आमची गुवाहाटी येथील व्यवस्था रवींद्र हणमत्तेकर करणार होते. आम्ही पुढे एक चौकात जाऊन त्यांना संपर्क करण्याच्या निमित्ताने चहा पिण्यासाठी थांबलो.
अर्धा तास थांबूनही आमचा संपर्क होईना. मग मी पर्यटन व्यावसायिक असलेला माझा चुलतभाऊ राहुल जोगळेकर ह्याला संपर्क केला. त्याने पूर्वी मला गुवाहाटी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल सागर मध्ये सोय करून दिली होती. त्याला माझी अडचण सांगताच त्याने तत्परतेने पुन्हा एकदा हॉटेल सागरमध्ये आमची सोय करून दिली. त्याने सोय झाल्याचे कळवले न कळवले तोच हणमत्तेकर ह्यांचाही फोन आला. त्यांना आम्ही दुसरे दिवशी त्यांच्याकडे येऊ असे सांगून आम्ही हॉटेल सागरकडे वळलो.
पुढे जाताच आम्हाला ब्रह्मपुत्रेचे विस्तीर्ण पात्र नजरेस आले. नदीचा पलीकडील काठ अगदी अस्पष्ट दिसत होता. आसामला लाभलेल्या ह्या नैसर्गिक तटबंदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते. ब्रह्मपुत्रा ही आसामला जीवन पुरवत होती ते केवळ पाणी पुरवून नव्हे तर तिच्या प्रवाहाने संरक्षण देऊनही. ब्रह्मपुत्रेवरील पूल पार करत आम्ही गुवाहाटी शहर गाठले. पलीकडील काठाच्या बाजुबाजूनेच रस्ता जात होता. आम्ही तिघेही बरोबरच जात होतो.
मला नदीपात्रात दूरवर एक शिल्प दिसले. एक सेनापती सैन्याला दिशा दाखवत आहे असे दर्शविणारे ते शिल्प होते.
ते शिल्प म्हणजेच ज्या आसामच्या शिवाजीचा शोध मी घेत होतो त्या 'वीर लचित बोरफुकन यांचेच शिल्प होते. १७ व्या शतकातील अहोम राज्याचे दिग्गज लष्करी सेनापती असलेल्या लचित बोरफुकन यांना समर्पित असलेला हा पुतळा नदीच्या मध्यभागी उभारलेला एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकृती आहे. हे शिल्प गुवाहाटीमधील एमजी रोडलगत लचित घाट (माखोवा) जवळ नदीच्या मध्यभागी आहे. कमांडिंग पोझमध्ये उभा असलेल्या जनरल लचित बोरफुकनचे मुख्य शिल्प म्हणजे ३५ फूट उंच असा कांस्य पुतळा आहे. त्याच्या बाजूला अहोम सैनिकांच्या आठ १८-फूट उंच फायबर ग्लास शिल्प आहेत. संपूर्ण जोडणी १२ x १२ मीटरच्या एका मोठ्या स्ट्रक्चरल पेडेस्टलवर उभी आहे, ब्रह्मपुत्रेच्या जोरदार प्रवाहांना तोंड देण्यासाठी नदीच्या विहिरीच्या संरचनेत थेट बांधलेली आहे. इन्स्टॉलेशनमध्ये दोन ३२-फूट-लांब फायबरग्लास वॉटर कॅनन्स देखील आहेत.
हे स्मारक ऐतिहासिक 'सराईघाटच्या लढाई'च्या (१६७१) स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आले आहे. ही लढाई नदीवरील सर्वात महान नौदल लढायांपैकी एक मानली जाते. सेनापती लाचित बडफुकन यांनी अहोम साम्राज्याच्या तुलनेने लहान सैन्याचे यशस्वी नेतृत्व करत, ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात मुघल साम्राज्याच्या अवाढव्य नौदलाचा निर्णायक पराभव केला आणि अशा प्रकारे अहोम राज्याचे सार्वभौमत्व सुरक्षित राखले. हा पुतळा शौर्य, धोरणात्मक प्रगल्भता आणि परकीय सत्तेसमोर न झुकण्याच्या जिद्दीचे सर्वोच्च प्रतीक आहे. नदीच्या भौगोलिक परिस्थितीचा अत्यंत कुशलतेने वापर करून आणि गनिमी नौदल युद्धनीतीचा अवलंब करून, बोरफुकन यांनी ईशान्य भारताला मुघल वर्चस्वापासून मुक्त आणि स्वतंत्र ठेवले. पुतळ्यातील देहबोली त्यांच्या प्रखर देशप्रेमाचे दर्शन घडवते. युद्धाच्या तयारीदरम्यान, एका महत्त्वाच्या मातीच्या तटबंदीच्या बांधकामात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल लचित बोरफुकन यांनी स्वतःच्या मामाचा शिरच्छेद केला होता. त्यावेळी त्यांनी उच्चारलेले शब्द आजही प्रसिद्ध आहेत: "देक्सोतकोइ मोमाइ डांगोर नोहोइ" (माझा मामा माझ्या देशापेक्षा मोठा नाही).
हे स्मारक त्याच युद्धभूमीवर—ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात उभारण्यात आले आहे, जिथे त्यांनी आपला सर्वात मोठा विजय मिळवला होता.
नदीच्या काठाने सायकलवत असताना त्या शिल्पाचा फोटो घेण्यासाठी आम्ही थांबलो आणि एका रिक्षामधून ड्रायव्हर आम्हाला जोरजोरात काहीतरी बोलत असल्याचे जाणवले. मला आधी वाटले की बहुधा इथे फोटो काढण्याची मनाई असावी असे ड्रायव्हर सांगत असेल. मी ड्रायव्हरकडे बघतही नव्हतो. मात्र इतक्यात जाणवले की रिक्षा थांबली आहे. मी वळून बघितले तर एक महिला रिक्षा चालवत होती आणि ती आम्हाला प्रोत्साहित करत होती. ती रिक्षातून उतरून आमच्याकडे आली आणि म्हणाली की मी पण सायकलिस्ट आहे.
ती म्हणाली की ती पोटापाण्यासाठी रिक्षा चालवत असली तरी इतरवेळी सायकलवरच फिरत असते. गुवाहाटीमधील सायकल क्लबची ती सदस्यही आहे. माझा गुवाहाटी मधील सायकलमित्र दिगंत बारुआला ती ओळखते असेही ती म्हणाली.
माझ्या मनात पुढील सायकल प्रवास घोळत होताच. मी तिला विचारले पुढच्या वर्षी आम्ही seven sisters सायकल मोहीम करणार आहोत. तू येशील का? येथील कोणी आमच्याबरोबर असेल तर आम्हाला गाईड मिळेल असा विचार मी करत होतो. तिने तत्क्षणी होकार कळवला.
असे वाटले की आमच्या मोहिमेचे सगळ्यात मोठे यश आहे ते हेच!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा