रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आंतरराष्ट्रीय सीमा आहे, जी गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहे. 

शहर पार करताच समोर फरक्का बॅरेज दिसत होते. उत्तर बंगालला जोडण्यासाठी गंगा नदीवरील हे एक महत्वाचे बॅरेज आहे. हे बॅरेज बांगलादेशपासून जेमतेम १८ किमी अंतरावर आहे. बांगलादेशची अंदाजे ७०% लोकसंख्या आणि भारताची अंदाजे ५०% लोकसंख्या गंगा खोऱ्यात राहते. भारताच्या एकूण सिंचित क्षेत्रापैकी ४३% क्षेत्रही गंगा खोऱ्यात आहे, आणि तिच्या काठावर अंदाजे १०० शहरी वस्त्या असून एकूण लोकसंख्या अंदाजे १२० दशलक्ष आहे. फरक्का बॅरेजच्या बांधकामानंतर, गंगा-पद्मा नदीतील पाण्याचा जास्तीत जास्त प्रवाह लक्षणीयरीत्या कमी झाला. प्रवाहातील या घटीमुळे भारत आणि बांगलादेशात अनेक समस्या निर्माण झाल्या; यामध्ये माशांच्या विविध प्रजातींचे नुकसान, पद्मा नदीच्या उपनद्या आटणे, बंगालच्या उपसागराकडून खारे पाणी आत येण्याचे प्रमाण वाढणे आणि सुंदरबनमधील खारफुटीच्या (मँग्रोव्ह) जंगलांचे नुकसान होणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. बांगलादेशमध्ये, असे मानले जाते की जलमार्गाचे नियमन केल्यामुळे क्षारतेची पातळी वाढली आहे, मत्स्यव्यवसाय दूषित झाला आहे, जलवाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे आणि पाण्याच्या गुणवत्तेला व सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वाढलेल्या क्षारतेमुळे जमिनीतील ओलाव्याची पातळी कमी होण्यासोबतच वाळवंटीकरणही झाले आहे. अर्थातच, या धरणाचा दोन शेजारी देशांमधील संबंधांवर अजूनही महत्त्वपूर्ण परिणाम होतो. 

बिहारमधील पुरासाठीदेखील फरक्का बॅरेजवर टीका केली जाते, कारण त्यामुळे गंगेच्या पात्रात गाळाचे प्रमाण अत्यधिक वाढले आहे. फरक्का बॅरेजमुळे गंगा नदीच्या प्रवाहातून होणारे माशांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात मंदावले. 'हिल्सा' (किंवा 'इलिश') सारखे समुद्रातील प्रौढ मासे प्रजननासाठी सहसा गोड्या पाण्याच्या नद्यांमध्ये येतात. फरक्का बॅरेज बांधल्यानंतर, या माशांना प्रजननासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणारी कोणतीही 'फिश लॅडर' (माशांसाठीची विशेष वाट) तयार करण्यात आली नाही. या बॅरेजच्या निर्मितीनंतर भारतातील हिल्सा माशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली, तर बांगलादेशातील पद्मा नदीच्या खालच्या पट्ट्यात मात्र त्यांची संख्या चांगली राहिली. २०१६ पासून, फरक्का बॅरेजवर काही 'फिश लॅडर्स' (माशांसाठीच्या विशेष वाटा) बांधण्यात आल्या आहेत.

भारत आणि बांगलादेशमध्ये तणाव निर्माण करणारे फरक्का बॅरेज उत्तर बंगालला मात्र जोडण्याचे महत्वाचे काम करत होते. 

गंगा नदी आमच्या डावीकडून वाहत येत होती आणि उजवीकडे वाहत जात होती... ती बांगला देशाच्या दिशेने. आम्हाला नदी ओलांडून पुढे जायचे होते. सायकल चालवत आम्ही नदीवरील पुलाजवळ आलो. बॅरेजवरील पुलावर चारपदरी रस्ता होता. पुलावर रस्त्याच्या कडेला साधारण १० फूट रुंदीचा पदपथही होता. पुलावर प्रवेश करत असताना रस्ता मात्र खराब होता. वाहतूकही बऱ्यापैकी होती. मी पुलाजवळ जाताच एका जवानाने मला अडवले. मी थोडा गोंधळलो. कदाचित येथे सायकलने पूल करायला मनाई तर नाही, हा रस्ता केवळ मोठ्या गाड्यांसाठी राखीव तर नाही? मला त्या जवानाने पदपथावरून सायकल चालवायला सांगितले. त्याप्रमाणे मी पदपथावरून सायकलने जाऊ लागलो. पुल बराच जुना असल्याचे जाणवत होते. १९६२ साली ह्या पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. तब्बल १ अब्ज डॉलर्स करून बॅरेजचे काम १९७० साली पूर्ण झाले होते. मात्र बॅरेज सुरू व्हायला १९७५ साल उजाडावे लागले होते. जीर्ण झालेल्या फरक्का बॅरेजवरून प्रवास करणे ही रोजच्या संयमाची परीक्षा ठरली आहे.  हा जुना बॅरेज वाहनांचा प्रचंड ओघ हाताळण्यास असमर्थ ठरत होता. त्यामुळेच बहुधा सायकलच्या वेगामुळे इतर वाहनांचा खोळंबा होऊ नये, म्हणून त्या जवानाने सायकल पदपथावरून चालवायला सांगितली होती. पदपथ मात्र पूर्ण रिकामा होता.

नदीच्या विशाल पात्राची कल्पना पुल सुरू होण्या अगोदर येत होती.  त्यामुळे नदीकडे पाहत सायकलवायला मिळेल ह्या कल्पनेने मी खुष झालो होतो. पुलाशेजारील पदपथावर सायकल चढवली मात्र आणि.. माझी पार निराशा झाली. पुलाच्या डाव्या बाजूला अंदाजे ६ फुटांपेक्षा उंच कठडा होता. रस्त्याच्या पुलाला खेटूनच डावीकडे रेल्वेमार्गही होता. त्यामुळे डावीकडे नदीचे पात्र पाहताही येत नव्हते. उजव्या बाजूला चारपदरी रस्त्याच्या पलीकडे बांगला देशाच्या दिशेने वाहणाऱ्या नदीच्या पात्राच्या ' दूरदर्शन ' वरच समाधान मानावे लागत होते. नदीचे पात्र रुंद तर होतेच शिवाय चांगलेच खोल असल्याचे लांबूनही जाणवत होते. तेथील पाण्याच्या प्रवाहाचा खळाळ आणि पात्राची रुंदी, खोली पाहता ही नदी नव्हे तर ' नद ' च होता. फरक्का बॅरेजला आव्हान देत बांगलादेशकडे जाणारा तो अजस्त्र नद आपल्याच नादात वाहत होता.

पुल चांगलाच लांब होता. वाटेत काही ठिकाणी टेहेळणी पथकही तैनात होते. पदपथावरून जात असल्याने वेगही कमी झाला होता. पदपथावर चालत जाणारे तर कोणीच नव्हते. त्यामुळे सायकल संथ मात्र विना अडथळा जात होती. पुल पार करायला आम्हाला जवळपास २० मिनिटे लागली. ह्या बॅरेजची लांबी २२४५ मीटर आहे. मात्र एवढ्या विशाल पात्राचे नीट दर्शन न मिळाल्याने नदीपात्रावरील सायकलवण्याची मजा घेता येत नव्हती.

एव्हाना भूकही लागली होती. सुदैवाने पूल पार करताच डाव्या बाजूला एक खोपट दिसले. लांबून पाहता तिथे जेवण मिळेल असे वाटत नव्हते. मात्र किमान चहा घेऊन तरी पुढे जाता येईल अश्या अपेक्षेने आम्ही तिथे शिरलो. शेजारीच फरक्का सुपर थर्मल पॉवर स्टेशन दिसत होते. हे पॉवर स्टेशन २१०० मेगावॉट क्षमतेचे होते.

आम्ही त्या खोपटामध्ये शिरून पाहिले. आतील जागा चांगलीच मोठी होती. समोर बरीच मोकळी जागा होती. दरवाजाच्या उजव्या बाजूला काही टेबल आणि खुर्च्या मांडल्या होत्या. तर डाव्या बाजूला अगदी आतल्या बाजूूला किचन दिसत होते. ते बंदिस्त नव्हते. एकाच हॉल मध्ये बिनभिंतीचा तो कारभार होता. मालक आणि मालकीण आमचा अंदाज घेत होते आणि आम्ही त्यांचा अंदाज घेत होतो. समोर बसलेले ग्राहक उत्सुकतेने आमची चौकशी करू लागले. आम्ही मुंबईहून आलो आहोत हे ऐकताच ते खुष झाले. व्यापारानिमित्त त्यांचा मुंबईशी नियमित संपर्क होता. त्यांनी लगेचच त्याच्या मुंबईतील मित्राला फोन लावला. त्यांचा मुंबईतील मित्रही आमची मोहीम ऐकून खुष झाला. मनोज त्या मुंबईतील मित्राशी फोनवर बोलत होता तर मी येथील नवीन मित्राशी गप्पा मारू लागलो. आमची मोहीम त्यांना रोमांचकारी वाटत होती. एव्हाना हॉटेलचे मालक, मालकीण आणि आम्हीही एकमेकांबद्दल आश्वस्त झालो. आम्ही येथेच जेवण करण्याचे ठरवले. एकतर भूक लागली होतीच. शिवाय कालच्या दुपारचा अनुभव ताजाच होता. जेवण मात्र छानच होते. हॉटेल मालक आणि मालकिणीला आम्ही धन्यवाद दिले. त्यांनी आणि येथे परिचित झालेल्या आमच्या नवीन मित्राने आम्हाला शुभेच्छा दिल्या. 

आम्हाला त्या शुभेच्छांची आज खरोखरीच गरज होती. कारण आम्ही आज ज्या गजोल ह्या गावी मुक्काम करायचे ठरवले होते त्या गावाचे नावही ऐकले नसल्याचे आम्हाला काहीजणांनी सांगितले होते. तिथे पोचल्यावर आम्हाला राहण्याची व्यवस्था शोधायची होती. अर्थातच त्यासाठी सूर्यास्ताच्या अगोदर पोचायला हवे होते. अद्यापही जवळपास ६५ -७० किमी अंतर बाकी होते. सूर्यास्ताच्या सुमारास आम्ही गजोल गाठले खरे. मात्र हमरस्त्याला हॉटेल दिसेना. आम्ही गावाकडे वळलो. चौकशी करता सुरुवातीला एक दोन हॉटेलने आम्हाला राहण्याची परवानगी नाकारली. अंधार होत असल्याने थोडी चिंता वाटू लागली. मात्र तिसऱ्या ठिकाणी आमची सोय झाली. थोडे फ्रेश होऊन आम्ही आजच्या राइडचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलो.




                                                             



शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

जयहिंद: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग २२

 


बंगालमध्ये आमचा पाहुणचार उत्तम होत होता. येथील खाद्यपदार्थांची विविधता आमच्या रसनेची तृप्ती करत होती. तसेच येथील माणसेही आमची मने जिंकत होती. अब्दुलबरोबर मराठी आणि बंगाली भाषांचे नातेही उलगडत होते. एखादा माणूस किती साधा, सरळ आणि निर्मळ असावा ह्याचे अब्दुल हा मूर्तिमंत उदाहरण होता. रात्री आमची झोपही अगदी शांत आणि व्यवस्थित झाली. पहाटे आम्ही येथून निघण्याची तयारी करू लागलो. अब्दुलप्रमाणेच इतरही काही युवक येथे नोकरीनिमित्ताने राहत होते. त्यांच्यापैकी दोघेजण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले.

अब्दूलने त्यांची आमच्याशी ओळख करून दिली. आमच्या मोहिमेविषयी आम्ही त्यांना माहिती दिली. दोघांनाही आमच्या मोहिमेविषयी उत्सुकता वाटत होती. त्याच्या एका मित्राचे नाव होते राज! तो तेथील क्रिकेट क्लब मधील होतकरू खेळाडू होता. तेथील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो प्रयत्न करत होता. IPL खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी त्याला शुभेच्छा देत आम्ही आमच्या सायकली तयार केल्या. आमच्या सायकलींवर सामान लादताना अब्दुल आणि त्याचे मित्र कुतुहलाने पाहत होते. 'लवकरच आम्ही तुला IPL खेळताना पाहू, त्यावेळी आमच्या तिकिटाची सोय कर ', असे राजला सांगत आम्ही तिघांचाही निरोप घेतला.


सकाळची वेळ अतिशय प्रसन्न होती. आम्ही शांतपणे सुरुवात केली. आम्ही राष्ट्रीय महामार्ग सोडून राज्य रस्त्याने जात होतो. तो अरुंद होता. आमच्या मार्गापासून बांगला देशाची सीमारेषा  जवळच होती. आमच्या मार्गाला साधारणपणे ती सीमारेषा समांतर जात होती. रस्त्यात सगळीकडे मुस्लिम वस्ती होती. बहुतांश ठिकाणी गायी, बकऱ्या पाळलेल्या होत्या. मशिदीतून बांग ऐकायला येत होती. रस्त्यात सगळेजण आपापल्या कामात गर्क होते. इतक्यात एक अडीच तीन वर्षांचा मुलगा आम्हाला पाहून रस्त्यावर धावत आला. तिथे येताच तो ओरडायला लागला. मला पटकन तो काय म्हणतोय ते कळले नाही. मी त्याच्याकडे पाहिले. रस्त्याच्या डावीकडे अंगण होते. त्यापलीकडे असलेल्या घरातून धावत येत तो काहीतरी ओरडत होता. त्याच्या आवाजामुळे सायकलचा वेग एकदम कमी करून मी त्याच्याकडे बघू लागलो.  तो छोटा मुलगा माझ्याकडे पाहत कडक सॅल्युट मारत ओरडत होता.... 'जयहिंद!' त्याला घरातून काय शिक्षण मिळत होते, त्याच्यावर काय संस्कार होत होते.. हे उघडच होते. भारतीयत्वाचे बाळकडूच त्याला पाजले गेले होते. भारताची बांगलादेशकडील सीमारेषा किती बळकट आहे ह्याचे प्रत्यंतर आम्हाला येत होते.

लवकरच आम्ही पुन्हा महामार्गाला लागलो. वातावरण अतिशय सुंदर होते. रस्ताही चांगला होता. आम्हाला पाहून अनेकजण आमची प्रशंसा करत होते, आम्हाला शुभेच्छा देत होते. 



वाटेत एकाने आम्हाला थांबवले. त्याला आमची मुलाखत घ्यायची होती. तो एक यूट्यूब चॅनेल चालवत होता. वास्तविक तो एक चांगल्या ठिकाणी कामही करत होता. त्याच्या यूट्यूब चॅनेलसाठी त्याने आम्हा तिघांचीही थोडक्यात मुलाखत घेतली. आमच्याशी बोलत आमच्या मोहिमेविषयी त्याने मन त्या चॅनेलवर माहिती दिली. आम्हाला शुभेच्छा देत त्याने आमचा निरोप घेतला. अश्या मोहिमेदरम्यान आपली कोणी आस्थेने चौकशी करत असेल तर आपल्याला नक्कीच समाधान वाटत असते. मात्र त्या दरम्यान वेळ, काम, वेग ह्यांचेही भान सुटू द्यायचे नसते.


कल्याण, शहाड कडून टिटवाळा येथे जात असताना वाटेत 'पाचवा मैल' असा एक स्थानदर्शक दगड आहे. बंगालमधील रघुनाथगंज सोडल्यावर बऱ्याच वेळाने आम्हाला 'आठ मैल' असा स्थानदर्शक दगड दिसला. शहाड पुढील 'पाचवा मैल ' पाहून मला नेहमी प्रश्न पडायचा हे 'पांचवा मैल' नेमके आहे तरी आहे.. कुठून मोजले? आज पर्यंत पहिले चार मैल कधी दिसले नव्हते. पुढे सहा, सातवा मैल सुद्धा कधी दिसले नाही. आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळील शहाडपाशी 'पाचवा मैल' तर भारताच्या पूर्व सीमारेषेजवळ हे 'आठवा मैल'. 'पाचवा मैल' आणि 'आठ मैल' ह्या दोन ठिकाणामध्ये महाराष्ट्र ते बंगाल एवढा विभाग सामावला आहे ह्याची आम्हाला जाणीव नव्हती. सहावा मैल आणि सातवा मैल कुठे आहेत ह्याचीही मला आता उत्सुकता वाटायला लागली.


बंगाल मला विशेष आवडायला लागला होता. कारण शाळकरी मुले आणि मुली सायकली चालवत शाळेत जात आहेत हे दृश्य येथे अगदी नियमितपणे दिसत होते. शाळांच्या प्रांगणात मोठ्या संख्येने सायकली उभ्या असलेल्या पाहून खूप समाधान वाटत होते. मुंबई, कोलकाता सारखी महानगरे ह्या वैभवाला मुकली असली तरी येथील गावागावात सायकलींचे प्रगतीचे वारे वाहत असल्याचे पदोपदी जाणवत होते.





रविवार, २ ऑगस्ट, २०२६

खादाडी: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २१

अब्दूलला आम्हाला रघुनाथगंज दाखवायचे होते. खरतर तो आग्रह करत होता की आम्ही आणखी एकदोन दिवस रहावे. त्याच्याबरोबर त्याच्या आई वडिलांना भेटायला जंगीपूरलाही यावे. पण आम्हाला ते शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरात लवकर आम्हाला निघायचे होते. संध्याकाळच्या थोडक्या वेळात त्याने जमेल तेवढे रघुनाथगंज आम्हाला दाखवायचे ठरवले.

आम्ही फिरायला बाहेर पडलो. अब्दुल आणि माझ्या गप्पा सुरू होत्याच. बंगाली, मराठी शब्दांच्या गमतीजमती आम्ही एकमेकांना सांगत होतो. ' आई ' .... माँ ला मराठीत आई म्हणतात ना! तो मला विचारत होता. मी म्हटले हो, पण तुला कसे माहित! अब्दूलने मला सांगितले होते की तो बंगालच्या बाहेर अद्याप गेला नव्हता. तो म्हणाला चित्रपटात मी पाहिले आहे. त्यानंतर बंगाली आणि मराठीतील काही जवळपास असणारे शब्द आम्ही एकमेकांना विचारत आणि सांगत होतो.

दरम्यान मी अब्दुल आम्हाला बाजारात घेऊन गेला. त्याने आम्हाला दरबेशपारा येथील नियोगी टिफीन स्टोअर मध्ये नेले. हे तेथील खवय्यांचे खास ठिकाण होते. तिथे गेल्यावर ठाण्यातील मामलेदार मिसळ अथवा पुण्यातील डेक्कन पाशी असलेल्या आप्पांच्या उपहारगृहाची आठवण होत होती. त्या उपहारगृहामध्ये फारतर चार पाच टेबल असावी. मात्र तिथे चांगलाच राबता होता. तेथील कचोरी खूपच छान असल्याचे आम्हाला सांगितले. खरोखरच कचोरी अप्रतिम होती. आम्ही खात असतानाच तिथे जिलबीचा घाणाही काढला जात होता. अब्दूलने आम्हाला येथील जिलेबी खाण्याचाही आग्रह केला. जीभ चाळवली होतीच. आम्ही लगेचच जिलेबीवर आडवा हात मारला. 




तिथून तो आम्हाला नदीकाठावर घेऊन गेला. तिथे आरती सुरू होती. आम्हाला त्याने नदीचे दर्शन घडवले. तिथे मिळणारे खाद्यपदार्थ त्याला आम्हाला खाऊ घालायचे होते. नदीजवळील सुभाष दीप च्या ' चा ठेक ' पाशी आम्ही आलो. चहा तर हवा होताच. ' चा ठेक' मध्ये फर्मास चहा मिळाला. आमची भ्रमंती सुरू होती त्याबरोबर खादंती सुद्धा सुरू होती.








अब्दूलने आमचा पाहुणचार त्या एका संध्याकाळीच व्यवस्थित आणि यथायोग्य करायचा चंग बांधला होता. तिथून आम्ही परत एकदा बाजारात बालीघाटा रस्ता येथे गेलो. रस्ता चिंचोळा होता. थोडाफार अंधारही होता. रस्त्यावर फार गर्दी नव्हती. इतक्यात एक दुकान दिसले...बादल चंद्रा घोष स्वीट शॉप! दुकान साधेसुधे होते. तेथील पदार्थात वैविध्य होते. अब्दूलने आम्हाला येथील मिठाई खाण्याचा आग्रह केला. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रसगुल्ले होते. ते पाहून माझ्या तोंडाला चांगलेच पाणी सुटले. आम्ही तीनचार प्रकारचे रसगुल्ले मटकावले. मनोज स्वतः रसगुल्ले खायचा नाही. मात्र मला आग्रह करायचा. मी त्या आग्रहाला आनंदाने बळी पडायचो. मनोजला मिष्टी दोही हवे होते. त्याने त्याचीही चांगलीच तारीफ केली. मग मला आणि संजयला मिष्टी दोही घेणे तर क्रमप्राप्तच होते. बंगाल मध्ये रसगुल्ले आणि मिष्टी दोही न खाणारा अरसिकच म्हटला पाहिजे. 




आता आम्ही परत अब्दुलच्या घराकडे वळलो. तो म्हणत होता आता आपण जेवण करू आणि मगच घरी जाऊ. दुपारी जेवण मिळत नव्हते आणि आता तर पोटावर अत्याचार सुरू होते. आम्ही त्याला म्हटले आत्ता एवढे खाणे झाले आहे आता इतक्यात तरी जेवण जाणार नाही. त्याबरोबर तो आम्हाला एक मैदानाकडे घेऊन गेला. तिथे एक बंदिस्त बॅडमिंटन कोर्टही होते. तिथेही आम्ही थोडा वेळ काढला. आमचे पोट मात्र तुडुंब भरलेले होते. 

अब्दूलने आमचा उत्तम पाहुणचार केला होताच, रघुनाथगंमधील तऱ्हेतऱ्हेचे खाद्य पदार्थ खायला घातले होते. मात्र त्याने फार खाल्ले नव्हते. आम्ही विचार केला की आमच्याबरोबर तो ही जेवेल. त्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर कुंडू हॉटेलमध्ये गेलो. ही एक खानावळ होती. अब्दूलने आमच्याकरता थाळीची ऑर्डर केली. तीनच थाळी आल्या. अब्दूलने फक्त आमच्यासाठी जेवण मागवले होते. ही त्याची नेहमीची मेस नव्हती. तो स्वतः त्याच्या नेहमीच्या मेसमध्ये जेवायला जाणार होता. आम्हाला ह्याची कल्पनाच नव्हती. थाळी मध्ये फक्त भात होता.... तोही डोंगराएवढा! आमचे पोट तर आधीच तुडुंब भरलेले होते. लाजेखातर थोडा फार भात खाणे क्रमप्राप्त होतेच. तो खाल्ला जावा म्हणून मी आणि मनोजने मासे मागवले. पण आमचे पोट भातही नाकारत होते आणि मासेही. पोटाला दामटवत आम्ही मासे संपवले. मात्र तो भात अर्धाही संपवता येत नव्हता. खरतर तिघांसाठी मिळून एकच थाळी मागवली असती तरी चालले असते. आम्ही पूर्ण शरणागती पत्करली.

तिथून आम्ही अब्दुलच्या वसतिगृहाकडे निघालो. मला जिरे घ्यायचे होते. पण त्याला हिंदी किंवा इंग्रजीत काय म्हणतात ते मला माहित नव्हते. बंगाली मध्ये त्याचे भाषांतर काय असेल ह्याची तर सुतराम कल्पना नव्हती. आम्ही घरातून निघाल्यापासून जिऱ्याला हिंदी इंग्रजीत काय म्हणतात ते आठवत होतो. अखेरीस मी अब्दूलला म्हटले मला जो पदार्थ घ्यायचा आहे तो किराणा दुकानात मिळतो, तो बडीशेप सारखा दिसतो. त्याला लक्षात येईना. मग मी गुगल करून त्याला फोटो दाखवला. त्यासरशी अब्दुल लगेच म्हणाला...' जीरा!'. मी डोक्याला एवढा ताण देऊन अब्दूलला जीरा हवय हे कसे सांगायचा ह्याचा विचार करत होतो. आणि... जिऱ्याला बंगालीतही जीरा म्हणत असतील ह्याचा विचारच केला नव्हता. घरातून निघाल्यापासून मी आणि अब्दूलने मराठी बंगालीत साम्य असलेले काही शब्द आठवून एकमेकांना सांगितले होते. त्याची मजा घेतली होती. मात्र जिऱ्याने माझी चांगलीच फिरकी घेतली होती.

आम्ही घरी आलो. बहुधा आम्हाला मोकळीक मिळावी म्हणून तो शेजारी त्याच्या मित्राकडे झोपायला गेला. काय नाते होते आमचे आणि अब्दुलचे! आम्ही ह्या आधी कधी भेटलो नव्हतो, परत कधी भेटू माहित नाही. मात्र आमचे नाते जोडले गेले ते कायमचे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अब्दुल आणि पश्चिम किनाऱ्यावरील आम्ही ह्यांचे बंध कायमसाठी बांधले गेले. Cuouchsurfing च्या माध्यमातून असे अनेक अनोळखी लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांप्रमाणे आपला पाहुणचार करतात किंवा आपणही तसे कोणाला आमंत्रित करू शकतो. ह्यातून मिळणारा आनंद पैशाने विकत घेता येत नाही.

सोमवार, २७ जुलै, २०२६

नाम अब्दुल है मेरा..कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २०

उमरपूर हे छोटेसे खेडेगाव होते. तिथे थोडीफार वर्दळ आणि बऱ्यापैकी वस्ती दिसत होती. तिथे पोचल्यावर मी अब्दूलला फोन केला. तो म्हणाला तिथून त्याचे घर जेमतेम दोन किमी आहे. मानसकुमारने तर उमरपूर पासून रघुनाथगंज १५-१७ किमी तरी लांब आहे असे सांगितले होते. मी अब्दूलला त्याचे लोकेशन पाठवायला सांगितले. त्याने लोकेशन पाठवताच आम्ही त्यानुसार जाऊ लागलो. खेडेगाव असले तरी तिथे बऱ्यापैकी वाहने, रहदारी दिसत होती. ५-१० मिनिटातच आम्ही अब्दूलने पाठवलेल्या लोकेशनवर पोचलो. समोरून अब्दुल आमच्याकडेच येत होता. त्याने आमचे स्वागत केले आणि आम्हाला त्याच्या हॉस्टेलकडे नेऊ लागला.

अब्दुल अझीझ मुळचा जंगीपुर ह्या गावचा. नोकरीनिमित्त तो रघुनाथगंज येथे राहत होता. तो पेशाने शिक्षक होता. जंगीपूर गाव तसे १५-२० किमी अंतरावरच होते. मात्र प्रवासाची मर्यादित सोय, कामाचा व्याप ह्यांचे गणित सोडवण्यासाठी तो एका हॉस्टेल मध्ये राहत होता. त्याने मला त्याची कल्पना आधी दिली होतीच. त्याच्याबरोबर जाताना आम्ही पायउतार होऊन सायकली 'चालवत' होतो. त्याने आम्हाला एका अतिशय अरुंद बोळात नेले. तो बोळही सरळ मार्गाने जाणारा नव्हता, तर नागमोडी आकारात जात होता. वाटेत बहुधा एक मस्जिदही होती. त्याच्या बाजूने आम्ही पुढे जात होतो. नेमकी किती वळणे घेतली हेही समजेना. अखेरीस अगदीच छोट्या पदपथापाशी आमची वरात थांबली. पुण्यातील जुन्या वाड्यांप्रमाणेच एक वाडा वाटत होता. आमच्या सायकली व्यवस्थित एका रूममध्ये ठेवून अब्दूलने आम्हाला वरील मजल्यावर नेले.

त्याची खोली एखाद्या ब्रह्मचाऱ्याप्रमाणेच पसरली होती. एका भिंतीवर बरेचसे सुविचार लिहिले होते. खोलीमध्ये कपडे वाळत टाकण्यासाठी दोरीही होती. दोन तीन जण झोपू शकतील असा एक पलंग होता. त्याच्या सामानाच्या काही पेट्या एका बाजूला ठेवलेल्या होत्या. त्याच्या खोलीच्या बाजूलाही दोन तीन खोल्या होत्या. त्यापलीकडे दोन तीन सार्वजनिक स्वच्छतागृह होती. अब्दुल अतिशय शांत स्वभावाचा होता. मुख्य म्हणजे तो अतिशय चांगला लिस्टनर होता. आम्हा तिघांची त्याने व्यवस्थित विचारपूस केली. आम्ही थोडे फ्रेश झाल्यावर आम्हाला म्हणाला चला आपण गंगेचे दर्शन घ्यायला जाऊ. दरम्यान त्याच्याबरोबर माझी चांगली गट्टी जमली होती.

मी couchsurfing ची सदस्यता घेतली होती ती माझ्याकडे अनामिक पाहुणे यावे तसेच माझीही सोय इतर सदस्यांकडे व्हावी ह्या दुहेरी उद्देशाने! अब्दुलबरोबर माझा संपर्क Couchsurfing site द्वारेच झाला होता. त्याला देश/जग फिरण्याची खूप इच्छा आहे. मात्र त्याचे पालक त्याच्या काळजीपोटी त्याला जाऊन देत नाहीत. मात्र त्याची जग फिरण्याची इच्छा तो couchsurfing site वरून लोकांना त्याच्याकडे राहण्याचे आमंत्रण देऊन त्यांच्या अनुभवकथनातून पूर्ण करून घेतो. खरोखरच किती निर्मळ, साधा स्वभाव होता अब्दुलचा ! 

अब्दूलने एक डायरी स्वतःजवळ ठेवली आहे. त्याच्याकडे राहायला आलेल्या पाहुण्यांना तो त्या डायरीमध्ये त्यांचे मनोगत लिहायला सांगतो. त्यामध्ये एका बंगलोरस्थित सायकलपटूचे मनोगत खूपच हृदयस्पर्शी होते. त्याने मलाही माझे मनोगत लिहायला सांगितले. 



                      संजय, मी आणि मनोज

मी ते मनोगत लिहित असताना डोरिस डे ने गायलेले माझे एक अतिशय आवडते गाणे त्याला ऐकवले...

You work and work for years and years

You're always on the go

You never take a minute off

Too busy making dough

Some day you say you'll have your fun

When you're a millionaire

Imagine all the fun you'll have

In your old rocking chair

Enjoy yourself, it's later than you think

Enjoy yourself while you're still in the pink

The years go by as quickly as a wink

Enjoy yourself, enjoy yourself

It's later than you think


C'mon now, you gotta have fun

You're gonna take that ocean trip

No matter come what may

You've got your reservations, but

You just can't get away

Next year, for sure, you'll see the world

You'll really get around

But how far can you travel

When you're six feet underground?

Enjoy yourself, it's later than you think

Enjoy yourself while you're still in the pink

The years go by as quickly as a wink

Enjoy yourself, enjoy yourself

It's later than you think


Get out and see the world

You worry when the weather's cold

You worry when it's hot

You worry when you're doing well

You worry when you're not

It's worry-worry all the time

You don't know how to laugh

They'll think of something funny when

They write your epitaph

Enjoy yourself, it's later than you think

Enjoy yourself while you're still in the pink

The years go by as quickly as a wink

Enjoy yourself (enjoy yourself)

It's later than you think


हे गाणे ऐकून अब्दुल फारच खुश झाला. त्याला ते गाणे कमालीचे आवडले. अब्दुलच्या मनाला हे गाणे भिडले होते. कदाचित हे गाणे घरी आईवडिलांना त्याने ऐकवले तर ते त्याला त्याची जगप्रवासाची इच्छा पूर्ण करायला परवानगी देतील असा भाबडा विश्वास मला वाटत होता....


मात्र, खरं सांगायचं तर त्याच्या जगप्रवासाची हौस, आपल्या आई वडिलांचा मान राखत आपले गावही न सोडता, त्या डायरीमधील मनोगताद्वारे अब्दुल पूर्ण करून घेत होताच. पृथ्वीप्रदक्षिणा करण्याची पैज लागल्यावर मोरावर बसून वेगाने जाणाऱ्या कार्तिकेयापेक्षा आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीप्रदक्षिणा करणारा गणपती हाच अब्दुलचा आदर्श तर नव्हे!


                       अब्दुल बरोबर आम्ही तिघे 


शनिवार, २५ जुलै, २०२६

बंगालचा राष्ट्रीय खेळ: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग १९

अहमदपूर येथे चहाचे इंधन मिळाल्यावर तीनही सायकली पुन्हा धावू लागल्या होत्या. ट्रक, टेम्पो, बसेसचे कर्णकर्कश आवाज अजिबात ऐकू येत नव्हते. रहदारी अगदीच तुरळक होती. त्यामुळे आम्ही अगदी आरामात पुढे जात होतो. दोनेक तासाने पोटातील कावळे ओरडू लागले. तोच काय तो आवाज ऐकू येई लागला. मात्र वाटेत कुठेही खाद्य केंद्र दिसेना. वाटेत एक गाव दिसले खरे. मात्र तिथे थोडा फार बाजार रस्त्याला लागला तरी हॉटेल, खानावळ दिसले नाही. बाजारात फळे दिसली. मनात विचार आला की निदान फळे तरी घेऊ. पण लगेच दुसऱ्या विचाराने त्यावर मात केली...पुढे एखादे हॉटेल असेलच की! पण हा दुसरा विचार मारक ठरला. खाणे राहो, चहासुद्धा दिसेना.

आम्ही पानागढ मोरग्राम राज्यमार्गावरून जात होतो. थोड्याच वेळात रस्त्याच्या डावीकडे थोडी गर्दी दिसली. त्या बाजूला न्याहाळत मी जात होतो. डावीकडे एक मोठे मैदान असावे.  तिथे बघे जमले होते. त्यांच्या पलीकडे मैदानात काय आहे हे मला दिसत नव्हते. मात्र कॉमेन्ट्रीचा आवाज कानावर आला. कॉमेन्ट्री चालू आहे म्हणजे तिथे एखादा सामना सुरू असणार...सामना म्हणजे क्रिकेट...हा माझा मुंबईकर अंदाज होता. क्रिकेट... मग ते लॉर्ड्स असो की दोन चाळींमधील अडनिड्या अरुंद जागेतील क्रिकेट असो...दोन क्षण का होईना थांबणार नाही तो मुंबईकर कसला! मी माझ्या क्रिकेटप्रेमाला जागत सायकलचा वेग कमी करत पेडलवर उभे राहून पाहण्याचा प्रयत्न केला. बघ्यांच्या बाजूने पाहिले तर तिथे झाडांच्या फांद्या मध्ये येत होत्या. कॉमेन्ट्री रंगात आली असली तरी ती बंगाली भाषेत होती. त्यामुळे त्यावरूनही मैदानातील खेळाचा अंदाज येईना. मग मात्र मी सायकल थांबवली. ती बाजूला घेत मैदानात पाहिले... सामना चांगलाच रंगात आला असावा... मात्र तो क्रिकेट नव्हे, फुटबॉलचा होता. 




मुंबईमध्ये अशी गर्दी, कॉमेन्ट्री फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी अनुभवण्याची सवय असलेल्या अस्मादिकांना आपण महाराष्ट्रात नव्हे बंगालमध्ये असण्याचे भान आले. बंगालचा 'राष्ट्रीय खेळ' बघण्यात मीदेखील काही क्षण गुंग झालो. फुटबॉलच्या सामन्यापुढे आमची भुकेची जाणीवही विरून गेली होती.

मात्र पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केल्यावर जठराग्नीचा दाह जाणवू लागला. इंधनाअभावी आमचा वेग मंदावला होता. वेग मंदावल्यामुळे अंतर कापायला आणखीच वेळ वाढू लागला. आमचे ' काम, काळ, वेग ' हे त्रैराशिक बिघडू लागले. अर्थातच माझ्याकडे रघुनाथगंज, उमरपूरपेक्षा वीसेक किमी कमी अंतरावरील सागरदिघीचा पर्याय होताच. संदीपप्रमाणेच गंधारनेही सागरदिघीला राहण्याबद्दल सांगितले होते. अखेरीस दुपारी १.३० -२ च्या सुमारास आम्ही नलहाटी येथे पोचलो. तिथे उजवीकडे वळण घेतले आणि एक छोटेसे खोपट दिसले. पोटातील कावळे फारच कावकाव करत होते. त्या खोपटात फार काही खायला दिसत नव्हते. मात्र आता भुकेला कोंडाही चालणार होता. सायकली त्या खोपटाच्या भिंतीला लावल्या. तिथे चॉइस करायला विशेष वाव नव्हताच. दोनतीन पदार्थच उपलब्ध होते. आम्ही खायला बसलो इतक्यात शाळकरी मुलांचा घोळकाच तिथे खायला आला. ते खोपट इतके छोटे होते की आम्ही तीनजण आणि ते शाळकरी ८-१० जण इतक्या लोकांना बसायला जागाच नव्हती. आम्ही पटापट आवरून त्या मुलांना बसायला जागा करून दिली.

अब्दुल अझीझ.. आमचा रघुनाथगंज येथील यजमान ह्याला फोन लावला. त्याला म्हटले आज आम्ही मुक्कामाला येऊ शकत नाही. इतक्या लांबवर अंधाराच्या आत पोचू असे वाटत नाही. त्याने आमचे ठिकाण विचारले. मी नलहाटी येथे आहे असे म्हणताच तो खात्रीपूर्वक म्हणाला की आम्ही नक्की रघुनाथगंज येथे पोहोचू. मी त्याला सांगितले की आमचा वेग कमी आहे. आम्ही उमरपूर येथे किंवा सागरदिघी येथे मुक्काम करू. अब्दुल मात्र आग्रह करतच होता. अखेरीस मी त्याला म्हटले की आम्ही ४ च्या सुमारास अंदाज घेऊ. आम्ही अंधारात सायकल चालवणार नाही. ५-५.३० ला अंधार पडेल असा माझा अंदाज होता. 

रघुनाथगंज अजूनही ४०-४२ किमी दूर होते. आमचा वेग लक्षात घेता आम्हाला अजूनही तीन तास सायकलवायला लागणार होते. त्याखेरीज वाटेत पुन्हा एक थांबा घ्यावा लागणार होता..त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सागरदिघी येथेच थांबण्याचा विचार करू लागलो. मात्र इंधन आमच्या पोटात जाताच आमच्या सायकली वेगात दौडू लागल्या.  



तासाभरातच आम्ही मोरग्राम येथील तिकाण्यावर पोचलो. इथे आम्ही पुन्हा कोलकाता गुवाहाटी महामार्गाला लागत होतो. डावीकडे उमरपूर तर उजवीकडे पुन्हा कोलकाता. सागरदिघी इथून ८ किमी वर होते. मात्र त्यासाठी पुन्हा थोडे कोलकात्याच्या दिशेने जाऊन मग बोटीने जावे लागणार होते. बोटी किती वाजेपर्यंत असतात ह्याचाही अंदाज नव्हता. आम्ही सागरदिघी रद्द केले आणि अब्दुलला सांगितले आम्ही उमरपूर येथे राहणार आहोत. तिथून पुढे रघुनाथगंजला येऊ शकणार नाही. अब्दुल पुन्हा म्हणाला तुम्ही उमरपूर येथे आलात तर रघुनाथगंजला नक्की पोहोचाल. तुम्ही नक्की माझ्याकडेच या.





मी अब्दूलला म्हटले आम्ही उमरपूर येथे पोचल्यावर तुला फोन करतो. अब्दुल मात्र अगदी आग्रहाने आम्हाला बोलावत होता. आम्ही त्या तिकाण्यावर डावीकडे उमरपूरच्या दिशेने वळण घेतले. आता उमरपूर जेमतेम १७ किमी अंतरावर होते. साधारण तास सव्वा तासात आम्ही पोहोचू असा अंदाज होता. आम्ही थोडा वेग घेतला. कारण उमरपूरला राहायचे ठरले तर उजेडातच हॉटेल शोधलेले बरे असे वाटत होते. 

चहावाल्याचे आदरातिथ्य: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १८



शांतिनिकेतनला भेट देत मी माझ्या बकेटलिस्ट मधील एक इच्छा पूर्ण करून घेतली होती. खरतर कोलकाता गुवाहाटी ह्या मार्गात शांतिनिकेतन येत नाही. त्यासाठी आम्ही दिशा बदलली होती. शांतिनिकेतन /बोलपूर येथील अनुभव खूपच उत्साहवर्धक आणि आनंददायी होते. कोलकाता सोडल्यापासून सातत्याने सायकलपटू दिसत होते. शांतिनिकेतन तर सायकलपटूंचेच शहर वाटत होते. इथे आमच्या सायकल सफरीबाबत कोणालाही कुतूहल वाटण्याचे कारणच नव्हते.

खोआई रस्त्यावरील सोनझूरी हाट शेजारील कृष्णा उत्सब रिसॉर्ट मधील वास्तव्यही सुखद होते. सोनाझूरी जंगल आणि बल्लवपूर वन्यजीव अभयारण्य ह्या दोन्हीच्या सान्निध्यात असलेल्या ह्या रिसॉर्टमध्ये वातावरण अतिशय शांत होते. आम्हाला मात्र कल्पनाही नव्हती की आम्ही अभयारण्याच्या सीमारेषेवर मुक्काम केला होता. किंबहुना येथे जंगल अथवा अभयारण्य आहे ह्याचीही आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही कोणत्याही पर्यटन व्यावसायिकामार्फत इथे आलो नव्हतो. त्यामुळे शांतिनिकेतन येथील प्रत्येक ठिकाणी भेट दिल्याची ' टिक ' करण्याचे बंधन आमच्यावर नव्हते. त्यामुळेच इतरत्र भेट देण्याचा हट्टाहास न करता हाट मध्ये आम्ही मनमुराद आनंद घेतला होता. कृष्णा उत्सब रिसॉर्ट मध्ये रात्रीचे जेवणही छान झाले. वास्तविक आजचा दिवस सायकलवणे कमी मनोरंजन जास्त असाच होता.

रात्रीची शांत झोप झाल्यावर आम्ही जरा वेळेवर म्हणजे सकाळी ६.१५ वाजताच सायकल चालवण्यास सुरुवात केली. भारताच्या पूर्व किनाऱ्याजवळ असल्याने इथे मुंबईपेक्षा जवळपास तासभर सूर्योदय लवकर होत असावा. त्यामुळे ६.१५ वाजता पुरेसे उजाडले होते. आजपासून रोज सरासरी ११० ते १२० किमी सायकल चालवायची होती. Couchsurfing साइट द्वारा मला आज रघुनाथगंज येथे राहण्याचे निमंत्रण मिळाले होते. ते अंतर जवळपास १२० किमी होते.


संदीपने मला सागरदिघी येथीलही एक संपर्क दिला होता. कोलकाता गुवाहाटी हमरस्त्याला लागल्यावर सागरदिघी गाव आम्हाला लागणार होते. मात्र रघुनाथगंजसाठी आणखी १५-२० किमी अंतर गुवाहाटीच्या दिशेने कापावे लागणार होते. दुपारी  ३ वाजेपर्यंत आपण कुठे पोचतोय त्यानुसार निर्णय घेण्याचे मी ठरवले. सुरुवातीपासूनच रस्ता अरुंदच होता. मात्र वर्दळ फार नव्हती. वातावरण प्रसन्न होते. वाटेतील गावं जागी होत होती. शाळेमध्ये सायकलने जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी दिसत होते. 




साधारण तासभर सायकलवल्यानंतर आम्ही अहमदपूर गावात शिरलो. लांबूनच मला एका चहावाल्यापाशी थोडी गर्दी दिसली.  चहाकेंद्र पाहून मलाही चहा घ्यायची हुक्की आली. संजय आणि मनोज मागे होते. मला चहा तर हवा होता पण सायकलवण्याची लय घालवायला लागली असती. मी दोघांचा काय विचार आहे हे विचारण्यासाठी सायकल थांबवत असतानाच चहावाल्याने मला हाक दिली. मी त्याचाच फायदा घेत मनोज आणि संजयला सांगितले, की तो चहावाला आपल्याला बोलावतोय. त्याबरोबर तेही दोघे चहा घ्यायला तयार झाले. चहावाल्याने आमच्यासाठी स्पेशल चहा आधणावर ठेवला. आमच्या सायकली लावून आम्ही गप्पा मारत असताना एक इसम आमच्याकडे आला. त्याने आमच्या मोहिमेविषयी चौकशी केली. तो म्हणाला, 'मी मानसकुमार चॅटर्जी '... 

तो एक पर्यटक व्यावसायिक होता. तो आमच्या मोहिमेची माहिती ऐकून चांगलाच प्रभावित झाला होता. आमच्या गप्पा चांगल्याच रंगत होत्या. दरम्यान आमचा चहादेखील आला. आम्ही चहाचे घुटके घेत गप्पा मारत होतो. त्याने सांगितले की व्यवसायानिमित्त त्याच्या भारतभर ओळखी आहेत. अगदी मुंबई असो की गुवाहाटी.. तिथे त्याच्या ओळखी आहेत. त्याने असेही सांगितले की अगदी गुवाहाटीपर्यंत कोठेही आम्हाला काही मदत लागली तरी त्याला संपर्क केल्यास तो आमची सोय करून देऊ शकत होता. आम्हालाही वाटेत काही संपर्क, निवास व्यवस्था मिळाली तरी हवी होतीच.

त्याला आम्ही सांगितले की आज रात्री आमची सोय रघुनाथगंज येथे झाली आहे. त्यासरशी तो म्हणाला तुम्ही तिथे का जाता, त्यासाठी तुम्हाला महामार्गापासून १० किमी आत जावे लागेल. त्या ऐवजी त्याच्याच जवळ महामार्गाला लागूनच उमरपूर गाव आहे तिथेच तुम्ही रहा. त्याने काही हॉटेलची नावेही दिली. मी विचार केला ठीक आहे आपल्याकडे आता सागरदिघी, रघुनाथगंज बरोबर उमरपूर हाही एक पर्याय आहे. चहा घेऊन झाला होता. आम्ही त्याचा निरोप घेऊन चहावाल्याला पैसे देऊ लागलो. तो चहावाला पैसेच घेईना. तो म्हणाला, 'चहा माझ्याकडून होता. मी तुम्हाला बोलावले होते. मी पैसे घेणार नाही ' इतक्यात मानसकुमार तिथे आला तो म्हणाला, ' नाही, नाही... चहा माझ्याकडून आहे.'

आम्ही दोघांनाही धन्यवाद देऊन निघू लागलो. मी संजय आणि मनोज तिघांनी सायकलवर बसून पेडल मारले न मारले तोच चहाकेंद्राच्या दिशेकडून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही मान वळवून मागे पाहतो तर तो चहावाला आणि मानसकुमार दोघेही एकमेकांशी वाद घालत होते.... चहा नक्की कोणाकडून आहे! चहा पिण्यात जेवढा आनंद असतो तेवढाच तो पाजण्यातही असतो ह्याचा हा अनुभव अनोखा होता.

शनिवार, १८ जुलै, २०२६

शांतिनिकेतन: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १७

शांतिनिकेतन येथिल 'सोनाझुरी हाट'चा अनुभव फारच उत्साहवर्धक होता. सोनाझुरी हाट हे लाकडी हस्तकला, टेराकोटा हस्तकला (टेराकोटाचा शब्दशः अर्थ आहे 'भाजलेली माती), कच्च्या धातूचे दागिने, ढोकरा कला आणि स्थानिक बनावटीचे कपडे पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी, शांतीनिकेतनच्या स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे

कोपाई नदीकाठच्या लाल मातीच्या परिसरात, खोई (दरीसारख्या) प्रदेशात आणि सोनाझुरी वृक्षांच्या दाट सावलीखाली भरणारा हा बाजार प्रामुख्याने दुपारी २:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत चालतो. हा एक गावचा बाजार असून येथे स्थानिक हस्तकला वस्तू खरेदी करता येतात. येथे भेट देणारे लोक हाताने बनवलेले 'डोकरा' दागिने, 'कांथा' विणकामाच्या साड्या आणि टेराकोटाच्या (मातीच्या) वस्तूंची खरेदी करू शकतात. त्याच वेळी बाऊल लोकगायक झाडांच्या फांद्यांमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशात आपली कला सादर करतात. मनाला भिडणारे 'बाऊल' संगीत आणि 'संथाल' आदिवासी नृत्याचा आनंदही हा एक विलक्षण अनुभव आहे.

शांतिनिकेतन हे तसे पाहिले तर बोलपूर शहराचा एक भाग आहे. १९ व्या शतकाच्या मध्यास बोलपूर हे एक लहानसे गाव होते. शांतीनिकेतनच्या वाढीबरोबर त्याचाही विकास झाला. रायपूरचे जमीनदार भुबन मोहन सिन्हा यांनी बोलपूर परिसरात एक लहानसे गाव वसवले आणि त्याचे नाव भुवनडांगा ठेवले.

१८६३ मध्ये, देवेंद्रनाथ टागोर यांनी भुबन मोहन सिन्हा यांच्याकडून, दोन सप्तपर्णी (अल्स्टोनिया स्कॉलॅरिस) झाडांसह २० एकर जमीन ५ रुपये वार्षिक भाड्याने कायमस्वरूपी भाडेपट्ट्यावर घेतली. त्यांनी तेथे एक अतिथीगृह बांधले आणि त्याचे नाव शांतीनिकेतन (शांतीचे निवासस्थान) ठेवले. हळूहळू, संपूर्ण परिसर शांतीनिकेतन म्हणून ओळखला जाऊ लागला.

भुवनडंगा हे कुप्रसिद्ध दरोडेखोरांच्या टोळीचा अड्डा होता. दरोडेखोर इतके निर्ढावलेले होते की लोकांना मारण्यात त्यांना काहीच विशेष वाटत नव्हते. देवेंद्रनाथांसाठी संघर्ष आणि चकमकीची परिस्थिती ठरलेलीच. परंतु अखेरीस टोळीच्या म्होरक्याने देबेंद्रनाथांसमोर आत्मसमर्पण केले आणि त्यांनी परिसराच्या विकासात त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. तिथे एक सप्तपर्णी वृक्ष होता, ज्याखाली देबेंद्रनाथ ध्यान करत असत. मूळतः लंडनच्या हाइड पार्कमध्ये १८५१ च्या ग्रेट एक्झिबिशनसाठी बांधलेल्या आणि नंतर स्थलांतरित केलेल्या 'द क्रिस्टल पॅलेस'पासून प्रेरणा घेऊन, देबेंद्रनाथांनी ब्राह्मो प्रार्थनेसाठी ६० फूट × ३० फूट आकाराचे एक सभागृह बांधले. त्याचे छत कौलारू होते आणि जमिनीवर पांढरा संगमरवर होता, परंतु उर्वरित रचना काचेची बनलेली होती. अगदी सुरुवातीपासूनच, हे सगळ्या लोकांसाठी एक मोठे आकर्षण होते.

देवेंद्रनाथ टागोर यांचे पुत्र रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनचा विस्तार केला. रवींद्रनाथांनी वयाच्या १२ व्या वर्षी, फेब्रुवारी १८७३ मध्ये प्रथम शांतीनिकेतनला भेट दिली. १८८८ मध्ये, देवेंद्रनाथांनी एका विश्वस्त कराराद्वारे ब्रह्मविद्यालयाच्या स्थापनेसाठी संपूर्ण मालमत्ता समर्पित केली. १९०१ मध्ये, रवींद्रनाथांनी ब्रह्मचर्याश्रम सुरू केला आणि १९२५ पासून तो पाठ भवन म्हणून ओळखला जाऊ लागला. रवींद्रनाथ टागोर यांनी १९२१ मध्ये स्थापन केलेल्या विश्वभारतीला १९५१ मध्ये केंद्रीय विद्यापीठ आणि राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आले. रविंद्रनाथांच्या दूरदृष्टीमुळे विश्व-भारतीची निर्मिती होऊन हे आताचे विद्यापीठ शहर बनले आहे.

हा परिसर दोन बाजूंनी अजय आणि कोपाई नद्यांनी वेढलेला आहे. पूर्वी शांतिनिकेतनमध्ये विस्तृत जंगल होते, परंतु मोठ्या प्रमाणात झालेल्या जमिनीच्या धूपमुळे काही भाग उजाड दिसू लागले, या घटनेला स्थानिक पातळीवर 'खोई' म्हणून ओळखले जाते. तथापि, वनस्पतीशास्त्रज्ञांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, शहराच्या काही भागांमध्ये संपूर्ण भारतातील वनस्पती आणि झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात. जरी आजूबाजूच्या परिसराचे एकूण पर्यावरण काळानुसार बदलले असले तरी, शांतिनिकेतनच्या मुख्य भागाने निसर्गाशी आपले सान्निध्य टिकवून ठेवले आहे. 

१९४२ मध्ये स्थापन झालेले रवींद्र भवन, हे विश्वभारतीचे केंद्रबिंदू आहे. येथे एक संग्रहालय, अभिलेखागार, ग्रंथालय आणि इतर विभाग आहेत.

सोनाझुरी जंगल आणि हाटचा आनंद आम्ही घेतला मात्र ह्याखेरीज विश्व-भारती विद्यापीठ आणि आश्रम, अमर कुटीर आणि बल्लवपूर वन्यजीव अभयारण्य येथे भेट देण्याचा योग मात्र आम्हाला वेळेअभावी मिळवता आला नाही.

विश्व-भारती विद्यापीठ आणि आश्रम येथे आजही मोकळ्या आकाशाखाली वर्ग भरतात. येथील प्रमुख ठिकाणांमध्ये उपासना गृह (काचेचे प्रार्थना सभागृह) आणि रवींद्र भवन संग्रहालय यांचा समावेश आहे.

अमर कुटीर ही कांथा स्टिच, बाटिक प्रिंट्स आणि टेराकोटा यांसारख्या पारंपरिक बंगाली हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली एक सहकारी संस्था आहे.

कोपाई नदीजवळ वसलेले बल्लवपूर वन्यजीव अभयारण्य हे एक हरीण उद्यान आहे, जे निसर्गाचा एक शांत अनुभव देते.

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

हाट: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १६

सायकलवरील सामान उतरवून आम्ही आमच्या रूमचा ताबा घेतला. हाट पहायची उत्सुकता होती त्यामुळे आराम करण्यात वेळ न दवडता आम्ही बाहेर पडलो. अगदी हाकेच्या अंतरावरच हाट होता. आम्ही तेथील प्रांगणात शिरलो. हाटमध्ये शिरत असतानाच आम्हाला एका टोटोवाल्याने हटकले. मुंबईतील रिक्षाचे एक जुळे भावंड म्हणजे बंगालमधील टोटो! तो टोटोवाला आम्हाला बोलपूर, शांतिनिकेतन येथील महत्वाची ठिकाणे पाहायला जाण्याचा आग्रह करत होता. मात्र हातचा हाट सोडून पळत्याच्या पाठी कशाला लागायचे असा विचार आम्ही केला. आम्ही त्याला म्हटले आधी आम्ही हाट बघतो त्यानंतर मग बोलपूर - शांतिनिकेतन पाहू. तो आमचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. पण आम्ही त्याला धूप घातली नाही.

हाट म्हणजे झाडांनी भरलेल्या आणि मातीच्या लांबलचक प्रांगणात भरलेली एक जत्रा होती. आम्ही आत शिरलो तोच विविध कलाकुसरीच्या वस्तू, साड्या, कपडे, खेळणी नजरेस पडू लागले. तेथील वस्तू पाहून मन पुन्हा बालपणात परतले. जत्रेतील पाळणे, खेळ तिथे नव्हते मात्र जत्रेत मिळणारी खेळणी आम्हाला आमचे वय विसरायला लावत होती. 

आम्ही भारावल्यासारखे पुढे जात होतो. वाटेत वेगवेगळे खाद्यपदार्थ दिसले. एक विक्रेता जादूचे प्रयोग करावे अशा आविर्भावात वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवत होता. आम्हाला भूक तर  लागली होतीच. त्याची ती कारागिरी पाहून आमची भूक चांगलीच चाळवली गेली. आम्ही एकामागोमाग एक असे तीनचार प्रकारचे पदार्थ तिथे खाल्ले. त्यामुळे तर जठराग्नी आणखीच प्रदीप्त झाला. अर्थात त्या पदार्थांच्या चवीचा आणि त्या जादुगार विक्रेत्याच्या हातातील जादूचाही तो परिणाम असावा. 

वाटेत अनेक लोक कलावंत येथील वेगवेगळे स्थानिक नृत्यप्रकार सादर करत होते, गाणी गात होते, निरनिराळी वाद्ये वाजवत होते. तिथे फिरण्यासाठी आलेल्यांना त्यांच्यामध्ये सामील होण्याचे आवाहनही करत होते. सगळे लहानथोर आपले वय, हुद्दा, मानमरातब विसरून त्या लोक कलावंतांबरोबर सामील होत नाचत होते. त्यांना दाद देत होते. 









आम्ही जसजसे पुढे जात होतो तसतशी आमची उत्सुकता वाढतच होती. आम्ही अक्षरशः गुंग झालो होतो. चालता चालता आमची रसनेचीही चाळवाचाळव होत होती. तिची तृप्ती अजिबात होत नव्हती. आम्ही पुन्हा हातातोंडाची लढाई करण्यात गुंतलो. तेथील खाद्यपदार्थ आम्हाला आवाहन करत होते आणि आम्ही त्यांना आपले म्हणत होतो. 

पोटाबरोबर, जिव्हा आणि डोळे ह्यांचेही समाधान होत होते. हाट मधील विविध वस्तू पाहताना त्या विकत घेण्याचा मोह आवरत नव्हता. 




येथे मिळणाऱ्या वस्तूंमध्ये विविधता तर होतीच शिवाय त्या अतिशय वाजवी किमतीमध्ये मिळत होत्या. ग्राहकाच्या गळी पडण्याची वृत्ती येथील विक्रेत्यांकडे नव्हती मात्र आपण चौकशी केल्यावर ते विक्रेते अतिशय नम्रपणे, आपुलकीने आणि न कंटाळता आपल्याला त्या वस्तू दाखवत होते. आम्ही नेमका किती वेळ तिथे घालवला ह्याची आम्हाला कल्पनाच येत नव्हती. मात्र सूर्यास्ताच्या वेळेस हाटची वेळ संपते. हाटमधील विक्रेते त्यांचे सामान आवरते घेऊ लागल्याची जाणीव होऊ लागली. त्याबरोबर मी पटापट थोडी खरेदी केली. सुट्टी संपवून ऑफिसमध्ये पुन्हा हजर झाल्यावर आमच्या स्टाफला माझ्या सुट्टीची भरपाई म्हणून काही भेटी तर द्यायला लागणार होत्याच. त्याची बऱ्यापैकी खरेदी मी मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी हाटचा फायदा घेत करून घेतली. 

गंधार आम्हाला शांतिनिकेतन येथे गेलात की येथील हाट पाहण्याविषयी जो आग्रह करत होता त्याचे कारण आम्हाला चांगलेच पटले होते. शांतिनिकेतन विद्यापीठ पाहून एखाद्या विद्वान पंडिताला जेवढा आनंद होईल त्यापेक्षाही अधिक आनंद आमच्या मनात लपलेल्या लहान मुलाला झाला होता. तो आनंद मनात साठवत आम्ही आमच्या निवासस्थानाकडे वळलो तोपर्यंत सूर्य स्वगृही निघाला होता.








गुरुवार, १६ जुलै, २०२६

शोधयात्रा एका हाटची: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १५

बिश्व खुद्र बाजारपासून चार पाच किमी अंतर पुढे जातो तर तिथे दोन रस्ते फुटलेले दिसत होते. बोलपूरकडे जाणारा रस्ता डावीकडे, तर शांतिनिकेतनकडे जाणारा रस्ता समोरच्या दिशेने जात होता. आम्हाला हाट बघायचा होता. आधी एखादा लॉज पहावा की सायकलींसह थेट हाट पाहायला जायचे की आधी विश्वविख्यात शांतिनिकेतन पहायचे अश्या विचारात मी पडलो. लॉजवर जाऊन आराम करून निघायचे तर हाट ची वेळ संपण्याचीही भीती वाटत होती. शिवाय लॉजमध्ये राहण्यापेक्षा शांतिनिकेतन विद्यापीठाच्याच वसतिगृहात राहता आले तर तेथील अधिक माहिती मिळवता आली असती. शिवाय लॉजचा खर्च वाचला असता किंवा कमी तरी झाला असता. त्यामुळे आम्ही बोलपूरला न जाता थेट शांतिनिकेतन येथे जायचे ठरवले.

थोड्या वेळात अरुंद रस्ते दिसू लागले. सायकलस्वार मोठ्या प्रमाणात दिसत होते. सायकलवरून जाणारे नोकरदार, शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पाहून समाधान वाटत होते, आनंद होत होता. मी शांतिनिकेतन विद्यापीठ शोधत होतो. शांतिनिकेतन हे विविध शैक्षणिक सुविधा असलेले एक विद्यापीठ आहे अशी माहिती मला होती. येथे विज्ञान आणि शिक्षण यांमधील अनेक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त, विश्व-भारतीमध्ये संगीत, नृत्य आणि कला यांचेही विविध अभ्यासक्रम आहेत. विविध भाषांच्या अभ्यासक्रमांवरपासून चर्मकला, पुस्तक बांधणी आणि हस्तनिर्मित पॅकेजिंग, बाटिक काम आणि हस्तनिर्मित कागद निर्मिती, कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील अभ्यासक्रमापर्यंत विविध अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत हेही मला माहीत होते. मात्र आम्ही जसजसे रस्त्याने पुढे जात होतो तेव्हा लक्षात आले की शांतिनिकेतन हे एक विद्यापीठ नसून एक विद्यापीठ शहरच आहे. 

येथे मला अनेक विद्यापीठ दिसत होती. ह्यापैकी रविंद्रनाथांनी सुरू केलेले विद्यापीठ नेमके कोणते हे उमजत नव्हते. आम्ही हाट कोठे आहे ह्याची चौकशी करत रस्त्याने पुढे पुढे जात होतो. वाटेत एक छोटासा बाजार दिसला. तो पाहून हाच तो हाट आहे का ह्याबद्दल शंका आली. तो कोणत्याही शहरात असावा असा एक फेरीवाल्यांचा एक भाग होता. तिथे काही कलाकसरीच्या वस्तूही होत्या. मात्र तो आम्हाला सांगण्यात आलेला हाट नव्हता हे समजल्यावर बरे वाटले. कारण ह्या मूठभर फेरीवाल्यांसाठी एवढा वेळ काढला ह्याचे जास्त वाईट वाटले असते.

हाट दिसत नव्हता मात्र वाटेत एक विद्यापीठ पाहून तिथे राहण्याची सोय होईल का हे पाहायचे मी ठरवले. त्याप्रमाणे आम्ही त्या प्रांगणात शिरलो. अनेक विद्यार्थी, शिक्षक तेथून जात होते. आम्ही तेथील कार्यालयाबद्दल विचारत असताना एक प्रौढ इसमाने आमची चौकशी केली. तो तेथील एक वरिष्ठ शिक्षक होता. मी त्याला आमच्या फिट इंडिया सायकल मोहिमेची माहिती दिली. त्याला म्हटले की विद्यापीठातील वसतिगृहात आम्हाला राहता येईल का ह्याची चौकशी करण्यासाठी आम्हाला कार्यालयात जायचे आहे. त्यांनी सांगितले की येथे राहण्याची कोणतीही व्यवस्था नाही. मात्र जवळच एक धर्मशाळा आहे तिथे तुमची सोय होऊ शकेल किंबहुना तो ती सोयही करून देण्यास तयार होता. आम्हाला धर्मशाळेत राहायचे नव्हते तर विद्यापीठात राहायचे होते जेणेकरून आम्हाला विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती मिळवता आली असती. तिथे व्यवस्था होणार नसेल तर आम्ही एखादा बऱ्यापैकी चांगला लॉज पाहणार होतो.

आम्ही पुन्हा हाटच्या शोधात पुढे निघालो. संपूर्ण गाव ओलांडून आम्ही पुढे जातोय असे वाटू लागले मात्र तो हाट दिसेना. पुढे एक चौक लागला. वस्ती दिसत नव्हती.. आम्ही बहुधा शांतिनिकेतनच्या बाहेर पडलो असे आम्हाला वाटत होते. तिथे चौकशी केली तर उजव्या बाजूला दोन चार किमी अंतरावर हाट आहे असे कळले. आम्ही त्या दिशेने जाऊ लागलो.. थोड्याच वेळात रस्त्याच्या उजव्या बाजूला एखादी जत्रा, आठवडी बाजार असावा असे दिसत होते. तरी तिथे आम्ही पुन्हा चौकशी केली की शांतिनिकेतन येथील प्रसिद्ध हाट हाच आहे का? 

अखेर हाट ची शोधयात्रा संपली होती. होय! हा तोच हाट होता ज्या हाटच्या प्रतीक्षेत आम्ही बोलपूरपासून जवळपासून तास दीड तास सायकलवत होतो. 

आम्ही हाटच्या बाजूने रस्त्याने सायकल पुढे पुढे दौडवत होतो. त्या हाटची व्याप्ती संपली तरी पुढे आणखी काही आहे का ह्याची चाचपणी करण्यासाठी आम्ही आणखी पुढे गेलो. सुदैवाने अगदी बाजूलाच एक छानसे हॉटेल दिसले. आम्ही सायकलवरून पायउतार होत तिथे राहण्यासाठी रुमची चौकशी केली. आमचे नशीब जोरावर होते. त्या हाटच्या अगदी शेजारीच आमची राहण्याची व्यवस्था झाली होती.

थोडे फ्रेश होऊन हाट पहायला जायला आम्हाला अवधी होता. आम्ही सायकलींवरील खोगीर, सामान उतरवले आणि आमच्या रूमचा ताबा घेतला.

मंगळवार, १४ जुलै, २०२६

शांतिनिकेतनकडे: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १४

रात्री झोप शांत लागली होती. आम्ही तिघेही घड्याळ बाबांकडे दुर्लक्ष करत झोपेचा लाभ घेत होतो. अखेर संजय आणि मी चहासाठी बाहेर पडलो. पण खाली गेटला लॉक लावलेले होते..वॉचमन ला उठवले आणि गेट उघडायला लावले. त्याला म्हटले आम्ही चहा पिऊन येतो. तो लगेचच उत्तरला एवढ्या लवकर चहा कुठेही मिळणार नाही. मग मात्र नाईलाजाने परत रूम वर आलो आणि हॉट पॉट मध्ये पाणी उकळून चहा प्यायला.  आम्ही थोडे आरामात आवरत होतो. अखेरीस ५.३० च्या ऐवजी ७.३० ला सायकलवायला सुरुवात केली.

तसेही आज फार जास्त अंतर सायकलवायचे नव्हते. मात्र ज्या ठिकाणी आज जायचे होते त्या ठिकाणी जायची उत्सुकता मला लहानपणापासून होती. ते ठिकाणचं तसे खास होते. म्हणून तिथे जास्तीत जास्त वेळ मिळण्यासाठी लवकरात लवकर पोचायचे होते. कित्येक वर्षांची प्रतीक्षा आज पूर्ण होणार होती. 

वास्तविक बंगाल ही क्रांतिकारकांची भूमी. त्याचप्रमाणे ही संस्कृती, साहित्य आणि कला ह्यांचेही संवर्धन करणारी भूमी आहे. गुरुवर्य रबिंद्रनाथ टागोर ह्याच भूमीतील. त्यांनी स्थापन केलेले शांतिनिकेतन पहायचे माझे लहापणापासूनचे स्वप्न होते. त्यामुळे आज तिथे लवकरात लवकर पोचायचे होते.  रबिंद्रनाथांनी स्थापन केलेले शांतिनिकेतन विद्यापीठ मला पहायचे होते. तेथील कार्य पाहण्याची उत्सुकता मला शाळेत असल्यापासून होती. शालेय इतिहासात शांतिनिकेतन आणि रबिंद्रनाथ ह्यांच्याबद्दल जी माहिती मिळाली होती त्यामुळे मी भारावून गेलो होतो. आजची सायकल दौड त्यासाठी मला जास्त विशेष वाटत होती. आज आम्ही पोचणार होतो... शांतिनिकेतन येथे!

आम्ही संदीपकडे कोलकाता येथे राहिलो असता त्याच्याशी देखील शांतिनिकेतन येथे आमची काही व्यवस्था होऊ शकते का ह्याबद्दल मी चौकशी केली होती. तसेच मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा प्रसार करण्याचा ध्यास घेऊन त्यासाठी सायकलने भारत भ्रमण करणाऱ्या गंधारलाही मी विचारले होते. गंधारने मला सल्ला दिला होता की शांतिनिकेतनऐवजी त्याच्या थोडेसे आधी बोलपूर नावाचे गाव आहे तिथे रहा. तिथे राहण्याची व्यवस्था स्वस्तात होऊ शकेल. तिथून तुम्ही शांतिनिकेतन येथे फिरायला जाऊ शकाल. त्याने आणखी एक गोष्ट सांगितली होती की शांतिनिकेतन येथे हाट भरतो. तो मात्र जरूर बघा. तिथे तुम्हाला अतिशय छान छान गोष्टी बघायला मिळतील. हाट बघण्याविषयी तो वारंवार आणि अतिशय मनापासून सांगत होता. त्यासाठी आम्हाला थोडे लवकर जावे लागेल असेही त्याने सांगितले होते. शांतिनिकेतन विद्यापीठ आणि तेथील हाट ह्या दोन्हींची उत्सुकता आम्हाला होती. मला तर प्रत्यक्ष त्या विद्यापीठात जर एखादे वसतिगृह असेल तर तिथेही राहण्याची व्यवस्था असेल तर ते बघायचे होते. विद्यापीठातील वसतिगृहात राहायला मिळाले तर तेथील अधिक माहिती मिळवता आली असती.

सायकली दौडत होत्या. ध्येय समोर होते. आमची उत्सुकता आमच्या सायकलींनाही समजली असावी. त्यामुळे त्यांनीही चांगला वेग घेतला होता. आजचे एकूण अंतर जवळपास ६५ किमी होते. बोलपूर जवळ येत होते. मात्र ध्यानीमनी नसताना अचानक समोर दिसत होता भेडीया! शांतिनिकेतन किंवा बोलपूरला जाताना भेडीयाशी गाठ पडणार आहे ह्याची किंचितही कल्पना आम्हाला नव्हती. इतर कोणीही त्याबद्दल आम्हाला काही सांगितले नव्हते. मात्र आता आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. भेडीया जवळ आहे हे समजत होते. शांतिनिकेतनला जाण्याचा मार्ग तिथूनच होता. अखेर आम्ही भेडीयाला भिडायचे ठरवले. सायकलचा वेग वाढवला. बोलपूर समोरच्या दिशेला होते, मात्र भेडीयाकडे जाणारा रस्ता आमच्या डावीकडे गेला होता.



पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यातील भेडीया हे खेडगाव बोलपूर/ शांतिनिकेतन पासून साधारण १५-२० किमी अंतरावर आहे.

सायकल प्रवासादरम्यान एनर्जी टिकवण्यासाठी मला दर दोन तासाने तरी चहा हवा असतोच. तसे म्हटले तर घरी बसल्या बसल्याही दर दोन तासाने चहा हवा असतोच. मात्र तो चहा जर मटक्यातून प्यायला मिळाला तर जी चव येते ती तर अप्रतिमच. 


बंगाल जसे संस्कृती, साहित्य, कला ह्यांचे माहेर घर आहे तसेच येथील फुटबॉल प्रेमही सर्वश्रुत आहेच. मुंबईतील प्रत्येक घरात जन्माला येणारा मुलगा क्रिकेटपटू म्हणूनच जन्माला येतो. संघात फक्त ११ जण असतात म्हणून ते सगळेजण club क्रिकेटच्याही बाहेर राहतात ही गोष्ट वेगळी. मात्र गल्लोगल्ली होणारे क्रिकेटचे सामने टेस्ट क्रिकेट पेक्षाही चुरशीने खेळले जातात. तीच गोष्ट बंगालमध्ये फुटबॉलबद्दल सांगता येईल. शांतिनिकेतनच्या वाटेवर ह्या बंगल्याने चक्क फुटबॉलच मस्तकावर पेलला होता. बंगालमधील ह्या बंगल्याच्या मालकाच्या फुटबॉल प्रेमाने माझ्या सायकलला ब्रेक मारायला लावला.


बोलपूर आता अगदी जवळ आले होते. शांतिनिकेतनला रहायचे की बोलपूरला ह्याबद्दल मी विचार करत होतो.


अचानक बोलपूर/ शांतिनिकेतन कडे जाण्यासाठी उजवे वळण आले. तिथे वळताच नजरेस पडला बिश्व खुद्र बाजार! मनात विचार आला की गंधार आठवण करून देत होता तो हाट हाच तर नव्हे. हाट म्हणजे बाजारच की! मी फुजीला थांबवले आणि तेथील सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितले हे एक मोठे व्यापार केंद्र आहे. 


बोलपूर आणि शांतिनिकेतन अजूनही पुढे होते.....

सोमवार, १३ जुलै, २०२६

मोहिमेचा शुभारंभ: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १३


संदीप आणि माँ ह्यांनी आमचा पाहुणचार उत्तम केला होता. माँ चा स्वयंपाक तर उत्तम होताच. शिवाय दोघांनी आमचे आदरातिथ्य खूपच मनापासून केले होते. संदीप ने गप्पा मारता मारता आम्हाला सांगितले. आम्ही जे घर बघितले ते त्यांच्या मालमत्तेचा एक भाग होता. त्यालाच जोडून पुढे त्यांची अतिशय प्रशस्त जागा होती. तिथे त्याचा भाऊ राहत होता जो पश्चिम बंगाल च्या विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेत्याचा वैयक्तिक सहाय्यक होता. संदीप स्वतः इंग्लिश स्पीकिंग आणि कॉम्प्युटर चे क्लास घेतो. तसेच तो लेखकही आहे. एका NGO मध्येही तो काम करतो. संदीप सायकल पटू तर आहेच. तो लडाखला चार वेळा तरी जाऊन आला आहे. लडाखबद्दल त्याला विशेष प्रेम आहे. लडाखबद्दल त्याला विस्तृतपणे लिहायचे आहे.

संदीपच्या घरचा पाहुणचार आटपून आता आमची मोहीम सुरू करायची होती. रात्री माँ च्या चविष्ट स्वयंपाकाबरोबर संदीपने आणलेल्या मीहीदाना आणि सीताभोग ह्या मिठाया खाऊन आम्ही अगदी शांत झोपलो होतो.

जाग आली तेव्हा पाहिले तर  चांगलेच उजाडले होते. आम्ही घड्याळ पाहिले तर पहाटेचे ५.३० वाजले होते. मात्र आज सफरीला सुरुवात करायची होती. आम्ही एक फेरफटका मारून चहा पिऊन आलो. घरी परत येतो न येतो तोच माँ नी चहा विचारला. मग परत एक चहा घेतला. सायकली तयार करून निघण्यासाठी सायकली घराबाहेर आणल्या. संदीपसह एक छायाचित्र काढून घेतले. 











माँ चा आशीर्वाद घेऊन आमच्या मोहिमेचा शुभारंभ केला. हवा खूपच छान होती. सुरुवातीच्या गल्लीबोळातून महामार्गाला लागल्यावर चांगली लय मिळाली. जवळपास ३८ किमी अंतर झाले तिथे डावीकडे एक छोटेसे दुकान दिसले. तिथे मिठाई होती. मी त्यांना कचोरी आहे का विचारताच त्यांनी हो म्हटले. मी लगेचच तीन कचोरींची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात पुरी आणि बटाट्याची मस्त भाजी आली. तेव्हा समजले हे लोक कचोरी कशाला म्हणतात. मात्र पुरी भाजीची चव उत्कृष्ट होती. दुकानदार, आजूबाजूचे लोक आमची चौकशी करत होते. त्यांना फिट इंडिया मोहिमेबद्दल सांगितले. मला नंतर चहा हवा होता..इतक्यात मनोजने मिष्टी दोही तुम्ही इथेच बनवता की बाहेरून आणता असे दुकानदाराला विचारले. तो म्हणाला आम्ही इथेच बनवतो. मनोजने मिष्टी दोही मागवले. मग मलाही आग्रह केला. मी आणि संजयने चहाचा मोह टाळून मिष्टी दोही घेतले. ते छानच होते.

दुकानदार म्हणाला आमच्याकडील रसगुल्ला पण खा. तो छान असतो. मग काय लगेचच रसगुल्ला गट्टम केला. नाष्टा भरपेट, स्वस्तात आणि उत्कृष्ट झाला होता. सायकली पुन्हा दौडायला लागल्या. तिघांनी छान लय साधली होती. तिघांचा वेग सारखा असल्याने सलग सायकलवता येत होते.

सकाळच्या नाश्त्याने पुरेसे इंधन पुरवले होते. थोड्या वेळात मनोज पुढे गेला. संजय थोडा थांबला. शेवटच्या सायकलपटुला एकटे सोडायचे नाही असा नियम मी सांगितला होता. तो मलाच पाळावा लागणार होता. मी संजयसाठी थांबलो. संजयला पायात cramp आले होते. त्यांनी थोडे स्ट्रेचिंग केले. आणि आम्ही निघालो. काही अंतर पुढे जातोय तर लांबून एक बस स्टॉप समोर मनोजची सायकल दिसली. तिथे जाऊन बघतो तर त्या रिकाम्या बस स्टॉपवर मनोज मस्तपैकी आडवा झाला होता. मी त्या दोघांनाही म्हटले थोडे पुढे जाऊन आपण चहा घेऊया.

पुढे लगेचच हॉटेल दिसले. आम्ही सायकली उभ्या केल्या आणि हॉटेलमध्ये शिरलो. बाहेर बघतोय तर हॉटेलबाहेर लावलेल्या सायकलीभोवती लोकांनी गराडा घातलेला. मी सायकलपाशी गेलो. एकाने विचारले हा कॅमेरा आहे का? सायकलच्या हँडलला लावलेल्या GoPro चे काम कसे चालते, त्यामध्ये शूटिंग कसे करता येते, समोरचा माणूस कसा दिसतो ह्याचे प्रात्यक्षिक मला दाखवावे लागले. आमच्या सायकल मोहिमेबद्दलही तेथील लोकांना उत्सुकता होती. चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. बर्धमान शहर जवळ येत असताना आम्ही राहण्यासाठी आणि खाण्यासाठीही हॉटेल शोधू लागलो. राहण्याची सोय काही दिसत नव्हती. मात्र एक पंजाबी धाबा दिसला. तो एकदम टिपिकल पंजाबी धाबा होता. मस्तपैकी दोन दोन खाटा समोरासमोर टाकलेल्या. त्यावर ऐसपैस मांडी घालून बसलो. जेवायला पराठे मिळतील असे वाटले होते. पण पराठे फक्त सकाळी मिळतात, आत्ता रोटी मिळेल असे समजले. मनोजने चौकशी केली रोटी मैद्याची की गव्हाची.... लगेच उत्तर आले की गव्हाची रोटी मिळेल. एक कडधान्याची भाजी आणि कढी पकोडे ह्यापैकी एक मिळेल असे समजले. आम्ही दोन्हीची ऑर्डर दिली. कढी पकोडे असल्याने मी तर खुषच झालो. जेवण मनसोक्त झाले. पाठोपाठ सुंदर दही मिळाले. अगदी तृप्त होऊन आम्ही राहण्यासाठी हॉटेल शोधू लागलो. महामार्गालगत हॉटेल मिळत नसल्याने आम्ही अखेर शहरात शिरलो. शहरातील गर्दी पार करत करत जवळपास ५-७ किमी वर मात्र हॉटेल मिळाले. थोडे फ्रेश होऊन आम्ही चहा प्यायला बाहेर पडलो. तिथे बसलेल्या लोकांनी आमची चौकशी केली आणि जेवणासाठी एक खास हॉटेल सांगितले. आम्ही शोधत शोधत गेलो. हॉटेल सापडले. तिथे अंदाज घेतला आणि आमच्या लॉज मध्ये परत आलो. थोडावेळ आराम करून परत जेवायला गेलो. मनोजने अंडा फ्राय तर संजयने फ्राईड राईस घेतला. माझी थोडी पंचाईत झाली. फिश फ्राय खाल्ला पण त्याची quantity कमी होती. पोट भरलेले नव्हते. येताना काही स्वीट ची दुकाने पहिली होती. त्यापैकी एकामध्ये शिरलो. समोर मालपुवा दिसला. मी लगेचच तीनचार मालपुवा घेतले. त्याची चव तर अप्रतिमच होती. तिथे तीनचार प्रकारचे रसगुल्ले दिसले. साधा रसगुल्ला, ऑरेंज रसगुल्ला आणि मँगो रसगुल्ला. ऑरेंज रसगुल्ला खाऊन मी समारोप केला.

झोपताना ठरवले उद्या पहाटे ५.३० ला सायकल चालवायला सुरुवात करायची....

रविवार, १२ जुलै, २०२६

कोलकाता दर्शन: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १२

सकाळी आम्हाला जाग आली तेव्हा संदीप घरी नव्हता. आम्हाला त्याने ती कल्पना आधी दिली होतीच. माँ ना तर हिंदी येत नव्हते. मात्र त्या माँ होत्या. मुलांना कधी काय हवे असते त्याची कल्पना माँ ना असणारच ना! आम्ही जागे होताच त्यांनी लगेचच ' चा ' असे विचारले. तेही केवळ एकदा चहा देऊन नव्हे तर पुन्हा एकदा. माँ बरोबर आमची दोस्ती होणारच ना!

संदीपने आम्हाला जी खोली राहायला दिली होती त्या खोलीला लागून पुढे ओळीने तश्याच आणखी चारपाच खोल्या संदीपच्या घरात होत्या. त्या सर्व खोल्यांना एक सामायिक असा लांबलचक व्हरांडा तिथे होता. तो व्हरांडा संपल्यावर पुढे बाथरूम होते. संदीपचे घर वास्तविक चांगलेच लांबलचक होते. आमच्या पुढच्या खोलीत माँ, पुढे संदीपची खोली, जेवणाची खोली आणि त्यापुढे आणखी एखाद दोन खोल्या असाव्यात.

आम्हाला आज जमेल तेवढे कोलकाता बघायचे होते. संजयची सायकल हावडा स्टेशनला जाऊन आणायची होती. बेलूर मठ संदीपच्या घरापासून जवळच होता. त्यामुळे बेलूर मठापासूनच कोलकाता दर्शनाची सुरुवात करायचे ठरवले. कोलकाता चेन्नई सायकल सफर आम्हाला बेलूर मठापासूनच करायची होती. मात्र तेव्हा ते जमले नव्हते. त्यामुळे बेलूर मठ दर्शन ह्यावेळी नक्कीच करायचे होते. आवराआवर करून निघालो तेव्हा समजले की बेलूर मठ दर्शनाची सकाळची वेळ संपायला थोडाच अवधी शिल्लक आहे. आम्ही लगबगीने आत शिरलो. 







तेथील परिसर देखील थोड्या घाईघाईने पाहिला. मठातूनच दक्षिणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी बोटी मिळतात. आम्ही लगोलग बोट पकडण्यासाठी गेलो. बोट अजून आली नव्हती. आम्ही काही वेळ तेथील प्रतीक्षालयात बसलो. जवळपास अर्ध्या तासाने बोट आली.





आम्ही बेलूर मठातून दक्षिणेश्वर मंदिराकडे बोटीने निघालो. बोट पूर्ण भरलेली होती. हुगळी नदीमधील जलप्रवास करून दक्षिणेश्वर मंदिराकडे जाताच आम्हाला तेथील दर्शनासाठी जमलेली गर्दी दिसली. नदीकिनारी तट बांधलेले होते. मंदिराचे आवार प्रशस्त होते. 










बोटीतून दिसणारे दक्षिणेश्वर मंदिर

ख्रिस्ती ग्रेगोरियन शक १८५५ मध्ये राणी रासमानी ह्यांनी हे मंदिर बांधले आहे. दक्षिणेश्वर काली मंदिर किंवा दक्षिणेश्वर कालीबारी हे हिंदू नवरत्न शैलीचे मंदिर आहे. मंदिराची प्रमुख देवता भवतारिणी (काली) आहे, ती महादेवी किंवा पराशक्ती आद्य कालीचे रूप आहे. ती आदिशक्ती कालिका म्हणून ओळखली जाते. चट्टोपाध्याय कुटुंबातील एका तरुणाला येथील पूजा अर्चेचे काम मिळाले होते. त्याच्या मदतीला त्याचा धाकटा भाऊ गदाधर देखील येथे येऊन राहिला. दुर्दैवाने गदाधरच्या थोरल्या भावाचा तरुण वयातच मृत्यू ओढवला. त्याच्या पश्चात मंदिराची जबाबदारी गदाधरवर आली. तो दिवसरात्र देवीच्या पूजेमध्ये मग्न राहू लागला. त्याला देवी ही प्रत्यक्ष त्याच्यासमोर अस्तित्वात आहे ह्यावर ठाम विश्वास होता. तंत्रसाधनेने साकार परमेश्वराची प्राप्ती झालेला गदाधर म्हणजेच श्रीरामकृष्ण. त्यांनी आणि त्यांची पत्नी शारदा देवी ह्यांनी ह्या मंदिराची अनेक वर्ष सेवा केली. 

नदीला समांतर थोड्या अंतरावर मात्र मंदिराच्याच परिसरात एका बाजूला एका रांगेत काही उपहारगृहे होती. आम्हाला भूक लागली होतीच. तिथे एक राजस्थानी जोडपे आमच्या बरोबर जेवायला बसले होते. त्याचा एक मोठा गट दर्शनासाठी राजस्थानहून आला होता. आम्हा सगळ्यांना तेथील जेवण आवडले. 
मंदिराबाहेर पडत असताना तेथील भिंतीवरील एका संदेशाने माझे लक्ष वेधले. ' जितक्या व्यक्ती तितके मार्ग ' अश्या अर्थाचा तो संदेश होता. खरोखरच इतका व्यापक विचार इतर कोणी केला असेल का! रामकृष्ण मिशन अथवा विवेकानंद केंद्र ह्यांचा हा संदेश मनावर कोरला गेला.

आम्हाला संजयची सायकल हावडा स्टेशनला जाऊन घ्यायची होती. त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये अधिक वेळ न घालवता तेथून निघालो. पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मजा घेत हावडा स्टेशन गाठले. तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला ओळखले. त्यांनी लगेचच संजयची सायकल आम्हाला दिली. 

काल मी आणि मनोजकडे सायकल होती तर संजयकडे नव्हती. आता मात्र उलट झाले होते. अखेर संजय सायकल चालवत घराकडे निघाला. मी आणि मनोजने लोकल प्रवास करत बेलूर स्टेशन गाठले.  बेलूर स्टेशन कडून संदीपच्या घरी जाताना वाटेत एक सायकल दुरुस्तीचे दुकान दिसले. बहुधा तिथे भाड्यानेही सायकली मिळत असाव्यात.


घरी पोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. आम्ही घरी जाताच माँ चा आवाज आला ' चा' . आम्ही खुश होणारच. 

          संजय, अस्मादिक, माँ, मनोज आणि संदीप

संदीप आम्हाला म्हणत होता की माँ आणि तुमची आता चांगली मैत्री झाली आहे. त्या आमची चौकशी करत होत्या. संदीप बरोबर तर आमच्या गप्पा रंगत होत्याच. पण माँ बरोबर देखील आम्ही बंगाली vs हिंदी भाषेत गप्पा मारत होतो. आज रात्रीही आमच्यासाठी माँ नी उत्तम स्वयंपाक केला होता. संदीप ने रात्री जेवणासाठी मीहीदाना आणि सीताभोग आणले होते. संदीप आणि माँ ह्यांच्या गप्पा आणि जेवण दोन्हीमुळे आम्ही अगदी तृप्त झालो होतो.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...