रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

उद्घाटन





सायकल.... हे केवळ वाहन नाही तर जगभरातील सायकलपटुंना जोडणारे साधन आहे.


ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंबरनाथ सायकलिस्ट फाउंडेशन आणि बदलापूर सायकलिंग क्लब ह्या दोन्ही संघांनी एकत्रितरित्या आयोजित केलेला आजचा कार्यक्रम! सागर मेननने चार दिवसापूर्वीच फुजिला तसेच पेडल रिपब्लिकच्या सगळ्या सदस्यांना ह्या कार्यक्रमाला हजर राहण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे काल २१२ किमी ची दौड केल्यानंतरही झोपताना फुजी स्वतःला आज लवकर उठण्याबद्दल बजावत होती. 


मात्र तरीही थोडा उशीर झालाच.' मै देर करता नही, देर हो जाती है ' हे आळवत फुजी घरातून निघाली तेव्हा पेडल रिपब्लिकचे इतर सदस्य PR नाका सोडत होते. त्यामुळे फुजिने जवळच्या मार्गाने जात त्यांना गाठण्याचे ठरवले. वाटेत काही जणांना गाठत फूजिने नेवाळी फाटा गाठला. PR चे अधिकृत छायाचित्रकार आवटीकाकांनी समूह छायाचित्र घेतल्यावर तिघेजण माघारी परतले. तर उरलेल्या दहा जणांनी पुढे कूच केले. 


कोंढेश्वर रस्त्याला लागल्यावर हिरव्या रंगाने नटलेला निसर्ग दिसू लागला होता. रस्ता अरुंद असला तरी वाहतूक अगदीच तुरळक होती. एका रांगेत जात असलेल्या म्हशिंनी PR सदस्यांना शिस्तीचे धडे दिले. गुगलबाबांच्या मार्गदर्शनानुसार डॉ राहुल जात होते. त्यांच्या पाठोपाठ इतर सायकलस्वारही लगबगीने जात होते. सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाची उत्सुकता होती. काही वेळाने मुख्य रस्ता सोडून डॉ राहुल कच्च्या रस्त्याला वळले. दोन्ही बाजूने वृक्षराजी स्वागत करत होती. हिरवाई मनाला भुरळ पाडत होती. सायकलस्वार पुढे जाताच त्यांना एक मोकळे मैदान दिसले. तिथे काही सायकलस्वार गोलाकार उभे राहून खेळ खेळत होते. श्री लोकरे ह्यांच्या फॉर्म हाऊसचा तो परिसर होता. परिसर अतिशय नेटका होता. 


PR सदस्य तिथे जाताच सागरने PR सदस्यांचे स्वागत केले. थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रम सुरू झाला. गोलाकारात उभ्या असलेल्या सायकलपटुंनी एका बाजूला थोडे अंतर मोकळे ठेवले. त्या दिशेने सगळेजण दूरवर पाहू लागले. एवढ्यात त्या दिशेने अंबरनाथ सायकलिस्ट फाउंडेशन आणि बदलापूर सायकलिंग क्लबची जर्सी घातलेले एकेक सायकलपटू आले. काही क्षण गेले सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती.... आणि तिसरा सायकलपटू- श्री साबळे येताना दिसले. पण... ही कोणती जर्सी त्यांनी घातली होती? ही होती अंबरनाथ सायकलिस्ट फाउंडेशन आणि बदलापूर सायकलिंग क्लब ह्या दोन्ही संघांनी एकत्रितरित्या प्रदर्शित केलेली सामाईक जर्सी. 



