पर्यटन करण सगळ्यांनाच आवडत. त्यासाठी किती सामुग्री आवश्यक आहे बरं! खरतर आपलं भाग्य आणि एक नकाशा ही सामुग्री आपल्याला जिथे जायचंय त्या ठिकाणी नेण्यास पुरेशी असते.
पॉल डी विव्ही हा खऱ्या अर्थाने पहिला कडवा किंवा दुराग्रही सायकलस्वार म्हटला पाहिजे. आपण ज्या शब्दाच्या प्रेमात आहोत त्या सायकलपर्यटनाचा हा आद्य प्रणेता. 'सायकलपर्यटन' ही संज्ञाही त्याचीच देणगी. गियर बदलण्यासाठी डीरेलर यंत्रणा निर्माण करणे हाही ह्याचा उद्योग. त्यामुळे सायकल चालवणे किती सहजसोपे झाले आहे ह्याचा अनुभव आपण घेतच असतो.
सायकलबद्दलच्या भावना व्यक्त करताना तो म्हणतो ,'दिवसभर सायकल चालवल्यावर मला ताजातवाना आणि शुचिर्भूत झाल्याचा अनुभव येतो. पर्यावरणाशी समरस झाल्यासारखे आणि शांत वाटते. सायकलबद्दलची माझी कृतज्ञता खोलवर झिरपल्यासारखे वाटते.' आपण सायकल का चालवतो ह्याचे इतके यतार्थ वर्णन इतर कोणीही केले नसेल. त्याने लिहिलेल्या ह्या ओळींमध्ये १४० वर्षांनंतरही बदल करण्याची गरज नाही.
सायकल चालवण्याबाबत पॉल म्हणतो,' किरकोळ थांबे घेत शेकडो मैल सायकल चालवण्यामुळे सर्वसामान्य जीवांना कोणताही ताण येत नाही हे सांगणे इतकाच माझा उद्देश आहे. हे स्पष्ट करणे हा माझा केवळ आनंदच नाही तर ते माझे कर्तव्यही आहे.
पॉल ने पहिली सायकल घेतली भारतीय वर्ष १८०९ मध्ये(ग्रेगोरीयन १८८१) वयाच्या २८ व्या वर्षी- ती होती पेनी फार्मिंग
त्याचे खऱ्या अर्थाने सायकलवणे सुरू झाले ते भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरच्या १८१४ यावर्षी म्हणजे १८८६ ह्या ग्रेगोरीयन वर्षी - वयाच्या ३३ व्या वर्षी. युरेकाच्या रबरी टायरच्या बळावर त्याने मध्यान्ह होईपर्यंत फ्रान्समधील सेंट ईंटिन ते वीची हे ९० मैल म्हणजे १४४ किमी अंतर कापले होते.
तर आणखी तीन वर्षांनी म्हणजे भारतीय वर्ष १८१७ (ग्रेगोरीयन १८८९) मध्ये २५ किलो वजनी ब्रिटिश स्टारवर आरूढ होत १५० मैलांचा (२४० किमी) पहिला सायकलप्रवास पूर्ण केला - तो होता सेंट एटिनी-चार्लीयु असा दुतर्फा प्रवास! हा प्रवास करताना कधी मित्रांची साथ होती, तर कधी एकल प्रवास होता. हा प्रवास दिवसा केला तसाच रात्रीही सुरू होता. पहिल्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी आणि रात्रीही प्रवास सुरूच होता. केवळ खाणे आणि कपडे बदलणे ह्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या किरकोळ थांब्यांसह तिसऱ्या दिवशी हा प्रवास पूर्ण झाला.
भारतीय वर्ष १८२८ म्हणजे ग्रेगोरीयन वर्ष १९०० मध्ये त्याने आल्प्स पर्वत रांगांतील १८००० फूट चढणीचा ४०० मैल (६४० किमी) प्रवास ४८ तासात पूर्ण केला. तर सेंट एटिन ते मेंटोन व परत असा ६०० मैल (९६० किमी) प्रवास त्याने ४ दिवसात पूर्ण केला.
भारतीय वर्ष १८३१ म्हणजे ग्रेगोरीयन वर्ष १९०३ मध्ये त्याने नाइस पर्यंतचा ३५० मैल (५६० किमी)चा प्रवास ३२ तासात पूर्ण केला, आणि लगेचच मित्रांबरोबर मजेखातर २५० मैल (४०० किमी) प्रवास ३ दिवसात पूर्ण केला.
वीस वर्ष ते साठ वर्ष ह्या वयोगटातील कोणताही सायकलपटू योग्य सायकल आणि योग्य आहार घेत दिवसभरात १३० मैल (२०८ किमी) अंतर पार करू शकतो असे त्याचे म्हणणे होते. वयाच्या ५९ व्या वर्षी म्हणजे भारतीय वर्ष १८४० (ग्रेगोरीयन वर्ष १९१२) ह्या वर्षी त्याने सेंट एटिंन ते एक्स एन प्रॉव्हिन्स हे ४०० मैल (६४० किमी) अंतर त्याने ४६ तासात पार करत त्याने त्याचे म्हणणे सिद्धही केले.
हे शेकडो मैल तो पार करत होता शंभर- सव्वाशे वर्षांपूर्वी! जेव्हा रस्ते चिखल, खड्डे, बारीक घसरणारी वाळू ह्यांनी भरलेले असत, सायकल जड असत, टायर रुंद असत, ब्रेकही बहुधा असे असावेत की उतरंडीवर लावले तर लहान मुलांप्रमाणे घसरगुंडीचाच अनुभव देतील. थोडक्यात शरीरातील आंद्रेनलीनला पुरेपूर आव्हान देणारा प्रवास असे. आणि हो, एनर्जी बार, पेय ह्यांचा पूर्णपणे अभाव होता. आरोग्याबाबत तो कमालीचा दुराग्रही होता. त्याला धूम्रपान, मद्य कशाचेही व्यसन नव्हते. त्यामुळे तो त्या काळात विसंगत वाटत असे. इतकच नव्हे तर तो मांसाहारही करत नसे.
सायकलपटूंसाठी त्याने सात नियम सांगितले होते ज्यांना तो सात आज्ञा म्हणत असे. आश्चर्य म्हणजे ते सातही नियम आजही तंतोतंत लागू पडतात-
४) थंडी वाजण्यापूर्वी अधिक थर घाला आणि गरम होण्यापूर्वी थर कमी करा.
५) दारू, मांसाहार, तंबाकू पासून (म्हणजेच व्यसनांपासून) दूर रहा.
६) स्वतःशी समर्पित होऊन सायकल चालवा (विशेषतः पहिल्या तासाभरात हे जास्त आवश्यक आहे)- म्हणजेच pacing. हे तो तेव्हा करत होता जेव्हा सायकल संगणक, गार्मिन, जी पी एस अस्तित्वात नव्हते.
७) दिखाऊपणा करू नका.
पॉल हा व्हेलोसीओ नावाने लेखन करत असे. उतारवयात दिवसाची सुरुवात तो प्राचीन ग्रीक साहित्यवाचनाने करत असे. भारतीय दिनांक ८ फाल्गुन १८५८ अर्थातच २७ फेब्रुवारी १९३० चा दिवस. पॉल वाचत होता...
'...मृत्यू माझ्या मागावर आहे आणि जीवन मला वाचवत आहे. जेव्हा मी झोपायला जातो, तेव्हा वाटते मला कधीच जाग येणार नाही. जेव्हा मला जाग येते, तेव्हा वाटते आता कधीच झोपायला जाता येणार नाही. जेव्हा मी बाहेर जातो असे वाटते की मी परत माघारी येणार नाही.'...
वाचन संपवून पॉल ने त्याची सायकल घेतली आणि रस्ता ओलांडण्यासाठी ढकलू लागला. कार चुकवण्यासाठी त्याने पाऊल माघारी घेतले आणि एका ट्रामने त्याला उडवले.
अमेरिकन क्लीफोर्ड ग्रेव्हजने म्हटले आहे,'सायकलच्या माध्यमाद्वारे ऊन, पाऊस, वारा ह्यांच्याशी तो संवाद साधू शके. त्याच्यासाठी सायकल हे वैयक्तिक तत्वज्ञानाची अभिव्यक्ती होती. त्याच्यासाठी सायकल हे शारीरिक आणि अध्यात्मिक स्वातंत्र्याचा मार्ग होता.
खूप छान माहिती दिली.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा