आमची दौड सुरू होतीच. आजूबाजूचा सुंदर निसर्ग प्रफुल्लित करत होता. मध्यानाची वेळ उलटून गेली होती. आता इंधनाची सोय करणे आवश्यक होते. सायकल चालवण्यासाठी मनुष्य शक्ती हेच इंधन आवश्यक असते. त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच उदरभरण करणे आवश्यक होते. मात्र आंध्र प्रदेशात शिरल्यापासूनच ह्या महामार्गाला लागून क्षुधाशांतीगृह सापडणे कठीणच होते. सहा पदरी हमरस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता असा एकंदर आठपदरी रुंद असलेल्या ह्या महामार्गालगत आमच्या पोटातील कावळ्यांचे काय करायचे ह्याचे उत्तर सापडत नव्हते.
वास्तविक मी जेव्हा आमची सफर आखली तेव्हा जी महत्वाची शहरे दिसत होती त्यानुसार राहण्याची ठिकाणे निवडली होती. मात्र पहिल्या दिवसापासूनच आम्ही मागे पडत गेलो होतो. माझ्या मूळ आराखड्याप्रमाणे काल रात्री आम्ही श्रीकाकुलम ह्या शहरात मुक्काम करायला हवा होता. मात्र आम्ही आजचा अर्धा दिवस संपल्यानंतर तिथे पोचत होतो. शहर सुरू व्हायच्या बऱ्याच आधीपासून शहर मोठे असल्याचा अंदाज येऊ लागला होता. श्रीकाकुलम हे आंध्र प्रदेशातील जिल्ह्याचे ठिकाण होते. ह्या जिल्ह्यामध्ये बौद्ध पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत.
कलिंगाच्या मध्ययुगीन आणि नंतरच्या ऐतिहासिक काळातील श्रीकाकुलम किंवा चिकाकोल हे खूप महत्वाचे ठिकाण आहे. श्रीकाकुलमचा सर्वात जुना इतिहास पूर्व गंगा राजवंशाच्या काळापासून सुरू होतो. गोवलकोंडा कुतुब शाह्यांनी त्याच्या ताब्यात येईपर्यंत ते नंदापूरच्या सूर्यवंशींच्या थेट राजवटीखाली होते. गोवलकोंडाच्या सुलतानांच्या काळात, श्रीकाकुलम उत्तर आंध्र प्रदेशाचे मुख्यालय बनले आणि प्रशासनाची देखरेख करण्यासाठी 'फौजदार' नावाचा एक अधिकारी नियुक्त करण्यात आला. १६७३ मध्ये जयपूरचा राजा विश्वंभर देव-१ आणि चिकाकोलचा नवाब यांच्यातील युद्धाने या प्रदेशातील गोवलकोंडाचे राज्य संपले. गोवलकोंडाच्या कमकुवत राज्यामुळे, चिकाकोलच्या फौजदाराने नवाब ही पदवी स्वीकारली आणि स्वतंत्र शासन स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तथापि, विश्वंभर देव-१ ने त्याचा पराभव केला, ज्याने उत्तर आंध्र प्रदेशात जयपूरचे राज्य पुन्हा स्थापित केले.
इतका पुरातन इतिहास कालीन असलेल्या ह्या शहराची सध्याची लोकसंख्या साधारण दीड लक्ष आहे. अर्थातच आम्हाला ह्या इतिहासापेक्षा आमच्या वर्तमानाची अधिक काळजी होती. संजय आणि आनंद बरेच मागे पडले असावे. श्रीकाकुलम शहर दिसू लागताच इथे आमची जेवणाची सोय होऊ शकेल असे वाटू लागले. मी उड्डाणपूल टाळून त्या बाजूने जाऊ लागलो. शहरात जाणारे रस्ते मी पाहत होतो. मात्र आनंद आणि संजय दिसतही नसल्याने मी हॉटेल शोधण्यासाठी महामार्ग सोडून आत शिरू शकणार नव्हतो. एका उड्डाणपुलाशेजारून जात असताना मला पुलाखाली तीन कॉलम मधून जाणारे प्रशस्त रस्ते दिसले. शहर डावीकडे होते. शहरात शिरणारे रस्तेही सुंदर, स्वच्छ होते. तसेच पुलाखालील कॉलम मधून जाणारे रस्तेही अतिशय स्वच्छ होते. तिथेच एक कॉलम जवळ मला जेवणाची सोय दिसली. तिथे एक गाडी भोवती बसायला प्लास्टिक ची आठ दहा स्टूल ठेवलेली होती. मामला अगदीच आटोपशीर दिसत होता. ती गाडी चालवायला तीन चार बायका दिसत होत्या. सायकल बाजूला लावून मी तिथे जाऊन जेवायला काय उपलब्ध आहे ह्याची हिंदीमध्ये चौकशी केली. त्यांना काहीच कळेना. इंग्रजीची मात्राही चालत नव्हती. अखेरीस तुटक्या फुटक्या इंग्रजीत त्यांनी तिथे उपलब्ध असलेले तीन पर्याय सांगितले... चिकन राईस, वेज राईस आणि एग राईस.
मुळातच नुसताच राईस खाऊन माझे पोट भरणे शक्य नव्हते. त्यामुळे वेज राईस खाऊन उपयोग नव्हता. एग राईस मी खाऊ शकणार नव्हतो, कारण मला एग चालत नाही. म्हणजे माझ्यासाठी फक्त चिकन राईस हाच पर्याय होता. चिकनचे तुकडे खाऊन तरी पोट थोडे भरणे शक्य होते. मी संजय आणि आनंदला माझे लोकेशन कळवले. थोडावेळ त्यांची वाट पाहिली मात्र त्यांचा काहीच पत्ता नव्हता. अखेरीस मी माझ्यासाठी चिकन राईस ची ऑर्डर दिली. तेथील ताई आग्रहाने पुन्हा पुन्हा राईस, चिकनची करी वाढत होत्या. मी पोटभरून जेवलो. अजूनही माझ्या सहकाऱ्यांचा पत्ताच नव्हता. ते नक्की का आणि किती मागे राहिले कळत नव्हते. मग मी सायकल तिथेच लावून इकडेतिकडे भटकू लागलो. तिन्ही कॉलम वर सुंदर चित्रे काढलेली दिसत होती. मी नुसताच टाईमपास करतोय असे वाटून त्या ताई मला जेवणाचे पैसे मागू लागल्या. मी त्यांना आणखी दोन जण येत आहेत असे सांगितल्यावर त्या शांत झाल्या. मात्र त्यानंतरही जवळपास अर्ध्या तासाने माझे सहकारी आले. एव्हाना माझी चांगलीच विश्रांती झाली होती. त्यांचे जेवण होईपर्यंत मी आजूबाजूला भटकून आलो. तेथील सुंदर सुंदर चित्र पाहून मी खुश झालो. आमचे तिघांचेही मनसोक्त जेवण झाले. तिघांचे मिळून फक्त २१० रुपये बिल! अमर्यादित चिकन राईस फक्त ७० रुपयात! तेही अतिशय रुचकर.
त्या ताईंना आणि त्यांना मदत करणाऱ्या मुलांना आमच्याबरोबर फोटो काढून घ्यायचे होते. त्यांना आमचे खूपच कौतुक वाटत होते. आम्हाला आग्रहाने जेवण तर त्यांनी दिले होतेच त्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आमच्याबद्दलची आपुलकी स्पष्ट दिसत होती. आम्हाला संवाद साधायला भाषेची अडचण येत नव्हती. आम्ही निघत असताना त्यांनी आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या. आम्ही तेथून निघालो ते नवे नाते जोडूनच!






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा