दाढीही बऱ्यापैकी वाढली होती. तीदेखील अस्ताव्यस्त दिसत होती. मी त्याची चौकशी केली. तो प्रथम नीट बोलायलाच तयार नव्हता. तो थोडे आढेवेढे घेत बोलू लागला. तो बहुधा राजस्थानातील होता. त्याच्या म्हणण्यानुसार तो बऱ्याच वर्षांपूर्वी घर सोडून निघाला होता. कुटुंबातील कोणाशीही त्याचे संबंध नव्हते. तो कायम पायी प्रवास करत असे. आत्ताही जवळपास दीडशे किमी अंतर त्याला पायी जायचे होते. त्याच्या झोळीत फार काही असावे असे वाटेना. मी त्याला माझ्याकडून लाडू देऊ केले. मात्र तो ते घ्यायलाही तयार नव्हता. त्याला कोणतीही मदत नको होती. मी त्याला सांगीतले तू जसा पायी प्रवास करत आहेस तसेच आम्ही सायकलवरून प्रवास करत आहोत. आपण एकमेकांचे सहप्रवासी आहोत. त्यामुळे तुला माझ्याकडून लाडू घ्यायला हरकत नाही. मग मात्र तो लाडू घ्यायला तयार झाला. त्याने त्याची झोळी उघडून त्यातील एका डब्यात तो लाडू नीट ठेवला.  मला तो माणूस बराच चमत्कारिक वाटला.


संजय, आनंद आणि मी वेग छानच पकडला होता. शेवटचे ६२ किमी अंतर ३-३.५ तासात पार झाले ज्यात चहाचा आणि गुळाचा हॉल्टही होता. एलुरु येईपर्यंत वाटेत धाबा, हॉटेल काहीच दिसले नव्हते. अखेर मी जे म्हटले तसेच झाले. जेवण थेट एलुरुलाच मिळाले.😄 बहुधा माझ्या वाक्यावर परमेश्वराने तथास्तु म्हटले असावे. एलुरु गावाच्या वेशीवरच मस्तपैकी नारळपाणी घेतले. 




आम्ही आज मात्र दिवसाउजेडी गंतव्यस्थानी पोचलो होतो. भूक तर लागली होतीच. जवळच एक धाबा दिसत होता. तिथे छानपैकी जेवण करून मगच आजच्या वास्तव्याच्या सोय बघायची असे ठरवले. त्यामुळे आम्ही आधी उदरभरण करून घेतले. दरम्यान आनंदच्या आंध्र पोलिसांमधील मित्रांतर्फे आमची राहायची सोय ज्या हॉटेलमध्ये झाली आहे त्याची माहिती मिळाली. हॉटेल शहराच्या बऱ्यापैकी आतमध्ये होते. वाटेत रेल्वेखालून चिंचोळ्या भुयारी मार्गाने रेल्वे लाईन पलीकडे जावे लागले होते. रस्ते अरुंद होते आणि बहुतेक त्यामुळे ट्रॅफिकही लागले होते. आम्ही हॉटेलला पोचलो. हॉटेलसमोर चौकोनी आकाराचे मोठे मोकळे मैदान होते. आमच्या सायकली त्या मैदानात ठेवायला सांगितल्यावर आम्हाला चिंता वाटू लागली. मात्र हॉटेल व्यवस्थापन आणि सिक्युरिटीने आम्हाला सायकल सुरक्षित राहतील ह्याची पूर्ण खात्री दिली. एव्हाना माझी अवस्था आता माझ्यात ताकद नाही मी सायकलवरच झोपतो अशी झाली होती.

पण आनंदच्या मागच्या चाकाचे पुन्हा काहीतरी बिनसल्याचे लक्षात आले. हॉटेलमध्ये वेळेवर आल्यामुळे आमच्याकडे आज बऱ्यापैकी वेळही हाताशी राहिला होता. जवळपास सायकलचे दुकान कोठे आहे ह्याचे चौकशी आम्ही गुगलबाबांकडे केली. आम्हाला जवळपास ५ किमी जावे लागणार होते. अंघोळ केल्यावर मात्र आम्ही फ्रेश झालो होतो. त्यामुळे एलुरुच्या गल्लीबोळातून वाट काढत आम्ही पुन्हा त्याच चिंचोळ्या भुयारी मार्गाने  सायकलच्या दुकानात पोचलो. आमची सायकलमोहीम ऐकून दुकानदार आणि त्याचे सहाय्यक चांगलेच खुष झाले. त्यांचे दुकानही छान सजवले होते. सायकलच्या उपयोगाच्या बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध होत्या. दुकानही बऱ्यापैकी मोठे आणि लांबलचक होते. आनंदच्या सायकलचे काम सुरू असताना आम्हाला आठवले की आम्हीही आमच्या सायकलींना कोलकाता सोडल्यापासून तेलपाणी केलेच नव्हते. त्या बिचाऱ्या आमची ओझी वाहत होत्या मात्र आम्ही त्यांच्या सांध्यांचा विचारच केला नव्हता. मग त्या दुकानातच आमच्याही सायकलींचे तेलपाणी करून घेतले 

दरम्यान मला खोकल्याचा त्रास जाणवत होता. आनंदच्या सायकलचे काम बराच वेळ चालणार असल्याचा अंदाज आल्यावर मी आणि संजय चहाचे दुकान शोधू लागलो. पण जवळपास चहाचे दुकानच सापडेना. घशाला थोडा शेक मिळाला असता म्हणूनही चहा हवा होता. मग मी आसपास किराणा दुकान, आयुर्वेदिक दुकान पाहू लागलो. मला जेष्ठमध मिळाला असता तर घशाला थोडा आराम मिळेल असे वाटत होते. तेथील एका दुकानात आम्हाला जवळपास एक वैदुचे दुकान असल्याचे समजले. आम्ही तिथे गेलो. मला तेलगु येत नव्हते आणि त्या वैदुला मराठी, हिंदी, इंग्रजीचा गंध नव्हता. सुदैवाने विक्रम आमच्याबरोबर होता. इथे जवळपास वर्षभर राहत असताना तो चांगले तेलगू बोलू लागला होता. अखेर त्याने दुभाष्याचे काम पत्करले. ते वैदू बऱ्यापैकी वयस्कर आणि अनुभवी होते. त्यांनी माझी नाडीपरीक्षा केली. माझी व्यवस्थित माहिती घेऊन एक औषध दिले. आयुर्वेदिक सल्ला आणि औषध ह्याचे अगदीच कमी मूल्य त्यांनी आकारले त्याशिवाय तेलगूमधील एक कॅलेंडर मला देऊ केले. मी त्यांना म्हटले की मला तेलगु येत नाही. त्यामुळे मला हे कॅलेंडर नको. मात्र तरीही त्यांनी आग्रहाने ते कॅलेंडर मला बरोबर घ्यायला लावले.

आम्ही हॉटेलमध्ये परतलो. मात्र आमचा चहा राहिला होता. मी आणि संजय चहा पिण्यासाठी बाहेर पडलो. आम्हाला उद्या सकाळी लवकर चहा कुठे मिळेल ह्याचा शोध घ्यायचा होता. बाहेर पडल्यावर मी जवळपास जेष्ठमध, जिरे मिळत आहे का ह्याचा अंदाज घेऊ लागलो. तेथील कोणालाही मी काय म्हणत आहे हेच समजेना. एका दुकानात जिरे मिळले पण त्यांनाही जेष्ठमध समजेना. दुकानदारीण स्वभावाने खूप चांगली होती. मी तिला जेष्ठमध चे गुगल translation दाखवले. पण बहुधा गुगलने काहीतरी घोळ केला होता. मग तिला फोटो दाखवला. तेव्हा तिने सांगितले की हे तिच्याकडे मिळत नाही. दुसऱ्या एका ठिकाणी मिळते पण ते संध्याकाळी ५ च्याच आतच. नंतर मागितले तर ते ओरडतात. तिला जेव्हा समजले की मला ते खोकल्यावर औषध म्हणून हवे आहे. तेव्हा तिने मला हिरड्या सारखे काहीतरी दाखवले. कदाचित तो हिरडाच असू शकेल. तिने सांगितले हा उत्तम उपाय आहे. त्याच्या सालाचा तुकडा तोंडात ठेवायचा. लाळ येईल ती गिळायची पण ते साल किंवा बी गिळायचे नाही. तिने माझ्या expedition बद्दल चौकशी करून त्याचे कौतुक केले, शुभेच्छाही दिल्या. बहुधा तिच्या लक्षात आले असावे की मला तो हिरडा तोडता येणार नाही. मग तो तोडून त्याच्या सालाचे तुकडेही करून दिले. घरातील एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे तिचे वागणे होते. तिने मला त्यातील एक तुकडा मला तोंडात ठेवायला सांगितला. मी थोडे पुढेमागे करत आहे हे लक्षात येताच मोठ्या बहिणीप्रमाणे थोडे दटावतच मला तो तुकडा तोंडात ठेवायला लावला.

आम्हाला चहाचे दुकानही सापडले. तिथे पहाटे ४ वाजता चहा मिळू शकेल असे समजताच आम्ही समाधानाने हॉटेलच्या रूममध्ये परत आलो. जेवणही छान मिळाले. एलुरु शहरात आमचा पाहुणचार फारच छान झाला होता.

1 टिप्पणी:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...