भारताच्या पूर्व किनाऱ्यावर सूर्य मुंबईपेक्षा जवळपास तासभर लवकर उगवतो. गेल्या दोन दिवसांमध्ये आम्ही आमच्या नियोजित अंतरापेक्षा साठेक किमी अंतर मागे राहिलो होतो. त्यामुळे आज तरी लवकर सुरुवात करण्याची गरज होती. मात्र आम्हा तिघांची अन्हिके आवरून हॉटेल स्वर्णचुडा चा निरोप घेईपर्यंत घड्याळबाबांनी सातचा ठोका दिला होता. आज खरेतर भुवनेश्वर गाठायचा मूळ आराखडा होता. भुवनेश्वर येथून २५० किमी अंतरावर होते. आम्हाला तर एवढ्याच अंतरासाठी दोन दिवस कमी पडले होते. अर्थातच भुवनेश्वर गाठणे आज अवास्तव ठरले असते. मात्र आम्ही फार विचार न करता शक्य तेवढे अधिक अंतर कापायचे असे ठरवले.
सुरुवातीला ३०-३५ किमी अंतर आम्ही वेगात कापले. तिघांनीही आवश्यक सरासरी वेग कायम राखला होता. त्यामुळे मी थेट ७० किमी सायकल चालवून बेलडा येथे नाश्त्यासाठी पोचण्याचे मनसुबे रचत होतो. अर्थातच मी वेग कायम ठेवत पेडल मारणे सुरूच ठेवले. मात्र थोड्या वेळात मागे पाहिले तर संजय आणि आनंद दोघेही दिसेनात. दोघेही बरेच मागे राहिले होते. इतक्यात मला संजयचा फोन आला की आनंदला औषध घ्यायचे आहे. त्यामुळे नाश्ता करण्यासाठी थांबायला हवे.माझ्या डोक्यातील बेलडा गाठायचा विचार बाजूला ठेवून मी जवळपास हॉटेल शोधू लागलो. अर्थातच माझा वेग मात्र मी कायम ठेवला. संजयला मी योग्य हॉटेल सापडले की थांबतो असे सांगून मी पाय मारणे सुरूच ठेवले. जवळपास तासभर अंतरावर 'पंजाबी तडका' हे हॉटेल दिसू लागले.
हॉटेलच्या नावावर मी खुश होतो. इथे चांगले बटाटा पराठे मिळतील असे मांडे मनात मांडत मी दोघांची वाट पाहू लागलो. खरतर हॉटेल माझ्या डोळ्यासमोरच होते. मात्र ते महामार्गाला लागून नव्हते तर सेवा रस्त्याला लागून होते. मी जर हॉटेलमध्ये जाऊन बसलो असतो तर संजय आणि आनंदला मी तिथे थांबल्याचे लक्षात न येता ते पुढे जाण्याची शक्यता होती. त्यामुळे मी रस्त्यामध्ये उभे राहिलो. दोघेही येईपर्यंत बराच वेळ गेला. पहिले ३०- ३५ किमी वेगात मारणारे संजय आणि आनंद अचानक का मंदावले हे मला कळेना. एव्हाना माझी अर्धशतकी मजल पूर्ण झाली होती. आज जर भुवनेश्वर गाठले तर उद्याच्या दिवसात आम्हाला पुरी, कोणार्क येथे चांगला वेळ घालवता येणार होता. माझ्या आणि इतर दोघांमधील अंतर लक्षात घेता मी त्यांना सायकल सकट गाडी करून चांदीखोलला जाण्याचा आणि तेथून पुढे सायकल चालवायला सुरुवात करण्याचा सल्ला दिला. मी त्यांना म्हटले की तुम्ही चांदीखोल पासून कटक पर्यंत पोचेपर्यंत मी तुम्हाला गाठतो.
तथापि, पंजाबी तडका मधील सेवा फारच मंद होती. अर्थात तेथील पदार्थ अतिशय चवदार आणि स्वादिष्ट होते.
पंजाबी तडका मधील सेवकही अतिशय चांगली सेवा देत होते. हॉटेलचा हॉल चांगलाच प्रशस्त होता मात्र हॉटेलमध्ये आम्ही वगळता कोणीच गिऱ्हाईक दिसत नव्हते. सेवा पुरवायला वेळ लागत असला तरी पदार्थांच्या चवीमुळे आम्हीही पुरेसा वेळ देत समोरील पदार्थांचा यथोचित समाचार घेतला. उदरभरण सुरू असतानाच मी आज आणि उद्याच्या पर्यायी मुक्कामांचा विचार करत होतो. मी जो मार्ग निवडला होता त्यामध्ये भुवनेश्वर अगोदर चंडीखोल हे महत्वाचे ठिकाण होते.
वेगवेगळे पर्याय शोधताना मला चंडीखोल शहराची आठवण झाली. बहुधा आनंदने चंडीखोलमधील व्यवस्थेसंबंधी काहीतरी सांगितले होते असे मला आठवले. मी आनंदला विचारले की त्याच्याकडे काही संदर्भ आहे का. त्याने त्याच्याकडील माहिती तपासली. कोणीतरी त्याला हॉटेल मिड ईस्ट चा संदर्भ दिला होता. त्याने हॉटेल मिड ईस्ट सुचवणाऱ्या व्यक्तीला फोन केला. तिथे नक्की सोय होत असल्याचे समजले. अर्थातच आम्ही आटापिटा करत आजच भुवनेश्वर गाठण्याचा बेत रद्द केला. पंजाबी तडका येथील पदार्थांवर ताव मारता मारता आम्ही हॉटेल मिड ईस्टचे ऑनलाइन बुकिंग केले.
मी सुशांतला फोन करून माफी मागितली की त्याने भद्रक आणि भुवनेश्वर येथे राहण्याची ऑफर दिली असली तरी आम्ही ती स्वीकारू शकत नाही आणि आम्ही चंडीखोल येथील हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी त्या हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग केले आहे. त्याने लगेचच विचारले की ते हॉटेल मिडईस्ट आहे का. मी हो म्हटल्यावर तो म्हणाला की ते त्याचेच हॉटेल आहे आणि मला ऑनलाइन बुकिंगचा परतावा मिळेल.
खाणे झाल्यावर आम्ही परत एकदा सायकलवणे सुरू केले. चंडीखोल येथे राहण्याबद्दल आमची खात्री झाली होतीच. त्यामुळे की काय आनंद आणि संजय यांनी वेग आणखीच कमी केला. मी मात्र आधी राखलेला वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्यामधील अंतर मात्र वाढत होते.भद्रक मागे टाकत मी पुढे निघालो. इथे सुशांत आमची व्यवस्था त्याच्या घरीच करणार होता.मात्र आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला असल्याने भद्रक शहराचा आम्ही महामार्गावरूनच निरोप घेतला.सुमारे ४.३० वाजताच मला लक्षात आले की अंधार पडायला सुरुवात झाली आहे. आदित्य नारायणाची साथ संपली की अस्मादिकांना फुजीवर स्वार होणे पसंत नसते. त्यामुळे आता मात्र मी संजय आणि आनंद ह्यांना सोडून माझा वेग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. भास्कराचार्यांच्या पूर्वेकडील भ्रमणाशी आमची लय साधत नव्हती. त्यांची वेळ गाठण्यासाठी माझा आटापिटा सुरू होता.
मी आघाडी वाढवत असताना लक्षात आले की आजचे अजून १७ किमी अंतर बाकी आहे. मी आनंद आणि संजय ह्यांना मेसेज केला की मी आणखी अर्धा तास सायकल चालवेन आणि जिथे पोचेन तिथे ५ मिनिटे वाट पाहेन. तोपर्यंत तुम्ही मला गाठा. त्याप्रमाणे मी अर्ध्या तासाने थांबलो. गुगलबाबा मला सांगत होते की मी हॉटेलपासून ७ किमी दूर आहे. चहाची वेळही होऊन गेली होती. त्यांची वाट बघताना मला चहा हवाच होता. मी पुन्हा मेसेज केला की मी एक चहाची टपरी शोधेन आणि तुम्हा दोघांची वाट पाहेन. अंधारात तिघेही एकत्र असलो तर परत पहिल्या दिवसासारखा गोंधळ झाला नसता. त्यामुळे अंधारात तिघेही एकत्र असणे आवश्यक होते. मला फक्त १-२ किमी पुढे एक चहाची टपरी सापडली. टपरी छोटीशी होती. तिथे बऱ्याच इतर गोष्टीही होत्या. मला भूकही लागली होती. मी आधी एक चहा घेतला आणि त्यांची वाट पाहू लागलो. बराच वेळ गेला तरी दोघेही येण्याची चिन्हं दिसेना. भूकही चाळवली होती. तिथे वेगवेगळे लाडू दिसत होते. मी दोन लाडू घेऊन जठराग्नीला आहुती दिली. तरी दोघांचाही पत्ता नव्हता. आहुती मिळाल्यावर जठराग्नी शांत होण्याऐवजी आणखीच भडकला होता. मी आणखी दोन चार लाडूंची आहुती दिली. त्यावर चहाचे तीर्थ स्वाहा केले.
मी दोघांची वाट पाहत होतो. दरम्यान सुशांतने मला फोन केला. मी कुठे आहे ह्याची त्याला माहिती देत मी दोघांची वाट पाहत असल्याचे त्याला कळवले. मी चहाच्या टपरीवर थांबलो त्या वेळी ते दोघे माझ्यापासून जेमतेम ५-६ किमी अंतर मागे होते. खरतर पंधरा वीस मिनिटात दोघेही येणे अपेक्षित होते. मात्र दोघेही त्या चहाच्या टपरीपाशी पोचेपर्यंत जवळपास एक तास संपला होता. ते पोहोचत असतानाच मला सुशांतचा आणखी एक फोन आला. खरतर तोही त्या टपरीपाशी पोचला होता.
आमची ओळख परेड होताच तो हॉटेलमध्ये आमची व्यवस्थित सोय होत आहे हे पाहण्यासाठी दुचाकीवर पुढे निघाला. आम्हीही त्याच्या नंतर काही मिनिटांतच हॉटेल मिड ईस्ट येथे पोहोचलो. सुशांतने आम्हाला दोन खोल्या मिळवून दिल्या आणि ऑनलाइन बुकिंगसाठी दिलेले पैसेही परत केले.
रात्री जेवण्यासाठीही त्याने आम्हाला आमंत्रण दिले. ते आम्ही नाकारू शकत नव्हतो. सुशांत स्वभावाने खूपच छान आहे. तो लोकांचे आतिथ्य करण्यास उत्सुक असतो. तो couchsurfing (CS) ह्या साइटवर देखील आहे. Couchsurfing हा एकमेकांचे आतिथ्य करणाऱ्या लोकांचा एक समाजमाध्यमावरील समूह आहे. मी देखील त्यावर आहे. सुशांतने मला सीएस वर राहण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात विनंती पाठवण्यास सांगितले. मी लगेचच त्याला CS वर संदेश पाठवला.
आदरातिथ्यात त्याने कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. माझी मत्स्यहाराची आवड समजताच त्याने त्याप्रमाणे ऑर्डर दिली. जेवण करत असताना आम्हाला कळले की उद्या त्याच्या मोठ्या काकीचा १० वा दिवस आहे. म्हणून तो खरतर त्या तणावात आहे. मात्र इतका वेळ आम्हाला त्याने हे जाणवूही दिले नव्हते. जेवण सुरू असतानाच आमच्या गप्पाही रंगत होत्या. तो सांगत होता की तो जगाला भेट देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवावस्थेतच सागरी सेवेत सामील झाला होता. काही काळ तो मुंबईत दिवा येथेही राहिला होता. डोंबिवली शेजारील दिवा येथे तो राहिला असल्याचे समजताच त्याची माझी जवळीक आणखीच वाढली. तो पुढे सांगत होता की त्याने मध्य पूर्व, कोम्बोडिया, व्हिएतनाम, लाओस सारख्या अती पूर्वेकडील देशांना भेट दिली होती. आम्ही त्याच्यासोबत खूप छान वेळ घालवला. आमच्या गप्पा संपत नव्हत्या. मात्र त्याला परत भद्रकला जायचे होते. आमचे जेवण झाल्यावर तो परत घरी निघाला तेव्हा आमची भूक भागली असली तरी आमची गप्पांची भूक कायम होती. सुशांतची आदिरातिथ्याची भूकही तशीच कायम होती. तो मला विनंती करत होता की आमच्या ओळखीतील कोणीही ओरिसा मध्ये येणार असेल तर त्याला आदिरातिथ्याची संधी मिळावी. 'अतिथी तुम कब आओगे'ची त्याची तळमळ त्याच्या बोलण्या वागण्यातून जाणवत होती.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा