रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

त्रिवेणी योग




सुर्यनारायण दक्षिण गोलार्धात प्रवेश करून दीड महिना झाला होता. अर्थातच त्यामुळे तो जरा उशिरानेच धारित्रीला भेटायला येऊ लागला होता. धरित्री त्याची वाट पाहत असायची, पण त्याचे येणे रोज अधिकाधिक उशिराने होऊ लागले होते. त्यानंतरही त्याची लगबग सुरू असायची. धारित्रीचे मन भरायच्या आतच तो परतीची वाट धरू लागला होता.


आज तर खर म्हणजे त्याचाच वार... रविवार! मात्र आजही तो उशिरानेच जागा झाला. उशिराने जागा झालेल्या सुर्यनारायणाचा अंदाज घेत श्विनने डोळे किलकिले केले. Innerwheel club of Dombivli East (IWCDE) तर्फे आज सायकलपटूंसाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. तसेच Bergamont च्या tourde100 चा आज २१ वा दिवस म्हणजे दुसऱ्या टप्याचा पहिला दिवस होता. दुसऱ्या टप्यातील अनेक आव्हानामधील सर्वात कठीण आव्हान होते एका दिवसात १२५ किमी अंतर पार करणे.  ह्यानंतरच्या रविवारी दीपावली होती, तर त्या पुढच्या रविवारसाठी असे आव्हान शिल्लक ठेवण्यापेक्षा आजच १२८ किमी अंतर पार केले तर मागच्या आठवड्याप्रमाणेच आठवड्याच्या शेवटच्या ३ दिवसात ३०० किमी अंतर पार करता येणार होते.


IWCDE ची मोहीम, Begamont च्या tourde100 मधील दुसऱ्या टप्याची सुरुवात आणि लागोपाठ दुसऱ्या आठवड्याअखेरीस तीन दिवसात ३०० किमी हे तीन योग एकत्र साधण्याचे श्विनने ठरवले.


IWCDE गणेशमंदिरापासून सकाळी ६.१५ ला सुरुवात करणार होते. तर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत Pedal Te public (PR) ची फेरीही ६.१५ ला च गणेशमंदिरापासून सुरू होणार होती.


मात्र आजही श्विनला एवढ्या लवकर निघता येणार नव्हतेच. श्विन तयार होईपर्यंत ८.१५ वाजले होते. सूर्यनारायण येऊन बराच वेळ लोटला होता. श्विनने आपल्याबरोबर पाणी आणि नाश्त्याची बेगमी केली होतीच. एवढे अंतर पार करायचे असले तरी मध्यान्हीच्या सुमारास घरीही परतायचे होते. एकमार्गी कर्जत पर्यंत जाऊन परतताना काही अडथळे येऊन उशीर होण्याची अंधुकशी संधीही ठेवायची नव्हती. त्यामुळे जास्तीत जास्त वांगणी पर्यंत जाऊन घरी परतायचे आणि जेवण करून पुन्हा उर्वरित फेरी पूर्ण करायची असा मनसुबा श्विन रचत होती. काटई नाक्यापाशी डावे वळण घेत बदलापूर पाइपलाइन महामार्गाला लागल्यावर श्विनची हिम्मत पुन्हा वाढू लागली. सकाळी वांगणी ऐवजी नेरळला जाऊन यायचे विचार मनात घोळू लागले. बदलापूर वांगणी दरम्यान पोचल्यावर श्विन थेट कर्जत गाठण्याची शक्यता असल्याने मी दुसरा काही पर्याय आहे का याचा विचार करू लागलो.


इतक्यात बारवी डॅम चा पर्याय आठवला. अर्थात तो बऱ्यापैकी लांब असल्याने तिथपर्यंत न जाता अर्ध्या रस्त्यातून परतायचे ठरवले. बारवी डॅम साठी महामार्ग सोडून श्विनने डावे वळण घेतले. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक विस्तीर्ण तळे आणि बाजूला शिवमंदिर दिसले. दृश्य खूपच विलोभनीय होते. परतताना येथेच नाष्टा करायचे ठरवून श्विनने टाच मारली.


लगेचच चढउताराचा खेळ सुरू झाला. रस्ता थोडा अरुंदही होता. रस्त्याचा अंदाज घेत आणि मजा घेत श्विन पुढे सरकत होती. इतक्यात रस्त्याच्या डाव्या बाजूला एक अरुंद चढण चढून येणारे दोन सायकलस्वार दिसले. पुढे असलेल्या Sahir Shaikh ला श्विन ने लगेच ओळखले. त्याला हाक मारून श्विन उजवीकडे वळणाऱ्या रुंद रस्त्याला लागली... बहुतेक इथेच घात झाला. थोड्याच वेळात एक छोटा घाट उतरून श्विन एका गावात पोचली. श्विन रस्ता चुकली होती. तिथे बारवी डॅम कडे जाणाऱ्या रस्त्याची चौकशी केली. तर रस्ता गुंतागुंतीचा तर वाटलाच शिवाय खराबही दिसत होता. वेळ महत्वाचा असल्याने श्विनने तेथूनच परत फिरायचे ठरवले. वाटेत शिवमंदिरापाशी ठरवल्याप्रमाणे नाष्टा केला. तळे पूर्ण भरलेले असताना काठाशी असलेला निष्पर्ण वृक्ष मात्र अस्वस्थ करत होता. तळ्यापाशी असून त्याच्या निष्पर्ण अवस्थेबद्दल खिन्नता बाळगायची की निष्पर्ण झाला तरी तळ्याच्या काठाने तो ताठ उभा आहे याबद्दल आनंद वाटावा हे कोडे श्विनला पडले. तळ्याच्या काठाशी व्यायामासाठी जवळपास १५ प्रकाराची उपकरणे रांगेत ठेवलेली होती. आयुष्याची सकाळ अनुभवत असलेल्या बालवयातील व्यायामपटू शेजारीच आयुष्याची संध्याकाळ रमणीय करत एक आजोबाही त्या उपकरणांचा आनंद घेत होते. कदाचित ह्याच उत्साहाकडे पाहत तो निष्पर्ण वृक्षही ताठ मानेने उभा असावा.






तेथून निघायला मन तयार होत नव्हते, पण त्याचे मन मोडून मी श्विनवर आरूढ झालो. वाटेत आनंदनगर MIDC जवळ एक युवक हातात सायकल घेऊन जात असलेला दिसला. त्याची चौकशी करताच त्याचा पुढील गियर १ क्रमांकावर अडकला असल्याचे लक्षात आले. त्याचा खटकाही दाबता येत नव्हता. तो ही डोंबिवलीचाच होता. त्याला अश्वस्थ करून मी पुढे जाऊ लागताच त्याच्याबरोबरच पुढे जाण्याचा आग्रह करू लागला. त्याचे मित्र पुढे गेले होते आणि त्याला रस्ता माहीत नव्हता. मी त्याला पुढे जाऊन परत मागे येतो असे सांगून पुढे निघालो. थोड्याच अंतरावर त्याचे मित्र वाट पाहत उभे असल्याचे दिसले. त्यांची चौकशी करेपर्यंत मागचा सायकलस्वार तेथे आलाच. त्यांची भेट झाल्यावर, सगळ्यांना एकत्र राहायला सांगून श्विन पुढे निघाली.


पेंढारकर महाविद्यालयापाशी 'शांताराम सरबत' येथे लिंबूपाणी घेऊन श्विन घरी परतली तेव्हा ८० किमी अंतर पार झाले होते. जेवण करून १०-१५ मिनिटे विश्रांती घेऊन श्विन पुन्हा निघाली तेव्हा घड्याळ बाबा २.३० वाजल्याची खूण करत होते. श्विनने बरोबर एका छोट्या बाटलीत कोकम सरबत घेतले. ९० फिट रस्त्यावरून उजवे वळण घेत प्रथम कल्याण शीळ महारस्ता आणि पुढे काटई नाक्यापाशी डावे वळण घेत श्विन पुन्हा बदलापूर पाइपलाइन रस्त्याला लागली. बारवी डॅम च्या वळणापर्यंत जाऊन कोकम सरबतचे दोन घोट घेऊन श्विनने परतीचा रस्ता धरला. नेवाळी फाटा, काटई नाका मार्गे पेंढारकर महाविद्यालयापाशी येईपर्यंत bergamont च्या tourde100 च्या दुसऱ्या टप्यातील आव्हानांपैकी सगळ्यात कठीण आव्हान असलेले १२५ किमी चे आव्हान पूर्ण झाले होते. तर घरी परतेपर्यंत १३०  किमी अंतर पार होत लागोपाठ दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या तीन दिवसात ३०० किमी अंतरही पूर्ण झाले होते. हा अंदाज आल्यामुळे घरी जातानाच घेतलेले सीताफळ आईस्क्रीम खाऊनच आजचा जुळून आलेला त्रिवेणी योग साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...