शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

गिरिजात्मज आणि गणेशखिंडीतील गणेश: अष्टविनायक सायकल यात्रा लेख ७

'वा, चहा मस्तच आहे. अजून एक बिनासाखरेचा चहा द्या', श्विनने फर्माईश केली. पहाटे ५.३० चा सुमार असावा. अजून फटफटलेले नव्हते. शांत झोप झाल्यावर श्विनला चहा हवाच होता. ओझरच्या भक्तनिवास ४ मधून बाहेर पडून उजव्या हाताला वळून शंभरेक पावलावर उघडे असलेल्या चहाकेंद्रावर श्विन एकटाच गेला होता.

समोरच्या बाकावर एक ग्रामस्थ बसलेले होते. ते चहाकेंद्र त्यांचे नित्याचेच ठिकाण असावे. सहजपणे विषय काढत त्यांनी गप्पांना सुरुवात केली. शोलेतील बसंतीचेच हे खरे वंशज असावेत. सुदैवाने श्विनला मध्येच तोंड उघडायला त्यांनी संधी दिली. त्या संधीचा लाभ घेत श्विनने पोबारा केला. भक्तनिवासात स्कॉटची आवराआवर झालीच होती. दोघेही भक्तनिवासाच्या प्रांगणात आल्यावर पाठोपाठ अटलास आणि हिरो हॉक सुद्धा हजर झाले. सगळ्यांच्या रबरी नळीतील हवेचा दाब तपासल्यावर भक्तनिवासाचा निरोप  घेण्यासाठी चौघेही सज्ज झाले. इतक्यात आजूबाजूच्या भक्तगणांनी त्यांच्याबरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी घेरले. त्यांच्यासह छायाचित्र काढून झाल्यावर श्विन- स्कॉट -अटलास -हिरो हॉक या चौकडीलाही त्यांनी छायाचित्रबद्ध केले.



छायाचित्राचे सत्र झाल्यावर चौघेही भक्तनिवासातून एका लयीत बाहेर पडले. अद्याप रविराज पूर्ण जागे न झाल्याने प्रकाश धुसरच होता. ओझरच्या बाहेर पडल्यावर तर पुढील वाट पूर्णपणे धुक्यात हरवली होती. अटलास आणि हिरो हॉक पुढे होते. मात्र तेही धुक्यात दिसेनासे झाले. श्विन स्कॉटचा वेग मंदावला होता. मात्र सातत्य टिकून होते. डोळे फाडून फाडून बघत असताना श्विनला एक आठवण आली. एकदा श्विन आणि नयना आघरकर यांनी डोंबिवली नेरळ जायचे ठरवले होते. सकाळी ६.३०-७ वाजता दोघे निघाले होते. धुक्यामुळे काहीही दिसत नव्हते. त्यामुळे अतिशय संथगतीने दोघे जात होते. अखेरीस नयना आघारकरांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. दोघेही परत फिरले पण श्विनचे समाधान झाले नव्हते. म्हणून श्विनने किमान अंबरनाथपर्यंत जायचे ठरवले. पुन्हा एकदा नेवाळी फाटा पार केला, तेव्हा ९ वाजले होते. अजूनही डोळ्यासमोर काहिही दिसत नव्हते. श्विनने डोळ्यावरील चष्मा सरकावत चष्मा काढून समोर पाहिले, तर सगळे काही स्वच्छ दिसत होते. चष्म्यावर मात्र धुक्यात दवबिंदू जमा झाले होते. त्या चष्म्यामुळेच अजूनही समोरचे दिसत नव्हते.
त्या आठवणींनी श्विनने एकदा चष्मा सरकावून पाहिला, मात्र आजमात्र अजूनही धुके पसरलेले होतेच. त्यामुळे श्विनसाठी संथ गती शिवाय पर्याय नव्हता. ओझर ते लेण्याद्री पल्ला फारतर १२ किमी. मात्र आता घड्याळ बाबा वेगात धावत होते. साधारण अर्ध्या तासाने सगळे लख्ख दिसू लागले तेव्हा रवीमहाराज बऱ्याच उंचावर पोचले होते.
अटलास आणि हिरो हॉकसुद्धा जवळच होते. अटलासच्या रबरी नळीतील हवेचा दाब थोडा कमी होता. त्यामुळे पुरेशी हवा भरून झाल्यावर अटलास, हिरो हॉक आणि श्विन निघाले. तोपर्यंत स्कॉट पुढे गेली होती. आता अटलास, हिरो हॉक आणि श्विन यांनीही वेग वाढवला. लेण्याद्रीकडे उजवे वळण आले तोपर्यंत स्कॉटला तिघांनीही गाठले.


सगळ्यांनी ते वळण घेत लेण्याद्रीच्या दिशेने दौड सुरू केली. थोड्याच अवधीत चढ सुरू झाला. आता मात्र एकामागोमाग एकजण पुन्हा धीम्या गतीने जाऊ लागले. डाव्या हाताला असलेले भक्तनिवास पाहिल्यावर श्विनने तिकडे मोर्चा वळवला. पाठोपाठ अटलास, हिरो हॉक आणि स्कॉटही तेथे गेले. चौघांनाही भक्तनिवासात दावणीला बांधून त्या चौघांचे स्वार आता पायउतार होऊन लेण्याद्रीच्या डोंगराच्या पायऱ्यांकडे वळले.
लेण्याद्रीच्या डोंगरावर चढत असताना वाटेत बऱ्याचदा माकडे हातातील वस्तू खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याकडील सर्व सामान भक्तनिवासाच्या आवारात दावणीला बांधलेल्या श्विन, अटलास आणि हिरो हॉक यांच्याकडे सोपवूनच सर्व स्वार लेण्याद्रीच्या तिकीट खिडकीपाशी पोचले. तरीही काही सामान शर्टच्या मागील खिश्यात ठेवलेले होते, ते सामान त्या तिकीट खिडकीत जमा केले. आम्ही सर्वजण सकाळी ८ च्या आत चढण सुरू केल्यामुळे लेण्याद्रीदर्शनाचे तिकीट काढावे लागले नाही.

पायऱ्या चढत असताना अस्मादिकांनी घातलेल्या डोंबिवली सायकल क्लबचा शर्ट, सायकलचे हातमोजे आणि डोक्यावरील संरक्षक कवच यामुळे इतर भाविकांना उत्सुकता निर्माण होत होती. अर्थात इतर तिघांकडेही अशीच काही आयुधे होतीच. सायकलिंग करून गड किल्ले चढले की पाय जरा मोकळे होतात हा अनुभव अस्मादिकांनी डोंबिवली ते कर्नाळा सायकलिंग करून कर्नाळा सर केला तेव्हा आला होताच. आत्ताही अस्मादिक तोच आनंद अनुभवत होते.

एकाच दमात लेण्याद्रीचा डोंगर सर केल्यावर सगळे सायकलस्वार गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी गुंफेत शिरले.
अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती आहे जो गिरी म्हणजे डोंगरावर स्थित आहे.
मुळातील बौद्ध विहार असलेल्या गुंफामालिकेतील सातवी गुंफा आता गणेशमंदिर म्हणून मान्यताप्राप्त पावली आहे. येथे एकंदर २६ गुंफा असून त्यांना पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने क्रमांक दिले आहेत. ह्या गुंफा दक्षिणाभिमुख आहेत. ६ आणि १४ क्रमांकाची गुंफा चैत्यगृह अथवा देवळाच्या स्वरूपात असून इतर गुंफा ह्या विहार अर्थात मठवासी साधू/ भिक्षु यांच्या वास्तव्यासाठी आहेत. सर्व गुंफा पहिले ते तिसऱ्या शतकातील असून गणेशमंदिरही पहिल्या शतकातील आहे. ह्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी २८३ पायऱ्या चढाव्या लागतात ज्या गणपतीने इंद्रियांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक समजले जातात. गणेशमंदिर म्हणून मान्यता पावलेली ही गुंफा अश्या पद्धतीने बांधली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य उगवत राहील तोपर्यंत प्रकाश आत येत राहील. मंदिर दक्षिणाभिमुख असून गणपती मात्र उत्तराभिमुख आहे, ज्यामुळे गणपतीचे मुख पर्वताच्या विरुद्ध दिशेला आहे असे मानले जाते. पेशव्यांनी गणेशाचे मुख शोधण्याचा असफल प्रयत्नही करून पाहिला होता.

गिरिजात्मजाचे दर्शन घेतल्यावर सगळे सायकलपटू शांतपणे सभामंडपामध्ये बसले. तेथील शांत वातावरणात गणेशाची प्रार्थना करत सगळेजण उल्हसित झाले होते. सायकल पटू सभामंडपाबाहेर पडताच इतर भाविकांनी त्यांना घेरले. त्या भाविकांना सायकलपटूंसह छायाचित्र काढून घ्यायचे होते. सगळ्या सायकलपटूंनी सर्व इच्छुक भविकांबरोबर छायाचित्र काढू दिले.




लेण्याद्रीच्या डोंगरावरून आसपासचा परिसरच नव्हे तर आकाशही विलोभनीय दिसत होते.



ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून सगळे सायकलपटू लेण्याद्रीचा डोंगर उतरू लागले.


सर्व पायऱ्या उतरून सायकलपटू पायथ्याशी असलेल्या क्षुधाशांतिगृहकडे मोर्चा वळवला. येथील जेवण श्विनला नेहमीच आवडे, त्यामुळे अष्टविनायकयात्रा करत असताना किमान एक रात्र लेण्याद्री येथे मुक्काम करण्यास श्विन नेहमीच उत्सुक असे. यावेळी रात्री मुक्काम न करता आल्याने जेवणाची तहान केवळ सकाळच्या नाश्त्यावर भागवावी लागणार होती. थोड्याच वेळात हातातोंडाची लढाई सुरू झाली. मनसोक्त नाष्टा झाल्यावर आजूबाजूच्या दुकानात फेरफटका मारून भक्तनिवासाशेजारील श्विन स्कॉटला आम्ही बंधमुक्त केले.

श्विन आणि स्कॉट थोडे आधी निघाले. मात्र अटलास आणि हिरो हॉक गिरिजात्मजाच्या पायथ्याशी आणखी काही काळ थांबले. माळशेज घाट उतरेपर्यंत तरी श्विन, स्कॉट थोडे पुढे राहतील आणि अटलास, हिरो हॉक मागे राहतील असे चौघांनी ठरवले होते. त्या दृष्टीने श्विन स्कॉट पुढे निघाले होते. लेण्याद्री डोंगरातील उताराचा रस्ता श्विन स्कॉट उजवीकडे वळले. रस्ता कमी वर्दळीचा आणि रुंद तसेच सुंदर होता. दोघांनी वेग घेतला आणि काही काळातच गणेशखिंडीचा चढ सुरू झाला. सुरुवातीला रस्ता चांगल्या अवस्थेत होता आणि चढ कमी तीव्रतेचा होता. मात्र एका चढणीपाठोपाठ दुसरी त्यानंतर तिसरी अश्या अनेक चढणी लागत असल्याने श्विन स्कॉटचा वेग बऱ्यापैकी मंदावला. पुढे पुढे रस्ताही खराब अवस्थेत होता.


काही ठिकाणी तर कोणतीही दुचाकी घसरू शकेल इतका रस्ता खराब झाला होता. श्विन आणि स्कॉटने नेटाने गणेशखिंड सर केली. गणेशखिंड सर करून तेथील गणेशाचे दर्शन घेऊन श्विन स्कॉटची वाट पाहत होता. सभोवार पाहता सुंदर वातावरण होते. स्कॉटही थोड्या वेळात तेथे पोचली. खिंड पार केल्याबद्दल स्कॉटला आनंद झाला होता. गणेशमंदिराजवळ येऊन दोघांनी मंदिरातही श्री गणेशाचे दर्शन घेतले. तेथील वारा अंगावर घेऊन दोघेही प्रसन्न झाले होते. श्विन स्कॉटने चिक्की खाऊन आपला आनंद साजरा केला. एवढ्यात दुचाकीवरून दोनजण मंदिरापाशी येऊन दर्शन घेऊ लागले. श्विन स्कॉटने त्यांनाही चिक्की देऊन आनंदात सहभागी करून घेतले.
हा आनंदोत्सव साजरा करत दोघेही गणेशखिंडीवरून सभोवार पाहू लागले.


गणेशखिंड सर केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. अंगावर येणाऱ्या वाऱ्यासह दोघेही ते समाधान आणि आनंद व्यक्त करत तेथे रेंगाळले तेव्हा दिवसभरातील उरलेल्या ११० किमी अंतराच्या ताणाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता.



रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

विघ्नहर्ता- अष्टविनायक सायकल यात्रा लेख ६

'इंद्रप्रस्थ'च्या पहिल्या मजल्यावर आम्हाला वास्तव्य करायला मिळाले होते. व्यवस्थापनाने त्याच मजल्यावरील सज्जा मध्ये श्विन आणि स्कॉट यांचीही व्यवस्था केली होती. त्या सज्जासमोर मोकळी जागा होती तेथे इंद्रप्रस्थमधील कर्मचारीवर्ग निद्रिस्त झाला होता. पहाटे श्विन स्कॉट यांना दावणीतून सोडवून त्या कर्मचारीवर्गामधूनच आणावे लागले.

श्विन स्कॉट सज्ज झाले तेव्हा भास्कराचार्य डोळे किलकिले करू पाहत होते. मात्र अद्याप त्यांनी पूर्णपणे डोळे उघडले नव्हते. त्यामुळे पुरेसा प्रकाश नव्हता. रस्ता अरुंद असला तरी व्यवस्थित डांबरीकरण झालेला होता. त्यामुळे श्विन स्कॉटने संथ गतीने दौड सुरू केली. केडगावजवळील रुळांवरील उड्डाणपूल ओलांडून पूढे जात असताना थोडेफार धुके असले तरी पुढे मात्र पुरेसा प्रकाश होता. श्विन आणि स्कॉट पहाटेच्या वेळेचा फायदा घेत १५-२० किमी अंतर पार करून चहा घेण्याच्या विचारात होते. मात्र साधारण १० किमी अंतरावर असताना श्विनला चहाचे फक्कड ठिकाण दिसले. श्विनने मागून येणाऱ्या स्कॉटला तेथे थांबण्याची खुण केली. मात्र इतक्यात एक प्रशिक्षित श्वान स्कॉटच्या दिशेने धावत ओरडू लागला. स्कॉट थांबली तरी त्या श्वानाने त्याचे ओरडणे सुरूच ठेवले. अखेरीस श्विन ने मागे येऊन स्कॉटला पुढे जायला सांगितले. दोघेही पुढे गेल्यावरही तो श्वान मात्र ओरडायचे थांबत नव्हता.

श्विन आणि स्कॉटने चहाची फर्माईश केली. चहाचे ते स्थानक अतिशय स्वच्छ होते. चहा आल्याबरोबर त्याची चव श्विनला तृप्त करून गेली. ती चव नेहमीसारखी नव्हती. तो गुळाचा चहा होता. श्विनला ती चव इतकी आवडली की यापुढे मिळेल तेव्हा गुळाचाच चहा प्यायचे श्विनने मनाशी नक्की केले. इतका झकास चहा मिळाल्यावर दोघेही ताज्या दमाने पुढे मार्गक्रमण करू लागले. रस्ता अरुंद असला तरी फारशी वर्दळ नव्हती, त्यामुळे स्वतःचेच राज्य असल्याप्रमाणे दोघेही निवांतपणे जात होते.

थोड्या वेळातच आंधळगावजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला 'माय ऊर्जा' चे केंद्र दिसले. साधारण तीन वर्षांपूर्वी श्विनने डोंबिवली सायकल क्लबचे सदस्य श्री अय्यर यांच्याबरोबर अष्टविनायक सायकल यात्रा केली होती. त्यावेळी दौंडहून सकाळी सुरुवात करून मध्यान्हीच्या वेळी याच 'माय ऊर्जा' केंद्रातील अप्रतिम लस्सी पिऊन श्विनने उदरभरण केले होते. ती लस्सी आवडल्यामूळे त्यावेळी आणखी एक लस्सीचे पाकीट श्विनने आपल्याबरोबर घेऊन ठेवले होते. पुणे येथील कुतवळ फूड्स प्रा लि या कंपनीने 'ऊर्जा' या व्यापारी चिन्हासह दूध आणि दुग्धोत्पान्न पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. मध्यान्हीच्या वेळेस त्या दिवशी त्या लस्सीने श्विनला खरोखरच चांगली ऊर्जा मिळवून दिली होती.

श्विन त्या आठवणीनी सुखावून गेली. 'माय ऊर्जा' च्या केंद्रातून पुन्हा एकदा लस्सी घेण्याची श्विनला इच्छा होती. खरतर या वेळी श्विन स्कॉट सकाळच्या वेळेस तेथून जात होते. तसेच नुकताच चहा झाला होता आणि आता लस्सीपेक्षा नाश्त्याची गरज होती. श्विनचा हा प्रश्न 'माय ऊर्जा' केंद्राने परस्परच सोडवून टाकला, कारण ते केंद्र बंदच होते. श्विन आणि स्कॉट येथून अर्थातच पुढे निघाले.

दोघेही क्षुधाशांती गृह शोधत असतानाच अंबले गावाजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूसच एक छोटेसे खोपट दिसले. यापुढेही फार काही पर्याय मिळतील असे श्विनला वाटत नव्हते. त्यामुळे श्विन स्कॉट तेथे शिरले. ते खाद्य केंद्र बहुधा एक कुटुंबच चालवत होते. नाश्त्यासाठी पोहे मिळतील हे कळल्यावर दोघांनाही समाधान वाटले. पोहे तयार आहेत असे सांगूनही पोहे मेजापर्यंत येत नव्हते. 'तयार आहे' असे सांगितलेले पोहे अजून फोडणीला टाकायचे होते. पोहे बऱ्याच वेळाने आले तोपर्यंत श्विन आणि स्कॉटची पुरेशी विश्रांती झाली होती. समोर आलेल्या पोह्यांची चव घेताच या केंद्रात थांबल्याचा आनंद श्विन स्कॉटला झाला. पोहे उत्कृष्ट होतेच शिवाय त्याचे प्रमाणही पुरेसे होते. पोहे खाऊन श्विन आणि स्कॉट तृप्त मनाने बाहेर पडले.
कर्डे गावामध्ये शिरेपर्यंत स्कॉट थोडी मागे राहिली होती. त्यामुळे श्विनने स्कॉटची वाट पाहण्यासाठी एक थांबा घेतला. इतक्यात उल्हासनगरची जोडगोळी श्री उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर यांची पुन्हा गाठ पडली. श्विन स्कॉटच्या जोडीला आता उपेंद्रची अटलास आणि हितेशची हिरो हॉक कायम राहणार होते. आता चौघेही एकामागोमाग जाऊ लागले. पुढे गेल्यावर एक डावे वळण घेत पाइपलाइनच्या बाजुने रांजणगाव येथे जाण्यासाठी एक जवळचा रस्ता असल्याचे श्विनला मागील अनुभवामुळे माहीत होते.
कर्डे गावाजवळ ते डावे वळण घेत श्विन, स्कॉट, अटलास आणि हिरो हॉक पाइपलाइन रस्त्याला लागले. तो रस्ता फारच अरुंद होता. तेथून वर्दळ कमी असली तरी एखादे मोठे वाहन आले तरी रस्ताची रुंदी कमी पडत होती. अटलास आणि हिरो हॉक थोड्याच वेळात पुढे निघून गेले. श्विन स्कॉट काही अंतर मागे राहिले होते खरे, पण काही वेळातच अटलास आणि हिरो हॉक उदरभरण करण्यास थांबले. पोहे खाल्यामुळे श्विन आणि स्कॉट अगोदरच तृप्त झाले होते. त्यामुळे त्या दोघांनी आता आघाडी घेतली. कारेगाव येथे पोचताच पुणे नगर हमरस्ता लागला. या गुळगुळीत आणि प्रशस्त रस्त्यावर श्विनने चांगलाच वेग घेतला. मात्र रस्ता चढ उताराचा होता. मात्र रांजणगाव फार लांब नव्हते. थोड्याच वेळात श्विन स्कॉट महागणपतीच्या प्रवेशद्वाराशी पोचले.


श्रीमहागणपतीचे दर्शन अतिशय सुखद होते. तेथील आवारात श्विन आणि स्कॉट पुन्हा एकदा ताजेतवाने झाले.


दर्शनानंतर दोघेही पुढील प्रवासासाठी तयार होणार इतक्यात अटलास आणि हिरो हॉक तेथे आले. त्यांना सांगून श्विन आणि स्कॉट मलठण मार्गे ओझर, लेण्याद्रीच्या दिशेने निघाले. एव्हाना मध्यान्ह उलटून गेली होती आणि ओझरपर्यंत जवळपास ७० किमी तर ओझर मार्गे लेण्याद्री पर्यंतचे जवळपास ८२ किमी अंतर बाकी होते. काम, काळ, वेग या अंकगणिताचा विचार करता आता वाटेत थांबण्यासाठी अतिरिक्त वेळ हाताशी नव्हता.
श्विन स्कॉटने सुरुवात करताच एक उंच चढाव सामोरा आला. तो शांतपणे सर करून दोघेही पुढे निघाले. मलठण येत असताना श्विन स्कॉटला उदरभरण करण्याची आठवण झाली. इतक्यात अटलास आणि हिरो हॉकही तेथे पोचले. श्विन आणि स्कॉटच्या अष्टविनायक सायकल यात्रेची बातमी पुढारी वर्तमानपत्रात छापून आली होती. ती मलठण येथे वाचावयास मिळाली.

श्विन स्कॉट यांनी अटलास आणि हिरो हॉक यांना नाश्त्याचे निमंत्रण दिले. मात्र त्या दोघांचे रांजणगाव येथे उदरभरण झाले होते, त्यामुळे त्यांनी पुढे जायचे ठरवले. तेथील हॉटेल द्वारकाच्या व्यवस्थापकाने श्विन स्कॉटचे यथोचित आदरातिथ्य केले. जणू काही त्यांच्या घरी गेलेलो आम्ही त्यांचे आप्तच होतो. इतकेच नव्हे तर शेजारील मेजावर बसलेल्या दोघा ग्राहकांनीही श्विन स्कॉटची आपुलकीने चौकशी केली आणि मार्गदर्शनही केले. अश्या तऱ्हेने मिळालेल्या ह्या वागणुकीने श्विन स्कॉट भारावून गेले.

तेथून पुन्हा कूच करताना दोघेही अतिशय समाधानी होते. मलठण कवठे रांजनी हा मार्ग तसा कंटाळवाणाच! रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोकळे रान, मनुष्यवस्ती विरळीच. मात्र ह्याच रस्त्याला श्विनला एक उमद्या मनाचा माणूस भेटला. त्याचे नाव शिवाजीराव थोरात! पांढराशुभ्र सदरा, पांढरी पडत असलेली खुरटी दाढी, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळाला टिळा आणि डोळ्यावर गॉगल.. अश्या पेहरावात गडी दुचाकी चालवत होता. अटलास आणि हिरो हॉक बरेच पुढे गेले होते, तर स्कॉट मागे राहिली होती. शिवाजीराव श्विनला समांतर गाडी चालवू लागले. 'तुम्ही मगाशी रांजणगावला होतात ना. मी तुम्हाला तिथे पाहिले', शिवाजीराव श्विनला म्हणाले. तोच धागा पकडून दोघेही एकमेकांना समांतर राहत गप्पा मारू लागले. स्कॉट मागे राहिली असली तरी, शिवाजीरावांना आपल्यासाठी वेग कमी करायला लागत आहे हे पाहून श्विनने त्यांच्यासाठी वेग वाढवला. गप्पा रंगत होत्या, त्याबरोबर दोघांचा वेगही वाढत होता. मात्र त्यामुळे मागे राहिलेल्या स्कॉटमधील अंतर आणखी वाढेल हे लक्षात घेत श्विनने त्यांना तसे सांगितले. 'तुम्हाला चहा पाजायचा आहे, मी पुढे थांबतो. तुम्ही या, असे सांगून शिवाजीराव पुढे गेले. स्कॉट येईपर्यंत श्विनने वेग कमी केला. त्यानंतर दोघेही पुढे निघाले. थोड्याच वेळात शिवाजीराव, अटलास आणि हिरो हॉक एका चहाकेंद्रावर बसले दिसले. श्विनला त्यांनी हाक मारली. शिवाजीरावांनी चौघांनाही चहा पाजला.


शिवाजीराव हे शाळेत असताना त्यांच्या भागातील नेत्याच्या बरोबर एकाच बाकावरील सहाध्यायी होते. विशेष म्हणजे त्या लोकनेत्याचेही नाव शिवाजीरावच. थोडक्यात शाळेत असताना एकाच बाकावर दोन शिवाजी बसत होते.

चहापान झाल्यावर पुढील दौड पुन्हा सुरू झाली. श्विन स्कॉट सातत्याने जात असताना अटलास आणि हिरो हॉक यांनी पुन्हा एकदा उदरभरण करण्यासाठी थांबा घेतला. रांजनी गाव जवळ आल्यावर श्विन स्कॉट पुन्हा एकदा मार्गाची चौकशी करत असताना मागाहून आवाज आला,' बरोबर आहे, तिथेच वळा,' शिवाजीराव पुन्हा मागाहून दुचाकीवरून येत सांगत होते.

श्विन स्कॉट त्याप्रमाणे पुढे निघाले. नारायणगाव येताच पुन्हा एकदा बऱ्यापैकी रुंद रस्ता लागला. तेथून चौकशी करत करत श्विन स्कॉट ओझर कडे जाणाऱ्या रस्त्याला लागले तोपर्यंत अदित्यनारायण पश्चिमेकडे झुकू लागला होता. श्विन स्कॉट च्या उजव्या बाजूला लांबवर सावल्या पडू लागल्या होत्या.



रस्ता तर अतिशय सुरेख होता. दोघांचाही वेग वाढला. ओझर जवळ येत असल्याचे समजल्यानेही दोघेही निर्धास्त झाले होते. समोरच्या क्षितिजावर मनोहारी दृश्य दोघांचे मन रिझवत होते.

थोड्या वेळातच दोघेही एका फाट्यावर पोचले तेथून डावीकडे लेण्याद्री तर उजवीकडे ओझर वसलेले होते.



दोघांनी उजवीकडे वळण घेतले. मात्र आता खडबडीत रस्ता सुरू झाला होता. मात्र ओझरला पोचल्याचा आनंद त्या खडबडीत रस्त्यालाही हिरावून घेता येत नव्हता.
ओझर येथे एक भव्य कमानीने श्विन स्कॉटचे स्वागत केले.


ओझर येथे मंदिराच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने जात श्विन स्कॉट मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोचले. तेथील फुलविक्रेत्याला सांगून श्विन स्कॉट यांना दावणीला बांधून आम्ही विघ्नेश्वराचे दर्शन घेतले. विघ्नेश्वराचे दर्शन नेहमीच मन प्रसन्न करते. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला प्रशस्त ओवरी असून भक्कम तटबंदीही आहे. गणेशाची मूर्तीही पूर्वाभिमुख असून त्याच्या बरोबर रिद्धी आणि सिद्धीही आहेत.
पोर्तुगीजांवर विजय मिळवत वसईचा किल्ला जिंकल्यावर चिमाजी आप्पा यांनी ओझर गणपतीच्या मंदिराचे नूतनीकरण करून मंदिराला सोन्याचा कळस चढवला.

श्विन स्कॉट विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन समोरील मोकळ्या जागेत येताच इतर भक्त त्यांची चौकशी करू लागले.

एव्हाना अंधार पडू लागला होता. ओझर येथे पोचताना वाटेत चौकशी केली असता ओझरपासून लेण्याद्री पर्यंतचा रस्ता चांगला असून पथदिवेही आहेत असे समजले होते. अंधार पडू लागला तरी संध्याकाळचे जेमतेम ६ वाजत असल्याने पुढे लेण्याद्री पर्यंत जायचा दोघांचा निर्धार होता.

मात्र दुपारी मलठण येथे इडली सांभार चा समाचार घेतल्यावर ओझरपर्यंतचे ५५ किमी अंतर पार करताना चहा घेतला असला तरी खाणे झाले नव्हते. त्यामुळे ओझर येथे नाष्टा करून मगच लेण्याद्रीला जायचे दोघांनी ठरवले. क्षुधाशांती करून तेथील कर्मचाऱ्याला लेण्याद्रीचा रस्ता विचारताच 'अंधारात त्या रस्त्याने जाऊ नका, वाटेत वाघ आहेत', असे त्याने सांगितले. ते ऐकल्यावर ओझर मंदिराच्या प्रसादाचे कार्यालय तसेच रस्त्यावरील विक्रेती बाई यांनाही विचारून पाहिले. मात्र सगळ्यांनीच श्विन स्कॉटला वाटेत वाघ असल्यामुळे अंधारात त्या रस्त्याने जाऊ नका असेच सांगितले. तिथे मिळालेल्या सल्ल्यानुसार दोघांनी भक्तनिवास ४ येथे खोली घेतली. भक्तनिवास तर उत्तम होतेच शिवाय तेथील कर्मचारीही मदतीसाठी तत्पर होते. स्कॉट आराम करत असताना श्विन चहासाठी बाहेर पडला. मंदिरासमोरील चहाकेंद्रातही गुळाचा चहा मिळाल्याने श्विनची स्वारी खुश झाली. तेथूनच श्विनने अटलास आणि हिरो हॉक यांची भ्रमणध्वनीद्वारे चौकशी केली. ते दोघेही ओझर येथे पोचल्याचे त्यांनी कळवताच श्विनने त्यांना मंदिराशीच यायला सांगून त्यांची व्यवस्था भक्तनिवास ४ मध्येच करायला स्कॉटला सांगितले.
अटलास आणि हिरो हॉक यांनी विघ्नेश्वराचे दर्शन घेतल्यावर श्विन त्यांना भक्तनिवास ४ येथे घेऊन गेला. चौघांचीही थोडी विश्रांती झाल्यावर मग प्रसादाचे जेवण घेण्यासाठी सगळेजण निघाले. तेथील शिस्त, स्वच्छता वाखाणण्यासारखी होती.
ओझर येथील वातावरणात चौघेही ताजेतवाने झाले होते. मात्र दिवसभराच्या प्रवासामुळे चौघांवरही निद्रादेवी लगेचच प्रसन्न झाली.

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

आंधळी कोशिंबीर - अष्टविनायक सायकल यात्रा लेख ५

अष्टविनायक यात्रेदरम्यान सर्व गणपतींचे दर्शन झाल्यावर पुन्हा प्रथम गणपतीचे दर्शन घेतले तर अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. शास्त्रोक्त पद्धतीने ही यात्रा करत असताना ज्या गणपतीचे सर्वप्रथम तसेच सर्वात शेवटी दर्शन घ्यायचे तो गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर! सिंधू ह्या दैत्याचा वध करणारा हा मयुरेश्वर! माघी चतुर्थी तसेच भाद्रपद चतुर्थी या दिवशी चिंचवड येथून गणेशाची पालखी मयुरेश्वराच्या देवळात येते.

हे मंदिर नेमके कधी बांधले याचा कालावधी निश्चित नसला तरी मोरया गोसावी यांचा मात्र या मंदिराशी थेट संबंध आहे. पेशव्यांच्या काळात या देवालयाची भरभराट झाली. मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावर समर्थ रामदासांना 'सुखकर्ता दुखहर्ता' ही आरती स्फुरली.
मंदिर उंच दगडी भिंतीने संरक्षित आहे. ती भिंत चारही कोपऱ्यातील मिनारांनी जोडलेली आहे. ते मिनार मंदिराच्या स्थापत्यकलेवरील मुस्लिम प्रभावाची साक्ष देत आहेत. काही काळ एक मुस्लिम सरदार या मंदिराचा आश्रयदाता आणि संरक्षक होता. या मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वार एकेका युगाचे प्रतिनिधित्व करतात. पूर्वेच्या प्रवेशद्वारावरील बल्लाळविनायकासमवेत राम आणि सीता 'धर्माचे' प्रतीक आहेत आणि सृष्टीचा रक्षणकर्ता विष्णूचे मूर्त स्वरूप आहेत. दक्षिण प्रवेशद्वाराकडील विघ्नेश शिव आणि पार्वतीसह 'अर्थ' म्हणजेच संपत्ती आणि कीर्तीचे प्रतीक असून सृष्टीचे विसर्जन करणाऱ्या शिवाचे मूर्त स्वरूप आहेत. पश्चिमेकडील चिंतामणी हा कामदेव आणि रती सह असून 'काम' म्हणजेच अभिलाषा, प्रेम, कामुक आनंदाचे प्रतीक असून निराकार ब्राह्मणाचे मूर्त स्वरूप आहे. तर उत्तरेकडील महागणपतीसह वराह आणि त्याची पत्नी महीसह 'मोक्ष' चे प्रतीक आहे जो ब्राह्मणाचे मूर्त स्वरूप आहे.
मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून चौकोनी आवारात दोन दीपमाळा आहेत.


मोरगाव येथे श्विन स्कॉट पोचले तेव्हा बऱ्यापैकी अंधार झाला होता. तेथील चिंचोळ्या बोळातून त्या अंधारात मुख्य रस्ता शोधणे कठीणच होते. मोरगाव येथे श्री ढोले भाऊ यांनी श्विन आणि स्कॉटची भक्तनिवासात सोय केलेली होती. भक्तनिवासात थोडी विश्रांती घेऊन आणि स्नान करून दोघेही मयुरेश्वराच्या दर्शनाला निघाले. शांत वातावरणात दोघांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले.






मंदीरामध्ये काही काळ प्रसन्न वातावरणाचा लाभ घेऊन श्विन आणि स्कॉट क्षुधाशांतिगृह शोधू लागले.  जवळपास मोजकीच क्षुधाशांतिगृह दिसत होती. खरतर अद्याप ८-८.३० चा च सुमार झाला होता. मात्र मुख्य रस्त्यावरही सामसूम झाली होती. थोडा फेरफटका मारून श्विन स्कॉटने एक क्षुधाशांतिगृह निवडले. तेथील जेवण खरोखरीच रुचकर होते. त्यानंतर दोघेही भक्तनिवासात जाऊन निश्चीन्तपणे निद्रादेवीच्या स्वाधीन झाले. मात्र दरम्यान श्विनच्या डोक्यात पूढील ४ दिवसांचा पल्ला ३ च दिवसात कसा पार पाडता येईल याचे नियोजन होत होते.

दुसऱ्या दिवशी दोघांनाही पहाटेच जाग आली. जवळपास चहापान करत असता मोरगाव कडून केडगाव चौफुलाकडे जाणारा रस्ता दोघांनी विचारून घेतला. भक्तनिवास मंदिराच्या शेजारीच होते. मोरगाव सोडण्याअगोदर श्विन स्कॉट पुन्हा मंदिराकडे वळले.



पहाटेच्या प्रकाशात मंदिर अतिशय सुंदर दिसत होते. मंदिराचे दर्शन घेऊन श्विन स्कॉटने कूच केले. सुरुवातीचा रस्ता अतिशय चिंचोळा होता. त्यामुळे दोघेही थोडे गोंधळात पडले होते. मात्र तो चिंचोळा रस्ता संपून सुपेच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागल्यावर मात्र दोघे निर्धास्थ झाले. रस्ता फारसा रुंद नव्हता. दोघांनीही संथ गतीने जाणेच पसंत केले. 

काही काळातच डाव्या हाताला मयुरेश्वर अभयारण्य लागले.







अभयारण्यात जाण्यास मज्जाव असल्याचा फलक तेथे होताच. तसेच श्विन स्कॉटलाही अभयारण्यापेक्षा सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची ओढ लागली होती. दोघेही अभयारण्य मागे सोडून पूढे जाऊ लागले. रस्ता थोडासा ओबडधोबड आणि अरुंद असल्याने वेग वाढवता येत नव्हता. तरी दोघेही सातत्याने पुढे जात होते.
साधारण सकाळचे ९ वाजण्याच्या सुमारास दोघेही केडगाव चौफुला येथे पोचले. श्विनच्या डोक्यात रात्री शिजलेल्या योजनेप्रमाणे पुढील ४ दिवसांचा प्रवास ३ च दिवसात पूर्ण करायचा असल्यास आज सिद्धटेकला जाऊन न थांबता परत मागे केडगाव चौफुला येथे येणे गरजेचे होते. त्यामुळे दोघांनी केडगावला पोचताच प्रथम रात्री राहण्याची सोय होईल का ते पाहिले. सुदैवाने पहिल्याच ठिकाणी त्यांना राहण्याची उत्तम सोय होत असल्याचे समजले. त्या इंद्रप्रस्थ लॉज मध्ये आगाऊ रक्कम देऊन दोघांनी रात्री राहण्याची सोय नक्की केली.

केडगाव येथे नाष्टा करायला न थांबता दोघेही पुढे पाटस येथील टोलनाक्याला पोचले. तेथील क्षुधाशांतिगृहात मनाजोगता नाष्टा झाल्यावर दोघांनी दौंड शहराकडे मोर्चा वळवला. नाष्टा होईपर्यंत सकाळी १० चा सुमार झाला असावा.

पाटस येथील टोळ नाक्या पासून अवघ्या १३ किमी वर दौंड शहर तर तेथून पुढे जेमतेम २० किमी वर सिद्धटेक. म्हणजे पाटस टोळ पासून सिद्धटेकला जाऊन येऊन अंतर होते ६६ किमी. तर त्यांनंतर पुन्हा केडगाव येथिल इंद्रप्रस्थ लॉज फक्त १० किमी अंतरावर. श्विन स्कॉटच्या अंदाजाप्रमाणे सिद्धिविनायकाच्या दर्शन आणि ७६ किमी अंतराचा प्रवास यास साधारण ६-७ तास पुरेसे होते. मात्र यापुढे मात्र वेगळेच विधिलिखित ठरले होते.

दौंडकडे दौड सुरू झाली खरी पण रस्त्याची अवस्था पाहता ती दौड दुडकी ठरत होती. येथील हमरस्ता पाहता डोंबिवली शहरातील रस्ताही सुंदर वाटू लागला होता. फुटाफुटाला पडलेले खड्डे श्विन आणि विशेषतः स्कॉटची परीक्षाच पाहत होते. श्विन स्कॉट मधले अंतर वाढत होते, त्यामुळे श्विन थोड्या थोड्या अंतरावर स्कॉटसाठी थांबत असे.

स्कॉटची वाट पाहण्यासाठी विश्रांती घेण्यास श्विनला मिळालेले एक आसन



रस्ता खड्याखड्यांनी जोडलेला आहे असेच वाटत होते. श्विन पुढे जाऊन थांबत असल्याने श्विनला थोड्या थोड्या वेळाने विश्रांती मिळत होती. स्कॉटला मात्र वेग कायम राखता येत नसल्याने विश्रांतीसाठी न थांबता मार्गक्रमण करावे लागत होते. मजल दरमजल करत दोघेही दौंड च्या वेशीवर पोचले. चहापानाच्या निमित्ताने विश्रांती घेऊन झाल्यावर दोघांनी दौंडहुन सिद्धटेकच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. यापुढचा रस्ता पाहता प्रवास आणखीच बिकट होणार याची प्रचिती लगेचच येऊ लागली.

मध्यान्हीचा समय झाल्यामुळे सूर्यदेव डोक्यावर आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती फुलली होती. रस्त्यावरील खड्यांची महिरप अधिक फुलत होती. श्विन आणि स्कॉट अथकपणे पुढे सरकत होते. सिद्धटेक जवळ येत असताना एक अनोखे दृश्य श्विनला दिसले


बाजूच्या शेतात अनेक ट्रॅक्टर हारीने उभे होते. ते दृश्य पाहून श्विनने पुन्हा टाच मारली खरी, पण.. श्विनच्या वाहकावर रबरी नळीने बांधलेली सॅक आता धावकावर स्थिर राहायला तयार नव्हती. पाटस-दौंड- सिद्धटेक या रस्त्यावरील प्रवास त्या सॅकलाही मानवेनासा झाला होता. तिने आता अस्मादिकांच्या खांद्यावरूनच प्रवास करण्याचा हट्ट धरला. दोघांचेही सामान त्याच सॅकमध्ये होते. पण आता श्विनचा नाईलाज तर होताच मात्र दिलासादायक बाब म्हणजे सिद्धटेक आता जवळ होते. काही काळातच श्विन सिद्धटेकच्या वेशीवर पोचून स्कॉटची वाट पाहू लागली. शेजारीच सिद्धटेक येथील प्रसिद्ध झुणका भाकरी केंद्राची झोपडी होती. त्यातून श्विनला झुणका भाकरीविषयी विचारणा झाली. श्विन मात्र स्कॉटच्या प्रतीक्षेत होती. इतक्यात 'शशांक....' अशी हाक ऐकू आली. महड येथे भेटलेली उल्हासनगरची जोडगोळी उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर तेथे ... त्याच झोपडीत आराम करत होती. हितेश श्विनच्या स्वागताला पुढे आल्याबरोबर श्विनने खांद्यावरील सॅक हितेशच्या हवाली केली. इतक्यात स्कॉटही तेथे पोचली.
सॅक हितेशकडे दिल्यावर श्विन आणि स्कॉट सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोचले. सिद्धिविनायकाच्या पुजाऱ्याला दोघेही सायकलने अष्टविनायक दर्शन करत आहेत हे समजताच त्याने श्विन स्कॉटच्या मागणीप्रमाणे देवाचे हार सायकलकरीता दिले. श्विन आणि स्कॉटने ते हार परिधान करताच दोघांचा रुबाब आणखीच वाढला.



सिद्धटेक येथे आलेल्या भक्त गणांना श्विन आणि स्कॉटविषयी उत्सुकता वाटत होती. काहीजणांना श्विन आणि स्कॉट बरोबर छायाचित्र काढून घ्यायचे होते. श्विन स्कॉटने आनंदाने छायाचित्र काढू दिले. बरेच जण श्विनची चौकशी करत होते. त्याचदरम्यान डोंबिवली सायकल क्लबमधील श्री आवटीकाकांचे एक मित्र श्री दामले भेटले. श्री दामले सध्या पुणेकर असले तरी पूर्वी ते डोंबिवलीकर होते. मंदिरात थोडावेळ थांबून तेथे भेटणाऱ्या सिद्धिविनायकाच्या भक्तांशी गप्पा मारून श्विन स्कॉट पुन्हा निघाले. सिद्धिविनायकाचे मंदिर अतिशय सुंदर दिसत होते.



श्विन आणि स्कॉटला एव्हाना चांगलीच भूक लागली होती. उपेंद्र आणि हितेश थांबलेल्या झोपडीत गेल्यावर श्विन स्कॉटने जेवणाची फर्माईश केली. गरमागरम भाकरी, झुणका, वांग्याचे भरीत बरोबर कांदा, मिरचीचा ठेचा असा फक्कड बेत पाहून भरपेट जेऊन तेथेच ताणून द्यावी असा विचार येत होता. मात्र एव्हाना दुपारचे दोन वाजून गेले होते. श्विन स्कॉटला परत केडगाव चौफुल्याला जायचे होते तर हितेश आणि उपेंद्र मात्र दुसरा रस्ता पकडणार होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा रांजणगाव येथे भेटायचे ठरवून श्विन स्कॉटने त्यांचा निरोप घेतला.




आता पुन्हा एकदा सिद्धटेक दौंड पाटस या रस्त्याने जायचे होते. प्रत्येक पावला पावलाला श्विन आणि स्कॉटची परीक्षा घेतली जात होती. श्विन आणि स्कॉट चांगलेच तावून सुलाखून निघत होते.दोघेही MTB अर्थात माऊंटन बाइक श्रेणीतील  असल्याने त्यांचा निभाव लागत होता. मात्र दौंड अवघ्या ३-४  किमी वर असताना श्विनच्या रबरी  नळीतील हवा कमी होऊ लागल्याचे जाणवू लागले. धावकावरील सॅकचे वजन आणि रस्त्यातील खड्डे यामध्ये श्विनच्या मागच्या चाकातील रबरी नळीला छिद्र पडले होते. श्विन स्कॉटने रस्त्यात ठाण मांडून ते छिद्र शोधण्याचा प्रयत्न केला. ते छिद्र अतिशय सूक्ष्म होते.  केवळ डोळ्यांना किंवा कानांना ते छिद्र जाणवत नव्हते. श्विन स्कॉटला तेथे रस्त्यावर बसून रबरी नळीचे काम करताना पाहून एक दुचाकीस्वारही तेथे थांबला. त्याने सिद्धटेककडे जातानाही श्विन स्कॉटला पाहिले होते. त्यालाही श्विन स्कॉटच्या अष्टविनायक सायकलयात्रेविषयी उत्सुकता वाटत होतीच. तो आणि त्याचा साथीदार श्विन स्कॉटला मदत करू लागले. मात्र त्यांनाही ते छिद्र सापडले नाही. अखेरीस श्विनने पायउतार होत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. स्कॉट पुढे जाऊन चौकशी करू लागली. चौकशी करता जवळच मोठ्या गाड्यांच्या टायरचे काम करणारा कारागिर जवळ असल्याचे समजले. तो सायकलचे काम करणारा नसला तरी श्विनकडे सर्व साहित्य होते. श्विन स्कॉटची अष्टविनायक यात्रा लक्षात घेता त्या कारागिराने तत्परतेने मदत केली.

एव्हाना संध्याकाळ होऊ लागली होती. दौंड शहर सोडता सोडता दोघांनी चहा बिस्किटांचा समाचार घेतला. आता त्या फुटक्या रस्त्यावरूनही जलदीने जायचा दोघे प्रयत्न करू लागले. अंधार पडायच्या आत पाटस गाठण्यासाठी दोघेही आटापिटा करू लागले. मात्र तेजोनिधीने अर्ध्या रस्त्यातच श्विन स्कॉटची साथ सोडली. श्विन स्कॉटचे दिवे अपुरे पडत होते. अंधाराचे साम्राज्य चांगलेच पसरले. तरी पाटस टोल जवळ येत असल्याचे चिन्ह दिसत नव्हते. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही अश्या मिट्ट काळोखात दोघेही बेभानपणे पुढे सरकत होते. किती वेळ जातोय हे कळत नव्हते मात्र पाटस टोल नाका मात्र अजूनही येत नव्हता. प्रत्येक क्षण हा युगासारखा वाटू लागला होता आणि प्रत्येक पुढील पेडल मारताना अधिकाधिक धडकी भरत होती. अंधाराच्या साम्राज्यात स्कॉट किती मागे आहे हेही श्विनला कळू शकत नव्हते. अरुंद रस्ता आणि अंधार यामुळे मागे राहिलेल्या स्कॉटसाठी वाटेत कुठे थांबताही येत नव्हते. स्कॉटनेही जोर लावला होताच. थोडं थोड्या वेळाने पाटस टोळ आला असे वाटत होते, मात्र ते मृगजळाप्रमाणे होते.

बराच अवधी गेल्यावर अखेरीस पाटस नाका आला. तेव्हा मात्र श्विन स्कॉटच्या जीवात जीव आला. दोघांनी लगोलग तेथे भरपेट नाष्टा करून घेतला. श्विनने केडगाव चौफुला येथील इंद्रप्रस्थ लॉजमध्ये भ्रमणध्वनी करून एकूण प्रकारची कल्पना दिली. तेथील लॉजच्या व्यवस्थापक मालकाने पाटसपासून केडगाव चौफुला पर्यंत सेवा रस्ता असून सेवा रस्त्यानेच या असे निक्षून सांगत श्विन स्कॉट ला आश्वस्तही केले. त्यावेळी ते बोलही फार आधार देणारे ठरले. सकाळी साधारण १० वाजता ज्या पाटस टोल हुन सिद्धटेककडे जाऊन त्याच पाटस टोलनाक्याला परत आले तोपर्यंतचे ६६ किमी अंतर पार करेपर्यंत संध्याकाळचे ७.३०- ८ वाजले होते. ६६ किमीचे अंतर हे साधारणपणे सिद्धिविनायकाच्या दर्शनासह ५- ६ तासात कापले जायला हवे त्यासाठी तब्बल ९.३०- १० तास लागले होते.

मात्र इंद्रप्रस्थलॉजच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे पाटस हुन केडगाव चौफुलयापर्यंत सेवा रस्ता होता. मुख्य म्हणजे तो खड्डेविराहित होता. त्यामुळे पाटस हुन इंद्रप्रस्थ लॉजपर्यंत मात्र श्विन स्कॉट विनासायास पोचले.




मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

'तो माझा सांगाती' अष्टविनायक सायकल यात्रा लेख ४

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वसलेले तळेगाव एक शांत व सुंदर शहर. येथील प्रसन्न हवा आपल्याला नेहमीच ताजेतवाने करते. येथे रात्री घेतलेल्या विश्रांतीनंतर श्विन आणि स्कॉट पुन्हा सज्ज झाले होते.


पिंपरी चिंचवड येथील मित्रपरिवार आज वाटेत भेटणार होता. श्विन आणि स्कॉटने तळेगाव येथून सुरुवात करत असतानाच श्री सुनील ननावरे यांचा फोन आला. श्विन, सुनील ननावरे, सुनील पाटील यांची SOS (Saveoursahyadri) या सायकल मोहिमेदरम्यान छान गट्टी जमली होती. ही मोहीम सह्याद्रीचे संवर्धन करण्याचे महत्व सांगण्यासाठी श्री बिभास आमोणकर यांच्या संकल्पनेतून सुरू केली होती. नवापूर ते महाबळेश्वर हा उत्तर मार्ग आणि सावंतवाडी ते महाबळेश्वर हा दक्षिण मार्ग अश्या दोन मार्गांवर दोन स्वतंत्र गट या मोहिमेत सायकलिंगद्वारा जागृती करत होते.

डोंबिवली आणि ठाणे येथे भरलेली दोन सायकल मित्र संमेलनं, ननावरे- पाटील यांची मागील वर्षातील अष्टविनायक तसेच काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा, श्विन - स्कॉटची डोंबिवली पणजी सायकलयात्रा तसेच इतर छोट्या मोहिमा, भेटी यांद्वारे श्विनची पाटील- ननावरे आणि पिंपरी चिंचवड येथील सायकल मित्र गट यांच्याबरोबरची मैत्री अधिकाधिक दृढ होत होती. अर्थातच श्विन स्कॉटच्या या अष्टविनायक यात्रेमध्ये या मित्रपरिवाराशी भेट होणे स्वाभाविकच होते.

श्विन आणि स्कॉट इतकीच भेटीची उत्सुकता ननावरे आणि मित्रपरिवारालाही होती. म्हणूनच की काय श्विन स्कॉट तळेगावहून निघायच्या आधीच ननावरे थेट पिंपरीहून तळेगावच्या वेशीपर्यंत येऊन पोचले होते.

ननावरे यांच्या बरोबर भेट झाल्यावर चहापानासाठी एक थांबा घेतला गेला. श्विन स्कॉटला भेटण्यासाठी ननावरे यांचा मित्र आणि आयर्नमॅन या किताबाचा मानकरी श्री विशाल शेट्ये तेथे आले. श्री विशाल शेटे धावण्याचा सराव करत होते. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांची भेट झाली तेव्हा धावून थकवा आल्याचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. विशाल शेटे यांची प्रसन्न मुद्रा आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा स्कॉट आणि श्विनचा उत्साह वाढवत होती.


आयर्न मॅन विशाल शेट्ये यांची भेट झाल्यावर ननावरे यांच्यासह श्विन आणि स्कॉट पुढे निघाले. श्री सुनील पाटील यांच्याबरोबर पिंपरी चिंचवड येथील इतर मित्रपरिवार सुद्धा श्विन स्कॉट चे स्वागत करायला देहू टोळफाटा च्याही पुढे आला होता. खरंतर आज सुट्टीचा दिवस नसल्याने सगळ्यांना आपापल्या कार्यालयातही जायचे होते. तरीही श्विन स्कॉटबद्दल वाटत असलेल्या आपुलकी आणि प्रेमामुळे सर्वजण सायकलवरून पहाटे लवकर उठून दोघांना भेटायला आले होते.


निगडी येथील भक्ती शक्ती चौकापासून चिंचवडपर्यंत एकेक मित्र शुभेच्छा देत निरोप घेत होते. सुनील ननावरे यांचे सायकलिंग काही काळ थांबले होते, तरी ते श्विन स्कॉट साठी आज बऱ्याच दिवसांनी मोठ्या अंतराचे सायकलिंग करत होते. त्यांनी मात्र श्विन स्कॉटच्या बरोबर पुढील मार्गक्रमण सुरूच ठेवले. वाटेत नाशिक फाटा (कासारवाडी) येथे नाष्टा करून तिघेजण दापोडी- खडकी मार्गे येरवडा येथे पोचले. तेथून मांजरीकडे जाणारा मार्ग दाखवून सुनील ननावरे यांनी श्विन स्कॉटचा निरोप घेत दोघांना शुभेच्छा दिल्या.

इथून पुढे श्विन आणि स्कॉट दोघेजणच जाणार होते. वाटेतील रस्ता अत्यंत वर्दळीचा होता. त्यामुळे दोघांची गती बरीच मंदावली होती. पल्ला बराच मोठा होता. वाटेत इतर वाहनस्वार श्विनस्कॉटचे कौतुक करीत शुभेच्छा देत होते. श्विन त्या गर्दीतून पुढे सरकत असताना थोड्या थोड्या अंतरावर मार्ग योग्य असल्याची खात्री करत असे. त्याच दरम्यान एक सायकलस्वार श्विनला रस्ता दाखवण्यासाठी पुढे आला. श्विन त्याच्या बरोबरीने जात असताना गर्दीमुळे स्कॉट मागे पडू लागली. दरम्यान एका दुचाकीस्वाराने श्विन स्कॉटला दोघांबरोबर छायाचित्र काढून देण्याची मागणी केली. श्विन स्कॉटने आनंदाने त्याला होकार दिला. मात्र दरम्यान मार्गदर्शन करणारा सायकलस्वार थोडा पुढे गेला होता. त्यामुळे श्विन स्कॉट छायाचित्र काढून झाल्यावर त्या दुचाकीस्वाराचा निरोप घेत लगोलग निघाले. तो मार्गदर्शक सायकलस्वार, श्री सुभाष माने, पूढे जाऊन श्विन स्कॉटची वाट पाहत थांबला होता.

सुभाष माने हा होतकरू तरुण आपले गाव सोडून नोकरी व्यवसायानिमित्त पुणे येथे राहत होता. त्याला श्विन स्कॉटच्या अष्टविनायक यात्रेसंबंधी समजताच त्यालाही या यात्रेत सहभागी व्हावेसे वाटू लागले. मात्र त्या दिवशी रात्रपाळी करून त्याला तीन दिवसासाठी गावी जायचे होते. त्यामुळे त्याला या यात्रेत पुढे सहभागी होता येणार नव्हते. त्याबद्दल त्याला सारखी हुरहूर लागत होती. क्षणोक्षणी तो श्विनला मन मोकळे करून सांगत होता. त्याचे गंतव्यस्थान आले तरी तो श्विन स्कॉटला गर्दीतून वाट दाखवण्यासाठी पुढे येत होता. अखेरीस जेव्हा मोकळा रस्ता सुरू झाला तेथे त्याने श्विन स्कॉटचा निरोप घेतला. मात्र तोपर्यंत त्याने त्याची सायकल गंतव्यस्थानाच्या किमान ५-६ किमी पुढे पर्यंत दामटवली होती.



सुभाषमुळे रस्ता शोधत जावे नसले तरी आत्तापर्यंत लागलेल्या रहदारीच्या वाटेत अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागला होता. पुढे रस्ता मोकळा असल्याने श्विन आणि स्कॉटने वेग घेतला. वाटेत वळणे येतील तसतसा श्विन रस्ता विचारून घेत असे आणि स्कॉट दिसली की दोघे पुढे जात होते.

अष्टविनायकाच्या दर्शनाला निघालेल्या श्विन आणि स्कॉटला प्रत्येक वेळी त्या विनायकाच्या आशीर्वादाने मार्ग दाखवायला कोणी ना कोणी भेटत होते. जणू प्रत्यक्ष श्रीगजाननच कोणत्या कोणत्या रुपात मार्गदर्शन करत होते. एक अरुंद पुलावरून गेल्यावर दोन रस्ते पुढे जात असलेले श्विनने पाहिले. पूल संपल्यावर एक दुचाकीस्वार तिथे उभा असलेला दिसला. तो दुचाकी सुरू करण्याच्या आत त्याला गाठत श्विनने त्याला थेऊरकडे जाण्याचा रस्ता विचारला. ते होते नगरसेवा टाइम्सचे संपादक आणि पत्रकार संरक्षक समितीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री शिवराम कांबळे.



श्री कांबळे यांनी थेऊरचा रस्ता दाखवत श्विनला चहाचे निमंत्रण दिले. स्कॉट थोडी मागे होती. ती येताच दोघेही कांबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढील चौकात पोचले. तिथे कांबळे साहेबांनी श्विन स्कॉट या जोडीला नाथाभाऊ देवराम उंदरे पाटील दैनिक पुढारी पत्रकार (मांजरी खुर्द हवेली ,पुणे) अध्यक्ष-पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या कार्यालयात नेले. कांबळेसाहेब जितके अगत्यशील आणि विनयशील तितकेच नाथाभाऊ प्रेमळ आणि अगत्यशील. नाथाभाऊ घरातील वडीलधाऱ्याप्रमाणेच वाटत होते. श्विन आणि स्कॉटला त्यांनी नाष्टा करण्याचा आग्रह केला. खरतर श्विन स्कॉटला पुढील प्रवास दिसत होता, पण नाथाभाऊंच्या आग्रहाला नकार देणे शक्य नव्हते. त्यांचे घरही कार्यालयासमोरच होते. भाऊंनी श्विन स्कॉटला त्यांच्या घरीही नेले. तसेच नाष्टा चहा होईपर्यंत थेऊर संस्थानातील विश्वस्थ श्री तांबेमहाराज, रांजणगाव येथील पोलीस निरीक्षक श्री राऊतसाहेब तसेच इतर अनेक जणांना दूरध्वनी करून श्विन स्कॉटला वाटेत सर्वतोपरी मदत करण्याविषयी सांगितले. कांबळे साहेब आणि नाथाभाऊंच्या ह्या आदरातिथ्याने श्विन आणि स्कॉट भारावून गेले.



