सोमवार, १३ जुलै, २०२६

मोहिमेचा शुभारंभ: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १३


संदीप आणि माँ ह्यांनी आमचा पाहुणचार उत्तम केला होता. माँ चा स्वयंपाक तर उत्तम होताच. शिवाय दोघांनी आमचे आदरातिथ्य खूपच मनापासून केले होते. संदीप ने गप्पा मारता मारता आम्हाला सांगितले. आम्ही जे घर बघितले ते त्यांच्या मालमत्तेचा एक भाग होता. त्यालाच जोडून पुढे त्यांची अतिशय प्रशस्त जागा होती. तिथे त्याचा भाऊ राहत होता जो पश्चिम बंगाल च्या विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेत्याचा वैयक्तिक सहाय्यक होता. संदीप स्वतः इंग्लिश स्पीकिंग आणि कॉम्प्युटर चे क्लास घेतो. तसेच तो लेखकही आहे. एका NGO मध्येही तो काम करतो. संदीप सायकल पटू तर आहेच. तो लडाखला चार वेळा तरी जाऊन आला आहे. लडाखबद्दल त्याला विशेष प्रेम आहे. लडाखबद्दल त्याला विस्तृतपणे लिहायचे आहे.

संदीपच्या घरचा पाहुणचार आटपून आता आमची मोहीम सुरू करायची होती. रात्री माँ च्या चविष्ट स्वयंपाकाबरोबर संदीपने आणलेल्या मीहीदाना आणि सीताभोग ह्या मिठाया खाऊन आम्ही अगदी शांत झोपलो होतो.

जाग आली तेव्हा पाहिले तर  चांगलेच उजाडले होते. आम्ही घड्याळ पाहिले तर पहाटेचे ५.३० वाजले होते. मात्र आज सफरीला सुरुवात करायची होती. आम्ही एक फेरफटका मारून चहा पिऊन आलो. घरी परत येतो न येतो तोच माँ नी चहा विचारला. मग परत एक चहा घेतला. सायकली तयार करून निघण्यासाठी सायकली घराबाहेर आणल्या. संदीपसह एक छायाचित्र काढून घेतले. 











माँ चा आशीर्वाद घेऊन आमच्या मोहिमेचा शुभारंभ केला. हवा खूपच छान होती. सुरुवातीच्या गल्लीबोळातून महामार्गाला लागल्यावर चांगली लय मिळाली. जवळपास ३८ किमी अंतर झाले तिथे डावीकडे एक छोटेसे दुकान दिसले. तिथे मिठाई होती. मी त्यांना कचोरी आहे का विचारताच त्यांनी हो म्हटले. मी लगेचच तीन कचोरींची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात पुरी आणि बटाट्याची मस्त भाजी आली. तेव्हा समजले हे लोक कचोरी कशाला म्हणतात. मात्र पुरी भाजीची चव उत्कृष्ट होती. दुकानदार, आजूबाजूचे लोक आमची चौकशी करत होते. त्यांना फिट इंडिया मोहिमेबद्दल सांगितले. मला नंतर चहा हवा होता..इतक्यात मनोजने मिष्टी दोही तुम्ही इथेच बनवता की बाहेरून आणता असे दुकानदाराला विचारले. तो म्हणाला आम्ही इथेच बनवतो. मनोजने मिष्टी दोही मागवले. मग मलाही आग्रह केला. मी आणि संजयने चहाचा मोह टाळून मिष्टी दोही घेतले. ते छानच होते.

दुकानदार म्हणाला आमच्याकडील रसगुल्ला पण खा. तो छान असतो. मग काय लगेचच रसगुल्ला गट्टम केला. नाष्टा भरपेट, स्वस्तात आणि उत्कृष्ट झाला होता. सायकली पुन्हा दौडायला लागल्या. तिघांनी छान लय साधली होती. तिघांचा वेग सारखा असल्याने सलग सायकलवता येत होते.

सकाळच्या नाश्त्याने पुरेसे इंधन पुरवले होते. थोड्या वेळात मनोज पुढे गेला. संजय थोडा थांबला. शेवटच्या सायकलपटुला एकटे सोडायचे नाही असा नियम मी सांगितला होता. तो मलाच पाळावा लागणार होता. मी संजयसाठी थांबलो. संजयला पायात cramp आले होते. त्यांनी थोडे स्ट्रेचिंग केले. आणि आम्ही निघालो. काही अंतर पुढे जातोय तर लांबून एक बस स्टॉप समोर मनोजची सायकल दिसली. तिथे जाऊन बघतो तर त्या रिकाम्या बस स्टॉपवर मनोज मस्तपैकी आडवा झाला होता. मी त्या दोघांनाही म्हटले थोडे पुढे जाऊन आपण चहा घेऊया.

पुढे लगेचच हॉटेल दिसले. आम्ही सायकली उभ्या केल्या आणि हॉटेलमध्ये शिरलो. बाहेर बघतोय तर हॉटेलबाहेर लावलेल्या सायकलीभोवती लोकांनी गराडा घातलेला. मी सायकलपाशी गेलो. एकाने विचारले हा कॅमेरा आहे का? सायकलच्या हँडलला लावलेल्या GoPro चे काम कसे चालते, त्यामध्ये शूटिंग कसे करता येते, समोरचा माणूस कसा दिसतो ह्याचे प्रात्यक्षिक मला दाखवावे लागले. आमच्या सायकल मोहिमेबद्दलही तेथील लोकांना उत्सुकता होती. चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. बर्धमान शहर जवळ येत असताना आम्ही राहण्यासाठी आणि खाण्यासाठीही हॉटेल शोधू लागलो. राहण्याची सोय काही दिसत नव्हती. मात्र एक पंजाबी धाबा दिसला. तो एकदम टिपिकल पंजाबी धाबा होता. मस्तपैकी दोन दोन खाटा समोरासमोर टाकलेल्या. त्यावर ऐसपैस मांडी घालून बसलो. जेवायला पराठे मिळतील असे वाटले होते. पण पराठे फक्त सकाळी मिळतात, आत्ता रोटी मिळेल असे समजले. मनोजने चौकशी केली रोटी मैद्याची की गव्हाची.... लगेच उत्तर आले की गव्हाची रोटी मिळेल. एक कडधान्याची भाजी आणि कढी पकोडे ह्यापैकी एक मिळेल असे समजले. आम्ही दोन्हीची ऑर्डर दिली. कढी पकोडे असल्याने मी तर खुषच झालो. जेवण मनसोक्त झाले. पाठोपाठ सुंदर दही मिळाले. अगदी तृप्त होऊन आम्ही राहण्यासाठी हॉटेल शोधू लागलो. महामार्गालगत हॉटेल मिळत नसल्याने आम्ही अखेर शहरात शिरलो. शहरातील गर्दी पार करत करत जवळपास ५-७ किमी वर मात्र हॉटेल मिळाले. थोडे फ्रेश होऊन आम्ही चहा प्यायला बाहेर पडलो. तिथे बसलेल्या लोकांनी आमची चौकशी केली आणि जेवणासाठी एक खास हॉटेल सांगितले. आम्ही शोधत शोधत गेलो. हॉटेल सापडले. तिथे अंदाज घेतला आणि आमच्या लॉज मध्ये परत आलो. थोडावेळ आराम करून परत जेवायला गेलो. मनोजने अंडा फ्राय तर संजयने फ्राईड राईस घेतला. माझी थोडी पंचाईत झाली. फिश फ्राय खाल्ला पण त्याची quantity कमी होती. पोट भरलेले नव्हते. येताना काही स्वीट ची दुकाने पहिली होती. त्यापैकी एकामध्ये शिरलो. समोर मालपुवा दिसला. मी लगेचच तीनचार मालपुवा घेतले. त्याची चव तर अप्रतिमच होती. तिथे तीनचार प्रकारचे रसगुल्ले दिसले. साधा रसगुल्ला, ऑरेंज रसगुल्ला आणि मँगो रसगुल्ला. ऑरेंज रसगुल्ला खाऊन मी समारोप केला.

झोपताना ठरवले उद्या पहाटे ५.३० ला सायकल चालवायला सुरुवात करायची....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...