शनिवार असल्यामुळे आज ठाण्याला जायचे नव्हते. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी नेवाळी फाट्यापर्यंत जाऊन यायचे ठरवले होते. घराबाहेर पाहीले तर 'नभ मेघांनी आक्रमिले' हि परिस्थिती स्पष्ट दिसत होती. तरीही आज ऑफिसला जायचे नसल्याने बेफिकिरीनेच निघालो. श्विन तयारच होती.
सोसायटीबाहेर पडल्याबरोबर के डि एम सी महानगरपालिकेच्या मेहेरबानीमुळे खड्ड्यांमध्ये काही जागी शिल्लक राहिलेले रस्त्याचे तुकडे दिसू लागले. श्विन मात्र तेथून सहीसलामत बाहेर पडली. एव्हाना "तारांगण सर्व हिराकूनी गेले" होते. श्रावणा ऐवजी पुन्हा आषाढाचे साम्राज्य असल्यासारखे वाटत होते. श्विन ला त्याचे काहीही सोयरसुतक नव्हते.
के डि एम सी च्या प्रयत्नाने तयार झालेली पेंढारकर कॉलेज जवळील वीतभर ते मीटरभर लांब रुंद तळ्यांची मालिका पार करून श्विन कल्याण- शिळ रस्त्याला लागली. तोपर्यंत अवकाशातील मेघांनी श्रावण धारा सुरु केल्या नव्हत्या. कल्याण शिळ रस्त्याला लागल्यावर मला आजूबाजूला लपायला जागा नाही असे दिसताच मात्र त्यांनी आक्रमण सुरु केले. पण इतक्यात मला आणि श्विनला एक आडोसा मिळालाच. वर्षाराणी रंगात येण्याच्या खुणा दिसू लागल्याने मी मानपाडा रस्त्याने परत घरी जायचे ठरवले. श्विन माझ्यावर नाराजच झाली होती
मात्र मी कल्याण शिळ रस्त्यावरून मानपाडा रस्त्याला वळण्याआधीच तेथून डोंबिवली सायकल क्लब चे तीन शिलेदार शिळ रस्त्याकडे वळताना दिसले. त्यात एक अर्णव कुलकर्णी होता. अर्णव होता म्हणजे गंधार डोंबिवलीकर असणारच
मग माझ्याकडे दुर्लक्ष करीत श्विन त्यांच्यामागे सुसाट निघाली. मला काही कळायच्या आत श्विन ने त्यांना गाठलेही. अर्णव आणि गंधार बरोबर आज संजय दात्येही होते. एव्हाना पाऊस कमी झाला असला तरी : 'मुसलाधार बारिश की संभावना' कायम होती. पण आता मात्र मी वरुणराजाचे आव्हान स्वीकारायचे ठरवले. शिळ फाट्याऐवजी नेवाळी फाटा येथे जाण्याविषयी विनाविलंब एकमत झाले आणि आम्ही बदलापूर पाइपलाइन रस्त्याला वळलो. थोड्याच वेळात "घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा" असा अनुभव येऊ लागला. नेवाळी फाटा येईपर्यंत मनसोक्त भिजून झाल्यामुळे एक कप चहा लागू झाला होता. चहा तर फक्कडच होता. चहा साठी घेतलेली विश्रांती संपेपर्यत वर्षाराणीही शांत होती.
परतीच्या प्रवासासाठी श्विनची तयारी नव्हती. पण आता मात्र मी श्विनहट्ट न पुरवण्याचे ठरवले.
परतीच्या प्रवासासाठी आम्ही पुन्हा निघालो आणि वर्षाराणी पुन्हा आमच्या स्वागताला हजर झाली. मात्र आधीच पुरेसे भिजल्यामुळे आता आम्ही तयारच होतो. आमच्या मानवशक्तिधारित वाहनांना वर्षा राणी आणि वरुणराज अडथळा आणू शकत नव्हते. मात्र काही अंतरावरच एक अश्वशक्तीधारी वाहन मात्र बंद पडले होते. मग त्या वाहनाला धक्का मारण्याचे प्रयत्न करून आम्ही पुढे निघालो.
परत येताना आम्ही डोंबिवली सायकल क्लब मधील सदस्यांना मोहविणाऱ्या उंबार्ली रस्त्याने आलो. तेथून येताना शिळ फाट्याकडे मुंब्रा डोंगररांगांवर अजूनही काळे ढग राज्य करताना दिसत होते. मात्र उजवीकडे सोनारपाडा दावडी गावाच्या दिशेने सूर्याची सोनेरी किरणे दिसू लागली होती.
गंधार म्हणजे हालता बोलता भाषाकोष. मग मी मिळालेली संधी साधायचे ठरवले. संस्कृत पासून प्राकृत, प्राकृतापासून बोली अश्या भाषा आणि नागरी पासून देवनागरी आणि देवनागरी पासून मोडि अश्या लिप्या यासंबंधी गांधारकडून माहिती घेत श्विनसह मी घरी परतलो तेव्हा मात्र अंधाराचे जाळे फिटून आकाश मोकळे झाले होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा