शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

बदलापूर

हिंदू धार्मिक कालगणनेप्रमाणे ७ व्या म्हणजे अश्विन महिन्याचे दोन दिवस बाकी असले तरी जगातील एकमेव निधर्मी म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे आज ८ व्या म्हणजे कार्तिक महिन्याची ४ तारीख! पुणे जम्मू सायकलयात्रेसाठी आता दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला होता.  डोंबिवली हुन जम्मूच्या दिशेने प्रयाण करण्याचा दिवस म्हणजे राष्ट्रीय कालगणनेनुसार १० व्या म्हणजे पौष महिन्याचा १ ला दिवस वेगाने जवळ येत असल्याने नियमित सराव अत्यावश्यक होता.

त्यामुळे आज किमान अर्धशतकी मजल मारण्याचे ठरवले होतेच. श्विनला डॉ सुमीतच्या दवाखान्यातून नियमित देखभालीसाठी जाऊन आणले असले तरी त्याचे खोगीर मात्र बदलावे लागणार होते. अर्थातच श्विनच्या ऐवजी आज फुजीचीच साथ मिळणार होती. तसेही गेले कित्येक दिवस सडपातळ बांध्याच्या फुजीबरोबर गेल्यामुळे फुजीचा सहवास सुखाचा वाटू लागला होताच. बहुधा त्यामुळे आज श्विनकडे लक्षही न जाता फुजीलाच बरोबर घेतले.

सवयीप्रमाणे घराबाहेर पडण्याआधी फुजीच्या रबरी नळीत पुरेशी हवा असल्याची खात्री करून अस्मादिकांनी स्वतःचा जामानिमा केला. आज फुजीला साथ देण्यासाठी स्कॉट बरोबर होती. दोघांनीही आपापले STRAVA सुरु करून आजच्या भरारीला सुरुवात केली. डोंबिवली पश्चिमेकडून ठाकुर्ली उड्डाणपुलामार्गे पूर्वेला जाईपर्यंत दोघेही संथ गतीने जात होते. पूर्वेला गेल्यावर फुजीने थोडा वेग घेतला. स्कॉटने तिचा वेग कायम ठेवला होता. मंजुनाथ शाळेपाशी थोडा मोकळा आणि रुंद रस्ता मिळताच फुजी सुसाट वेगाने निघाली. थोड्याच वेळात पेंढरकर महाविद्यालय मागे टाकून कल्याण शिळ रस्ता दिसू लागला. पाठोपाठ स्कॉटही संयमित वेगाने पण सातत्याने येत होती.

कल्याण शिळ रस्ता नेहमीप्रमाणेच गजबजलेला होता. स्वयंचलित वाहने वेगाने जाऊ पाहत होती.  रस्त्यातील गतिरोधक, खड्डे येताच ती वाहने अडखळत असत. मात्र ते गतिरोधक पार होताच ती प्रदूषणकारी वाहने त्यांच्या यांत्रिक अश्वशक्तीद्वारे लगेच वेग घेऊ शकत. मनुष्यशक्तीच्या इंधनावर चालणारे फुजी आणि स्कॉट असा अचानक वेग घेऊ शकत नव्हते. मात्र  तरी गतिरोधक किंवा खड्डे पार करताना फुजी आणि स्कॉट त्या स्वयंचलित वाहनांना मागे टाकत होते.

महामार्गाला लागल्याने फुजी आणि स्कॉट दोघांनीही चांगलाच वेग घेतला होता. मानपाडेश्वर मंदिर, प्रीमियर वसाहत मागे टाकून थोड्याच वेळात दोघेही काटई नाक्याला डावे वळण घेत अंबरनाथ पाइपलाइन रस्त्याला लागले. सूर्यनारायण मात्र अजून दर्शन देत नव्हता. पावसाचे लक्षण मात्र दिसू लागले होते. फुजी, स्कॉटला मात्र त्याची फिकीर नव्हती. तळोजा फाटा पार केल्यावर फुजीने चांगलाच वेग घेतला. काही मिनिटातच नेवाळी फाटा गाठला. स्कॉट दृष्टिपथात नव्हती. त्यामुळे फुजीने स्कॉटसाठी पुन्हा तळोजा फाट्यापर्यंत जाऊन यायचे ठरवले. अर्ध्या अंतरातच मागून गन्धार, अक्षत आणि आणखी एक सायकल पटू यांनी फुजीला गाठले. गंधारबरोबर अर्णव मात्र दिसला नाही. याचे फुजीला आश्चर्य वाटत होते. गन्धार आणि अर्णव हे दोघे एकत्र नसतील तर काहीतरी अपूर्ण राहिल्याचे फुजी/ श्विन यांना वाटत असे.

गन्धारने स्कॉटला नेवाळी फाट्याच्या दिशेने गेल्याचे पाहिले होते. रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावरील झुडुपांमुळे फुजीला मात्र स्कॉट दिसली नव्हती. मात्र गंधारने सांगितल्यावर फुजीने पुन्हा नेवाळी फाट्याकडे मोर्चा वळवला. फुजीने पुन्हा नेवाळी फाटा गाठेपर्यंत स्कॉटने बरीच आघाडी घेतली होती. फुजीने भ्रमणध्वनिमार्फत संपर्क साधत फुजी मागे असल्याची स्कॉटला कल्पना दिली आणि वेग आणखी वाढवला. अंबरनाथ येत असताना फुजीने स्कॉटला गाठले. दोघांनी मग पुढे बदलापूर गाठायचे ठरवले. फुजीने पुन्हा एकदा आघाडी घेतली. रस्ता मोकळाच होता. त्यावेळी वेगही छान मिळाला. 'नेरळ २० किमी' या पाटीकडे फुजीने दुर्लक्ष करून नेरळचा मोह टाळला आणि K2 Cycles पर्यंत गेल्यावर परतीचा निर्णय घेतला.

परत फिरताना फुजीच्या साखळीलाही दात्यांच्या पुढील आणि मागील बाजूकडील आतील संचावर वळवले. साहजिकच आता पदललित्य अधिक वेगाने होऊ लागले तरी  फुजीचा वेग कमी झाला. पायाच्या अधिक गतीने होणाऱ्या भ्रमणाचा आनंद घेत बदलापूर शहर मागे टाकल्यावर मात्र पुन्हा एकदा दोन्ही बाजूकडील दात्यांच्या बाहेरील संचावर साखळी सरकवून फुजीने वेग वाढवला. अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीजवळ जाताच 'हॉटेल वैभव'  खुणावू लागले. मात्र तिकडे दुर्लक्ष करत फुजी आणि स्कॉट झपाट्याने परतू लागले. डावीकडे मलंगगड साथ करत होता. मात्र सूर्यदर्शन न झाल्याने मलंगगडानेही काळी झालर पांघरली होती.



मलंगगडाला छायाचित्रबद्ध करत असताना फुजीला अचानक लक्षात आले की आज शिरस्त्राण मात्र विसरून घरीच राहिले होते. फुजीला तयार करून अस्मादिकांनी डोक्यावर, तोंडावर आणि नाकावर आवरण तर घातले होतेच, मात्र त्या आवरणानंतर शिरस्त्राण घालण्याचे भान राहिले नव्हते. आणि त्याची जाणीव झाले ते थेट बदलापूरहून परत फिरल्यानंतर!

 अभ्राच्छादित वातावरणात नेवाळी फाटा मागे टाकत फुजी आणि स्कॉट लवकरच पुन्हा काटई नाक्याला पोचले. तेथे उजवीकडे वळण घेत डोंबिवली गाठत असतानाच वाटेत संजय दात्ये एका सायकलस्वारासह दिसले. ते दोघेही मलंगगडाच्या सान्निध्यातील करवले गावात जाऊन आले होते. त्यांच्याशी गप्पा मारतच फुजी आणि स्कॉट डोंबिवली शहरात शिरले. एव्हाना ५५ -५६ किमी अंतर न थांबताच पार झाले होते. दात्येंचा निरोप घेता घेता 'एक चहा' तर लागू झाला होता. उभ्या उभ्या चहा घेत फुजी आणि स्कॉट पुन्हा डोंबिवली पश्चिमेला पोचले. घरी पोचत असताना Strava ने ६० किमी साठी ६०० मीटर अंतर कमी असल्याची सूचना दिली. फुजी त्यावर समाधानी नव्हती. फुजीने घराभोवती परिभ्रमण करत strava ने ६० किमी अंतर पूर्ण केल्यावरच विश्रांती घेतली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...