शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

गणेश घोळ मंदिर, शिळ फाटा

पर्शियन राजा जमशेद याने सुरु केलेल्या पारशी कॅलेंडर वर्षाचा आज पहिला दिवस- जमशेद- ए- नवरोज अर्थात - पतेती. त्यानिमित्त मिळालेल्या सुट्टीचा उपभोग घेत फिरण्यासाठी श्विनचे विचारचक्र दोन दिवस सुरु होते. संजय दात्ये आणि अभय कुलकर्णी यांनाही विचारून झाले. मात्र दोघांनाही वेळ नसल्याने श्विनने 'एकला चालो रे' ची तयारी ठेवली होती.

पहाटे नेहमीपेक्षा लवकरच म्हणजे ब्राह्म मुहूर्तावरच जाग अली. मात्र रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे अस्मादिक बाहेर पडायला तयार होत नव्हते. वातावरण ढगाळ होते. श्विनला बाहेर जायचा उत्साह असला तरी अस्मादिकांनी जास्तीत जास्त वेळ घालवला. अखेरीस श्विनच्या इच्छेपुढे हार मानत आमची दौड सुरु झाली. अर्थात एक पेडल मारल्याबरोबर श्विनबरोबर अस्मादिकांनाही स्फुरण चढले.

सम्राट चौक, लोहमार्गावरून जाणारा पूल पार करत पूर्वेला पोचलो तरी कुठे जायचे ते ठरत नव्हते. टंडन रस्त्याहुन राजेंद्रप्रसाद रस्त्याला न वळता श्विन सरळ भोपरच्या दिशेने निघाली. तरी श्विनच्या मनात काय आहे हे कळत नव्हते. मी मात्र शांत होतो. भोपरहून श्विन मानपाडा रस्त्याला लागली. मानपाडा रस्ता संपताच डावीकडे वळत शिळ कल्याण महामार्गामार्फत ९० फुटी रस्ता आणि परत घरी असा प्रस्ताव मी श्विनपुढे ठेवला. मात्र श्विनच्या मनात काही वेगळाच विचार होता. मानपाडा रस्ता संपताच श्विनने डावीकडे वळण घेण्याऐवजी उजवीकडे वळण घेतले.

आता पुन्हा दोन पर्याय होते. बदलापूर पाइपलाइन रस्ता की थेट शिळ फाटा. खड्डे पडलेल्या बदलापूर पाइपलाइन रस्त्यापेक्षा श्विनने शिळ फाट्याकडे जाणारा वाहनांच्या गर्दीचा रस्ता निवडला. शिळ फाट्याला U आकाराचे वळण घेत घरी परतायचे मी ठरवले. शिळ फाटा येथे वाहनांच्या रांगा मध्ये अडकल्यावर अचानक पुढील खिंडीतील गणेश घोळ मंदिरकडे जायचा विचार मनात आला. खिंडीतील चढावर श्विनला दामटवत आम्ही गणेश घोळ मंदिराशी पोचलो. खरतर तेथून लगेच परतायचा विचार होता. पण आजूबाजूच्या निसर्गाने मला मोहिनी घातली. मी श्विनबरोबर मंदिराकडे वळलो.

मंदिराचा फलक आमचे स्वागत करत होता. काही पायऱ्या वर जात होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी बहरली होती. मंदिराच्या पायथ्यापासूनच परत जायचे ठरवले असले तरी आजूबाजूचा निसर्ग परत फिरू देत नव्हता. मग मी श्विनला उचलून घेत काही पायऱ्या चढून परत फिरायचे ठरवले. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर दृश्य दिसत होते. छोटी फुलपाखरे, फुले पाहताना आणखी काही पायऱ्या चढण्याचा मोह आवरत नव्हता. पक्ष्यांचे मंजुळ गान मला मंदिराकडे खेचून नेत होते. एका हातात श्विन आणि फोटो काढण्यासाठी एका हातात मोबाइल असा सज्ज होत मी पायऱ्या चढत होतो. नागमोडी वळणाने वर जाणाऱ्या पायऱ्या माझे कुतूहल वाढवत होत्या. त्या पायऱ्या चढत वर जाताना प्रसन्न वाटत होते. वाटेतील निसर्ग टिपत क्षणाक्षणाला थांबत मी मंदिराच्या दिशेने जात होतो. मंदिराजवळील शेवटच्या टप्प्यात एका वटवृक्षाच्या पारंब्या पसरलेल्या दिसल्या.

मंदिराजवळ जाताच समोर एक आश्रम दिसला. बाहेरच नळापाशी एक साधू लंगोटीवरच हातपाय धुवत होता. तेथेच समोर एक आश्रम होता. तेथेही एक साधू बसला होता. मी श्विनला तिथेच उभे केले आणि शिरस्त्राण, बूट काढले. आश्रमातील साधूने मला हातपाय धुवायला सांगितले तेव्हा मला शेजारी आणखी एक नळ दिसला. तेथील गार पाण्याने हातपाय आणि तोंड धुवून मी ताजातवाना झालो. मंदिर छोटेसे होते. एक साधू मंदिरात पूजा करत होता. मंदिराभोवतीचा परिसर अतिशय स्वच्छ केलेला होता. त्या प्रसन्न वातावरणातून माघारी फिरण्याची इच्छा होणे अशक्यच होते. गाभाऱ्यातील मूर्ती प्रसन्न होतीच शिवाय गाभाराही लख्ख केला होता.

कल्याण-शिळ रस्त्यावरील जवळ असूनही प्रदूषणापासून सुटका झाल्याचे समाधान मिळत होते. येथे आल्यावर थकलेले अंग पुन्हा ताजेतवाने झाले होते. किमान सव्वाशे दीडशे पायऱ्या असतील, पण त्या चढताना अजिबात दमायला होत नाही. घनदाट झाडी आणि डेरेदार वृक्ष बाजूला असल्याने गारवा वाटतो. एकेक पायरी चढताना आजूबाजूची अनेक फुलझाडे, वेगळय़ा प्रकारचे वृक्ष न्याहाळत आपण पुढे पुढे जात राहतो.. साधारण १५ ते २० मिनिटांनंतर आपण डोंगरावरील मंदिरापर्यंत पोहोचतो. हे मंदिर अगदी साधेसुधे असून अगदी लहान आकाराचे आहे. मंदिरात गणेशाच्या दोन मूर्ती आहेत. एक भाग दगडाच्या खोबणीत बसविला आहे.. या मोठय़ा दगडातही कोरून काही शेंदूर फासलेल्या मूर्त्यां बसविण्यात आल्या आहेत.

मंदिराचा परिसरही अतिशय सुंदर आणि ताजातवाना करणारा आहे. पण या मंदिराच्या बाजूला काही साधूंनी त्यांचे आश्रम उभारले असल्याने परिसर अतिशय रमणीय आणि मन प्रसन्न करणारा आहे.

मंदिरात दर्शन घेऊन आणि थोडावेळ थांबून मी परत निघालो तरी लंगोटीधारी साधू अजूनही नळापाशी हातपाय धुण्यातच दंग होता.

मी पुन्हा पायऱ्या उतरायला सुरुवात केली. वाटेत काही वेगवेगळय़ा प्रकारची फुले पाहायला मिळतात, तर काही वेगळय़ाच वनस्पती आढळतात. त्यामुळे येथे छायाचित्रे काढण्याचा मोह आवरता येत नाही. पायऱ्या उतरताना आपण पुन्हा या वनस्पती न्याहाळू लागतो. त्यामुळे पुन्हा अर्थातच एका हातात श्विन आणि एका हातात मोबाइल सज्ज करत मी पायऱ्या उतरू लागलो. निसर्ग इतका मोहवीत होता की प्रत्येक पायरीवर थांबत आजूबाजूचे दृश्य टिपावेसे वाटत होते. पक्ष्याच्या आवाजानेही पाय थबकत होते. मंदिराच्या पायऱ्या उतरून मी श्विनला सज्ज केले, तरीही तेथून पाय निघत नव्हता. मी श्विनकडे वळलो की एखादे सुंदर फुल, फुलपाखरू किंवा सुंदर पक्षी दिसत होता. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा थबकत होतो.

निसर्गाच्या ह्या लिलांमध्ये वेळ कसा जात होता हे समजत नव्हते. खरेतर निसर्गाने माझ्या मनावर पूर्ण ताबा मिळवला होता. सर्व भान विसरून मीही त्या दुनियेत हरवलो होतो. अखेरीस मी श्विनकडे मोहरा वळवला आणि पुन्हा निसर्गसंपन्न परिसरापासून कृत्रिम जगतात परत फिरलो.

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

श्विनची उल्हास नदी (अर्ध)परिक्रमा

भारताच्या पश्चिम बाजूकडील पश्चिमी घाटातील पर्वतरांगा हा भारतालाच नव्हे तर जगाला मिळालेला अलौकिक ठेवा. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा मध्ये असलेली जैवविविधता जगातील इतर पर्वतरांगाना क्वचितच लाभली असेल. संगमरवरी हिमालयसुद्धा ह्या बाबतीत सह्याद्रीपेक्षा कमनशिबीच!
पावसाळ्याच्या चार महिन्यात जलाभिषेक करणाऱ्या सह्यपर्वतरांगांवरील स्नानोदक एका बाजूने थेट बंगालच्या उपसागरात मिळते तर दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात मिळते.

शेकडो नद्या उपनद्याचा जन्म होणाऱ्या ह्या सह्याद्रीपासूनच लोणावळ्याजवळ उगम पावणारी उल्हास नदी जेमतेम १२५ किमी लांबीची. उल्हास नदीच्या दोन्ही तीरावर वाढत गेलेल्या शहरातील एक म्हणजे डोंबिवली!

उल्हास नदी केवळ डोंबिवलीच काय पण भारताची आर्थिक राजधानी असलेल्या संपूर्ण महामुंबईला जीवन देत आहे. स्वातंत्रदिनानिमित्त उल्हास नदीची छोटी परिक्रमा करत तिला मानवंदना देण्यापेक्षा वेगळी काय उत्तम कल्पना असू शकते!

श्विनने म्हणूनच आज डोंबिवली- कल्याण-राजनोली-खारेगाव टोल-मुंब्रा- शिळ- मानपाडा- डोंबिवली असा छोटासा प्रदक्षिणा मार्ग निवडला. श्विनने मार्गक्रमण करायला सुरुवात करताच पर्जन्यराजही प्रसन्न झाला होता. डोंबिवली पश्चिमेकडून नवीन पुलामार्गे श्विन ९० फुटी रस्त्याला पोचली. पुढे पत्रिपुलाची एक बाजू मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे श्विनला मोकळा रस्ता मिळाला. दुर्गाडी पुलावर जाताच आज सुट्टी असल्याचा प्रत्यय आला. श्विनने अगदी आरामात कोनगाव गाठले.

कल्याणहुन भिवंडीकडे जाणाऱ्या महामार्गावरील कोनगाव येथील रस्त्याचा डावीकडील अर्धा भाग कधीकाळी अस्तित्वात तरी होता का याची शंका येत होती. साधारण २० फूट डावीकडील रस्त्याचा डावीकडील १० फूट रुंद असलेल्या भागाचे अस्तित्व पूर्ण नाहीसे झाले होते. महामार्ग असूनही बराच भाग चक्क पेव्हरब्लॉक टाकून तयार केला होता. त्या पेव्हरब्लॉकचे भाग तुटल्याने रस्त्याचा मधला भाग आणि डावा भाग यामध्येही आपोआपच आणखी एक दुभाजकही तयार झाला होता. श्विनने रस्त्याच्या मधल्या भागातून वाट काढत सर्व अश्वशक्तीधारी दुचाकी, चारचाकी, बहुचाकी गाड्यांना मागे टाकले.

नाशिक ठाणे महामार्गाला लागल्यावर मात्र श्विनची सुटका झाली. त्या गुळगुळीत महामार्गावर श्विनचा वेग चांगलाच वाढला. दिवा वसई लोहमार्गावरील पूल पार करून ओवळी गावाच्या फाट्याला मागे टाकत श्विनने पहिला थांबा घेतला. क्षणभर विश्रांती घेत श्विनने गती घेतली. खारेगाव टोल आल्यावर आज मात्र ठाण्याकडे न जाता श्विन मुंब्रा शहराकडे वळली.

सुरुवातीला थोडा खराब रस्ता गेल्यावर मात्र श्विनला आनंदाचा धक्काच बसला. उत्तम काँक्रिटिकरण केलेला रस्ता श्विनचे स्वागत करत होता. त्या रस्त्याच्या डावीकडे खाडी तर उजवीकडे डोंगररांगा होत्या. खाडीचे विशाल पात्र मोहात पाडत होतेच पण उजवीकडील डोंगररांगा नजर खिळवून टाकत होते. त्या डोंगररांगांनी ल्यालेला हिरवा शालू खुलून दिसत होता. त्याबरोबरच शुभ्र ढगांचा मुकुटही डोंगररांगांना शोभून दिसत होता. सुदैवाने पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे मनसोक्त छायाचित्रण करणेही शक्य झाले होते. मुंब्रा डोंगररांगांचे वैभव टिपत श्विन क्षणाक्षणाला थांबत होती.

मुंब्रादेवीचे मंदिरही ढगांच्या दुलईत लपेटलेले होते. त्यामुळे मुंब्रादेवीचे दर्शन घेता येईल असे वाटत नव्हते. थोडे पुढे जात श्विनने मुंब्रा शहराकडे कूच करत उजवीकडे पाहिले आणि... मंदिराभोवतीची ढंगांची दुलई दूर करून मुंब्रादेवी श्विनला दर्शन देत होती. काश्मीरमध्ये एक म्हण आहे,'मुंबईका फॅशन और कश्मीरका मौसम, कब बदलेगा कोई बता नही सकता.'
हाच अनुभव मुंब्रा येथे येत होता. 'कश्मीरका मौसम' मुंब्रा येथेच अनुभवायला मिळत होता. मुंब्रादेवी मंदिराचे दर्शन झाल्यावर श्विनचा उत्साह आणखीच वाढला.

श्विन मुंब्रा शहरात पोचली. सकाळची वेळ असल्याने मुंब्रा शहरातील बाजार गजबजलेला नव्हता. स्वातंत्रदिनानिमित एकदोन ठिकाणी सुरु असलेले कार्यक्रमही रस्ता अडवणारे नव्हते. श्विनने तेज गतीने कौसा गाठले. तेथील छोटासा भाग वगळता मुंब्रा ते शिळ रस्ता उत्तम स्थितीत होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकांना (की नगरभक्षकांना?) रस्ते कसे असावेत याचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंब्रा येथे नेण्यास हरकत नसावी.

श्विनने चांगलाच वेग घेतला. मोकळा आणि खड्डेविरहित रस्ता मिळाल्याने कल्याण फाटा येथे वळून मानपाडा कधी गाठले हे समजलेही नाही. खरेतर, कोकणरत्न हा श्विनचा हक्काचा थांबा! पण आज मोकळ्या रस्त्यामुळे ते भानही श्विनला राहिले नव्हते. मात्र डोंबिवली शहरात शिरल्याबरोबर श्विनला स्वतःच्या शहरात शिरल्याचे 'धक्के' पावलोपावली जाणवू लागले. घरी पोहोचेपर्यंत नेहमीप्रमाणे श्विन आणि श्विनस्वार झालेले अस्मादिक दोघेही चिखलाने यथेच्छ माखले होतो. घरी पोहोचताच सरकारी कृपेने पाइपद्वारे मिळालेल्या उल्हास नदिच्या पाण्यानेच शुचिर्भूत होऊन श्विन आणि अस्मादिकांनी उल्हास नदीच्या (अर्ध)परिक्रमेची सांगता केली

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

मलंगगडाची श्रीमंती

'उद्या कुठे दौरा'.... श्विनच्या बद्दल #tjsbbank मधील सहकारी विचारत होता. श्विनसफारीबद्दलची उत्सुकता माझ्या इतकीच माझ्या सहकाऱ्यांना आहे.

ऑगस्ट हा मूळ रोमन कॅलेण्डरचा सहावा महिना! हा सहावा महिना असल्याने ह्याचे लॅटिन नाव होते सेक्सटिलिस. (रोमन वर्षाचा पहिला महिना होता मार्च आणि वर्ष होते दहा महिन्यांचे). मात्र नुमा पोंपिलिअस ह्या राजाने रोमन वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने वाढवले आणि सेक्सटिलिस महिन्यात २९ दिवस अस्तित्वात आले. मात्र नंतर राजा जुलिअस सीझर ने ज्युलियन कॅलेंडर अस्तित्वात आणताना ह्या महिन्यात आणखी २ दिवस वाढवत हा महिना ३१ दिवसांचा केला. पुढे ऑगस्टस ह्या लढवय्याने इजिप्तवरील विजयासह ह्या महिन्याच्या काळात मिळवलेल्या अनेक विजयाच्या स्मरणार्थ ह्या महिन्याचे नाव ऑगस्ट झाले. कॅनरी आयलँडमध्ये ह्या महिन्याला बेनेसमर किंवा बेनेसमेन असेही म्हणतात. प्राचीन रोममध्ये ह्या महिन्यात अनेक धार्मिक सण येत असल्याने हा महिना बहुतेक कामगारांसाठी सुट्टीचा महिना असे.

भारतात मात्र ह्यापैकी कोणताही राजा वा त्याच्या राज्याचा कोणताही संबंध आला नसल्याने रोमन, ज्युलियन किंवा ग्रेगोरियन कॅलेण्डरचा भारताशी काडीमात्र संबंध नाही.

ह्या धेडगुजरी कॅलेंडरमधील ऑगस्ट ह्या ठिगळं लावत वाढलेल्या महिन्यातला आज दुसरा शनिवार असल्याने आज मला सुट्टी होती. अर्थातच आज श्विन आज निसर्गसफारीसाठी बाहेर पडणार हे माहित असल्यानेच माझ्या सहकाऱ्याने 'उद्या कुठे दौरा असे विचारले होते.

शनिवार- रविवार जोडसुट्टी असल्याने तळेगावला जाण्याचा विचार मनात घोळू लागला असला तरी इतर कामांमुळे ते जमणार नव्हते. मग मी #dombivlicycleclub चे सदस्य @sanjaydatye याना विचारले. त्यांच्या सायकलिंगलाही खीळ बसली असल्याने त्यांनाही पुन्हा सायकलिंग सुरु करायची संधी साधायची होती. त्यामुळे त्यांनी लगेचच होकार दिला.

मात्र शुक्रवारी रात्री निद्रादेवी प्रसन्न व्हायला तयार नव्हती, त्यामुळे आज (शनिवारी) सकाळी सूर्योदय होऊन गेला तरी डोळ्यावरील जडत्व जात नव्हते. श्विनसफारीचा विचार करत मी उठलो एवढ्यात दात्येंचा फोन आला. मग मात्र तयार होऊन श्विनला खुणावले. बाहेर फिरायला मिळण्याचा श्विनचा आनंद लगेचच जाणवत होता. दोन मजले श्विनला उचलून खाली आणल्यावर आता माझे वजन आणि तोल सांभाळण्याचे काम श्विनचे होते.

मी श्विनला टाच देणार तोच 'ऑगस्ट' ह्या पाश्चिमात्य सौर महिन्यात न शोभणारा जोरदार पाऊस सुरु झाला. कदाचित श्विनचे स्वागत करायलाच तो आला असावा. पावसाचा जोर सहन करत श्विनने संथगतीने सुरुवात केली. काही क्षणातच पावसाच्या मुसळधार धारांनी श्विनला चिम्ब भिजवले. डोंबिवली शहरातच हा रागरंग पाहता आम्ही जाणार असलेल्या मलंगगडाजवळच्या वातावरणाची कल्पना येत होती. अक्षरशः दहा- पंधरा मिनिटातच पापणींचा पहारा चुकवून पाणी दोन्ही डोळ्यात शिरले. मग मात्र श्विनला पटकन रस्त्याच्या कडेला घेत मी दोन्ही डोळ्यातील पाणी झटकून टाकले.

अजूनही पावसाचा जोर कायम असला तरी श्विन नेटाने पुढे जाऊ लागली. मानपाडा रस्ता मागे टाकून सामंत पेट्रोल पम्पापाशी दात्ये माझी वाट पाहत उभे होते. आता मात्र पावसाचा जोर ओसरला होता. त्याचा फायदा घेत श्विनने वेग वाढवला. मात्र आज बदलापूर पाइपलाइन रस्त्याला लागल्यावर सरळ नेवाळी फाट्याकडे न जाता आम्ही कोलेगावापाशी उजवे वळण घेतले. थोड्याच वेळात निसर्ग त्याचे अंतरंग उलगडू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडे नजर जाईल तोपर्यंत हिरवळ दिसत होती. तो हिरवा रंग डोळ्यांना सुखावत होता.  निसर्गाने श्रावणातील मूड पकडला होता. 'श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे' याचा प्रत्यय येत होता.

निसर्गाचे ते रूप पकडून ठेवण्यासाठी वारंवार फोटो काढण्याचा मोह होत होता. श्विनला पुढे जात राहायचे असले तरी फोटोचा मोह श्विनच्या उत्साहावर मात करत होता. 'क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे' हा निसर्गाचा चमत्कार अनुभवास येत होता.

रस्ता अरुंद असला तरी रहदारी नसल्याने आम्ही आरामात आणि निसर्गसौंदर्य लुटत पुढे जात होतो. घेसर मार्गे पुढे जात आम्ही नऱ्हेन गाव गाठले. इतक्यात म्हशींचा एक घोळका समोरून रस्ता ओलांडून उजवीकडे वळत असल्याचे दिसले. त्यांना पाहून समोरून येणारा ट्रकहि जागेवर थांबला होता. अर्थात चोहीकडे हिरवळ पसरलेल्या ह्या ठिकाणी त्या म्हशी आमच्या मार्गात आल्या होत्या की त्यांच्या वाटेवर आम्ही आणि तो ट्रक आले होतो हा ही प्रश्नच आहे. त्या म्हशींच्या पाठोपाठ श्विननेही मार्ग काढला.

नऱ्हेन गावाकडून आम्ही तळोजा बायपास ओलांडून करवले गावाकडे जाऊ लागलो. इथे मात्र रस्ता त्याचे अस्तित्वच विसरला असल्याचे जाणवू लागले. सर्वत्र केवळ चिखल दिसत होता. मात्र हा निसर्गनिर्मित चमत्कार नसून मानव निर्मित चमत्कार होता. थोडे पुढे जाऊन पुन्हा रस्त्याचे अस्तित्व जाणवू लागल्यावर थोड्याच वेळात एक चारचाकी वाहन श्विनला समांतर चालू लागले आणि आवाज आला, 'थोड्या बाजूने चला जरा'. अरुंद रस्त्यावर हा उपदेश करणाऱ्या आवाजाच्या दिशेने मी वळून पहिले तर त्या गाडीत बसलेला @ajitmodak माझ्याकडे पाहत हसत होता.

कलंबोलीहून अंबरनाथ येथील औद्योगिक परिसरातील त्याच्या कार्यालयात जाताना अजित नेहमी तळोजा बायपासहुन बदलापूर पाइपलाइन रस्ता गाठत असे. त्यामुळे तो करवले गावाच्या रस्त्यावर येण्याची मला अपेक्षा नव्हती. खरेतर दात्ये आज येणार नसते तर मी आज अजितच्या घरी श्विनला घेऊन जायचे ठरवले होते. मात्र दात्ये येण्याचे नक्की झाल्याने अजितच्या घरी जायचे रद्द झाले होते. अर्थातच अजित भेटणार नाही असे वाटत होते. मात्र आज त्याला भेटण्याची झालेली माझी प्रबळ इच्छा त्याला आज करवले गावाकडे घेऊन आली असावी. आणि तो भेटला तोही अश्या ठिकाणी की तेथून त्याची वाट डावीकडे तर श्विनची वाट उजवीकडे सुरु होणार होती. म्हणजेच त्या क्षणी आमची भेट झाली नसती तर नंतर आजच्या दिवसात आमची भेट होऊ शकली नसती.

ती भेट जपून ठेवण्यासाठी तो क्षण कॅमेराबद्ध करत आम्ही सर्वजण आपापल्या दिशेने वळलो.

मलंगगड जवळ येत होता... ओह, म्हणजे श्विन मलंगगडाजवळ पोचत होती. पावसाचा काहीही ठावठिकाणा नव्हता. इतक्यात डावीकडे हिरवळ पांघरलेल्या डोंगररांगांनी आम्हाला जागीच खिळवून ठेवले. समोरही मलंगगडाची डोंगररांग होतीच. त्या समोरील डोंगररांगांवर ढगाआड लपलेला सूर्य पुढे येण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ढगांच्या त्या भक्कम तटबंदीपुढे सूर्याचे प्रयत्न अपुरे पडत होते. मात्र त्यांच्या ह्या जुगलबंदीमुळे समोरच्या डोंगररांगांमध्ये कृष्णधवल चित्र उभे राहिले होते.

समोरील डोंगररांगांवर कृष्णधवल रंग तर डाव्या बाजूला हिरव्या रंगातील डोंगररांगा या दोन्हीमध्ये आम्ही हरवून गेलो होतो. पाऊस नसल्यामुळे श्विन बेहोष होऊन तो नजारा अनुभवत असताना अचानक श्रावणाने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली. वातावरणातील बदल टिपत श्विनने लगेच मलंगगडाच्या दिशेने पुन्हा धाव घेतली. डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसात भिजलेले कपडे एव्हाना सुकले असल्याने हाताच्या अंतरावर मलंगगड असताना पुन्हा ओले होण्याची इच्छा नव्हती. श्विनने घेतलेली गती पाहता श्रावणानेही त्याचा हट्ट सोडला आणि श्रावणसरीना थोडक्यात आवरते घेतले.

मलंगबाबाच्यावाडी जवळ पोचताच जठराग्नी तप्त झाल्याची जाणीव झाली. वातावरणाची मागणी पूर्ण करत कांदाभजीची फर्माइश आपोआपच केली गेली. एका प्लेटमध्ये समाधान न झाल्याने once more अर्थात रिपीट ची फर्माइश झाली. मलंगगडाची श्रीमंती आमच्या दोन डोळ्यात साठवणे शक्य नव्हते. मात्र त्या श्रीमंतीच्या सागरातील आम्हाला शक्य होते तेवढे सौंदर्य टिपत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परत येताना मात्र आम्ही नेवाळी गावाकडील मार्ग पकडला. सुरुवातीचा चढ संपल्यावर श्विन भरधाव निघाली. पाहता पाहता नेवाळी नाका गाठत आम्ही बदलापूर पाइपलाइन रस्ता गाठला. आता रस्ता चांगला असला तरी निसर्गाची संगत मात्र दूर गेली होती. अर्थातच श्विनचा वेग वाढला होता.

डोंबिवली मध्ये शिरल्यावर पृथ्वीवरील अमृत म्हणजे चहा घेत आम्ही स्वगृही परतलो. तेव्हा श्विन आणि माझे वजन प्रत्येकी किलोकिलोने वाढले होते ते अर्थातच रस्त्यात जमवत गेलेल्या चिखलामुळे!

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...