भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे....'
ही प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये प्रत्येकाने हजारो वेळा म्हटलेली आहे... प्रतिज्ञे मधील ह्या ओळी अगदी मुखोद्गतही झाल्या असतील. भारतीयत्वाचे वैशिष्ट्य सरोजिनी नायडू ह्यांनी अतिशय कमी शब्दात मात्र परिपूर्णपणे सांगताना म्हटले होते, 'भारतीयत्व म्हणजे विविधतेत एकता!'
अश्या ह्या देशातील विविध संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्याच्या उर्मी माझ्या मनात रुजल्या होत्याच. खरे म्हटले तर आपल्या प्रत्येकातच एक भटक्या दडलेला असतो. 'भटकंती' म्हणजे बाहेरील जगाचा आणि स्वतःच्या आतील शांततेचा शोध घेण्याची एक मुक्त प्रक्रिया आहे. आपला देश पहावा, देशातील वेगवेगळ्या संस्कृती अनुभवाव्या ही इच्छा तर होतीच. सायकलवरून फिरताना स्थानिक लोकांशी आपण सहजपणे जोडले जातो ह्याचा अनुभव होताच. त्यामुळे गेली काही वर्ष सायकल चालवत असताना सायकलवरूनच देश फिरावा असे वाटू लागले होते. भटकंती ही कोणत्याही उद्दिष्टविनाही असू शकते.
२०१९ च्या क्रीडादिना पर्यंत तरी माझ्या सायकलवरून देशभर फिरण्याला केवळ भटकंती करणे हाच उद्देश असावा. मात्र पंतप्रधानांनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी क्रीडादिनानिमित्त 'फिट इंडिया' ही संकल्पना मांडली आणि म्हटले की जरी ही संकल्पना सरकारने मांडली असली तरी ती नागरिकांनी पुढे न्यायची आहे. इतका निस्वार्थी, निर्मळ विचार लगेचच पटला.
स्वतः सुदृढ राहत असताना इतरांनाही त्यासाठी उद्युक्त करणे हा विचार मनाला भिडला होता. त्याहीपलीकडे 'फिट इंडिया ' ही एक चळवळ व्हावी ही इच्छा देखील किती निर्मळ! अश्या ह्या चळवळीचा भाग व्हावे...त्यात खारीचा वाट उचलावा असे मला मनापासून वाटले. ती संकल्पना मी पुढे कशी नेऊ शकतो ह्याचे उत्तर तर आधीपासूनच तयार होते.... खरतर आधी हा प्रश्नच समोर आला नव्हता..म्हणून कदाचित मला ते उत्तर दिसत नव्हते. देशभर सायकल सफर करताना ' फिट इंडिया ' हा संदेश देणे नक्कीच संयुक्तिक ठरणार होते. तशी सुरुवात करूनही झाली होतीच. २०१९ मध्ये पुणे जम्मू, २०२२ मध्ये कन्याकुमारी चेन्नई, २०२४ मध्ये कोलकाता चेन्नई अश्या ' फिट इंडिया ' संकल्पनेअंतर्गत तीन मोहिमा झाल्या होत्याच.
कोलकाता चेन्नई मोहीम सुरू असतानाच ह्या संकल्पनेमधील पुढील टप्पा कोलकाता गुवाहाटी मनात योजना घेत होता. कोलकात्याहून चेन्नईकडे म्हणजे दक्षिणेकडे सायकल चालवत असताना मन मात्र कोलकात्याच्या उत्तरेला असलेल्या गुवाहाटीकडे जाणाऱ्या रस्त्याचा अंदाज घेऊ लागले होते.
कोलकाता चेन्नई मोहीम सुरू होतानाच पुढील कोलकाता गुवाहाटी ह्या सायकल मोहमेचे सुतोवाच मी केले होतेच. भारताची उत्तर, पश्चिम, दक्षिण सीमारेषा सायकलक्रांत करत असताना पूर्व सीमारेषेबद्दल कुतूहलाची विशेष भावना होती. मागील वर्षी कोलकाता येथून सायकल मोहीम सुरू करत असताना कोलकाता शहराची उत्सुकता आणखीच वाढली होती. कोलकाता गुवाहाटी प्रवास हा मुख्यतः बंगालमधून तर अखेरीस आसाम मधून होणार होता. पूर्वोत्तर सात राज्यांची चाहूल ह्या मोहिमेद्वारे लागणार होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा