मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

भारतीय राष्ट्रीय कँलेडर v/s हिंदू कँलेडर

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेसंबंधी सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे ही दिनदर्शिका म्हणजे हिंदू दिनदर्शिका आहे समजणे.

ह्या गैरसमजामूळे ही दिनदर्शिका जाणून घेण्याचा प्रयत्न न करताच काहीजण ह्याचा अभिमान बाळगतात तर उरलेले कालबाह्य म्हणून टीका करतात.

वास्तविक हिंदू कालगणनेतील महिन्यांची नावे आणि शालिवाहन शकातील वर्षाचा क्रमांक राष्ट्रीय कालगणनेमध्ये स्विकारला आहे याव्यतिरिक्त दोहोंमध्ये काहीही साम्य नाही.



काय आहे भारतीय राष्ट्रीय कालगणना आणि हिंदू कालगणना यातील फरक?

१) कालगणनेची सुरुवात:
हिंदू कालगणना प्राचीन आहे.
हिंदू कालगणनेनुसार हे ५१२२ वे वर्ष सुरू आहे. त्याखेरीज अनेक हिंदू राजांनी त्यांच्या राजवटीत नवीन हिंदू कालगणना सुरू केल्या आहेत.
शालिवाहन शकचे हे १९४२ वे वर्ष तर विक्रम संवत्सरचे हे २०७६ वर्ष आहे.
अगदी अलीकडे सुरु झालेली हिंदू कालगणना म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरु केलेली हिंदू कालगणना.


भारतीय राष्ट्रीय कालगणना ही अद्ययावत (Latest/ Modern) असून  भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरु करण्यात आली.
संपूर्ण भारतात एक सामायिक कालगणना असावी जी उपयोगात आणण्यास सोपी आणि दोषमुक्त असेल ह्या विचाराने डॉ मेघनाद साहा ह्या खगोलभौतिकी शास्त्रज्ञ असलेल्या खासदाराच्या अध्यक्षतेखाली कँलेडर रिफॉर्म कमिटी स्थापन करण्यात आली. त्या समितीने विविध कँलेडरचा अभ्यास करुन खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रोक्त (Scientific) कँलेडर बनवले. तीच आपली राष्ट्रीय कालगणना.

२) आधार:

आपल्याला ज्ञात शालिवाहन शक असो वा विक्रम संवत्सर ..ही हिंदू कालगणना प्रामुख्याने चंद्राच्या स्थितीवर (तिथींवर) अवलंबून आहे.

मात्र भारतीय राष्ट्रीय कालगणना सुर्याच्या स्थितीवर (तारखेनुसार) अवलंबून आहे.

३) दिवस (दिनविशेष):
हिंदू कालगणना चंद्राच्या स्थितीवर म्हणजे कलेप्रमाणे असल्याने दिनविशेष अथवा दिवस तिथीने दर्शविला जातो. प्रत्यक्ष तिथी दिवसभरात केव्हाही संपली तरी सुर्योदयाला जी तिथी असेल ती त्या दिवसभर धरली जाते. नवीन दिवस सुर्योदयाला सुरु होतो. एखादी तिथी सूर्योदयानंतर सुरु होऊन पुढिल दिवशीच्या सुर्योदयापुर्वी संपली तर ती तिथी दोन्हिपैकी कोणत्याही दिवशी धरली न जाता तिचा क्षय झाला असे समजतात. तर एखादी तिथी पहिल्या दिवशी सुर्योदयापुर्वी सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर संपली तर दोन्ही दिवशीचा दिनविशेष तीच तिथी असल्याचे मानले जाते.


भारतीय राष्ट्रीय कँलेडर सौर (सुर्यावर) अवलंबून असल्याने दिनविशेष तारखेने दर्शविला जातो. मात्र दिवस सुर्योदयाप्रमाणे सुरु न होता रात्री १२ ह्या काल्पनिक वेळेला सुरु होतो.

४) महिनाः
हिंदू कँलेडर (कालगणना) मधील महिन्याचे दोन भाग आहेत. आमावस्येनंतरच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल (शुध्द) पक्ष, तर पौर्णिमेनंतर च्या प्रतिपदेपासून आमावस्येपर्यंत वद्य (क्रूष्ण) पक्ष. दोन्ही पक्ष मिळून एकंदर ३० तिथी होतात. ह्या ३० तिथींचा एक महिना धरला जातो.

भारतीय राष्ट्रीय कँलेडर मध्ये तिथींचा संबंध नसुन ३० किंवा ३१ दिवसांचा एक महिना असतो.

५) वर्ष:
हिंदू कँलेडरमध्ये १२ महिन्यातील ३६० तिथी मिळून एक वर्ष पुर्ण होते. ज्याचा कालावधी साधारण ३५४ दिवसांचा असतो.

भारतीय राष्ट्रीय कँलेडरमध्ये ३१ दिवसांचे ५ सलग महिने आणि ३० दिवसांचे ७ महीने असे एकंदर ३६५ दिवसांचे एक वर्ष असते.

६) वर्षारंभ:
हिंदु कालगणनेनुसार ज्या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असते त्या महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस वर्षारंभाचा दिवस समजला जातो... ज्याला गुढीपाडवा असे म्हणतात.

भारतीय राष्ट्रीय कँलेडरचा वर्षारंभ हा त्या दिवशी असतो सामान्यतः ज्या दिवशी सुर्य विषुववृत्त ओलांडून ऊत्तर गोलार्धात प्रवेश करत असतो...अर्थातच ह्या दिवशी दिवस रात्र समसमान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. ह्या दिवसानंतर सहा महिने ऊत्तर गोलार्धातील दिवस रात्री पेक्षा मोठा असतो.

७) मेळ:
हिंदू कालगणना हि चंद्राच्या स्थितीवर (कलेनुसार) अवलंबून असली तरी ह्या मध्ये सुर्याच्या स्थितीचाही विचार केला आहे. सुर्य आणि चंद्र यांच्या अवकाशातील नक्षत्र व रास ह्यांंच्या स्थितीचा खगोलशास्त्रावर आधारीत विचार करून हिंदू कँलेडर मध्ये शास्त्रोक्त पध्दतीने अधिक महीना धरला जाऊन चांंद्रवर्ष आणि सौरवर्षाचा मेळ घातला जातो.

भारतीय कँलेडर मध्ये चंद्राच्या स्थितीला महत्व दिले जात नाही. मात्र दर ४ वर्षांनी सुर्याच्या स्थितीमध् पडणाऱ्या अंतराचा मेळ घालण्यासाठी एक अधिक दिवस मिळवला जातो. त्यामुळे हे वर्ष ३६६ दिवसांचे असते ज्यामध्ये पहिले सलग ६ महिने ३१ दिवसांचे तर शेवटचे सलग ६ महिने ३० दिवसांचे असतात. ह्या वर्षाला लिपवर्षं असे म्हटले जाते.

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

नंदनवनः पुणे जम्मू सायकल सफर भाग ३ लेख ५

भारतीय राष्ट्रीय दिनांक १० पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक ३१ डिसेंम्बर २०१९

आजचा दिवस श्विनसाठी खुपच महत्वाचा होता. कारण एक- दोन नव्हे तर श्विनच्या तब्बल सहा मित्रांचा आज सौर कालगणनेनुसार वाढदिवस होता. आणि तोही सगळ्या सहा जणांचा ५० वा वाढदिवस होता. मात्र आज श्विन ह्या सगळ्यांपासून हजार किमी दुर होता. श्विनला जाग आली ती ह्या सहाही मित्रांच्या आठवणीबरोबरच!

थंडी चांगलीच जाणवत होती. मात्र राजस्थानमध्ये भेटलेल्या मित्रांनी त्या थंडीपासून संरक्षण करण्याचा उपाय सांगितला होता. आधीच कळल्याप्रमाणे एकदोन जाड कपडे घालण्याऐवजी थोडे पातळ का असेना पण कपड्यांचे जास्त थर घालत होतो. त्यात नवीन माहिती मिळाली की कपड्यांच्या दोन थरांमध्ये कागद ठेवायचा. कपड्यांतून थंडी आत सरकते, मात्र कागदातून तेवढ्या प्रमाणात थंडी आत सरकत नाही. ही अनमोल माहिती कळल्यामुळे कपड्यांचे थर चढवत असता दोन थरांमध्ये वर्तमानपत्राचे कागदही संरक्षक कवच म्हणून आम्ही चढवत होतो. हॉटेलमध्ये चहा मिळणार नसल्याने आम्ही हॉटेल सोडून रस्त्यावर आलो खरे, पण लगेचच थंडी आमचा ताबा घेऊ लागली. आमचे हॉटेल मेडता रोडचा फलाट संपल्यावर लोहमार्गाला समांतर थोड्याच अंतरावर होते. आम्ही सायकलवायला सुरुवात करण्याअगोदरच आमचे लक्ष लोहमार्गापलिकडे असलेल्या उजेडाकडे गेले. लांंबुन तो नक्की कसला उजेड आहे ते कळत नव्हते. आमचा मुक्काम महामार्गानजीक नसल्याने पुढील रस्त्याची एकदा खात्रीही करायची होती.

पहाटेच्या अंधारात त्या लांबवर दिसणाऱ्या उजेडाकडे गेलो. ओहोहो, ते तर चहाकेन्द्र होते. तेथे शेकोटीही होती. चहाएवढीच त्या शेकोटीचीही गरज वाटत होती.



शेकोटीवर हात शेकल्यावर हाताला बोटं असल्याची जाणीव व्हायला लागली. चहा पिता पिता तेथील लोकांना आजचा रस्ता विचारून घेतला. त्यांनी लोहमार्गाला लागून असलेला एक रस्ता सांगितला. तो मेडता रोड स्थानकाला लागून जात होता. आम्हाला माहीत असलेल्या रस्त्यापेक्षा हा रस्ता अरुंद असला तरी जवळपास २० किमी अंतर वाचवणारा आहे, असे तेथील लोकांनी सांगितले. आम्ही २० किमी वाचवण्यासाठी अरुंद रस्त्याने जाणे स्विकारले.

मेडता रोड स्थानक मागे पडल्यावर एक डावे वळण घेत आम्ही लोहमार्ग ओलांडला. पूढील रस्ता अरुंद असला तरी सुंदर होता. आजुबाजुला हिरवळ चादर पसरली होती.


भास्कर क्षितीजावर येत होता. वातावरणातील गारवा सुखद वाटू लागला होता. श्विन(फुजी)ने आघाडी घेतली होती. ट्रेक, रसिकभाई, मोहित पाठोपाठच होते. १०-१५ फुट मागोमाग इतर सायकलस्वार होते. आम्ही जारोडाकडे जात होतो. रस्ता मोकळा असल्याने वेग वाढत होता. इतक्यात रस्त्याच्या डावीकडून रस्ता ओलांडत हरणांचे एक पथक दौडत गेले. त्यांची ती डौलदार धाव पाहताच आम्ही मंत्रमुग्ध झालो. दिवसाची सुरुवात तर मस्तच झाली होती.

जारोडाहून आम्ही बुटाटीच्या दिशेने जाऊ लागलो. आता कच्चा रस्ता लागला होता. आमचा वेग मंदावला होता. आणि अचानक तो शुन्यवतच झाला. निसर्ग आमच्यावर चांगलाच प्रसन्न झाला होता. त्या सोनेरी वातावरणात डावीकडे मोरांचा थवाच विहार करत होता. तर रस्त्याच्या डावीकडे एक झाड पोपटांच्या थव्याने अक्षरशः लगडलेले होते.








पक्ष्यांचा राजा शांतपणे विहरत असताना पोपटांचा कल्लोळ मात्र अविरतपणे सुरु होता. काय संभाषण करत होते कोण जाणे! कदाचित मोरांचा रूबाब त्यांना सहन होत नसावा. किंवा आमचे लक्ष मोरांवरून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न ते करत असावेत. त्या मोहक वातावरणातून पुढे जायला मन तयार होत नव्हते. थोड्या नाखुषीनेच आम्ही पुढे जाऊ लागलो.

बूटाटी जवळ आल्याची जाणीव होताच आम्ही चहाकेंद्राची चौकशी करू लागलो. स्टेशनजवळ चहाकेंद्र असल्याचे समजले. आम्ही स्टेशनची चौकशी करत जात असताना एका हमरस्त्याला लागलो. तिथे समोरच चहा केंद्र दिसले. तिथे स्टेशनची चौकशी केली तर तेथील लोक सांगु लागले की तेच स्टेशन होते. आम्ही गोंधळात पडलो. आम्हाला स्टेशनचे कोणतेच चिन्ह दिसत नव्हते. ना फलाट ना लोहमार्ग.. ...

थोड्या वेळात उलगडा झाला तिथे रेलस्टेशन नव्हे, बसस्टेशन होते. हमरस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बस थांबत होत्या. आम्ही चहा बरोबर नाश्ताही करुन घेतला.




तो हमरस्ता बूटाटीहुन नागौरकडे जाणारा होता. चहा, नाश्ता झाल्यावर सायकलस्वारांनी नागौरची दिशा धरली. थोडे अंतर गेल्यावर ऊजवे वळण घ्यायचे होते. फुजी(श्विन), देवधर, मोहित आणि अय्यर ह्यांनी आघाडी घेतली. बाकी सायकलस्वार थोडे मागे राहिले होते. एवढ्यात ऊजवीकडे जाणारा एक अरूंद रस्ता दिसला. फुजी(श्विन) हेच वळण घ्यायचे आहे का, याची गुगलकाकांंकडे चौकशी करत असताना अय्यर, मोहित आणि देवधर पुढे जाऊ लागले. श्विनने त्यांना थांबायला सांगितले. अय्यर आणि मोहित एव्हाना थोडे पुढे गेले असल्याने त्यांंना ते ऐकू आले नाही. सरळ जाणारा रस्ता नागौरकडे जाणारा महामार्ग असल्याने प्रशस्त होता, तर उजवीकडे वळणारा रस्ता अरुंद होता. देवधर श्विनच्या हाकेकडे दुर्लक्ष करत सरळ निघुन गेले. गुगलकाका मात्र ऊजवे वळण घ्यायला सांगत होते. अखेरीस मागे राहीलेल्या सायकलपटूंची वाट पहात फुजी(श्विन)ने तेथेच थांबायचा निर्णय घेतला.

महामार्गाच्या हव्यासापोटी नागौरमार्गे तब्बल ५०-६० किमी अंतर वाढणार होते. मागील सायकलपटू लगेचच आले. त्यांच्याबरोबर गौतमचा टेम्पोही होता. लगेचच गौतमला चुकीच्या दिशेने दौडत निघालेल्या तिघांना परत आणण्यासाठी पाठवले. सगळे परत आल्यावर आम्ही महामार्ग सोडून उजवे वळण घेतले. एव्हाना सगळ्या गोंधळात अर्धा तास तरी निघून गेला होता. मग मात्र आम्ही ते ऊजवे वळण घेत कुचेरा (कुचखेडा)मार्गे कसनाऊ-देहरी-तरनू कडे वळलो. छोट्या गावातून जाणारा रस्ता अरुंद असणे स्वाभाविक असले तरी आता आम्हाला त्याची सवय झाली होती. खरतरं रस्ता खेड्यातील गल्लीएवढा अरूंद झाला होता. मध्यान्हं झाली होती. आम्ही एका छोट्या गावात शिरलो. तिथे चहाची चौकशी करताना मोठ्या मुश्किलीने एक चहा केंद्र सापडले. फुजी(श्विन), ट्रेक, नयना आघारकर चहा घेत असताना आसाभाईंनी रस्त्यात बैठक मारून मेळावा भरवला होता. तेथील कोपऱ्यावर एक कळकट, अंधारे दुकान होते. कसं कोण जाणे सायकलस्वारांना ते मिठाईचे दुकान असल्याचा शोध लागला. दुकानदाराने अस्सल खव्यापासून बनवलेला एक पदार्थ खायला दिला. ओहोहो, गरम गरम बनवलेला तो पदार्थ खाताच सगळ्यांच्याच जीभेला पाणी सुटले. हा, हा म्हणता दुकानातील माल संपला. गाव छोटे असल्याने त्या गावाच्या मानाने खरेदीसाठी कदाचित तो पुरेसा असला तरी त्याचा चट्टामट्टा झाला होता. तेथील लोक त्याला रबडी म्हणत होते. (मात्र आपल्याकडे मिळणारी रबडी ही नव्हे). आम्ही फर्माईश करताच दुकानदाराने पुन्हा एकदा खव्याची ती गरमागरम पाककृती आम्हाला सादर केली.



तेथून निघालो तेव्हा गावकरी आमच्याभोवती कोंडाळे करून ऊभे राहिले होते. त्यांना आम्ही कोणीतरी परग्रहवासीच वाटत होतो. त्या कोंडाळ्यातुन सुटका करत आम्ही पुढील मार्गाला लागलो. वाटेत वन्य पशु पक्षी दर्शन देत होते.



तरनू गाव पार करुन आम्ही नागौर- डीडवाना हमरस्त्याला लागलो. Butterflies in stomach म्हणा की पेटमे चूहे म्हणा की पोटातले कावळे म्हणा ... सगळेच दंगा करु लागले होते. त्यामुळे हमरस्त्याला लागताच एक धाबा पाहून तिथे जठराग्नीला आहुती दिली. ती फुलपाखरे, उंदीर आणि कावळे शांत झाल्यावर आम्ही पुन्हा कुच केले. एव्हाना २.३० वाजले होते आणि आजचे ५५ किमी अंतर बाकी होते. मात्र आता पुढील संपूर्ण मार्ग हा प्रशस्त हमरस्त्याचा होता.

हा हमरस्ता असला तरी गावे एकमेकांपासून दूरदूर आणि छोटी, कमी लोकवस्तीची होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वन्य प्राणी- पक्षी दिसत होते. मोकळ्या हमरस्त्यावरून वेगाने रस्ता ओलांडणाऱ्या निलगायी पाहताना रोमांच ऊभे राहात होते. मोर तर अगदी मुबलक प्रमाणात दिसत होते. एका गोष्टीचे मात्र वाईट वाटत होते की मोर वगळता इतर कोणालाही छायाचित्रबध्द मात्र करता येत नव्हते.

वाटेत पुन्हा दोन वेळा चहा पान करत आम्ही डीडवानाकडे दौडत असताना एका गावाच्या नावाची पाटी पाहून आमचे चांगलेच मनोरंजन झाले.



डीडवाना येथे गंतव्यस्थानी पोहोचेपर्यंत भास्कराचार्य आजचा कारभार आवरता घेऊ लागले होते. अस्मादिकांना आज फुजी साथ करत असली तरी शैलेशभाईंंनी आज टेम्पोमध्ये कमी वेळ घालवून श्विनवरच बऱ्यापैकी वेळ घालवला होता. त्यामुळे फुजी आणि श्विन दोघेही एकसमयावच्छेदे दौड करत असल्याचा दुर्मिळ योग आज आला होता.

डावीकडे मोहित, ऊजविकडे रसिकभाई आणि मधोमध श्विनसह शैलेशभाई


रात्री हॉटेलमधील जेवण यथातथाच होते. मात्र दिवसभरात घडलेल्या राजस्थानमधील ग्रामीण आणि वन्यसफारीने मात्र मन तृप्त झाले होते. आजची सायकलसफर म्हणजे एखाद्या नंदनवनातीलच सफर वाटत होती.

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

पाहुणचार: पुणे जम्मू सायकलसफरः भाग ३ लेख ४

भारतीय राष्ट्रीय दिनांक ९ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक ३० डिसेंम्बर २०१९

(सुर्य उत्तर गोलार्धात अधिक दिवस असतो. त्या वेळी भारतीय राष्ट्रीय कँलेंडरचे पहिले ६ महिने सुरु असतात. त्यामुळे राष्ट्रीय कँलेंडरच्या पहिल्या ६ महिन्यात जास्त दिवस असतात. दुसरा महिना ते सहावा महिना या सलग ५ महिन्यात प्रत्येकी ३१ दिवस असतात, तर शेवटच्या ६ सलग महिन्यात प्रत्येकी ३० दिवस असतात. पहिल्या महिन्यात सामान्यतः ३० दिवस असतात. हे सौर कँलेंडर असल्याने चौथ्या वर्षी एक अधिक दिवस असतो. गणिताच्या नियमानुसार राहिलेला हातचा पुढील पायरीत लगेच मिळवतात. त्याप्रमाणे दर चौथ्या वर्षी म्हणजे लिप वर्षी तो अधिक दिवस पहिल्या महिन्यात वाढवला जाऊन लिप वर्षी पहिले सलग ६ महिने ३१ दिवसांचे तर शेवटचे सलग ६ महिने ३० दिवसांचे असतात.

ग्रेगोरीयन कँलेंडरमध्ये मात्र कसलेही नियम न लावता, मन मानेल तसे कितीही दिवस कोणत्याही महिन्यात घुसवले आहेत. ज्यूलियस आणि आँगस्टस ह्या सरदारांना वाटले म्हणून त्यांंच्या नावाच्या महिन्यात १ दिवस वाढवुन ते ३१ दिवसांचे केले, आणि त्यासाठी फेब्रुवारीचे २ दिवस कापून त्याला लंगडा केला. लिप वर्षी सुध्दा अधिक दिवस पहिल्या नव्हे तर दुसऱ्या महिन्यात वाढवला आहे.)

श्विनचा मुक्काम आता घरापासून जवळपास १००० किमी अंतरावर होता. गेेले काही दिवस थंडीही वाढत होती. काल जेवायलाही थोडे लांंब जावे लागले होते. पोट तर अधूनमधून तक्रार करत होतेच. सगळ्याचा परीणाम होत रात्री कणकण जाणवू लागली होती. पहाटे पहाटे झोपेमध्ये अचानक एक स्वप्न पडले. माझा मुलगा -राजस स्वप्नात आला.. उठलो तेव्हा स्वप्न नीटसे आठवत नव्हते. मात्र आज माझ्या वडिलांची पुण्यतारीख होती. २३ सौरवर्ष आज पुर्ण होत होती. मी हे विसरलो नव्हतोच. पण ते स्वप्न यासाठीच तर पडले नव्हते ना!

आम्ही सकाळी ६.३० ला हॉटेल सोडले. थंडी चांगलीच जाणवत होती. कणकण असल्याने तापाची गोळी घेतली. मात्र श्विनबरोबर टेम्पोचा पर्याय निवडला. थंडीच्या जोडीला दाट धुकेही होते. सुदैवाने अक्षरशः अर्धा एक किमी अंतरावरच चहाकेंद्र सापडले. त्यामुळे लगेचच थांबा घेतला गेला. चहाबरोबर शेगडीची उब मिळाल्याने बरे वाटू लागले होते. त्यामुळे चहा घेतल्यानंतर श्विन रस्त्यावर उतरली. महामार्ग साथ करत असताना आम्ही लय पकडली होती. मात्र थोड्या वेळातच आम्हाला महामार्ग सोडावा लागला. तो सोडण्यासाठी आम्ही डावे वळण घेतच होतो एवढ्यात कोपऱ्यातील शेकोटीकडे सगळ्यांचे लक्ष गेले. आपोआपच सगळ्या सायकलींचा लगाम खेचला गेला.

शेकोटीची उब घेत सायकलस्वार ताजेतवाने तर झालेच पण चांंगलेच रंगातही आले. सगळ्यांंनी शेकोटी भोवती फेर धरला.




आदित्यनारायण धुक्याची दुलई दुर करून डोळे किलकिले करू पाहत होता. सायकलपटूंचा नाच पाहून आदित्य एकदम प्रसन्न झाला होता. तो आळस झटकून क्षितिजावर येऊ लागला. त्याचे रुप लोभसवाणे दिसत होते. शेकोटी भोवती धरलेला फेर पाहून प्रसन्न झालेला आदित्य त्याची कोवळी किरणे सायकलस्वारांवर पसरू लागला.



त्या सुंदर वातावरणामुळे सायकलस्वारांचा ऊत्साहही वाढला होता. सगळेजण लयीत जाऊ लागले. हमरस्ता सोडल्यामुळे आता रस्ता थोडा अरूंद झाला होता. मात्र रस्त्याला वाहनेच नव्हती. अर्थातच सायकलस्वारांना रस्ता जणू आंदणच मिळाला होता. काही अंतरावर वाटेत पथकरनाका लागला. मात्र तिथेही वाहने नव्हतीच. इतका चांंगला रस्ता आणि सुंदर पथकरनाका पाहून महाराष्ट्र राज्यातील आठवण येऊन श्विनला न्युनगंड वाटू लागला. खरतर हा महामार्गही नव्हता. महाराष्ट्रात इतका चांगला अंतर्गत रस्ता आणि त्याचबरोबर मोकळा पथकरनाका असेल तर वाहनचालक स्वतःच पथकर घ्या म्हणू लागतील.

पुढे पुढे रस्ता आणखीच अरूंद होत होता. मोकळ्या रस्त्यावर सायकलपटू आणखीच रंगात आले होते. वाटेत डावीकडे जाणारे एक छोटे वळण दिसले. श्विनने नकाशामध्ये तिथे एक वळण असल्याचे पाहीले होते. श्विनने चौकशी केली तर गावकऱ्यांनी वळण न घेता सरळ जायला सांगितले. त्यामुळे सगळेजण सरळच जाऊ लागले. पुढे रस्ता थोडा खराब होता. तिथून वाट काढून सगळेजण पुन्हा चांगल्या रस्त्यावर पोचले खरे पण इतक्यात मागुन गौतमची हाक ऐकू आली. आम्ही चुकीच्या रस्त्याने ३ किमी पुढे आलो होतो. गावकऱ्यांनी आम्हाला चुकीचा रस्ता सांगितला होता. श्विनने चौकशी केली तेच वळण घ्यायला हवे होते. नशीबाने गौतमने आम्हाला थांबवले होते.

आम्ही परत फिरलो. परत त्याच वळणावर आलो तोपर्यंत १०.३० वाजले होते. जठराग्नी जागृत झाला होता. त्या वळणावर दोनतीन दुकाने दिसत होती. उपहारगृह मात्र नव्हती. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून हे गाव सोडले तर पुन्हा कधी खायला मिळेल याची खात्री नव्हती. त्यामुळे तेथील दुकानातच काय खायला मिळेल ह्याची चौकशी केली. मात्र तो दुकानदारच नव्हे तर आजुबाजुची लोकही काही सांगू शकत नव्हते. मात्र त्या दुकानात कचोरी दिसली. त्या कचोरी बरोबर त्या दुकानात कढी मिळत होती.

अखेरीस कचोरी कढीवर ताव मारून वेळ निभावत सायकलपटू पुढे निघाले. रस्ता आणखी अरुंद झाला होता. सगळ्यांचा वेग चांगलाच मंदावला. मात्र सगळे आरामात पुढे जात होते. सगळ्यांचा ऊत्साह कायम होताच.



राजस्थानमधील परीसराची आमच्या संघाला सवय झाली होती. मैलोनमैल गाव तर राहोच, तर छोटी झोपडीही नजरेस पडत नव्हती. कित्येक योजनं मनुष्यवस्ती नव्हतीच. मात्र अश्या ह्या प्रदेशात गोधन सांभाळण्याचे कार्य कालप्रमाणेच आजही द्रूष्टीस पडले. जोधपूर जिल्ह्यातील बिलाडा गावाजवळ कामधेनू गौरक्षा दल सेवा समितीतर्फे अनाथ पशुपक्ष्यांसाठी चिकीत्सालय सुरू केले होते. जागाही बरीच मोठी दिसत होती.



साडेदहाच्या सुमारास नाश्ता झाला होता. त्याला बराच वेळ झाला होता. मध्यान्ह उलटून गेली होती. मात्र आमचा संघ न थांबता पुढे जात होता. साधारण दोन वाजता रस्त्याच्या उजव्या बाजूला एक प्रशस्त धाबा पाहुन आम्ही थांबा घेतला. जेवण अप्रतिम होते. रोज १००-१२५ किमी सायकलवताना धाब्यावरील खाटेवर बसून जेवायला मस्त वाटत होते.




जेवण झाल्यावर आम्ही संथ गतीने जाऊ लागलो.
आम्ही महामार्ग सोडल्यापासुन रस्ता तर अरूंद होताच पण वाटेत शहरांची नावं दाखवणारे फलकही नव्हते. त्यामुळे श्विनने आघाडी घेत गुगलच्या सहाय्याने मार्ग शोधणे सुरू केले. आम्हाला मेडता रोड येथील सुंदरम पँलेस येथे जायचे होते. वाटेत एक डावे वळण घ्यायचे गुगलकाका सांगत होते. मात्र त्या ठिकाणी असलेला फलक मात्र मेडतासाठी सरळ जायला सांगत होता. काही वेळा गुगल काका गोंधळ घालतात खरे पण श्विनला ह्यावेळी गुगलकाकांंवर विश्वास वाटत होता. अखेर सगळेजण तिथे थांबले. रस्त्याच्या कडेला एक छानसे राजस्थानी जोडपे बसलेले दिसत होते.


काहीजण आजुबाजुला नक्की कोणत्या दिशेने जायची चौकशी करत होते. दरम्यान श्विनने गुगलकाकांंकडे अधिक खोलात चौकशी केली. तेव्हा श्विनला उलगडा झाला की मेडता शहराकडे जाणारा रस्ता सरळ असला तरी मेडता रोडला जाण्यासाठी डावे वळण घ्यायला हवे होते. आम्हाला जायचे असलेले सुंदरम पँलेस मेडता रोड येथे होते, जे मेडता शहरापासुन साधारण १५ किमी लांंब होते. आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणापासून मेडता शहर आणि मेडता रोड दोन्ही अजूनही साधारण १८- २० किमी लांब होते.

श्विनने इतरांना समजावण्याचा प्रयत्न केला. काहीजण थोडे गोंधळात पडले तरी त्यानी श्विनवर विश्वास ठेवला. ते डावे वळण घेतल्यावर रस्ता अगदीच अरूंद झाला. पुढे एक गाव दिसले. तिथे दोन रस्ते फुटले होते. गावातील लोकांना आमचे होटेल माहितीच नव्हते. मात्र श्विनने गुगल काकांंकडून वाटेतील छोट्या छोट्या गावांची, ठिकाणांची माहिती करून घेतली होती. त्यामुळे श्विनने वाटेतील गावांची नावे पाठ करून ठेवली होती आणि इतरांकडुनही पाठ करून घेतली होती. ती ठिकाणं पाहत आम्ही जाऊ लागलो.

आताही वाटेत वस्ती नसली तरी आजूबाजूला थोडीफार शेती दिसत होती. मार्ग शोधत श्विनने आघाडी घेतली होती. मात्र 'look back' हा स्वतःच सांगितलेला मंत्र श्विनने जपला होता. रस्ता अगदीच अरुंद झाला होता. श्विन थोड्या वेगात असली तरी रस्त्याच्या आजुबाजुला आणि समोर श्विनचे बारीक लक्ष होते. अश्याच वेळी श्विनला समोर रस्त्यावर ऊजव्या बाजूला ३ कूत्रे काही तरी हूंगत असलेले दिसले. तिथे बहुतेक एखादा प्राणी मरुन पडला असल्याची शक्यता श्विनला वाटली. तसे असेल तर ती कुत्री श्विनवर हल्ला करण्याचीही शक्यता होती. हे लक्षात येताच श्विनने लगाम खेचला. मात्र थोडा उशिर झाला होता. त्या कुत्र्यांना श्विनची चाहुल लागली होती. तिन्ही कुत्री क्षणार्धात श्विनच्या अंगावर धावली, तीही अगदी योजनापुर्वक! एकजण रस्त्याच्या उजवीकडून रस्ता ओलांडून रस्त्याच्या डावीकडे थेट श्विनसमोर आला. बाकी दोघे उजव्या बाजूनेच.. पण त्यातील एक समोरच्या बाजूने तर उरलेला म्हणजे तिसरा कुत्रा उजव्याच बाजूला श्विनला समांतर येऊन थोडा मागे पोचला होता. म्हणजेच तीनही कु्त्र्यांनी तीन वेगवेगळ्या बाजूने श्विनला घेरले होते.

मागील सायकलस्वार हाकेच्या अंतरावर असले तरी ते येईपर्यंत थोडा वेळ लागणार होता. त्यांना लांबून ही परिस्थिती दिसत नव्हती. ते येईपर्यंत किमान २-३ मिनिटे लागणार होती. तोपर्यन्त परीस्थिती सांभाळावी लागणार होती. अस्मादिकांनी पायउतार होत श्विनलाच ढाल बनवले आणि मागे सरकू लागले. सुदैवाने इतक्यात तिथे एक दुचाकीस्वार आला. त्याने परिस्थिती ओळखत दुचाकी थांबवली. त्याबरोबर ती कुत्री भुंकतच थोडी मागे सरकली. त्याबरोबर तो दुचाकीस्वार पुन्हा जाऊ लागणार इतक्यात श्विनची साखळी निघाल्याचे अस्मादिकांना लक्षात आले. श्विनने जिवाच्या आकांताने त्या दुचाकीस्वाराला थांबवले. मात्र इतक्यात बाकी सायकलस्वारही आले. दुचाकीस्वार पुढे निघाला. श्विनने इतर सायकल स्वारांना कल्पना देत साखळी बसवून घेतली. 'Look back' मंत्र जपत आघाडी सांभाळण्याचा फायदा स्वतः श्विनलाच झाला होता. ह्या मंत्रामुळे मागील सायकलस्वार हाकेच्या अंतरावर असल्यानेच वेळेवर पोचले होते.

आमचा संघ पुन्हा वेग घेतच होता. इतक्यात एका चार चाकीने आमचा रस्ता अडवला. श्विनचे लक्ष लगेचच गाडीच्या क्रमांकाकडे गेले. ... MH 12. हो, तो पुणे येथील नाना पेठ भागात स्थायिक झालेला राधेश्याम नावाचा व्यावसायिक होता. आमचे पुणे जम्मू सायकलसफरीचे फलक पाहूनच तो थांबला होता. त्याचे मूळगाव पुढे आमच्या मार्गावर होते. तिथे चहा नाश्ता करण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिले. गावातील देवळात त्यांनी आम्हाला चहा नाश्ता तर दिलाच शिवाय तेथील धर्मशाळेतच राहण्याचा तो आग्रह करत होता. सगळे जण तेथील वातावरण पाहुन खुष झाले होते. सगळ्यांना तिथे राहण्याचा मोह होत होता.





मात्र त्या प्रेमळ पाहुणचाराचा स्वीकार करत आम्ही पुढचा रस्ता धरला. मेडता रोड जवळ येत असताना झी वाहिनीच्या बातमीदाराने आम्हाला गाठले. त्याने आम्हाला आमचे हॉटेल तर दाखवलेच शिवाय झी राजस्थान न्युज वाहीनीसाठी आमची मुलाखतही घेतली. त्याचबरोबर आमची आणि आमच्या सायकलची व्यवस्था व्यवस्थित आहे ह्याची खात्रीही त्याने करून घेतली. निरोप घेत असताना कोणतीही मदत लागली तरी संपर्क करा असे आग्रहपूर्वक सांगितले. खरतर त्यावेळी असा संपर्क करावा लागेल अशी कल्पना त्यालाही नव्हती आणि आम्हालाही नव्हती. मात्र रात्री आम्हाला समजले की जवळपास कुठेही जेवणाची सोय होऊ शकत नव्हती. आम्ही नाइलाजाने त्या पत्रकाराला भ्रमणध्वनी केला. त्याचे घर आमच्या ठिकाणापासून ७-८ किमी लांब होते. तरीही त्या पत्रकाराने कोणतेही कारण न सांगता आम्हाला घरपोच जेवण आणुन दिले. पुणेकर राजस्थानी राधेश्याम पाठोपाठ ह्या राजस्थानी पत्रकाराने केलेल्या पाहुणचाराने मन प्रसन्न झाले होते. शिणलेल्या गात्रांवर निद्रादेवीने कधी पाश आवळले ते आम्हाला कळलेही नाही.

सोमवार, २० एप्रिल, २०२०

श्विनचे पुनरागमन: पुणे जम्मू सायकल सफर : भाग ३ लेख ३

भारतीय राष्ट्रीय दिनांक ८ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २९ डिसेंबर २०१९

(भारत स्वतंत्र होण्याअगोदर ज्या भुभागावर ब्रिटिशांचे राज्य होते तिथे ख्रिस्ती कॅलेंडर वापरात होते. मात्र ज्या जवळपास ५७० स्वतंत्र संस्थांनाशी ब्रिटिशांनी केवळ तह/ करार केले होते आणि राज्य ब्रिटिश करत नसून तेथील संस्थानिकच तेथील राजे होते अश्या जवळपास ५७० संस्थानांमध्ये हिंदू अगर मुस्लिम कॅलेंडर वापरात होते. मात्र भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्या संस्थानांना स्वतंत्र राहणे शक्य नव्हते. कारण ब्रिटिशांशी केलेल्या करारानुसार त्यांना स्वतःचे सैन्य ठेवता येत नव्हते आणि ब्रिटिश भारत सोडून गेल्यावर इतक्या लांबून ते ह्या संस्थानांचे रक्षण करू शकणार नव्हते. अर्थातच ही संस्थाने भारतात विलीन झाली. मात्र संपूर्ण भारताला सामायिक कॅलेंडर असणे जरुरीचे होते. संस्थांनांमधील हिंदू अथवा मुस्लिम असलेली बहुतेक कॅलेंडर चांद्र पद्धती म्हणजे तिथीवर आधारित होती, तर ब्रिटिश राज्य करीत होते त्या भारताच्या भागामध्ये सौर कॅलेंडर असले तरी ते अवैज्ञानिक, केवळ युरोप खंडाशी आणि ख्रिस्ती धर्माशी निगडित होते. आशिया खंडाशी त्या म्हणजे ग्रेगोरीयन कॅलेंडरशी काडीचाही संबंध नव्हता आणि नाही. त्यामुळे भारत सरकारने सर्व अधिकृत कामकाजात वापरता येण्यासाठी सर्वांना सामायिक असे राष्ट्रीय कॅलेंडर निर्माण केले जे कोणत्याही धर्मावर आधारित नसून खगोलशास्त्रावर आधारित सौर कॅलेंडर आहे)


पौष महिन्याची आज ८ तारीख होती. म्हणजे पुणे जम्मू सायकलसफरीचा आज नववा दिवस होता. सायकलप्रवासाची नवलाई संपून आता आम्ही चांगलेच सरावलो होतो. पहाटे गजर लावण्याची सवय फुजी (श्विन) ला नव्हतीच, तशी लवकर उठण्याचीही सवयही नव्हतीच. मात्र या सायकलयात्रेदरम्यान आपोआपच जाग येत होती. श्विनला जाग आल्याबरोबर चहा घ्यावाच लागे. काल रात्री चहाचे दुकान पाहून ठेवले होतेच. अस्मादिकांना जाग आली तेव्हा ५.३०-५.४५ झाले असावेत. लगेचच अस्मादिकांनी चहाकेंद्र गाठले. तर तिथे येथील पालिका उपाध्यक्ष चंपादेवी कुमावत तसेच स्थानिक पूर्व नगरसेवक अशोक कुमावत सायकलपटूंच्या प्रतिक्षेतच होते. खरतर ते नगरसेवक इतक्या लवकर उठत नसत. मात्र खास सायकलपटूंचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना चहा नाष्टा देण्यासाठी ते भल्या पहाटे उठून चहाकेंद्रापाशी हजर झाले होते. त्यांनी लगेचच अस्मादिकांचे स्वागत केले आणि इतर सायकलपटूंबद्दल विचारले.

अस्मादिकांनी ग्लास मधून चहा घेतला तर नगरसेवकांनी आणखी चहा घेण्याचा आणि बिस्किटांचा आग्रह केला. इतक्यात अस्मादिकांचे लक्ष तेथील कुल्हडकडे गेले. श्विनने लगेचच कुल्हडमधून चहा घेतला आणि बरोबर बिस्किटांचाही फडशा पाडला. नगरसेवकांचा निरोप घेऊन अस्मादिक हॉटेलवर परतले आणि इतर सायकलपटूंना नगरसेवक वाट पाहत असल्याचे सांगितले. एव्हाना गौतम हजर झाला होता. त्यामुळे इतर सायकलपटू आपापल्या सायकली घेऊनच चहापानासाठी गेले. अस्मादिकांनीही फुजीचा ताबा घेतला... मात्र..  फुजीची रबरी नळी फुटल्याचे लक्षात आले. एव्हाना बाकी सगळे सायकलपटू सायकली घेऊनच नगसेवकांबरोबर चहा घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे आत्ता रबरी नळी बदलायला वेळ नव्हता. त्यामुळे अस्मादिकांनी फुजीला टेम्पोमध्ये ठेवून श्विनला उतरवण्यासाठी गौतमला सांगितले. तो इतर सामान टेम्पोमध्ये लावण्यातच गर्क होता. इकडे सगळ्यांचे चहापान झाले होते. नगरसेवक आणि इतर सायकलपटू अस्मादिकांची वाट पाहत होते. मात्र गौतमने टेम्पोतून श्विनला उतरवल्याशिवाय अस्मादिकांना जाणे शक्य नव्हते. श्विन इतके दिवस टेम्पोत विराजमान असल्याने दिवा, छायाचित्रिकरणाची आयुधे फुजीने परिधान केली होती. गौतमने श्विनला उतरवल्यावर फुजीची आयुधे काढून ती सगळी आयुधे परिधान करायला श्विन थांबली तर इतर सायकलपटूंना उशीर होत होता. अखेर श्विनने त्यांना उशीर होऊ नये म्हणून पुन्हा एकदा दिवा परिधान न करता इतर सायकलपटूंच्या साहाय्याने सुरुवातीचा मार्ग कापण्याचे ठरवले. श्विन चहाकेंद्रापाशी पोचताच तेथील नगरसेवकांनी सगळ्या सायकलपटूंना हार घालून शुभेच्छा दिल्या.



इतक्यात मागून गौतम श्विनकडे आला. त्याला त्याच्या टेम्पोमध्ये ट्रेकने ठेवलेला एक दिवा सापडला होता. तो श्विनला देण्यासाठी तो आला होता. तो दिवा श्विन लावणार तोच बाकी सगळे सायकलपटू पुढे निघाले. ट्रेक मात्र श्विनसाठी थांबली होती. दरम्यान आजूबाजूला जमा झालेले लोकही श्विनची चौकशी करू लागले आणि शुभेच्छा देऊ लागले. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून पुढे गेलेले सायकलपटू कोणी मागे राहिले आहेत की नाही ह्याची फिकीर करणार नव्हतेच. त्यामुळे श्विनने पटकन पुढे जायची तयारी केली. पुढील सायकलपटूंना गाठण्यासाठी श्विन वेग घेत असताना ट्रेकला मात्र वेग घेता येईना. अद्यापि बराच अंधार होता. गौतमने दिलेल्या दिव्याने लगेचच राम म्हटला. ट्रेकला वेग घेता येत नसल्याने श्विननेही वेग कमी केला. मात्र त्यामुळे पुढील सायकलस्वार दिसेनासे झाले. इतक्यात सुमेरगंज गाव लागले. तिथे मोठा चौक होता. पुढे गेलेले सायकलपटू कुठल्या दिशेला गेले आहेत हे कळायला काहीच मार्ग नव्हता. जेमतेम ६.३० वाजले होते, त्यामुळे रस्त्यावरही कोणीही नव्हते. चुकीचा मार्ग धरला तर पुढील सायकलपटूंपासूनचे अंतर क्षणाक्षणाला दुपटीने वाढत गेले असते. त्यामुळे श्विनने चौकातच थांबायचे ठरवले आणि कोणीतरी भेटल्यावर मार्ग विचारून पुढे जायचे ठरवले. श्विन आणि ट्रेक थांबले खरे पण थोड्या अंतरावर एक छोटा दिवा श्विनला दिसला. श्विनने तिथे जाऊन पहायचे ठरवले. तिथे जाऊन पाहिले तर तो रसिकभाईंच्याच सायकलचा दिवा होता. काहीतरी अडथळा आल्यामुळे ते थांबले होते. ते मागोमाग येत आहेत की नाही याची फिकीर न करताच बाकी सगळे सायकलपटू पुढे निघून गेले होते. वास्तविक श्विन रोजच एक नियम सगळ्या सायकलपटूंना सांगत असे, ते म्हणजे 'Look back'. आपल्या पुढच्या सायकलपटूला गाठण्याचा प्रयत्न करू नका, मात्र कायम आपल्या मागे असलेल्या सायकलपटूकडे लक्ष ठेवा. पुढे गेलेल्या सायकलपटूला काही झाले तर आपण तिथे पोचणार आहोतच. पण मागील सायकलपटूला काही झाले आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नसू तर त्याला मदत द्यायला कोणीच नसेल. किंबहुना सगळ्यांनी look back हा नियम पाळला तर शेवटच्या सायकलपटूसाठी त्याच्या पुढचा सायकलपटू थांबेल, तो थांबला की त्याच्या पुढचा थांबेल. असे करत करत अगदी सुरुवातीचा सायकलपटूसुद्धा थांबेल आणि साखळी पूर्ण होईल. त्यामुळे सगळेजण एकमेकांच्या संपर्कातही राहू शकतात आणि एकमेकांना मदतही करू शकतात. त्यासाठी अगदी मागोमाग राहण्याची गरज नसली तरी मागील सायकलपटू आपल्या नजरेच्या टप्प्यात राहील ह्यापेक्षा अधिक अंतर असता कामा नये. दिवसाउजेडी दोन सायकलपटूंमधील हे अंतर अर्धा एक किमी सुद्धा असू शकते, मात्र पहाटेच्या अंधाराच्या वेळी हे अंतर ५-१० फुटपर्यंतच असणे गरजेचे होते.

दुर्दैवाने हा नियम पाळला न जात असल्याने रसिकभाईसुद्धा एकटे पडले होते. मात्र त्यांच्यामुळे श्विन ट्रेकला दिशा सापडली होती. आता तिघेही एकमेकांच्या बरोबरीने जाऊ लागले. उजेड पडेस्तोवर त्यांनी इतरांना गाठले. चहाकेंद्रासाठी थांबा घेईपर्यंत दोन तास 'सायकलवून' झाले होते. अस्मादिकांनी स्वतःला मिळालेला हार श्विनला घातला होता. त्या हारामुळे श्विन खुलली होती.


अस्मादिक चहा घेत श्विनकडे कौतुकाने बघत होते. श्विन ही फुजीप्रमाणे सडपातळ, देखणी रोड बाईक नव्हती तर ती सुबक ठेंगणी माऊंटन बाईक होती. मात्र ती अस्मादिकांची विशेष लाडकी होती. बऱ्याच दिवसांनी फुजी ऐवजी श्विनची साथ मिळाल्याने अस्मादिक विशेष खुश होते. फुजीप्रमाणे आभूषणे परिधान न करताही साधीसुधी दिसणारी श्विन खुलून दिसत होती.


चहा घेत असता कळले की तो चहावालासुद्धा पूर्वी कल्याणला राहत होता. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या परिसरात राहून गेलेला कोणीना कोणी जवळपास रोजच आम्हाला भेटत होता.

अस्मादिक चहा पिऊन श्विनकडे जाताच तेथील बालगोपाळही कुतूहलाने तेथे जमा झाले. त्यांची उत्सुकता, कुतूहल पाहून अस्मादिकही त्यांच्याबरोबर रमले.



आमचा पुढील प्रवास सुरु झाला. आम्ही राजस्थानमध्ये असल्याची जाणीव सतत होत होती कारण आता छोटे छोटे धाबेसुद्धा लांब लांब अंतरावर दिसत होते. त्यातच एका पुलाखालून एका नदीचे भलेमोठे मात्र कोरडे पात्र गेलेले नजरेस पडले.



अर्थात अश्या ह्या रस्त्यावर काही गमतीदार ठिकाणेही नजरेस पडत होती. रस्त्यावरील किमीच्या दगडांवर एक नाव सारखे नजरेस पडू लागले होते. ते पाहून मनात मात्र एक प्रश्न येऊ लागला होता, "हे काय 'बरं'?"


मात्र आमची दिशा 'बरं' पेक्षा वेगळी होती. त्या 'बरं' ने काही काळानंतर आमची साथ सोडली. दरम्यान साडेदहाच्या सुमारास नाष्टा झाल्यावर आम्ही पालीजवळ जेवणासाठी थांबायचे ठरवले होते. पाली शहराजवळील ७२ फूट संकटमोचक हनुमानाचे दर्शन झाले तोपर्यंत पोटातील कावळे कोकलायला लागले होते.







पाली शहर केव्हाच मागे पडले होते तरीही ठरवलेले असूनही पुढे गेलेले सायकलपटू थांबलेले दिसत नव्हते. शिवाय एक धाबा गेल्यावर दुसरा धाबासुद्धा जवळपास दिसत नव्हता. त्यामुळे आता जो धाबा आधी दिसेल तिथे थांबून आधी जठराग्नी शांत करायचे श्विन आणि ट्रेकने ठरवले. बराच वेळ गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक छोटा आणि कच्च्या बांधकामाचा धाबा दिसला. तिथे दोन माणसे दिसत होती. त्यांना विचारले तर १०-१५ मिनिटात जेवण मिळेल असे त्यांनी सांगितले. समोर तयारी तर काहीच दिसत नव्हती. मात्र आता इंधन भरल्याशिवाय पाय मारणे कठीण वाटत होते. अखेरीस शेवभाजीची फर्माईश करून श्विन आणि ट्रेक तिथे थांबले.
आश्चर्य म्हणजे खरोखरच १०-१५ मिनिटात अप्रतिम चवीचे जेवण तिथे मिळाले.

गौतम आणि शैलेशभाई देखील तिथेच जेवायला थांबले. त्यांचे जेवण झाल्यावर श्विन आणि ट्रेक ह्यांनी सायकलवायला सुरुवात केली तर गौतम आणि शैलेशभाई टेम्पोमधून मागोमाग येऊ लागले. तब्बल अर्धा तास पुढे गेल्यावर इतर सायकलपटू जेवायला थांबलेले दिसले.



एव्हाना अडीच वाजून गेले होते. क्षुधाशांती झाल्यामुळे आता प्रवास संथ गतीने होत होता. वस्तीची ठिकाणे एकमेकांपासून फार दूर दूर अंतरावर होती. पांथस्थांना विश्रांतीसाठी थांबायलाही जागा मिळणे दुरापास्त होते. तर इतर प्राण्यांना आधार मिळणे, नव्हे अगदी चारा मिळणेही अवघडच! मात्र सुदैवाने रस्त्यात असलेल्या गोशाळेमुळे मात्र हा प्रश्न सोडवणे थोड्या फार प्रमाणात शक्य झाले होते.

साधारण चार वाजत आले होते. जेवण करून बराच वेळ झाला होता. एकादशीची चहासाठीची 'लक्ष्मणवेळ' होत आली होती. तसे पाहता सोजत जेमतेम ४ किमी वर राहिले होते. मात्र चहाची लक्ष्मणवेळ पाळायची असल्याने आम्ही थांबा घेतला. सायकलपटू चहा, लस्सी घेत होते. तेथील चहावाला देखील अतिशय आपुलकीने चौकशी करत होता. चहाचे 'टॉनिक' मिळाल्यावर आम्ही थेट सोजत गाठले.  मुक्कामी हॉटेल 'सनराइझ' येथे पोचलो तेव्हा 'सनसेट' अवघ्या तास-दीड तासावर होता. टेम्पोमधील सामान काढेपर्यंत हॉटेलवाल्याने चहा देऊन आमचे स्वागत तर केलेच पण त्याशिवाय आणखी तीन छोटे यजमानही आमचे मनोरंजन करत होते.







फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...