रविवार, २३ जानेवारी, २०२२

नामंजूर





जपत किनारा शिड सोडणे नामंजूर
अन् वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर

घड्याळाच्या काट्यावर उठणे नामंजूर
अन् घड्याळाच्या ठोक्यावर सायकलवणे नामंजूर.

फुजी जेव्हा घराबाहेर पडेल तीच सकाळ..तेव्हा घड्याळबाबा हातवारे करून काही का सांगेनात. आजही फुजी निघाली तेव्हा घड्याळबाबा ८ वाजल्याचे सांगत होते. बऱ्याचदा डोंबिवलीबाहेर पडेपर्यंतही फुजीचे गंतव्यस्थान ठरलेले नसते. आजचे ठिकाण मात्र आधीच ठरले होते.

दोन तीन दिवसांपूर्वी मुरबाड सायकल गटाच्या 'काय अप्पा ' समूहावर रविवारी शहापूर येथे सायकलचे नवीन दुकान सुरू होत असल्याचे समजले होते. त्यानिमित्ताने आज शहापूरला जाऊन शतकी दौड करण्याचे फुजिच्या मनात होते. दरम्यान आजच्या दौडीबद्दल पेडल रिपब्लिकच्या समूहावर चर्चा सुरू होती. श्रेयसने पडघा येथे जाणार असल्याचे कळवले आणि इतक्यातच राहुल जोशीने शतकी दौडीविषयी समूहावर विचारणा केली. सगळे योगायोग जुळून येत होते. शहापूरला गेल्यास तीन गोष्टी साध्य होणार होत्या. नवीन दुकानाच्या उद्घाटनाला जाता येणार होते, शतकी दौड होणार होती आणि पडघ्याला जाणाऱ्या पेडलच्या सदस्यांबरोबर दौडही करता येणार होती. त्यामुळे राहुलने विचारणा करताच फुजीने लगेचच शहापूरला जाणार असल्याचे संकेत दिले.

शनिवारी फुजीने शतकी दौड (१०० मैल -१६० किमी) केली होती. आता लगोलग दुसरी शतकी दौड (१०० किमी) ची संधी साधायची होती. मात्र पहाटे ५ वाजता जाग आली, तेव्हाही फुजीला झोप अर्धवट झाल्याची जाणीव झाली. राहुलला पुढे जाण्याचा संदेश पाठवून फुजीने आणखी तासभर डूलकी काढली. घड्याळबाबा मात्र पुढे पुढे धावत होते.

मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनी खेळ मांडणे नामंजूर 

असे खडसावत फुजीने घड्याळबाबांकडे दुर्लक्षच केले. अखेरीस दोन कप अमृतप्राशन केल्यावर फुजी निघाली. तेव्हासुद्धा भास्करबुवा मात्र ढगांच्या दुलईमध्ये लपले होतेच. फुजीने नेहमीप्रमाणेच संथपणे सुरुवात केली. ९० फुटी रस्ता, दुर्गाडी, गंधारी पुल पार करत फुजी पडघा नाक्याला पोचली. आता ठाणे नाशिक महामार्ग सुरू झाला होता. रस्ता चौपदरी होता पण वर्दळही जरा जास्त होती. चारचाकी वाहने बऱ्याच जवळून वेगाने जात होती. त्यातच ह्या महामार्गाला चढही लगोलग येत होते. त्यामुळे फुजीला फार वेग घेता येत नव्हता. अर्थात संधी मिळताच फुजी वेग वाढवत सरासरी वेग राखण्याचा प्रयत्न करत होती. 

फुजीने पहिला थांबा घेतला तोच जवळपास ३५-४० किमी अंतर पार केल्यावर! मुंबई२उडुपी ह्या खाद्यकेंद्राच्या नावाच्या मोहामुळे फुजी तिथे शिरली. 



इडली सांबार हे आवडते इंधन भरून झाल्यावर मी नेहमीप्रमाणे फूजीच्या चाकावरील रबरी आवरण तपासले. मागील चाकाच्या रबरी अवरणातील हवा किंचित कमी झाली होती. ह्याचा अर्थ स्पष्ट होता. शहापूर अजूनही ६-८ किमी दूर होते. त्यामुळे हवा पूर्ण जाण्याच्या आत थोडे पुढे जाण्यासाठी फुजीने वेग घेतला. २ किमी अंतरातच फुजी रुसली. अखेर तिला हातात धरुनच शहापूर गाठले. ३ महिन्यांपूर्वी श्रेयसबरोबर शहापूरला आलो तेव्हा सायकलदुरुस्तीचे दुकान पाहिले होते. आजही तिथे जाऊन फुजीची शल्यक्रिया उरकली.

तेथून लगेचच आजचा मुख्य कार्यक्रम म्हणजे 'रायडर सायकल' हे दुकान गाठले. दुकान छान सुशोभित केले होते. बाहेर बसण्यासाठी खूर्च्याही मांडल्या होत्या. दुकानातील वातावरण मंगलमय होते. दुकानात शिरत असतानाच प्रसन्न वाटत होते. फुजीने लगेचच दुकानाचे मालक श्री  संजय पांढरे ह्यांची भेट घेत ओळख करून घेतली. शुभेच्छा देण्यासाठी फुजी डोंबिवलीहून आल्याचे समजताच संजय चांगलेच खुश झाले. 



सायकल खरेदीसाठी शहापूरकरांना कल्याण डोंबिवली ठाणे गाठावे लागत होते. मात्र 'रायडर सायकल 'ने शहापुरकरांच्या ह्या समस्येवर पर्याय उपलब्ध करून दिला होता. दुकान नवीन असले तरी सायकलींची संख्या समाधानकारक होती आणि त्यातही वेगवेगळे पर्याय उपलब्ध होते. 

संजयजींना शुभेच्छा देऊन फुजी परत निघाली. फुजीने लगेचच वेग घेतला. परतीच्या प्रवासात उतार जास्त प्रमाणात  असल्याचे फुजीच्या लक्षात येत होते. भास्करबुवा हजर नसल्यामुळे दृश्यमानता कमी होती. वातावरण फारसे उत्साहवर्धक नव्हते. मात्र मिळत असलेल्या वेगामुळे फुजी लयीमध्ये जात होती. शहापूरकडे जात असताना जाणवत असलेली वाहनांची वर्दळ आता विरुद्ध दिशेला जाताना अजिबात जाणवत नव्हती. त्यामुळेच चहाची तल्लफ येऊनही फुजी थांबणे तर दूर वेग कमीही करत नव्हती. पडघा टोळजवळ असलेल्या कल्याणला जाणाऱ्या जवळच्या मार्गाकडे दुर्लक्ष करत फुजीने ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील दौड सुरू ठेवली. रांजनोली जवळ आल्याचे लक्षात आल्यावर मात्र फुजी चहासाठी थांबली. 'पंढरपुरी चहा ' ची केंद्रे फुजीला अनेक दिवस खुणावत होती खरी. आज मात्र तेथील चहाचा लाभ घेण्याचा योग आला. तरीही शतकी दौड करून आल्यावर ९० फुटी रस्त्यावरील चहाकेंद्रावर चहा घेण्याचा शिरस्ता फुजीने मोडला नाहीच. दौड सुरू होण्यापूर्वी घरी दोन कप चहा बरोबर दौड संपतानाही दोन वेळा चहा घेत फुजीने समन्वय साधला. कारण..
जगण्यासाठी चहा हवा मज समजे
चहा टाळण्याचा गर्व वाहणे.... नामंजूर

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

एक उनाड दिवस




भास्करबुवांनी वर्दी दिल्याशिवाय घराबाहेर पडायला फुजी तशी नाखुषच असते. त्यात सध्या हिवाळ्याचे दिवस... थंडी नसली तरी भास्करबुवा उशिराच उगवतात. घड्याळ बाबा मात्र उगाचच पुढे पुढे धावत होते. फुजी आज बाहेर पडली तेव्हा तर ते ८ चा ठोका पाडत होते. फुजिने नाराजीनेच त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. 

अजूनही भास्करबुवा मात्र नजरेस पडत नव्हतेच. फुजीने संथगतीने सुरुवात करत PR नाका गाठला...(PEDAL REPUBLIC चे सदस्य ज्या ठिकाणाहून राईड ची सुरुवात करतात त्याला जगभरात PR नाका असे म्हणतात हे सुजाण वाचकांना माहीत आहेच)

घारडा सर्कल मार्गे फुजी कल्याण शीळ रस्त्याला लागली तरी साधारण १ किमी पुढे धुक्याचे साम्राज्य पसरले आहे असेच वाटत होते. त्यातच मानपाडा बस थांब्यापाशी उखडलेल्या रस्त्याने फुजीचे स्वागत केले. फुजीने ते फारसे मनावर घेतले नाही. काटई बदलापूर पाईप लाईन रस्त्याला लागल्यावर मात्र फुजी थोडी सहजतेने जाऊ लागली. पहिला थांबा नेहमीप्रमाणेच बदलापूर येथील शेलारांच्या खाद्य केंद्रावर घेतला. गरमागरम इडली, झकास चटणी आणि मनसोक्त सांबार ही फुजीची सुट्टीच्या दिवशीची शेलारांकडची ठरलेली फर्माईश! आपल्या डिश बरोबरच येथील अण्णा सांबार भरलेली एक छोटी बादली आपल्या मेजावर आणून ठेवतो. मग अस्मादिक इडली सांबार ऐवजी सांबार इडली न स्वाहा करतील तरच नवल.