ह्या जर्सीचे उद्घाटन हाच आजचा मुख्य कार्यक्रम होता. राष्ट्रध्वज हा देशाचे प्रतिनिधित्व करत असतो, त्याचप्रमाणे जर्सी समूहाचे...संघाचे प्रतिनिधीत्व करत असतो. दोन्ही संघांची सामाईक जर्सी! किती ही विलक्षण  कल्पना. अंबरनाथ सायकलिस्ट फाउंडेशन आणि बदलापूर सायकलिंग क्लब दोघांनी एक नवा आदर्शच निर्माण केला होता. डॉ. अहिरे, सागर, अभिषेक आणि दोन्ही संघाचे इतर सदस्य ह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरीत्या केले होते



थोड्या वेळातच इंधन भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. श्री लोकरे स्वतः जातीने लक्ष देत होते. इडली, डाळवडा आणि मेदुवडा ह्यांचे इंधन उत्तम होतेच. त्यावर चटणी आणि सांबारचे आवरणही इंधनाची गुणवत्ता वाढवत होते. सगळेच सायकलपटू तृप्त झाले होते. कार्यक्रमाची आखणी अतिशय नेटकी झाली होती. 


PR चे सदस्य परतीच्या मार्गाला लागले. काल द्विशतकी दौड झाल्यावर आज कार्यक्रम आटपून घरी जाईपर्यंत ६० किमी अंतर पार होणार होतेच. फुजी त्यावर समाधानी होती. काटई नाका जवळ येत असताना फूजिने विचार केला, जर सुनील गावस्करने पहिल्या डावात द्विशतक मारले असते आणि दुसऱ्या डावात तो साठ धावांवर खेळत असता तर तो समाधानी असता का? त्याने नक्कीच दुसऱ्या डावातही शतक मारले असते! फुजिला पुढे काय करायचे ह्याचे उत्तर आपोआपच मिळाले. काटई नाका येताच फूजिने डावे वळण घेतले. पुढे वेग घेत फूजिने थेट कोपरखैरणे गाठले. तिथून परत फिरायला फुजिचि हरकत नव्हती. कारण आता घरी जाईपर्यंत शतक पूर्ण होणार असल्याची फुजिला खात्री वाटत होती. 


परतीच्या प्रवासात Track And Trail मध्ये जात फूजिने रवी राहणेची भेट घेतली. दोन दिवसापूर्वीच रवी रहाणेकडे जाऊन सुमितने फुजीसाठी नवे टायर आणले होते. त्याचे उद्घाटन काल द्विशतकी दौड करत फुजीने केले होते. त्या टायरच्या जोरावर अवघ्या ११ तासाच्या दौडितच फुजिने २१२ किमी अंतर पूर्ण केले होते. रवीला सदिच्छा भेट देऊन फुजीने प्रवास सुरू केला खरा. पण आता अडथळ्यांची शर्यत सुरू झाली होती. पालवाजवळच्या चढावर काम सुरू असल्याने कोंडी झाली होती. तिथून मार्ग काढत फुजी पुढे सरकली. पुढे लांबवर धुराचे लोळ आकाशात जाताना दिसत होते. वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. इंच इंच लढवत फुजी मानपाडेश्वर मंदिराजवळ पोचली तर तिथे एनएमएमटीची बस जळत असलेली दिसली. खरतर आता केवळ सांगाडाच उरला होता. तोही आता जळत होता. त्याचेच धुराचे लोळ लांबवरून दिसत होते. रस्त्याची उजवी बाजू वाहतुकीला बंद करून डाव्या बाजूनेच वाहतूक सुरू होती. 


तेथून मार्ग काढत फुजी ९० फुटी रस्त्याला पोचली तोपर्यंत फुजिने ९० किमी अंतर पार केले होते. मग तिथेच आणखी ४-५ किमी ची फेरी मारून फुजीने शिरस्त्याप्रमाणे पटेल टी सेंटर मध्ये चहास्वाद घेतला. चहाची अप्रतिम चव जिभेवर रेंगाळताच फुजी पुन्हा ताजीतवानी झाली. त्यानंतर वेळ न दवडता फुजिने घर गाठले.


काल नवीन टायरचे उद्घाटन द्विशतकी दौडीने झाले होते. त्यानंतर काल संध्याकाळीच भेट मिळालेल्या Garmin चे उद्घाटन फुजिने आज शतकी दौडीने केले होते.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...