रविवार, १५ जून, २०२५

मटका स्वीट: कोलकाता चेन्नई सायकलसफर



अग्रिमाच्या आग्रहामुळे आम्ही भुवनेश्वर येथे राहायचे ठरवले. सुशांतला हे कळवण्यासाठी फोन केला. मात्र आदल्या रात्रीच आम्ही त्याला भुवनेश्वर येथे राहणार नाही हे सांगितल्यामुळे त्याने घरची चावी तिथे ठेवली नव्हती. अर्थातच तरी त्याने आमची सोय करण्याची खात्री दिली. त्याचे एक नवीन ऑफिस तिथे सुरू होणार होते. तिथे त्याने आमची सोय केल्याचे त्याने आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो.

आम्ही सायकलने भुवनेश्वरला सुशांतच्या ऑफिसला जाऊन आमचे सामान तिथे ठेवू आणि अग्रीमा आम्हाला तिथे भेटेल असे ठरले. कटक ते भुवनेश्वर हे अंतर जेमतेम २०-२५ किमीचेच. नाष्टाही छान झाला होताच. त्यामुळे हे अंतर सलग पार करायला साधारण दिड तास पुरेसा होता. आद्या आणि अग्रिमाचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा एकदा सायकलींवर स्वार झालो. परत एकदा रेल्वे पूल पार करून कटक भुवनेश्वर रस्त्याला लागलो. जेमतेम २ किमी वर काठजोडी नदी दिसू लागली. महानदी आणि काठजोडी नद्यांच्या मध्ये वसलेले कटक शहर मागे पडत असल्याचे लक्षात आले. 

दोन नद्यांच्या मध्ये वसलेले कटक शहर

वास्तविक काठजोडी नदी ही महानदीचीच एक उपनदी आहे असे म्हणता येईल. नाराज बंधाऱ्यावर काठजोडी नदी उगम पावते आणि लगेचच विभाजित होते. तिच्या दक्षिण शाखेला कुआखाई असे म्हणतात. त्याचा अर्थ आहे कावळ्याचा तलाव. ही शाखा पुढे पुरी जिल्ह्यात वाहत जाते. काठजोडी नदीवरील पुल देखील बराच लांब होता. नदीचे पात्र चांगलेच रुंद होते. मात्र ह्या पात्रामध्ये पाणी दिसत नव्हते. नदीचे ते रुक्ष पात्र पाहवत नव्हते. त्या पुलावरून मी पुढे सरकलो. आता लवकरात लवकर सुशांतच्या ऑफिसमध्ये जाऊन सामान ठेवायचे तोपर्यंत अग्रीमाही आलेली असेल. तिच्याबरोबर लगेचच निघायचे असा विचार करून आम्ही भुवनेश्वरची दिशा पकडली. साधारण १०-१२ किमी पुढे गेलो असेन. डाव्या हाताला ओळीने काही मिठाईची दुकाने दिसत होती. मागे वळून पाहिले तर आनंद आणि संजय दिसत नव्हते. जेमतेम १२ किमी मध्ये ते का मागे राहिले कळत नव्हते. मी थोडा वेळ त्यांची वाट पाहिली. ते दोघेही आल्यावर आम्ही त्या दुकानांकडे मोहरा वळवला. त्यातला त्यात मटका स्वीट हे दुकानाचे नाव जरा विशेष वाटले. म्हणून तिथे गेलो. येथील दुकानदाराकडे मिठाईबद्दल चौकशी केली. ती मिठाई छेना पासून बनवतात असे तो सांगत होता. मला खरतर छेना म्हणजे नक्की काय ह्याचा काहीच उलगडा होत नव्हता. दुधामध्ये लिंबू पिळून पनीर बनवले जाते त्याला छेना म्हणतात असे गुगलबाबा सांगत होते.



दुकानात ओळीने वेगवेगळे पदार्थ दिसत होते. आजूबाजूला मधमाश्या फिरत होत्या. आम्ही आधी सर्व पदार्थ पाहून घेतले. रसगुल्ला ओळखीचा होताच. त्यांना रसगुल्ला खायला मागताच एका disposable bowl मध्ये त्यांनी रसगुल्ला दिला. मधमाश्यांकडे लक्ष देता देता आम्ही रसगुल्ला मटकावला मी गुलाबजामचा शौकीन. पाक भरपूर मुरलेला गुलाबजाम खाण्यात जी मजा आहे ती रसगुल्ला खाताना येत नाही. मात्र येथील रसगुल्लाही छान वाटला. पण त्याचबरोबर केकसारखा गोल आकारात एक पदार्थ ठेवलेला होता.



रसगुल्ला खाऊन माझे समाधान झाले नव्हते. तो गोल पदार्थही खावासा वाटत होता. मात्र त्याचा आकार पाहता तो संपवता येणार नाही ह्याचा अंदाज आला. अग्रीमा भेटली की तिला तो पदार्थ भेट देऊ असा विचार करून तो गोल पदार्थ पॅक करून घेतला. 


तिथून मात्र थेट भुवनेश्वर गाठले. सुशांतच्या सांगण्यावरून त्याच्या ऑफिसमधील एक कर्मचारी आम्हाला घ्यायला आला. अर्थात तो आला तेच बरे झाले. कारण ते ऑफिस सहज सापडण्यासारखे नव्हते. एका कालव्याशेजारी एक रस्ता जात होता. त्यानंतरही थोडासा चक्रव्यूह भेदल्यावर बांधकामाचे सामान रस्त्यात दिसत होते. त्यापुढे एक दुमजली बांधकाम दिसत होते. ते होते सुशांतचे काही काळानंतर सुरू होणारे ऑफिस. दुसऱ्या मजल्यावर एक २ BHK सदनिका होती. तिथे आमची राहण्याची व्यवस्था केली होती. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी आमच्यासाठी मस्त जेवणाची व्यवस्था केली.  खरतर जेवण झाल्यावर ताणून द्यायचाच विचार होता. आज अजून सायकलवायचे नसल्याने आम्ही आता सुस्तावलो होतो .

रविवार, ८ जून, २०२५

दहिवडा: कोलकाता चेन्नई सायकलसफर


 गोल टोपी, जॅकेट घातलेली अग्रीमा आम्हाला सामोरी आली. आम्हा तिघांच्या सायकली, जर्सी पाहून तिने मला हाक मारली. तिची रुममेट आद्या देखील आम्हाला भेटायला आली होती. अग्रीमा आणि आद्या ... वाह काय जोडी आहे! दोघीही कायम सगळ्यांच्या पुढेच असणार. 

त्या दोघींना ह्याची कल्पना होतीच की आम्ही पन्नास किमी सायकल चालवून तिथे पोचलो होतो आणि आम्हाला भूकही लागली असणार. अग्रीमा कटकमध्ये चांगलीच रुळली होती. तिने आम्हाला लगेचच हॉटेलमध्ये नेले. हॉटेलसुद्धा तिने आमच्यासाठी खास निवडले होते... बॉम्बे हॉटेल...! जणू आम्हाला घरच्या वातावरणाचा अनुभव यावा ह्यासाठीच तिने हे हॉटेल निवडले होते. आम्ही तिघांनीही दक्षिणात्य पदार्थांवर ताव मारला


हॉटेल मधून बाहेर पडलो अन् अग्रीमाने सांगितले कटक इथला दहिवडा खूप प्रसिद्ध आहे. तो तुम्ही खाल्लाच पाहिजे. मलातर दहिवडा अजिबात आवडत नाही. मुळात वडा म्हणजे तो बटाटेवडाच हवा. वडा म्हणून नुसते पीठ खाण्यात काय मजा! बर त्यातही ते पीठ गोड दह्याबरोबर खाण्यात कसली चव मिळते कोण जाणे? पण अग्रीमा दहिवड्याचे फारच कौतुक करत होती. ती म्हणाली तू इथे आलास तर दहिवडा खाल्लाच पाहिजेस. मला अग्रीमाचे थोडे आश्चर्यच वाटत होते. अग्रीमा स्वतः अरबट चरबट खात नाही. किंबहुना खाण्याबद्दल ती फार काटेकोर आहे. सकाळी ती भरपेट नाश्ता करते. तेही मुख्यतः फळांवरच जोर. दुपारी थोडेसे पोटाला आधार म्हणून काहीतरी खाते. दुपारी चार नंतर ती दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काहीही खात नाही. चहा, कॉफी तर ती घेतच नाही. हे सगळे ती माझ्या घरी आली तेव्हापासून मला माहित होतेच. मी तिला स्पष्टच विचारले तुला दहिवडा कसा काय चालतो! पण तिने सांगितले इथला दहिवडा खूप स्पेशल आहे. 

अग्रीमाने स्वतः डबल डॉक्टरेट केलेली आहे. आधी तिने बायोटेक मध्ये मास्टर्स केले नंतर neuroscience मध्ये PhD केली. त्यावेळी आलेला स्ट्रेस घालवण्यासाठी ती योगसाधनेकडे वळली. नुसती वळली नाही तर त्यातही PhD केली. इतके करून ती सध्या काय करतेय तर सायकलवरून जगप्रवासाला निघाली आहे.

अशी ही अग्रीमा दहिवड्याचे फारच कौतुक करत होती आणि मला दहिवडा खाण्याचा आग्रह करत होती. मी आनंद आणि संजयला विचारले. त्यांनी नाही म्हटले असते तर मीही सुटलो असतो. पण दोघेही दहिवडा खायला तयार. अखेर दहिवडा खाण्याचे धाडस करण्याचे मी ठरवले. आपल्याकडे दहिवडा हा हॉटेलमध्ये शांतपणे बसून खाण्याचा पदार्थ. आपल्याकडे बटाटेवडा जसा रस्त्यावर मिळतो तसा इथे दहिवडा रस्त्यावरच मिळत होता. एका सायकलच्या carrier वर पातेल्यामध्ये दहिवड्याचे साहित्य होते. आम्ही दहिवड्याची ऑर्डर दिली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.





अग्रीमा मला इथे तीनचार दिवस तरी रहा असा आग्रह करत होती. किंबहुना मी इथे राहीन हे गृहीत धरून तिने भुवनेश्वरला सुशांतच्या घरी आमची रहायची व्यवस्थाही करून ठेवली होती. सुशांतही आदल्या रात्री मला वारंवार हाच आग्रह करत होता. मात्र मी त्याला नकार दिला होता. अग्रीमाचे म्हणणे होते की ती आमच्याबरोबर इथे तीनचार दिवस भटकेल आणि मग आम्ही पुढे जावे. आम्हाला मात्र वेळेचे बंधन होते. खरतर एक दिवस आधीच कमीत कमी भुवनेश्वर ला पोचायचा आमचा प्लान होता. तिचा आग्रह मात्र सुरूच होता. मी गुगलबाबांना विचारले. आम्हाला उद्या रात्री बाळूगावला पोचायचे होते जे भुवनेश्वर चेन्नई महामार्गाजवळ होते. पुरी आणि कोणार्क साठी मात्र भुवनेश्वर पासून महामार्ग सोडून डावीकडे १०० किमी जायचे होते. बाळूगावचे अंतर भुवनेश्वर आणि पुरीपासून मात्र साधारण सारखेच दिसत होते. अखेर चर्चेअंती आम्ही मध्यम पर्याय निवडला. आम्ही भुवनेश्वरला सुशांतकडे सायकली ठेवून गाडी करून कोणार्क आणि पुरी येथील मंदिराचे दर्शन घेऊन रात्री मुक्कामाला भुवनेश्वरला सुशांतच्या घरी यायचे ठरवले. अग्रीमा आमच्याबरोबर कोणार्क आणि पुरीला येणार होती. मी आद्यालाही म्हटले तुहि आमच्याबरोबर चल. मात्र भटक्या अग्रीमाने आदल्याच दिवशी तिला फिर फिर फिरवले होते त्यामुळे तिला आज विश्रांती हवी होती.

दरम्यान आमच्यासमोर दहिवडा आला. वाह! दहिवड्यावर चक्क रगडा आणि शेव होती. दहिवड्याला कोणतीही गोड चव नव्हती. मी एकदम खुश झालो.. दहिवड्यावर आणि त्याचा आग्रह करणाऱ्या अग्रीमावरही. हा जगातील सगळ्यात बेस्टेस्ट दहिवडा होता. कटक येथील दहिवडा प्रसिद्ध असायलाच हवा होता.


हा दहिवडा बनवण्याची पद्धतही विशेष होती. हा वडा आधी रात्रभर दह्यात भिजवत ठेवतात. ते दही त्या वड्यामध्ये पूर्ण मुरले जाते. त्यामुळे त्याला खास चव येत असावी. ह्याशिवाय तो रगडा, शेव ह्यामुळे येणारी खुमारी ती वेगळीच. आग्रिमाने विशेष माहिती पुरवली मुंबईमध्ये पाणीपुरी खाल्ल्यावर डिशमध्ये पाणी प्यायला देतात तसेच इथे तो दहिवडा खाऊन झाला की ते दही प्यायला देतात. आता मी तेही प्यायला तयार होतो. त्या दह्यासाठी मी माझी डिश दिली. ते दही नव्हे तर दह्याचे पाणी होते... तेही गोड नव्हते... बहुधा रगडा मिश्रित होते. दहिवडा आणि ते पाणी पिऊन फारच मजा आली. 





कोलकाता चेन्नई सायकल सफरीचे आधीच्या ब्लॉगच्या लिंक्स:

1) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post.html

2) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_19.html

3) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/hdor-100.html

4) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_21.html

5) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_22.html

6) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_23.html

7) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_24.html

8) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_25.html

9) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_26.html

10) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_92.html

11) https://schwinnsafari.blogspot.com/2025/02/blog-post_28.html

12) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post.html

13) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_2.html

14) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_14.html

15) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_16.html

16) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_17.html

17) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_18.html

18) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_76.html

19) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_20.html

20) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_21.html

21) https://schwinnsafari.blogspot.com/2025/03/blog-post_22.html

22) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post.html

23) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post_13.html

24) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post_14.html

25) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post_20.html

26) https://schwinnsafari.blogspot.com/2025/04/blog-post_27.html

27) https://schwinnsafari.blogspot.com/2025/05/blog-post.html

28) https://schwinnsafari.blogspot.com/2025/05/blog-post_4.html

29) https://schwinnsafari.blogspot.com/2025/06/blog-post.html 

शनिवार, ७ जून, २०२५

अग्रिमाची भेट: कोलकाता चेन्नई सायकल सफर

 


पूर्व भारताविषयी मला प्रथमपासूनच एक कुतूहल आणि थोडी शंका होती. कुतूहल विशेषतः ओडिशा राज्याविषयी होते. सायकलने भारत भ्रमण करून आलेला गंधार आणि सध्या ओडिशा येथे असलेली अग्रिमा ह्यांनी माझ्या सगळ्या शंका आधीच दूर केल्या होत्या. मात्र ह्या राज्यासंबंधीचे कुतूहल कायम होते. ओडिशा मध्ये प्रवेश करून आम्हाला दोन दिवस झाले होते. दोनही दिवसात येथील लोकांचे प्रेमळ स्वागत आम्ही अनुभवत होतो.

ओडिशाचे पूर्वीचे नाव ओरिसा. खरतर ह्याला उत्कल असेही म्हटले जाते. आपल्या राष्ट्रगीतात ह्या राज्याचा उल्लेख उत्कल असाच आहे. श्रीरामाची माता कौसल्या ही ज्या कौशल प्रदेशाची राजकन्या होती तो हाच प्रदेश. अज्ञातवासात पांडवांना ज्या विराट राजाने आश्रय दिला त्याचा मत्स्य देश तो हाच! आलेल्या अतिथीचे आदरातिथ्य कसे करावे हे येथील लोकांपेक्षा इतर कोण अधिक जाणणार? येथील लोकांच्या प्रेमळ आणि अतिथ्यशील स्वभावाची परंपरा रामायण महाभारत काळापासूनच चालत आलेली असावी. 

ओरिसाची संस्कृती फारच प्राचीन आहे. येथील ओडिसी नृत्य सातशे वर्षांपासून चालत आलेले आहे. जवळपास ४०% लोकसंख्या ही अनुसूचित जाती जमातींची असलेले हे राज्य इतर राज्यांपेक्षा प्रगतीशील होऊ शकले नाही. आता मात्र ह्या राज्याने कात टाकून प्रगतीचा वेग पकडला असल्याचे जाणवते.

ओडिशा येथील संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी मी आमच्या मोहिमेतील चौथा दिवस कमी अंतराचा ठेवला होता. पहिल्या तीन दिवसातील कसर भरून काढण्यासाठी आता हा दिवस उपयोगी पडणार होता. वाटेत कटक येथे अग्रिमाही भेटणार होती. ही भटकी मुलगी सायकलवरून जगप्रवासासाठी निघून जवळपास वर्ष झाले तरी ओडिशाच्या प्रेमामुळे सहा सात महिने ह्याच राज्यात अडकली होती. तिने केरळ ते काश्मीर हा एकटीने सायकल प्रवास केला तेव्हा एक दिवस ती माझ्या घरी राहिली हा एवढाच आमचा परिचय. त्यावेळी तिचा धाडसी प्रवास पाहून मी तिला १०० वर्षांपूर्वी तीन पारशी लोकांनी सायकलने जगप्रवास केला त्यासंबंधातील जे पुस्तक भेट दिले ते वाचून तीही जगप्रवासास निघाली होती. आणि आता ओडिशामध्ये तिच्याच ओळखीने आमची मुक्कामाची सोय सुशांत करत होता.

अग्रीमा सध्या कटकमध्ये मुलींच्या हॉस्टेल मध्ये राहत होती. ती सकाळी आम्हाला भेटणार होती. नाश्त्याच्या वेळी तिला भेटून पुढे तडक पुरी, कोणार्क येथे जाण्याचा माझा विचार होता. आम्ही चांदीखोल मधील हॉटेल मिड ईस्ट येथून निघताना तरी हाच विचार होता. 

हॉटेल मिड ईस्ट सोडून कूच करेपर्यंत सात वाजून गेले होते. मात्र आम्ही लगेचच वेग पकडला रस्ता चांगला होता. अग्रीमाबरोबर गप्पा मारण्यास मी उत्सुक होतो. आम्ही अडीच वर्षांनी प्रत्यक्ष भेटणार होतो. चांदीखोल ते कटक हे अंतर साधारण ५० किमी चे.

कटक ह्या शब्दाचा अर्थ आहे सेना छावणी किंवा राजधानीचे ठिकाण. ह्या शहराचा इतिहासदेखील हा अर्थ स्पष्ट करतो. इथे प्रथम वस्ती झाली ती सैन्याच्या छावणीसाठी... आणि पुढे हेच शहर राजधानीचे ठिकाण बनले. महानदी आणि कथाजोडी ह्या दोन नद्यांच्यामध्ये ५ गावांचे एकत्रीकरण करत कटक शहर निर्माण झाले. साधारण ११ व्या शतकात राजधानीचा दर्जा मिळाला तरी हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले ते नागपूरकर भोसल्यांच्या काळात. अर्थातच मराठा साम्राज्याची ही कामगिरी आपल्याला नक्कीच अभिमानास्पद आहे.

अग्रिमाशी भेट ह्या बरोबरच नागपूरकर मराठा साम्राज्याच्या व्यापाराचे महत्वाचे ठिकाण असलेल्या कटक शहराला भेट देण्यासाठी म्हणूनच मी अधिक उत्सुक होतो. कटक, भुबनेश्वर, पुरी, कोणार्क ही शहरे पाहण्यासाठी मला मिळणार होता फक्त एक दिवस! 

मी फुजीला दामटवत होतो. कटकला पोचण्याआधीच महानदीचे विशाल पात्र नजरेस पडले. प्राचीन काळात महानदीला चित्रोत्पला किंवा निलोत्पला असेही म्हटले जात असे. छत्तीसगड राज्यात उगम पावून पुढे ईशान्य दिशेकडे वाहणारी महानदी कटकजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. महानदीवर जगतपूर आणि कटक ह्या दोन शहरांना जोडणारा एक लांबलचक पूल होता. ह्याला जोबरा पूल असेही म्हणतात. ह्या पुलाची लांबी २ किमी आहे.  कटक जवळ महानदीवर अनेक पूल आहेत. ओडिशाच नव्हे तर भारतामध्ये असलेल्या सर्वात लांब नदी पुलाच्या प्रकल्पाचा हा एक भाग आहे. 


पुल ओलांडून आम्ही कटक शहरात प्रवेश केला थोड्याच अंतरावर उजव्या हाताला कटक रेल्वेस्थानकाची सुंदर वास्तू नजरेस पडली. मुंबईकरांसाठी रेल्वे किती महत्वाची आहे हे इतर कोणाला समजणे कठीण. रेल्वेची देखणी इमारत पाहून मन प्रसन्न झाले. मात्र रेल्वेस्थानकात शिरण्यासाठी आज वेळही नव्हता, मनसुबाही नव्हता आणि योगही नव्हता. 


आज उत्सुकता होती ती अग्रिमाला भेटण्याची. मूळ केरळची रहिवासी असलेली अग्रिमा महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आम्हा तिघा सायकलस्वारांचे ओडिशामधील आतिथ्य करणार होती. किती कुतूहलाची बाब होती की आम्ही निघालो होतो जेमतेम कोलकाता ते चेन्नई प्रवासासाठी आणि ती निघाली होती जगप्रवासासाठी.

पुढे कटक रेल्वेमार्गावरील पुल ओलांडून आम्ही U टर्न घेतला. थोड्याच वेळात आमची भेट घेण्यासाठी पुढे असलेली अग्रीमा आम्हाला दिसली. माझ्याप्रमाणेच तीही आमच्या भेटीसाठी उत्सुक होती. 

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...