इडली सांबारचे इंधन पुरेपूर भरून झाल्यावर फुजी चांगलीच ताजीतवानी झाली होती. खरवई जवळचा खड्डेमय रस्ता, चढण ह्यांना पार केल्यावर फुजीने वेग घेतला. मात्र अजूनही भास्करबुवा ढगांच्या दुलईमागे लपले होते. तसे ते अधूनमधून बाहेर डोकावत असले तरी त्या दुलई मागून पूर्णपणे काही बाहेर येत नव्हते. फुजी मात्र आता मजेत पुढे जात होती. बदलापूर पुढे वाहनांची गर्दीही कमी झाली होती. नेरळच काय पण कर्जतचा चार फाटा मागे पडला तरी फुजी दुसरा थांबा घ्यायला तयार नव्हती. कर्जत चौक रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असली तरी वर्दळ कमी असल्यामुळे फुजिने वेग कायम राखला होता. चौक फाटा आल्यावर फुजिने उजवे वळण घेत पनवेलकडे मोर्चा वळवला. लोधीवली जवळ आल्यावर मात्र अस्मादिकांनी फूजीला थांबवले. सफरचंदाचे इंधन भरून झाल्यावर फुजीच्या चाकावरील रबरी आवरण तपासले खरे... ओह, मागील चाकावरील आवरण पूर्णपणे दाबले गेले. त्यातील हवा भुर्रर्रर उडाली होती. फुजी ने आजूबाजूला पाहिले, तर शेजारीच कारागीर दिसला. तो खरतर स्वयंचलित आणि प्रदूषणकारी वाहनांचा कारागीर होता, पण फुजीने आपल्याकडे साहित्य आहे असे म्हटल्यावर मात्र त्याने लगेचच शल्यक्रिया पार पाडली.

त्यानंतर टमटमित फुगलेल्या चाकाच्या जोरावर राष्ट्रीय महामार्ग ४ च्या गुळगुळीत पृषठभागावर फुजीने चांगलाच वेग घेतला. पनवेल शहरात प्रवेश न करता पळस्पे फाट्याहून फुजिने जेएनपीटीकडे जाणारा पनवेल बाह्यवळण मार्ग निवडला. ह्या प्रशस्त मार्गावर फुजी मजेत जाऊ लागली. खरतर तिसरा थांबा घेण्यासाठी कळंबोली येथे थांबण्याचा अस्मादिकांचा विचार होता. पण फुजीला मिळालेली लय पाहता अस्मादिकांना विचार बदलावा लागला. इडली आणि सफरचंद ह्यांचे इंधन संपून आता वेग मंदावू लागल्याची जाणीव फुजीला होईपर्यंत खारघर आले होते. एव्हाना फुजिचे शतकही पूर्ण झाले होते. मग मात्र फुजीने पुन्हा छोटा थांबा घेत संत्र्याचे इंधन भरून घेतले. त्यानंतर तर फुजीचा वेग चांगलाच वाढला. बेलापूर ठाणे हमरस्त्यावरील उड्डाणपूल घेत फुजी लयीत पुढे जात होती. वाटेत दिसत असणारी निराकेंद्र फुजीला खुणावत होती. पण त्या अमिषाला न बधता फुजीने मार्गक्रमण सुरूच ठेवले होते. दरम्यान भास्करबुवा थोडावेळ ढगांच्या दुलईतून बाहेर येऊन फुजिकडे डोळे वटारू लागले होते. अखेर तुर्भे नाका पार होताच थोड्याशा नाराजीनेच एका निराकेंद्रापाशी फुजी थांबली. दोन पेले निरा रिचवल्यावर तृप्त मनाने फुजीने पुन्हा प्रवास सुरू करताच भास्करबुवा पुन्हा गायब झाले. 
आयरोलि मुलुंड दरम्यानच्या खाडीवरील पुलावर फुजीने मनसोक्त वारा पिऊन घेतला. खरतर तिथे फुजी वाऱ्यावरच स्वार झाली होती. 
संत्रे स्वाहा करत असताना चहाचे इंधन भरण्यासाठी मी मुलुंडला येत असल्याचे आमदिकांनी राहुलला कळवले होते. त्यामुळे तो वाट पाहत होताच. तिथे चिवडा, लाडू आणि चहाचे इंधन भरत असताना गप्पाही रंगात होत्या. मात्र पुढे ठाणे शहर, ठाणे नाशिक हमरस्ता आणि भिवंडी कल्याण हमरस्ता ह्यावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता फुजीला फार वेळ थांबता येणार नव्हते. मुलुंडहून निघतानाच फुजीला आपला अधिक वेळ न थांबण्याचा निर्णय योग्य असल्याचे ध्यानात आले. आनंदनगर चेक नाक्यावर वाहनांची रांगच रांग लागली होती. तेथून शिताफीने वाट काढत फुजी पुढे निघाली खरी पण माजिवडा -रांजनोली-गोवेगाव मार्गे कल्याण गाठेपर्यंत वाहनांच्या भाऊगर्दीने फुजिची साथ सोडली नाहीच. दुर्गाडी पुलावर तर फुजीला साथ द्यायला वरुण राजांनीही हजेरी लावली. तसे ते केवळ शिंतोडे उडवूनच परतले.

९० फुटी रस्त्यावर आल्यावर त्या गोतावळ्यातून फूजीची सुटका झाली. अखेरीस चहास्वाद घेत फुजिने आजच्या शतकी (१०० मैल - १६० किमी) फेरीची सांगता सुफल संपन्न झाल्याची ग्वाही दिली.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...