नाथाभाऊंचा निरोप घेऊन श्विन स्कॉट थेऊरकडे निघाले. श्री कांबळे यांनाही थेऊरलाच जायचे होते. त्यांच्या स्वयंचलित दुचाकीने स्कॉट श्विनला मागे टाकले. श्विन स्कॉट थेऊर येथील मंदिराशी पोचून तांबे महाराजांना भ्रमणध्वनी लावत असतानाच श्री कांबळे यांनी पुन्हा एकदा श्विन स्कॉटचे स्वागत केले. तेथून त्यांनी दोघांना मंदिराच्या आवारातील श्री तांबेमहाराजांच्या कार्यालयात नेले. तांबेमहाराज यांनी श्विनस्कॉटची विचारपूस करून त्यांना दर्शन घेऊन येण्यास सांगितले.

थेऊर हे क्षेत्र मूळा आणि मुठा या नद्यांनी वेढलेले आहे. धरानिधार महाराज देव यांनी बांधलेल्या येथील गणपतीच्या मंदिराला नवे रूप देत जवळपास १०० वर्षांनंतर पेशव्यांनी भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. युरोपीयनांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला तर दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशवे यांचा याच चिंतामणीसमोर क्षयरोगामुळे मृत्यू झाला. तसेच त्यापाठोपाठ त्यांची पत्‍नी रमाबाई सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.
मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. 

मंदिरातील विश्वस्थ श्री तांबेमहाराज यांच्या बरोबर आरतीला उपस्थित राहत श्विन आणि स्कॉटने श्रीचिंतामणीचे दर्शन घेतले.
एव्हाना मध्यान्ह उलटून गेली होती आणि अद्याप थेऊर ते मोरगाव हे अंतर पार करायचे होते. त्यामुळे स्कॉट थोडी चिंतेत होती. तरीही पहाटेपासूनच श्री चिंतामणी कोणत्या ना कोणत्या रुपात भेटत मार्गदर्शन करत असल्याने आणि चिंता दूर करत असल्याने श्विनला मात्र निश्चीन्त वाटत होते.

थेऊर सोडल्यावर सुरुवातीचा रस्ता अरुंद होता. मात्र थोड्याच वेळात पुणे सोलापूर महामार्ग लागला. हा लोण्यासारखा गुळगुळीत महामार्ग सुरू होताच श्विन आणि स्कॉट झपाट्याने पुढे सरकू लागले. काही अंतरावर 'येथे लस्सी पिता येत नाही खावी लागते' अश्या अर्थाचा मजकूर लिहिलेला दिसला. आजचे दुपारचे जेवण लस्सीवर उरकायचे ठरवून श्विन स्कॉटने तेथे थांबा घेतला. उरळीकांचन ते जेजुरी दरम्यानचा घाट टाळण्यासाठी दोघांनी सोलापूर महामार्गावरच वाटचाल सुरू ठेवली. घरकुल हॉटेलसमोरील एका गॅरेजमध्ये चौकशी करता श्विनला मोरगावला जाणारा खुष्कीचा मार्ग कळला. श्विन त्या मार्गाची चौकशी करत असताना स्कॉट पुढे निघून गेली होती. श्विनला तशी शंका आली तरी स्कॉटला मात्र श्विन मागे राहिल्याची कल्पना नव्हती. पुढे भांडगाव येथील हॉटेल यशोदासमोर थांबण्यासाठी श्विनने स्कॉटला भ्रमणध्वनीद्वारा सांगितले. दोघेही तेथे पोचल्यावर दोघांनी पुन्हा एकदा मोरगावला जाण्यासाठी भांडगावमार्गे जाणारा रस्ता आणि केडगाव चौफुला मार्गे जाणारा रस्ता या दोन्ही मार्गांची चौकशी केली. तेथील ग्रामस्थांनीही भांडगावमार्गे जाणारा रस्ता जवळचा तर आहेच शिवाय अधिक चांगला असल्याचे सांगितले. त्यानुसार श्विन आणि स्कॉट भांडगावमार्गे जाणाऱ्या रस्त्याकडे वळले. रस्ता अरुंद असला तरी निसर्गसंपन्न आणि अतिशय चांगल्या अवस्थेत होता. वाहतूक जवळपास नव्हतीच. जणू संपूर्ण रस्ता श्विन स्कॉटला आंदणच मिळाला होता. वाटेत फारशी वस्तीही नव्हती. दोघांना चहाची तल्लफ आली होती. बऱ्याच अंतरावर एक लहानसे खोपटवजा क्षुधाशांतिगृह दिसले. श्विन आणि स्कॉट लगेचच त्याकडे वळले



चहापान झाल्यावर ताजेतवाने झालेले श्विन स्कॉट पुन्हा मार्गक्रमण करू लागले. मात्र आता लागोपाठ चढ सुरू झाले होते. मात्र ते चढ फारसे तीव्र नव्हते आणि रस्ता अतिशय चांगला होता. थोड्या वेळातच एक छोटी खिंड लागली. नेमका तेवढा रस्ताही खराब अवस्थेत होता. श्विन त्यातून मार्गक्रमण करत असतानाच बाजूने एक चारचाकी आली आणि त्यातील प्रवाशांनी श्विनला थांबायला सांगितले. त्यांनी श्विनची आपुलकीने चौकशी केली. दरम्यान स्कॉट पुढे गेली. त्या चारचाकी मध्ये बारामती येथे राहणारे श्री लोणकर सर होते. त्यांनीही बारामतीमध्ये 'बारामती सायकल क्लब'ची सुरुवात केली होती.
श्विन स्कॉटच्या अष्टविनायक सायकलयात्रेचे त्यांना कौतुक वाटले. त्यांनी खिंड संपल्यावर चहा प्यायचे आमंत्रण दिले. खिंड छोटीशीच होती. ती संपल्यावर चारचाकी थांबवून लोणकर सर आणि त्यांचे सहकारी श्विन स्कॉटची वाट पाहत उभे होते. त्यांच्या बरोबर चहा पित गप्पा चांगल्या रंगत होत्या. मात्र आता सूर्यदेव उतरणीला लागला होता. तसेच मोरगावला ज्यांनी राहण्याची सोय केली होती त्या ढोले भाऊ ह्यांचाही दुरध्वनी खिंडीत असतानाच येऊन गेला होता. त्यामुळे गप्पा आटोपत्या घेत श्विन आणि स्कॉट भरधाव निघाले. आता स्पर्धा प्रत्यक्ष सूर्याशीच होती.
५.३० वाजून गेले तेव्हाही साधारण १०-१२ किमी अंतर बाकी होते. थोड्या वेळातच सुर्य केव्हाही त्याची प्रभा आटोपती घेऊ शकेल अशी चिन्हे दिसू लागली. श्विन आणि स्कॉट शक्य तेवढ्या जलदीने जाऊ लागले. मोरगावच्या मयुरेश्वराचीही श्विन आणि स्कॉटवर कृपादृष्टी होतीच. बहुधा त्याच्याच कृपेने काही अंतरावरच एक दुचाकीस्वार श्विनला भेटला आणि मोरगावच्या दिशेने मार्गदर्शन करू लागला. सुर्यदेवाने आपली किरणे आवरती घेतली तरी मयुरेश्वराने पाठवलेला तो दुचाकीवरील स्वार श्विनला प्रकाश दाखवत मार्गदर्शन करत होता. स्कॉटही पाठोपाठ येत होती. थोड्या वेळातच तिघेही सुपा मोरगाव  रस्त्याला लागले. तो दुचाकीस्वार श्विन स्कॉटला मयुरेश्वराच्या मंदिरापर्यंत मार्गदर्शन करणार होता, मात्र ढोले भाऊंनी श्विन स्कॉटला ग्रामपंचायतीजवळ असलेल्या माहेश्वरी भक्तनिवासापाशी येण्यास सांगितले होते. त्यामुळे मोरगावला पोचताच त्या दुचाकीस्वाराने निरोप घेतला. श्विन स्कॉट माहेश्वरी भक्तनिवासापाशी पोचले. तेथे व्यवस्था होऊ शकली नाही तेव्हा ढोले भाऊंनी मंदिराशेजारील दुसऱ्या भक्तनिवासात व्यवस्था करून दिली.

पहाटे सुनील ननावरे या सायकलमित्रापासून संध्याकाळी ढोले भाऊं पर्यंत अनेकांच्या रूपाने प्रत्यक्ष श्री विनायक क्षणोक्षणी आणि जागोजागी सोबत असल्याची भावना श्विन आणि स्कॉटला निद्रादेवीच्या स्वाधीन होताना जाणवत होती.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...