श्रीकाकुलम येथे असताना जवळपास दोन अडीच वाजून गेले होते. आता जलदीने पुढे जायला हवे होते. वास्तविक संजय आणि आनंद ह्यांनी तिथे यायलाच खूप उशीर केला होता. तिथे पटकन जेवून न निघता त्यांनी आल्यावरही बराच वेळ घेतला होता. त्यामुळे आता पुढे तरी ते जलद गतीने यावेत अशी माझी अपेक्षा होती..आम्ही तिघांनी सुरुवात केली. पहिल्या दोन पाच मिनिटातच ते मागे राहिले. मला त्यांचे खूपच आश्चर्य वाटत होते.
पुढे एक छानसा उड्डाणपूल लागला. उड्डाणपूल आला की फुजीला आणखी उत्साही वाटत असे. फुजीने वेग घेतला. इतक्यात एक स्वयंचलित दुचाकी मला समांतर जाऊ लागली. बहुधा ते जोडपे असावे. मागील सीटवरील बाईने मला विचारले.... 'खाना '. मी म्हटले ' हो गया..' त्यावर तिने मला एक पिशवी देऊ केली. मी त्यांना परत म्हटले 'खाना हो गया है ' त्यावर ती म्हणाली ' Later ' आणि माझ्या हातात पिशवी सोपवली. एक पाण्याची बाटलीही त्यांनी मला दिली. वाटेत भेटणाऱ्यांचे हे असे प्रेम सायकल यात्रेत बऱ्याचदा अनुभवाला येते. ती पिशवी माझ्या हातात सोपवून लगेचच ती दुचाकी वेगात पुढे निघून गेली. खरं पाहता त्या पिशवीत काय आहे ह्याचीही मला कल्पना नव्हती. मी ती पिशवी तशीच प्यानियर्स मध्ये ठेवून दिली.
उड्डाणपुलांची एक मालिकाच तिथे दिसत होती. एक उड्डाणपूल संपतोय न संपतोय तोच दुसरा उड्डाणपूल दिसत होता. त्यामुळे फुजी खूष होती. संजय आनंद मात्र उड्डाणपूल टाळून सेवा रस्त्याने येत असत. उड्डाणपूल जेवढे चांगल्या दर्जाचे असायचे तेवढ्या चांगल्या दर्जाचे सेवा रस्ते असतीलच ह्याची खात्री नव्हती. तसेच गावातील गर्दी सेवा रस्त्याला लागू शकत होती. उड्डाणपूल सहापदरी होता आणि वाहतूक तुरळक होती. त्यामुळे उड्डाणपुलावरून वेग घेता येत असे.
आनंद आणि संजय मुळातच कमी वेगाने सायकल चालवत होते. त्यात उड्डाणपूल टाळत होते. त्यामुळे त्यांच्या आणि माझ्यामध्ये पुन्हा अंतर वाढत होते. आज खरेतर दीडशे किमी अंतर कापायचे होते. त्यामुळे वेग कायम राखणे गरजेचे होते. आम्ही पूर्व किनारपट्टीवर असल्याने साडेपाच वाजेपर्यंत इथे अंधारही पडत होता. त्यामुळे मी त्यांना सांगितले साडेपाच वाजता मी जिथे असेन तिथे तुमच्यासाठी थांबेन. अर्थात कोलकातापेक्षा इथे अंधार थोडा उशिराने पडत होता. ते दोघे माझ्या फार मागे राहू नयेत म्हणून मी वाटेत फोटो काढण्याची हौसही भागवत होतो. साधारण साडेपाचच्याच सुमारास सुदैवाने मला रांगेत चहाची काही दुकाने दिसली. तिथे आसपास निसर्गही छान दिसत होता. साहजिकच मी फुजीला तिथे थांबवले आणि दोघांची वाट पाहू लागलो.
त्यांची वाट पाहता पाहता तेथील आल्याचा चहा घेतला. त्याचा स्वाद अप्रतिमच होता. त्यामुळे मी खुष झालो. आता अंधार पडायला सुरुवात झाली होती. विजयनगरमसाठी आम्हाला महामार्ग सोडून १५ किमी आत जावे लागणार होते. येथून विजयनगरम जवळपास २५ किमी अंतरावर होते. विशाखापट्टणम तर पन्नासेक किमी अंतरावर होते. आंध्र पोलीसखात्यातील आनंदच्या मित्राने आम्हाला सांगितले महामार्गालगतच तुमची सोय करतो. त्यामुळे मला जरा हायसे वाटले. अंधारात सायकल चालवणे मला अजिबातच आवडत नाही. तेही नेहमीच्या रस्त्याला असेल तर जरा तरी ठीक आहे. मात्र अनोळखी रस्त्यात एक छोटासा खड्डा असेल तरी अंदाज येत नाही. ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मी आता विजयनगरमपर्यंत जाण्यास फार उत्सुक नव्हतो. विनय तोश्नीवाल ह्यास मी तसे कळवून टाकले. आमची सोय चहाकेंद्रापासून साधारण १२ किमी अंतरावर भोगापुरम ह्या गावी केल्याची बातमी मिळताच सगळ्यात जास्त आनंदात मीच होतो.
चहाकेंद्रावर आमचा बराच वेळ गेला होताच. चांगलाच अंधार पडला होता. आम्ही ओळीने पुढे जाऊ लागलो. थोड्या वेळातच भोगापुरम येथे पोचलो. तर तिथे एक माणूस आमची चौकशी करू लागला. आम्ही त्याला आमची मोहीम सांगितली आणि आमची आजची सोय हॉटेल अन्नपूर्णा येथे झाली असल्याचे त्याला सांगितले. तत्क्षणी तो म्हणाला, तुम्ही तिथे अजिबात राहू नका. आंध्र पोलिसांनी सांगितलेल्या हॉटेलमध्ये एक माणूस आम्हाला राहू नका म्हणून का सांगतोय आम्हाला कळेना. आम्ही तिथे घुटमळत असतानाच समोरुन दोन पोलिस आले. ते आमच्या स्वागतासाठीच आले होते. त्यांच्या मागोमाग तेथून साधारण एक किमी अंतरावर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा येथे पोचलो. तिथे एक दोन/ तीन मजली इमारत दिसली. तळमजल्याला गोडाऊन चे स्वरूप दिसत होते. एक वऱ्हांडा होता. तिथे आमच्या सायकली ठेवल्या. मात्र तिथेही बरेच सामान पडलेले दिसत होते. स्वागतकक्ष नव्हताच. वऱ्हाड्यांच्या एका कोपऱ्यात जिना दिसत होता. सुदैवाने त्या वऱ्हाड्यांला एक सरकते गेट होते. त्याला कुलूप लावून आमच्या सायकली सुरक्षित राहणार असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले.
आम्हाला दोन रूम देण्यात आल्या होत्या. आम्ही रूम ताब्यात घेताच आम्हाला जेवण काय हवे ते त्या पोलिसांनी विचारले. साधारण साडेआठ वाजले होते. मात्र ह्या हॉटेलमध्ये आणि आसपासही काहीही खायला मिळणार नाही. त्यामुळे आत्ताच ऑर्डर द्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दोन पोलिसांनीच आम्हाला जेवण आणून दिले आणि त्यांनी आमचा निरोप घेतला. येथील हॉटेल स्थलांतरित करण्यात येत असून सध्या ह्या जागेतील हॉटेल बंद केले गेले असल्याचे समजले. त्यामुळे इथे कोणीच दिसत नव्हते. ते पोलिसही निघून गेल्यावर हॉटेलमध्ये आम्ही वगळता चिटपाखरूही दिसत नव्हते.....























