शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

१६ आणा बंगाली: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २६


जलपायगुडी हे शहर बांगलादेशच्या डोक्यावर आहे. आम्हाला आज गाठायचे होते अलीपूरद्वार! ह्या दोन शहरांमधील प्रवास हा बांगलादेशच्या डोक्यावरून होणार होता. आम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार होतो. आमच्या दक्षिण बाजूस बांगलादेश असणार होता तर आमच्या उत्तरेला आता भुतान सुरू होत होता. खरेतर आजचे अंतर जवळपास १३० किमी असणार होते. मात्र काल आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो तेथील काउंटरवरील इसमाने आम्हाला एक दुसरा मार्ग सांगितला ज्यामुळे आमचे अंतर जेमतेम ९५ किमी असणार होते. त्यामुळे आम्ही अगदी निश्चिंत झालो. साधारण ७.१५ वाजता आम्ही सायकलवयाला सुरुवात केली. 

थोड्याच वेळात आम्ही तिस्ता नदीपाशी पोचलो. नदीचे पात्र बऱ्यापैकी रुंद दिसत होते. मात्र नदीपात्रामध्ये पाणी अगदीच कमी दिसत होते. बरेचसे पात्र कोरडेच होते. आतील खडक उघडे पडले होते.  



नदीपात्र ओलांडून आम्ही पुढे निघालो. रस्ता आता जेमतेम दुपदरी होता. रस्त्याच्या दुतर्फा आता हिरवळ दिसू लागली होती. केळी, नारळासारखी झाडे पाहून कोकणातील निसर्गाची आठवण येऊ लागली होती. रस्त्यावर फार रहदारीही नव्हती. आम्ही सलगपणे ३७-३८ किमी अंतर पार केले.







धुपगिरी गावाजवळ आम्ही उजवीकडे वळलो. एव्हाना भुकेची जाणीव होऊ लागली होती. आम्ही वळण घेऊन थोडे पुढे गेलो अन् तिथे एक छानसे क्षुधाशांतीगृह दिसले. आम्ही चौकशी केली असता तिथे पुरीभाजी उपलब्ध असल्याचे समजले. आम्ही लगेचच ऑर्डर केली. पुरीबरोबर जी भाजी आली ती बटाटा आणि सोयाबीनची होती. भाजी अप्रतिम होती. आम्ही त्या पुरीभाजीचा चांगलाच समाचार घेतला. येथे छानसे मिष्टी दोही देखील आम्हाला मिळाले.

आजचे अंतर फार नसल्याने आम्ही अंदाज करत होतो की बहुतेक जेवण करायलाच आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू. जवळपास ३५-४०% अंतर तर दोन अडीच तासातच पार झाले होते. उरलेले अंतर साधारण ६० किमी होते. अगदी आरामात गेलो तरी चार पाच तासात अंतर पार करू शकू असे वाटत होते. आम्ही पुन्हा एकदा सायकलवायला लागलो. आमचा प्रवास मजेत सुरू होता. नाष्टा झाल्यावर आणखी साधारण २० किमी अंतर आम्ही पार केले. लवकरच आम्ही फलकाटा गाव गाठले. इथे आम्हाला अलीपुरद्वार गावाकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांपैकी योग्य पर्याय निवडायचा होता. आम्हाला हॉटेलमालकाने जवळचा रस्ता कोणता ह्याचे मार्गदर्शन केले होतेच. तरी पुन्हा एकदा योग्य मार्गाची खात्री करण्यासाठी मी तिथे चौकात एका दुचाकीस्वाराकडे अलीपुरद्वारकडे जाणाऱ्या रस्त्याची चौकशी केली. एक रस्ता सरळ जात होता तर एक उजवीकडे वळण घेत होता. त्या दुचाकीस्वाराने आम्हाला सरळ जायला सांगितले. हॉटेल मालकाने आम्हाला काल रात्री देखील ह्याच सरळ जाणाऱ्या रस्त्याने जायला सांगितले होते. त्यामुळे आमची खात्री झाली. 

आम्ही पुढे निघालो. रस्ता थोडा खराब दिसला. कदाचित २००-४०० मीटर संपल्यावर पुन्हा चांगला रस्ता सुरू होईल असे वाटत होते. आमचा वेग मंदावला होता. चांगला रस्ता किती अंतरावर आहे हे पुढे जाऊन बघण्यासाठी मी थोडा वेग घेण्याचा प्रयत्न केला. मनोज आणि संजय सावधपणे येत होते. आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसे आमच्या लक्षात आले की येथील डांबर, सिमेंट ह्यांचे रस्त्यावरील अस्तित्व नाहीसे होत आहे. जे अस्तित्व टिकून आहे तिथे त्याने एकाच स्तरावर राहण्याचे मनावर घेतलेले नव्हते. अर्थातच एक तर खड्डे किंवा मातीचा रस्ता हे दोन पर्याय आम्हाला उपलब्ध होते. आणखी थोड्या अंतरावर पुन्हा चांगला रस्ता सुरू होईल ह्या आशेवर आम्ही पाय मारत होतो. पुढे जात असताना लक्षात आले की रस्ता केवळ ओबडधोबड नव्हता तर त्यावर रेती आणि खडीही पसरली होती. सायकलचे चाक घसरू नये ह्याची काळजी घेण्यासाठी आमचा वेग चांगलाच कमी झाला होता. चाक घसरण्याबरोबर सायकल पंक्चर होऊ नये ह्याचीही काळजी वाटू लागली होती. रस्त्याचे काम सुरू असल्याचे लक्षात येत होतेच. रस्त्याच्या कडेला खडी, रेतीचे ढीग लागले होते. शिवाय एकदा रस्त्याची डावी बाजू रहदारीसाठी उपलब्ध होती तर एकदा उजवी बाजू उपलब्ध होती. आता आम्हाला खोखोमध्ये पळतीचा खेळाडू जसे प्रतिपक्षाच्या खेळाडूंच्या रांगेमधून इकडून तिकडे, तिकडून इकडे पळत असतो तसे आम्हीही त्या रेताड जमिनीच्या एका बाजूकडून दुसरीकडे न कंटाळता (!) जात होतो.





आम्ही घेतलेला शॉर्टकट आम्हाला चांगलाच महाग पडला होता. सूर्यही आमच्यावर कोपला होता. ती आग वरून भाजून काढत होतीच. त्यातच पोटातील आगही पेटू लागली होती. आम्हाला अंतर वाचवण्यासाठी त्या हॉटेलमालकाने तसेच आज भेटलेल्या दुचाकीस्वाराने हा मार्ग सांगितला खरा. मात्र येथील रस्त्याचे काम सुरू होते, हा नवीन मार्ग तयार होत होता ही माहिती आम्हाला सांगितली गेली नव्हती. एक तर दुपारचे ऊन, पोटात पडलेली आग आणि हा अनपेक्षितपणे लागलेला वाळवंटी प्रदेश आमची परीक्षा घेत होते. ह्या संपूर्ण मार्गात क्षुधाशांती करण्यासाठी छोटेसे खोपटही दिसत नव्हते. 

जवळपास १८ किमी आम्ही कसेबसे पार केले आणि रस्त्याच्या डावीकडे एक मोठे खंडार ओलांडून एक दुकान दिसले. मोठ्या आशेने आम्ही तिकडे गेलो. तिथे आम्हाला थंड पेय आणि पाणी मिळाले. दुकानदारही चांगला होता. त्याच्याशी गप्पा मारत आम्ही थोडा विसावा घेतला. उरलेले अंतर फार नव्हते, मात्र पोटातील भूक आणि डोक्यावरील उन्हे आता पाय मारायला देत नव्हते. त्या दुकानात थंड पाणी घेऊन चेहरा धुवून काढला. पाठीच्या मणक्यावरून गार पाणी सोडले. थोडा विसावा घेतल्यावर मात्र आम्ही थोडे ताजेतवाने झालो.

सुदैवाने शेवटचे २० किमी मात्र रस्ता जुना होता... त्यामुळे चांगला होता. त्यामुळे त्या दुकानापासून सलग सायकलवत आम्ही अलीपूरद्वार गाठले. वाटेतील रस्त्यामुळे आज सायकलची देखभाल गरजेची होती. आम्ही हॉटेलमध्ये सामान ठेवून सायकल चालवण्याच्याच वेषात सायकली घेऊन सायकल दुरुस्तीच्या दुकानात गेलो. अरुंद बोळात एक छोटेसे दुकान होते. दुकानदार अतिशय मन लावून काम करत होता. 



आमचा पोशाख आणि सायकली पाहून तेथील लोक आमची विचारपूस करू लागले. त्यातील एकजण जास्तच उत्साहित झाला होता. मात्र त्याचा उत्साह त्याच्या मूळ स्वभावापेक्षा त्याने घेतलेल्या द्रव्यामुळे होता हे लगेचच लक्षात आले. त्याच्या द्रव्याचा त्याच्यावर चांगलाच परिणाम झाला होता. संजय आणि मनोज शांत उभे होते. मी मात्र माझे मनोरंजन करून घेत होतो. थोड्या वेळात मलाही कंटाळा आला. मनोज माझ्या सहाय्याला धावला. त्या माणसाच्या आणि माझ्या संभाषणात मनोजने भाग घेतल्यावर मी हळूच बाजूला झालो.

सायकल मेकॅनिक मात्र इकडे तिकडे ढुंकूनही न पाहता काम करत होता. त्याला आमच्या मोहिमेची माहिती एव्हाना समजली होतीच. शिवाय तो खरोखरच खूप मेहनती माणूस होता. आमच्या सायकली त्याने अगदी साफसूफ करून दिल्या. चेन मध्ये तेल टाकायला सांगितल्यावर त्याने ते काम तर केलेच शिवाय सायकलच्या इतर छोट्या छोट्या भागांचीही त्याने काळजी घेतली.

 

सायकल दुकानासमोर एक छोटेसे उपहारगृह होते. त्याची मालकीण  आमच्याकडे आली. तिने आमची चौकशी केली आणि आम्हाला चहा विचारला. आम्ही हो म्हणताच ती खुष झाली. आम्हाला बजावले चहा प्यायल्याशिवाय जाऊ नका. इतर लोक आमची चौकशी करत होते. थोड्या वेळात त्या बाईने आम्हाला चहा दिला आणि आम्ही नाही म्हणत असताना जबरदस्तीने बिस्किटेही दिली. आम्ही चहा बिस्किटे घेतल्यावर तिला खूप आनंद झाला. आमच्यासाठी काय करू आणि काय नाही असे तिला झाले होते. आम्ही जायला निघालो तर आमच्या पायाच पडायला लागली. ती मुळची आसामची आहे. आम्ही गुवाहाटी पर्यंत जाणार हे समजल्यावर ती खूप भावूक झाली होती.



तिचा भाऊदेखील तिथे होता. तो पूर्वी काही काळ मुंबईत राहून गेला होता. तो मात्र आमच्याबद्दल थोडा साशंक होता. त्याचा मुंबईतील अनुभव चांगला नव्हता असे त्याच्या बोलण्यावरून वाटत होते. तसेच तो हे मान्य करायलाच तयार नव्हता की कोणताही आर्थिक लाभ मिळणार नसला तरी आम्ही सायकलवरून अशी मोहीम करत आहोत. त्याच्या दृष्टीने आम्हाला शासकीय आर्थिक लाभ मिळण्यासाठी आम्ही अश्या मोहीमेत भाग घेत आहोत. आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की आर्थिक लाभापेक्षा आपण अनेक गोष्टी आनंद, समाधान मिळणे ह्यासाठीही करत असतोच. काही लोक चित्रपट बघायला जातात, काही पर्यटनाला जातात त्यासाठी सरकारकडून मदत मिळत नाही. मात्र तरीही ते मिळणाऱ्या आनंदासाठी चित्रपट बघतात किंवा पर्यटन करत असतात. तसेच आम्हीही आनंद मिळण्यासाठी आणि विविध भाग बघण्यासाठी सायकल पर्यटन करत आहोत. तो थोडा अंतर्मुख होऊन विचार करू लागला पण त्याचे मन मात्र साफ झाले नव्हते.

दुपारी जेवण झाले नव्हतेच. त्यामुळे आता रात्री तरी पोटभर आणि चांगले जेवण हवे होते. आम्ही तिथे जेवणासाठी चांगल्या हॉटेलची चौकशी केली. तेथील लोकांनी आम्हाला १६ आणा बंगाली ह्या हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आम्ही राहत होतो त्या लॉजपासून ते हॉटेल साधारण अडीच तीन किमी लांब होते. आम्ही रिक्षा करून तिथे गेलो. बाहेरूनच ते हॉटेल छान वाटत होते. गर्दीही बऱ्यापैकी होती. बरेचजण कुटुंबासह तिथे आले होते. आम्ही मेनुकार्ड बघत ऑर्डर दिली. हॉटेलचा थाट वेगळाच होता. पितळेच्या लख्ख केलेल्या ताटामध्ये पदार्थ मांडले जात होते. पिण्याचा पेला, पाण्याचा जार पितळ्याचेच होते. पदार्थात ही वैविध्य होते. बंगाल मध्ये असताना मत्स्याहार तर हवाच. पांढरा शुभ्र भात त्यावर विराजमान झालेली मासोळी त्याभोवती पद्धतशीरपणे भाज्या, डाळ आणि इतर चविष्ट पदार्थ ह्यांची रेलचेल होती. भात अमर्यादित होता. आम्ही अगदी तृप्त होईपर्यंत आडवा हात मारला आणि दुपारच्या चुकलेल्या जेवणाचीही भरपाई करून घेतली.







माझे एक मित्र श्री प्रमोद हेबळी ह्यांच्या शब्दात सांगायचे तर...आमचा प्रवास मानवी कथांच्या एका सुंदर संग्रहासारखा उलगडत चालला होता. सामान्य लोकांच्या मनात माणुसकी किती खोलवर रुजलेली आहे, याची प्रचिती आजच्या अनुभवातून पुन्हा एकदा आली. खडतर रस्ता, कडक ऊन आणि वाटेत अचानक आलेला तो 'वाळवंटासारखा' पट्टा—हे सर्व असूनही, त्या छोट्या गल्लीत पोहोचताच आम्हाला जी मनापासूनची आपुलकी मिळाली, ती खरोखरच मोलाची होती.

सायकल दुरुस्त करणाऱ्या त्या व्यक्तीचा साधेपणा, स्थानिकांची आमच्याशी बोलण्याची उत्सुकता आणि चहा-बिस्किटांचा पाहुणचार देणाऱ्या त्या माऊलीची मनापासूनची आत्मीयता—या सर्व गोष्टी आपल्या देशाची खरी संस्कृती आणि माणुसकी दर्शवतात. कधीकधी अनोळखी माणसेही आपल्या अपेक्षांपेक्षा कितीतरी अधिक प्रेम आणि जिव्हाळा देतात; आणि असे क्षण आपल्या स्मरणात कायमचे कोरले जातात.

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

टाईम मशीन: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग २५

इस्लामपूर हे मुळात बिहारमधील एक गाव जे १९५० च्या दशकात पश्चिम बंगालमध्ये समाविष्ट करण्यात आले. उत्तर दिनाजपुर जिल्ह्याचे हे मुख्य ठिकाण. बिहार आणि सिलिगुडीचा अरुंद परिसर ज्याला चिकन नेक म्हणतात त्यापासून हे शहर अगदी जवळ आहे. ह्या शहरापासून नेपाळची सीमा साधारण ३०० किमी तर बांगलादेशची सीमा १२५ किमी अंतरावर आहे. आमचा प्रवास आज बांगलादेश बोर्डरच्या जवळून होणार होता

सकाळी आम्ही इस्लामपूर ह्या गावातून निघालो ते जरा उशिरानेच. आमचे आजचे अंतर जेमतेम १०३ किमी होते. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. हवा छान होती. 




सकाळी १० च्या सुमारास आम्ही दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता. हा जिल्हा हिमालय पर्वताच्या पायथ्याशी उत्तर पश्चिम बंगालमध्ये वसलेला आहे. एव्हाना सूर्य डोक्यावर आला होता. हिमालयाच्या पायथ्याशी असूनही एव्हाना गरमा जाणवू लागला होता. चहाच्या मळ्यांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. सिलिगुडीपासून २०-२५ किमी अंतरावर असतानाच आम्हाला  चहाचे मळे दिसू लागले होते.


आमची आजची जलपायगुडी येथील रहायची सोय झालेली नव्हती. Couchsurfing वर एकाने मला बऱ्याच दिवसांपूर्वी सोय होईल असे कळवले होते. मी कालपासून त्याला मेसेज पाठवत होतो. मात्र त्याचे काहीही उत्तर येत नव्हते. गुवाहाटी येथील आमचे स्नेही रवींद्र हणमत्तेकर ह्यांना जलपायगुडी येथे काही सोय होऊ शकते ते विचारले. मात्र त्यांनी सांगितले की ते सिलिगुडी येथे आमची सोय करू शकतील. सिलिगुडी शहर आमच्या मार्गापासून २५ किमी लांब होते. तिथे मुक्काम केला तर उद्याचे अंतर तब्बल ५० किमीने वाढले असते. त्यामुळे मी त्यांना सिलिगुडी येथे आम्हाला राहता येणार नाही असे सांगितले.







हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ह्या परिसरात सकाळचा नाष्टा झाल्यावर बराच वेळ काही खायला मिळत नव्हते. आम्ही नेटाने सायकलवत होतो. जवळपास ६५ अंतर पार केल्यावर आम्ही तिस्ता नदीजवळ पोचलो. तिथे एक बॅरेज दिसत होते. ते तीस्ता/फुलबारी बॅरेज होते. उत्तर बंगाल आणि शेजारील राज्यांकडे होणाऱ्या प्रादेशिक व्यापारासाठी व प्रवासासाठी हे एक प्रवेशद्वार होते. सुदैवाने आमची राखीव एनर्जी संपण्याआधीच तिस्तानदीजवळील त्या बॅरेज जवळ एक छोटे खोपट दिसले. तिथे जेवण्यासाठी थांबलो. येथून बांगलादेश सीमा अगदीच जवळ होती. बांगलादेशमधील टॉवर्स आम्हाला दिसत होते. आम्ही जेवणाची ऑर्डर दिली. तेथील लोकांना आमच्याविषयी कुतूहल वाटत होते. त्यातील दोघे आमच्यापाशी आले. एकजण म्हणाला, 'कोलकातापासून तुम्हाला इथे यायला सहा दिवस लागले! कोलकाताहून बाईकवरून तर एका दिवसात येता येते.' मी त्यांना म्हटले, 'विमानाने मुंबईहून कोलकाता देखील दोन तासात येता येते. मात्र त्यामुळे टेक्नॉलॉजी समजेल. आम्हाला टेक्नॉलॉजी समजून घ्यायची नाहीये तर माणसे समजून घ्यायची आहेत.' हे ऐकून दोघेही अगदी खूष झाले. ते म्हणाले इथून थोडे पुढे गेलात की एक मिठाईचे दुकान दिसेल. तिथे नक्की मिठाई घ्या. मिथुन चक्रवर्ती इथे आला की त्या दुकानातून नक्की मिठाई घेऊन जातो.  



तिथे जेवून निघालो तेव्हा १ वाजून ४८ मिनिटे झाली होती. पुढे ३-४ किमी अंतरावर फुलबाडी गाव होते. तो ३-४ किमीचा रस्ता खडबडीत असल्याने बराच वेळ गेला. खडबडीत रस्ता संपताच फुलबाडी गाव लागले. फुलबाडी हे भारत-बांगलादेश सीमेवरील आंतरराष्ट्रीय रस्ते सीमा-ओलांडण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ह्या शहराला 'लँड पोर्ट फुलबारी' म्हटले जाते, जे बांगलादेशाकडील बाजूला असलेल्या 'बांग्लाबांधा' ला जोडलेले आहे. मिथुन चक्रवर्ती ज्या दुकानात मिठाई घेत होता ते दुकान काही आम्हाला दिसले नाही. मात्र तिथे एका चौकात बंगला देश २ किमी असा फलक दिसला.

आम्हाला तिथे फोटो काढायचा मोह आवरत नव्हता.

'अमर फोटो स्टुडिओ' नावाचे एक नाटक आहे. त्यात एक फोटोग्राफर असतो. त्याच्या कॅमेऱ्यामध्ये जादू असते. फोटो काढला की माणूस time travel करतो.

तसेच काहीसे झाले. आम्ही तिथे फोटो काढले खरे..... आणि लक्षात आले की आम्हीही 'अमर फोटो स्टुडिओ' तील प्रसंगांप्रमाणे फोटो काढल्याबरोबर time travel केला आहे. त्या नाटकात अनेक वर्षे काळ बदलत होता. बहुधा आमचा कॅमेरा तेवढा powerful नव्हता. आम्ही जेमतेम तासभरच time travel करून मागे गेलो होतो. हो, आम्ही चक्क एक तास भूतकाळात परत गेलो होतो.

जेवण झाले तेव्हा १.४८ वाजले होते. त्यानंतर आम्ही फोटो काढला तोपर्यंत आणखी २० मिनिटे झाली होती. पण वेळ २ वाजून ८ मिनिटांऐवजी १ वाजून ८ मिनिटे झाली होती. आम्ही चक्क एक तास time travel करून भूतकाळात गेलो होतो. बहुधा बांगलादेशमधील टॉवर्सनी ही जादू केली होती.





आम्ही फुलबाडीहून पुढे निघालो. अजूनही हवेतील गरमा कमी होत नव्हता. वाटेत मी थंड पाण्याच्या दोन बाटल्या विकत घेतल्या. त्यातील एक बाटलीतील पाण्याने चेहरा धुतला. पाठीवरून थंड पाणी सोडले. तरी उष्णता जाणवतच होती. अखेरीस चहाच्या निमित्ताने थांबत आम्ही थोडा विसावा घेतला. तेथील हॉटेलमालकाकडे एक लिंबू मागितले. ते चांगलेच मोठे होते. माझ्या थंड पाण्याच्या बाटलीत ते लिंबू पिळले. लिंबू पाण्याचा आस्वाद घेत पुन्हा सायकलवायला लागलो. थोड्याच वेळात आम्ही जलपायगुडी येथे पोचलो. सुरुवातीला दोन लॉज आम्हाला पसंत पडले नाहीत. मात्र तिसरा लॉज आम्ही नक्की केला. येथील रिसेप्शन काउंटर वर दोनतीन जण होते. त्यांनी आमची चौकशी केली. आमची मोहीम ऐकून ते एकदम खुष झाले. त्यातील एका माणसाने आम्हाला पुढे अगदी गुवाहाटी पर्यंत जायच्या मार्गाचे मार्गदर्शन केले. आम्हाला अद्याप त्यासाठी चार दिवस लागणार होते. त्यातही उद्याच्याच दिवशी आम्ही जो मार्ग निवडला होता त्याला पर्यायी असणारा मार्ग त्यांनी आम्हाला सांगितला. खरंतर मी निवडलेल्या मार्गाने आमचे अंतर १३० किमी होते. मात्र त्या रिसेप्शनिस्टने सांगितलेल्या मार्गाने आमचे उद्याचे अंतर फक्त ९५ किमी असणार होते.

 ह्या भागात साधारण ४-४.३० ला सूर्यास्त होतो. आम्ही त्या आधी पोचलो होतो. त्यामुळे एक फेरफटका मारता येणार होता. आम्ही आमच्या सायकली आणि सामान ठेवून बाहेर पडलो. सौरव गांगुली चे दुमजली घर आम्हाला दिसले. मात्र हा सौरव ऍडव्होकेट होता.



चहा घेऊन आम्ही लॉजवर आलो. तोपर्यंत साधारण ५.३० वाजले होते. अंधार मात्र मुंबईतील रात्रीचे ८.३० वाजल्यावर असतो तसा दिसत होता. अजूनही हवेतील गरमा मात्र जाणवतच होता.


रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

विपरीत भीती आणि बरेच काही: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग २४

गजोल येथे आम्हाला लॉजमध्ये प्रवेश का नाकारण्यात आला त्याचे कारण आम्हाला रात्री समजले. दिल्ली येथे एक भीषण आत्मघातकी स्फोट झाला होता. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून दीड हजार किमी लांब असलेल्या गजोल शहरातही अधिक काळजी घेतली जात होती. त्यामुळे आमच्याकडे कोणाचा संदर्भ नसल्याने पहिल्या दोन लॉजमध्ये आम्हाला मुक्काम करण्यास मज्जाव करण्यात आला तर ज्या लॉजमध्ये आम्हाला मुक्काम करण्याची परवानगी मिळाली तेथे आमच्या ओळखपत्राची प्रत तर घेतलीच ह्याशिवाय आमचे फोटोही काढण्यात आले.


अर्थात आम्हाला दिवसभर सायकलवल्यामुळे रात्री झोप मात्र शांतपणे लागली. पहाटे जरा लवकर सुरुवात केली. साडेसहाच्या सुमारास आम्ही गजोल सोडले होते. गाव तसे लहानच होते त्यामुळे आम्ही लगेचच महामार्ग गाठला. आम्हाला आज इस्लामपूर येथे पोचायचे होते. दोनेक तास सायकलवाल्यावर मी नाश्त्यासाठी ठिकाण शोधू लागलो. रस्त्याच्या डाव्या बाजूला माँ तारा हॉटेल अँड रेस्टॉरंट असा फलक दिसला. समोर बरीच मोकळी जागा होती.. तिथल्या मातीच्या पटांगणामध्येच मस्तपैकी छत्री आणि टेबल खुर्च्या लावलेल्या दिसल्या. इतका जामानिमा पाहिल्यावर आम्ही तिथेच नाश्ता करायला थांबलो. 





साधारणपणे ३७ किमी अंतर पार झाले होते. अजून १०० किमी अंतर आज पार करायचे होते. नाश्ता करत आम्ही थोडे सुस्तावलो होतो. एकदा सायकलवर बसल्यावर मात्र अगदी सहजपणे वेग घेतला. 






नाश्ता झाल्यावर जेमतेम १२-१३ किमी पार झाले असावेत. आजूबाजूला सुंदर निसर्ग आमचा उत्साह वाढवत होता. हवादेखील छान होती. आम्ही अगदीच निश्चिंतपणे जात होतो. महामार्ग असल्यामुळे सायकलीदेखील अगदी सहजपणे जात होत्या. तसे पाहता काळजीचे काहीही विशेष कारण नव्हते. मात्र अचानकपणे जे दिसले त्यामुळे मात्र मी थबकलो. प्रत्यक्ष ' भीती ' आमच्यासमोर दिसत होती


भीती पार केली आणि आम्ही पुन्हा निर्धास्तपणे जाऊ लागलो. इतक्यात समोरून एका मध्यमवयीन स्त्रीने आम्हाला थांबण्यासाठी खूण केली. लांब बाह्यांचा सदरा, गळ्यामध्ये गोल फिरवून पुढे खाली सोडलेले एक शालवजा वस्त्र अश्या वेशातील त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. आम्ही तिच्यापाशी थांबलो. तिचे नाव होते देबश्री सरकार. तिने आस्थेवाईकपणे आमची चौकशी केली. मी आमच्या मोहिमेबद्दल तिला सांगितले. ती स्वतःही चांगलीच भटकी होती. ती भारतातील तब्बल २१ राज्यात एकटी फिरलेली होती. मी देखील तेव्हा पर्यंत मी पार केलेली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ह्यांची मोजदाद केली. ती संख्या देखील २१ होत होती. मी देबश्रीला म्हटले आपल्यामध्ये टाय आहे. तिची भटकंती खरोखरच अचंबित करणारी होती. मग मी तिला couchsurfing बद्दल माहिती दिली. तिच्या पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा दिल्या तिनेही आम्हाला शुभेच्छा दिल्या. 


आम्ही पुन्हा लय पकडली. आमच्या सायकली वेगात धावू लागल्या. महामार्ग असल्याने सायकली दौडत होत्या. हा महामार्ग पुढे डालखोला शहरामार्गे जात होता जो बिहारच्या सीमारेषेजवळून जातो. थोडे अंतर बिहार मधूनही जातो आणि पुढे इस्लामपूर येथे पोचतो. डालखोलाच्या आधी वाटेत बोतोलबारी येथे एक रस्ता उजवीकडे रासखोवा गावाकडे जातो. त्यामार्गाने देखील इस्लामपूर गाठता येत होते. मात्र तो महामार्ग नव्हता तर अरुंद रस्ता होता.

डालखोला शहरामार्गे जाणारा रस्ता महामार्ग असला तरी जवळपास २० किमी अंतर वाढवणारा होता. त्यामुळे आम्ही बोतोलबारी येथे थांबलो. तिथे चहा घेत थोडी चौकशी केली. तेव्हा समजले की त्या ऐवजी जो दुसरा मार्ग आहे तो सुद्धा चांगला आहे. बोतोलबारी येथे आम्ही राष्ट्रीय महामार्गाचा निरोप घेत बोतोलबारी रासखोवा हा मार्ग निवडला. 

एव्हाना दुपारचे १२ वाजले होते. जवळपास ७० किमी अंतर बाकी होते. गजोल येथे आमची राहण्याची व्यवस्था अगदी नशिबानेच झाली होती. मात्र आज इस्लामपूर येथे आमच्या राहण्याची व्यवस्था कोलकाता येथील आमचे मित्र श्री संदीप चटर्जी ह्यांनी केली होती. त्यांचे एक स्नेही माणिक बिस्वास ह्यांनी आमची व्यवस्था करत असल्याचे कळवले होते. तरी आज उजेडात तिथे पोचायचे होते. खरेतर मी संदीपला इस्लामपूरच्या थोडे आधी धंतोला येथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते का हे विचारले होते. तिथे डालखोला मार्गे जाणाऱ्या महामार्गाला रासखोवा मार्गे जाणारा रस्ता जोडला जात होता. त्यामुळे ते थोडे मोठे शहर असावे असे मला वाटले होते. मात्र संदीपने मला सांगितले की धंतोला हे काही शहर नाही, किंबहुना तिथे हॉटेल/ लॉज मिळण्याची शक्यताही जवळपास नाहीच. अर्थात आम्हाला इस्लामपूर गाठणे क्रमप्राप्त होते.

त्यामुळे आम्हाला आता जलदीने जावे लागणार होते. बंगालमधील सायकल सफरीचा आजचा पाचवा दिवस होता. कोलकाता येथून आम्ही गुवाहाटीची दिशा पकडली होती. मात्र अचानक आम्ही पोचलो ते गोव्याला. आमच्या समोर फलक स्पष्ट दिसत होता.... गोआगाव! 


मात्र इथे रस्ता आमची परीक्षा पाहू लागला होता. बंगालमधील गोआगावात चक्क पेव्हर ब्लॉक लावून रस्ता तयार करण्यात आला होता. ते पेव्हर ब्लॉकचे काम इतके छान झाले होते की सायकलची घंटी न वाजवताही ती आपोआप वाजत होती. प्रत्येक क्षणाक्षणाला सायकल तिचे स्नायू वाजत असल्याचे सांगत होती. नशिबाने लावलेल्या पेव्हरब्लॉक ला खड्डे पडले नव्हते. वेग घेण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त आपला तोल सांभाळायचा होता. इतक्यात काही मुले आमच्याबरोबर सायकल चालवू लागली. १०-१२ वर्षाची ती मुले आम्हाला पाहून उत्साहित झाली होती. त्यांना आमच्याबरोबर फोटो काढायचा होता. अखेर गोआ गाव सोडत असताना एका चौकात आम्ही त्यांच्याबरोबर फोटोसेशन केले. 






एव्हाना दोन वाजून गेले होते. पोटात इंधनाची गरज जाणवू लागली होती. गोआ गावापासून रस्ता अरुंद तर होताच पुढे रहदारी आणि माणसांची गर्दीही दिसू लागली. ते एक छोटेसे गाव होते... ताजपूर! मी पोटात इंधन भरण्याजोगे काही दिसते का हे शोधत होते. एका चौकात वळताच तिथे एक उपहारगृह दिसले. तिथे फळेही ठेवलेली दिसत होती. एक कुटुंबच ते उपहारगृह चालवत होते. जेवण्यासाठी थाळी तिथे नव्हती. मात्र समोसा, लाडू असे काही पदार्थ होते. आम्ही लाडू मागवले. मालक, मालकीण आणि त्यांचा साधारण तिशीत असलेला मुलगा तिथे होते. आम्ही मुंबईहून आलो आहेत हे ऐकताच ते आमच्याशी गप्पा मारू लागले. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे. मुंबई आणि राजस्थान दोन्ही भारताच्या पश्चिम सीमारेषेजवळ... मात्र आम्ही भेटत होतो भारताच्या पूर्व सीमारेषेजवळ.



गप्पा आणि उदरभरण आटोपते घेत आम्ही पुढे निघालो. आम्ही सायकलवत असताना बरेचजण आम्हाला सिलिगुडीला चाललात का असे विचारत होते. गुवाहाटीला जाणारा रस्ता सिलिगुडी जवळून जातो हे मला माहित नव्हते. त्यामुळे मी मात्र थोडा गोंधळात पडलो होतो. मी माणिक बिस्वास ह्यांना आमचे लोकेशन आणि रूट पाठवला आणि आम्ही योग्य रस्त्यावर आहोत ह्याची खात्री करून घेतली. घड्याळबाबा धावत होते. मला डोळ्यासमोर इस्लामपूर पर्यंतचे अंतर गाठण्याचे गणित दिसू लागले. जवळपास तीन वाजत आले होते. आम्हाला अजूनही तीन साडेतीन तास लागणार होते. मात्र भारताच्या पूर्व सीमारेषेवर आदित्यनारायण पाच साडेपाचच्या पुढे थांबणार नव्हता. आता स्पर्धा प्रत्यक्ष आदित्य बरोबर होती



कोलकाता सोडल्यानंतर आज पाचव्या दिवसापर्यंत आम्हाला सातत्याने सायकलस्वार दिसत होते. शाळा कॉलेजमधील मुलंमुली, विक्रेते, गृहिणी, नोकरदार अश्या सगळ्या स्तरातील नागरिक बंगालमध्ये सायकलवरून प्रवास करताना दिसत होते. अगदी डबलसिट वर जाणारे जोडपे हेदेखील येथील नियमित दिसणारे दृष्य होते. ताजपूर सोडून थोड्या वेळाने असाच एक शाळकरी मुलींचा एक ग्रुप मला दिसला. आम्ही चहा पिण्यासाठी तिथे थांबलो होतो. त्यांच्यामध्ये आमच्याबद्दल कुजबुज सुरू असलेली मला जाणवले. मी त्यांना फोटो काढायचा आहे का असे विचारले. त्यातील दोघी जणी लगेच पुढे येत असताना आणखी एक पटकन नाही म्हणाली. आम्ही चहा पित असेपर्यंत त्या मुली तिथेच बाजूला थांबल्या होत्या. आम्ही पुढे निघू लागलो इतक्यात त्या मुली माझ्याकडे आल्या आणि फोटो काढायची विनंती करू लागल्या. मी मनोज आणि संजयला थांबवले. त्या मुलींबरोबर फोटो काढून त्यांना सायकल चालवणे सुरूच ठेवा असे सांगून मी त्यांचा निरोप घेतला.





तिथून आम्ही पुढे निघालो. काल ' भेडीया ' दिसले होते तर आज ' भीती ' आणि ' गोआ गाव ' दिसले होते. बंगालमध्ये ' व 'च्या ऐवजी ' ब ' असा उच्चार केला जातो. ताजपूर पासून थोडे पुढे गेलो आणि विपरीत (बिपरीत ) दिसू लागले. गाव विपरीत असले तरी येथील माणसे मात्र विपरीत पणे वागत नव्हती.


सूर्य मावळतीला निघाला होता. शेतात राबणारे कामकरी, करणारी गुरे वासरे घराकडे परतू लागली होती. आम्ही मात्र इस्लामपूर पासून बऱ्यापैकी मागे होतो. रस्त्याची रुंदी पुन्हा वाढली होती आणि रहदारी कमी झाली होती. त्यामुळे आमचा वेग वाढला होता.



लवकरच आम्ही धंतोला येथे पोचलो. इथे डालखोला कडून येणारा महामार्ग आमच्या रस्त्याला मिळत होता. इस्लामपूर फार लांब नव्हते मात्र सूर्य वेगाने अस्ताला निघाला होता. धंतोला येथे विशेष काहीच नव्हते. लॉज, हॉटेल तर राहो छोटे दुकानही दिसत नव्हते. संदीपने आम्हाला जे सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला येत होता.






महामार्ग लागल्याबरोबर मी माणिक बिस्वास ह्यांना फोन करून आम्ही कुठे यायचे तो पत्ता आणि लोकेशन पाठवायला सांगितले. त्यावर ते म्हणाले की तुम्ही इस्लामपूर येथे पोचलात की मला कळवा मग मी तुम्हाला सांगतो. आम्ही वेग घेत इस्लामपूर गाठले. तिथून पुन्हा फोन केला त्यावर त्यांनी एका चौकात यायला सांगितले. आम्ही तिथे पोचलो. बाजूलाच चहा आणि नाश्ता दिसत होता. चहा तर हवा होताच शिवाय खायलाही हवे होते. मी चहा बिस्किटे घेत माणिक बिस्वास ह्यांना परत फोन केला. त्यावर त्यांनी सांगितले की त्यांना एका कामासाठी तातडीने दुसऱ्या गावी जावे लागत आहे. त्यामुळे तुम्ही लॉजवर रहा. त्यांनी लॉजचे नावही सांगितले. आम्ही चहाचे पैसे देत चहावाल्यालाही राहण्यासाठी माणिक बिस्वास ह्यांनी सांगितलेले हॉटेल विचारले. तो लॉज आम्ही होतो त्याच चौकात होता. मी थोडा गोंधळात पडलो की मी अर्धा पाऊण तास आधी आणि परत पाच दहा मिनिटे आधी माणिकजींना फोन केला तेव्हाही ते इथे असणार नाहीत ह्याबद्दल काही बोलले नव्हते आणि आता लगेच लॉज, हॉटेल असे का बोलत आहेत. अखेर आम्ही त्याच चौकात असलेली एकदोन हॉटेल पाहून एक हॉटेल निवडले. रूम छानच होती. थोडे फ्रेश होऊन आम्ही बाहेर पडलो. जवळच एक ठिकाणी एकजण गाडीवर जिलेबी तळत होता. तिथे आम्ही मनसोक्त जिलेबी रबडी खाल्ली. 

इस्लामपूर हे गाव संदीपने सांगितल्याप्रमाणे चांगलेच मोठे होते. माणिक बिस्वास जरी अचानकपणे आम्हाला न भेटता दुसऱ्या गावी गेले असले तरी इस्लामपूरने सहजपणे आमची राहण्याची आणि जेवणाची सोय केली ह्या समाधानात आम्ही शांतपणे झोपी गेलो.

भेट आसामच्या शिवाजीशी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३३

आमची गुवाहाटी येथील व्यवस्था रवींद्र हणमत्तेकर करणार होते. आम्ही पुढे एक चौकात जाऊन त्यांना संपर्क करण्याच्या निमित्ताने चहा पिण्यासाठी थांब...