सुलुरपेट येथील आमचा मुक्काम अतिशय समाधानाचा होता. चेन्नई आता एका मुक्कामावरच होती. शेवटच्या दिवशी अंतर शक्यतो १०० किमी च्या आत ठेवायचा माझा मनसुबा साध्य झाला होता. त्यामुळेही मी निश्चिंत होतो. आम्ही नेहमीप्रमाणे प्रथम चहाची सोय पाहिली. अन्हिके उरकून आमच्या सायकली तयार केल्या. आम्ही केव्हाही निघालो तरी घड्याळबाबांनी ७.३० किंवा नंतरची वेळ दाखवण्याचे सातत्य आजही पाळले होते.
सायकल मोहिमेतील शेवटचा दिवस असला की माझा उत्साह कमी झालेला असतो. खरतर आळस नसतो पण आज मोहीम पूर्ण होणार ह्याचा आनंद असला तरी ती संपणार ह्यामुळे थोडा निरुत्साहही वाटत असतो. पेडल मारण्यात जोश नसतो...तर ते यांत्रिकपणे मारले जाते. आजही थोडे तसेच झाले. थोड्याशा कमी वेगातच सुरुवात केली. अंतर फार नव्हतेच. शिवाय चेन्नईमधील मुक्कामाची सोय झालेली होती. तिघांनीही सुरुवात संथपणे केली मात्र थोड्या वेळातच फुजीने लय साधली. संजय आणि आनंद मागे पडले. मी थोडा पुढे होतो. इतक्यात काही मुलांनी माझ्याकडे पाहत मला मी कोठून आलो आहे ह्याची चौकशी केली. मी 'मुंबईहून आलो आहे ' असे म्हणताच त्यांनी विचारले 'मुंबई पुणे का?' मी हो म्हणताच ती मुले जोरात ओरडली 'शिवाजीमहाराजकी....'. मी तेवढ्याच जोरात ' जय ' ओरडत असताना त्या मुलांनी आणि मी उजवा हात झटकन वर केला. महाराजांचे नाव ऐकताच त्या मुलांना आणि मलाही उत्साह वाटला.
रस्त्याच्या डाव्या कडेला एक खोपट होते..तिथे नक्की काय खायला मिळेल अशी शंका वाटत होती. फारशी स्वच्छता नसली तरी आसपास इतर काही पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे आनंद आणि संजय येईपर्यंत मी तिथेच वाट पहायची ठरवले. वाट पाहता पाहता माझी ऑर्डर दिली. नाष्टा मात्र अपेक्षेपेक्षा उत्तम होता. संजय आणि आनंदही लवकरच आले. भरपेट नाष्टा करून आम्ही पुन्हा टाच मारली. आता आम्ही तिघेही एकत्रच जात होतो. आंध्रप्रदेशातील रुंद रुंद महामार्ग संपून रस्ताही थोडा अरुंद झाला होता. शिवाय रहदारीही जाणवत होती. चेन्नई फार लांब नव्हते. वाटेतील लोक आमची चौकशी करत होते. आम्हाला शुभेच्छा देत होते, अभिनंदनही करत होते. चेन्नई अगोदर जेवणासाठी एक थांबा घेतला. तिथे फक्त भात मिळू शकत होता. रोटी, चपाती नव्हती. मग मी चिकन वरच जोर दिला. नुसता भात खाऊन पोट भरल्याचे समाधान झाले नसतेच.
नंतर थोड्या वेळातच चेन्नई गाठली. विवेकानंद हाऊसची नेटकी इमारत दिसताच आम्ही खुष झालो. येथील आवारात सायकली लावून आम्ही चौकशी करण्यासाठी गेलो.
मात्र अजून मोहीम संपन्न झाली नव्हती. तिथे कार्यालयामध्ये मी ज्या स्वामीजींच्या संपर्कात होतो त्यांची चौकशी केली. तेव्हा ते इथे नसल्याचे समजले. तसेच आमची राहण्याची कोणतीही व्यवस्था इथे झाली नसल्याचे सांगितले गेले. त्याबरोबर मी स्वामीजींचा मला आलेला मेल दाखवला. त्यावर येथील इसमाने सांगितले मेलमध्ये तुमच्या मोहिमेची विवेकानंद हाऊस येथे सांगता करू शकता एवढीच परवानगी दिली आहे. राहण्याची परवानगी मेल मध्ये नाहीये. मीही थोडा गोंधळलो. अर्थात चेन्नईमध्ये कुठेही राहण्याची सोय होऊ शकते हे माहित असल्याने मी निश्चिंत होतोच. मात्र मला राहण्याच्या सोयीचा उल्लेखही सापडला. त्याबरोबर त्या इसमाने सांगितले की विवेकानंद हाऊस येथे तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. इथे तशी काही व्यवस्था नाही. तुम्हाला मयलापोर येथील रामकृष्ण मठात जावे लागेल. तुमची राहण्याची व्यवस्था तिथे केली असणार. आम्ही लगेचच सायकलवर स्वार झालो. स्वामीजींना भेटायची उत्सुकता होती, तसेच थोडा आरामाही करायचा होता.
वाटेत डाव्या बाजूला चेन्नई येथील विख्यात मरिना बीच पसरलेला होता. हा भारतातील सगळ्यात जास्त लांबीचा बीच आहे. साधारण तीन चार किमी अंतरावर असलेल्या रामकृष्ण मठात आम्ही शिरलो आणि स्वामी रघुनायकानंद ह्यांना भेटलो. त्याबरोबर त्यांना विलक्षण आनंद झाला. रामकृष्ण मठ येथे आमचे जंगी स्वागत करण्यात आले. तिथे उपस्थित असलेले प्रत्येक स्वामीजी इतके खूष होते की तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आमची ओळख करून देत होते.
रघुनायकानंद स्वामीजींनी आम्हाला सांगितले की आज शारदामातेची जयंती असल्याने आज रामकृष्ण मठ येथे उत्सव आहे. त्यामुळे आमची आजची राहण्याची व्यवस्था रामकृष्ण मठात नव्हे तर विवेकानंद हाऊस येथेच होईल. त्याबरोबर मी त्यांना सांगितले की आम्हाला तेथूनच इथे पाठवले आहे. त्यावर ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुमची आजची व्यवस्था तिथे होईलच. शिवाय जर तुम्हाला पुढील दोन तीन दिवसही तिथे राहायचे असेल तरी तुम्ही तिथे राहू शकता आणि जर तुम्हाला इथे राहायचे असेल तर उद्या इथे येऊ शकता.
आज शारदामातेची जयंती असणार असल्याचे मी मोहीम ठरवली तेव्हाच मला माहित होते. मी रघुनायकानंद ह्यांना तसे सांगताच ते भलतेच खुष झाले. सगळ्याच स्वामीजींना आम्हाला भेटून खूप आनंद झाला होता. तेथील अध्यक्षांना भेटताच त्यांनीही अगदी मनमोकळेपणे आमचे स्वागत केले.
खरोखर सर्वच स्वामींनी आम्हाला अक्षरशः डोक्यावर ठेवण्याचे तेवढे बाकी ठेवले होते. तिथे माझी एक छोटी मुलाखतही चित्रबद्ध झाली. ह्याशिवाय प्रत्येक स्वामी आणि कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मुलाखत घेतल्या त्या वेगळ्याच. इतके कौतुक पाहून आम्हाला फार संकोच वाटत होता. खरतर शारदमातेचा उत्सवाचा दिवस, त्यामुळे ते सगळे कार्यक्रमाच्या गडबडीत होते. आमची राहण्याची व्यवस्था विवेकानंद हाऊस मध्ये होती. आम्ही जायला निघालो, दरवाजापर्यंत गेलो की परत कोणीतरी बोलावत होते.
आम्हाला समोसा, चहा घ्यायला लावला. आम्ही खूप संकोचलो होतो. पण त्यांना नकारही धड देता येत नव्हता. नाष्टा चहा करून आम्ही पुन्हा विवेकानंद हाऊस येथे जायला निघालो. मात्र मठातील स्वामींनी आम्हाला आग्रह केला की उद्या नक्की मठात राहायला या. दोन्ही ठिकाणच्या व्यवस्था त्यांनीच केल्या होत्या. निवड आम्ही करायची होती. पुन्हा एकदा विवेकानंद हाऊसला पोचताच आमचे तिथेही स्वागत झाले. कार्यालयाशेजारी चार पाच खोल्यांची बैठी इमारत होती. तिथे आमची राहायची व्यवस्था झाली.
रामकृष्ण मठ आणि विवेकानंद हाऊस दोन्ही ठिकाणी आम्हाला रात्रीच्या जेवणाचेही आमंत्रण आम्हाला दिले होते. माझा चेन्नई स्थित सायकलमित्र रवी ह्याचे आम्हाला जेवणाचे खूप आधीपासूनच मिळाले होते. त्यामुळे आम्ही त्याचे निमंत्रण स्वीकारले होते.


































.jpg)






















