पृथ्वीप्रदक्षिणा करण्यासाठी कशाची आवश्यकता असते....? फक्त पहिले पाऊल उचलण्याची! खरोखरच, इतर पाऊले म्हणजे केवळ पुनरावृत्ती असते.
श्विन घरातच अडकली होती. त्याला आता जवळपास ६ महिने होत आले होते. अर्थात ह्या कालावधीदरम्यान एक दिवस श्विन बाहेर पडली होती, त्यालाही तीन महिने झाले होते. खरतर पहाटे लवकर उठावं लागू नये म्हणूनच तर श्विन गेली ९ वर्ष ६०-६२ किमीचा cycle2work प्रवास करत होती. आणि रस्त्यांच्या कामामुळे ते करणे अशक्य झाल्यामुळे श्विनचे बाहेर पडणेच थांबले होते. त्यातच ऑफिसला जाण्यासाठी आधी बस पकडण्यासाठी रोज अर्धातास पायी प्रवास आणि मग २-२.५ तास ऑफिसपर्यंत बस प्रवास तसेच संध्याकाळी असाच उलट प्रवास असा दिवसभरात साधारण ६ तासांचा प्रवास केल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून बाहेर पडणे श्विनला जीवावर येई.
इतर सायकलमित्रांच्या नियमित सायकलसफरी श्विनला घायाळ करत होत्या. प्रकाश पटवर्धन, रुपेशकुमार लालसंगी, विनायक वैद्य, मिलिंद तुंगारे ह्यांच्या सफरी आणि त्यादरम्यानची छायाचित्र पाहून तर श्विन चांगलीच अस्वस्थ होत होती. विशेषतः विनायकच्या लेखनामुळे तर अस्वस्थता चांगलीच वाढत होती. त्यातच घरातच शेजारी उभी राहणारी ट्रेक तर गेले सहाही महिने रोज ५० किमी रपेट करत होती. श्विन मात्र त्यामुळे चांगलीच कुढत होती. माझी तर श्विनकडे पाहण्याचीही हिम्मत होत नव्हती. गच्चीतील झाडांना रोज पाणी घालायला जाताना मी श्विनकडे चुकूनही बघत नसलो, तरी श्विनची क्रुद्ध नजर मला न बघताही कळत होती.
दरम्यान घरी थोडे फर्निचरचे कामही सुरू झाले होते. त्याची जबाबदारी नेहमीप्रमाणेच कॉलेजमधील माझा मित्र प्रवीण दाभाडे ह्याच्यावर सोपवली होती. त्याच्याकडे काम करणारा घनश्याम मला ओळखत होता. तोच कामाला येत असल्याने मीही निर्धास्त होतो. मात्र ह्या कामामुळे आता एकाच खोलीत कोंडून घ्यावे लागते होते. योगायोगाने मी सतीश आंबेरकरांचे 'दोन चाक झपाटलेली' वाचायला सुरुवात केली. त्यातील मुखपृष्ठापासूनच मन खाऊ लागले होते. आंबेरकरांचा प्रत्येक शब्द सृजनाचे काम करत होता. मनातील आळस झटकून कृतिशील झाल्याशिवाय सृजन गप्प बसणार नव्हता. सकारात्मक विचार सृजनशिलतेला पोषक असतात. आंबेरकर प्रत्येक वाक्यागणिक मनावर गारुड करू लागले होते. मी श्विनला नजरेआड ठेवले तरी पुस्तकातील शब्द मला अस्वस्थ करत होते.
घनश्याम गेले आठवडाभर येत होता. त्याने काल अचानक विचारले इतक्यात तळेगावला सायकलने जाऊन आलात की नाही. त्याला नाही म्हणून सहजपणे सांगितले खरे. पण आधीच पुरेपूर इंधन भरले होते त्यात काडी मात्र पडली होती.
आजही मी अंमळ उशिरा उठलो आणि आरामात आवरलं. ८-८.३० झाले होते. गच्चीतील झाडांना पाणी घालताना श्विनकडे निग्रहाने पाहिले. ती चांगलीच रुसली होती. तिने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मी समजलो. गपचूप घरात जाऊन पाणी आणि कोलीन घेऊन आलो आणि श्विनकडे गेलो. तिने आश्चर्यानेच माझ्याकडे पाहिले. मी तिला स्वच्छ केले. काहीही न बोलता हवेचा दाब पाहिला. हवा कमी होतीच. लगेच श्विनला उचलून दिवाणखान्यात आणले आणि हवा भरली. आता मात्र श्विन जरा खुलली. हो, अजून तिला माझ्यावर विश्वास नव्हताच. पण मग मी लगेचच श्विनच्या हँडलला पाऊच अडकवला. तेव्हा मात्र श्विन निर्धास्त झाली. मीही लगेचच तयार झालो. डोंबिवली सायकल क्लबची जर्सी, सायकलवण्यासाठी घेतलेली विशेष विजार, डोके आणि तोंडावरील सुरक्षाकवच आणि सायकलवण्यासाठीचे विशेष हातमोजे घालण्याचा योग बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे मीही थोडा उत्साहित झालो. तसाही मी लवकर उठण्याबाबत आळशी असल्याने बऱ्याचदा ७-८ वाजल्यानंतर निघून शतकी सफारी करत असे. त्यामुळे आजही ८.३० वाजता निघालो तरी काही फिकीर नव्हतीच.
मात्र बरेच दिवस सायकलवले नसल्याने आज जेमतेम १० किमी अंतर पार करून घरी यायचे असे ठरवले होते. जास्त पुढे जायचा मोह नको म्हणून पाण्याची बाटलीही घेतली नव्हती. तसेही एकमार्गी घर ते ऑफिस ३२ किमी सायकलवताना मला पाण्याची आवश्यकता लागत नसेच. डोंबिवली मधील खड्डे आणि खड्डयाना जोडणारे डांबराचे तुकडे पार करत मी पेंढरकर महाविद्यालयामार्गे कल्याण शीळ महामार्गाला लागलो. महारस्ता असल्याने हा रस्ता गुळगुळीत असेल अश्या भ्रमात राहू नका. नुकतीच ह्या रस्त्याच्या दुरावस्थेची नोंद गिनीज बुक मध्ये जाण्याची शक्यता आहे. महारस्ता असल्याने इथे महाखड्डे मात्र होते. खरतर एव्हाना मी ठरवल्याप्रमाणे एकतर्फी ५ किमी अंतर पार झाले होते. घरी जाईपर्यंत १० किमीपेक्षा जास्तच अंतर होणार होते. मात्र श्विन रंगात आली होती. तिने मला म्हटले आलो त्याच मार्गाने परत फिरण्यापेक्षा मानपाडा रस्त्याने परत जाऊ. मलाही काही विशेष वाटले नाही. मी तात्काळ होकार दिला. मात्र मानपाडा रस्त्याला वळण्याऐवजी श्विन तशीच सरळ जाऊ लागली. मी तिला चुचकारले, पण तिने लक्ष असल्याचेच दाखवले नाही. मी पुन्हा विचार केला कदाचित ती काटई नाक्याला जाऊन परत फिरेल.
तिथे तर श्विनने आणखीच वेग घेतला. मला म्हणाली आज सुट्टीचा दिवस आहे तर पालवाला नेहमीइतकी गर्दी आहे का ते पाहून परत येऊ. गेल्या सहा महिन्यातील तिचा राग जाणार असेल तर आणखी दोनेक किमी जायला माझीही हरकत नव्हती. पालवाचा चौक पूर्णपणे रिकामा असल्याचे पाहताच श्विन सुसाट निघाली. आधी खिडकाळी, मग कोकणरत्न असे म्हणत म्हणत श्विन थेट शीळ फाट्याला पोचली. मग मात्र मी तिचे हँडल थेट १८० अंशात वळवले. आता मात्र श्विनही काही कांगावा करू शकत नव्हती. एव्हाना आम्ही न थांबता आलो होतो. छायाचित्रणासाठीही थांबलो नव्हतो. परतीच्या प्रवासात मात्र नेहमीप्रमाणे चहासाठी नाही तरी छायाचित्रणासाठी कोकणरत्नला क्षणभर थांबलो. वाटेत Track&trail मध्ये रवी रहाणेचीही गाठ घेतली. रवी, साहिर शेख ह्यांच्यामुळेच कल्याण डोंबिवलीकरांना आधुनिक सायकली उपलब्ध झाल्या आहेत.
श्विनची सफरीची भूक भागत होती, मात्र माझ्या जठरातील अग्नी आता प्रदीप्त होऊ लागला होता. पुन्हा पेंढरकर महाविद्यालयापाशी पोचल्यावर मात्र पोटापेक्षा पोटऱ्याच अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागल्या. बऱ्याच दिवसांनी नव्याने सुरुवात करत असताना मी नेहमीच १०-१५ किमी पासून सुरुवात करत असे. पण आंबेरकरांच्या शब्दांनी केलेल्या जादूमुळे आज टाकलेले पहिले पाऊल थेट ३४ किमीचे ठरले होते.




