भास्करबुवांनी वर्दी दिल्याशिवाय घराबाहेर पडायला फुजी तशी नाखुषच असते. त्यात सध्या हिवाळ्याचे दिवस... थंडी नसली तरी भास्करबुवा उशिराच उगवतात. घड्याळ बाबा मात्र उगाचच पुढे पुढे धावत होते. फुजी आज बाहेर पडली तेव्हा तर ते ८ चा ठोका पाडत होते. फुजिने नाराजीनेच त्यांच्याकडे कटाक्ष टाकला.
अजूनही भास्करबुवा मात्र नजरेस पडत नव्हतेच. फुजीने संथगतीने सुरुवात करत PR नाका गाठला...(PEDAL REPUBLIC चे सदस्य ज्या ठिकाणाहून राईड ची सुरुवात करतात त्याला जगभरात PR नाका असे म्हणतात हे सुजाण वाचकांना माहीत आहेच)
घारडा सर्कल मार्गे फुजी कल्याण शीळ रस्त्याला लागली तरी साधारण १ किमी पुढे धुक्याचे साम्राज्य पसरले आहे असेच वाटत होते. त्यातच मानपाडा बस थांब्यापाशी उखडलेल्या रस्त्याने फुजीचे स्वागत केले. फुजीने ते फारसे मनावर घेतले नाही. काटई बदलापूर पाईप लाईन रस्त्याला लागल्यावर मात्र फुजी थोडी सहजतेने जाऊ लागली. पहिला थांबा नेहमीप्रमाणेच बदलापूर येथील शेलारांच्या खाद्य केंद्रावर घेतला. गरमागरम इडली, झकास चटणी आणि मनसोक्त सांबार ही फुजीची सुट्टीच्या दिवशीची शेलारांकडची ठरलेली फर्माईश! आपल्या डिश बरोबरच येथील अण्णा सांबार भरलेली एक छोटी बादली आपल्या मेजावर आणून ठेवतो. मग अस्मादिक इडली सांबार ऐवजी सांबार इडली न स्वाहा करतील तरच नवल.
इडली सांबारचे इंधन पुरेपूर भरून झाल्यावर फुजी चांगलीच ताजीतवानी झाली होती. खरवई जवळचा खड्डेमय रस्ता, चढण ह्यांना पार केल्यावर फुजीने वेग घेतला. मात्र अजूनही भास्करबुवा ढगांच्या दुलईमागे लपले होते. तसे ते अधूनमधून बाहेर डोकावत असले तरी त्या दुलई मागून पूर्णपणे काही बाहेर येत नव्हते. फुजी मात्र आता मजेत पुढे जात होती. बदलापूर पुढे वाहनांची गर्दीही कमी झाली होती. नेरळच काय पण कर्जतचा चार फाटा मागे पडला तरी फुजी दुसरा थांबा घ्यायला तयार नव्हती. कर्जत चौक रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असली तरी वर्दळ कमी असल्यामुळे फुजिने वेग कायम राखला होता. चौक फाटा आल्यावर फुजिने उजवे वळण घेत पनवेलकडे मोर्चा वळवला. लोधीवली जवळ आल्यावर मात्र अस्मादिकांनी फूजीला थांबवले. सफरचंदाचे इंधन भरून झाल्यावर फुजीच्या चाकावरील रबरी आवरण तपासले खरे... ओह, मागील चाकावरील आवरण पूर्णपणे दाबले गेले. त्यातील हवा भुर्रर्रर उडाली होती. फुजी ने आजूबाजूला पाहिले, तर शेजारीच कारागीर दिसला. तो खरतर स्वयंचलित आणि प्रदूषणकारी वाहनांचा कारागीर होता, पण फुजीने आपल्याकडे साहित्य आहे असे म्हटल्यावर मात्र त्याने लगेचच शल्यक्रिया पार पाडली.
त्यानंतर टमटमित फुगलेल्या चाकाच्या जोरावर राष्ट्रीय महामार्ग ४ च्या गुळगुळीत पृषठभागावर फुजीने चांगलाच वेग घेतला. पनवेल शहरात प्रवेश न करता पळस्पे फाट्याहून फुजिने जेएनपीटीकडे जाणारा पनवेल बाह्यवळण मार्ग निवडला. ह्या प्रशस्त मार्गावर फुजी मजेत जाऊ लागली. खरतर तिसरा थांबा घेण्यासाठी कळंबोली येथे थांबण्याचा अस्मादिकांचा विचार होता. पण फुजीला मिळालेली लय पाहता अस्मादिकांना विचार बदलावा लागला. इडली आणि सफरचंद ह्यांचे इंधन संपून आता वेग मंदावू लागल्याची जाणीव फुजीला होईपर्यंत खारघर आले होते. एव्हाना फुजिचे शतकही पूर्ण झाले होते. मग मात्र फुजीने पुन्हा छोटा थांबा घेत संत्र्याचे इंधन भरून घेतले. त्यानंतर तर फुजीचा वेग चांगलाच वाढला. बेलापूर ठाणे हमरस्त्यावरील उड्डाणपूल घेत फुजी लयीत पुढे जात होती. वाटेत दिसत असणारी निराकेंद्र फुजीला खुणावत होती. पण त्या अमिषाला न बधता फुजीने मार्गक्रमण सुरूच ठेवले होते. दरम्यान भास्करबुवा थोडावेळ ढगांच्या दुलईतून बाहेर येऊन फुजिकडे डोळे वटारू लागले होते. अखेर तुर्भे नाका पार होताच थोड्याशा नाराजीनेच एका निराकेंद्रापाशी फुजी थांबली. दोन पेले निरा रिचवल्यावर तृप्त मनाने फुजीने पुन्हा प्रवास सुरू करताच भास्करबुवा पुन्हा गायब झाले.
आयरोलि मुलुंड दरम्यानच्या खाडीवरील पुलावर फुजीने मनसोक्त वारा पिऊन घेतला. खरतर तिथे फुजी वाऱ्यावरच स्वार झाली होती.
संत्रे स्वाहा करत असताना चहाचे इंधन भरण्यासाठी मी मुलुंडला येत असल्याचे आमदिकांनी राहुलला कळवले होते. त्यामुळे तो वाट पाहत होताच. तिथे चिवडा, लाडू आणि चहाचे इंधन भरत असताना गप्पाही रंगात होत्या. मात्र पुढे ठाणे शहर, ठाणे नाशिक हमरस्ता आणि भिवंडी कल्याण हमरस्ता ह्यावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता फुजीला फार वेळ थांबता येणार नव्हते. मुलुंडहून निघतानाच फुजीला आपला अधिक वेळ न थांबण्याचा निर्णय योग्य असल्याचे ध्यानात आले. आनंदनगर चेक नाक्यावर वाहनांची रांगच रांग लागली होती. तेथून शिताफीने वाट काढत फुजी पुढे निघाली खरी पण माजिवडा -रांजनोली-गोवेगाव मार्गे कल्याण गाठेपर्यंत वाहनांच्या भाऊगर्दीने फुजिची साथ सोडली नाहीच. दुर्गाडी पुलावर तर फुजीला साथ द्यायला वरुण राजांनीही हजेरी लावली. तसे ते केवळ शिंतोडे उडवूनच परतले.
९० फुटी रस्त्यावर आल्यावर त्या गोतावळ्यातून फूजीची सुटका झाली. अखेरीस चहास्वाद घेत फुजिने आजच्या शतकी (१०० मैल - १६० किमी) फेरीची सांगता सुफल संपन्न झाल्याची ग्वाही दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा