रविवार, १४ जून, २०२०

सांगता: पुणे जम्मू सायकलसफर भाग ४ लेख १०

भारतीय राष्ट्रीय अर्थात भारताच्या अधिकृत (official) कॅलेंडरनुसार दिनांक १६ पौष १९४१
ग्रेगोरीयन (युरोपमधील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित) कॅलेंडरनुसार दिनांक ६ जानेवारी २०१९



आमच्या राईडचे ठिकठिकाणी झालेले स्वागत पाहून वरूणराजही आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आतुर झाला होता. काल सकाळपासून त्याने सूर्यदर्शन होऊ दिले नाही. आम्ही अमृतसरला पोचल्यानंतर त्याने शुभेच्छांचा अविरत वर्षाव सुरू केला, तो रात्रभर सुरूच राहिला. आमचे अंबरसिया (अमृतसर येथे राहणारे) मित्र तसेच जम्मू येथील मित्रांनी आम्हाला सांगितले की पुढील २ दिवसही तो असाच वर्षाव करत असणार आहे. त्यांनी असेही पुढे सांगितले की अश्या वातावरणात आम्हीही सायकल चालवत नाही. अमृतसर येथून जम्मूकडे जाणाऱ्या मार्गावर अमृतसारपासून साधारण २०-३० किमी अंतरावर राहणाऱ्या मित्रानेही सांगितले की तेथेही पाऊस सुरूच होता... वास्तविक केवळ अमृतसर ते जम्मूच नव्हे तर पंजाब ते नेपाळपर्यंत पाऊस सुरूच राहणार असल्याचे समजले. 

आमच्या अमृतसर व जम्मू येथील मित्रांनी आमची यात्रा अमृतसर येथेच समाप्त करण्याची आग्रही सूचना केली. सकाळी ९-१० वाजेपर्यन्त वाट पाहून आम्ही वरूणराज आम्हावर अविरत करत असलेल्या शुभेच्छांना मान तुकवत आमची सायकलयात्रा अमृतसर येथेच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पंजाबात संपूर्ण प्रवास फुजीनेच केला होता आणि श्विन साहाय्य वाहनातच राहिली होती. आता दोघांनाही इतर मैत्रिणींबरोबर साहाय्य वाहनातच बसून अमृतसर येथूनच परतीचा प्रवास करायचा होता. पुणेकरांनी प्रत्येक सायकल व्यवस्थित परत जावी यासाठी प्रत्येक सायकलसाठी खोके आणले होते. त्यांच्या आणि गौतमच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येकाने आपापल्या सायकलचे हाताळे, पायपट्टी आणि एकेक चाक काढून सायकली एकेका खोक्यात भरल्या. आणि मग ते काढलेले भागही त्याच खोक्यात आजूबाजूला भरून ठेवले. खोके पक्के बंद केल्यावर ती खोकी साहाय्य वाहनात भरण्यात आली. श्विन, फुजी, ट्रेक, स्कॉट आता आम्हाला थेट डोंबिवली येथेच भेटणार होत्या.

आमची आज रात्रीची राहण्याची व्यवस्था पठाणकोट येथे केली होती. त्यामुळे सायकलींची व्यवस्था लावून आम्ही लोहमार्गाने अमृतसरहुन पठाणकोटला जाण्यासाठी गाडीमध्ये बसलो. सगळेजण निश्चिन्त आणि समाधानी होते. रसिकभाई आणि अस्मादिकांनी अहमदाबादहुन सायकलयात्रा सुरू झाल्यापासून रोज मुक्कामी पोचलो की बुद्धिबळाचा डाव टाकायचे ठरवले होते. मात्र रोज संध्याकाळी होणाऱ्या स्वागतसमारंभात राजा, वजीर, हत्ती, उंट, घोडे, प्यादी रणांगणामध्ये पोहोचतच नव्हती. ती संधी आम्हाला अमृतसरहुन पाठणकोटला जाताना लोहमार्गावरील गाडीमध्ये मिळाली. गाडी पठाणकोटला पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. राहण्याची व्यवस्था जेमतेमच होती. तीही सगळ्यांना एकाच ठिकाणी मिळाली नाही. मात्र केवळ रात्रच काढायची असल्याने आम्ही ती व्यवस्था स्वीकारली. वरूणराजाने अजूनही रजा घेतली नव्हती.

रात्र पठाणकोटला काढून दुसऱ्या दिवशी म्हणजे राष्ट्रीय दिनांक १७ पौष १९४१ अर्थात ग्रेगोरीयन दिनांक ७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी जम्मूला जाणारी गाडी पकडायला आम्ही लोहमार्गस्थानकात पोचलो. गाडी यायला बराच वेळ होता. संपूर्ण फलाट रिकामा होता. तिमिराचेच साम्राज्य होते. इतक्यात आम्हाला चिवचिवाट ऐकू येऊ लागला. वर पाहिले तर बरेच पक्षी तिथे जमले होते. रसिकभाई लगेचच हातावर काही खाद्य घेऊन त्या पक्ष्यांना आमंत्रण देऊ लागले.


त्यांनी बराच वेळ प्रयत्न केला पण त्या पक्ष्यांनी काही दाद दिली नाही. आम्ही सर्वजण मात्र निवांत बसलो होतो.







थोड्या वेळाने मी आणि देवधर फलाटावर फिरत असता समोर एक लष्करी जवान दिसला. बिल्ल्यावर मराठी नाव दिसले. आम्ही ज्या गाडीने जम्मूला जाणार होतो त्याच गाडीने पुण्याहून त्याचे कुटुंब येणार होते. बऱ्याच दिवसांनी भेटणार असलेल्या कुटुंबियांच्या भेटीची व्याकुळता त्याच्या डोळ्यात दिसत होती. गाडी येताच आम्ही त्याचा निरोप घेतला. गाडी आता जम्मूच्या दिशेने निघाली. गाडीतून रस्ता दिसू लागला की आम्ही हळूच खिडकीबाहेर नजर टाकत होतो. न जाणो पाऊस थांबला तर....(आता खरंतर पाऊस थांबला तरच आम्हाला निराशा आली असती कारण सायकली आमच्याबरोबर नव्हत्या). मात्र वरुणराजांची संततधार सुरूच होती.

गाडीत गर्दी नव्हती. इतके दिवस एकत्र असून एकमेकांशी निवांत गप्पा मारायला आता वेळ मिळाला होता. वाटेत एका स्टेशनवर गाडी थांबली आणि मला 'शोले' चित्रपटाची आठवण आली. स्टेशनचा फलाट संजीवकुमार गावाला जातो त्या स्टेशनच्या फलाटासारखा रिकामा होता. त्या गावाचे नाव होते ...'साम्बा'.  फलाटावर उतरणारे मोजके प्रवासी पाहून कदाचित स्थानकप्रमुख तिकीट तपासनीसाला विचारात असावा,'(आज) कितने आदमी थे?'

गाडी जम्मूला पोचली. स्थानक बऱ्यापैकी गजबजलेले होते. एक खाजगी बस करून आम्ही आमच्या नियोजित हॉटेलवर पोचलो. हॉटेलचा बोळ पाहताच साहाय्य वाहन आणि सायकली इथे न आणल्याबद्दल समाधानच वाटले. तसेच समाधान पठाणकोटचे हॉटेल पाहूनही वाटले होते.

जम्मू येथील हॉटेलसमोरील रस्ता अरुंद असला तरी हॉटेल मात्र आरामदायी आणि प्रशस्त होते. हॉटेल रघुनाथ मंदिरापासून हाकेच्या अंतरावर होते. जम्मूमधील हॉटेल वास्तव्य सुखद होते. पावसाच्या संततधारेमुळे आम्हाला बाहेर मात्र पडता येत नव्हते. जम्मू येथील सायकल क्लबचे सदस्य आमच्याबरोबर अमृतसर/ पठाणकोट पासून सायकलवत येणार होते. मात्र पावसामुळे त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला होताच शिवाय आम्हालाही सावध केले होते. मात्र आदरातिथ्य करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. तेथील सायकलपटू हरप्याससिंग आणि त्यांचे मित्र आम्हाला भेटायला आले. हरप्याससिंग ह्यांनी प्रत्येक सायकलपटूला सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले.






त्यांनी इतक्या छान प्रकारे आदरातिथ्य केले की आम्हाला आमच्या सायकलयात्रेची सांगता अमृतसर नव्हे तर जम्मू येथेच झाल्याप्रमाणे समाधान वाटले. हरप्याससिंग ह्यांचे कार्यालय जम्मू विमानतळाजवळच होते. डोंबिवलीकर आणि पुणेकर हवाई मार्गाने तर अहमदाबादकर लोहमार्गाने परत जाणार असल्याचे समजताच त्यांनी जाण्याअगोदर त्यांच्या कार्यालयातही येण्याचे निमंत्रण दिले. जम्मू येथे रात्र काढल्यावर पुढील दिवशी म्हणजे राष्ट्रीय दिनांक १८ पौष १९४१ (ग्रेगोरीयन दिनांक ८ जानेवारी २०१९) रोजी पहाटे पावसातच रघुनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. एव्हाना काकड आरतीही झाली नव्हती.

डोंबिवलीकरांचे विमान (जम्मू मुंबई) सकाळी लवकर असल्याने आम्ही हरप्याससिंग ह्यांच्या कार्यालयात न जाता थेट विमानतळावर गेलो. अमृतसर येथे पोचताच आमच्यावर शुभेच्छांचा करत असलेला वर्षाव थांबवायला वरुणराज अजूनही तयार नव्हता. त्यामुळे त्याच्या ह्या प्रेमामुळे आकाशात अजूनही सूर्यदेव दर्शन देत नव्हता. परिणामी जम्मू विमानतळावर कोणतेही विमान कालपासून उतरलेले नव्हते. आज सकाळीही जम्मू येथे उतरण्याचा प्रयत्न दोन वेळा असफल झाल्यावर आमचे विमान चंदीगडला पाठवले गेले होते. ह्यानंतरच्या प्रयत्नात यश आले नाही तर मात्र आमचे विमान रद्द होणार होते. सुदैवाने ५ तास जम्मू विमानतळावर प्रतीक्षा केल्यावर आमचे विमान धावपट्टीवर उतरले आणि आम्ही निश्वास सोडला. मग मात्र ते विमान जम्मू येथे फार काळ थांबवून न ठेवता लगेचच आकाशात झेपावले.

त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आविष्काराचा चमत्कार अनुभवत आम्ही हवाई मार्गाने अडीच तासातच जम्मूहून (आमची) मुंबई गाठली. मात्र ह्या हवाई प्रवासात यांत्रिक चेहरे मिळालेली माणसे वगळता ना इतर कोणाशी गाठ पडली, ना कोणाशी ऋणानुबंध जुळले गेले. डोंबिवली येथे परत पोचल्यावरही विज्ञान आणि तंत्रज्ञानातील चमत्कारापेक्षा आमच्या हृदयाच्या कप्प्यात साठवले गेले ते महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू येथील जमिनीवर भेटलेल्या सुहृदांशी जुळलेले अतूट नाते!


सोमवार, ८ जून, २०२०

जिप्सी




नमस्कार मी 'श्विन'. मला भटकायला खूप आवडते. खरतर हे जरी आधीपासून माहीत असले तरी गेले २ महिने एकाच जागी अडकून पडल्यावर त्याची जाणीव जास्त तीव्रतेने व्हायला लागली आहे.

भटकणे कोणाला आवडत नाही? प्रत्येकालाच आवडते, होय ना!प्रत्येकामध्येच एक जिप्सी दडलेला असतो. जिप्सी... म्हणजे परंपरेने चाकाच्या मोठ्या छकड्यात राहून आणि सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुक्काम हलविणारा माणूस

हाच जिप्सी माझ्या मित्रामध्येही दडलेला होताच... हा मित्र शशांक वैद्य.

हा कॉलेजमध्ये होता तेव्हा त्यांच्यातील जिप्सी जागा व्हायला कारण होते त्याची मैत्रीण 'हिरो'. हम्म...ती काळी होती, पण नाजूक नव्हती बरं का! हिरोबरोबर करवंद खायला जायला शशांक नेहमी तयार असायचा. शहरात तर कुठेही फिरताना हिरो आणि शशांक ह्यांची जोडी ठरलेलीच! डोंबिवली कर्नाळा, डोंबिवली गणेशपुरी अश्या सफरी झाल्यावर दोघांनी डोंबिवलीहुन थेट गोवा गाठायचे ठरवले. पण ना मार्गदर्शन, ना साथ त्यामुळे ते स्वप्नच राहिले.

हिरोने २०-२२ वर्ष साथ दिल्यावर मात्र शशांकने हिरोला रजा दिली. नंतर दोनेक वर्षांनी त्याला फोमास सापडली. फोमासने रोज आसपासच्या परिसरात भटकण्याची सवय लावली. एकदा तर फोमासने पुणे सायकल प्रतिष्ठानच्या सदस्यांसह थेट झांसी गाठली. जिप्सीची भूक वाढत होती. फोमास अधूनमधून शशांकच्या ऑफिसपर्यंत डोंबिवलीहुन ठाण्याला जायला लागली. ऑफिसला जाताना मिळणारे स्वातंत्र्य इतर वाहनांनी मिळणे अशक्यच


हिरोप्रमाणे फोमासही डोंबिवली गोवाचे स्वप्न पाहू लागली होती. मात्र अचानक एका चोराने तिला पळवून नेले. शशांक उदास होता. त्याच वेळी त्याची माझ्याशी मैत्री झाली. आमची जोडी जमल्यावर तर भटकंती आणखीच वाढली. मी तर रोजच शशांकबरोबर त्याच्या ऑफिसला ठाण्याला जायला सुरुवात केली.
गोवा दौऱ्याचे स्वप्न पुन्हा पडायला लागले पण इतक्यात YHAI च्या गोवा कन्याकुमारी दौऱ्याची बातमी कळली. ही सफर करताना जिप्सी सुखावत होता.

त्यानंतर एकदा अष्टविनायक दौरा करायचे ठरवले. ह्यावेळी दोन श्विनने हा दौरा केला.. एक मी स्वतः आणि दुसरी म्हणजे अय्यरकाकांची श्विन! 
जिप्सी आता थांबायला तयार नसायचा. रोज ऑफिसच्या निमित्ताने जाऊन येऊन ६० किमी प्रवास झाल्यावर रविवारी शतकी राईडची चटक लागली होती. नयना आघारकर ह्यांच्याबरोबर मग डोंबिवली बडोदा राइडही झाली. ह्या दोन राइड करताना राईडची आखणी, नियोजन करण्याची जबाबदारी घ्यावी लागली होतीच.

कल्याणला राहणारे विलास वैद्य आणि तीनजणांनी चालवायच्या तांडेम सायकलसह वेगवेगळ्या सायकल बनवणारे दुर्गेश झिपरे ह्यांच्याबरोबर माघी गणेशोत्सवानिमित्त कल्याण पाली सायकलयात्रा दरवर्षी घडू लागली. त्यामधून टीमवर्क, जिद्द ह्यांची शिकवण मिळत होती. 

पुन्हा एकदा गोवा दौरा आखत असताना कळले की saveoursahyadri म्हणजे सह्याद्री वाचवा ह्या संदेशासह नवापूर ते महाबळेश्वर आणि सावंतवाडी ते महाबळेश्वर अशी सायकलमोहिम आखण्यात आली आहे. पुन्हा एकदा गोवा दौरा मागे पडला. पर्यावरणाच्या जागृतीसाठी आम्ही सायकलसफर करत आहोत असा आव आणणाऱ्या सफरी या आधी पाहिल्या होत्या. त्या सफारी करत असतानाच त्यातला फोलपणा, नाटकीपणा जाणवायचा. मात्र saveoursahyadri मोहिमेदरम्यान डोळेच उघडले. ह्या मोहिमेमुळे पर्यावरणाकडे पाहण्याची वेगळी दृष्टीच मिळाली.

मात्र हिरोबरोबर पाहिलेले डोंबिवली गोवाचे स्वप्न अजून अपूर्णच होते. गोवा सफर आखल्यावर ती पाच वेळा अचानक रद्द करावी लागली होती. दरम्यान २०१७ साली मी सुनील गावस्कर ह्यांच्या एकूण कसोटी धावांएवढे डोंबिवली ठाणे डोंबिवली असे cycle2work करत पूर्ण केले. पुढच्याच वर्षी शशांकच्या सहचारिणी मीरानेही नवी मैत्रीण शोधली... ती होती स्कॉट! 
आता तर चार जिप्सी एकत्र झाले होते...मी स्वतः, शशांक, स्कॉट आणि मीरा.

मग काय आम्हा चौघांचे दर आठवड्याला दौरे सुरू झाले. तळेगाव, अलिबाग, इंदापूर असे दौरे नियमाने होत असताना पुन्हा एकदा गोव्याचा प्लॅन आखला. यावेळी मात्र तो यशस्वीही झाला. हिरोने जे स्वप्न १९९० च्या आसपास पाहिले होते ते मी पूर्ण केले ते २०१८ साली. पुढच्याच वर्षी शशांकने माझ्या जोडीला फुजीला आणले, तर मीराने स्कॉटच्या जोडीला ट्रेकला आणले. मी आणि स्कॉट MTB म्हणजे माऊंटन बाईक होतो. आमची धाव थोडी धीमी असली तरी आम्ही डोंगराळ भागातही दौड कायम राखायचो. तर ह्या नवीन मैत्रिणी मात्र सडपातळ बांध्याच्या हायब्रीड होत्या. त्यांना मुलायम रस्ता मिळाला की त्या सुसाट सुटायच्या, पण रस्ता थोडा कच्चा असला की पडल्या आजारी. मला आणि स्कॉटला त्यांचा खूप राग यायचा. 

दरम्यान आम्ही डोंबिवली ते जम्मू जायचे ठरवले. पण प्रश्न होता की आता निवड कोणाची होणार माझी की फुजीची, स्कॉटची की ट्रेकची. मात्र सरावासाठी पुन्हा एकदा अष्टविनायक यात्रा करायची ठरली. त्यावेळी मात्र माझी आणि स्कॉटची निवड झाली होती. सिद्धटेक दौंड पाटस रस्त्याला तर आमची उपयुक्तता चांगलीच सिद्ध झाली. तिथे जर त्या नाजूकसाजूक फुजी आणि ट्रेक असत्या तर नक्कीच आजारी पडल्या असत्या. त्यामुळे जम्मूला जाण्यासाठी आता आमचीच निवड होणार असे वाटत होते. आमचा सराव सुरू होताच. 

इतक्यात समजले की जम्मूला जाताना एक टेम्पोही बरोबर असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनीच जायचे ठरले. आमच्याबरोबर पुणे आणि अहमदाबाद येथूनही काही जण सामील होणार होते. अखेर जम्मू सफर सुरू करण्याचा मान मला मिळाला. सफर सुरू असताना मी आणि फुजी आलटून पालटून सहभाग घेत होतो. अमृतसर येथे पोचताना मात्र फुजीने बाजी मारली. पुढे पुन्हा माझी वर्णी लागणार होती. पण पावसाच्या माऱ्यामुळे मोहीम तिथेच आटोपती घ्यावी लागली. तिथे निसर्गावर चरफडण्यापेक्षा त्याला मान देण्याची शिकवणंही मिळाली. लांबवर दौरे आखताना पर्यावरण, स्वास्थ्य राखणे ह्यांचा प्रसार करण्याबरोबरच वेगवेगळ्या लोकांना भेटणे, त्यांच्याशी बंध निर्माण करणे, असलेले बंध दृढ करणे हेही मला जास्त महत्वाचे वाटते. महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, राजस्थान आणि पंजाबमधील लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. ह्या मोहिमेदरम्यान अनेक नवनवीन मित्र मिळाले. रस्त्यावरील चहावाल्यापासून ते जिल्ह्याच्या कमिशनरपर्यंत सगळेजण एका समान धाग्याने आमच्याशी जोडले जात होते. ही समानता, हे विश्वबंधुत्व इतर कोणते वाहन देऊ शकते.

शुक्रवार, ५ जून, २०२०

अंबरसरिया-पुणे जम्मू सायकलसफर भाग ४ लेख ९

जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार दिनांक: १५ पौष १९४१


यूरोप खंडातील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित, अशास्त्रीय आणि धेडगुजरी सौर कँलेडर म्हणजेच ग्रेगोरीयन कँलेडर नुसार दिनांक : ५ जानेवारी २०२०


पोलीस चौकीमधील कर्मचाऱ्यांनी आपुलकीने केलेला पाहुणचार स्वीकारून फुजी(श्विन), ट्रेक आणि रसिकभाई नदीवरील पुलावरून पुढे निघाले. पूल संपताच चांगलाच उतार दिसत होता. बाकीचे स्वार पुढे जाऊन एव्हाना बराच वेळ झाला होता. त्यामुळे त्या उताराचा फायदा घेत तिघेही वेग वाढवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो उतार संपताच पुन्हा एकदा फुजी, ट्रेक आणि रसिकभाईंना लगाम खेचावे लागले. कारण डाव्या बाजूला असलेल्या क्षुधाशांतिगृहात पुढे गेलेले सायकलस्वार जठराग्नीला आहुती देत बसले होते.

फुजी, ट्रेक आणि रसिकभाई तेथे पोहोचेपर्यंत पुढे गेलेल्या सायकलस्वारांचे अर्धेअधिक उदरभरण झाले होते. गरम गरम पराठा आणि चहाने सगळ्यांचा अंतरात्मा तृप्त झाला होता. बाकीचे सायकलस्वार इथे बराच वेळ थांबले असल्याने त्यांनी पुढे जायला सुरुवात केली. देवधर मात्र फुजी, ट्रेक आणि रसिकभाईंसाठी थांबले होते. पराठा आणि चहावर ताव मारून फुजी (श्विन), ट्रेक, रसिकभाई आणि देवधरही पाठोपाठच निघाले. 

सकाळपासून काही क्षण वगळता सूर्यदर्शन घडलेच नव्हते, पूर्ण मळभ होते. त्यामुळे वातावरण अगदीच निराशाजनक होते. सोधी आणि इतर फिरोजपुरकरांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळी चिन्हे दिसतंच होती. त्यामुळे अमृतसरला लवकरात लवकर पोचणे आवश्यक होते. मात्र एकंदर वातावरणामुळे सगळे सायकलस्वार निराश झाले होते. अमृतसरला लवकर पोचण्यासाठी फुजी आणि ट्रेक वेग घेण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात तेही सामान्य वेगातच जात होते. मात्र आता पुणेकरांच्या सायकलचे चाकच पुढे जायला तयार नव्हते. पुणेकरांचा उत्साह पूर्ण मावळला होता. फुजीने त्यांना पावसाच्या शक्यतेमुळे पाय चालवण्याची आठवण केली. ट्रेक आघाडीवर होती. पण पुणेकरांनी आता पूर्ण हार पत्करली होती. मागे राहिलेल्यांना सोडून पुढे जाणे फुजी(श्विन)ला पटत नव्हते. त्यामुळे फुजीने ट्रेकलाही थांबवले. सगळेचजण खोळंबून राहिले. थोडावेळ तिथे थांबून सायकलस्वार पुन्हा पाय मारू लागले, पण त्यात ना जीव  होता ना जोर. नेहमी वेगात जाणारे स्वार आता पूर्णपणे मंदावले होते.

अर्थात त्यामुळे आता अकराच्या अकरा सायकलस्वार आणि सहाय्य वाहन सगळेच एकत्र जात होते. संपूर्ण काफीला आता एक झाला होता. त्याला वेग देणे गरजेचे होते. रस्ता बऱ्यापैकी रुंद झाला होता.  पुन्हा एकदा अय्यरकाकांनी आघाडी घेतली. फुजी त्यांच्याबरोबर आघाडीवर होती. मध्ये थांबल्यामुळे आणि नंतर संथ गतीने पाय मारल्यामुळे वेळ बराच गेला होता. वातावरणातील मळभ तसेच होते. त्यामुळे आता पुणेकरांनाही पुन्हा चहा, नाश्त्याची आठवण होऊ लागली 

आठ पदरी रस्त्याला दुरदूरपर्यंत काहीही दिसत नव्हते. बराच वेळ गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला दोन क्षुधाशांतिगृह दिसत होती. फुजीने थांबा घेतला. अय्यरकाका मात्र त्यांच्याच नादात पुढे गेले. बाकी सगळे सायकलस्वार तेथे थांबून चर्चा करत होते. रस्त्यापलिकडील क्षुधाशांतिगृहात काय मिळू शकेल ह्याचा अंदाज घेणे गरजेचे होते. मध्ये असलेल्या दुभाजकामुळे सहाय्य वाहन तिथे नेता येणार नव्हते. इतक्यात सगळ्या सायकलस्वारांना पाहून समोरील क्षुधाशांतिगृहातील सेवकच हमरस्ता ओलांडून सायकलस्वारांना आमंत्रण द्यायला आला. सहाय्य वाहन आणि सायकली रस्त्याच्या डावीकडेच ठेवून त्याने चहानाश्त्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. सर्व वाहने सुरक्षित राहतील याचीही त्याने खात्री दिली. सगळेजण कंटाळले होतेच. त्यामुळे क्षणभर विचार करून सगळ्यांनी सायकली रस्त्याच्या डावीकडे ठेवून त्या क्षुधाशांतिगृहाकडे मोर्चा वळवला. एव्हाना अडीच वाजले होते.


पाचवे शीख धर्मगुरू श्री अर्जुनदेवजी ह्यांनी सोळाव्या शतकात स्थापन केलेले तरण तारण साहिब हे शहर आता जवळच होते. मात्र आम्ही त्या शहरामध्ये न जाता महामार्गावरून थेट पुढे जाणार होतो. अमृतसर अजून साधारण ३० किमी अंतरावर होते. चहा नाष्टा झाल्यावर सगळ्या सायकलस्वारांनी वेग पकडला. तास दीड तासातच सगळेजण अमृतसर शहराच्या वेशीवर पोचले.


अमृतसर शहरात प्रवेश करतानाच सगळ्यांना उत्साह वाटू लागला. सगळ्यांच्या सहमतीने आता मोहितने आघाडी घेतली. बाकी सायकलस्वार त्याच्या पाठोपाठ जात होते. पुढे जाता जाता एक उड्डाणपूल लागला. तो चढत असताना त्याचा अंदाज आला नाही. मात्र आम्ही जसजसे आम्ही पुढे जाऊ लागलो तसतसे तो उड्डाणपूल आणखीच आकर्षक वाटू लागला. दुर्दैवाने आधी अंदाज नसल्याने कॅमेरा बंद होता. पुलावरील रस्ता फार रुंद नव्हता आणि सगळे सायकलस्वार एकापाठोपाठ होते. त्यामुळे कॅमेरा सुरू करण्यासाठी क्षणभरसुद्धा थांबणे शक्य नव्हते. सगळेजण वेगात जात होते. अमृतसर येथील मॉल ते भंडारी पूल ह्यांना जोडणारा हा उड्डाणपूल तब्बल ३.७०० किमी लांबीचा होता.

उड्डाणपूल संपताच आम्ही लवकरच आमचे गंतव्यस्थान असलेल्या 'हॉटेल रोझवूड इन' या फॅब हॉटेलच्या साखळीतील हॉटेलमध्ये पोचलो. आम्ही थोडा आराम करतोय न करतोय तोच सुनील ननावरेंनी ज्याचा संदर्भ दिला होता त्या कुश पन्नूने संपर्क केला. काहीजण संध्याकाळी सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग येथे जाणार होते. पण कुशने सांगितले की तिथे पाऊस सुरु होता. मी आणि अय्यरकाका चहासाठी बाहेर पडलो तर खरोखरच पावसाला सुरुवात झाली होती. बहुधा आम्ही हॉटेलमध्ये सुखरूप पोचण्याचीच तो वाट पाहत होता. थोड्याच वेळात कुश आणि अमृतसर बायसायकलिंग क्लबमधील इतर सदस्य आमचे स्वागत करायला हॉटेलमध्ये पोचले.








आम्ही सगळेजण हॉटेलच्या प्रवेशद्वारातील दालनातच उभे होतो. हॉटेलमधील स्वागतकक्षातील कर्मचारीही आमच्याकडे कौतुकाने आणि कुतूहलाने पाहत होते. मिठाई आणि गप्पांनी चांगलीच रंगत आणली होती. पावसाने आज आमच्यासाठी कळ काढली त्यामुळे आम्ही समाधानी होतो. आम्ही थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तयारी करून आलो होतो. मात्र पावसाची अपेक्षाच आम्ही केली नव्हती. आता पुढील प्रवास वरुणराजावरच अवलंबून होता.

हरिके पट्टण.. हरी के पट्टण -पुणे जम्मू सायकलसफर भाग ४ लेख ८

जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार दिनांक: १५ पौष १९४१


यूरोप खंडातील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित, अशास्त्रीय आणि धेडगुजरी सौर कँलेडर म्हणजेच ग्रेगोरीयन कँलेडर नुसार दिनांक : ५ जानेवारी २०२० 





सोधी, गुरुमुखसिंग आणि हरबीर ह्यांचा निरोप घेऊन आम्ही डावीकडे ९० अंशात वळून अमृतसरकडे जाणाऱ्या महामार्गाला लागलो. तेव्हा डोळ्यासमोर प्रशस्त रस्ता दिसत असला तरी चाकांची गती अडखळली होती, कारण आमचे सुहृद मागे राहिले होते.

अमृतसर ५०-६० किमी दूर होते. आज दुपारी ३-३.३० ला पावसाची शक्यता असल्याने त्याआधी अमृतसरला हॉटेलवर पोचणे गरजेचे होते. थोडा सूर्यप्रकाश आला असल्याने आणि सहा- आठ पदरी रस्ता दिसल्याने उत्साह वाटू लागला.. अर्थातच हळूहळू वेग वाढू लागला. फुजी आणि तिच्या मैत्रिणी महामार्गाचा आनंद घेत असताना पुन्हा मळभ दाटून आले. थोड्या वेळात आम्ही माखू गावाजवळ पोचलो. माखू गाव तसे लहानसेच.. जेमतेम १२-१५ हजार वस्तीचे. येथून हरीके पक्षी अभयारण्य जवळच होते. सतलज आणि बिआस नदीचा संगम येथून अवघा ५ किमी दूर होता. रस्ता पुन्हा अरुंद झाला होता. ट्रेकचा वेग अचानक मंदावला. त्यामुळे श्विननेही थांबा घेतला. दरम्यान ट्रेक आणि रसिकभाई वगळता इतर सर्व सायकलस्वार पुढे निघून गेले. उजवीकडे लांबवर हरिके येथील पाणथळ जागा दिसू लागली होती. ह्याला 'हरी के पट्टण' असेही म्हणतात. उत्तर भारतातील ही सर्वात मोठी पाणथळ जागा आहे. याच्याच खोलवर जागेत हरिके तलाव आहे.

जेमतेम १०००० च्या आतबाहेर लोकसंख्या असलेले हरिके गाव तरण तारण साहिब आणि फिरोजपुर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या ६ वर्षात हरिके गावाच्या दक्षिणेस सतलज आणि बिआस नदीच्या संगमाजवळ पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने बांधकाम करून पाणथळ जागा आणि तलाव निर्माण केला होता. हरिके येथील ही मानवनिर्मित नदी वा सरोवर ह्या दोन जिल्ह्यांसह कपूरथला ह्या जिल्ह्यातही पसरली आहे

ह्या पाणथळ जागेमुळे नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा तसेच जगातील नामशेष होऊ घातलेल्या स्थलांतरित पाणपक्ष्यांसह इतर पक्षी ह्यांचे संवर्धन होत आहे. येथील जैवविविधतेमुळेच भारतीय राष्ट्रीय वर्ष १९१२ (ग्रेगोरीयन वर्ष १९९०) मध्ये रामसार कन्व्हेंशन (Ramsar Convention on Wetlands of International Importance especially as Waterfowl Habitat) या आंतरराष्ट्रीय परिषदेने या जागेला एकमताने अधिकृत मान्यता दिली. वेगवेगळे पक्षी, कासव, साप, उभयचर, मासे, अपृष्ठवंशी ह्यांनी हे अभयारण्य समृद्ध आणि संपन्न आहे. वाढीव क्षेत्र धरून येथील ८६०० हेक्टर क्षेत्रास हरिके पट्टण पक्षी अभियारण्य घोषित करण्यात आले आहे. येथे हिवाळ्यात पक्ष्यांच्या २०० हुन जास्त प्रजाती भेट देतात. तसेच १९३० नंतर भारतात न दिसलेल्या इंडस डॉल्फिननेही ह्या अभयारण्यातील बियास नदीपात्रात १२ वर्षांपूर्वी दर्शन दिले होते. नामशेष होण्याच्या मार्गावरील कासवं, सुसर आणि पाणमांजरीही येथील पाणथळ जागेत सापडले आहेत.

फुजी आणि ट्रेक सतलज नदीवरील पुलापाशी पोहोचले. मागे वळून पाहिले तर रसिकभाई दिसत नव्हते. ट्रेकलाही थोडी विश्रांती हवी होती. त्यामुळे दोघांनी तिथे थांबायचे ठरवले. बाजूलाच एक पोलीस चौकी दिसत होती. चौकी म्हणजे जेमतेम २०-२५ चौरस फूट आकाराचे दगडविटांचे बांधकाम होते. तिथे असलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकजण लगेचच फुजी आणि ट्रेककडे आला. पुणे जम्मू सायकलसफरीबद्दल ऐकताच तो स्तिमित झाला. लगेचच त्याने प्यायला गरम पाणी हवे आहे का म्हणून विचारणा केली. थंडी वाजत होतीच. रसिकभाई यायला अजून वेळ होता. तेवढ्यात पाणी गरम करून मिळेल म्हणून फुज आणि ट्रेकने त्यांना गरम पाणी द्यायला सांगितले. इतक्यात ते दोन्ही कर्मचारी चौकीबाहेर येऊन फुजी आणि ट्रेकला चहा घेण्याचाही आग्रह करू लागले. चहाचा मोह फुजी (श्विन)ला कधीच आवरत नाही. तरी थोड्याश्या संकोचाने फुजीने नकार दिला. मात्र ते दोन्ही कर्मचारी अगदी आग्रहाने पुन्हा विचारायला लागले. तेव्हा मात्र फुजी आणि ट्रेकने चहा चालेल म्हणून सांगितले. त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी फुजी आणि ट्रेकला बसायचा आग्रह केला. चौकीमध्ये एक छोटा ओटा होता. त्यावर असलेल्या शेगडीवर प्यायला गरम पाणी करून त्या कर्मचाऱ्यांनी फुजी आणि ट्रेकला दिले. इतक्यात रसिकभाईही तेथे पोहोचले. त्यांनीही गरम पाण्याने घसा ओला केला. पाठोपाठ आलेल्या चहाने फुजी (श्विन), ट्रेक आणि रसिकभाई ह्यांना चांगलीच तरतरी आली. तिघेही आता पुढील टप्पा पार करण्यासाठी सज्ज झाले होते.




सोमवार, १ जून, २०२०

Cycle 2work



'तू सायकलने ऑफिसला का येतोस?' Cycle2work करणाऱ्या प्रत्येकालाच हा प्रश्न कधी न कधी विचारला गेला असतो. गम्मत म्हणजे ज्यांनी सायकल कधी चालवलेलीही नाही असे लोक तर ह्यात असतातच, पण रोज नियमाने व्यायाम म्हणून सायकल चालवणारेही असतात.

हा प्रश्न विचारणाऱ्याच्या आश्चर्याचेच मला आश्चर्य वाटते. अर्थात ह्यात त्यांचे काही चुकत नसते, कारण त्यांची अवस्था ही तळ्यातल्या बेडकांप्रमाणे असते. तळ्याबाहेरचे जग त्यांनी पहिलेलेच नसते.

काही शंका..नव्हे ठाम मत ह्यांनी बनवलेले असते...
सायकलने ऑफिसला येताना दमायला होत असणार, प्रचंड घाम येत असणार, दिवसभर थकवा जाणवणार, कामात उत्साह राहणार नाही,.....

सायकलने ऑफिसला जायचं तर ऑफिसमध्ये शॉवर, बाथरूम तरी हवं...

एक नव्हे शंभर ठाम 'मतं'!

व्यायाम (Excercise) आणि श्रम (exsertion) यातील फरक लक्षात न येणाऱ्यांना असे प्रश्न पडत असतात. Excercise केल्यावर आपल्याला उत्साह येतो, थकवा जाणवत नाही, मात्र exsertion मूळे थकवा जाणवतो, उत्साह कमी होतो. सायकळवणे (सायकल चालवणे) हा व्यायामाचा (excerscise)  प्रकार आहे (exsertion) श्रमाचा नव्हे. मात्र लोकलने, बसने प्रवास करताना व्यायाम नव्हे तर श्रम होत असतात. मग दमायला सायकलने होईल का इतर पर्यायी वाहनाने?


सायकलने ऑफिसला जाताना आपल्याला जे स्वातंत्र्य अनुभवायला मिळते, ते इतर वाहनांनी मिळणे अशक्यच! सगळ्यात पहिले स्वातंत्र्य म्हणजे मानगुटीवरचे घड्याळ खाली उतरवता येते. सायकल2वर्क नसेल तर पहाटे ५.३०-६ ला उठून दीड तास सायकलिंग किंवा इतर व्यायाम करा, घाईघाईने आवरा, नाष्टा कोम्बा आणि पैसे देऊन लोकांच्या शिव्या, धक्के खात आणि इतरांचे घाम आपल्या अंगाला फासून लोकलने जा. सायकलवरून ऑफिसला जाताना जेवढा घाम येतो, तेवढा घाम तर लोकलची वाट पाहत रेल स्टेशनवरच येतो.
 परत नंतर रिक्षावाल्यांची मग्रुरी, रिक्षाला पैसे म्हणजे काळ्या पैशाला मदत (इन्कम टॅक्स भरणारा रिक्षावाला मला तरी भेटला नाही), शिवाय लोकलमुळे ऑफिसला उशीर ठरलेलाच! म्हणजे सगळे काही घडाळ्याच्या काट्यावर पण करा आणि तरीही मनस्ताप पदरी पडून घ्या.

शिवाय व्यायामासाठी वेगळा वेळ द्यावा लागत असूनही घर ते ऑफिस असा प्रवासाचा एकूण वेळ मोजला तर तोही जवळपास cycle2work करताना लागतो तेवढाच!

त्यापेक्षा cycle2work असेल तर आरामात ७ ला उठा, ऑफिसमध्ये सगळ्यांच्या आधी पोचून घास ३२ वेळा चावून नाष्टा करा. व्यायामासाठी वेगळा वेळ द्यायला नको. ऑफिसला जायच्या वेळातच व्यायामपण. वाटेत फोटोग्राफी करता येते. मी तर एका छोट्या तळ्याकाठी थांबून, फुलपाखरे, पक्षी, झाडे, फुले बघत पण थांबतो. झाडांच्या विविध छटा बघतो... अक्षरशः रोज पिकनिक. म्हणजे सायकल2वर्क करताना आपले घड्याळ आपणच ठरवू शकतो. इथे त्या निर्जीव वस्तूची गुलामी करावी लागत नाही.


इतरांपेक्षा उशिरा उठुनही व्यायामासाठी वेगळा वेळ द्यावा न लागल्याने आपण ऑफिसच्या वेळेच्या एक-दीड तास लवकर पोहोचू शकतो. सकाळी ९ पर्यंत ऑफिसला पोचलो तर घामही फार येत नाही. ऑफिसमध्ये काही शॉवर किंवा बाथरूम नसले तरी टॉयलेट तर असते. इतर लोक ऑफिसला यायच्या आधीच आपण टॉयलेटमध्येही कपडे बदलू शकतो. बेसिनचे पाणी तोंडावर मारून साबणाने तोंड आणि हात धुता येतात. तसेच त्यानंतर ऑफिसमध्ये नाष्टा करून सगळे यायच्या पाऊण एक तासभर आधी कामाला सुरुवात. त्यामुळे इतरांपेक्षा दिवसभर सगळ्यांपेक्षा फ्रेशही राहता येते. शिवाय संध्याकाळी आपण एकटेच डॉट वेळेवर निघु शकतो. त्यामुळे घरी जातानाही फ्रेश. बाकीचे सहकारी लोकलमधून येताना स्वतःबरोबर इतरांचाही घाम अंगाला लावून येतात आणि दिवसभर तसेच त्या घामेजल्या कपड्यात बसतात, शिवाय संध्याकाळी आपण वेळेवर गेल्यावर त्यांची चिडचिड होते ती वेगळीच. त्यामुळे घरी जातानाही ते वैतागलेलेच!


इतर काही सुचले नाही तर ह्या चिंताक्रांत जंतूना शंका असते ऋतूंची- उन्हाळ्यात ह्यांना उन्हाची चिंता, पावसाळ्यात पावसाची तर हिवाळ्यात थंडीची! नशीब अजून चौथा ऋतू नाही.
खरतर तिन्ही ऋतूंमध्ये cycle2work ची वेगळीच मजा असते. उन्हाळ्यात मोठ्ठा दिवस- त्यामुळे लवकर ऑफिसला पोचायचे आणि संध्याकाळी आरामात परत निघायचे, वाटेत हवा तेवढा वेळ थांबायचे- फोटो काढायचे.
पावसाळा तर आणखीच चांगला. वेग थोडा मंदावतो खरे. पण आपण दमल्यावर काय करतो- तोंडावर पाणी मारतो. इथे तर निसर्गच हे काम स्वतःहून आपल्यासाठी करत असतो. श्रावण महिन्यातील निसर्गाची उधळण पाहण्याची संधी आणि वेळ cycle2work करताना रोजच मिळते.
हिवाळ्याच्या दिवसात सायकलिंगची मजा तर काही औरच! अनेक परदेशी पक्षी ह्या दरम्यान आपल्याकडे येतात. त्यांना न्याहाळत, कॅमेराबद्ध करत जाण्यासाठी इतर कोणते वाहन सोयीस्कर आहे.

थोडक्यात लोक वर्षातून, महिन्यातून किंवा फारतर आठवड्यातून एकदा पिकनिकला जातात. पण cycle2work  करताना आपण रोजच पिकनिक करत असतो.


काळा घोड्यावरून चाललेला पाववाला असो की BKC तील वातानुकूलित केबिनमध्ये बसणारा उच्चशिक्षित असो.... cycle2work करताना सगळ्यांनाच समान वागणूक मिळते. इथे फर्स्ट क्लास-सेकंड क्लास, लेडीज डबा- जेन्ट्स डबा असले भेदभाव नाही. कोणी बसायचं, कोणी उभं राहून प्रवास करायचा, कोणी खिडकीत बसायचं ह्याची मारामारी नाही. धक्काबुक्की नाही नी कोणाचे शिव्याशाप नाही. सगळ्यांना बसायची, वारा अंगावर घ्यायची समान संधी. Cycle2work करतानाची समानता रेल्वे, बस मध्ये कशी मिळणार?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे रस्त्यात भेटणारी माणसे.   रस्त्यावरील मजुरापासून आलिशान चारचाकीतील माणूस ह्या सगळ्यांनाच आपल्याबद्दल उत्सुकता असते. सारख्याच आपलेपणाने ते आपल्याशी वागतात, आपल्याशी बोलायला संधी शोधत असतात. हे विश्वबंधुत्व ऑफिसला सायकलने जातानाच मिळू शकते.

म्हणून तर मी नेहमी म्हणतो स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व देणारे सायकल हे एकमेव वाहन आहे.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...