'सायकलिंग...
कधी वाट अज्ञाताची, तर कधी मळलेल्या वाटांची...'
पनवेल येथील माझी सायकल मैत्रीण सुनीता रामचंद्रने सायकलिंग बद्दलच्या भावना अतिशय सुंदर शब्दात गुंफल्या आहेत. कवितेचा समारोप करताना ती म्हणते, 'सायकलिंग ...सुरेल गाणी.. मला शोधणाऱ्या माझ्याच अंतरीची,
एक कहाणी माझ्या समृद्ध होत जाणिवांची'
निसर्गाच्या ओढीने असो की स्वतःचा शोध घेण्यासाठी, स्वप्नांची वाट शोधण्यासाठी असो की अज्ञात वाटेने जाण्यासाठी असो, ... निमीत्त बदलत असले तरी दोन चाकांवरील प्रवास नेहमीच शब्दांपलीकडील आनंद देत असतो. म्हणूनच बहुतेक एक प्रवास संपत असतानाच मनात दुसऱ्या प्रवासाचे आडाखे तयार होत असतात. ५ वर्षांपूर्वी YHAI बरोबर भारताचे दक्षिण टोक कन्याकुमारी चक्राकांत केले तेव्हाच उत्तर दिशा खुणावू लागली होती. खरंतर संपूर्ण भारत देशाची सीमारेषाच खुणावू लागली होती. मनाने तर युरोप ते ऑस्ट्रेलिया भरारी घ्यायला सुरुवात केली होती. इंग्लंडमधील मित्र ज्यो बरोबर डोंबिवली ते पालघर सायकल सफारी केली तेव्हा मन त्याच्याबरोबर त्याच्या ऑस्ट्रेलियापर्यंतच्या प्रवासात भटकत होते.
तोच अनुभव एकमेकांशी लग्न करण्याचा, तसेच लग्न केल्यास कुठे राहायचे याचा निर्णय घेण्यास स्वीझरलँडची जस्सी आणि ऑस्ट्रेलियाचा मॅट ह्यांनी जस्सीच्या स्वीझरलँडच्या घरापासून मॅटच्या ऑस्ट्रेलियातील घरापर्यंत केलेल्या सायकलसफारी बद्दलचा 'पेडल प्रॉमिस' हा ब्लॉग वाचताना येत होता. माझे सायकलप्रवास सुरू होतेच. त्यातच कॉलेजमध्ये असताना माझा मित्र अविनाशने माझ्या मनात रुजवलेले डोंबिवली गोवा सायकलसफरीचे स्वप्न वर्षभरापूर्वी माझी सहचारिणी मीराबरोबर पूर्ण झाले होते. खरतर मीराने सायकल चालवायला सुरुवात केली ती केवळ माझ्याबरोबर राहण्यासाठी. पण तिची साथ मिळाल्यावर वेळोवेळी काहीना काही कारणांमुळे पुढे ढकलले जाणारे डोंबिवली गोवा सायकलसफरीचे स्वप्न पूर्ण होताच झालेला आनंद अवर्णनीय होता. अर्थातच एक सायकलप्रवास पुढील सायकलसफरीसाठी उत्साह, प्रोत्साहन देत असतोच. इतरांना आपल्या पुढील सायकलसफरीबद्दल उत्सुकता असते तशीच उत्सुकता आपल्यालाही लागून राहते. अनेक योजना मनात घर करू लागतात. मनातील अनेक योजनांच्या गुंत्यातून नेमकी एक योजना नक्की करेपर्यंत मन शांत दिसत असते. मात्र ती शांतता केवळ वरवरची असते, तळाशी सगळ्या योजनांचे एकमेकांशी द्वंद्व सुरू असते. अश्याच वेळी कोणीतरी सायकल मित्र ही अश्याच द्वंद्वात अडकला असताना त्याचे मन मोकळे करतो. दोघं- तिघांच्या किंवा अधिक सायकलमित्रांच्या मनातील गुंत्यातील सामायिक दुवे जुळत एक ठिकाण निश्चित होते आणि नवा सायकलप्रवास निश्चित होतो.
मी आणि मीराचा जोडीने मुंबई गोवा सायकल प्रवास झाल्यावर अश्याच योजना मनात पिंगा घालत होत्या. एके दिवशी ऑफिसहुन घरी येताच मीरा म्हणाली, 'अरे, मावशीचा फोन आला होता. तुझा फोन लागत नव्हता. जरा फोन करून बघ.' माझा सायकलप्रवास नियमित सुरू झाला तो माझी मावशी निरुपमा भावे हिच्यामुळेच. लहानपणापासून माझी समजूत काढण्याचे काम ती अतिशय सहजपणे करत असे. वाचन हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा छंद. मावशीकडे तर पुस्तकांचा खजिनाच होता/ आहे. त्यामुळे लहानपणी मी तिच्याकडे राहायची संधी शोधतच असे. त्यातच माझा मावसभाऊ हर्षुने माझी ओळख माझ्या पहिल्या प्रेयसीशी करून दिली होती. ती पितवर्णीय, सुबक ठेंगणी होती. तिच्याबरोबर पहिल्यांदाच फिरताना आम्ही दोघे एकमेकांबरोबर झुडुपात पडलो आणि लगोलग एकमेकांच्या प्रेमात पडलो. ती होती हर्षुची सायकल. पुस्तके आणि सायकल हे दोन्ही छंद मावशीकडे अधिकच वाढीस लागले होते. माझा पहिला लांबचा सायकलप्रवास मावशीबरोबरच झाला होता. त्यामुळे मावशीचा फोन आल्याचे कळताच ऑफिसहून आल्याचा शीण पळून गेला. गेले काही दिवस जसे माझ्या मनात सायकलप्रवासाचे बेत शिजत होते, तसेच मावशीच्या मनातही ते शिजत होतेच.
फोन लावताच मावशीने सांगितले , 'आपण येत्या डिसेंबरमध्ये सायकलप्रवासाला एकत्र जाणार आहोत.' ती माझी परवानगी विचारत नव्हती, ती सांगत होती. मीराला स्वतःबद्दल थोडी साशंकता वाटत होती. मावशीने तीही दूर केली.
मावशीने पुढील सायकलप्रवासाची दिशा सांगितली,'पुणे जम्मू..'

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा